Friday 31 January 2020

पत्ते योग्य पडले नाही

पहाटे पाच वाजेची वेळ. अनेकजण मॉर्निंग वॉकला जाण्याची तयारी करत होते. काहीजण तर त्याआधीच उद्यानात, रस्त्यांवर दाखलही झाले होते. थंडीचे दिवस असल्याने सर्वांच्या डोक्यावर टोप्या, मफलर होत्या. अर्धवट झालेली झोप आवरत अनेकजण बळजबरीचा व्यायाम करत होते. त्याचवेळी पोलिसांची मोबाईल गस्ती व्हॅन पोलिस ठाण्याकडे परत निघाली होती. चला फार काही मोठं घडलं नाही. दोन राऊंडमध्ये एक भुरटा चोर सापडला. त्यापलिकडं काही नाही. आता घरी जाऊन निवांत पडता येईल, असा विचार इन्सपेक्टर काळे करत होते. पण बहुधा नियतीला ते मान्य नसावे. व्हॅन अगदी पोलिस ठाण्याच्या आवारात शिरत असतानाच वायरलेस सेटवर ग्रीनलँड अपार्टमेंटमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा निरोप मिळाला. त्यांनी ड्रायव्हरला व्हॅन तशीच वळवण्यास सांगितले. बघ्यांची गर्दी हटवून काळे आवारात दाखल झाले. तर पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून धूर येत होता. धुराचे लोट जिन्यावरूनही वाहत होते. त्यामुळे कोणाला तिथे जाणं शक्य नव्हते. अपार्टमेंट सोसायटीचे सचिव मनिष धारकंडकर अग्निशमन दलाला कॉल करत होते. काळेंनी मग स्वतःच अग्निशमनच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यांचे बोलणे होईपर्यंत आगीचा बंब आला होता. जवानांनी शिड्या लावून पाण्याचा मारा केला. धूर थांबला. मग काळे आणि त्यांचे सहकारी झटपट पायऱ्या चढून फ्लॅटमध्ये शिरले. दरवाजाला धक्का दिला. तेव्हा दरवाजाला अडसर म्हणून अडकवलेल्या, एकाला एक जोडलेल्या दोन गाद्या खाली पडल्या. त्यात तिन्ही गाद्यांतून धूर येतच होता. शिवाय गॅलरीत ठेवलेली एक गादी, दोन उशाही धुराने वेढलेल्या होत्या. त्यापलिकडे काळेंनी नजर टाकली आणि ते चकितच झाले. आणखी एका जळालेल्या गादीवर एक महिला पडलेली होती. त्यांनी तपासलं तर तिचा प्राण निघून गेला होता. ग्रीनलँड अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकट्याच राहणाऱ्या, अंदाजे पन्नास वर्षे वय असलेल्या एलआयसी कर्मचारी निलिमा यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे, असे काळेंनी वरिष्ठांना कळवले. चोरीचा इरादा असावा. किमान दोन चोरटे असावेत. महिलेने प्रतिकार केल्यावर त्यांनी तिला गळा आवळून मारले आणि नंतर आगीत जळाल्याचे भासावे म्हणून गादी पेटवली असावी, असा प्राथमिक अंदाजही व्यक्त केला. मग अँब्युलन्स बोलावून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रवाना केला. अपार्टमेंटचा चौकीदार, सचिव आणि अध्यक्षांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी निलिमांबद्दल सांगितले. त्या साधारणतः सहा वर्षांपूर्वी येथे राहण्यास आल्या होत्या. त्यांचे पती केनियामध्ये असतात. ते कधीच इथे आल्याचे दिसले नाही. त्यांच्या सावत्र बहिणीचा तरुण मुलगा कधीतरी येताना दिसत असे. क्वचित ऑफिसचे कर्मचारी, मैत्रिणी येत. पण तेही तासाभराच्या पलिकडे थांबत नव्हत्या. निलिमा कधीच सोसायटीच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नसत. संध्याकाळी ऑफिसमधून आल्या की त्या स्वतःला टीव्हीसमोर बांधून घेत. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत. किंवा एकटीनंच पत्ते खेळत. कधीतरी बाहेरून जेवण मागवत, अशी माहिती समोर आली. निलिमा यांचे कोणाशीही सख्य नसले तर भांडणही नव्हते. काळेंनी अपार्टमेंटच्या चौकीदाराला पट्ट्यावर घेण्याचा प्रयत्न केला. पण तो सत्तरीत पोहोचलेला म्हातारा. त्याची नात बाळंतपणासाठी आली होती. तिच्या देखभालीत रात्री गुंतला होता. त्यामुळं अपार्टमेंटमध्ये कोण आलं, हे त्यानं पाहिलंच नव्हतं. पण हा फ्लॅट एका बिल्डराला पाहिजे होता. त्यासाठी तो निलिमांकडे तगादा लावत होता. अध्यक्ष, सचिव आणि अपार्टमेंटमधल्या  काही बायका निलिमा मॅडमवर नाराजच होत्या. समोरचा किराणा दुकानदारही फ्लॅटवर डोळा ठेवून आहे, असं चौकीदारानं हलक्या आवाजात सांगितलं. मग काळे पुन्हा फ्लॅटमध्ये शिरले. तोपर्यंत फिंगर प्रिंट एक्सपर्ट आले होते. श्वानपथकही दाखल झालं होतं. सामानाची उचकापाचक झाली होती. त्यात पत्त्यांचा कॅट विखुरला होता. पण सोन्याचे दागिने, रोख रक्कम सगळंच जागच्या जागी होतं. म्हणजे ही चोरी नव्हती. मग नेमकं काय होतंॽ निलिमांचा प्राण कोणी घेतला होताॽ गादी का पेटवली होतीॽ    
००००००००००००००००००००
गेल्यावेळचे उत्तर
आयसीयू वॉर्डातील बेडवर पडलेल्या स्वरूपकुमारांनी त्या संध्याकाळचा सगळा घटनाक्रम डोळ्यासमोर तपशीलाने आणला. एका क्षणाला ते चमकले आणि रुममधील कपाटात अडकवून ठेवलेली त्या दिवशीची पँट त्यांनी तपासून पाहिली. पँटच्या खिशात सोन्याची एक अत्यंत बारीक रिंग अडकली होती. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांनी तातडीने तिसऱ्या सूनबाईला म्हणजे मंजूला बोलावून घेतले. रिंग दाखवताच ती घडघडा बोलू लागली. नवऱ्याला नव्या शोरुमसाठी सासऱ्याकडून एक कोटी रुपये मिळत नाही, असे लक्षात आल्यावर तिने संतापाच्या भरात वाकडा मार्ग निवडला. गुंडाला एक लाख रुपये दिले होते. पण त्याचा फटका स्वरूपकुमारांनी चुकवला. ते त्याच्या अंगावर चालून जात असताना मंजूनेच त्यांना मागे ओढले. झटापटीत तिच्या कानाची रिंग स्वरूपकुमारांच्या पँटला अडकली होती. रुग्णालयात अर्धवट शुद्धीत आल्यावर त्यांनी काय टोचतंय, असं म्हणत खिसा झटकला. तेव्हा ती रिंग खिशात गेली होती. सासऱ्यानेच गुन्हेगार शोधलाय हे लक्षात आल्यावर मंजू माफी मागू लागली. खरेतर स्वरूपकुमारांना जबाब बदलण्याची इच्छा होती. पण त्यांनी झाकली मुठ सव्वालाखाची ठेवायचे ठरवले.    

अवघे विश्वची नृत्याचे

नृत्य करणारे काही कलावंत तुमच्यातून म्हणजे प्रेक्षागृहातून येतील, अशी उद्घोषणा महागामीच्या संचालक पार्वती दत्ता करत होत्या. तेव्हा नाट्यजगताशी नाळ जुळलेल्या अनेकांना यात काय विशेष? कलावंतांची एंट्री प्रेक्षकांमधून हा प्रयोग तर नाटकामध्ये तर घासून, पुसून, झिजून झाला आहे, असे वाटले. त्यामुळे ते काहीसे सुस्तावून बसले होते. पण काही मिनिटांतच त्यांनी जे काही पाहिले, अनुभवले ते जिवाचा थरकाप उडवणारे होते. बरं, केवळ थरकाप उडाला असता तरी समजू शकले असते. पण  केरळचे नर्तक आणि त्यांच्यासोबतचे वादक त्यापुढे गेले होते. त्यांनी सत्याचा असत्यावर विजय होतोच, असे मूलभूत तत्व कालिका देवी-राक्षस युद्धातून सांगताना पाहता पाहता रंगमंचाभोवतीचा अवकाशही ताब्यात घेतला. थरकापाचे रुपांतर अद्‌भुतेमध्ये केले. मग आणखी एक पाऊल पुढे टाकत केवळ वाद्यांचा ठेका बदलत, चेहऱ्यावर भाव-भावनांच्या प्रत्यंचा खेचत रोमांच उभा केला आणि अखेरच्या टप्प्यात त्याच रंगमंचावर रसिकांमध्ये साहसही जागृत केले. हे सारे त्यांनी अवघ्या एक ते सव्वा तासाच्या मुडियट्ट नृत्यातून मांडले. तेव्हा दाट झाडांनी वेढलेल्या महागामीचा परिसर आश्चर्यचकित, आनंदित झाला. 'अवघे विश्वच नृत्याचे अद्‌भुत घर' असाच भाव रसिकांच्या मनात उमटला. पण हे केवळ या मुडियट्ट नृत्यापुरते मर्यादित नव्हते. तर आठ दिवसांपूर्वी महागामीच्या शारंगदेव महोत्सवात झालेल्या प्रत्येक सादरीकरणाबाबत हेच म्हणावे लागेल. सर्व नृत्य प्रकार स्वतंत्र भाषेत, शैलीत काहीतरी संदेश देणारे होते. तरीही त्याचा मूळ धागा अतिशय पक्का, कसदार होता. तो म्हणजे हे जीवन असंख्य घटनांनी, चढ-उतारांनी, सुख-दुःखाने काठोकाठ भरले आहे. त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चालावेच लागते. काही क्षणांशी लढणे भाग पडते. पण अंतिम विजय सत्याचा, चांगुलपणाचाच होतो. मात्र, त्यासाठी अविरतपणे कष्ट केलेच पाहिजेत. मेहनतीनेच तुम्ही पुढे जाऊ शकतात, असे स्पष्ट निर्देश त्यात होते. त्यामुळे वरवर पाहता हा महोत्सव म्हणजे नव्या पिढीसाठी भारतीय नृत्य परंपरेची ओळख असा असला तरी त्यातून सर्वांसाठी जीवनातील एक मूळ तत्व, नृत्याच्या वैश्विक परिभाषेतून देण्याचा प्रयत्न होताच. आणि प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता तो प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. 
नृत्य म्हणजे केवळ मनोरंजन नाही. किंवा वाद्यांच्या तालांवर शरीराला नव-नव्या आकारात वाकवणे नाही. तर नृत्यही नाटक, सिनेमा, कथा, कादंबरीप्रमाणे एक कथानक घेऊन तयार होते. त्यातही व्यक्तिरेखा असतात. त्या टप्प्या-टप्प्याने विकसित होतात. या नृत्य प्रवासात नर्तकाला काहीतरी सांगायचे असते. वादकांना विशिष्ट तालातून वातावरण निर्माण करायचे असते. हे कळण्यापर्यंत या महोत्सवाने नृत्य अभ्यासक, रसिकांना आणून ठेवले आहे. 
आजकाल कोणाचेच काहीच समजून घ्यायचे नाही. माझे तेच खरे, असे मानणाऱ्या उजव्या, डाव्या, मध्यममार्गी लोकांचा चोहोबाजूंनी गलबला झाला आहे. त्यात अतिशय शांतपणे, सखोलतेने विषय या महोत्सवात समजून घेत, समजावून सांगितला गेला. याचे पूर्ण श्रेय या महोत्सवाचा पसारा अतिशय कल्पकतेने,  सातत्याने, न थकता मांडणाऱ्या महागामीच्या संचालक पार्वती दत्ता यांना आहे. 

भारतीय शास्त्रीय, लोकनृत्य म्हणजे एक महान संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. आणि तो जतन करण्याची जबाबदारी आताच्या लोकांची जबाबदारी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेकडो वर्षांपासून नृत्य कलेला जिवंत ठेवणाऱ्यांना जगवणे. सर्वांसमोर आणणे हे आपले कर्तव्यच आहे, या ठाम जाणिवेतून त्यांचे काम सुरू आहे. म्हणून त्यांनी कायम छोटेखानी शहरातील लोकांपासून दूर असलेल्या नृत्य प्रकारांनाही प्राधान्य दिले. दरवर्षी काहीतरी नवीन, वेगळे असा त्यांचा ध्यास दरवर्षी नृत्याची एक नवीन दालन खुले करत आहे. गेल्या काही वर्षात जागतिक कीर्तीच्या अनेक नृत्य कलावंतांना निमंत्रित केले. त्यांच्या सादरीकरणातून रसिकांच्या मनाला तृप्तता मिळवून दिलीच. शिवाय भारतीय शास्त्रीय नृत्यातील नवे काही जाणून घेण्यासाठी, नृत्यातील दिशा शोधण्यासाठी तळमळणाऱ्यांना एक निश्चित दिशा दाखवून दिली. या महोत्सवाचे दत्ता यांनी कसोशीने जपलेले एक आणखी अत्यंत ठळक, मूलगामी वैशिष्ट्य म्हणजे हा महोत्सव केवळ सादरीकरणापुरता मर्यादित राहू दिला नाही. तर त्या मागील सारी गुपिते, रहस्ये त्यांनी चर्चासत्रांतून कलावंतांमार्फतच उलगडली. या नृत्यामागील नेमका विचार कायॽ ते कसे सुचलेॽ कोणी, का निर्माण केले. त्याचा पुढील प्रवास कसा झाला. सध्या या नृत्य प्रकाराची काय अवस्था आहे. पुढील काळात त्यात कोणती स्थित्यंतरे अपेक्षित आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कलावंत मंडळीमार्फत मिळवून दिली. त्यातून नृत्य अभ्यासक, रसिकांच्या ज्ञानविश्वात मोलाची भर पडत नसेल तरच नवल. 

Wednesday 22 January 2020

सात रंगांपलिकडला

चित्रातून काहीतरी गोष्ट, विचार सांगण्याची कला दृश्य कलांमधील सर्वात प्रभावी मानली जाते. कारण बहुतांश वेळा ती त्या कलावंतांची एकट्याची उर्जा असते. त्यासाठी त्याने दीर्घकाळ निरीक्षण, मंथन केलेले असते. त्यातून येणारी अस्वस्थता त्याला प्रकट करायची असते. ही अस्वस्थता जेवढी खोलवर, विस्तारलेली असेल तेवढी त्याची कलाकृती समुद्राच्या तळासारखी अथांग होत जाते. कधीकधी चित्रकाराला अपेक्षित नसलेला विचारही रेखाटनातून बाहेर पडत असतो. चित्रामागील विचार, परिमिती, रंगसंगती यांचा अचूक संगम झाला की ते बघणाऱ्याच्या चित्तवृत्तीला खिळवून ठेवते. त्यात दडलेले अनेक अर्थ चित्र स्वतःच उलगडून सांगू लागते. असाच अनुभव नेहा राजेश पाटणी, सृष्टी भरत पाटील, यशवंत विजय शिंदे या तरुण चित्रकारांच्या चित्रकृतींतून येतो. त्यांच्या सुमारे १०० रेखाटनांचा एक प्रकारचा महोत्सवच औरंगाबादेतील मालती आर्ट गॅलरीत नुकताच भरला होता. हे तिन्ही चित्रकार विशेष वर्गातील. जन्मतःच निसर्गाने त्यांच्यातील श्रवणशक्ती हिरावून घेतली आहे. पण असे करताना त्यांना इतर शक्ती प्रदान करण्यास विसरला नाही. त्यामुळे सृष्टी, नेहा, यशवंत यांची कला पाहताना सात रंगांपलिकडला विशेष रंग अनुभवण्यास येतो. असे म्हटले जाते की, केवळ अंगभूत कला असून चालत नाही. ती खुलवण्यासाठी एक चांगला गुरु भेटावा लागतो. या तिघांना तो कला शिक्षक विठ्ठल पैठणकर यांच्या रुपाने भेटला. 
विशेष मुलांमधील कलागुणांना व्यापक मंच मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या उत्कर्ष संस्थेने हा प्रदर्शन रुपातील महोत्सव आयोजित केला होता. त्यात नेहा, यशवंत, सृष्टीने कॅनव्हासवर जी मांडणी केली. ती अर्थातच त्यांच्या भावविश्वातील, अनुभवातील विचारांचे प्रकटीकरण होते. त्याची विविध रुपे त्यांनी साकारली. नेहाने मास्टर्स इन फाईन आर्टसमध्ये शिक्षण पूर्ण करताना ‘गिटार’ असा विषय निवडला  होता. गिटार हे वाद्य किती वेगवेगळ्या परिमाणात दिसू शकते. त्याचा मानवी विचारांशी कसा संबंध आहे, हे तिने ज्या सखोलतेने मांडले. ते पाहून आपण गुंतून जातो. विचार कधी भरकटतात, स्थिरावतात, कधी आक्राळविक्राळ होतात. कधी मनाच्या तळाला ढवळून काढतात. कधी आनंदाचा लाटा निर्माण करतात तर कधी दुःखाने वेढून टाकतात, अशी संकल्पना तिने गिटारीभोवती गुंफली. प्रत्येक चित्रात ब्रशचा स्ट्रोक, रंगसंगती नेहातील कौशल्याची तर जाणिव करून देतेच. शिवाय ती कोणत्या पद्धतीने जीवनाकडे बघते, हेही लक्षात येते. इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी, बालश्री पुरस्कार विजेत्या सृष्टीची बहुतांश रेखाटने निसर्गाशी नाते सांगणारी. आजूबाजूला दिसणारा परिसर, त्यातील सौंदर्य तिने प्रत्येक चित्रात टिपले आहे. पुढील काळात जसे तिचे विश्व विस्तारत जाईल, तसे रेखाटनाचे विषय आणखी सखोल, व्यापक होत जातील, याची खात्री पटत जाते. या प्रदर्शनावर यशवंतच्या चित्रांची मोहर ठळक आणि आकर्षक होती. औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात बी.एफ.ए. पदवी मिळवलेल्या यशवंतला विषयांचे बंधन नाही. त्याने निसर्गाची अनेक रुपे तर रेखाटलीच आहे. शिवाय ऐतिहासिक प्रसंग, त्याला दिसलेली महापुरुषांची विविध रुपेही चितारली आहेत. त्यातील बाह्य आणि आतील रेषा अतिशय सूक्ष्म पण बोलक्या आहेत. विशेषतः अर्धी मांडी घालून बसलेले भगवान गौतम बुद्धांचे चित्र तर आपण काहीतरी नवीन, वेगळेच पाहत आहोत, हे वारंवार सांगत राहते. एवढा त्यात विचार त्याच्या कुंचल्याने प्रगट केला आहे. पुन्हा कधी ही चित्रे पाहण्यास मिळाली तर नक्की त्यांचा आस्वाद घ्यावा, एवढेच या निमित्ताने सांगणे आहे.

दरवाजा उघडा राहिला अन्...

आरोग्य अधिकारी पदावरून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या डॉ. शालिनींनी आधी अमेरिकेत बहिणीकडे धाव घेतली. तिथून सिंगापूर, श्रीलंका अशी फेरी मारून त्या परतल्या. यामुळे त्यांचे पती डॉ. रमेश चांगलेच खट्टू झाले होते. मी आजारी असताना तुझा साधा फोनही नाही, असे ते म्हणू लागले. त्यावरून त्यांचे जोरदार खटके उडाले. दोनदा डॉ. रमेश यांनी त्यांच्यावर हातही उगारला. मी तुझ्यापेक्षा वयाने आणि कर्तबगारीने लहान म्हणून तु मला असे टाळतेस, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर शालिनींनीही ‘तु माझा दुसरा नवरा. सतीशपासून झालेल्या मुलीचा तु स्वीकार केल्याचे नाटक केले. पण वर्षभरातच तुझे खरे रूप दिसल्यावर मी तुझ्यापासून मुल होऊ दिले नाही. हे कायम लक्षात ठेव’ असे तावातावाने म्हटले होते. हे ऐकून त्यांच्या शेजारी, कापड व्यापारी उमाकांत चकित झाला होता. प्रचंड आर्थिक सुबत्ता असलेल्या शालिनींचे हे रुप पाहून त्याच्या मनात वेगळीच लालसा निर्माण झाली. अलिकडे आपल्याला धंद्यात खोट आली आहे. डॉक्टरबाईला काहीतरी करून गळाला लावून तिच्याकडून पैसे उकळले पाहिजे, असे त्याला वाटू लागले. पण अचानक त्या दिसेनात. मग त्याने रमेशना न राहवून विचारले. तेव्हा त्या मोरगावला मुलगी वैशालीकडे आठ दिवसांसाठी मुक्कामाला गेल्याचे कळाले. मग उमाकांतनेही मोरगावलाच शालिनींना भेटून पैसे मिळवण्याचे ठरवले. इकडे शालिनी वैशालीकडे घरी पोहोचल्या. तेव्हा तिच्याकडे नव्या रुग्णालयाच्या उद्घाटनाची लगबग सुरू होती. मराठी विषयाची प्राध्यापक असलेल्या वैशालीनं बालरोगतज्ज्ञ अविनाश यांच्याशी विवाह केला होता. अविनाश अतिशय तापट म्हणून प्रख्यात होते. शालिनींकडून लग्नाला विरोध होताये, असे लक्षात आल्यावर त्यांच्यावर प्रचंड संतापले होते. त्यांच्यात जोरदार हमरातुमरीही झाली होती. पुढे वैशालीनं आईला न जुमानता विवाह केला. हळूहळू अविनाश कामात गुंतले. पण त्यांच्यातील धुमसणे अजूनही कायम होतं. म्हणूनच की काय त्यांनी रुग्णालयाच्या उद्‌घाटनाची साधी निमंत्रणपत्रिकाही सासू-सासऱ्यांना पाठवली नव्हती. पण वैशालीला राहवलं नाही. तिनं मोबाईल मेसेजवर आईला कल्पना दिली. शिवाय तुझ्याकडून दहा लाख रुपये मिळतील, का अशी विचारणा केली होती. शालिनींना तिचे असे मागणे मुळीच आवडले नव्हते. पण मुलीवरील प्रेमापोटी त्यांनी बँकेत दहा लाख रुपये वळवून ठेवले. ५० हजार रुपये घेऊन मोरगावात दाखल झाल्या. त्या रात्री वैशालीनं अविनाशना आईकडून दहा लाख रुपये मिळू शकतात, असं सांगितलं. तेव्हा त्यांचे डोळे काहीसे लकाकले. एवढी मदत झाली तर रुग्णसेवा चांगली होऊ शकते, असे त्यांना वाटू लागले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी वैशालीनं विषय काढला तर डॉ. शालिनींनी एवढा पैसा मिळणार नाही. देणार नाही, असा सूर लावला. आणि अविनाशचा तोलच सुटला. बेभान होऊन शिवीगाळ करत ते बाहेर पडले. त्यापाठोपाठ वैशालीही कॉलेजला निघून गेली. घरी एकट्या शालिनी राहिल्या. तेवढ्यात सोसायटीचा सुरक्षारक्षक बलराज ‘पाणी आलं आहे काॽ,’ असं विचारत आला. सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेली बाई इथं एकटी आहे, हे पाहून त्याचे डोके फिरले. कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागल्यानं तो पायऱ्या उतरला. 
तासाभरानं वैशालीनं आईची खबरबात विचारण्यासाठी पाच-सात वेळा कॉल केला तर उत्तर नाही. चिंतेत पडलेली वैशाली घरी पोहोचली. अर्धवट उघडा दरवाजा तिने घाबरतच लोटला तर कपाटाजवळ डॉ. शालिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. 
पोलिसांच्या संशयाची सुई डॉ. रमेश, उमाकांत, डॉ. अविनाश, वैशाली आणि बलराजच्या दिशेने वळाली. यापैकी कोण होता खुनीॽ 
वाचा पुढील अंकात.

येस आय एम गिल्टी


तिच्या ‘नव्या’ लढाईचे सुन्न करणारे नाट्य
वैज्ञानिक अंगाने कायद्यावर बोट ठेवत अनेक प्रश्नांची मांडणी

--
तसं म्हटलं तर महिलांच्या जगात महिलांचे असंख्य प्रश्न. ते सारेच पुरुषी व्यवस्थेने निर्माण केले आहेतच. ते सोडवून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदे तयार झाले आहेत. होत आहेत. पण न्याय मिळवून देणाऱ्या कायद्यातील त्रुटींनी नवे प्रश्न उभे ठाकत आहेत काॽ या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. आणि हे प्रश्न किती किचकट आहेत. त्यात किती धागेदोरे वेटोळे घालून बसले आहेत. आणि याबद्दल भारतीय समाज किती अनभिज्ञ आहेत, हे जाणून घ्यायचे असेल तर सत्यजित खारकर यांनी लिहिलेल्या, अस्लम शेख यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘येस, आय एम गिल्टी’ या नाटकाकडे पाहावे लागेल. हे नाट्य केवळ महिलेचा प्रश्न, कायद्यातील त्रुटी, समाज व्यवस्था एवढ्यापुरते मर्यादित भाष्य करत नाही. तर त्यापुढे जाऊन ते मुळात आपण माणूस म्हणून जगणे कधी शिकणार आहोत. सहृदयी केव्हा होणार आहोत. दुसऱ्याच्या हक्काचे संरक्षण झालेच पाहिजे, अशी भावना आपल्यात कधी निर्माण होणार, असेही धारदारपणे विचारते. सुन्न करून टाकते. सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी रंगभूमीवर वैज्ञानिकदृष्टीने विषय मांडणारे हे अत्यंत महत्वाचे नाटक आहे. खारकर यांना वर्तमानपत्रातील अपघाताच्या बातम्या असताना ‘येस, आय एम गिल्टी’चा विषय सुचला. त्यावर त्यांनी जवळपास दोन वर्षे संशोधन केले. विषयाच्या अनुषंगाने कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत काॽ डॉक्टर मंडळींना याबद्दल कितपत माहिती आहे, याची माहिती घेतली. विधिज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर नाटकाची बांधणी केली आहे. 
दोन अंकात मांडलेल्या या नाटकाचे थोडक्यात कथानक असे. घरच्यांचा विरोध पत्करून अंजू (डॉ. श्रद्धा चांडक) अक्षयशी (डॉ. अतिश लड्डा) विवाह करते. मूल होत नसल्याने ते डॉक्टरांचा सल्ला घेतात. स्वतःचे मूल हवे, हे त्यांचे स्वप्न सत्यात येईल, असे वाटत असतानाच एका भीषण अपघातात अक्षय मृत्यूमुखात जाऊन पोहोचतो. तो कोणत्याही क्षणी हे जग सोडून जाणार असे लक्षात आल्यावर अंजू तिची मैत्रिण, प्रख्यात वकिल ॲड. स्नेहाच्या (नीता पानसरे) मदतीने कोर्टात धाव घेते. मरण्यापूर्वी अक्षयचे स्पर्म्स (बीज) काढून घेण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज करते. पण याविषयीचा कोणताही कायदाच अस्तित्वात नाही. शिवाय अशी परवानगी दिली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो, असे म्हणत कोर्ट परवानगी नाकारते. अक्षय मरण पावतो. तेव्हा अंजू विचारते की, माझे आणि माझ्या पतीचे स्वतःचे मूल असण्याचे स्वप्न साकारण्याचा अधिकार मला एकटीला का मिळू शकत नाही. पती जिवंत असला तरच त्याचे स्पर्म्स मिळतील, असे काॽ विज्ञानाने कृत्रिम गर्भधारणेबद्दल जी प्रगती केली त्याचा उपयोग कायॽ तिच्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच मिळत नाही. मग ती आई होण्यासाठी एक वेगळा मार्ग शोधतो. पण त्यातून एका वेगळ्याच संकटात सापडते. आई होण्यासाठी केलेले धाडस अंगलट तर आले नाही ना, असे तिला वाटू लागते. मग एका टोकाच्या क्षणी ती अतिशय खंबीर, आक्रमक होत संकटाचा मुकाबला करते आणि यशस्वी होते. अंजूने शोधलेला मार्ग कोणताॽ ते धाडस तिच्या कसे अंगलट येते. त्यातून ती कशी बाहेर पडते, याची उत्तरे नाटक पाहताना मिळतात. अत्यंत गुंतागुंतीचा हा विषय खारकर यांनी अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने अविष्कृत केला आहे. शिवाय प्रत्येक प्रसंगातील नाट्य, थरार कायम ठेवल्याने शेवटपर्यंत उत्सुकता कायम राहते. दिग्दर्शक शेख यांनी साऱ्या व्यक्तिरेखा अतिशय ठसठशीत होत जातील. प्रसंगांमधील धार उत्तरोत्तर वाढत जाईल, याची पूर्ण काळजी घेतली आहे. अंजूची मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या डॉ. श्रद्धा चांडक यांनी हे नाटक पूर्णपणे पेलले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी या भूमिकेतील सारे पैलू अतिशय मनस्वीपणे साकारले आहेत. त्यांचा आवाज आणि रंगमंचावरील सहज वावर त्यांच्यातील अभिनेत्रीची ताकद सांगणारा. नीता पानसरे, गुंड रोकडे (डॉ. अमोल देशमुख), सिस्टर (डॉ. हर्षलता लड्डा), डॉ. भागवत (डॉ. संदीप मुळे), सरकारी वकिल (डॉ. प्रफुल्ल जटाळे) यांनी भूमिकांमध्ये सर्व रंग भरल्याने नाटक रंगत जाते. रवी कुलकर्णी यांचे नेपथ्य, कविता दिवेकरांची रंगभूषा, डॉ. विशाल चौधरी,  विनोद आघाव यांचे संगीत, प्रसाद वाघमारे यांची प्रकाशयोजना संहितेला पूर्ण न्याय देणारी.

ते थोडक्यात बचावले पण...

आयसीयू वॉर्डात बेडवर पडलेले स्वरूपकुमार डोक्याचे भलेमोठे बँडेज हाताने चाचपून पाहत होते. आपल्यावर एवढा प्राणघातक हल्ला करणारा कोण असावा. कशासाठी हल्ला केला असेल त्यानं, याचा अंदाज घेत त्यांनी डोळे मिटले आणि त्यांना साठ वर्षांपूर्वीचा काळ आठवला. गरिबीला कंटाळून त्यांचे वडिल त्यांना, आईला घेऊन थेट जयपूरमधून या शहरात आले होते. एका खोलीत तिघं राहू लागले. वडिलांच्या हातात फरशीकामाचं चांगलं कसब होतं. शहरात नवी बांधकामं सुरू होती. फरशीवर नक्षीचं, ओटे बांधण्याचं काम मिळू लागलं. स्वरूपकुमारही नक्षीच्या फरशा, संगमरवरी देवघरे, लाकडी दरवाजे असं बरंच काही तयार करू लागले. पाहता पाहता ते धनाढ्य उद्योजक बनले. लक्ष्मी पाणी भरू लागली. तीन मुले, तीन सुना नांदू लागले. पण सोबत कटकटीही वाढल्या होत्या. त्यांनी सुरू केलेल्या नव्या हॉटेलातील नोकरानं आत्महत्या करून चिठ्ठीत हॉटेलच्या मॅनेजरचे नाव लिहिलं होतं. मॅनेजर म्हणत होता दहा लाख रुपये दिले नाही तर तुमचे नाव गोवतो. एक समाजसेवक तर वीस लाखांसाठी धमकावत होता. दुसरीकडे पुण्यातील शोरूमचा भागीदार जागा हडपण्यासाठी धमकावत होता. स्वरूपकुमारांना अशा अडचणींशी लढण्याची आवड होती. पण ते खंतावले होते तिसऱ्या मुलाच्या स्वैर, व्यसनी वागण्यानं. त्याला बापाच्या कष्टाची जाणिवच नव्हती. त्याला एक कोटी खर्चून कार- टु व्हिलरचं शो रूम सुरू करायचं होतं. त्याची बायको मंजू माहेरची धनाढ्य. ती माहेराहून पैसे आणते असं म्हणत होती. स्वरुपकुमार यांच्या पत्नीला सुवर्णाबाईंना ते मुळीच आवडत नव्हतं. त्यावरून चौघांमध्ये खटके उडत. मधली सुन सुषमा जेमतेम दहावी पास. तीन मुलींचा बाप झालेला तिचा नवरा स्वरूपकुमारांसारखा व्यवसायात झोकून दिलेला. आणि ती कायम घरच्या कामात मग्न. घरातल्या दोन नोकर महिला तिला सारखं ‘तुम्ही किती काम करता हो. घरच्या मालकीणबाई तुम्हीच’ असं म्हणायच्या. दोन्ही नोकराणींचे नवरे जुगारी. कधी पैशे घेण्यासाठी घरातही घुसायचे. सुषमात मालकीण होण्याची भावना निर्माण होणं चांगलं नाही, असं स्वरूपकुमारांना सारखं वाटायचं. पण सुवर्णाबाईंनी तिला जवळपास उत्तराधिकारी घोषित केलं होतं. सर्वात मोठा मुलगा आणि सून प्रख्यात आर्किटेक्ट. त्यांची कायम परदेशात ये-जा. त्यांची एकुलती एक मुलगी लग्न करून सिंगापूरला गेली होती. अलिकडे सर्वात मोठ्या सुनेचा चुलतभाऊ पियूष स्वरूपकुमारांच्या सगळ्याच कामात थोडी मदत करू लागला होता. पण ते सुवर्णाबाईंना फारसं पसंत नव्हतं. या सगळ्यातून मार्ग कसा काढावा, अशा विचारात स्वरूपकुमार गुंतले होते. त्यात रात्री अकराच्या सुमारास तो प्रकार घडला. डोअरबेल वाजली. कधीच कुठं न जाणारा नोकर आत्माराम औषध खरेदीसाठी गेलाय, असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. कोणॽ काय पाहिजे असं म्हणताच त्यांच्या डोक्यात एक जोरदार फटका पडला. तशाही अवस्थेत त्यांनी हल्लेखोराच्या कमरेला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोणीतरी त्यांना मागे ओढलं होतं. असं त्यांना आठवत होतं. पण त्यापलिकडं काही नाही. तीन जबाबातही त्यांनी तेच सांगितल्यानं पोलिसही हल्लेखोर कोण, यावरून चक्रावले होते. 
0000
गेल्यावेळचे उत्तर 
इन्सपेक्टर थोरातांनी डॉ. रमेश, उमाकांत, डॉ. अविनाश, वैशाली आणि बलराजला चौकशीच्या फेऱ्यात घेतले. पण हातात काहीच येईना. या चौघांच्या पलिकडे खुनी असावा, असा संशय त्यांच्या मनात बळावला. त्यांनी स्वतः सलग चार तास अपार्टमेंटचा चप्पा-चप्पा पुन्हा नजरेखालून घातला. तेव्हा दोन गोष्टी त्यांच्या हाती लागल्या. स्वयंपाकघराच्या गॅलरीजवळील झाडाची बऱ्यापैकी जाड फांदी तुटली होती. संरक्षण भिंतीच्या पलिकडे एका पाकिटात गांजाच्या दोन गोळ्या होत्या. मग त्यांनी चक्रे फिरवली. गांजाच्या नशेत धुंद असलेल्या राकेशला रेल्वे स्टेशनवरून उचललं. पोलिसी रट्टे देताच त्यानं डॉ. शालिनींचा खून केल्याची कबूली दिली. झालं असं होतं की, शालिनींच्या अंगावरील दागिने लुटण्याचा विचार बलराजच्या मनात बळावला. पण उमाकांत आल्याची चाहूल लागल्यानं तो थांबला. रिक्षावाल्याकडून सुटे पैसे घेण्यात उमाकांतही अडकला. त्याचवेळेस, शालिनींच्या दागिन्यांवर नजर ठेवलेला, गांजेखोर, भुरटा चोर राकेश गच्चीवरून घरात शिरला. त्याला चाकूचा धाक दाखवून फक्त दागिने, पैसे पाहिजे होते. पण शालिनींनी प्रतिकार करताच त्याने त्यांचा गळा चिरून टाकला. मग उमाकांतच्या पावलांची चाहूल लागल्यानं दरवाजाला आतून कडी लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते जमलंच नाही. त्यानं स्वयंपाकखोलीलगतच्या गॅलरीजवळ आलेल्या झाडाच्या फांद्याला लटकून कंपाऊंडबाहेर कशीबशी उडी मारली. आणि काही सेकंदानं फांदी मोडून पडली. दरम्यान, भिंतीलगतच्या कचऱ्याच्या ढिगात त्याच्या गांजाच्या गोळ्याचं पाकिटही पडलं.