नाव आडगाव असलं तरी ते हायवे टच गाव
होते. राष्ट्रीय महामार्गावरचं होतं. एका बाजूला शहर. तिन्ही बाजूंना शेती.
प्रत्येक शेतात किमान एक विहीर. पिकलेला प्रत्येक दाणा चढ्या भावाने विकला जायचा. त्यामुळं
गावात सुबत्ता वाढतच चालली होती. क्राईम रेट जवळजवळ नव्हताच. म्हणजे याचा अर्थ
गावात भानगडी नव्हत्या, असं नव्हतं. मोटार लावणं, एकमेकांच्या शेतात घुसखोरी,
मालाचा भाव ठरवणं यावरून भांडणं, हाणामाऱ्या होत होत्या. पण त्या पोलिस ठाण्यात
जाणार नाहीत, याची सर्वजण काळजी घेत होते. एकेकाळी सरपंच राहिलेले जलाल खान पूर्ण
गावावर नजर ठेवून होते. कोणाचं वागणं खटकलं तर त्याला ते लगेच बोलावून झाडाझडती
घेत. जशी त्यांनी नुकतीच म्हाताऱ्या मैनाबीची घेतली. गावापासून काही अंतरावर
झोपडीत राहणाऱ्या मैनाबीकडं दीड एकर जमीन होती. पण ती कसण्यासाठी कोणीच पुरुष
माणूस नव्हतं. तिचा नवरा मरून पंचवीस-तीस वर्ष होऊन गेली होती. तिला मिरगीचे झटके
येतात, असं म्हटलं जात असल्यानं कोणी नातेवाईक तिच्याकडं फिरकत नव्हतं. कोण्या
पुरुषानंही तिच्याकडं कधी पाहिलं नाही. गावातल्या दर्ग्यात बसून माळ ओढत राहायची.
लोक जे देतील ते घेऊन घरी पोहोचल्यावर खायचं, एवढंच तिचं काम होतं. अजून एक काम ती
इमानेइतबारे करायची. ते म्हणजे तिच्या दूरच्या बहिणीची मुलगी अमिनाची काळजी घेणं.
सोळा-सतरा वर्षाच्या अमिनात मैनाबीचा जीव प्रचंड अडकत चालला होता. बकऱ्या
चारण्यासाठी डोंगराकडं जायचं नाही. घळीत उतरायचं नाही. पाशा खान, अकबरच्या शेताकडं
जायचं नाही. असं ती निक्षून सांगायची. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अमिनाचं
पाऊल घसरलं, तिला कोणी जाळ्यात ओढलं तर काय करायचं, असा विचार मैनाबीला हैराण
करायचा. त्यात माजी सरपंच जलाल खाननी भर टाकली. ते म्हणत होते की, डाळीचा व्यापारी
शकील पठाण अमिनाच्या पाठलागावर आहे. एकदा त्याच्या कारमधून ती शहरातही जाऊन आली
आहे. मैनाबीनं असंही पाहिलं होतं की, पोलिस हवालदार कय्युमच्या तिच्याभोवती चकरा
वाढल्या होत्या. पाशा खान, अकबरची दोन-दोन लग्नं झाली होती. तरीही ते तिसऱ्या
लग्नासाठी उतावळे झाले होते. बऱ्याबोलानं पोरगी पटली नाही तर तिला उचलून नेऊ,
असंही दोघंही पारावरल्या गप्पांत सांगत. त्यामुळं दोघांच्या बायका अमीनाला पाहताच
बोटं मोडत. तिची विल्हेवाट लावण्याची भाषा करत. कधी ती एकटी सापडते का, याचा शोध घेत. दुसरीकडं जलाल
खानचा नातू शाहजादही आपल्या भाचीभोवती घिरट्या घालतोय. त्याला जलाल काहीच समज देत
नाही, असं मैनाबीला कळत होतं. तिनं अमिनाला दहादा विचारूनही पाहिलं. पण यापैकी
कोणाशीच लग्न करायचं नाही. गावात खूपच बदनामी
झालीय. मुंबईला जाते नशिब काढायला, असं सांगत होती. या पोरीचं काही बरंवाईट झालं
तर आपण काय करायचं, असं मैनाबीला गेल्या महिनाभरापासून वाटू लागलं
होतं. आणि झालंही तसंच. अमिनाचा मृतदेह गावाजवळच्या डोंगरातील एका झाडाला लटकला
होता. काही लोक म्हणत होते बदनामीला कंटाळून तिनं आत्महत्या केली. मैनाबीलाही तसंच
एक क्षण वाटलं. पण पोलिस अधिकारी सय्यद यांना मृतदेहापासून काही अंतरावर वायरचा
लांबलचक तुकडा सापडला. बकरीच्या गळ्यात अशा वायर बांधल्या जातात, अशी माहिती त्यांना
मिळाली. पण अशी वायर तर विहीरीतल्या मोटारीत, डाळीचे पोते बांधण्यासाठी वापरले
जाते. घरात, अगदी पोलिस ठाण्यातही अशी वायर असते, असं मनाशीच म्हणत त्यांनी जीप
इलेक्ट्रिक साहित्य विक्रेत्याच्या भल्यामोठ्या दुकानासमोर उभी केली. काहीवेळातच
त्यांना खुनी कोण असावा, हे लक्षात आलं.
x
x
No comments:
Post a Comment