नाटकाच्या
प्रयोगासाठी तुम्ही गेलात. तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. मग रंगमंचावर नेमकं काय
उभारलं गेलंय. वास्तू, स्थळ कोणते आहे, हे जसजसे प्रकाशाने रंगमंच उजळू लागतो,
तसतसे दिसू लागते. म्हणजे एका अर्थाने म्हणाल तर प्रकाश योजना ही नाटकाची दृष्टीच
असते. जसं एखादी अंधारी वाट कंदीलाच्या प्रकाशात दिसू लागते. तसे नाटकाच्या
प्रत्येक प्रसंगात प्रकाश योजनेचे स्थान आहे. केवळ प्रसंगच नाही तर प्रत्येक पात्र
प्रेक्षकांच्या किती जवळ न्यायचे, किती दूर ठेवायचे हेही प्रकाश योजनेवर अवलंबून
असते. मात्र, त्यासाठी प्रकाश योजनाकाराला संहितेचा अभ्यास करण्याची आवड हवी.
नाहीतर योजनाकाराच्या हातून प्रकाशाची, नाटकाची दिशा निसटून जाते, अशा शब्दांत प्रख्यात
प्रकाश योजनाकार सतीश म्हस्के नाट्य जगतातील या अत्यंत महत्वाच्या पण दुर्लक्षित
प्रांताबद्दल सांगतात. त्यांनी गेल्या पस्तीस वर्षांत किमान अडीच हजार हौशी,
व्यावसायिक, प्रायोगिक नाटक-एकांकिकांना प्रकाश झोतात आणले आहे. राज्य हौशी,
कामगार, बाल नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी अक्षरशः अनेक बक्षिसे, प्रमाणपत्रे
मिळवली आहेत. अनेक सिनेमा, टीव्ही सिरीअल्ससाठी दिग्दर्शकांच्या विनंतीवरून
प्रकाशरचना करूनही दिली. मराठवाड्यातील कोणत्याही शहरात मोठा इव्हेंट करायचा असेल
तर मुंबई-पुण्याच्या संस्था आधी सतीश म्हस्के यांच्याकडून कितपत मदत मिळेल, याची
चाचपणी करून घेतात.
आज त्यांच्याविषयी
आणि प्रकाश योजना प्रांताबद्दल सांगण्याचे कारण म्हणजे दिवसेंदिवस नाट्य शिक्षणाकडे
मुला-मुलींचा ओढा वाढतो आहे. नाटकांमध्ये काम करून थोडा पाया मजबूत करून घ्यायचा
आणि दुसरी उडी टीव्ही मालिका, सिनेमात घ्यायची अशी त्यांची आखणी होत आहे. नाट्य
विभागातील प्राध्यापकही त्यांच्याकडे याच दृष्टीने बघत असतात. त्यातले बोटावर
मोजण्याइतके लेखक, दिग्दर्शक होऊ इच्छितात. बाकीच्या सर्वांना अभिनेता, अभिनेत्रीच
व्हायचे असते. खरेतर त्यांच्यातील अनेकजणात एक उत्तम प्रकाशयोजनाकार, एक रंगभूषा
करणारा, नेपथ्याची अप्रतिम नजर असलेला असतो. पण तंत्रज्ञ म्हणजे कमी दर्जाचा, असा
भयंकर समज तमाम प्रख्यात नट-नट्यांनी एकेकाळी करून ठेवला. तो तंत्रज्ञांनी लो
प्रोफाईल राहत वाढवत नेला. त्याचा परिणाम म्हणून मधल्या काळात प्रकाश योजना किंवा
अन्य तांत्रिक बाबींकडे ओढा रोडावला होता. सुदैवाने टीव्ही सिरीअल्स, वेब
सिरीजमुळे तो बऱ्यापैकी वाढत आहे. कारण तेथे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळत आहे.
म्हस्के यांचा
प्रकाश योजनेतील प्रवेश अपघातानेच झाला. १९८५चा काळ. घरची स्थिती
बिकट. आपल्याला शिक्षणात फारशी गती नाही, असे लक्षात येताच त्यांनी कामधंद्याचा
शोध सुरू केला. योगायोगाने त्यांच्या एकाने मित्राने त्यावेळी प्रकाश योजनेचे
साहित्य पुरवठादार प्रकाश तापी यांच्याकडे काम सुरू केले होते. लगेच पैसे मिळतील
की नाही माहिती नाही. पण काम आहे, असे तो मित्र म्हणाला. आणि म्हस्के यांनी
आयुष्यात पहिल्यांदा दहा-बारा किलो वजनाचा स्पॉट खांद्यावर उचलला. सेलूला ‘नटसम्राट’चा
प्रयोग होता. मित्राने सांगितले त्यानुसार म्हस्केंनी ठिकठिकाणी स्पॉट लावले.
डिमर्सला जोडले. आणि पूर्ण नाटक पाहिले. ते पाहताना त्यांना आपण एकदम नव्या
क्षेत्रात प्रवेश केल्याची जाणिव झाली. पोटापाण्यासाठी दुसरे काही करण्याची संधी
नव्हती. त्यामुळे प्रचंड मेहनत, कष्टाचे काम असले तरी प्रकाश योजनेतच चालत राहायचे,
असं त्यांनी त्या क्षणाला ठरवून टाकले. सुदैवाने तो काळ एकांकिका स्पर्धांचा होता.
व्यावसायिक नाटके धडाक्याने होत होती. प्रकाश तापी यांनी असंख्य स्पॉट, डीमर्स आणि
एकूणच यंत्रणा धडपड्या म्हस्केंना अत्यल्प भाडेतत्वावर देऊन टाकली. सर्वात
महत्वाचे म्हणजे प्रकाश योजनेचे बादशाह अशी ओळख असलेले प्रा. डॉ. अलोक चौधरींशी
म्हस्केंचा परिचय झाला. त्यांची कार्यपद्धती जवळून निरखण्याचा म्हस्केंना प्रचंड
फायदा झाला. प्रकाश योजनाकार म्हणजे केवळ दिग्दर्शक म्हणतो म्हणून रंगमंचाच्या
विशिष्ट भागात स्पॉट लावणे नाही. तर त्यानेही पूर्ण संहिता वाचली पाहिजे. लेखकाला
काय सांगायचे आहे. कोणत्या काळाची मांडणी त्याने केलीय. जेथे प्रसंग घडतोय. तेथील
वातावरणाबद्दल काही संकेत दिले आहेत का. दिले नसतील तर दिग्दर्शकाचे काय निरीक्षण
आहे. त्याला रंगमंचावर किंवा पडद्यावर दृश्य कसे दिसणे अपेक्षित आहे, हे अभ्यासणे
प्रकाश योजनाकाराचे काम असल्याचे म्हस्के यांना अनुभवातून कळाले. आणि मग त्यांनी
कोणताही प्रयोग असो. आधी मला संहिता वाचू द्या, असा आग्रह धरला. सुरुवातीला काही
दिग्दर्शकांना ते उद्दामपणाचे वाटले. पण प्रयोगांमध्ये प्रकाश योजनेलाही टाळ्या पडू
लागल्या. बक्षिसे मिळू लागली. परीक्षक प्रकाश योजनाकाराला भेटण्यास सांगा, असे
म्हणू लागले. तेव्हा त्यांना म्हस्केंचे वेगळेपण ठळकपणे कळाले. असाच वेगळेपणाचा
ठसा उमटवण्याची मोठी संधी तरुण पिढीकडे चालून आली आहे. केवळ नाटक, सिनेमाच नव्हे
तर शेकडो ठिकाणी प्रकाश योजनेची गरज भासू लागली आहे. त्याचा फायदा घ्यावा.
स्वतःतील कलावंतपण ताठ मानेने सिद्ध करावे, हाच म्हस्के यांचा सांगावा आहे.
सध्या मंदीचा काळ
असला तरी तो फार काळ राहणार नाही. मनोरंजनाचे जग आणखी विस्तारत होत जाणार आहे.
अफाट होणार आहे. त्यामुळे अभिनेता-अभिनेत्री किंवा लेखक म्हणून पुढे सरकता येणार
नाही, असे लक्षात आल्यावर तंत्रज्ञ होण्याकडे वळा. मेहनत करा आणि यशस्वी व्हा.
तेथे तुलनेने कमी स्पर्धा आहे. तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाल्याने पूर्वीएवढ्या
अंगमेहनतीची गरज नाही. फक्त सादरीकरणापूर्वी मेंदूच्या पटलावर सादरीकरण पाहता आले
पाहिजे. असे म्हस्के यांचे अनुभवाचे बोल आहेत. ते मनावर घेणारे स्वतःसोबत कला
प्रांताचेही भले करू शकतील, याची खात्री आहे.
No comments:
Post a Comment