Tuesday, 11 May 2021

ममता आटवणारी मिनाक्षी

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील निकालांनी भाजपचे तारु जमिनीवर आणले. मोदी-शहांनी अतिरेकी ताकद पणाला लावूनही तृणमूलने प्रचंड बहुमत मिळवले. चाणाक्ष, धुरंधर राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपला शंभरीही गाठता आला नाही. पण महाकाय विजय मिळवणाऱ्या तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी मोदी-शहांएवढीच शक्ती झोकून देऊनही नंदिग्राममध्ये पराभूत झाल्या. नंतर त्यांनी काहीही आरोप केले असले तरी आपला पराभव झाला, हे त्यांच्या अंतर्मनालाही लक्षात आले असावे. त्यांचे एकेकाळचे सहकारी शुभेंदू अधिकारींनी त्यांना धूळ चारली. पण लोकशाहीत मतांची फाटाफूटदेखील पराभवाचे एक कारण असते. हे लक्षात घेतले तर ममतांचा पराभव शुभेंदूंनी केला असे म्हणताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तरुण उमेदवार मिनाक्षी मुखर्जींनीही तो केला असे म्हणावे लागेल. शुभेंदू १९५६ मतांनी जिंकले आणि मिनाक्षींनी ६२६७ मते घेतली. त्यांनी नंदिग्राममध्ये ममता आटवली. त्यामुळे पक्ष जिंकूनही ममता पराभूत तर पराभूत होऊनही मिनाक्षी विजयी मुद्रेत आहेत. निवडणूक गमावली तरी मिनाक्षी जायंट किलर ठरल्या आहेत. १९९५मध्ये नरसिंहरावांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे केंद्र सरकार गेले. आणि संख्याबळ हाच निकष असलेल्या भारतीय राजकारणात कम्युनिस्ट पक्षांचा दबदबा अधिक वाढला. त्यांच्याशिवाय देशात सरकार नाही, असे गणित १४ वर्षे म्हणजे २००९पर्यंत होते. पश्चिम बंगाल तर डाव्यांचा महाकाय किल्ला होता. त्यांच्या सत्तेचा सूर्य अस्ताला जाणे मुश्किल आहे, असे डावे, काँग्रेससमर्थक पत्रकारही हिरीरीने मांडत. ममता बॅनर्जींनी ती मांडणी मोडीत काढली. २०१६ मध्ये एकहाती डाव्यांचा धुव्वा उडवला. त्यामुळे मार्चमध्ये नंदिग्राम विधानसभेसाठी जेव्हा भाकपने मिनाक्षी मुखर्जींना उमेदवारी दिली. तेव्हा त्या इतक्या धोकादायक ठरू शकतील, याचा अंदाज ममतांना आला नसावा. अवघे ३७ वर्ष वयाच्या, पदव्युत्तर पदवीधर असलेल्या मिनाक्षींच्या उमेदवारी अर्जावर त्यांची मालमत्ता एक लाख ३ हजार रुपये असल्याचे नमूद केले होते. यावरून त्यांची आर्थिक ताकद किती किरकोळ आहे, हे लक्षात येते. पण कम्युनिस्टांचे उमेदवार कायमच गोरगरिबांच्या पाठबळावर निवडणुकीत उतरतात. त्याला मिनाक्षी अपवाद नव्हत्या. एकीकडे भाजपचे धनाढ्य शुभेंदू दुसरीकडे बलाढ्य मुख्यमंत्री ममता अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी आक्रमक प्रचार केला. तृणमूल समर्थकांकडून सभा उधळण्याचे प्रकार झाल्यावरही त्या डगमगल्या नाहीत. उलट आणखी आत्मविश्वासाने लोकांशी संवाद साधत गेल्या. सगळा मिडिआ ममता आणि शुभेंदूंभोवती फिरत असताना त्यांनी एकेकाळी डाव्यांचा गड असलेला नंदिग्राम मतदारसंघ पिंजून काढला. ‘बंगालला स्वत:ची मुलगी मुख्यमंत्री हवी आहे’, अशी अस्मितेची हाक ममतांनी दिल्यावर त्याला मिनाक्षींनी ‘होय बंगालची मुलगीच मुख्यमंत्रीपदी हवी. पण ती ६५ वर्षांची नव्हे तर तरुण हवी’ असे प्रत्युत्तर देत प्रचार केला. भाजप आणि तृणमूल दोन्ही पक्ष धनदांडग्यांचे धनी आहेत. हे राज्य लुटणाऱ्या आणि लुटण्यासाठीच आलेल्यांना नाकारा. पु्न्हा आपल्या घराकडे म्हणजे कम्युनिस्टांकडे परत या, असे भावनिक आवाहनही केले. त्यामुळे नंदिग्राममध्ये जवळपास शू्न्यावस्थेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला सहा हजार मते मिळू शकली. मिनाक्षी वर्धमान जिल्ह्यातील चालबलबूर गावच्या मूळ रहिवासी. त्यांचे वडिल मनोज मुखर्जी डाव्या चळवळीत तर आई पारुल ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन असोसिएशनमध्ये काम करतात. एका महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करत असताना २००८मध्ये त्यांनी नोकरी सोडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डीवायएफआय या तरुणांच्या संघटनेत प्रवेश केला. शब्दांचा तोलूनमापून वापर करत खर्जाच्या आवाजात तळमळीने बोलण्याची नैसर्गिक देणगी त्यांना मिळाली होतीच. त्यात कम्युनिस्टांमधील लढाऊपणाचा बाणा पेरला गेला. आणि केवळ दहा वर्षात डीवायएफआयच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. एवढेच नव्हे तर पक्षाच्या राज्य समितीतही नियुक्त झाल्या. अनेक आंदोलने त्यांनी स्वबळावर उभी केली. पश्चिम बंगालमध्ये एनआरसी, सीएएविरोधी लढ्याची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. यावरून त्यांच्यातील नेतृत्वशक्तीचा अंदाज येऊ शकतो. वीस वर्षांपूर्वी शून्यावर असलेल्या ममता बॅनर्जी आज पश्चिम बंगालच्या सर्वसत्ताधीश आहेत. आणि जवळपास तीन दशके सत्तेत असलेले कम्युनिस्ट शून्यावर आले आहेत. असे म्हणतात की, धैर्याने लढण्याची तयारी असलेला कोणीच राजकारणात पूर्णपणे संपत नाही. मिनाक्षींचाही यावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी नंदिग्रामचा निकाल जाहीर होताच पुन्हा लोकांसोबत जाऊन काम करणे सुरू केले आहे. काय सांगावे पुन्हा राजकारणाची चक्रे फिरतील आणि २०४१मध्ये मिनाक्षी मनोज मुखर्जी पश्चिम बंगालच्या सर्वसत्ताधीश होतील.

Tuesday, 27 April 2021

मनो‘भावे’विश्व

सिनेमाच्या दुनियेत थोडंसं स्थिरसावर होऊ लागलं की कलावंतांसमोर एक पेच उभा असतो. तो म्हणजे लोकांना आवडेल असं आपण घडायचं की आपल्याला जे मनापासून आवडतं तेच करत राहायचं. बहुतांश कलावंत लोकांसोबत जाण्याचं ठरवतात. कारण त्यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. खूप मोठ्या वर्गासोबत तुम्ही जोडले जातात. मात्र, काहीजण विशिष्ट वर्तुळात राहणं पसंत करतात. स्वत:ला मनापासून भावणाऱी कला निर्मिती करत राहतात. सातत्याने त्याच वर्तुळात राहिल्याने त्यांना काही तोटे सहन करावे लागतात. पण टिकून राहिल्यावर कालांतराने फायदेही मिळतात. तळागाळातील अस्सल रसिकांपासून हे कलावंत शेकडो मैल दूर असले तरी मिडिआ, अभिजन वर्गावर त्यांची मजबूत पकड कायम असते. ही पकड असण्यामागे अनेक कारणे असली तरी एक महत्वाचे म्हणजे त्यांना विषयाचे उत्तम भान असते. कोणता विषय चर्चेत येऊ शकतो किंवा कोणत्या विषयावर उच्च वर्गात, मिडिआत अधिक चर्चा घडून येऊ शकते, याचा अंदाज त्यांना असतो. त्यामुळे ही कलावंत मंडळी सातत्याने उजळत राहतात. प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक, लेखिका, पटकथाकार सुमित्रा भावे, अशाच उजळलेल्या होत्या. त्यांनी अतिशय मनापासून सिनेमाचे माध्यम हाताळले. कोणी सहसा वाटेला जाणार नाही, अशा विषयांना हात घालत स्वत:चे भाव विश्व सर्वांसाठी खुलं केलं होतं. त्यामुळं त्यांचं जाणं क्लेशदायी आहे. पडद्यावर मांडण्यासाठी सशक्त गोष्ट समाजात घडणाऱ्या, दिसणाऱ्या घडामोडींतूनच उचलण्याची एक अजब शक्ती त्यांच्यात होती. कासव सिनेमातून त्यांनी ते सिद्ध केले. त्यावर राष्ट्रीय पारितोषिकाची मोहरही उमटली. पण त्यापलिकडे ‘हा भारत माझा’ या सिनेमाचं उदाहरण आहे. २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी जनलोकपाल विधेयकासाठी दिल्लीत आंदोलन सुरू केलं होतं. बघताबघता अख्खा देश या आंदोलनात सहभागी झाला. देशभर एकच धुरळा उडाला. चॅनेलवाले, मिडिआवाले हात धुऊन घेत होते. पण या प्रश्नाचं मूळ काय होतं. अण्णांच्या आंदोलनाचा गाभा काय होता. त्याचा आणि सामान्य भारतीय तरुणाचा काय संबंध होता, याची अतिशय मर्मभेदी मांडणी सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी ‘हा भारत माझा’मध्ये केली होती. त्याचं कथानक असं होतं की, इंजिनिअर होण्याची इच्छा असलेल्या इंद्र सुखात्मे नावाच्या एका मुलाला बारावीत ९० टक्के मिळालेत. आणि प्रवेश ९१ टक्क्यांवर थांबलाय. वडिलांना वाटतंय त्यानं खासगी कॉलेजात पैसे देऊन प्रवेश घेण्यापेक्षा थोडी स्वस्तातली, वेगळी वाट शोधावी. आहे त्यात समाधान मानावं. पण आई म्हणते की, मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे. सरळ मार्गानं जाऊन यशस्वी कसं व्हायचं? भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भारतात असं यश मिळवता येतं का, असा प्रश्न सुमित्रा भावे यांनी उपस्थित केला होता. त्या सिनेमाला दहा वर्ष होत आली. अजूनही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. सिनेमाचा विषय आजही तेवढाच ताजा आहे. एवढी दूरदृष्टी आणि समाजमनाचे आकलन त्यांच्याकडे होते. सिनेमा पाहून बाहेर पडणारा प्रेक्षक सिनेमाच्या विषयात दीर्घकाळ गुंतून राहिल, अशी क्षमता त्यांच्यात होती, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण त्यातही एक वेगळेपण असे होते की, त्यांची मांडणी सामाजिक प्रश्नांना, विषयाला धरून असली तरीही कुठे त्यात उपदेशाचा सूर त्यांनी लावला नाही. मांडणीचे अवडंबर, अतिशयोक्ती नाही. भपका तर नाहीच नाही. तुमच्या आजूबाजूला जे घडतंय तेच मी तुम्हाला सांगत आहे. असं बीज पेरून त्या कथावस्तूविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडत. ‘संहिता' सिनेमाही असाच वेगळ्या वळणाचा. म्हणजे असा की, चार महिला. त्यातील एक सिनेमा दिग्दर्शिका, दुसरी निर्माती, तिसरी लेखिका आणि चौथी अभिनेत्री. यातल्या दिग्दर्शिकेला मनासारखा शेवट असलेली कथा लिहायची आहे. पण असं शक्य आहे का? चौघींना आपल्या कथेचा शेवट सुखात करता येईल का, या प्रश्नाभोवती सुमित्रा भावेंनी अख्खा सिनेमा फिरवला आहे. त्या सांगत की, माझा स्वतःचा दिग्दर्शक म्हणून प्रवास निराळा असतो. माझ्या सिनेमांची कथा मला इतर कुणी देत नाही. मलाही नुसती स्वतंत्र कथा म्हणून सुचत नाही. तर सगळा सिनेमा डोळ्यांसमोर उलगडल्याप्रमाणे दिसू लागतो आणि मग मी तो कागदावर उतरवते. कथा-पटकथा-संवाद, कला-वेशभूषा इतकंच काय पण कॅमेरा-साऊंड यांच्या सूचनांसह अशी संपूर्ण स्क्रिप्ट लिहिते. आधी लिहिले मग अंमलात आणले, असे त्यांचे तंत्र होते. म्हणूनच तर त्या अभिजन वर्गासाठी अनेक दमदार सिनेमे देऊ शकल्या. नव्या पिढीतील लेखक, दिग्दर्शकांसाठी हे तंत्र दिशादर्शक नक्कीच आहे.

Tuesday, 13 April 2021

चांदणी शिशिराची

जगात सदा सर्वकाळ सगळंच काही वाईट घडत नसतं. कुठेतरी आशेची किरणं उगवत असतात. एखादी का होईना पणती कोणीतरी धाडसाने पेटवतं. काळ्याकुट्ट काळोख्या अवकाशात एक चांदणी प्रकाशमान होतेच. ही निसर्गाची अद्भुत लीला आहे. मानवी जीवनातही असेच घडत असते. त्याचा अनुभव यंदा जागतिक महिला दिनी बांगलादेशाने घेतला. माणूस म्हणून अस्तित्वच नाकारलेल्या, ना मर्द ना औरत असे म्हणून कायम हिणावल्या गेलेल्या तृतीयपंथीयांच्या जमातीतील तश्नुवा अनान शिशिरने प्रख्यात बौशाखी या न्यूज चॅनेलवर अँकर म्हणून काम सुरू केले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणून तेथील मध्यमवर्गीयांनी या घटनेचे क्रांतीकारी असे वर्णन करत स्वागत केले आहे. १९४७मध्ये भारत आणि १९७१मध्ये पाकिस्तानातून वेगळ्या झालेल्या बांगलादेशात कट्टरपंथीयांचा धुमाकूळ कायम सुरू असतो. १६ कोटी लोकसंख्येच्या या देशात अल्पसंख्यांकांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना नेहमीच घडतात. धर्मविरोधी लिखाण केल्याचा ठपका ठेवून तस्लिमा नसरीन या प्रख्यात लेखिकेला परागंदा होण्यास भाग पाडणारा देश अशीही एक ओळख आहेच. तेथे २९ वर्षीय तनुश्वामधील उपजत गुणाला, कौशल्याला वाव मिळाला. तिला एक सन्मानाचे काम देण्यात आले, हे महत्वाचे आहे. घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ फांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ कानावर आली अनंतातुनी हाक विसरूनि पंख पाखरु उडाले एक या प्रख्यात रॉय किणीकर यांच्या ओळींची ‘विसरुनि समाजाचे डंख, पाखरु उडाले एक’ अशी रचना करत तनुश्वाने झेप घेतली आहे. अर्थात हे झेपावणे महाकठीण होते. तिच्या लढाईची सुरूवात घरापासूनच झाली. आपल्या घरात मुलाच्या रुपात मुलगी जन्माला आली आहे, असे कळताच तिच्या माता-पित्यांनी तिला तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना अक्षरश: लाथाडून हाकलले. वडिलांनी बोलणेच बंद केले. शेजारी टोमणे मारू लागले. मग तिने ढाका शहरातील एका वस्तीत राहण्यास सुरुवात केली. तेथे पदोपदी होणारा अपमान गिळत लढाईला प्रारंभ केला. अंगी उपजत हुशारी होतीच. त्या बळावर तिने शिक्षण पूर्ण केले. हॉर्मोन बदलाची शस्त्रक्रिया करून तिचे मूळ स्त्री रुप मिळवले. इतर तृतीयपंथीयांसारखे रस्त्यावर भीक मागत जगायचे नाही हे तर तिने ठरवलेच होते. म्हणून तिने स्वत:ला सांस्कृतिक जगात झोकून दिले. नटुआ, बोटोआ नावाच्या दोन कलापथकांमध्ये काम केले. उत्तम नर्तक आणि आवाजावर प्रभुत्वाची देणगी आपल्याला मिळाली आहे, याची जाणिव तिला याच काळात झाली. कला प्रांतातील अनुभव घेतल्यावर तिने सामाजिक क्षेत्राकडे लक्ष वळवले. तरुण, महिलांसाठीच्या संस्थांमध्ये काम करू लागली. बंधू समाजकल्याण संस्था, बांगलादेश मानवाधिकार संघटनेत तिने कर्तृत्वाचा ठसा उमटवला. बांगलादेशात १० हजार तृतीयपंथीय आहेत. पंतप्रधान हसिना शेख यांनी २०१३मध्ये त्यांची स्वतंत्र नोंद करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये मतदानाचा अधिकार दिला. देशाच्या सर्वोच्च नेत्याने दिलेल्या बळामुळे तश्नुवाला आणि तिच्यासारख्यांच्या पाठिशी उभे राहू इच्छिणाऱ्यांना धीर मिळाला. तनुश्वाच्या नेमणुकीसाठी पुढाकार घेणारे बौशाखी चॅनेलचे उपकार्यकारी संचालक टिपू अलोम म्हणाले की, आपल्या पंतप्रधान धाडसी निर्णय घेत असतील तर आपणही काही केले पाहिजे, असे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही तनुश्वासोबत आणखी एका तृतीयपंथीयाला नाट्य विभागात नियुक्त केले आहे. बंधू समाजकल्याण संस्थेत दीर्घकाळापासून काम करणारे तनवीर इस्लाम तनुश्वाला पडद्यावर अत्यंत विश्वासाने बातम्या देताना पाहून कमालीचे सुखावले. धर्माच्या पोलादी भिंतीत बंदिस्त बांगलादेशासारख्या देशात असे काही घडणे ही चांगल्या बदलांची सुरुवात आहे, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि ते म्हणाले ते सत्यच असावे. कारण तनुश्वाला नुकतेच दोन सिनेमांसाठी साईन करण्यात आले. त्यातील एका सिनेमात ती फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तृतीयपंथीयांमधील उत्तम नर्तक, अभिनेत्री आणि प्रसारमाध्यमांच्या अभ्यासकांना एक चांगला मंच मिळवून देण्यासाठी ती कार्यरत राहणार आहे. त्यामुळे शिशिराची चांदणी दिवसेंदिवस प्रकाशमान होत राहिल. तिच्यासोबत इतर तारकाही चमकू लागतील. त्यांच्या नशिबात तनुश्वासारखा खडतर प्रवास येऊ नये, एवढीच पुरुष आणि स्त्री म्हणून जन्मण्याचे भाग्य लाभलेल्यांकडून अपेक्षा आहे. अखेर थोडेसे भारत आणि पाकिस्तानबद्दल. भारतात २०१४ मध्ये तमिळनाडूतील लोटस् नामक न्यूज चॅनेलवर पद्मिनी प्रकाश या तृतीयपंथीयाला अँकर म्हणून संधी मिळाली. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे २०१८मध्ये मर्विया मलिक कोहीनूर या पाकिस्तानी चॅनेलवर झळकली. जगात सदा सर्वकाळ सगळंच काही वाईट घडत नसतं. कुठेतरी आशेची किरणं उगवत असतात, असेच तर तनुश्वा शिशिर, पद्मिनी प्रकाश, मर्विया मलिक सांगत आहेत.

बुशरा : परिपूर्ण ... तरीही

आधी हिंदू-मुस्लिम एकतेचे मोठे समर्थक असलेले बॅ. मोहंमद अली जीना हळूहळू बदलत गेले. २० मार्च १९४० रोजी लाहोरमध्ये झालेल्या मुस्लिम लीगच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत. ते एकत्र, एकाच छताखाली कधीच नांदू शकत नाहीत, असे सांगितले. २३ मार्च १९४० रोजी पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला. पुढे काय झाले हे सर्वांना माहिती आहेच. भारतीय उपखंडाचे दोन तुकडे झाले. कोट्यवधी लोकांना, प्रचंड हिंसाचारात मायभूमी सोडावी लागली. दोन्ही देशांच्या आरपार घुसलेला फाळणीचा भाला अजूनही कायम आहे. कधीच भरून निघणार नाही, एवढे नुकसान झाले. क्रिकेट आणि कलेच्या प्रांतात तर ते खूपच हुरहुर लावणारे, खुपणारे आहे. भारत एकच देश असता तर आपला क्रिकेटचा संघ किती बलाढ्य असता, अशी चर्चा चार दशकांपूर्वी असायची. आपल्या दिलीपकुमार, माधुरी दीक्षित, हेमामालिनी, अमिताभ बच्चनवर फिदा झालेले कोट्यवधी पाकिस्तानी रसिक आहेत. तसेच तिकडेही अनेक अत्यंत प्रतिभावान कलावंत आहेत. सिनेमा, नाटक, टीव्ही मालिकांमध्ये झळकणाऱ्या, गायिका-लेखिकाही असलेल्या बुशरा अन्सारी त्यापैकीच एक आहेत. आपल्या वहिदा रहेमान, आशा पारेख यांच्या अभिनयशैलीचे एक अप्रतिम मिश्रण त्यांच्यात आहे. शिवाय त्यांच्यात खळाळता विनोद निर्माण करण्याची क्षमता आहे. पुढील महिन्यात १५ मे रोजी ६६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बुशरा जेव्हा पडद्यावर अवतरतात. तेव्हा पडदा पूर्णपणे व्यापून टाकतात. चाळीसपेक्षा अधिक सिनेमा, सहा टीव्ही मालिका, दहा नाटकांमधून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र रसिकवर्ग निर्माण केला आहे. पण त्या केवळ कलावंतच आहेत, असे नाही तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत जागृत आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथीयांना खडे बोल सुनावण्यास मागेपुढे पाहत नाहीत. इतिहासात जे घडले ते घडले. कुटुंबे वेगळी झाली म्हणून मुलांमध्ये कटूता कशासाठीॽ असा त्यांचा सवाल आहे. दोन वर्षांपूर्वी भारत – पाकिस्तानात तणाव वाढला. अणुयुद्ध होणार का, असे वातावरण मिडिआवाले तयार करू लागले. तेव्हा बुशरा यांनी ‘हमसाये माँ जायी’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली. मिडिआवाले, राजकारण्यांना बाजूला सारत आता भारत पाकिस्तानातील गृहिणींनाच दोन्ही देशांची काळजी घ्यावी लागणार आहे. युद्धाचे वातावरण थांबवून मुलांमध्ये प्रेम भावनेची पेरणी करावी लागेल, असा संदेश देणारे हे गीत बुशरा यांची एक बहीण नीलम अहमद बाशेर यांनी लिहिले. त्यात बुशरांनी हिंदू तर त्यांची दुसरी बहिण अस्मा अब्बास यांनी पाकिस्तानी मुस्लिम गृहिणीची भूमिका केली आहे. अगदी शंभर चौरस फुटाच्या सेटवर चित्रीत झालेल्या या गाण्याने लाखो पाकिस्तानी रसिकांनाही अंर्तमुख केले. गाण्याचा भावार्थ समजून तसे वागले पाहिजे, अशा प्रतिक्रियाही सोशल मिडिआवर लोकांनी दिल्या. त्यामुळे बुशरांचे बळ वाढले. पण केवळ व्हिडिओ करून त्या थांबल्या नाहीत तर प्रत्येक मंचावर हा विचारही ठणकावून मांडला. ‘बुशरा’ नावाचा अर्थ अचूकता. परिपूर्णता, अचूकतेचा ध्यास असलेली व्यक्ती असा आहे. हा अर्थ त्यांनी सार्थ केला आहे. अर्थात कलावंत होण्याचे, व्यक्तीस्वातंत्र्याच्या कट्टर समर्थक असण्याचे बीज त्यांच्यात वडिलांकडून पेरले गेले. त्यांचे वडिल अहमद बाशी प्रख्यात व्यावसायिक लेखक होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्या बाल कलावंत म्हणून काम करू लागल्या. पण त्यांना खरी ओळख मिळाली १९७८ मध्ये पीटीव्हीवर आलेल्या फिफ्टी-फिफ्टी या विनोदी मालिकेतून. १९८३मध्ये त्यांच्या ‘आंगन तेडा’ मालिकेने एकच खळबळ उडवून दिली. कारण त्यात त्यांनी पाकिस्तानची कायम मुस्कटदाबी करणाऱ्या लष्करी राजवटीवर टीका केली होती. त्यामुळे त्या काही काळ अडचणीतही आल्या होत्या. पण त्यांनी माघार घेतली नाही. अन्वर मकसूद हे पाकिस्तानच्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ लेखक, विचारवंत. त्यांची ‘लूज टॉक’ मालिका प्रचंड लोकप्रिय होती. त्यात ते आणि ताकदीचे अभिनेते मोईन अख्तर समाजातील दांभिक लोकांच्या चिंधड्या उडवत. या मालिकेतील काही भागांमध्ये बुशराही होत्या. त्यात भूमिका साकारताना बुशरा यांनी जी वेगवेगळी रुपे धारण केली आहेत ती त्यांच्यातील समर्थ, बहुगुणी अभिनेत्रीची साक्ष देतात. पण, तरीही असे वाटते की, त्यांच्यातील प्रतिभेला तेवढा वाव मिळाला नाही. त्यांचा चाहता वर्ग, भुमिकांमधील वैविध्य पाकपुरतेच मर्यादित राहिले. फाळणीच झाली नसती तर त्यांच्यातील अभिनयाचा आणखी कस लागला असता. त्यांना विविधांगी भूमिका मिळाल्या असत्या. अन् भारतात आणखी एका रुपवान, परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या अभिनेत्रीची भर पडली असती.

Thursday, 18 March 2021

अमेरिकी

जगावर दादागिरी करणारा, भांडवलशाहीचा महामेरू, स्वैराचारी अशी असंख्य दूषणे अमेरिकेला दिली जातात. पण कोणी कितीही नावे ठेवत असले तरी तो महाकाय, महाप्रचंड, अति प्रगत देश आहे. तेथे भौतिक सुविधांची रेलचेल तर आहेच. शिवाय वैयक्तिक स्वातंत्र्याचाही बोलबाला आहे. जगभरातील लोकांना आकृष्ट करणारी शेकडो पर्यटनस्थळे आहेत, ही वस्तु्स्थिती आहे. अनेकांनी त्याविषयी लिखाण केले आहे. प्रवास वर्णनेही आली आहेत. पण तेथील खाद्यसंस्कृती, सामाजिक, सांस्कृतिक जीवन कसे आहे. सामान्य अमेरिकन माणूस कसे जीवन जगतो. त्याचे राहणीमान कसे असते. संकटांना तो कसा सामोरा जातो. तेथील आरोग्य सेवा अत्युच्च दर्जाची आहे, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ती कशी आहे. अमेरिकी लोक परदेशी पाहुण्यांना कशी वागणूक देतात, याविषयी मराठीमध्ये एखाद्या गृहिणीकडून फारसे लिखाण झालेले नाही. ही कसर डॉ. मधु निमकर यांच्या ‘स्वातंत्र्यदेवतेच्या गावात’ या पुस्तकाने ठळकपणे भरून काढली आहे. २००८च्या सुमारास डॉ. निमकर अमेरिकेत वास्तव्यास होत्या. त्यावेळी बलाढ्य महासत्ता आतून कोसळत होती. आर्थिक आघाडीवर स्थिती वाईट होती. सुदैवाने बराक ओबामा अध्यक्ष झाले. त्यांनी एका विशिष्ट दिशेने निघालेल्या अमेरिकेला सर्वसमावेशकतेचा मंत्र दिला. हा सगळा कालखंड डॉ. निमकरांनी पाहिला. अनुभवला. त्यांच्याकडे भारतात असताना लिखाणाचा मजबूत अनुभव होता. एका मोठ्या कंपनीत त्यांनी जनसंपर्काचे विपुल काम केले होते. त्यामुळे त्यावेळी कृषीवलचे आणि आता दिव्य मराठीचे राज्य संपादक असलेले संजय आवटे यांनी त्यांना कृषीवलमध्ये लिहिण्याविषयी सुचवले. त्या लेखांचे पुस्तक म्हणजे ‘स्वातंत्ऱ्यदेवतेच्या गावात’ आहे. सप्तर्षी प्रकाशनाने ते प्रकशित केले आहे. ७० पेक्षा अधिक छोटेखानी लेख असलेल्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अमेरिका देश नेमका कसा आहे, हे अतिरंजित पद्धतीने उलगडून सांगण्याचा, समजावण्याचा डॉ. निमकरांनी मुळीच प्रयत्न केलेला नाही. उलट अमेरिकेकडे निघाल्यापासून ते तेथे स्थिरावण्यापर्यंतचा सारा प्रवास त्यांनी अतिशय सोप्या, सहज शब्दांत मांडला आहे. त्यामुळे प्रत्येक पानावर लेखिका आपल्याशी मनातील भावना व्यक्त करत सहजपणे बोलते आहे, असे वाटत राहते. सर्वात महत्वाचे हा संवाद एका सामान्य भारतीय गृहिणीचा आहे, असे जाणवत राहते. त्यामुळे त्यातील ओलावा, भावनिकता, आपुलकी मनाला भिडते. अमेरिकेची समाज रचना कशी आहे. तेथील दैनंदिन व्यवहार कसे चालतात. भारतीयांचे नेमके स्थान काय आहे. त्यांची तेथील जगण्याची लढाई कशी असते, याची सुरेख, ओघवती मांडणी डॉ. निमकरांनी केली आहे. वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी दिलेली परीक्षा, नायगारा फॉल्स, महानगरी न्यूयॉर्क, घर खरेदी असे अनुभ‌व त्यांच्यातील लेखिका, मुक्त पत्रकाराचा परिचय करून देतात. ग्रेट रिसेशन आणि अमेरिका प्रकरणात त्यांनी त्यावेळच्या आर्थिक संकटाचे अतिशय बोलक्या शब्दांत वर्णन केले आहे. या संकटाने तेथील भारतीयांचे जीवन कसे डळमळले. प्रत्येकाच्या संसारावर कसा परिणाम झाला, हे वाचताना ती कुटुंबेच डोळ्यासमोर उभी राहतात. एका आजारपणामुळे अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेचा आलेला अनुभवही थरथरून टाकतो. जणूकाही आपण सिनेमातील प्रसंग पाहतो की काय, असे वाटते, एवढा जिवंतपणा आला आहे. एकूणात हे पुस्तक अमेरिकेचे एक वेगळेच दर्शन घडवते. तेथील समाजजीवन आतून शोधते, याविषयी शंका नाही.

Tuesday, 2 March 2021

डफवाली

ओशो रजनीश प्रवचनात सांगत की, अग्नीवर नियंत्रण आणि चाक या दोन शोधांमुळे माणसाचे जीवन बदलून गेले. आगीचा वापर करून तो वन्य श्वापदांपासून स्वत:चे संरक्षण करू लागला. मांस भाजण्याची कलाही शिकला. चाकांमुळे त्याला प्रवास, स्थलांतर सोपे झाले. हा तर झाला बाहेरील शोध. पण माणसाला अंर्तमनातील आनंदाची पहिली वाट कशी सापडली असावीॽ प्रख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी एका व्याख्यानात याविषयी सांगितले. ते म्हणाले होते की, लाखो वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जंगलात आदिवासी टोळीतील कोणीतरी लाकडाच्या पोकळ ओंडक्यावर हात आपटला आणि त्यातून ध्वनी निघाला. तो ऐकून त्याच्या मनात आनंदाचा तरंग निर्माण झाला. या तरंगाचे रुपांतर त्याने पुढे वाद्य संगीतात केले. कोणतेही वाद्य ऐकले की, माणसाचे मन आपोआप त्या ध्वनी तरंगाकडे आकर्षित होते. रक्ताभिसरणावर परिणाम करते. चित्र, नृत्य, नाट्य, अभिनयाप्रमाणेच संगीतही जात, धर्म, पंथ, प्रांताच्या भिंती एका क्षणात जमीनदोस्त करते. अत्युच्च दर्जाचे संगीत आनंदाच्या असंख्य लाटा उसळवते. इराणच्या प्रख्यात डफवादक नघमा फराहमंद जेव्हा डफावर ताल धरतात, तेव्हा हाच अनुभव येतो. आपल्या मनात इराणची प्रतिमा कट्टर कलाविरोधी देश अशी आहे. त्यात तथ्यही असावे. पण तेथे कलेच्या प्रांतात काहीच घडत नाही. संगीत, नृत्य, चित्रकला, अभिनयाची त्यांची कवाडे बंद झाली आहेत, हेही तितकेसे खरे नाही. जगद्विख्यात सिनेमा दिग्दर्शक माजेद माजिदी यांच्या सिनेमातून ते स्पष्ट होते. अनेक इराणी तरुण, तरुणी कलेवर निरासक्त प्रेम करतात. आपल्या कला कौशल्याने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करतात. नघमा फराहमंद त्यात अग्रणी. सोशल मिडिआवर त्यांच्या नावाने सर्च केले तर एक इराणी सौंदर्यवती हातात डफ घेऊन तल्लीन झाल्याचे चित्र दिसते. एक क्षण असे वाटते की, सिनेमातील अभिनेत्रीने व्यक्तीरेखेची गरज म्हणून हातात डफ घेतला असावा. पण पुढे जाऊन पाहाल तर आश्चर्याचे धक्के बसत जातात. नघमांची नाजूक, लांबसडक बोटे अलगद डफाशी संवाद साधू लागतात. त्यातून प्रारंभी गंभीर ध्वनी ऐकू येऊ लागतो. पुढे काय होणार, असा प्रश्न मनाला पडत असताना काही मिनिटांतच डफ अक्षरश: हुंकारू लागतो. जणू काही डफाचा कोपरान् कोपरा बोलू लागतो. आपल्याला काहीतरी सांगू लागतो. पुढे नघमा यांची बोटे इतक्या वेगाने आणि विलक्षण आवेशाने फिरू लागतात. त्या अगदी सहजपणे हुंकाराचे रुपांतर कडकडाटात करतात. हा कडकडाट इतक्या टिपेला जाऊन पोहोचतो की आपण देहभान विसरून जातो. एवढी ताकद नघमा यांच्या वादनात आहे. भारतात अनेक महिलांनी तालवाद्यांत निपुणता मिळवली आहे. पण धार्मिक बंधनात जखडलेल्या अरबी राष्ट्रांमधील तरुणी छंदापलिकडे जात कला जोपासना करत असतील. व्यावसायिक वादक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत असतील, तर ते अधिक कौतुकास्पद आहेच. इराणचे प्रख्यात संगीतकार महमूद फराहमंद यांची कन्या असलेल्या नघमांनी वादन कौशल्य मर्यादित ठेवलेले नाही. त्या जगभरात मैफली करतातच. शिवाय डफ आणि इतर तालवाद्य वादनाचे प्रशिक्षणही देतात. आज युरोपातील अनेक देशात त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी संगीतमय प्रवास सुरू केला. आधी त्या फरामर्झ पेव्हार, शांग कामकर यांच्या मार्गदर्शनात संतूर वादन शिकल्या. काही वर्षातच त्या डफ वादनाकडे आकर्षित झाल्या. कारण डफामध्ये आध्यात्मिक ध्वनी असल्याचे त्यांना वाटू लागले. वडिलांकडून वारसाने मिळालेली अलौकिक प्रतिभा, गुरुंचे मार्गदर्शन आणि प्रचंड मेहनत या बळावर नघमा पाहता पाहता पारंगत झाल्या. जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान, फ्रान्स, इटली, कुवैत, ऑस्ट्रियातील अनेक महोत्सव त्यांनी गाजवले. त्यांचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्या केवळ इराणी, अरबी संगीत परंपरांच्या वर्तुळापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. बल्गेरियन, तुर्की, भारतीय आणि युरोपिअन संगीतातही त्या समरसून गेल्या आहेत. विविध संगीत संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. प्रख्यात कलावंत अँटोन आपोस्टोलोव्ह म्हणतात की, मी ज्या महिला तालवादकांसोबत काम केले. त्यात नघमा सर्वोत्कृष्ट आहेत. कारण त्या पारंपारिक पद्धतीने डफ वादन करताना नव्या शैलीचे अगदी सहजपणे मिश्रण करतात. त्यासाठीचे एक अतुलनीय तंत्र त्यांच्याकडे आहे. अरबी कलाप्रेमी युवतींसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून नघमा परिचित झाल्या आहेत. त्यांनी तालवादक महिलांची एक पिढीच निर्माण केली. अर्थात हे सारे त्यांना इराणमधून बाहेर पडत २०१० मध्ये कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारल्यावर साध्य करता आले. यशप्राप्तीसाठी कोणती तरी चौकट मोडावीच लागते नाॽ

Sunday, 21 February 2021

शशी‘कथा’

मोदी, हिंदुत्वावर सतत टीका आणि रुपेरी पडद्यावर चतुरस्त्र भूमिका अशा दुहेरी संगमामुळे तापसी पन्नू प्रसिद्धीच्या झोतात असते. सध्या ती ‘शाब्बाश मिठू’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये गर्क आहे. काही दिवसांपूर्वी तिनेच शूटिंगची काही छायाचित्रे सोशल मिडिआवर टाकून ही माहिती दिली. ‘शाब्बाश’ची कहाणी प्रख्यात महिला क्रिकेटपटू, भारताची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जाते. राहुल ढोलकिया त्याचे दिग्दर्शन करत आहे. कोरोनामुळे ‘शाब्बाश’चे वेळापत्रक लांबले. मिताली राज म्हणजे भारताची सर्वात यशस्वी खेळाडू. संघर्षातून यशाचे शिखर गाठताना तिने अनेक विक्रम प्रस्थापित केले. कोणताही सिनेमा चालायचा असेल तर त्यासाठी एक चमकदार गोष्ट लागते. यशस्वी, विक्रम प्रस्थापित करणाऱ्या खेळाडूची जीवनकहाणी विकली जाऊ शकते, याचा काही निर्मात्यांचा अंदाज असतो. त्यामुळेच अलिकडील काळात त्यांनी त्याकडे थोडे जास्त लक्ष वळवले आहे. फरहान अख्तरचा मिल्खासिंग, सुशांतसिंगचा धोनी त्याची काही उदाहरणे. काही वर्षांपूर्वी प्रियंका चोपडाचा ‘मेरी कोम’ बराच गाजला. भारताची सुवर्णकन्या पी.टी. उषा यांच्यावर सिनेमा येणार, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. पण ही कहाणी प्रत्यक्षात येण्यात अडचणी येत आहेत. ही सगळी झाली हिंदी जगताची सफर. मराठीमध्ये कायॽ याचे उत्तर काही नाही, असेच म्हणावे लागेल. मराठी खेळाडू राहू द्या. ज्या राजकारणाने अख्खा मराठी मुलुख कायम व्यापलेला असतो. त्यातील एखाद्या मराठी महिलेची गोष्ट पडद्यावर येत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री, पॉवरफूल मंत्री झाली नाही. मराठी निर्माते, दिग्दर्शक गाजलेल्या राजकारण्यांना पडद्यावर आणण्यापासून दूरच राहिले आहेत. अरुण साधू, जब्बार पटेलांचा सिंहासन हा मराठीतील अत्यंत गाजलेला राजकीय सिनेमा. त्यात रिमा लागू वगळता दुसऱ्या महिलेची व्यक्तिरेखा ठसा उमटवत नाही. ती देखील लोचट राजकारण्यांना गळाला लावणारी, नवरा बुळचट असल्याने सामर्थ्यवान सासऱ्यावर भाळलेली दाखवली आहे. भारताच्या राजकारणावर अलिकडे जया जेटली, ममता बॅनर्जी, जयललितांनी प्रभाव टाकला. अर्थात ममता, जयललितांच्या तुलनेत जेटलींचा प्रभाव काळ फारच किरकोळ, मर्यादित राहिला. ममतांवर अद्याप सिनेमा, वेबसिरीज आली नसली तरी नजिकच्या काळात नक्कीच येईल. महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिणेत राजकारणातील महिलांच्या अनेक कहाण्या छोट्या-मोठ्या पडद्यावर येत असल्याचे दिसते. जयललितांवर आधारित एक वेबसिरीज लॉकडाऊनच्या काळात प्रचंड गाजली. दुसरी येऊ घातली आहे. आता आणखी एक वादग्रस्त व्यक्तिरेखा तमिळनाडूत पुन्हा उदयास येऊ पाहत आहे. तिचे राजकारणात काय व्हायचे ते होईल. पण तिचे जीवन एका सिनेमाच्या कहाणीला लाजवेल असे आहे. ती व्यक्ती म्हणजे व्ही. के. शशिकला. एकेकाळी जयललितांच्या जीवनावर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चार वर्षे तुरुंगवास भोगून राजकारणात परतल्या आहेत. अद्रमुक पक्षावर ताबा घेण्यासाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. एकेकाळचे सहकारी विरोधात गेले. तुरुंगात चार वर्षे घालवल्यावर एखादी महिला मुकाट्याने शांत बसली असती. पण शशिकला येत्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे जुळवून मुख्यमंत्री होण्याची भाषा करत आहेत. जेमतेम शिक्षण असलेल्या शशिकला एवढ्या प्रभावी कशा झाल्या. याच्या अनेक सुरस कहाण्या आहेत. त्यांचे पती एम. नटराजन यांची एका प्रशासकीय अधिकाऱ्याशी सलगी होता. हा अधिकारी जयललितांच्या संपर्कात होता. त्याच्या मदतीने शशिकलांनी जयललितांशी संधान बांधले. ते एवढे कसून होते की, पुढील काळात शशिकलांशिवाय श्वास घेणेही जयललितांना कठीण जाऊ लागले. सत्तेची धुंदी, माज बहुतांशवेळा सत्ताप्रमुखाआधी त्याच्याभोवतीच्या कोंडाळ्यावर चढतो. जयललितांभोवती फक्त शशिकलांचे कोंडाळे होते. त्यांनी भ्रष्टाचाराचे विक्रम मोडले. मग निवडणुकीत पराभूत झालेल्या जयललितांनी निग्रहाने त्यांची घरातून हकालपट्टी केली. पण शशिकलांनी पुन्हा बाजी पलटवली. काही वर्षांतच पक्षाचा जवळपास पूर्ण ताबा मिळवला. त्यांची ताकद इतकी वाढत गेली, की त्यांचाच शब्द म्हणजे प्रमाण मानला जाऊ लागला. नियतीनेही अशी काही खेळी केली की, एकेकाळी व्हिडीओ पार्लर चालवणारी ही महिला दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्रीही झाली. आणि काही महिन्यातच तुरुंगातही पोहोचली. आता तेथून बाहेर पडल्यावर डरकाळ्या फोडू लागली आहे. अनेक नाट्यमय वळणे असलेली शशिकलांची कहाणी दक्षिणेतील मंडळी मोठ्या, छोट्या पडद्यावर आणतील आणि गाजवतील. आपल्या मराठी प्रांतात नजिकच्या काळात असे व्यक्तिमत्व, ताकदीची महिला राज पटलावर येण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे मराठी निर्माते, दिग्दर्शकांनी शशिकलांची कहाणी मराठी बाजात बांधून मांडली तर रसिकांना नक्कीच पसंत पडेल. किमान नव्या, धाडसी प्रयोगाची नोंद होईलच. शेवटी सिनेमा, छोटा पडद्याला एका चमकदार कहाणीची गरज असतेच नाॽ