Thursday, 9 April 2020

मद्यपीचा खूनॽ

सितारा कॉलनीतल्या पाच मजली यलो सन अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचा तत्काळ. फ्लॅट क्रमांक चारमध्ये पुरुषाचा मृतदेह सापडलाय, असा मेसेज हरीनगरच्या पोलिस ठाण्यात नुकत्याच पोहोचलेल्या इन्सपेक्टर तोनगिरेंना मिळाला. त्यांनी लगेच धडाधड फिंगर एक्सपर्ट, डॉग स्क्वाडला स्पॉटवर पोहोचण्याचे सांगितले. आणि तेही सितारा कॉलनीत पोहोचले. गेल्या काही वर्षांत खासगी नोकऱ्यांमध्ये भरघोस पगारवाढ झाल्याने अनेकजण बऱ्यापैकी श्रीमंत झाले होते. त्यांचे दोन-तीन बेडरुमचे फ्लॅटस अपार्टमेंटमध्ये होते. अपार्टमेंटला लागूनच डायमंड सोसायटीच्या बंगल्यांची भलीमोठी रांग होती. शहरातील किमान वीस टक्के अतिश्रीमंत मंडळी येथे राहत होती. त्यात केवळ व्यापारी, उद्योजक नव्हते. तर बडे डॉक्टर, काळ्या पैशांवर गब्बर झालेले अधिकारीही होतेच. इन्सपेक्टर तोनगिरेंनी सितारा कॉलनीत पोहोचताच या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली. मग ते दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. फ्लॅट क्रमांक चारमध्ये राहणाऱ्या सुधीरचा देह बेडरुममध्ये लोळागोळा होऊन पडला होता. शेजारी उंची मद्याच्या दोन रिकाम्या बाटल्या होत्या. सिगारेटची थोटकं होती. शिवाय रात्री उशिरा हॉटेलातून मागवलेल्या जेवणापैकी भात आणि मटनाचे तुकडे ताटात तसेच दिसत होते. सकाळी भांडे धुण्यासाठी आलेल्या कमलाबाई आल्या. साहेब-बाईसाहेब आतच असतील. त्यामुळे दरवाजा उघडा असावा, असे वाटून त्या थेट स्वयंपाकघरात गेल्या. तेथेच भांडी धुऊन ठेवली, हॉल झाडून-पुसून घेतला आणि जाते, असे सांगण्यासाठी बेडरुमजवळ गेल्या. तेथे सामसूम वाटल्याने त्यांनी डोकावून पाहिले. तेव्हा साहेब पडल्याचे  दिसले. ते चक्कर येऊन पडले की काय, अशी शंका कमलबाईंना आली. म्हणून त्यांनी त्यांना हलवून पाहिले. मग आरडाओरड सुरू केली. काही वेळाने नाईटआऊटसाठी मैत्रिणीकडे गेलेल्या सुधीर यांच्या पत्नी निलिमा पोहोचल्या. मृतदेहावर कोसळून पडल्या. तोनगिरेंनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. फिंगर एक्सपर्टकडून फार काही मिळेल, अशी शक्यता नव्हती. कारण सगळीकडं कमलबाईंच्या बोटाचे ठसे होते. अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांकडून त्रोटक माहिती मिळाली. त्यामुळे तोनगिरे सुधीरचे ऑफिस, मित्र, निलिमाचे ऑफिस, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक अशा अनेक ठिकाणी तपास सुरू केला. तेव्हा असे समोर आले की, सुधीर एकेकाळी कॉलेजचा हिरो आणि निलिमा हिरोईन होती. त्यांचे प्रेमप्रकरण प्रचंड गाजले होते. दोघेही मोठ्या कंपन्यांत बड्या पदांवर काम करत होते. त्यात निलिमांनी पाच वर्षांत साध्या सेल्स एक्झिक्युटीव्हपासून वेस्टर्न झोन हेडपर्यंत प्रगती केली होती. मुलगा शशांक पाचगणीला शिकण्यासाठी ठेवला होता. सगळे सुखनैव असताना संसाराचा ओघ भलतीकडेच वळाला. कारण सुधीरला मद्याचे व्यसन लागले होते. तो त्याच्या अक्षरशः आहारी गेला होता. त्यामुळे निलिमा बाहेर आधार शोधू लागली होती. तो तिला दुसऱ्या एका कंपनीचा सीईओ प्रीतेशच्या रुपाने मिळू लागला होता. त्याचा त्रास होऊन सुधीरचे व्यसन आणखीनच वाढले. त्याने कंपनीतील एका मित्राच्या मदतीने काही कॉलगर्लचे नंबर मिळवले होते. निलिमा प्रीतेशसोबत बाहेरगावी गेल्यावर तो त्यांना बोलावत असे. हा सारा प्रकार अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या एकटेच राहणाऱ्या उपप्राचार्य राजेंद्रना मुळीच पसंत नव्हता. आकर्षक, मादक आणि एकदम खुल्या विचारांची निलिमा प्रीतेशसोबत संबंध ठेवते. पण आपल्याशी जवळिक दाखवत नाही, हे त्यांना खटकत होते. शिवाय अपार्टमेंटसमोरच्या स्वस्तिक मेडिकल्सचा मालक रुपचंदलाही निलिमा-सुधीरमधला बेबनाव कळाला होता. त्याने एकदा निलिमाला अत्यंत कमी कपड्यात मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात एका माणसासोबत हातात हात घालून, बिनधास्त फिरताना पाहिले होते. त्यानं खातरजमा केली. तर दोघांच्या बाजूबाजूला रुम बुक होत्या. तो प्रीतेश नव्हता. तर डायमंड सोसायटीत राहणारा सुपर मून सिनेप्लेक्सचा मालक होता, असं तो त्याच्या मित्रांना खुसफुसत सांगत होता. पार्टीच्या निमित्ताने नित्यनियमाने सुधीरकडे येणाऱ्या किशोर, नवल खास मित्रांचाही निलिमावर डोळा होता. सुधीर गेला तर आपल्याला संधी आहे, असे त्यांना वाटत होते. दोन दिवसांनी पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला. तेव्हा सुधीरच्या पोटात विषारी औषधांचा अंश सापडला. आणि तोनगिरेंसमोर खुनी शोधण्याचे आव्हान उभे राहिले.  

No comments:

Post a Comment