केवळ ते शहरच नाही तर पूर्ण प्रांतात
केव्हीपी शैक्षणिक संस्थेची ख्याती होती. संस्थेचे सर्वेसर्वा महादेवराव यांनी
अनेक मार्गांनी वाटचाल करत हे संस्थान उभे केले होते. त्यात शेकडो प्रकारचे
अभ्यासक्रम होते. अगदी गवंडीकाम, सुतारकाम शिकायचे, खादी तयार करायची, कलावंत
व्हायचे तरी केव्हीपी. आणि डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, कृषी तंत्रज्ञ होण्याची
इच्छा असेल तरी केव्हीपी. अशी प्रतिमा तयार झाली होती. जेवढे ज्ञानदान तेवढी फी
वसुली करायचीच, असे महादेवरावांचे एकमेव सूत्र होते. त्यामुळे ३० वर्षांपूर्वी एका
खोलीत डीएडच्या फक्त तीन विद्यार्थिनींवर सुरुवात झालेल्या केव्हीपीचा विस्तार
पाचशे एकर जागेवर झाला होता. किमान पाच हजार मुलं-मुली दरवर्षी प्रवेश घेत होते.
मेडिकल इंजिनिअरिंगची एक जागा किमान दीड कोटी रुपये मिळवून देत होती. राज्यात
दीर्घकाळ सत्तेत राहणाऱ्या पक्षाशी महादेवराव निष्ठावंत होते. त्यामुळे जमीन
बळकावणे, फी वसूली, प्राध्यापक-कर्मचाऱ्यांवर अन्याय यावरून काहीही आरोप झाले तरी
नोटिसांपलिकडे काहीही होत नव्हते. उंची तटबंदी असलेल्या चिरेबंदी वाड्यात सगळं
काही सुखनैव सुरू राहणार, अशी खात्री महादेवरावांच्या मर्जीत असलेली प्राचार्य
मंडळी कायम देत असायची. खुद्द महादेवरावांनाही तसेच वाटत होते. पण त्या दिवशी
रात्री ११ वाजता त्यांच्या बंगल्यावरील फोनची घंटी खणखणली. रिसीव्हर उचलताच
प्राचार्य ढमालेंनी जे सांगितले ते ऐकून त्यांच्या कपाळावर किंचित घाम पसरला.
तुम्ही त्यांना थांबवून ठेवा. मी पोहोचतोच, असे म्हणत ते मुलींच्या वसतीगृहापाशी
पोहोचले. तेव्हा किमान एक हजार मुले-मुली उभी होती. पोलिसांच्या किमान चार व्हॅन
दिसत होत्या. इन्सपेक्टर राजभोज त्यांच्यापर्यंत पाच-सात पावलांतच पोहोचले. मनात
दाटलेला संताप नियंत्रणात आणत म्हणाले, सर, घटना कळाल्यावर अर्ध्या तासाने तुमच्या
स्टाफने आम्हाला कळवले. याचा अर्थ काय समजायचा आम्हीॽ बरं, इथं आल्यावरही
हॉस्टेलमध्ये प्रवेश नाही, असं म्हणून रोखलं गेलं. सगळा मिडिआ इथं आलाय. त्याच्यासमोर
तुमचा स्टाफ अरेरावी करतोय पोलिसांशी. राजभोज यांच्याकडं रोखून पाहत महादेवरावांनी
परिस्थितीचा अंदाज घेतला आणि जा हॉस्टेलमध्ये असं खुणावलं. तसं पोलिस कर्मचारी आत
धावले. त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील रुम क्रमांक २०३मध्ये रक्ताच्या थारोळ्यात
पडलेल्या स्मिताला स्ट्रेचरवर टाकून सरकारी हॉस्पिटलला पाठवून दिले. राजभोज आणि
सबइन्सपेक्टर निर्मला काकडेंनी कसून तपासणी केली. निर्मलांनी हॉस्टेलच्या वॉर्डन,
स्मिताच्या रुम पार्टनर आणि इतर मुलींचे जाब-जबाब घेतले. काहीजणींना उद्या सकाळी
पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. मग राजभोज, निर्मला महादेवरावांकडे पोहोचले.
तोपर्यंत डॉक्टर जैस्वालांचा कॉल होता. स्मिताच्या डोक्याला खोलवर जखम झाली आहे.
दोन ऑपरेशन्स करावी लागतील. किमान तीन दिवस तिला बोलता, सांगता येणार नाही, असं त्यांनी
सांगितलं. ते राजभोज यांनी महादेवरावांना ब्रीफ केले. आणि म्हणाले, तुम्हाला
माहिती असावे किंवा नसेल तरी जे आम्हाला दिसलं, कळालं ते सांगतोय. स्मिता एकुलती एक,
श्रीमंत घरची मुलगी. आर्किटेक्टच्या सेकंड इअरला. आता या वयात जे असतं ते होतं.
अक्षय, धैर्यशील आणि आशिष तिच्या हात धुऊन मागे लागले होते. पण ती फक्त धैर्यशीलला
जवळचा मानत होती. रहस्यकथांचा लेखक होऊ पाहणारा, किंचित बायकी वळणाचा अक्षय आणि
तिच्याच वर्गात असलेला धनाढ्य आशिष तिला पसंत नव्हता. त्या तिघांमध्ये स्मितावरून
कँटीनमध्ये हाणामारी झाली होती. याशिवाय डबेवाला रतनसोबत तिचं किरकोळ कारणावरून
कडाक्याचं भांडण झालं होतं. छंदीफंदी तरुण अशी प्रतिमा असलेले, हॉस्टेलपासून जवळच
राहणारे प्राध्यापक कार्तिक विनाकारण लगट करतायत, असे वाटल्यावर तिने लेखी
तक्रारीचा इशाराही दिला होता. एकूणात तणावात असलेली स्मिता रात्री साडेदहाच्या
सुमारास एकटीच गच्चीवर गेली. पावणेअकरा वाजता परतली. त्यानंतर एकजण तिच्या खोलीत
शिरला. तिने प्रतिकार केल्यावर त्याने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती जबर जखमी
झाली. हल्लेखोराने तिच्या डायरीतील काही पाने फाडून नेली आहेत. खोलीत वाळूचे कण दिसलेत.
असं सांगून निर्मला, राजभोज निघाले. जीपमध्ये बसलेल्या निर्मला विचार करत होत्या
की, स्मिताच्या गळ्यातली सोन्याची एक साखळी सापडली. दुसरी हल्लखोरानं नेली असावी
काॽ आणि त्या शोधत होत्या की हॉस्टेलजवळ, कँपसमध्ये वाळूचे ढिगारे कुठंयतॽ
No comments:
Post a Comment