Wednesday, 15 April 2020

स्वप्न बेतलं जिवावर

माणगाव छोटंसं. अगदी तीनशे घरांचं. त्यातले जेमतेम तीन-चार घरंच श्रीमंतांची. बाकी सगळे मजूर वर्गातले. श्रीमंतांच्या शेतावर राबायचे. ते देतील तेवढे पैसे घ्यायचे. गावातल्या त्यांच्याच दुकानावरून ज्वारी, तिखट, मीठ, भाजी, तेल खरेदी करायचं. चुलीवर अन्न शिजवायचं आणि खायचं, असं त्या गरीबांचं कित्येक वर्षापासून सुरू होतं. पण त्यातल्या कोणाची तक्रार नव्हती. जे काही आहे ते नशिबानं मिळालं वयाची साठी पार केलेले भिकाजीही त्याला अपवाद नव्हते. अलिकडं ते वयोमानाने थकू लागले होते. हे लक्षात आल्यावर नागप्पाच्या भावानं म्हणजे सत्यप्पानं बकऱ्या चारण्याची जबाबदारी भिकाजींवर सोपवली होती. चांगल्या चार-पाचशे बकऱ्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांना घेऊन भिकाजी गावाची वेस ओलांडत टेकडीजवळ पोहोचले. तेव्हा संध्याकाळ झाली होती. दहा मिनिटांत परतायची वेळ झाली. मग भिकाजींनी हाळी देत बकऱ्यांना वळते केले. पण दोन-तीन कळपातून बऱ्याच दूर गेल्याचं पाहून ते त्यांना हाकारण्यासाठी पुढे गेले. आणि त्यांची बोबडीच वळाली. कारण घळीत एक कवटी, हाडं पडली होती. मांसाचे तुकडे होते. त्यावर माशा घोंगावत होत्या. भिकाजी धावत गावामध्ये पोहोचले. थोड्यावेळानं इन्सपेक्टर सदाशिवराव आणि त्यांचे पथक घटनास्थळी धडकले. त्यांनी कवटी, हाडं तपासणीसाठी पाठवली. परिसर धुंडाळल्यावर एक लेडीज पर्स सापडली. त्यात काही कागदं होती. पण त्यांचा अक्षरशः लगदा झाला होता. आजूबाजूच्या गावांमधून मिसिंगची माहिती घेतली. तेव्हा नांदापूरला राहणारा अर्जुन नावाचा वीस-बावीस वर्षांचा पोरगा तीन महिन्यांपूर्वी मुंबईला जातो म्हणून गेलाय. पण मुंबईत पोहोचलो असे सांगितल्यावर त्याचा मोबाइल बंद झाला. त्यापुढची काही खबरबातच नाही, अशी माहिती मिळाली. कवटी, हाडे वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या तरुणाची असावीत. डोक्यावर जोरदार घाव झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला असावा, असेही समोर आले. अर्जुन नेमका कशासाठी मुंबईत गेला याची काहीच माहिती त्याच्या मजुरीकाम करणाऱ्या आई-बापाकडं नव्हती. पण हा पोरगा मुंबईला गेलाच नाही. कोणत्यातरी भानगडीत अडकला आणि त्यातूनच त्याचा खून झाला असावा, असं सदाशिवरावांचं एक मन सांगत होतं. मग त्यांनी मृतदेहाजवळ सापडलेली पर्स पुन्हा तपासली. तेव्हा आत एका चिठ्ठीवर बऱ्यापैकी अक्षरे दिसत होती. लिहिलं होतं मगनलाल – लोखंड सप्लायर. सोबत मोबाईल नंबरही होता. सदाशिवरावांनी कॉल केला. तर मगनलाल केव्हाच जग सोडून गेले होते. त्यांचा मुलगा माखनलाल व्यवसाय बघत होता. सदाशिवरावांनी मग अर्जुनचे गावातले, आसपासचे सर्व मित्र पकडून ठाण्यात आणले. तेव्हा काही धागेदोरे मिळाले. गावातल्या नाटक मंडळीत हौस म्हणून काम करणाऱ्या अर्जुनच्या डोक्यामध्ये सिनेमात काम करण्याचं खूळ शिरलं होतं. त्याला एका तमाशा मंडळात भूमिकाही मिळाली होती. तिथं त्याचं माला नावाच्या नर्तिकेसोबत नातं जुळलं होतं. दोघे मिळून मुंबईला जायचं ठरवत होते. पण त्यात अडसर होता तमाशा चालवणाऱ्या आनंदीबाईंचा. कारण मालाला सोडायचं तर आधी एक लाख रुपये दे, असं त्या अर्जुनला म्हणत होत्या. एवढा पैसा माझा आशिक झालेला लोखंडाचा व्यापारी, लोचट माखनलाल देईल, असं मालानं अर्जुनला सांगितलं होतं. हे पैसे तुच माखनलालकडून घेऊन दे, यासाठी अर्जुननं मालाकडंच टुमणं लावलं होतं. त्यावरून त्यांच्यात एक-दोन वेळा जोरात खटकाखटकी झाली होती. माला खरंच विश्वासाची आहे काॽ ती कायमची साथीदारीण होईल का, अशी त्याला शंका येऊ लागली होती. आनंदीबाईचा भाचा, कायम गुंडगिरी करणारा भानुदास आणि माणगावातील धनिक सत्याप्पांशी तिची नको तेवढी जवळीक त्याला खटकत होती. सदाशिवरावांनी चौकशी केली तर मालाही गायब झाली होती. त्यामुळं त्यांनी चौकशीची दिशा माखनलाल, तमाशा मंडळाकडे वळवली. आणि खुनी शोधून काढला.

No comments:

Post a Comment