लॉकडाऊनमध्ये बहुतांश लोक इंटरनेटवर तुटून पडले. कारण मनोरंजनासाठी दुसरा पर्याय नव्हता. बहुतांश मराठी घरांमध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन, मॅक्स प्लेअर, झी हाच आधार आहे. तमाम हलक्या फुलक्या, विनोदी मालिकांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. साऊथचे अक्षरश: शेकडो हिंदी डब सिनेमे एकापाठोपाठ एक पाहणे सुरू आहे. त्यात राजामौलींचा ‘बाहुबली’ अजूनही हिट आहे. तो आणि इतर अनेक साऊथ सिनेमे पाहताना असे वाटत होते की, मराठीमध्ये एवढी भव्य, दिव्य, वैविध्यपूर्ण निर्मिती होऊ शकते काॽ कदाचित … लवकरच. पण त्यासाठी काही गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील. त्यातील पहिली म्हणजे भाषा, राहणीमान, खान-पान आदी मुद्यांवरून कलावंतांनी इतर प्रांतीयांची टिंगल टवाळी उडवणे तत्काळ थांबवले पाहिजे. उलट त्यांच्यातील काही चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत. कठोर मेहनत, कल्पकता, नाविन्य, मानवी मूल्ये हेच कला निर्मितीचे प्रमुख सूत्र असले पाहिजे. दुसऱ्याची रेष पुसल्याने काही होऊ शकत नाही. आपल्याला मोठी रेष ओढावी लागेल. हा संदेश मराठी माणसाच्या मनामध्ये मराठी एकांकिका, नाटक, मालिका, सिनेमांमधून सातत्याने पेरण्याचे काम मराठी कलावंतांना खूप मनापासून करावे लागणार आहे.
आपल्यापैकी अनेकजण
दाक्षिणात्यांना कितीही नावे ठेवत असले. लुंगीवाले, मद्रासी, कारकुंडे असे म्हणत त्यांना नावे ठेवण्याचा
अभिमान बाळगत असले तरी ती मंडळी आपल्यापेक्षा अफाट, अचाट
विचार करतात. तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाची बाजी लावतात, हे तुम्ही, आम्ही मान्य केले नाही तरी सत्य आहे.
कितीही झाकून ठेवले तरी ते जगाला कळतेच. या अशा अफाट, अचाटपणामुळे
त्यांच्यात अतिशयोक्तीची परंपरा निर्माण झाली असे म्हटले तरी अतिशयोक्ती किती अद्भुत,
कलात्मकतेने, ताकदीने करता येऊ शकते, हे देखील त्यांच्याकडे पाहूनच शिकावे लागेल. अनेक प्रांतात साऊथवाली मंडळी आपल्यापुढे गेलेली आहेत. त्यातील एक म्हणजे सिनेमा. मराठी
माणसाचे बोट धरून त्यांनी सिनेमाची निर्मिती सुरू केली. आणि पाहता पाहता ते आशय, विषय, कथानक, मांडणी, चित्रीकरण, पटकथा, भडकपणा,
मसाला या साऱ्यामध्ये आपल्या पुढे निघून गेले आहेत. केवळ मराठीच
नव्हे तर सर्व भाषिकांवर त्यांची मोहिनी चालत आहे.
बाहुबली, थडम, एट बुलेटस् किंवा इतर अनेक सिनेमे पाहून दक्षिणेतील मंडळी
किती वैविध्यपूर्ण निर्मिती करू शकतात. साध्या कहाणीला भावना, तत्वांची जोड देत, एक ठोस संदेश सांगत कसे खिळवून ठेवतात.
तंत्रज्ञानाचा वापर करून तोंडात बोटेच नव्हे तर पूर्ण हात घालायला लावतात, याची प्रचिती येते.
तसं पाहिलं तर बाहुबलीची
कहाणी घिसीपिटी. शेकडो हिंदी मसाला सिनेमात येऊन गेलेली. म्हणजे एक चांगला माणूस
असतो. त्याचे एक छान कुटुंब असते. एक दिवस एका दुष्ट माणसाची त्याच्यावर छाया
पडते. तो कुटिल कारस्थान करून चांगल्या माणसाचा संसार उद्ध्वत करतो. पण देवाची कृपा म्हणून त्या चांगल्या माणसाचा छोटा मुलगा
वाचतो. पुढे चालून हा छोटा मुलगा मोठा होऊन दुष्ट माणसाचा खात्मा करतो. बाहुबलीत
हेच कथानक मांडण्यासाठी एक दीड हजार वर्षापूर्वीचा काळ निवडला आहे. त्यात दाखवलेले राज्य
दाक्षिणात्य असले तरी त्यात इतर राज्यांचा दु:स्वास नाही. दक्षिणेत एकेकाळी एवढे
संपन्न राज्य होते, असे दर्पाने सांगणारे एकही वाक्य नाही. प्रसंगही नाही.
राजामौलीचा हा सिनेमा केवळ मनोरंजन करत नाही तर राजसत्ता कशी असावी, याचाही संदेश देतो. त्यात रामय्याच्या तोंडी एक वाक्य आहे. ती
म्हणते –शत्रूपासून गोरगरिब प्रजेचे रक्षण करणे हेच केवळ राजाचे कर्तव्य नाही. तर शत्रूशी
लढताना गरिबांचे, प्रजेचे प्राण जाणार नाही, याचीही काळजी घेतो तोच खरा राजा.
बऱ्याच वेळा समान ताकदीचे, एकसारखी क्षमता असलेले दोन लोक प्रगतीच्या वाटेवर दीर्घ काळ सोबत चालतात.
त्यातील एकजण पुढे निघून जातो. लोकप्रिय होतो. लोकांच्या हृदयावर राज्य करू लागतो.
असे का होते...कारण फक्त ताकदीने जनतेच्या मनावर ताबा मिळवता येत नाही. त्यासाठी चांगुलपणा
अत्यावश्यक असतो. त्यापुढे सगळी शक्ती, बळ फिकी
पडतेच. सुरुवातीच्या काळात बळ, शक्ती, डावपेच
पुढे जाताना दिसले तरी अखेरच्या टप्पयात चांगुलपणाच त्यावर मात करत लोकांची मने
कायमसाठी जिंकतो. म्हणूनच तर चांगुलपणाचे बीज फार कमी लोकांना सापडते. बोटावर
मोजण्या इतक्यांना ते फुलवता येते आणि एखाद्यालाच ते जगवता, वाढवता,
पेरता येते. असा एखादाच मग ‘बाहुबली’ होतो. किमान मराठी कलावंतांनी हे लक्षात घ्यावे, असे लॉकडाऊनच्या काळातील
चिंतन सांगते.
No comments:
Post a Comment