रात्री नऊ वाजताची वेळ. हवालदार माने ड्युटी संपवून बाहेर पडले. घरची मंडळी माहेरी गेलीय. त्यामुळं पिंपळदरा चौकातील वाईन शॉपपाशी गाडी थांबवायची. एक क्वार्टर घ्यायची. खुशवंतसिंगच्या ढाब्यावर जायचं. दारूसोबत फक्कड जेवण करायचं आणि मग घरी जायचं, असा त्यांचा बेत होता. आणि ठाणे अंमलदार काकडेंनाही सांगितलं होतं. त्यानुसार चौक येताच त्यांनी वेग कमी केला आणि एक वळण घेतलं. तोच समोरच्या गल्लीतून एक पोरगा पळत सुटलाय आणि त्याच्यामागे दहा-पंधराजण लागलेत, असं त्यांना दिसलं. त्यांनी एका क्षणात गाडी त्या पोराच्या मागे दामटली. आणि कॉलरला हात घालत त्याला पकडलं. मागं पळत आलेल्या लोकांनी त्याच्यावर हात उगारला. तो मानेंनी रोखला. वीस-बावीस वर्षाचा चोरटा अंगपिंडानं किरकोळ होता. आता ठाण्यात कॉल करून मोबाईल व्हॅन बोलावण्यापेक्षा आपणच याला जमा करून येऊ, असं म्हणत मानेंनी त्याच्या खिशातील मंगळसूत्र स्वत:च्या खिशात टाकलं. त्याला गाडीवर बसवलं. तेव्हा तो थरथरत होता. पाच मिनिटात त्याला घेऊन ते ठाण्यात पोहोचले. डायरीत सगळी नोंद केली. चोरट्याला कोठडीत टाकून दिलं. ठाणे अंमलदार काकडेंना प्रकरण समजावून सांगितले. आणि पुन्हा गाडीला किक मारून ते चौकात पोहोचले. वाईन शॉपमधून एकाऐवजी दोन बाटल्या घेतल्या. लगोलग ढाब्यावर पोहोचले. खुशवंतसिंगला आधीच मोबाईलवरून कळवलं असल्यानं त्यानं सगळी तयारी करून ठेवली होती. मद्याचा अंमल चढून, तेज तर्रार जेवण झालं. आणि बिल देताना काऊंटरवरच्या पोराकडं पाहताना त्यांना अचानक त्या चोरट्या राजूची आठवण झाली. रात्रीच त्याचा जबाब नोंदवून घ्यावा, असा विचार करून ते ठाण्यात, कोठडीत पोहोचले. तेव्हा तो चोरटा कोपऱ्यात अंगाचं मुटकुळं करून पडला होता. दोन-तीन फटक्यातच त्यानं घडघड सगळी घटना सांगितली. घरची खूप गरिबी आहे. त्यामुळं कुणालदादाच्या नादाला लागून चोरी-मारी करू लागलो. दादा आता त्याच्या सावत्र आईकडं सापडंल. असंही सांगितलं. त्यामुळं माने कमालीचे खुश झाले. आणखी काय काय केलंय. तुमची किती लोकांची टोळी आहे, असं त्यांनी त्याच्या पेकाटात लाथ घालत सांगितलं. तेव्हा त्यानं जे सांगितलं ते ऐकून मानेंवरील मद्याचा राहिला साहिला अंमलही उतरून गेला. त्यांनी आवाज वाढवत त्याला पुन्हा विचारलं. तो पुन्हा उत्तरला, हो … मी, कुणालदादा आणि दोन जणांनी मिळून एक मृतदेह मोती तलावात फेकलाय. ५० हजार रुपये मिळाले त्या कामाचे. मानेंनी वेळ गमावला नाही. कुणाल आणि बाकीच्यांना ताब्यात घेतलं. इन्सपेक्टर चव्हाण दाखल झाले. सायंकाळी तलावात शोधाशोध करून पूर्ण सडलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. पण तो नेमका कोणाचा होता, हे ना कुणालला माहिती होतं, ना राजूला. मग चव्हाण यांनी एक एक धागा जोडला. तेव्हा हा मृतदेह बांधकाम ठेकेदार बलदेवचा असल्याचं कळालं. वयाच्या पन्नाशीत पोहोचलेल्या बलदेवची पत्नी दिलजित कौर पंजाबमधील सुखवस्तू घराण्यातील होती. मुलीचा विवाह झालेला होता. जावई हरविंदरसिंग इलेक्ट्रीकल वस्तूंचा मोठा वितरक होता. त्याचे सासऱ्याशी मुळीच पटत नव्हते. कारण बलदेवची तीन प्रेमप्रकरणे होती. सीमा, मीना आणि दीपा या त्याच्याकडं काम करणाऱ्या महिलांशी त्याचे संबंध होते. त्यातली सीमा हे त्याचे नवे प्रकरण होते. ती पती संतोषला सोडून बलदेवसोबत राहू लागली होती. दोन वर्षात तिला बलदेवने एक टु बीचएकेचा फ्लॅट घेऊन दिला. पण ती लग्नासाठी मागे लागली होती. पण त्यानं ते झिडकारून लावलं होतं. दुसरीकडं मीनाचा चुलत भाऊ आणि बलदेवकडेच सुपरवायजर म्हणून कामाला असलेला कृपालसिंग बलदेवच्या मागावर होता. बहिणीला किमान पन्नास लाख रुपये दे, अशी त्याची मागणी होती. तर दीपा एकटीच्या बळावर हिशोब चुकता करण्याच्या विचारात होती. म्हणजे बलदेवला मारण्यासाठी अनेकजणांकडे ठोस कारण होते. पण कोणी त्याचा काटा काढला. मृतदेह तलावात टाकण्यासाठी कुणाल आणि टोळीला पन्नास हजार रुपये दिलेॽ इन्सपेक्टर चव्हाण, हवालदार मानेंनी सर्व दिशांनी तपास सुरू केला.
No comments:
Post a Comment