Wednesday 28 September 2016

नसीरुद्दीन नावाच्या उत्तुंग नटाचा प्रामाणिक प्रवास


--

लौकिक जगात यशस्वी झालेल्यांचा जीवन प्रवास पुस्तक रुपात वाचण्यास मिळावा, अशी अनेकांची इच्छा असते. कारण त्यांच्या प्रवासाचा मार्ग प्रेरणादायी असतो. त्यात जर ही यशस्वी झालेली व्यक्ती चित्रपट अभिनेता, अभिनेत्री असेल तर मग विचारायलाच नको. त्यांचे व्यक्तिगत जीवन जाणून घेणे लोकांसाठी मनोरंजकही असते. म्हणूनच बुलंद अभिनयाचे देणे लाभलेले नसीरुद्दीन शाह यांचे `मग एक दिवस` हे पुस्तक त्यांच्या अभिनयशैलीइतकेच आगळेवेगळे आहे, असे म्हणावे लागेल.

सुभाष घईंचा कर्मा चित्रपट दोन दशकांपूर्वी प्रचंड गाजला. त्यातील देशभक्तीपर गीते अजूनही १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला हमखास वाजवली जातात. त्यातील दिलीपकुमार आणि डॉ. डँग म्हणजे अनुपम खेरची जुगलबंदी आजही अनेकांच्या स्मरणात आहेच. कर्मा आणखी एका कारणाने गाजला ते म्हणजे त्याकाळी समांतर चित्रपटांचा पडदा व्यापून टाकत विलक्षण अभिनयाची अनुभूती देणारा नसीरुद्दीन शाह व्यावसायिक पडद्यावर आला होता. रंगमंचावर काम करणाऱ्या अभिनेते, अभिनेत्रींना चित्रपटात वास्तववादी घटनांशी जवळिक साधणाऱ्या भूमिका करणे सोपे जाते. पण मसाला किंवा तद्दन व्यावसायिक चित्रपटांमध्ये वास्तवात जे घडूच शकत नाही, असे वास्तवात आणले जाते. त्यातील व्यक्तिरेखाही तशाच असतात. त्यामुळे नसीरुद्दीन फसणार. लोकांच्या पसंतीला उतरणार नाही, असे म्हटले जात होते. शिवाय त्याच्यासोबत व्यावसायिक चित्रपटांत नाव कमावलेली दिलीपकुमार, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूरसारखी प्रचंड लोकप्रिय मंडळी होती. मात्र, प्रत्यक्षात नसीरुद्दीनचा खैरू लोकांनी डोक्यावर घेतला. त्याच्या वाट्याला आलेले सर्व प्रसंग त्याने जिवंत केले. चित्रपटाच्या अखेरीस प्राण सोडताना लोकांच्या डोळ्यात पाणी आणण्याची ताकद फक्त अमिताभ बच्चनमध्येच, असे मानले जात होते. (आणि ते खरेही आहे.) त्यात नसीरने स्वतःचे नावही नोंदवले आहे. अतिरेक्यांच्या गोळ्यांनी जखमी झालेले दिलीपकुमार आता वाचतील की नाही, याबाबत सांगू शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर नसीरने जो काही हलकल्लोळ केला आहे, तो अंगावर रोमांच उभे करतो. त्याची अभिनयातील ताकद आणि व्यावसायिक पडद्यावरही छाप उमटवण्याची क्षमता दाखवून देतो. हिंदी चित्रपटसृष्टीत जे विलक्षण प्रतिभावान आणि उत्तुंग अभिनेते होऊन गेले आणि सध्या आहेत. त्यांच्या यादीत नसीरचा क्रमांक खूपच वरचा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. हिंदी चित्रपटात नटाला आवश्यक असणारा चेहरा, रुप नसतानाही त्याने केवळ अभिनय, पल्लेदार आवाजाच्या जोरावर हे स्थान प्राप्त केले आहे. अर्थात त्याची ही वाटचाल सुखाची नाहीच. एका उच्च मध्यमवर्गीय घरात जन्म घेऊनही त्याचा अभिनेता होण्याचा मार्ग खडतर राहिला. अनेक वळणे घेत, आयुष्यातील खड्डयांतून जात तो चालत राहिला. कोणत्याही क्षणी त्याने अभिनेता होण्याचे स्वप्न धूसर होऊ दिले नाही. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याने चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठीच खर्च केला. रंगभूमीवरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. त्यामुळे या उत्तुंग अभिनेत्याचा जीवन प्रवास म्हणजे प्रत्येक रंगकर्मीसाठी अभ्यासाचाच विषय आहे. खुद्द नसीरनेच त्याचा सारा प्रवास अतिशय प्रामाणिकपणे `मग एक दिवस` या पुस्तकात मांडला आहे. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांनी त्याचा मराठीत केलेला अनुवाद पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. आत्मकथन म्हणजे आपण आयुष्यभर केलेल्या कामगिरीचे पुनरावलोकन. आयुष्यभर घेतलेल्या निर्णयांचा किंचित मागे वळून पाहत घेतलेला धांडोळा. तो घेत असताना बहुतांश मंडळी त्यात इतरांवर आगपाखड करतात किंवा स्वतः केलेल्या घोडचुका सांगणे टाळतात. ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा आवर्जून उल्लेख करतात आणि ज्यांना आपल्यामुळे पश्चाताप झाला अशांबद्दल सांगणे टाळतात. नसीरने मात्, सारेकाही प्रामाणिकपणे सांगितले आहे. गांजाचे व्यसन, आई-वडिलांसोबतची बेदरकार, बेजबाबदार वागणूक, फॉकलंड रोडवर वेश्यांची संगत, मित्रांसोबतची भांडणे असे त्याने कोणताही आडपडदा न ठेवता सांगितले आहे.  आणि चुकांची कबूलीही दिली आहे. त्यामुळे अभिनेता होत असताना एक बाप, पती, मुलगा म्हणून तो कसा अयशस्वी होत गेला. आणि चुकांचे परिमार्जन करण्यासाठी त्याने खरेच काय केले, हेही वाचकांसमोर येते. सई परांजपे यांनी नसीरचे अंतरंग मराठीत आणताना त्यातील सत्व कायम राहिलच शिवाय त्यातील मराठीपण रुचेल, पचेल अशी काळजी घेतली आहे. त्यामुळे सर्वच प्रकरणे अतिशय वाचनीय, सखोल झाली आहेत. नसीरचे नट, अभिनेता म्हणून घडत जाणे कसे थरारक आणि एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसे होते, याचे दर्शन सुरेखपणे घडत जाते. विशेषतः नसीरने चित्रपटात काम करण्यासाठी पहिल्यांदा मुंबापुरी काढल्यावर जे दिवस काढले त्याचे वर्णन नव्या पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे.

असे म्हणतात की नट तयार होत नाही. तो जन्मालाच यावा लागतो. नसीरच्या बाबतीत हे म्हणणे तंतोतंत खरे ठरते. त्याचे आत्मवृत्त वाचल्यावर तर ते अधिक ठळकपणे लक्षात येते. अगदी लहान वयातच त्याला आपण उत्तम नट होऊ शकतो, असे वाटू लागले आणि मग हे वाटणे प्रत्यक्षात आणण्यसाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. मुंबईत अक्षरशः रस्त्यावर मुक्काम ठोकत मायानगरीतील ठोकरा खाल्ल्या. आता भारतीयच नव्हे तर परदेशातील रंगभूमी, चित्रपट क्षेत्रात उंचीवर पोहोचल्यावरही त्याचा नट म्हणून स्वतःचा शोध जारी आहे. अनेक रंगकर्मी किरकोळ यश मिळताच थांबून जातात. किंवा त्याच भूमिकांच्या चौकटीत अडकून जातात. स्वतः करत असलेलेच काम सर्वश्रेष्ठ असे मानणारी मंडळी तर राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, कला प्रांतात ढीगभर आहेत. पण असे मानणे म्हणजे थांबणे होय आणि जो थांबला तो संपला, असा जगाचा नियम आहे. हेच नसीरने त्याच्या कथनात मनापासून मांडले आहे. ते तेवढ्याच मनापासून वाचले तर खरा आनंद मिळेल.

No comments:

Post a Comment