Thursday, 30 April 2020

इटली … कोरोना.. मायकेल अँजेलो

कोरोनाचा पहिला तडाखा चीनच्या वुहान प्रांताला बसला. शेकडो बळी गेले. तरी त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती इटलीच्या भूमीवर. तेथे त्याने अक्राळविक्राळ रुप धारण केले. ते पाहून जग हादरून गेले. कारण वुहानमध्ये माध्यमांना प्रवेश नाही. अभिव्यक्ती स्वातंत्ऱ्य, व्यक्त होण्याचा अधिकार असं काही चीनमध्ये नाहीच. सरकारी माध्यम जे सांगणार तेच जगात जाणार. आणि सरकारला जे वाटतं तेच सरकारी माध्यमात जाणार. त्यामुळं अतिशयोक्ती किंवा तर्कटाचा भाग वगळला तरी त्या अर्थाने इटलीने जगाला सावध केले. हजारो बेफिकिर इटलीकरांनी स्वत:चे जीव गमावून अब्जावधी लोकांना या संकटाची माहिती दिली. सध्या कोरोनाचा देश अशी इटलीची ओळख होत आहे. पण मस्तीत जगणं हा या देशाचा मूळ स्वभावच आहे. त्याची शेकडो उदाहरणं इतिहासात पाहण्यास मिळतात. शिवाय हा अनेक जगद्विख्यात कलावंतांचा देश आहे. त्यापैकी एक आहे शिल्पकार मायकेल अँजेलो.
कोरोनाने मार्च महिन्यात इटलीमध्ये धुमाकूळ घालणे सुरू केले होते. ५४५ वर्षांपूर्वी याच महिन्याच्या सहा तारखेला मायकेलचा जन्म झाला. हा एक वेगळाच योगायोग म्हणावा लागेल. मायकेलचा जन्म झाला तो काळ संपूर्ण युरोपात वसाहतवादाचा होता. युरोपीय देश इतर खंडातील लोकांना शस्राच्या बळावर अंकित करण्यास निघत होते. त्याचवेळी रेनेसान्स ही दुसऱ्या टोकाची चळवळ सुरू झाली होती. त्यात कलावंत मंडळी नव्या निर्मितीच्या ध्यासाने भारावली होती. बुरसटलेल्या धार्मिक रुढी, परंपरा झुगारून द्या, असे कलावंत सांगू लागले होते. ग्रीक, रोमन शिल्प कलांकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसित  होऊ लागली होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातील बहुतांश कलावंतांना राजाश्रय, लोकाश्रय मिळू लागला होता. त्या अर्थाने मायकेल कमालीचा सुदैवी म्हणावा लागेल. तो जेथे राहत होता ते फ्लॉरेन्स शहर समृद्ध होते. दुसरं असं घडलं की ज्या दाईवर मायकेलला सांभाळण्यासाठी जबाबदारी दिली होती. तिचे कुटुंब पाथरवटाचे. त्यामुळे त्याची अगदी बालवयातच शिल्प कलेशी ओळख झाली. अर्थात अंगभूत प्रतिभा होतीच. ती फुलण्यासाठी मदत झाली. त्या वेळच्या वातावरणानुसार मायकेल आधी चित्रकलेकडे वळाला. डोमेनिको घिरलँडिओसारखा प्रख्यात चित्रकार त्याला गुरु म्हणून लाभला. त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने अनेक रेखाटने केली. पण त्याचे मन सारखे शिल्पकृतींकडे वळत होती. दगडांना विशिष्ट वळणे देऊन मानवी भावना चितारण्याचे किचकट, प्रचंड अंगमेहनतीचे काम त्याला सारखे खुणावत होते. मग एका शिल्पशाळेच्या निमित्ताने त्याला संधी मिळाली आणि एका अद् भुत शिल्पकाराचा जन्म झाला. चित्रकृती फक्त एकाच बाजूने म्हणजे कॅन्व्हासवर पाहता येते. शिल्प चारही बाजूंनी निरखता येते. त्यामुळे त्यावर सर्व बाजूंनी तेवढेच काम करावे लागते, याचा अतिशय अचूक अंदाज मायकेलला होता. म्हणूनच त्यानं संगमरवरातून जागतिक दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्या. पांढऱ्या रंगाचा हा पत्थर बाहेरून जसा दिसतो तसाच आतही आहे का. त्याच्या धमन्यांमधून काय वाहते आहे,  हे जाणून घेण्यात तो मातब्बर होत गेला. ‘स्लीपिंग क्युपिड’, ‘बॅटल ऑफ सेंटॉर’, ‘मेडोना ऑफ द स्टेअर्सया शिल्पकृती खूपच गाजल्या. पाच शतके होऊन गेलीतरी ती चर्चेत आहेत. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महत्वाची, वेगळी वाटतात. इटलीकरांच्या जडणघडणीचं, जीवनशैलीचं वैशिष्ट्य सांगतात. त्यातील एका शिल्पकृतीचे नाव आहे मद्यदेवता बॅक्स. एका हातात मद्याचा प्याला आणि दुसऱ्या हातात द्राक्षांचे घड असा आखीव-रेखीव बॅकस आहे. त्याच्या चेहऱ्यावर किंचित धुंदावलेपण आहे. त्याची पावलं मद्याचा अंमल चढल्याने किंचित अडखळली आहे. बॅकसच्या डाव्या हाताजवळ एक छोटेसे बालक आहे. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची निरागसता दिसते. मद्यपानाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आयुष्य संपवतो, असा संदेश मायकेलने  यातून दिलाय.
दुसरे शिल्प पिएता म्हणजे करुणा. येशू ख्रिस्ताचे पूर्ण जीवनच करुणामय. पण मायकेलने शिल्प निर्माण करताना त्यासाठी माता मेरी केंद्रस्थानी असेल अशी रचना केली आहे. येशू ख्रिस्त क्रूसावर प्राणार्पण करतो. मग त्याचा मृतदेह माता मेरीच्या मांडीवर ठेवला जातो. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर उमटलेला करुणेचा भाव त्याने इतक्या विलक्षण पद्धतीने साकारला आहे की, शिल्प पाहताना तोच भाव आपल्या मनात काही क्षणात झिरपू लागतो. या शिल्पाचे आणखी एक बलस्थान म्हणजे मेरी आणि येशू ख्रिस्ताच्या कपड्याला पडलेल्या चुण्या म्हणजे घड्या. छिन्नी, हातोड्याचे घाव घालून संगमरवराला कापडासारखी वळणे देण्याकरिता त्याने घेतलेली मेहनत थक्क करून टाकते. त्याची स्वाक्षरी असलेली हे एकमेव शिल्प, असे म्हटले जाते. त्यावरून मायकेलसाठी ते किती महत्वाचे याचा अंदाज येतो. शिवाय इटलीच्या बेफिकीर लोकांमध्ये कोरोनाच्या संकटानंतर करुणेचाभाव का प्रगटला असावा, याचाही अंदाज बांधता येतो.     



No comments:

Post a Comment