Saturday 23 January 2021

अम्मीचा गौरव

भारतीय पुराणात, लोककथा, कथा-कादंबऱ्यांत आईबद्दलची हजारो प्रकारची वर्णनं आहेत. हे खरं असलं तरी आईशी जाहीरपणे संवाद साधण्याचा,त्यातून समाजमन, समाजमनाच्या तळाशी सुरू असलेली उलघाल मांडण्याचा आणि त्यातून आईचं एक विशाल रूप सांगण्याचा प्रयत्न फारसा कुणी केलेला नाही. त्या अर्थाने प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक सईद मिर्झा यांचे “अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर’ हे पुस्तक भारतीय साहित्य जगतात माइलस्टोन म्हणावे लागेल. पुण्यात १७ ते ३१ जानेवारीदरम्यान सुरू असणाऱ्या इंटरनॅशनल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने मिर्झा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. हा त्यांच्या सिनेजगतातील कर्तृत्वाचा गौरव असला तरी हे कर्तृत्व त्यांच्यात जागृत करण्याचा, फुलवण्याचा पहिला मान त्यांच्या अम्मीस आहे. “अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर’ हे पुस्तक वाचताना प्रत्येक ओळीत ते ठसत जाते. मुस्लिम समाज म्हणजे पारंपरिकता, कट्टरता. त्यात महिलांना स्वातंत्र्य नाही. त्यांना एका विशिष्ट चौकटीतच जगावे लागते. चौकटी ओलांडण्याचे धाडस कुणी दाखवतही नाही, असे म्हटले जाते. मिर्झा यांच्या अम्मींनी ते धाडस दाखवले आणि ते ठामपणे सांगण्याचे धाडस सईद मिर्झा यांनी दाखवले आहे. अशी आई आणि असा मुलगा मुस्लिमच काय, सर्वच समाजात अतिशय दुर्मिळ. खरे तर आपण सारेच जण आपल्या आईच्या अतिशय जवळ असतो. तिच्या छत्रछायेखाली वाढत असताना तिच्या वाटचालीला, विचारांना अनुभवत असतो. आई करत असलेल्या संस्कारांत घडत असतो. त्याचे ऋण अनेक जण अलीकडील काळात वर्तमानपत्रात लिखाण करून सांगत असतात. पण आईशी मनमोकळा संवाद साधत अवघ्या विश्वाचा, समाजाचा तळ शोधण्याएवढी संवेदनशीलता सईद मिर्झांसारख्या कलावंतातच असते. वरवर पाहता हे पुस्तक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्र अशी धारणा होते. पण त्या अर्थाने ते आत्मचरित्र नाही तर त्यांनी राजकीय वादळे, संस्कृतीतील बदल, सिनेमाच्या संहिता, प्रवास अशी एक आगळीवेगळी रचना त्यात केली आहे. कुणीही व्यक्ती आईला पत्र लिहील तेव्हा त्यात राग, लोभ, चिंता, व्यथा असणारच. मनात साचलेला विचार मुक्त करण्याची भावना असते. पण त्यात एक आपुलकी, आस्था आणि हक्काचे स्थान असते. या पुस्तकात मिर्झा यांनी तोच धागा ठेवला आहे. तसे म्हटले तर “अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर’ एक प्रकारे राजकीय पुस्तकही आहे. पण केवळ तेवढ्यापुरते ते मर्यादित राहत नाही. वैज्ञानिकता, नव्या विचारांचा सहज स्वीकार आणि सेक्युलॅरिझम म्हणजे सर्वधर्मसमभाव यावर ठाम विश्वास असलेल्या आणि त्यानुसारच जीवन जगलेल्या एका मातेचीही गोष्ट या पुस्तकात आहे. भारतीय उपखंडात १९३० नंतर घडलेल्या अनेक घडामोडींचा चित्तवेधक प्रवास यात आहे. कारण १९३०च्या दशकात मिर्झा यांचे माता-पिता मुंबईत आले. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानऐवजी भारताची निवड केली. कारण स्वातंत्र्यानंतर भारतानं स्वीकारलेली धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना मिर्झा यांच्या अम्मीला भावली होती. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात घडू पाहणारा भारत देश आपल्या कुटुंबाला आणि समाजाला नव्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, असा ठाम विश्वास त्यांना होता. यावरून त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वातील सखोलता लक्षात येते. त्या किती खोलवरचा विचार करत असाव्यात, याचा अंदाज येऊ शकतो. एक गृहिणी, एक आई, एक पत्नी यासोबत त्यांचे एक विश्व होते. पुढे चालून त्या विश्वाला अनेक तडे गेले. धर्मनिरपेक्षतेच्या मजबूत पायावर हल्ले झाले. त्यामुळे अम्मीच्या मनात कल्लोळ उठला. त्या विलक्षण अस्वस्थ होत गेल्या. तो कल्लोळ, ती अस्वस्थताही सईद यांनी अतिशय संवेदनशीलतेने टिपली आहे. आणि ते टिपताना कुठेही अतिरेक नाही. उगाच संशयकल्लोळ, तिखट शब्दांचा मारा नाही. त्यामुळे ते सारे वाचताना आपणही त्यात नकळतपणे जोडले जातो. आपल्या आईचा चेहरा, तिचे विचार, संस्कार शोधण्याचा नव्याने प्रयत्न करतो. अलीकडच्या काळात मुला-मुलींच्या शाळेच्या दाखल्यात आईचेही नाव लावले जात आहे. आईवर निबंध लिहा, असा एक धडाही वर्गात गिरवला जातो आणि आपण तो पुढे विसरूनही जातो. आपल्यापैकी काही जणांनी तो धडा आईसोबतच्या पत्ररूपी संवादातून, नाटक, सिनेमा, कथा-कादंबरीतून विस्तारला तर ती भारतीय साहित्य विश्वात मोलाची भर ठरेल. आई-मुलाच्या नात्याची आणि त्या निमित्ताने समाजाची विविध रूपे उलगडतील. होय ना?

Thursday 7 January 2021

विस्तव आणि वास्तव

संभाजीनगर – औरंगाबाद असा अनेक वर्षांपासूनचा मुद्दा शिवसेनेच्या पोतडीतून पुन्हा एकदा वर काढण्यात आला आहे. हिंदुत्ववादी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या राजकारण्यांना या मुद्याची निवडणुकीच्या तोंडावरच गरज भासते. भावनिक मुद्यावरच मतदान झाले पाहिजे, अशी शिवसेनेची उघडउघड आणि इतर काही पक्षांची छुपी भावना असते. औरंगाबाद महापालिकेचा राजकीय इतिहास पाहिला तर मोठ्या संख्येने औरंगाबादकरांनी भावनेच्या आहारी जाऊनच मतदान केल्याचे दिसते. पण एकदा निवडणुका झाल्या की नामांतराचा मुद्दा गुंडाळून ठेवला जातो. त्याचा जाब कोणीही विचारत नाही, ही या शहराची खासियत आहे. पण या वेळी पेच थोडा गुंतागुंतीचा आहे. कारण, सध्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. आणि नामांतराला कायम विरोध असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये शिवसेनेसोबत सत्तेत भागिदार आहेत. आणि आतापर्यंत शिवसेनेच्या साथीला असलेला भाजप विरोधात बसल्याने शिवसेनेच्या कोंडीची संधी शोधत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वी दिलेला शब्द खरा ठरणार की नाही, अशी वक्तव्ये करून सत्ताधाऱ्यांमध्ये फटी पाडण्याचे काम भाजप करत आहे. तर आमच्यासाठी सत्ता दुय्यम अशी टोकाची भूमिका काँग्रेसने जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही हाच सूर लावला आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर भडका उडवण्याचे शिवसेनेचे धोरण दिसते. त्यामुळे बाजूने आणि विरोधात ठिणग्या अधिक उडत आहेत. त्याची झळ अर्थातच औरंगाबादकरांना बसणार आहे. खरे तर मराठवाड्याची राजधानी असे बिरुद विनाकारण मिरवणाऱ्या या शहरात आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही. नवी पाणी योजना प्रत्यक्षात येईलच, अशी हमी कोणीही देऊ शकत नाही. अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटलेला नाही. कोरोनाच्या संकटातून अजून सुटका झालेली नाही. औरंगाबादचे खरे वैभव असलेल्या आणि शेकडो तरुणांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या मोगल आणि निजामकालीन वास्तूंना पुर्नवैभव मिळवून देण्यात ‘औरंगाबाद’प्रेमींनाही स्वारस्य नाही. अशा स्थितीत भावनेच्या आहारी जायचे की पाणी, रस्त्यांसाठी राजकारण्यांना धारेवर धरायचे, याचा निर्णय लोकांना घेण्याची हीच ती वेळ आहे.