कोरोनामुळं सगळ्या
जगात उलथापालथ होत आहे. प्रचंड प्रदूषित गंगा-यमुना नद्यांची पात्रे कमालीची
स्वच्छ झालीयत. निसर्ग त्याला जसे हवे तसे करून घेत आहे. त्याचे शेकडो व्हिडिओ
पाहण्यास मिळत आहे. दुसरीकडं उद्योग, शिक्षण, राजकीय क्षेत्रांमध्ये मोठमोठे बदल
होतील, असे संकेत आतापासून मिळत आहेत. पहिल्या टप्प्यात जीवनशैलीच बदलेल, असे
म्हटले जात आहे. त्याचा थेट परफॉर्मन्स करणाऱ्या कला प्रांतावर किती परिणाम होईल,
याचा विचार करण्याची, रस्ते शोधण्याची वेळ निश्चित आली आहे. कारण कला आणि रसिक
प्रेक्षकांची गर्दी यांचे अतूट नाते आहे. रसिकच नाहीतर मैफली रंगणार कशा. फक्त
गायन-वादनावर जगणाऱ्यांचे पोट कसे चालणार. टाळ्या हीच शक्ती असलेल्या कलावंतांचा
उत्साह वाढणार कसा. नाट्य, सिनेमागृहांमध्ये गर्दीच नसेल तर नाटक-सिनेमाचे
अर्थकारण जुळणार कसे, असा गंभीर प्रश्न उभा टाकणार आहे. त्याची उत्तरे आतापासूनच
शोधावी लागतील. त्यासाठी कलावंतांनाच पुढाकार घ्यावा लागेल. काही वर्षांपूर्वी
औरंगाबादच्या संगीत क्षेत्रात कार्यरत आणि आता मुंबईत स्थायिक विजय न्यायाधीश
यांनी सर्व वादक-गायकांसाठी एक मुद्दा मांडला. तो असा की, कलावंतांना जगण्याची
आणखीही एखादी ‘कला’ आली पाहिजे. म्हणजे छोटासा उद्योग, नोकरी किंवा व्यवसाय हवा.
म्हणजे कलेच्या माध्यमातून पोट भरता आले नाही तर दुसरा आधार असेल. हा मुद्दा
विशिष्ट, मर्यादित क्षमता असलेल्यांसाठी अत्यंत रास्त, उपयुक्त आहे. पण खूप टोकाचे
वेड असलेल्या कलावंतांना ते शक्य होणार नाही. कलेत मातब्बर असाल तर पुढे जाण्याचा
काही ना काही मार्ग सापडून जातोच. त्यामुळे कला नसानसात भिनलेल्यांनी उद्योग,
व्यवसायाकडे वळू नये, असे वाटते. कारण हा जो अंधःकार दिसतोय. तो निश्चित हटेल.
काहीतरी नवीन दिसेलच.
कला जगतात जे काही
विचार मंथन सुरू होत आहे. नव्या दिशांना पाहिले जात आहे. त्यातील एक दिशा छोट्या
नोकरीची आहे. मराठी, हिंदी रंगभूमीवर यशस्वी झालेले अनेक दिग्गज सुरुवातीच्या
काळात बँका, आयुर्विमा महामंडळ अशा ठिकाणी नोकऱ्या करत. नावाला वलय प्राप्त
झाल्यावर हळूहळू त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. तसे काहीसे असले पाहिजे, असे
अनेकांना वाटू लागले असल्यास त्यात नवल नाही आणि गैरही नाही. शेवटी पोट चालले तरच
सगळे चालणार आहे, हे नक्की. पण नोकरीची कितपत संधी राहिल. त्यापेक्षा जे उपलब्ध
आहे. अंगभूत कौशल्य आहे. त्यातच आणखी काही शोधता येईल का, असा विचार केला पाहिजे. ‘बिकट
वाट वहिवाट असावी’ असे म्हणण्याचे दिवस येत आहेत.
कोरोनानंतरचा काळ
एकमेकांपासून दूर राहण्याचा, अंतर राखण्याचा असेल. पण तरीही लोकांना एकमेकांजवळ
येण्याची ओढ कायम राहणार आहे. ती घटणार नाही. उलट योग्य निमित्त असेल तर ती
वाढेलच. त्यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर करून संगीत मैफली होऊ शकतात का, याचा
विचार व्हावा. म्हणजे एका घरात गायक गात आहेत. वादक त्यांना विशिष्ट अंतरावरून साथ
संगत करत आहेत. आणि छोट्या
शहरातील २००-२५० अस्सल रसिक
इंटरनेटद्वारे मोबाईलवर जोडले जाऊन मैफलीचा आनंद घेत आहेत. त्या मोबदल्यात
कलावंतांना ऑनलाईन पेमेंट करत आहेत, असे चित्र दिसू शकते.
दुसरे असे की,
लॉकडाऊनच्या काळात टीव्हीशिवाय यु ट्युब हे एक प्रभावी माध्यम आढळले. लोकांनी
त्यावर मनपसंत भोजन पदार्थांच्या रेसिपीपासून ते मोबाइल पाण्यात पडला तर काय
करावे, इथपर्यंतचे व्हिडिओ पाहिले. अपलोड केले. सिनेमे पाहण्यासाठी तर मोठी गर्दी
होती. त्यात असे लक्षात आले की, दक्षिणेतील शेकडो सिनेमे डब करून हिंदीत उपलब्ध
करून दिले आहेत. सैराटसारखा एखाद दुसरा अपवाद वगळला तर काहीच नाही. त्यामुळे काही
दिवसांतच हजारो लोकांनी दक्षिणेतील सिनेमे पाहिले. एक नवा प्रेक्षकवर्ग त्यातून
तयार झाला. खरेतर मराठीतील सिंहासन, दुसरा सामना, गाढवाचं लग्न ते अगदी श्वास,
ख्वाडा, तुंबाड असे सिनेमे हिंदीत आवडू शकतील. पण मराठी कलावंत मंडळींचे बहुधा या
प्रांताकडे लक्ष गेलेले नाही, असे दिसते. दक्षिणेतील व्यक्तिमत्वांची, त्यांच्या
संवादशैलीची आपण मनसोक्त टिंगल उडवतो. पण दाक्षिणात्य लोक कायम नवनवे मार्ग शोधत
असतात. प्रचंड शिस्तबद्ध मेहनत करत त्यांची कला जगभर पोहोचवण्यासाठी जी धडपड करतात.
ती मराठी कलाप्रांताने आत्मसात केली पाहिजे. कोरोनाच्या निमित्ताने हे झाले.
पन्नास, शंभर मराठी सिनेमे हिंदीत डब होऊन यु ट्युबवर झळकले तर मराठीचा डंका अधिक
वाजेल. होय नाॽ
No comments:
Post a Comment