Thursday, 9 April 2020

पडदा दूर झाला आणि...

हाजी शरफोद्दीन म्हणजे गावातील मातब्बर असामी. खरेतर व्यापारी म्हणजे दोन गोष्टी कमी. चार गोष्टी जास्तीच्या. थोडीफार चलाखी, लबाडी गृहित धरलेलीच असते. पण शरफोद्दीन त्याला अपवाद असावेत. बांधकाम साहित्याचा व्यापार करताना त्यांना कधीच ग्राहकाला फसवावेसे वाटले नाही. गावातल्या तीन महत्वाच्या भागात त्यांची तीन मोठी दुकाने. चारही बाजूंनी पैसा धो-धो येत होता. पत्नी सुस्वभावी होती. दोन लहान भाऊ अतिशय चोखपणे दुकाने सांभाळत होते. सुदैवाने त्यांच्या बायकाही अत्यंत चांगल्या निघाल्या होत्या. शरीफोद्दीन यांना दोन मुली. दोन मुले. दोन मुली आणि एका मुलाचे लग्न झाले होते. सुनबाई डॉक्टर. त्यांनी तिला छोटासा दवाखाना थाटून दिला होता. एकूणात शरफोद्दीन यांचा संसार, व्यवसाय अतिशय उत्तम सुरू होता. फक्त त्यांना एक चिंता लागली होती. ती म्हणजे सर्वात धाकटा मुलगा अलिम व्यवसायाकडे अजिबात म्हणजे ढुंकूनही पाहत नव्हता. शिक्षणात बऱ्यापैकी तल्लख असलेला अलिम कॉमर्सचा पदवीधर होता. त्याला शेअर मार्केटमध्ये कमालीचे स्वारस्य होते. शेअर बाजार म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार. कधी लाखो रुपयांचे नुकसान होईल कळतही नाही, असे शरफोद्दीन यांचे त्याच्यामागे सारखे टुमणे होते. पण तो ऐकण्यास राजी नव्हता. अधूनमधून आईच्या मागे धोशा लावून दहा-वीस हजार रुपये घेऊन जायचा. त्यातून काही कमाई झाली का, असे विचारले तर प्रचंड संतापायचा. त्याचा हा स्वभाव शरफोद्दीन आणि मोठ्या भावाला मुळीच पसंत पडत नव्हत्या. डॉक्टर सूनबाई तर अलिमचे वागणे-बोलणे खानदानाला शोभणारे नाही, असे बोलून दाखवू लागली होती. त्यामुळे त्याला विवाह बंधनात अडकवण्याचे प्रयत्न शरफोद्दीन यांनी सुरू केले. तर त्यालाही तो दाद देत नव्हता. एक दिवस शरफोद्दीन आणि त्यांची पत्नी नातेवाईकाकडे बाहेरगावाला गेले. तिथून परतत असताना गावाच्या टेकडीजवळ त्यांना ओळखीची मोटारसायकल दिसली. त्यांनी डोळे ताणून पाहिले तर अलिमसारखा मुलगा दोन मित्र आणि एका मुलीसोबत असल्यासारखे त्यांना वाटले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी टेकडीकडे वळवण्यास सांगितले. पण तोपर्यंत ते सारेच निघून गेले होते. तो अलिम असल्याची शरफोद्दीन यांना खात्री वाटत होती. पण त्यांची पत्नी माझा पोरगा अशा ठिकाणी जाऊच शकत नाही, असे म्हणत होती. अस्वस्थ झालेले शरफोद्दीन तीन चार दिवसानंतर नमाज पढून मशिदीबाहेर पडत असताना अलिम एका विचित्र माणसाशी बोलत असल्याचे त्यांनी पाहिले. ते लक्षात येताच अलिम त्याच्याकडून एक छोटीशी पिशवी घेत निघून गेला. तो माणूस घाईघाईने दुचाकीवरून पळाला. शरफोद्दीन यांच्या मनात विचारांचे काहूर सुरू झाले. त्यांनी मग अलिमचा छडा लावण्याचा निश्चय केला. त्याच्यावर सातत्याने नजर ठेवू लागले. आठवडाभरानंतर ते खजिल झाले. कारण त्यांना एकही संशयास्पद गोष्ट सापडली नाही. अलिम नित्यनेमाने विद्यापीठात जात होता. वर्गात अभ्यास करत होता. लायब्ररीमध्ये बसत होता. संध्याकाळी लवकर घरी येत होता. रात्री एखाद्या तासासाठी भटकंती करून दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत जाऊन झोपत होता. त्यामुळे मुलगा नीट मार्गावर आहे. टेकडीजवळ अलिम नव्हताच, असे त्यांना वाटू लागले. आणि ते निश्चिंतपणे दुकानात लक्ष घालू लागले. दुसरी सून आणण्याची तयारी करू लागले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असावे. मित्रांसोबत करीम बिर्याणी हाऊसमध्ये जेवण्यासाठी जातो, असे म्हणून रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडलेला अलिम परतलाच नाही. मोबाईल स्वीच ऑफ. घाबरलेल्या शरफोद्दीन, त्यांची पत्नी आणि साऱ्या कुटुंबानेच शोधाशोध सुरू केली. बिर्याणी हाऊसच्या मालकाला जाऊन भेटले. त्याला अलिमचा फोटो दाखवला. तेव्हा त्याने नेमके आठवत नाही. आमच्याकडे शेकडो ग्राहक येतात, असे उत्तर दिले. अखेर शरफोद्दीन पोलिस ठाण्यात पोहोचले. इन्सपेक्टर रशीद खान यांनी तपास सुरू केला. बिर्याणी हाऊसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अलिम तीन मित्रांसोबत जेवून बाहेर पडत असल्याचे निष्पन्न झाले. बड्या बिल्डराचा मुलगा अस्लम, प्रख्यात डॉक्टरांचा मुलगा इलियास आणि हिरे व्यापाऱ्याचा मुलगा फहाद यांची कसून चौकशी केली. पण जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या मार्गाने निघून गेले. एवढेच वारंवार समोर येत होते. तीन महिने उलटून गेले. मुलाच्या चिंतेने व्याकुळलेले शरफोद्दीन नमाज पढून बाहेर पडत होते. तेव्हा आपल्या डोळ्यासमोरील पडदाच दूर झाला, असे त्यांना वाटले. 

No comments:

Post a Comment