Sunday 15 November 2020

गुढतेचा अलंकार

मानवी मनाला कायम गुढतेचे आकर्षण राहिले आहे. एखाद्या काळ्यामिट्ट गुहेत कोणी ध्यानस्थ साधू आहे का. जीर्णशीर्ण वस्त्रात गुंडाळलेल्या भल्यामोठ्या लाकडी पेटीत मृतदेह आहे का असा प्रश्न अनेकांना असतो भेसूर चेहऱ्याच्या माणसाचं जगणं कसं असावं हेही जाणून घ्यायचे असते हे सर्वांना मान्य असलेले सत्य तरीही मराठीच काय एकूणच सर्व भाषिक साहित्य विश्वात गुढ मांडणी गुढ कथानकाला अतिशय कमी स्थान मिळाले आहे विनोदाप्रमाणे गुढता हाही मुख्य प्रवाहच नाही या प्रांतातील अस्सल निर्मितीसाठी फार काही करावे लागत नाही गुढ कथानकाने समाजमन ढवळून निघत नाही अशी मराठी साहित्यिकांची पक्की धारणा झाली आहे वस्तुत: असे काही लिहिण्यासाठी खूप एकांतप्रिय नाविन्य शोधणारी सृजनता लागते. मराठी साहित्य विश्वावर प्रदीर्घ काळ राज्य करणारे जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनात ती जागोजागी दिसते. पण त्यांच्यानंतर तेवढ्या ताकदीचा लेखक झाला नाही. जीवनाचे एक वेगळेच दर्शन घडवणारी गुढ कथा, कादंबरी नजरेत आली नव्हती. रसिकांमध्ये खूप चर्चेत नव्हती. जणू काही गुढतेचा प्रवाहच एखाद्या काळ्याकुट् खोल दरीत गडप झाला की काय असे वाटत होते. पण असे म्हणतात ना की जगात काहीच कायमस्वरूपी संपत नाही. ते कालांतराने रुप पालटून कमी अधिक प्रमाणात प्रकट होतच असते तसेच काहीसे मूळ कवीचा पिंड असलेल्या संतोष विठ्ठल घसिंग यांच्या ‘विधाराद्रोण’ कादंबरीतून लक्षात येते. वाचकांना अद्भुत, थरारक, रोमांचकारी दुनियेत घेऊन जाणारी गुढमय संपन्न अलंकार धारण केलेली ही कलाकृती आहे. विशेष म्हणजे ती आशय मांडणीतही चमकदार आहे. जेष्ठ कवी, कादंबरीकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रीकांत देशमुख विधाराद्रोण आणि घसिंग यांच्याविषयी सांगतात ते मनाला पटते. विधाराद्रोण म्हणजे नंदन शिकाऱ्याची कथा तशी अगदी साधी पण प्रचंड गुंतागुंतीची. वाघाची शिकार करायला बाहेर पडलेला नंदन जे काही या प्रवासात भोगत जातो ती म्हणजे मानवी जीवनाची अंधारगुह जाणिवा गोठून जाव्यात असा हा प्रवास एका अकल्पित जगातून जाणारा. एखाद्या गूढकथेतला हा गहनगूढ प्रवास आपल्या आकलनाची कुवत जोखणारा. अतिशय अनघड भाषा खूपदा मनाचे तुकडे करणारी. एक वेगळे प्रतिमाविश्व अनाकलनीय आणि संमोहक. उदाहरणार्थ आयुष्य फुलावरल्या दवाप्रमाणे क्षणभंगुर दुर्दम्य इच्छाशक्तीची इंद्रज्योत. असंख्य प्रतिमा. संपूर्ण कादंबरी या प्रतिमांनी लखकून जाते. कधी व्याकुळ होते. कधी मरणप्राय वेदना सोसत पुढे सरकते. घसिंग यांनी ही रचना एक कथा दुसरी कथा कथेतील कथा बाहेरची कथ अशी केली आहे. या सर्वांना जोडून येणारा व्यापक पट वेगवेगळ्या जंगलातुन गुहांमधून जाणारा जसे की कनकेश्वर मंदिराचे यातले वर्णन मुळातून वाचावे असे आहे. जितसामा, बुधलीबाई, रक्त वृक्ष, पुतळाबाई, नगरवधू अशी कितीतरी पात्रे घसिंग यांनी निर्माण केली आहेत. ती या कादंबरीत आपापले गूढ विश्व घेऊन भेटतात. हे सगळे वाचतांना मनाला सुन्न करणारी भोवळ येते. वाचताना कधीकधी ओठ कोरडे पडतात. एक विचित्र विश्व आपल्या भोवती फेर धरू लागते.पण विधाराद्रोण केवळ काहीतरी अगम्य रंजक दुनियेच्या वर्णनापुरती मर्यादित राहत नाही. तर ती आपल्याला हळूहळू मानवी जीवनाच्या गाभाऱ्याकडे नेऊ लागते. त्यावेळेसचा प्रवास आपल्याला गुंतवून ठेवतही भानावर आणत जातो. तेथे या कादंबरीची भाषा हा एक अलौकिक ठेवा असल्याचे ठळकपणे जाणवते. डॉ. गणेश मोहिते म्हणतात त्याप्रमाणे, मानवी मनाचा तळपरीघ मोह, माया, मत्सर, इच्छा - आकांक्षा, असुया, भावना, वासना यातील द्‌वंद्वाने व्याप्त आहे. त्यातून मानवी मन व्यामिश्र अनाकलनीय बनले आहे. कोऽहम... मी कोण हा अनंत काळापासून अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे. त्यच्या उत्तरासाठी तर असंख्य विद्वानांनी अगाध तत्वज्ञान प्रसवले आहे. साहित्यिक, लेखक, नाटककारांनी लेखणी चालवली. मन अन् वर्तन नियमन करणारे न्याय नीति धर्मतत्वे आकाराला आली. मानवाच्या जीवनविषयक धारणांची जडणघडण करुन विशिष्ट विचारव्यूह आखण्याचे सर्वोतोपरी प्रयत्नही झाले. जीवनानुभूतींची संगती व नेणीवेतील विचारकलहाचा अन्वयार्थ लावून अनंत संज्ञा सिद्धांत जन्माला आले. तरीही माणसाचा स्वत्व शोधाचा प्रवास कधी थांबला नाही, असे विधाराद्रोण मांडते. त्या सोबत ही कादंबरी असेही सांगते की, संवेदनांचा भाषिक आविष्कार नेहमी नवे तत्वज्ञान, सिद्धांतांना जन्म देणारा असतो. त्याची कालपरत्वे निकड अधिक असते. काळ कोणताही असो आभासी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अविरत धडपड करण्यात मश्गुल राहून आनंदी असण्याचा सार्वत्रिक भ्रम पैदा करणे हा मानव जातीचा अट्टाहास आहे.मात्र खरे असे की तत्वतः मानवाला जगण्यासाठी ज्ञानापेक्षा आनंद अधिक उपयुक्त असतो. त्याकरिता निसर्गतः जगण्याचा अर्थ आणि अर्थातील 
'आनंद' कळायला हवा. असे त्यंतिक मौलिक जीवनभाष्य करणारी कलाकृती म्हणून संतोष विठ्ठल घसिंग यांची 'विधाराद्रोण' ही कादंबरी अद्वितीय ठरते. चार वेगवेगळ्या गुढ रुपकथांच्या माध्यमातून ही कादंबरी मानवी वर्तनाचे परिनियम आणि जीवनाचे सारसूत्र सांगते. मौखिक कथन परंपरेचा घाट स्वीकारुन निवेदक मानवी अस्तित्व शोधाच्या कल्पित परंतु तितक्याच जिवंत कहाण्या प्रसवतो. नायकाचा  आत्मसंवाद घडवून आणण्यात लेखक कमालीचा यशस्वी होतो. स्वःशोधाचा आत्मस्वर सापडल्याचा अतर्क्य आनंद कलाकृती वाचकांना देते. कथन वगळता कादंबरी रुपदृष्ट्या ठळक न होताही आशयातील तात्विक  जीवनभाष्याला अनुलक्षून आलेले भाषासौंदर्य वाचकांना नवं जीवनानूभुती प्रदान करणारे आहे. एखादे चित्र डोळ्यासमोर उभी करणारी अचूक प्रतिमा उभी करणे किंवा डोके लख्ख करणारी उपमा देणे हे जीए कुलकर्णी यांचे विलक्षण कसब होते. त्याच प्रकारचा अनुभव काही ठिकाणी विधाराद्रोणमध्येही येतो. प्रेरणा पाचपुते यांचे मुखपृष्ठ कादंबरीच्या आशयाला अचूकतेने पकडणारे आणि नजरेला ताण देणारे आहे. एकूणात मानवी जीवन मूल्ये आणि मनाच्या परिघांमध्ये कायम सुरू असलेली असंख्य आंदोलने यांचा एक वेगळा पट कसा असू शकतो, हे जाणून घेण्यासाठी विधाराद्रोण नक्की उपयुक्त ठरेल.
 
-