Tuesday, 19 May 2020

ॲपेकॅलिप्टो : जंगलाकडं जायला हवंॽ


रात्रीची वेळ. टीव्ही चॅनेल्स सर्फिंग करताना अचानक स्र्क्रीनवर काहीतरी अद्‌भुत दिसू लागतं. रिमोटवरील बोट तसेच राहते. काही क्षणात तुमचा मेंदू पडद्यावरील प्रत्येक हालचालीत, कथानकात झपाट्याने गुंतत जातो. सबटायटल्स, दृश्यांची सांगड घालत अर्थ समजून घेऊ लागतो. एकाबाजूला त्यातील पिळवटून टाकणारा आदीम संघर्ष क्षणाक्षणाला अस्वस्थ करतो. दुसरीकडं चित्रीकरणाची भव्यता, अद्‌भुतता पाहून आश्चर्यचकित करत जाते. मानवी इतिहासाचे एक निराळेच रूप दाखवून पडद्यावरचे कथानक थांबते. पण शेवटच्या ऐंशी सेकंदातील चारच संवादांनी अख्खा सिनेमा पुन्हा डोळ्यांसमोरून फिरू लागतो. एवढी शक्ती शेवटामधील प्रत्येक शब्दांत ओतली आहे.  
हा सिनेमा आहे, मेल गिब्सन यांचा ‘ॲपेकॅलिप्टो’. सिनेजगताच्या इतिहासातील सर्वोत्कृष्टपैकी एक असलेल्या ‘ॲपेकॅलिप्टो’ची कहाणी, मांडणी, सादरीकरण थरारक. ध्वनी, रंगभूषा, वेशभूषा सारेच नजर खिळवून ठेवणारे. कधीकधी त्यातील तपशील पाहता पाहता थकवून टाकतो. कारण मेल गिब्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर अतिप्रचंड मेहनत घेतली आहे. कोलंबसने पंधराव्या शतकात अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वीची तेथे माणूस कसा राहत होता, याचे डोळे विस्फारून टाकणारे दर्शन घडवले आहे.
असे म्हटले जाते की, मूळचा इटालियन कोलंबस स्पेनच्या राणीच्या आदेशावरून भारताच्या शोधासाठी निघाला होता. कारण त्या काळात भारतात आर्थिक सुबत्ता होती. येथील संपत्तीवर स्पेनला कब्जा करायचा होता. पण त्याच्या गलबताची दिशा हुकली आणि तो पोहोचला अमेरिकेच्या किनाऱ्यावर. त्याला वाटले तो भारतातच पोहोचला. म्हणून त्याने तेथे हजारो वर्षांपासून राहणाऱ्या माणसाला रेड इंडियन असे नाव दिले. त्याने तसेच त्याच्यानंतर आलेल्या युरोपियनांनी रेड इंडियन्सच्या क्रूर कत्तली केल्या. त्याच्या शेकडो कहाण्या आहेत.
पण कोलंबसचे पाऊल अमेरिकन खंडात पडण्यापूर्वी तिथं नेमकं काय होतं. तिथं माणूस कसा राहत होता. त्यांच्यातील नाते-संबंध कसे होते, याचा शोध मेल गिब्सनने ‘ॲपेकॅलिप्टो’मध्ये घेतला. तेव्हा माणूस मग तो कुठल्याही कालखंडातील, प्रदेशातील असो. माणूस कायम माणसाच्या रक्तासाठी आसूसलेलाच आहे. कोणत्यातरी कारणावरून दुसऱ्यावर हल्ला करणे, सूड उगवणे, भोसकणे, गुलाम बनवणे, दगाबाजी, मुडद्याच्या छातीवर नाच करत थयथयाट करणे यात माणूस रंगलेला आहे, असेच दिसले. मग मेक्सिकोतील मायन संस्कृतीचे जे अवशेष शिल्लक आहेत. पुरावे उपलब्ध आहेत. त्यावरून त्याने कथानकाची रचना केली आहे. ते असे आहे की, मायन साम्राज्याचा ढासळलेला पाया सावरण्यासाठी आणखी काही मंदिरे बांधा, असा सल्ला राजाला त्याचा ज्योतिषी देतो. या बांधकामासाठी मजूर हवेत. ते आणण्यासाठी मायन साम्राज्याचा क्रूर सेनापती जंगलांतील खेडेगावांत शिरतो. तेथील आदिवासींवर हल्ला करतो. त्यांना गुलाम बनवून साम्राज्यात आणतो. पण त्या गावचा तरुण नायक जग्वार तेथून निसटतो. गावाकडे धावत सुटतो. त्याला मारण्यासाठी सेनापती, त्याचे सैनिक जीवघेणा पाठलाग करतात. दरम्यान, हल्ल्यातून नशिबाने बचावत गावात राहिलेली जग्वारची गर्भारशी पत्नी एका खोल खड्ड्यात पडते. तुफानी पाऊस सुरू होतो. तिला प्रसववेदना सुरू होतात. पाठलागावरील एकेक हल्लेखोराला टिपून यमसदनाला पाठवत जग्वार गावात पोहोचतो का. पावसाने भरत जाणाऱ्या खड्ड्यातून त्याची पत्नी कशी बाहेर येते का, याचा थरार पडद्यावरच पाहावा, असा आहे. काळ उभा करणे, यात हॉलिवूडवाले एकदम मास्टर आहेत. ‘ॲपेकॅलिप्टो’ पाहताना ते आणखी ठसते. आपण चौदाव्या शतकातील अमेरिकन जंगलात आहोत, असेच वाटत राहते. त्यासाठी मेल गिब्सनने अचूक वातावरण निर्मिती केली आहे. शिवाय त्यावेळच्या लोकांची एक भाषा तयार केली आहे. त्या अपरिचित भाषेच्या आरोह-अवरोहांवर कलावंतांनी जो अभिनय केला तो शब्दांच्या पलिकडला आहे. बाळाच्या जन्माचा प्रसंग रोमांच उभा करतो.
अनेक अंगांनी चकित करणाऱ्या या सिनेमाचा शेवट अत्यंत प्रभावी. एकूणच मानव जातीला काहीतरी सांगणारा. क्रूर मायन सेनापतीच्या हल्ल्यातून बचावलेला आदिवासी नायक जग्वार, त्याची पत्नी निबिड जंगलात निघाले आहेत. सोबत एक नवजात आणि दुसरा तीन-चार वर्षांचा मुलगा आहे. उंच डोंगरावरून ते दोघे किनाऱ्यावर नजर टाकतात. तेव्हा कोलंबसचे जहाज अमेरिकेच्या किनाऱ्यावर लागले आहे. जग्वारची पत्नी त्याला विचारते, ‘आपण त्यांच्याकडे जायचंयॽ’ जग्वार ठामपणे उत्तर देतो, ‘आपण पुन्हा जंगलाकडं जायला हवं. नवी सुरुवात करण्यासाठी.’
कोरोनामुळे काही माणसांना जंगल तोडीची आठवण येतेय. श्रीमंत होण्यासाठी आपण पर्यावरणाचा खूपच नाश केलाय, असं काहीजणांना वाटतंय. मीच शक्तीशाली असं म्हणत जाती-धर्माच्या नावाखाली एकमेकांचे रक्त पिणं चूक आहे, असेही विचार बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या मनात घोळू लागले आहेत. त्यांच्यासाठी ही ‘ॲपेकॅलिप्टो’ची कहाणी सांगितली. बाकी काही नाही.     


No comments:

Post a Comment