Sunday, 31 May 2020

झाकोळलेल्या वाटेवरचा रंगयात्री

कोरोनाच्या संकटाने मोठी पडझड सुरू आहे. अनेकांच्या घरांचे आधारस्तंभ कोसळत आहेत. त्यात सौम्य व्यक्तिमत्वाचे, चिंतनशील आणि चतुरस्त्र लेखक रत्नाकर मतकरी यांचे जाणे म्हणजे रंगमंचावर नेपथ्यकाराने मोठ्या प्रयत्नाने उभा केलेला चिरेबंदी, देखणा वाडा कोसळण्यासारखेच आहे. आयुष्यभर इतरांच्या वाटचालीची काळजी घेणारा हा नाटककार अशा नाट्यमयरित्या आपल्यातून असा निघून जाईल, अशी कोणी कल्पनाच केली नव्हती. वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे १९५५ साली ‘वेडी माणसं’ नावाची एकांकिका मतकरींनी लिहिली. ती बऱ्यापैकी गाजली. मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘माझे रंगप्रयोग’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात त्यांनी त्या काळातील दिवसांचे अतिशय तटस्थपणे वर्णन केले आहे. त्यात ते कुठेही गुंतलेले दिसत नाहीत. चुकांची जबाबदारी आपल्यावर घेणे आणि यशाचे श्रेय इतरांना देणे, हा त्यांचा स्वभाव असल्याचे पानापानावर जाणवत राहते. मराठी रंगभूमीने १९६०नंतर मोठे वळण घेतले. दिवाणखाना, कौटुंबिक समस्या आणि मनोरंजनात अडकलेले मराठी नाटक वास्तवाशी भिडू लागले. समाजात दिसणाऱ्या समस्या रंगमंचावर येऊ लागल्य आजूबाजूला दिसणारी, क्रूरपणे वागणार हिंसक होणार धार्मिकतेचा लेप लावून बसलेली व्यक्तिमत्वे धडकू लागल रंगमंचाचा अवकाश मोडून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली त्याचे श्रेय निर्विवादपणे विजय तेंडूलकर, जयवंत दळवी, प्रेमानंद गज्वी, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांना द्यावे लागेल. त्याच काळात हिंदी रंगभूमीवर मोहन राकेश, शंकर शेष, गिरीश कर्नाड यांचा दबदबा सुरू झाला होता. राज्य नाट्य कामगार नाट्य स्पर्धांमध्ये तेंडूलकर आणि इतर समकालीनांची नाटके बहुचर्चित होती. त्यावर तत्कालिन प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा होत असे नाटकातील व्यक्तिरेखा मांडणी आणि लेखकाने दिलेला संदेश यावर अनेकदा गदारोळ ठरलेला असे एकीकडे असे सारे सुरू असताना रत्नाकर मतकरी वेगळी वाट निवडून त्यावर एक एक पाऊल निश्चयाने टाकत होते. कदाचित अभिनिवेशाने काही करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. ती त्यांची जडणघडण नव्हत. त्यांचा तो पिंड नव्हता. त्यामुळे १९६०-७०च्या दशकात मराठी रंगभूमी राजकीय, सामाजिक नाट्यांनी आणि लेखकांच्या वादग्रस्त विधानांनी ढवळून निघत असताना मतकरी त्यात कधीच रंगले नाहीत. नर्मदा बचाओ आंदोलन व निर्भय बनो आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पण स्वतः तयार केलेल्या, किंचित झाकोळलेल्या वाटेने चालणे बहुधा त्यांना आवडत असावे याचा अर्थ त्यांना सामाजिक भान नव्हते असे मुळीच नाही परंतु ते सांगण्याचा, व्यक्त होण्याचा त्यांचा मार्ग खूपच वेगळा होता. तो त्यांनी लोककथा ७८ मध्ये दाखवून दिला. अंगावर शहारे आणणारे, जात, वर्ण, वर्ग व्यवस्थेवर कठोर प्रहार करणारे नाट्य त्यांनी अतिशय ताकदीने लिहिले. साधारणत तीस वर्षांपूर्वी विजय देशमुख यांच्या दिग्दर्शनात बजाजच्या संघाने औरंगाबादला कामगार नाट्य स्पर्धेत लोककथाचा प्रयोग केला होता. सर्वच कलावंतांना जीव ओतून भूमिका केल्या होत्या. त्यामुळे पडदा पडत असताना ललित कला भवनात टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्याचे मोठे श्रेय अर्थातच मतकरींच्या लेखणीला होते. तेव्हा मला ते खूप बंडखोर आणि उग्र व्यक्तिमत्वाचे असावेत असे वाटले होते. पण ‘खोल खोल पाणी’ नाटकाच्या एका प्रयोगासाठी परवानगी घेण्याकरिता रमाकांत मुळे सरांसोबत मी मतकरींच्या घरी गेलो. दादरच्या हिंदु कॉलनीत सकाळच्या वेळी पोहोचलो. तेव्हा त्यांनी मृदू हास्य करत आमचे स्वागत केले. "केव्हा पोहोचलात अशी चौकशी केली आणि एका क्षणात प्रयोगाच्या परवानगीचे पत्रही दिले.मतकरींचे रंगभूमीवरील योगदान अतिशय व्यापक आहेच. पण त्यांना केवळ नाटककार म्हणणे म्हणजे त्यांच्यातील इतर प्रतिभांवर अन्याय करणे होईल. कारण ते कधीच नाटकांच्या चौकटीत बांधून राहिले नाहीत. त्यांनी बालनाट्य कथा, गूढकथा, ललित लेखन, वैचारिक साहित्य असे चौफेर लेखन केले. त्यांच्या ॲडम कादंबरीने त्या काळी तरुणाईत मोठा धुमाकूळ घातला होता. आणि थरारक गूढकथा. त्या कशा विसरता येतील. खरेतर मतकरी म्हणजे साधे, सरळ व्यक्तिमत्व. त्यामुळे त्यांच्यात हा गूढकथांचा थरार कुठून आला हे खरेतर त्या अर्थाने रहस्यच म्हणावे लागेल. माझ्या मते त्यांचे सर्वात मोठे योगदान बालरंगभूमीसाठीचे आहे. त्यांच्या आत्मचरित्रवजा कथनात त्यांनी जे काही सांगितले ते वाचून मन थक्क होते. ज्या काळात मुलांच्या मनोरंजनाचा कोणी फार विचार करत नव्हते. त्या काळात त्यांनी शाळा-शाळांत जाऊन बालनाट्ये केली. प्रसंगी आर्थिक फटका सहन केला. पण मुलांमध्ये नाटकाची आवड निर्माण करणे हे आपले कर्तव्यच आहे, या जाणिवेपासून तसूभरही मागे हटले नाही. पै – पै जोडून, खस्ता खात, संसाराला टाके देत प्रयोग करत राहिले. अशा सरळमार्गी, सामाजिक भान राखणाऱ्या व्यक्तिमत्वाविषयी सांगणाऱ्या लोककथा काही वर्षांनी नक्कीच तयार होतील. होय नाॽ

No comments:

Post a Comment