Sunday, 31 May 2020

अपघात नाही...मग?


सत्यजित कम्युनिकेशन्स, सत्यजित कन्स्ट्रक्शन्स, सत्यजित फॅशन्स अशा किमान पंधरा कंपन्यांचा मालक असलेला सत्यजित म्हणजे एकदम तरणेबांड, देखणे व्यक्तिमत्व. त्याच्याकडे कामाचा प्रचंड पसारा होता. अर्थात कारभार चालवण्यासाठी काहीजणांची मदत मिळत होतीच. त्यातील एक होते. त्याचे वडिल भैरवसिंग. वय साठीच्या पुढे ढळले, एका पायाने किंचित अधू असले तरी त्यांच्यात उत्साहाची मुळीच कमतरता नव्हती. साऱ्या कंपन्यांच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे व्यवस्थापक उत्तमसिंग हे देखील सत्यजितच्या विश्वासू कर्मचाऱ्यांमध्ये गणले जात होते. त्यांना साऱ्या व्यवहाराची खडा न खडा माहिती होती. मालकाच्या बंगल्यात थेट आतपर्यँत त्यांना प्रवेश होता. सत्यजित, भैरवसिंगांनी काय खावे, काय खाऊ नये, हे देखील तेच ठरवत. किचनचा प्रमुख मनोहरसिंग आणि त्याची पत्नी रुपाराणीला ते आठ दिवसांचा मेन्यू ठरवून देत. गेल्या काही महिन्यांपासून उत्तमसिंग अशा प्रयत्नात होते की, लवकरात लवकर सत्यजित विवाहबंधनात बांधले जावेत. माझे आता वय होत चालले आहे. फारकाळ मी सेवा करू शकणार नाही. त्यामुळे एखाद्या रुपवान, सुंदर मुलीशी लग्न करा, असे ते सत्यजित यांना सुचवत होते. भैरवसिंग यांनाही त्यांनी तसे सांगितले. पण त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मुलगा तरुण आहे. त्याला आणखी काही वर्षे जीवनाचा आनंद घेऊ द्या, असं ते म्हणत होते. तरीही उत्तमसिंग यांनी त्यांची नातेवाईक असलेल्या कामिनीचे फोटो सत्यजितला दाखवले. त्याला ती आवडली असे वाटल्यावर दोघांच्या काही भेटीही त्यांनी घडवून आणल्या. एवढ्या मोठ्या साम्राज्याची राणी होण्याची कामिनीची इच्छा सत्यजितची भेट झाल्यावर आणखी बळावली. आता लग्न करेन तर याच्याशीच असे तिने आडपडद्याने उत्तमसिंगांना सांगूनही टाकले. ती अतिशय उच्चशिक्षित तर होतीच. शिवाय महत्वाकांक्षीही होती. तिने तिच्या काही मैत्रिणींमार्फत माहिती काढली. तेव्हा सत्यजित फॅशन्सच्या सीईओ मालविका माथूरसोबत आपल्या भावी नवऱ्याचे प्रेमप्रकरण नुकतेच संपले असावे, असे तिला कळाले. मालविकाही महत्वाकांक्षी. तिलाही मोठ्या साम्राज्याची सम्राज्ञी होण्याची मनापासून इच्छा होती. पण एका पार्टीत मद्यपान करण्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्याचे रुपांतर ब्रेकअपमध्ये झाले. सत्यजित नव्या साथीदाराच्या शोधात असतानाच कामिनी त्याच्या आयुष्यात आली होती. पण त्याचे मन अधूनमधून मालविकाभोवती फिरतच होते. तिच्यातील व्यावसायिक चाणाक्षपणा त्याला भावत होता. त्यामुळे वैयक्तिक संबंध बिघडले असले तरी त्याने तिच्या नोकरीवर गदा आणली नव्हती. मात्र, ती दुसरी कंपनी शोधत होती. किरकोळ कारणावरून पार्टीत आवाज वाढवणाऱ्या सत्यजितला धडा शिकवावा, असे तिला तिचे मन वारंवार सांगत होते. अनेक वर्षांपासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा अमरसिंग त्यासाठी मदतीला तयारच होता. पण घडले वेगळेच. एक दिवस सायंकाळी कंपनीतून घरी परतताना ओसाड ठिकाणावर सत्यजितच्या कारला एका ट्रकने हुलकावणी दिली. कार दोन तीन कोलांटउड्या घेत थांबली. सत्यजित रक्ताच्या थारोळ्यात पडला. आठ दिवसानंतर सत्यजित शुद्धीवर आला. इन्सपेक्टर गुर्जरांनी जबाब घेत चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा अपघात नव्हे घातपाती हल्ला असावा. त्यांना अशीही माहिती मिळाली की, भैरवसिंग सत्यजितचे सख्खे वडील नाही. आई हेमावतीदेवीही सख्ख्या आई नाहीत. उत्तमसिंग हेमावतीचे दूरचे काका होते. अमरसिंगशीही त्यांचे नाते होते. त्यामुळे नेमका कोणी घातपात घडवून आणला असावा, असा प्रश्न गुर्जरांना पडला.

No comments:

Post a Comment