Thursday 30 April 2020

तिनं बदललं होतं जीवन … तरीही

त्रिलोक म्हणजे कॉलेजातला दादाच. त्याचे वडिल तर मोठे उद्योजक. राजकारण्यांमध्ये उठबस होती. पोलिस खात्यातील बडे अधिकारी मित्र होते. त्यामुळे त्रिलोकची दादागिरी कॉलेजचे प्राचार्यही खपवून घेत होते. तो कधी एकदाचा पास होऊन कॉलेजातून बाहेर पडतो, असे प्राचार्यांना वाटत होते. याला कोणी वळणावर आणू शकत नाही, याबद्दलही ते ठाम होते. पण एक दिवस चमत्कारच घडला. प्राचार्यांसमोरच कॉरिडोरमध्ये एका मुलीने त्रिलोकच्या कानाखाली आवाज काढला. शिवाय त्याच्या दोन टग्या मित्रांचीही धुलाई केली. दुसऱ्या दिवशी तर ती तिच्या चार-पाच भाऊ आणि त्यांच्या मित्रांना घेऊन कॉलेजात आली. त्यांनी मैदानावर त्रिलोक आणि त्याच्या टोळक्याला घेरले आणि तुफान झोडपून काढले. हे सगळे पाहून प्राचार्य कमालीचे अचंबित झाले. त्यांनी माहिती घेतली तर ती मुलगी म्हणजे मोना बाजूच्या आर्किटेक्ट कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मोनाचे वडील देशाच्या राजकारणात दबदबा असलेले माजी मंत्री. दोन मावसभाऊ आमदार, एक बहीण केंद्रीय प्रशासकीय अधिकारी आहे, असे कळाले. ते सारे ऐकून त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाहता पाहता त्रिलोकचा माज, मस्ती उतरत गेली. पण त्यांना जबर धक्का बसला जेव्हा त्रिलोक आणि मोना लग्नाची पत्रिका घेऊन घरी आले. त्यानं सांगितलं की, मी सगळी गुंडगिरी सोडून दिली. आणि तिला माझी जीवनसाथी बनण्याची विनंती केली. तिच्या आई-वडिलांनी, भाऊ-बहिणींनी थोडासा विरोध करून आमच्यातील नात्याला मान्यता दिली. मोना म्हणाली की, एखाद्या गुंडाचं आयुष्य स्त्रीमुळे किती बदलते, हे पाहून मी चकित झालीय. लग्नाला नक्की या, असे म्हणत मोना-त्रिलोक दालनाबाहेर पडले. त्या पाठमोऱ्या जोडीकडे पाहत प्राचार्य मनाशीच बोलू लागले, याला अनेक प्रकारचे नाद, छंद. मोना  आता त्याच्या प्रेमात असली तरी ती उथळ, भडक. तरीही यांचा संसार सुखाचा व्हावा.
पाहता पाहता दहा वर्षे उलटून गेली. प्राचार्य निवृत्त झाले. योगायोगाने त्रिलोक-मोना ज्या आलिशान अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते. त्या अपार्टमेंटच्या समोरील कॉलनीत राहण्यास आले होते. तिथं त्यांनी एक बंगला विकत घेतला होता. अधून-मधून कधीतरी त्रिलोक-मोना आणि त्यांच्या दोन मुली चारचाकीतून जाताना दिसत. पण प्राचार्यांनी त्यांच्याशी बोलणं, ओळख दाखवणं टाळलं. बरे झालं आपला अंदाज चुकला. यांचा संसार सुखाचा सुरू आहे, असं त्यांना वाटत होतं. पण रविवारी पहाटे भलतंच घडलं. प्राचार्य मॉर्निंग वॉकवरून परतत असताना अपार्टमेंटसमोर गर्दी होती. पोलिस व्हॅन आली होती. थोड्याच वेळात महिला पोलिसांच्या गराड्यात मोना खाली आली. व्हॅनमध्ये बसली. त्यापाठोपाठ त्रिलोकचा मृतदेह आला. अँब्युलन्स सरकारी रुग्णालयाकडे तर व्हॅन पोलिस ठाण्याकडे वळाली. अंदाज चुकला नाही, याचे प्राचार्यांना थोडेसे समाधान वाटले. पण संसार मोडल्याचे पाहून ते दु:खीही झाले. दुसरीकडे इन्सपेक्टर सुरासे तथ्य, पुरावे शोधत होते. त्रिलोकच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून मोनाने भली मोठी सुरी त्याच्या पोटात खुपसली होती. तर मोनाचे ड्रेस डिझायनर मनीष आणि कापड व्यापारी अवनीशसोबत खुलेआम फिरणे, रात्री उशिरापर्यँत पार्टी करणे त्रिलोकला मान्य नव्हते, असे सुरासेंना कळाले. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये असेही समोर आले की, सुरीचा घाव लागण्याच्या वीस ते तीस सेकंद आधी पोटात घाव झाला होता. मोना बेडरुममध्ये ठेवलेली सुरी आणण्यासाठी गेली असताना कोणीतरी घरात असावे, अशी शंका सुरासेंना आली. मोनावर वाईट नजर ठेवणारा सुरक्षा रक्षक दलीपसिंग, कॉलेज जीवनात तिचा आशिक असलेला आणि आता अपार्टमेंटमधील दोन गाळ्यांत आईस्क्रीम पार्लर चालवणारा मनमीत की तिचे खास मित्र मनीष, अवनीश. कोणी त्रिलोकवर आधी वार केला. की मोना खोटं बोलतीय, असा प्रश्न त्यांना पडला होता.
  

इटली … कोरोना.. मायकेल अँजेलो

कोरोनाचा पहिला तडाखा चीनच्या वुहान प्रांताला बसला. शेकडो बळी गेले. तरी त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती इटलीच्या भूमीवर. तेथे त्याने अक्राळविक्राळ रुप धारण केले. ते पाहून जग हादरून गेले. कारण वुहानमध्ये माध्यमांना प्रवेश नाही. अभिव्यक्ती स्वातंत्ऱ्य, व्यक्त होण्याचा अधिकार असं काही चीनमध्ये नाहीच. सरकारी माध्यम जे सांगणार तेच जगात जाणार. आणि सरकारला जे वाटतं तेच सरकारी माध्यमात जाणार. त्यामुळं अतिशयोक्ती किंवा तर्कटाचा भाग वगळला तरी त्या अर्थाने इटलीने जगाला सावध केले. हजारो बेफिकिर इटलीकरांनी स्वत:चे जीव गमावून अब्जावधी लोकांना या संकटाची माहिती दिली. सध्या कोरोनाचा देश अशी इटलीची ओळख होत आहे. पण मस्तीत जगणं हा या देशाचा मूळ स्वभावच आहे. त्याची शेकडो उदाहरणं इतिहासात पाहण्यास मिळतात. शिवाय हा अनेक जगद्विख्यात कलावंतांचा देश आहे. त्यापैकी एक आहे शिल्पकार मायकेल अँजेलो.
कोरोनाने मार्च महिन्यात इटलीमध्ये धुमाकूळ घालणे सुरू केले होते. ५४५ वर्षांपूर्वी याच महिन्याच्या सहा तारखेला मायकेलचा जन्म झाला. हा एक वेगळाच योगायोग म्हणावा लागेल. मायकेलचा जन्म झाला तो काळ संपूर्ण युरोपात वसाहतवादाचा होता. युरोपीय देश इतर खंडातील लोकांना शस्राच्या बळावर अंकित करण्यास निघत होते. त्याचवेळी रेनेसान्स ही दुसऱ्या टोकाची चळवळ सुरू झाली होती. त्यात कलावंत मंडळी नव्या निर्मितीच्या ध्यासाने भारावली होती. बुरसटलेल्या धार्मिक रुढी, परंपरा झुगारून द्या, असे कलावंत सांगू लागले होते. ग्रीक, रोमन शिल्प कलांकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसित  होऊ लागली होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातील बहुतांश कलावंतांना राजाश्रय, लोकाश्रय मिळू लागला होता. त्या अर्थाने मायकेल कमालीचा सुदैवी म्हणावा लागेल. तो जेथे राहत होता ते फ्लॉरेन्स शहर समृद्ध होते. दुसरं असं घडलं की ज्या दाईवर मायकेलला सांभाळण्यासाठी जबाबदारी दिली होती. तिचे कुटुंब पाथरवटाचे. त्यामुळे त्याची अगदी बालवयातच शिल्प कलेशी ओळख झाली. अर्थात अंगभूत प्रतिभा होतीच. ती फुलण्यासाठी मदत झाली. त्या वेळच्या वातावरणानुसार मायकेल आधी चित्रकलेकडे वळाला. डोमेनिको घिरलँडिओसारखा प्रख्यात चित्रकार त्याला गुरु म्हणून लाभला. त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने अनेक रेखाटने केली. पण त्याचे मन सारखे शिल्पकृतींकडे वळत होती. दगडांना विशिष्ट वळणे देऊन मानवी भावना चितारण्याचे किचकट, प्रचंड अंगमेहनतीचे काम त्याला सारखे खुणावत होते. मग एका शिल्पशाळेच्या निमित्ताने त्याला संधी मिळाली आणि एका अद् भुत शिल्पकाराचा जन्म झाला. चित्रकृती फक्त एकाच बाजूने म्हणजे कॅन्व्हासवर पाहता येते. शिल्प चारही बाजूंनी निरखता येते. त्यामुळे त्यावर सर्व बाजूंनी तेवढेच काम करावे लागते, याचा अतिशय अचूक अंदाज मायकेलला होता. म्हणूनच त्यानं संगमरवरातून जागतिक दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्या. पांढऱ्या रंगाचा हा पत्थर बाहेरून जसा दिसतो तसाच आतही आहे का. त्याच्या धमन्यांमधून काय वाहते आहे,  हे जाणून घेण्यात तो मातब्बर होत गेला. ‘स्लीपिंग क्युपिड’, ‘बॅटल ऑफ सेंटॉर’, ‘मेडोना ऑफ द स्टेअर्सया शिल्पकृती खूपच गाजल्या. पाच शतके होऊन गेलीतरी ती चर्चेत आहेत. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महत्वाची, वेगळी वाटतात. इटलीकरांच्या जडणघडणीचं, जीवनशैलीचं वैशिष्ट्य सांगतात. त्यातील एका शिल्पकृतीचे नाव आहे मद्यदेवता बॅक्स. एका हातात मद्याचा प्याला आणि दुसऱ्या हातात द्राक्षांचे घड असा आखीव-रेखीव बॅकस आहे. त्याच्या चेहऱ्यावर किंचित धुंदावलेपण आहे. त्याची पावलं मद्याचा अंमल चढल्याने किंचित अडखळली आहे. बॅकसच्या डाव्या हाताजवळ एक छोटेसे बालक आहे. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची निरागसता दिसते. मद्यपानाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आयुष्य संपवतो, असा संदेश मायकेलने  यातून दिलाय.
दुसरे शिल्प पिएता म्हणजे करुणा. येशू ख्रिस्ताचे पूर्ण जीवनच करुणामय. पण मायकेलने शिल्प निर्माण करताना त्यासाठी माता मेरी केंद्रस्थानी असेल अशी रचना केली आहे. येशू ख्रिस्त क्रूसावर प्राणार्पण करतो. मग त्याचा मृतदेह माता मेरीच्या मांडीवर ठेवला जातो. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर उमटलेला करुणेचा भाव त्याने इतक्या विलक्षण पद्धतीने साकारला आहे की, शिल्प पाहताना तोच भाव आपल्या मनात काही क्षणात झिरपू लागतो. या शिल्पाचे आणखी एक बलस्थान म्हणजे मेरी आणि येशू ख्रिस्ताच्या कपड्याला पडलेल्या चुण्या म्हणजे घड्या. छिन्नी, हातोड्याचे घाव घालून संगमरवराला कापडासारखी वळणे देण्याकरिता त्याने घेतलेली मेहनत थक्क करून टाकते. त्याची स्वाक्षरी असलेली हे एकमेव शिल्प, असे म्हटले जाते. त्यावरून मायकेलसाठी ते किती महत्वाचे याचा अंदाज येतो. शिवाय इटलीच्या बेफिकीर लोकांमध्ये कोरोनाच्या संकटानंतर करुणेचाभाव का प्रगटला असावा, याचाही अंदाज बांधता येतो.     



ब्लॅकमेल

कोणाचीही नजर सहज वेधून घेईल अशी सुवर्णा आणि तिच्या तुलनेत जेमतेम दिसणारा पती नरेश लग्नापूर्वी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. गरिबीमुळं दोघांचं शिक्षण जेमतेम. नोकऱ्याही बेतास बात. नरेश छोट्याशा कन्स्ट्रक्शन कंपनीत अकाऊंटंट म्हणून कामाला लागला तर सुवर्णाला लग्न झाल्यानंतर लगेच एका औषधी विक्री दुकानात काम मिळाले. दोघेहीजण अतिशय प्रामाणिक, कष्टाळू. त्यामुळे मालकांची त्यांच्यावर मर्जी जडली. दोघांचा पायगुण म्हणा की मालकांची मेहनत किंवा अजून काही असेल. नरेशची कंपनी राज्यातील आठ-दहा मोठ्या शहरात विस्तारली. सुवर्णा काम करत असलेल्या औषधी दुकानाचा ब्रँड राज्यभरात पसरला. तीन वर्षांतच एका दुकानाची तीस दुकाने झाली. या साऱ्याचा दोघांच्या वेतनावर परिणाम झाला. मग त्यांनी छानसे घर, दुचाकी खरेदी केली. मुलांना चांगल्या शाळेत टाकले. दिवसेंदिवस सुवर्णाच्या चेहऱ्यावरील तेज आणि नरेशचा आत्मविश्वास वाढत चालला होता. त्याने घर-दुकाने भाड्याने मिळवून देणारी एजन्सी भावाच्या म्हणजे मिलिंदच्या नावावर सुरू केली होती. त्याने मिलिंदला स्वतःच्या घरी आणले होते. नरेशपेक्षा तो अतिशय देखणा, चटपटीत, लाघवी. त्यामुळे त्याचाही चांगलाच जम बसू लागला. इकडं सुवर्णाचे चाहते वाढले होते. सामाजिक सेवेच्या मार्गानं राजकारणात पडावं अशी तिची कॉलेजच्या काळात तीव्र भावना होती. पण तेव्हा ते शक्य झालं नाही. पण आता तिनं नगरसेवकपदाची निवडणूक लढवावी, असे प्रस्ताव येऊ लागले होते. ते तिनं नम्रपणे फेटाळून लावले. कारण महिनाभरापूर्वी तिचं एक जुनं  दुखणं उफाळून आलं होतं. खरं तर कॉलेजमधले असिमसोबतचे प्रेम प्रकरण ती विसरली होती. त्या काळात स्वप्नाळू असिम तिच्यासाठी वेडावला होता. कविता, कथा, नाटक लिखाण करणाऱ्या असिममध्ये तिचं भावनिक मन गुंतत चाललं होतं. पण एका खोलीतील निवासी, केवळ लेखणीवरच आयुष्य कंठण्याची भाषा करणाऱ्या असिमची पुढे भरभराट होणं कठीण. आपल्या प्रगतीत तो फार कामाचा नाही, असं तिचं सावध, व्यवहारी मन तिला बजावत होतं. शिवाय तो आपल्यावर नजर ठेवतो. असंच राहा, तसेच कपडे घाल असं बजावत राहतो, हेही खटकत होतं. मग ती त्याचाच मित्र, व्यवहारनिपुण, हॉटेलमालकाचा मुलगा असलेल्या आशुतोषसोबत बिनधास्त फिरू लागली. ‘आता आपल्यात प्रेमाचे नाते संपले. पुढे कधी भेटलोच तर उत्तम मित्र, सहकारी म्हणून काम करू’, असं तिनं असीमला सांगून टाकलं. तिच्या शब्दांनी कोसळलेला तो शहर सोडून गेला. त्यामुळं सगळं सोपं झालंय, असं तिला वाटत असतानाच आशुतोष काहीही न सांगता परदेशात उच्च शिक्षणासाठी गेला. मग आई-वडिल म्हणतील ते स्थळ चांगलं असं म्हणत तिनं नरेशला स्वीकारलं. असीम, आशुतोषसोबत घालवलेल्या क्षणांची काही छायाचित्रे नाटकाचा ग्रुप लीडर मिथुनकडे असं कळाल्यावर ती काही वर्षे चिंतेत होती. पण संसार स्थिरावला. तशी चिंता चांगलीच कमी झाली होती. ती महिन्याभरापूर्वी वाढली. कारण एक महिला सारखे कॉल करत होती. आशुतोष, असीमसोबतची छायाचित्रे नरेशपर्यंत पोहोचू नयेत, असे वाटत असेल तर दोन लाख रुपये दे, असं म्हणत होती. कॉलनीत सतत पाठलाग करणारा, वाईट नजरेनं पाहणारा नरसिंग यामागे असावा, असं तिला वाटू लागलं होतं. दुसरं मन म्हणत होतं मिथुनचा दूरचा नातेवाईक, आपल्यासोबत नोकरी करणारा भगवानदासच असावा. कारण अंगचटीला येऊ लागल्यावर तिनं त्याला फटकारलं होतं. तिसरा विचार असाही येत होता की, असीम किंवा आशुतोषपैकी एकाचा हा उपद्व्याप असेल काॽ की घरचा भेदी. नरेशला काही कळण्यापूर्वीच प्रकरण निपटण्याचं तिनं ठरवलं आणि सायबर पोलिस विभागातील खास मैत्रिण इन्सपेक्टर चित्राशी संपर्क साधला. तपास सुरू झाला तर दोन लाख मागणारे सहाही मोबाईल क्रमांक बंद होते. मग इन्सपेक्टर चित्रांनी दुसऱ्या मार्गाने तपास सुरू केला आणि ब्लॅकमेलर शोधला.


बिकट वाट वहिवाट

कोरोनामुळं सगळ्या जगात उलथापालथ होत आहे. प्रचंड प्रदूषित गंगा-यमुना नद्यांची पात्रे कमालीची स्वच्छ झालीयत. निसर्ग त्याला जसे हवे तसे करून घेत आहे. त्याचे शेकडो व्हिडिओ पाहण्यास मिळत आहे. दुसरीकडं उद्योग, शिक्षण, राजकीय क्षेत्रांमध्ये मोठमोठे बदल होतील, असे संकेत आतापासून मिळत आहेत. पहिल्या टप्प्यात जीवनशैलीच बदलेल, असे म्हटले जात आहे. त्याचा थेट परफॉर्मन्स करणाऱ्या कला प्रांतावर किती परिणाम होईल, याचा विचार करण्याची, रस्ते शोधण्याची वेळ निश्चित आली आहे. कारण कला आणि रसिक प्रेक्षकांची गर्दी यांचे अतूट नाते आहे. रसिकच नाहीतर मैफली रंगणार कशा. फक्त गायन-वादनावर जगणाऱ्यांचे पोट कसे चालणार. टाळ्या हीच शक्ती असलेल्या कलावंतांचा उत्साह वाढणार कसा. नाट्य, सिनेमागृहांमध्ये गर्दीच नसेल तर नाटक-सिनेमाचे अर्थकारण जुळणार कसे, असा गंभीर प्रश्न उभा टाकणार आहे. त्याची उत्तरे आतापासूनच शोधावी लागतील. त्यासाठी कलावंतांनाच पुढाकार घ्यावा लागेल. काही वर्षांपूर्वी औरंगाबादच्या संगीत क्षेत्रात कार्यरत आणि आता मुंबईत स्थायिक विजय न्यायाधीश यांनी सर्व वादक-गायकांसाठी एक मुद्दा मांडला. तो असा की, कलावंतांना जगण्याची आणखीही एखादी ‘कला’ आली पाहिजे. म्हणजे छोटासा उद्योग, नोकरी किंवा व्यवसाय हवा. म्हणजे कलेच्या माध्यमातून पोट भरता आले नाही तर दुसरा आधार असेल. हा मुद्दा विशिष्ट, मर्यादित क्षमता असलेल्यांसाठी अत्यंत रास्त, उपयुक्त आहे. पण खूप टोकाचे वेड असलेल्या कलावंतांना ते शक्य होणार नाही. कलेत मातब्बर असाल तर पुढे जाण्याचा काही ना काही मार्ग सापडून जातोच. त्यामुळे कला नसानसात भिनलेल्यांनी उद्योग, व्यवसायाकडे वळू नये, असे वाटते. कारण हा जो अंधःकार दिसतोय. तो निश्चित हटेल. काहीतरी नवीन दिसेलच.   
कला जगतात जे काही विचार मंथन सुरू होत आहे. नव्या दिशांना पाहिले जात आहे. त्यातील एक दिशा छोट्या नोकरीची आहे. मराठी, हिंदी रंगभूमीवर यशस्वी झालेले अनेक दिग्गज सुरुवातीच्या काळात बँका, आयुर्विमा महामंडळ अशा ठिकाणी नोकऱ्या करत. नावाला वलय प्राप्त झाल्यावर हळूहळू त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. तसे काहीसे असले पाहिजे, असे अनेकांना वाटू लागले असल्यास त्यात नवल नाही आणि गैरही नाही. शेवटी पोट चालले तरच सगळे चालणार आहे, हे नक्की. पण नोकरीची कितपत संधी राहिल. त्यापेक्षा जे उपलब्ध आहे. अंगभूत कौशल्य आहे. त्यातच आणखी काही शोधता येईल का, असा विचार केला पाहिजे. ‘बिकट वाट वहिवाट असावी’ असे म्हणण्याचे दिवस येत आहेत.
कोरोनानंतरचा काळ एकमेकांपासून दूर राहण्याचा, अंतर राखण्याचा असेल. पण तरीही लोकांना एकमेकांजवळ येण्याची ओढ कायम राहणार आहे. ती घटणार नाही. उलट योग्य निमित्त असेल तर ती वाढेलच. त्यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर करून संगीत मैफली होऊ शकतात का, याचा विचार व्हावा. म्हणजे एका घरात गायक गात आहेत. वादक त्यांना विशिष्ट अंतरावरून साथ संगत करत आहेत. आणि छोट्या शहरातील २००-२५० अस्सल रसिक इंटरनेटद्वारे मोबाईलवर जोडले जाऊन मैफलीचा आनंद घेत आहेत. त्या मोबदल्यात कलावंतांना ऑनलाईन पेमेंट करत आहेत, असे चित्र दिसू शकते.
दुसरे असे की, लॉकडाऊनच्या काळात टीव्हीशिवाय यु ट्युब हे एक प्रभावी माध्यम आढळले. लोकांनी त्यावर मनपसंत भोजन पदार्थांच्या रेसिपीपासून ते मोबाइल पाण्यात पडला तर काय करावे, इथपर्यंतचे व्हिडिओ पाहिले. अपलोड केले. सिनेमे पाहण्यासाठी तर मोठी गर्दी होती. त्यात असे लक्षात आले की, दक्षिणेतील शेकडो सिनेमे डब करून हिंदीत उपलब्ध करून दिले आहेत. सैराटसारखा एखाद दुसरा अपवाद वगळला तर काहीच नाही. त्यामुळे काही दिवसांतच हजारो लोकांनी दक्षिणेतील सिनेमे पाहिले. एक नवा प्रेक्षकवर्ग त्यातून तयार झाला. खरेतर मराठीतील सिंहासन, दुसरा सामना, गाढवाचं लग्न ते अगदी श्वास, ख्वाडा, तुंबाड असे सिनेमे हिंदीत आवडू शकतील. पण मराठी कलावंत मंडळींचे बहुधा या प्रांताकडे लक्ष गेलेले नाही, असे दिसते. दक्षिणेतील व्यक्तिमत्वांची, त्यांच्या संवादशैलीची आपण मनसोक्त टिंगल उडवतो. पण दाक्षिणात्य लोक कायम नवनवे मार्ग शोधत असतात. प्रचंड शिस्तबद्ध मेहनत करत त्यांची कला जगभर पोहोचवण्यासाठी जी धडपड करतात. ती मराठी कलाप्रांताने आत्मसात केली पाहिजे. कोरोनाच्या निमित्ताने हे झाले. पन्नास, शंभर मराठी सिनेमे हिंदीत डब होऊन यु ट्युबवर झळकले तर मराठीचा डंका अधिक वाजेल. होय नाॽ  



रंगीन फ्रेड्रिक्स थारोळ्यातॽ

वयाच्या पंचाहत्तरीत पोहोचलेले फ्रेड्रिक्स शहरातले बहुचर्चित व्यक्ती. त्यांच्या वर्तुळात उद्योजक, कलावंत, बडे अधिकारी, व्यापारी, मिडिआ सम्राटांची उठबस होती. दर महिन्याला फ्रेड्रिक्स काहीना काही निमित्त काढून जंगी पार्टी द्यायचे. त्या पार्टीच्या निमंत्रणासाठी ज्यांना थेट फ्रेड्रिक्स यांच्याशी संधान बांधता येत नसे. ते त्यांचे सावत्र भाऊ फ्रान्सिसशी संपर्क साधायचे. त्याला छोटी-मोठी गिफ्ट द्यायचे. कारण शहरालगतच्या मोठ्या लॉन्स, पंचतारांकित हॉटेल्समध्ये होणाऱ्या या पार्ट्यांत दारुची, चटकदार खाद्य पदार्थांची रेलचेल असायची. शिवाय तिथं गेल्यावर काहीतरी डील होणार. एखादं नवीन काम मिळणार किंवा जुनं अडकलेलं काम मार्गी लागणार, असा प्रचार-प्रसार झाला होता. काहीच झालं नाही तर अनेक सुंदर, आकर्षक, मादक महिला, तरुणी, ललनांचे दर्शन पार्ट्यांमध्ये हमखास होणार, हे तर नक्की होतं. एक आश्चर्याची गोष्ट अशी होती की, आजुबाजुला कायम लोकांचा राबता असलेले अविवाहित फ्रेड्रिक्स पार्टी पूर्ण संपेपर्यंत कधीच थांबायचे नाही. रात्रीच्या दहाच्या सुमारास ते पार्टीतून ड्रायव्हरसोबत बाहेर पडायचे. सुरुवातीच्या काळात काही लोकांनी, पत्रकारांनी ते कुठे जातात, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ते थेट बंगल्यावरच जातात, असे कळाल्यावर उलटसुलट चर्चा थांबली आणि त्यांचे गुणगान करणारे ‘विरक्तीचा गौरव’ असे लेखही छापून आले. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत देखणे, हजरजबाबी असलेल्या फ्रेड्रीक्स यांचे जगणे रंगीन होते. पन्नास-साठ वर्षांपूर्वी ते गोव्यातून आले. त्यांनी अनेक छोटे-मोठे उद्योग केले. पण डिस्कोबारनी त्यांना सर्वाधिक यश मिळवून दिले. ते अब्जा-अब्जाधीश झाले. डिस्कोबारमध्ये मद्याचा एक थेंबही मिळणार नाही. कोणताही गैरधंदा चालणार नाही. याकडे स्वतः फ्रेड्रिक्स लक्ष देत. त्यामुळे पोलिसी कारवाईचा कधी प्रश्नच आला नाही. उलट नियुक्ती मिळालेला प्रत्येक पोलिस कमिशनर त्यांचा मित्र होत असे. असं म्हटलं जात होतं की, तरुण वयात फ्रेड्रिक्स यांची दोन प्रेमप्रकरणे फिसकटली. तेव्हापासून त्यांनी ठरवलं की, जे सुख हवं ते थेट विकतच घेऊन टाकायचं. त्यासाठी त्यांची खास यंत्रणा होती. दुसऱ्या शहरातून विशिष्ट वेळी एखादी महिला, तरुणी, ललना त्यांच्या बंगल्यात दाखल व्हायची आणि पहाटे पहाटे घसघशीत रक्कम घेऊन रवाना व्हायची. निवृत्त पोलिस अधिकारी आणि फ्रेड्रिक्स यांचे खास मित्र निशिकांत, सावत्र भाऊ फ्रान्सिस आणि ड्रायव्हर चरणसिंग यांनाच हे सगळं माहिती होते. निशिकांत यांना ते पसंत नव्हते. विकत मिळणारं सुख गुन्हेगारीकडं जातं असं ते म्हणत. तर जगात खरं सुख मिळवायचंच नाही. दोन भेटीनंतर त्या स्त्रीमध्ये मला स्वारस्यच राहत नाही. तु माझ्या एवढ्या गुण-अवगुणाकडं दुर्लक्ष कर बाबा, अशी विनंती फ्रेड्रिक्स करत. तरीही उफाड्याची, मदमस्त अशीच प्रसिद्धी असलेली कलिना त्यांच्याकडं दोन महिन्यात चौथ्यांदा आल्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारणा केली. त्यावर फ्रेड्रिक्स यांनी ‘अरे, मला तिच्यात काही खास वाटत नसलं तरी तिला वाटतंय. म्हणून माझ्या एजंटच्या मागे लागून ती येतेय. सोबत दोन भाऊही आणतेय’ असं खळखळून हसत उत्तर दिलं. निशिकांत यांना ते फारसं पटलं नाही. आयुष्याच्या उताराला लागलेल्या फ्रेड्रिक्सच्या प्रचंड संपत्तीचं काय होणार, अशी चिंता त्यांना होतीच. शिवाय बंगल्यातील तिजोरीत ठेवलेली रक्कम फ्रेड्रिक्स कोणाला देऊन तर टाकणार नाही ना, असे निशिकांत, सावत्र भाऊ फ्रान्सिसला वाटत होतं. फ्रान्सिसचा मुलगा सॅम्युअल आणि ड्रायव्हर चरणसिंगही कायम अस्वस्थ असायचे. तुम्ही का तुमच्या मालकासारखं श्रीमंत होत नाहीत, असं चरणसिंगची बायको त्याला नेहमी हिणवायची. या साऱ्यांना एक दिवस सकाळी जबर धक्का बसला. जेव्हा हातपाय बांधलेले, तोंडात बोळा कोंबलेला, डोक्यात घाव घातलेला अशा अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात फ्रेड्रिक्स यांचा मृतदेह सापडला. इन्सपेक्टर कठाळेंनी चौकशी सुरू केली. बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज कोणीतरी करप्ट करून टाकलं होतं. कोणीतरी कट रचून ही हत्या केली होती. नेमका कोण होता कटाचा सूत्रधार. कोण असावं कटात सहभागीॽ असे प्रश्न कठाळेंना पडले होते.


Wednesday 15 April 2020

स्वप्न बेतलं जिवावर

माणगाव छोटंसं. अगदी तीनशे घरांचं. त्यातले जेमतेम तीन-चार घरंच श्रीमंतांची. बाकी सगळे मजूर वर्गातले. श्रीमंतांच्या शेतावर राबायचे. ते देतील तेवढे पैसे घ्यायचे. गावातल्या त्यांच्याच दुकानावरून ज्वारी, तिखट, मीठ, भाजी, तेल खरेदी करायचं. चुलीवर अन्न शिजवायचं आणि खायचं, असं त्या गरीबांचं कित्येक वर्षापासून सुरू होतं. पण त्यातल्या कोणाची तक्रार नव्हती. जे काही आहे ते नशिबानं मिळालं वयाची साठी पार केलेले भिकाजीही त्याला अपवाद नव्हते. अलिकडं ते वयोमानाने थकू लागले होते. हे लक्षात आल्यावर नागप्पाच्या भावानं म्हणजे सत्यप्पानं बकऱ्या चारण्याची जबाबदारी भिकाजींवर सोपवली होती. चांगल्या चार-पाचशे बकऱ्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांना घेऊन भिकाजी गावाची वेस ओलांडत टेकडीजवळ पोहोचले. तेव्हा संध्याकाळ झाली होती. दहा मिनिटांत परतायची वेळ झाली. मग भिकाजींनी हाळी देत बकऱ्यांना वळते केले. पण दोन-तीन कळपातून बऱ्याच दूर गेल्याचं पाहून ते त्यांना हाकारण्यासाठी पुढे गेले. आणि त्यांची बोबडीच वळाली. कारण घळीत एक कवटी, हाडं पडली होती. मांसाचे तुकडे होते. त्यावर माशा घोंगावत होत्या. भिकाजी धावत गावामध्ये पोहोचले. थोड्यावेळानं इन्सपेक्टर सदाशिवराव आणि त्यांचे पथक घटनास्थळी धडकले. त्यांनी कवटी, हाडं तपासणीसाठी पाठवली. परिसर धुंडाळल्यावर एक लेडीज पर्स सापडली. त्यात काही कागदं होती. पण त्यांचा अक्षरशः लगदा झाला होता. आजूबाजूच्या गावांमधून मिसिंगची माहिती घेतली. तेव्हा नांदापूरला राहणारा अर्जुन नावाचा वीस-बावीस वर्षांचा पोरगा तीन महिन्यांपूर्वी मुंबईला जातो म्हणून गेलाय. पण मुंबईत पोहोचलो असे सांगितल्यावर त्याचा मोबाइल बंद झाला. त्यापुढची काही खबरबातच नाही, अशी माहिती मिळाली. कवटी, हाडे वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या तरुणाची असावीत. डोक्यावर जोरदार घाव झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला असावा, असेही समोर आले. अर्जुन नेमका कशासाठी मुंबईत गेला याची काहीच माहिती त्याच्या मजुरीकाम करणाऱ्या आई-बापाकडं नव्हती. पण हा पोरगा मुंबईला गेलाच नाही. कोणत्यातरी भानगडीत अडकला आणि त्यातूनच त्याचा खून झाला असावा, असं सदाशिवरावांचं एक मन सांगत होतं. मग त्यांनी मृतदेहाजवळ सापडलेली पर्स पुन्हा तपासली. तेव्हा आत एका चिठ्ठीवर बऱ्यापैकी अक्षरे दिसत होती. लिहिलं होतं मगनलाल – लोखंड सप्लायर. सोबत मोबाईल नंबरही होता. सदाशिवरावांनी कॉल केला. तर मगनलाल केव्हाच जग सोडून गेले होते. त्यांचा मुलगा माखनलाल व्यवसाय बघत होता. सदाशिवरावांनी मग अर्जुनचे गावातले, आसपासचे सर्व मित्र पकडून ठाण्यात आणले. तेव्हा काही धागेदोरे मिळाले. गावातल्या नाटक मंडळीत हौस म्हणून काम करणाऱ्या अर्जुनच्या डोक्यामध्ये सिनेमात काम करण्याचं खूळ शिरलं होतं. त्याला एका तमाशा मंडळात भूमिकाही मिळाली होती. तिथं त्याचं माला नावाच्या नर्तिकेसोबत नातं जुळलं होतं. दोघे मिळून मुंबईला जायचं ठरवत होते. पण त्यात अडसर होता तमाशा चालवणाऱ्या आनंदीबाईंचा. कारण मालाला सोडायचं तर आधी एक लाख रुपये दे, असं त्या अर्जुनला म्हणत होत्या. एवढा पैसा माझा आशिक झालेला लोखंडाचा व्यापारी, लोचट माखनलाल देईल, असं मालानं अर्जुनला सांगितलं होतं. हे पैसे तुच माखनलालकडून घेऊन दे, यासाठी अर्जुननं मालाकडंच टुमणं लावलं होतं. त्यावरून त्यांच्यात एक-दोन वेळा जोरात खटकाखटकी झाली होती. माला खरंच विश्वासाची आहे काॽ ती कायमची साथीदारीण होईल का, अशी त्याला शंका येऊ लागली होती. आनंदीबाईचा भाचा, कायम गुंडगिरी करणारा भानुदास आणि माणगावातील धनिक सत्याप्पांशी तिची नको तेवढी जवळीक त्याला खटकत होती. सदाशिवरावांनी चौकशी केली तर मालाही गायब झाली होती. त्यामुळं त्यांनी चौकशीची दिशा माखनलाल, तमाशा मंडळाकडे वळवली. आणि खुनी शोधून काढला.

Thursday 9 April 2020

तंबूतल्या सिनेमाचे दिवस

छान नदीचा किनारा. नदी तुडुंब भरून वाहतीय. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आहे. अलिकडच्या बाजूला वाळूच वाळू पसरली आहे. त्या वाळूच्या मध्यभागी एक तंबू लागलाय. तंबूत सिनेमाचा पडदा आहे. पडद्याच्या दोन्ही बाजूंनी वाळूत रिकामी पोती टाकलीत. एकमेकांपासून आठ-दहा फूट अंतरावर. आणि रात्री आठची वेळ आहे. आकाश निरभ्र. थंडगार वारा वाहतोय. लोक पोत्यावर निवांत बसून, पहूडून सिनेमा बघतायत. असं दृश्य होतं एकोणीसशे साठ-सत्तरच्या दशकात. मराठी मुलखातल्या अनेक गावांतील एक पिढी अशीच सिनेमारसिक झाली. अगदी अलिकडं म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी तंबूतल्या (तुरळक अपवाद सोडला) सिनेमानं जीव सोडला. तोपर्यंत काही दिग्गज, लोकप्रिय कलावंतही खेडेगावांतील जत्रा-यात्रांत तंबूतल्या सिनेमाचा प्रचार, प्रसार करत होते. अर्थात तेव्हा अशा सिनेमाला मोठी गर्दी होती. साठ-सत्तरच्या दशकातील एकमेकांपासून अंतर ठेवून, पोत्यांवर अंग टाकून सिनेमा पाहणं राहिलं नव्हतं. पण मूळ मुद्दा तंबूतल्या सिनेमाचा. असं म्हणतात ना की, जगात नवं  असं काही उत्पन्न होतंच नाही. जुनंच रूप बदलून येतं. कोरोनामुळं आपल्या सिनेमांचंही तसंच काही होईल की काय, असं वाटू लागलंय. अरे, मी तुला कोरोनापूर्वी असं म्हटलं होतं ना. अरे, लक्षात घे. कोरोनापूर्वीची घटना आहे रे ती. अशी वाक्यं काही दिवस, महिन्यांनंतर आपल्या कानावर पडणार आहेत. आपल्यापैकीच अनेकजण असं बोलणार आहेत. केवळ आपणच नाही तर अख्ख्या जगभर हे होणारच आहे. एवढा मोठा इफेक्ट कोरोनाने केला आहे. काही दिवसांसाठी का होईना पर्यावरण टिकवण्याच्या आणाभाका होतील. निसर्गाच्या शक्तीचं गुणगान केलं जाईल. त्यासोबत शाश्वत अर्थकारण, समाजकारणाचा शोध सुरू होईल. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ते म्हणालेत की, कोरोनाला अटकाव होत असतानाच पुढील काळात उद्योग, कृषी आदी क्षेत्रातील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी उपाययोजना आताच आखाव्या लागतील. कोणत्याही देशासाठी हीच दोन क्षेत्रे महत्वाची आहेत. कारण ती सावरली तर इतरांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा होतो. पण याचा अर्थ इतरांनी स्वतःहून काहीच करायचे नाही, असा थोडीच आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटातून सावरल्यानंतर आपण आपापल्या क्षेत्राला उर्जा कशी देऊ शकतो, याचा विचार आतापासूनच सर्वांना करावा लागणार आहे. त्यात कला प्रांताचाही समावेश आहे. कला प्रांतातील सिनेमा जगताला हे पाहावेच लागेल, अभ्यासावे लागेल. राज्यकर्त्यांसाठी कलावंत महत्वाचे असले तर कलाक्षेत्र त्यांच्या प्राधान्य यादीत वरच्या स्थानावर कधीच नसते. त्यामुळे आपल्याला जगायचे असेल तर आपल्यालाच काहीतरी मार्ग शोधावे लागतील, हे कलावंतांनी यापूर्वीच्या अनुभवावरून लक्षात घेतले पाहिजे. कोरोनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातील सिनेमा-नाटक जगाला भेडसावणारा सर्वात मोठा मुद्दा आहे प्रेक्षकांच्या. रसिक मायबापांच्या गर्दीचा. म्हणजे तुम्ही पहाल की गर्दीच नसेल तर नाटकाचा खेळ रंगत नाही. खऱ्या रसिकानं दिलेली टाळीची दाद कलावंताला प्रचंड शक्ती देऊन जात असते. हे झाले नाटकाचे. सिनेमाचं तर सारं गणितच गर्दीवर अवलंबून. दहा कोटी, पंधरा कोटी, पन्नास, शंभर, पाचशे कोटींचा धंदा केला तरच तो सिनेमा लोकप्रिय अशी म्हटलं जातं. आता कोरोनानंतरची काही वर्षे तरी लोक गर्दी टाळतील. एकमेकांपासून अंतर राखून आसन व्यवस्था हवी, अशी अपेक्षा व्यक्त करतील. आधीच मल्टीप्लेक्स जेमतेम २०० - ३०० खुर्च्यांचे. त्यात आणखी जागा करायची म्हटलं तर मल्टीप्लेक्सच्या मालकांना ते परवडणार आहे काॽ जरी परवडले तरी सध्या जो एक-दीड आठवडा सिनेमा चालतो. तो महिनाभर चालू ठेवणं शक्य होईल काॽ खरं तर शूटिंग करण्यापासून ते प्रोमोशनपर्यंतची इतरही अनेक आव्हाने आहेतच. पण लोकांची गर्दी कशी खेचायची, हा सर्वात मोठा प्रश्न तमाम सिनेमा-नाट्य कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञांपुढे असणार. त्याचे एक उत्तर काळानुरूप काही बदल करून तंबूतला सिनेमा हे आहेच. तो आपल्यातून जाऊन शेकडो वर्षे तर उलटली नाहीतच. हाक मारली तर येऊ शकतो तो परत. त्यावर सोशल डिस्टिन्सिंग आणि गर्दीचं समीकरण जमवून, थोडासा मुलामा चढवत रसिकांसमोर उभा राहू शकतो. कारण या जगात नवीन काहीच निर्माण होत नाही. जे येतं ते जुन्याची मोडतोड करून. त्यात काही बदल करूनच. कारण बदलांना आपलंसं करत आव्हानाशी लढणं हा माणसाचा स्वभाव आहेच. कलावंत मंडळी त्यात आघाडीवर असणारच. होय नाॽ

पडदा दूर झाला आणि...

हाजी शरफोद्दीन म्हणजे गावातील मातब्बर असामी. खरेतर व्यापारी म्हणजे दोन गोष्टी कमी. चार गोष्टी जास्तीच्या. थोडीफार चलाखी, लबाडी गृहित धरलेलीच असते. पण शरफोद्दीन त्याला अपवाद असावेत. बांधकाम साहित्याचा व्यापार करताना त्यांना कधीच ग्राहकाला फसवावेसे वाटले नाही. गावातल्या तीन महत्वाच्या भागात त्यांची तीन मोठी दुकाने. चारही बाजूंनी पैसा धो-धो येत होता. पत्नी सुस्वभावी होती. दोन लहान भाऊ अतिशय चोखपणे दुकाने सांभाळत होते. सुदैवाने त्यांच्या बायकाही अत्यंत चांगल्या निघाल्या होत्या. शरीफोद्दीन यांना दोन मुली. दोन मुले. दोन मुली आणि एका मुलाचे लग्न झाले होते. सुनबाई डॉक्टर. त्यांनी तिला छोटासा दवाखाना थाटून दिला होता. एकूणात शरफोद्दीन यांचा संसार, व्यवसाय अतिशय उत्तम सुरू होता. फक्त त्यांना एक चिंता लागली होती. ती म्हणजे सर्वात धाकटा मुलगा अलिम व्यवसायाकडे अजिबात म्हणजे ढुंकूनही पाहत नव्हता. शिक्षणात बऱ्यापैकी तल्लख असलेला अलिम कॉमर्सचा पदवीधर होता. त्याला शेअर मार्केटमध्ये कमालीचे स्वारस्य होते. शेअर बाजार म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार. कधी लाखो रुपयांचे नुकसान होईल कळतही नाही, असे शरफोद्दीन यांचे त्याच्यामागे सारखे टुमणे होते. पण तो ऐकण्यास राजी नव्हता. अधूनमधून आईच्या मागे धोशा लावून दहा-वीस हजार रुपये घेऊन जायचा. त्यातून काही कमाई झाली का, असे विचारले तर प्रचंड संतापायचा. त्याचा हा स्वभाव शरफोद्दीन आणि मोठ्या भावाला मुळीच पसंत पडत नव्हत्या. डॉक्टर सूनबाई तर अलिमचे वागणे-बोलणे खानदानाला शोभणारे नाही, असे बोलून दाखवू लागली होती. त्यामुळे त्याला विवाह बंधनात अडकवण्याचे प्रयत्न शरफोद्दीन यांनी सुरू केले. तर त्यालाही तो दाद देत नव्हता. एक दिवस शरफोद्दीन आणि त्यांची पत्नी नातेवाईकाकडे बाहेरगावाला गेले. तिथून परतत असताना गावाच्या टेकडीजवळ त्यांना ओळखीची मोटारसायकल दिसली. त्यांनी डोळे ताणून पाहिले तर अलिमसारखा मुलगा दोन मित्र आणि एका मुलीसोबत असल्यासारखे त्यांना वाटले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी टेकडीकडे वळवण्यास सांगितले. पण तोपर्यंत ते सारेच निघून गेले होते. तो अलिम असल्याची शरफोद्दीन यांना खात्री वाटत होती. पण त्यांची पत्नी माझा पोरगा अशा ठिकाणी जाऊच शकत नाही, असे म्हणत होती. अस्वस्थ झालेले शरफोद्दीन तीन चार दिवसानंतर नमाज पढून मशिदीबाहेर पडत असताना अलिम एका विचित्र माणसाशी बोलत असल्याचे त्यांनी पाहिले. ते लक्षात येताच अलिम त्याच्याकडून एक छोटीशी पिशवी घेत निघून गेला. तो माणूस घाईघाईने दुचाकीवरून पळाला. शरफोद्दीन यांच्या मनात विचारांचे काहूर सुरू झाले. त्यांनी मग अलिमचा छडा लावण्याचा निश्चय केला. त्याच्यावर सातत्याने नजर ठेवू लागले. आठवडाभरानंतर ते खजिल झाले. कारण त्यांना एकही संशयास्पद गोष्ट सापडली नाही. अलिम नित्यनेमाने विद्यापीठात जात होता. वर्गात अभ्यास करत होता. लायब्ररीमध्ये बसत होता. संध्याकाळी लवकर घरी येत होता. रात्री एखाद्या तासासाठी भटकंती करून दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत जाऊन झोपत होता. त्यामुळे मुलगा नीट मार्गावर आहे. टेकडीजवळ अलिम नव्हताच, असे त्यांना वाटू लागले. आणि ते निश्चिंतपणे दुकानात लक्ष घालू लागले. दुसरी सून आणण्याची तयारी करू लागले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असावे. मित्रांसोबत करीम बिर्याणी हाऊसमध्ये जेवण्यासाठी जातो, असे म्हणून रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडलेला अलिम परतलाच नाही. मोबाईल स्वीच ऑफ. घाबरलेल्या शरफोद्दीन, त्यांची पत्नी आणि साऱ्या कुटुंबानेच शोधाशोध सुरू केली. बिर्याणी हाऊसच्या मालकाला जाऊन भेटले. त्याला अलिमचा फोटो दाखवला. तेव्हा त्याने नेमके आठवत नाही. आमच्याकडे शेकडो ग्राहक येतात, असे उत्तर दिले. अखेर शरफोद्दीन पोलिस ठाण्यात पोहोचले. इन्सपेक्टर रशीद खान यांनी तपास सुरू केला. बिर्याणी हाऊसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अलिम तीन मित्रांसोबत जेवून बाहेर पडत असल्याचे निष्पन्न झाले. बड्या बिल्डराचा मुलगा अस्लम, प्रख्यात डॉक्टरांचा मुलगा इलियास आणि हिरे व्यापाऱ्याचा मुलगा फहाद यांची कसून चौकशी केली. पण जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या मार्गाने निघून गेले. एवढेच वारंवार समोर येत होते. तीन महिने उलटून गेले. मुलाच्या चिंतेने व्याकुळलेले शरफोद्दीन नमाज पढून बाहेर पडत होते. तेव्हा आपल्या डोळ्यासमोरील पडदाच दूर झाला, असे त्यांना वाटले. 

मदत मागितली तर...

बऱ्याच वेळा असं असतं की, सगळे आपले म्हटले तरी संकटाच्या काळात कोण खरंच मदतीला येईल, हे संकट आल्यावरच कळतं. आरोग्य खात्यात काम करणारी उमा टोकाची मदत करणाऱ्याच्या शोधात होती. तिने खूप धुंडाळले. पण एकही जण भरवशाचा वाटत नव्हता. तिला राहून राहून याचं आश्चर्य वाटत होतं की, सगळं व्यवस्थितपणे चाललेलं तिचं आयुष्य एकदम घरंगळत कसं काय गेलंॽ तिचे वडील सहकारी बँकेत सहव्यवस्थापक पदावर. आई पतसंस्थेत कर्मचारी. घरी बऱ्यापैकी पैसा खुळखुळत होता. उमाची छोटी बहीण मोहिनी एकदम सुंदर, चुणचुणीत, हुशार. उमाला कष्टात सरस होती. तिनं आरोग्य खात्याची परीक्षा पास केली. वडिलांनी राजकीय वजन वापरून त्यांनी तिला आरोग्य खात्यात नोकरीला लावलं. कुटुंबाला सोडून दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जाणं तिला थोडसं जडच गेलं. पण हळूहळू ती कामात रुळली. दिसायला बऱ्यापैकी आकर्षक असलेली उमा एक अपवाद वगळता कोणात फारशी अडकली नव्हती. सहा वर्षांपूर्वी बी.एस्सी. थर्ड इअरला असताना तिला नुकतेच जॉईन झालेले प्राध्यापक राहुल खूप आवडले होते. दोघांमधील गुरु-शिष्याचं नातं वेगळ्या वळणावर निघालं होतं. पण संस्थाचालकांनी राहुलची जोरदार कानउघाडणी केली. मग तो बोलण्यास टाळाटाळ करू लागला. कंटाळलेल्या उमानं त्याच्या आठवणी तशाच उराशी ठेवत परीक्षांकडे लक्ष वळवले. त्यात यश मिळवून नोकरी पटकावली. राहुलसोबतच्या प्रेमात अपयश आल्यानंतर आता आई-वडिल जे स्थळ आणतील तेच स्वीकारायचे, असं तिनं ठरवलं होतं. म्हणून आरोग्य मंत्रालयात मोठ्या पदावर काम करणाऱ्या गणेशच्या गळ्यात तिनं काहीही विचार न करता माळ घातली. महिना दोन महिन्यात गणेश उमाची मुंबईत बदली करून घेईल, असे ठरले होते. आई-वडिलांचा आदर करण्याच्या नादात आपण किती गंभीर चूक करून ठेवली हे तिला हनीमुनच्या आठवडाभरातच कळालं. एकुलता एक गणेश अय्याशी वृत्तीचा होता. पदाचा वापर करून पैसा खायचा आणि कॉलगर्ल्सवर उधळायचा, मनसोक्त दारू प्यायची. हा त्याचा आवडता उद्योग होता. त्यामुळं उमाच्या बदलीसाठी त्यानं दोन वर्षांत काडीचेही प्रयत्न केले नाही. उलट तो तिच्याकडून अधून-मधून पैसे घेऊन जाऊ लागला. उमाची एक वर्गमैत्रिण गणेशसोबत मंत्रालयात काम करत होती. एकदा तिनं सहज गमतीगमतीत राहुलबद्दल त्याला सांगितलं. तेव्हापासून त्यानं एकट्या राहत असलेल्या तिच्या चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले होते. दुसरीकडं तो उमाची लहान बहीण मोहिनी अश्लिल मेसेज, व्हिडिओ क्लीप्स पाठवू लागला होता. तिच्या भावी नवऱ्याला काहीबाही सांगू लागला होता. ताई तुझ्या नवऱ्याचा बंदोबस्त कर, असं मोहिनी म्हणू लागली होती. हे कमी होतं म्हणून की काय, ऑफिसमधील उमाचे वरिष्ठ केशवराव काहीतरी कारण काढून तिच्या अंगचटीला जात होते. तुझ्यासाठी काहीही करू शकतो, असं म्हणत होते. पण तिची मुळीच इच्छा नव्हती. गेल्या महिन्यात मॉलमध्ये अचानक भेटलेल्या राहुलभोवती तिचं मन घुटमळू लागलं होतं. त्यानं लग्न केलं नाही, हे कळाल्यावर तर तिच्या वेदना प्रचंड वाढल्या होत्या. पण नियती तेवढ्यावर थांबली नाही. लाचेच्या सापळ्यात अडकून निलंबित झालेला गणेश घरी येऊन बसला. आता यातून सुटका व्हायची असेल तर एकच मार्ग. तो म्हणजे गणेशचा काटा काढायचा. या विचारानं उमाला घेरलं होतं. आणि तिच्या डोळ्यासमोर चमकला सामाजिक कार्यकर्ता मनोजचा चेहरा. आरोग्य खात्यात ठेकेदारी करणारा मनोज तिला नेहमी म्हणायचा, ताई...काही मोठं काम सांगा. कोणाचीही वाट लावू शकतो आपण. त्याचे खास कार्यकर्ते फैय्याज आणि अखिलनं तर एकदा कमरेला लावलेलं पिस्तुलही दाखवलं होतं. कोणाला थेटपणं सांगावं, असा प्रश्न उमासमोर होता. पण तशी वेळ आलीच नाही. डोकं दुखू लागलं म्हणून ती दुपारी घरी आली तर गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचे  प्राण कधीच निघून गेले होते.

मद्यपीचा खूनॽ

सितारा कॉलनीतल्या पाच मजली यलो सन अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचा तत्काळ. फ्लॅट क्रमांक चारमध्ये पुरुषाचा मृतदेह सापडलाय, असा मेसेज हरीनगरच्या पोलिस ठाण्यात नुकत्याच पोहोचलेल्या इन्सपेक्टर तोनगिरेंना मिळाला. त्यांनी लगेच धडाधड फिंगर एक्सपर्ट, डॉग स्क्वाडला स्पॉटवर पोहोचण्याचे सांगितले. आणि तेही सितारा कॉलनीत पोहोचले. गेल्या काही वर्षांत खासगी नोकऱ्यांमध्ये भरघोस पगारवाढ झाल्याने अनेकजण बऱ्यापैकी श्रीमंत झाले होते. त्यांचे दोन-तीन बेडरुमचे फ्लॅटस अपार्टमेंटमध्ये होते. अपार्टमेंटला लागूनच डायमंड सोसायटीच्या बंगल्यांची भलीमोठी रांग होती. शहरातील किमान वीस टक्के अतिश्रीमंत मंडळी येथे राहत होती. त्यात केवळ व्यापारी, उद्योजक नव्हते. तर बडे डॉक्टर, काळ्या पैशांवर गब्बर झालेले अधिकारीही होतेच. इन्सपेक्टर तोनगिरेंनी सितारा कॉलनीत पोहोचताच या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली. मग ते दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. फ्लॅट क्रमांक चारमध्ये राहणाऱ्या सुधीरचा देह बेडरुममध्ये लोळागोळा होऊन पडला होता. शेजारी उंची मद्याच्या दोन रिकाम्या बाटल्या होत्या. सिगारेटची थोटकं होती. शिवाय रात्री उशिरा हॉटेलातून मागवलेल्या जेवणापैकी भात आणि मटनाचे तुकडे ताटात तसेच दिसत होते. सकाळी भांडे धुण्यासाठी आलेल्या कमलाबाई आल्या. साहेब-बाईसाहेब आतच असतील. त्यामुळे दरवाजा उघडा असावा, असे वाटून त्या थेट स्वयंपाकघरात गेल्या. तेथेच भांडी धुऊन ठेवली, हॉल झाडून-पुसून घेतला आणि जाते, असे सांगण्यासाठी बेडरुमजवळ गेल्या. तेथे सामसूम वाटल्याने त्यांनी डोकावून पाहिले. तेव्हा साहेब पडल्याचे  दिसले. ते चक्कर येऊन पडले की काय, अशी शंका कमलबाईंना आली. म्हणून त्यांनी त्यांना हलवून पाहिले. मग आरडाओरड सुरू केली. काही वेळाने नाईटआऊटसाठी मैत्रिणीकडे गेलेल्या सुधीर यांच्या पत्नी निलिमा पोहोचल्या. मृतदेहावर कोसळून पडल्या. तोनगिरेंनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. फिंगर एक्सपर्टकडून फार काही मिळेल, अशी शक्यता नव्हती. कारण सगळीकडं कमलबाईंच्या बोटाचे ठसे होते. अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांकडून त्रोटक माहिती मिळाली. त्यामुळे तोनगिरे सुधीरचे ऑफिस, मित्र, निलिमाचे ऑफिस, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक अशा अनेक ठिकाणी तपास सुरू केला. तेव्हा असे समोर आले की, सुधीर एकेकाळी कॉलेजचा हिरो आणि निलिमा हिरोईन होती. त्यांचे प्रेमप्रकरण प्रचंड गाजले होते. दोघेही मोठ्या कंपन्यांत बड्या पदांवर काम करत होते. त्यात निलिमांनी पाच वर्षांत साध्या सेल्स एक्झिक्युटीव्हपासून वेस्टर्न झोन हेडपर्यंत प्रगती केली होती. मुलगा शशांक पाचगणीला शिकण्यासाठी ठेवला होता. सगळे सुखनैव असताना संसाराचा ओघ भलतीकडेच वळाला. कारण सुधीरला मद्याचे व्यसन लागले होते. तो त्याच्या अक्षरशः आहारी गेला होता. त्यामुळे निलिमा बाहेर आधार शोधू लागली होती. तो तिला दुसऱ्या एका कंपनीचा सीईओ प्रीतेशच्या रुपाने मिळू लागला होता. त्याचा त्रास होऊन सुधीरचे व्यसन आणखीनच वाढले. त्याने कंपनीतील एका मित्राच्या मदतीने काही कॉलगर्लचे नंबर मिळवले होते. निलिमा प्रीतेशसोबत बाहेरगावी गेल्यावर तो त्यांना बोलावत असे. हा सारा प्रकार अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या एकटेच राहणाऱ्या उपप्राचार्य राजेंद्रना मुळीच पसंत नव्हता. आकर्षक, मादक आणि एकदम खुल्या विचारांची निलिमा प्रीतेशसोबत संबंध ठेवते. पण आपल्याशी जवळिक दाखवत नाही, हे त्यांना खटकत होते. शिवाय अपार्टमेंटसमोरच्या स्वस्तिक मेडिकल्सचा मालक रुपचंदलाही निलिमा-सुधीरमधला बेबनाव कळाला होता. त्याने एकदा निलिमाला अत्यंत कमी कपड्यात मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात एका माणसासोबत हातात हात घालून, बिनधास्त फिरताना पाहिले होते. त्यानं खातरजमा केली. तर दोघांच्या बाजूबाजूला रुम बुक होत्या. तो प्रीतेश नव्हता. तर डायमंड सोसायटीत राहणारा सुपर मून सिनेप्लेक्सचा मालक होता, असं तो त्याच्या मित्रांना खुसफुसत सांगत होता. पार्टीच्या निमित्ताने नित्यनियमाने सुधीरकडे येणाऱ्या किशोर, नवल खास मित्रांचाही निलिमावर डोळा होता. सुधीर गेला तर आपल्याला संधी आहे, असे त्यांना वाटत होते. दोन दिवसांनी पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला. तेव्हा सुधीरच्या पोटात विषारी औषधांचा अंश सापडला. आणि तोनगिरेंसमोर खुनी शोधण्याचे आव्हान उभे राहिले.  

चिरेबंदी केव्हीपीत हल्लेखोरॽ

केवळ ते शहरच नाही तर पूर्ण प्रांतात केव्हीपी शैक्षणिक संस्थेची ख्याती होती. संस्थेचे सर्वेसर्वा महादेवराव यांनी अनेक मार्गांनी वाटचाल करत हे संस्थान उभे केले होते. त्यात शेकडो प्रकारचे अभ्यासक्रम होते. अगदी गवंडीकाम, सुतारकाम शिकायचे, खादी तयार करायची, कलावंत व्हायचे तरी केव्हीपी. आणि डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, कृषी तंत्रज्ञ होण्याची इच्छा असेल तरी केव्हीपी. अशी प्रतिमा तयार झाली होती. जेवढे ज्ञानदान तेवढी फी वसुली करायचीच, असे महादेवरावांचे एकमेव सूत्र होते. त्यामुळे ३० वर्षांपूर्वी एका खोलीत डीएडच्या फक्त तीन विद्यार्थिनींवर सुरुवात झालेल्या केव्हीपीचा विस्तार पाचशे एकर जागेवर झाला होता. किमान पाच हजार मुलं-मुली दरवर्षी प्रवेश घेत होते. मेडिकल इंजिनिअरिंगची एक जागा किमान दीड कोटी रुपये मिळवून देत होती. राज्यात दीर्घकाळ सत्तेत राहणाऱ्या पक्षाशी महादेवराव निष्ठावंत होते. त्यामुळे जमीन बळकावणे, फी वसूली, प्राध्यापक-कर्मचाऱ्यांवर अन्याय यावरून काहीही आरोप झाले तरी नोटिसांपलिकडे काहीही होत नव्हते. उंची तटबंदी असलेल्या चिरेबंदी वाड्यात सगळं काही सुखनैव सुरू राहणार, अशी खात्री महादेवरावांच्या मर्जीत असलेली प्राचार्य मंडळी कायम देत असायची. खुद्द महादेवरावांनाही तसेच वाटत होते. पण त्या दिवशी रात्री ११ वाजता त्यांच्या बंगल्यावरील फोनची घंटी खणखणली. रिसीव्हर उचलताच प्राचार्य ढमालेंनी जे सांगितले ते ऐकून त्यांच्या कपाळावर किंचित घाम पसरला. तुम्ही त्यांना थांबवून ठेवा. मी पोहोचतोच, असे म्हणत ते मुलींच्या वसतीगृहापाशी पोहोचले. तेव्हा किमान एक हजार मुले-मुली उभी होती. पोलिसांच्या किमान चार व्हॅन दिसत होत्या. इन्सपेक्टर राजभोज त्यांच्यापर्यंत पाच-सात पावलांतच पोहोचले. मनात दाटलेला संताप नियंत्रणात आणत म्हणाले, सर, घटना कळाल्यावर अर्ध्या तासाने तुमच्या स्टाफने आम्हाला कळवले. याचा अर्थ काय समजायचा आम्हीॽ बरं, इथं आल्यावरही हॉस्टेलमध्ये प्रवेश नाही, असं म्हणून रोखलं गेलं. सगळा मिडिआ इथं आलाय. त्याच्यासमोर तुमचा स्टाफ अरेरावी करतोय पोलिसांशी. राजभोज यांच्याकडं रोखून पाहत महादेवरावांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि जा हॉस्टेलमध्ये असं खुणावलं. तसं पोलिस कर्मचारी आत धावले. त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील रुम क्रमांक २०३मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्मिताला स्ट्रेचरवर टाकून सरकारी हॉस्पिटलला पाठवून दिले. राजभोज आणि सबइन्सपेक्टर निर्मला काकडेंनी कसून तपासणी केली. निर्मलांनी हॉस्टेलच्या वॉर्डन, स्मिताच्या रुम पार्टनर आणि इतर मुलींचे जाब-जबाब घेतले. काहीजणींना उद्या सकाळी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. मग राजभोज, निर्मला महादेवरावांकडे पोहोचले. तोपर्यंत डॉक्टर जैस्वालांचा कॉल होता. स्मिताच्या डोक्याला खोलवर जखम झाली आहे. दोन ऑपरेशन्स करावी लागतील. किमान तीन दिवस तिला बोलता, सांगता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ते राजभोज यांनी महादेवरावांना ब्रीफ केले. आणि म्हणाले, तुम्हाला माहिती असावे किंवा नसेल तरी जे आम्हाला दिसलं, कळालं ते सांगतोय. स्मिता एकुलती एक, श्रीमंत घरची मुलगी. आर्किटेक्टच्या सेकंड इअरला. आता या वयात जे असतं ते होतं. अक्षय, धैर्यशील आणि आशिष तिच्या हात धुऊन मागे लागले होते. पण ती फक्त धैर्यशीलला जवळचा मानत होती. रहस्यकथांचा लेखक होऊ पाहणारा, किंचित बायकी वळणाचा अक्षय आणि तिच्याच वर्गात असलेला धनाढ्य आशिष तिला पसंत नव्हता. त्या तिघांमध्ये स्मितावरून कँटीनमध्ये हाणामारी झाली होती. याशिवाय डबेवाला रतनसोबत तिचं किरकोळ कारणावरून कडाक्याचं भांडण झालं होतं. छंदीफंदी तरुण अशी प्रतिमा असलेले, हॉस्टेलपासून जवळच राहणारे प्राध्यापक कार्तिक विनाकारण लगट करतायत, असे वाटल्यावर तिने लेखी तक्रारीचा इशाराही दिला होता. एकूणात तणावात असलेली स्मिता रात्री साडेदहाच्या सुमारास एकटीच गच्चीवर गेली. पावणेअकरा वाजता परतली. त्यानंतर एकजण तिच्या खोलीत शिरला. तिने प्रतिकार केल्यावर त्याने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती जबर जखमी झाली. हल्लेखोराने तिच्या डायरीतील काही पाने फाडून नेली आहेत. खोलीत वाळूचे कण दिसलेत. असं सांगून निर्मला, राजभोज निघाले. जीपमध्ये बसलेल्या निर्मला विचार करत होत्या की, स्मिताच्या गळ्यातली सोन्याची एक साखळी सापडली. दुसरी हल्लखोरानं नेली असावी काॽ आणि त्या शोधत होत्या की हॉस्टेलजवळ, कँपसमध्ये वाळूचे ढिगारे कुठंयतॽ

संहितेच्या दिशेचा सांगावा

नाटकाच्या प्रयोगासाठी तुम्ही गेलात. तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. मग रंगमंचावर नेमकं काय उभारलं गेलंय. वास्तू, स्थळ कोणते आहे, हे जसजसे प्रकाशाने रंगमंच उजळू लागतो, तसतसे दिसू लागते. म्हणजे एका अर्थाने म्हणाल तर प्रकाश योजना ही नाटकाची दृष्टीच असते. जसं एखादी अंधारी वाट कंदीलाच्या प्रकाशात दिसू लागते. तसे नाटकाच्या प्रत्येक प्रसंगात प्रकाश योजनेचे स्थान आहे. केवळ प्रसंगच नाही तर प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या किती जवळ न्यायचे, किती दूर ठेवायचे हेही प्रकाश योजनेवर अवलंबून असते. मात्र, त्यासाठी प्रकाश योजनाकाराला संहितेचा अभ्यास करण्याची आवड हवी. नाहीतर योजनाकाराच्या हातून प्रकाशाची, नाटकाची दिशा निसटून जाते, अशा शब्दांत प्रख्यात प्रकाश योजनाकार सतीश म्हस्के नाट्य जगतातील या अत्यंत महत्वाच्या पण दुर्लक्षित प्रांताबद्दल सांगतात. त्यांनी गेल्या पस्तीस वर्षांत किमान अडीच हजार हौशी, व्यावसायिक, प्रायोगिक नाटक-एकांकिकांना प्रकाश झोतात आणले आहे. राज्य हौशी, कामगार, बाल नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी अक्षरशः अनेक बक्षिसे, प्रमाणपत्रे मिळवली आहेत. अनेक सिनेमा, टीव्ही सिरीअल्ससाठी दिग्दर्शकांच्या विनंतीवरून प्रकाशरचना करूनही दिली. मराठवाड्यातील कोणत्याही शहरात मोठा इव्हेंट करायचा असेल तर मुंबई-पुण्याच्या संस्था आधी सतीश म्हस्के यांच्याकडून कितपत मदत मिळेल, याची चाचपणी करून घेतात.
आज त्यांच्याविषयी आणि प्रकाश योजना प्रांताबद्दल सांगण्याचे कारण म्हणजे दिवसेंदिवस नाट्य शिक्षणाकडे मुला-मुलींचा ओढा वाढतो आहे. नाटकांमध्ये काम करून थोडा पाया मजबूत करून घ्यायचा आणि दुसरी उडी टीव्ही मालिका, सिनेमात घ्यायची अशी त्यांची आखणी होत आहे. नाट्य विभागातील प्राध्यापकही त्यांच्याकडे याच दृष्टीने बघत असतात. त्यातले बोटावर मोजण्याइतके लेखक, दिग्दर्शक होऊ इच्छितात. बाकीच्या सर्वांना अभिनेता, अभिनेत्रीच व्हायचे असते. खरेतर त्यांच्यातील अनेकजणात एक उत्तम प्रकाशयोजनाकार, एक रंगभूषा करणारा, नेपथ्याची अप्रतिम नजर असलेला असतो. पण तंत्रज्ञ म्हणजे कमी दर्जाचा, असा भयंकर समज तमाम प्रख्यात नट-नट्यांनी एकेकाळी करून ठेवला. तो तंत्रज्ञांनी लो प्रोफाईल राहत वाढवत नेला. त्याचा परिणाम म्हणून मधल्या काळात प्रकाश योजना किंवा अन्य तांत्रिक बाबींकडे ओढा रोडावला होता. सुदैवाने टीव्ही सिरीअल्स, वेब सिरीजमुळे तो बऱ्यापैकी वाढत आहे. कारण तेथे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळत आहे.
म्हस्के यांचा प्रकाश योजनेतील प्रवेश अपघातानेच झाला. १९८५चा काळ. घरची स्थिती बिकट. आपल्याला शिक्षणात फारशी गती नाही, असे लक्षात येताच त्यांनी कामधंद्याचा शोध सुरू केला. योगायोगाने त्यांच्या एकाने मित्राने त्यावेळी प्रकाश योजनेचे साहित्य पुरवठादार प्रकाश तापी यांच्याकडे काम सुरू केले होते. लगेच पैसे मिळतील की नाही माहिती नाही. पण काम आहे, असे तो मित्र म्हणाला. आणि म्हस्के यांनी आयुष्यात पहिल्यांदा दहा-बारा किलो वजनाचा स्पॉट खांद्यावर उचलला. सेलूला ‘नटसम्राट’चा प्रयोग होता. मित्राने सांगितले त्यानुसार म्हस्केंनी ठिकठिकाणी स्पॉट लावले. डिमर्सला जोडले. आणि पूर्ण नाटक पाहिले. ते पाहताना त्यांना आपण एकदम नव्या क्षेत्रात प्रवेश केल्याची जाणिव झाली. पोटापाण्यासाठी दुसरे काही करण्याची संधी नव्हती. त्यामुळे प्रचंड मेहनत, कष्टाचे काम असले तरी प्रकाश योजनेतच चालत राहायचे, असं त्यांनी त्या क्षणाला ठरवून टाकले. सुदैवाने तो काळ एकांकिका स्पर्धांचा होता. व्यावसायिक नाटके धडाक्याने होत होती. प्रकाश तापी यांनी असंख्य स्पॉट, डीमर्स आणि एकूणच यंत्रणा धडपड्या म्हस्केंना अत्यल्प भाडेतत्वावर देऊन टाकली. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रकाश योजनेचे बादशाह अशी ओळख असलेले प्रा. डॉ. अलोक चौधरींशी म्हस्केंचा परिचय झाला. त्यांची कार्यपद्धती जवळून निरखण्याचा म्हस्केंना प्रचंड फायदा झाला. प्रकाश योजनाकार म्हणजे केवळ दिग्दर्शक म्हणतो म्हणून रंगमंचाच्या विशिष्ट भागात स्पॉट लावणे नाही. तर त्यानेही पूर्ण संहिता वाचली पाहिजे. लेखकाला काय सांगायचे आहे. कोणत्या काळाची मांडणी त्याने केलीय. जेथे प्रसंग घडतोय. तेथील वातावरणाबद्दल काही संकेत दिले आहेत का. दिले नसतील तर दिग्दर्शकाचे काय निरीक्षण आहे. त्याला रंगमंचावर किंवा पडद्यावर दृश्य कसे दिसणे अपेक्षित आहे, हे अभ्यासणे प्रकाश योजनाकाराचे काम असल्याचे म्हस्के यांना अनुभवातून कळाले. आणि मग त्यांनी कोणताही प्रयोग असो. आधी मला संहिता वाचू द्या, असा आग्रह धरला. सुरुवातीला काही दिग्दर्शकांना ते उद्दामपणाचे वाटले. पण प्रयोगांमध्ये प्रकाश योजनेलाही टाळ्या पडू लागल्या. बक्षिसे मिळू लागली. परीक्षक प्रकाश योजनाकाराला भेटण्यास सांगा, असे म्हणू लागले. तेव्हा त्यांना म्हस्केंचे वेगळेपण ठळकपणे कळाले. असाच वेगळेपणाचा ठसा उमटवण्याची मोठी संधी तरुण पिढीकडे चालून आली आहे. केवळ नाटक, सिनेमाच नव्हे तर शेकडो ठिकाणी प्रकाश योजनेची गरज भासू लागली आहे. त्याचा फायदा घ्यावा. स्वतःतील कलावंतपण ताठ मानेने सिद्ध करावे, हाच म्हस्के यांचा सांगावा आहे. 
सध्या मंदीचा काळ असला तरी तो फार काळ राहणार नाही. मनोरंजनाचे जग आणखी विस्तारत होत जाणार आहे. अफाट होणार आहे. त्यामुळे अभिनेता-अभिनेत्री किंवा लेखक म्हणून पुढे सरकता येणार नाही, असे लक्षात आल्यावर तंत्रज्ञ होण्याकडे वळा. मेहनत करा आणि यशस्वी व्हा. तेथे तुलनेने कमी स्पर्धा आहे. तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाल्याने पूर्वीएवढ्या अंगमेहनतीची गरज नाही. फक्त सादरीकरणापूर्वी मेंदूच्या पटलावर सादरीकरण पाहता आले पाहिजे. असे म्हस्के यांचे अनुभवाचे बोल आहेत. ते मनावर घेणारे स्वतःसोबत कला प्रांताचेही भले करू शकतील, याची खात्री आहे.


अमिनाची मौत

नाव आडगाव असलं तरी ते हायवे टच गाव होते. राष्ट्रीय महामार्गावरचं होतं. एका बाजूला शहर. तिन्ही बाजूंना शेती. प्रत्येक शेतात किमान एक विहीर. पिकलेला प्रत्येक दाणा चढ्या भावाने विकला जायचा. त्यामुळं गावात सुबत्ता वाढतच चालली होती. क्राईम रेट जवळजवळ नव्हताच. म्हणजे याचा अर्थ गावात भानगडी नव्हत्या, असं नव्हतं. मोटार लावणं, एकमेकांच्या शेतात घुसखोरी, मालाचा भाव ठरवणं यावरून भांडणं, हाणामाऱ्या होत होत्या. पण त्या पोलिस ठाण्यात जाणार नाहीत, याची सर्वजण काळजी घेत होते. एकेकाळी सरपंच राहिलेले जलाल खान पूर्ण गावावर नजर ठेवून होते. कोणाचं वागणं खटकलं तर त्याला ते लगेच बोलावून झाडाझडती घेत. जशी त्यांनी नुकतीच म्हाताऱ्या मैनाबीची घेतली. गावापासून काही अंतरावर झोपडीत राहणाऱ्या मैनाबीकडं दीड एकर जमीन होती. पण ती कसण्यासाठी कोणीच पुरुष माणूस नव्हतं. तिचा नवरा मरून पंचवीस-तीस वर्ष होऊन गेली होती. तिला मिरगीचे झटके येतात, असं म्हटलं जात असल्यानं कोणी नातेवाईक तिच्याकडं फिरकत नव्हतं. कोण्या पुरुषानंही तिच्याकडं कधी पाहिलं नाही. गावातल्या दर्ग्यात बसून माळ ओढत राहायची. लोक जे देतील ते घेऊन घरी पोहोचल्यावर खायचं, एवढंच तिचं काम होतं. अजून एक काम ती इमानेइतबारे करायची. ते म्हणजे तिच्या दूरच्या बहिणीची मुलगी अमिनाची काळजी घेणं. सोळा-सतरा वर्षाच्या अमिनात मैनाबीचा जीव प्रचंड अडकत चालला होता. बकऱ्या चारण्यासाठी डोंगराकडं जायचं नाही. घळीत उतरायचं नाही. पाशा खान, अकबरच्या शेताकडं जायचं नाही. असं ती निक्षून सांगायची. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अमिनाचं पाऊल घसरलं, तिला कोणी जाळ्यात ओढलं तर काय करायचं, असा विचार मैनाबीला हैराण करायचा. त्यात माजी सरपंच जलाल खाननी भर टाकली. ते म्हणत होते की, डाळीचा व्यापारी शकील पठाण अमिनाच्या पाठलागावर आहे. एकदा त्याच्या कारमधून ती शहरातही जाऊन आली आहे. मैनाबीनं असंही पाहिलं होतं की, पोलिस हवालदार कय्युमच्या तिच्याभोवती चकरा वाढल्या होत्या. पाशा खान, अकबरची दोन-दोन लग्नं झाली होती. तरीही ते तिसऱ्या लग्नासाठी उतावळे झाले होते. बऱ्याबोलानं पोरगी पटली नाही तर तिला उचलून नेऊ, असंही दोघंही पारावरल्या गप्पांत सांगत. त्यामुळं दोघांच्या बायका अमीनाला पाहताच बोटं मोडत. तिची विल्हेवाट लावण्याची भाषा करत. कधी ती  एकटी सापडते का, याचा शोध घेत. दुसरीकडं जलाल खानचा नातू शाहजादही आपल्या भाचीभोवती घिरट्या घालतोय. त्याला जलाल काहीच समज देत नाही, असं मैनाबीला कळत होतं. तिनं अमिनाला दहादा विचारूनही पाहिलं. पण यापैकी कोणाशीच लग्न करायचं नाही. गावात खूपच  बदनामी झालीय. मुंबईला जाते नशिब काढायला, असं सांगत होती. या पोरीचं काही बरंवाईट झालं तर आपण काय  करायचं, असं  मैनाबीला गेल्या महिनाभरापासून वाटू लागलं होतं. आणि झालंही तसंच. अमिनाचा मृतदेह गावाजवळच्या डोंगरातील एका झाडाला लटकला होता. काही लोक म्हणत होते बदनामीला कंटाळून तिनं आत्महत्या केली. मैनाबीलाही तसंच एक क्षण वाटलं. पण पोलिस अधिकारी सय्यद यांना मृतदेहापासून काही अंतरावर वायरचा लांबलचक तुकडा सापडला. बकरीच्या गळ्यात अशा वायर बांधल्या जातात, अशी माहिती त्यांना मिळाली. पण अशी वायर तर विहीरीतल्या मोटारीत, डाळीचे पोते बांधण्यासाठी वापरले जाते. घरात, अगदी पोलिस ठाण्यातही अशी वायर असते, असं मनाशीच म्हणत त्यांनी जीप इलेक्ट्रिक साहित्य विक्रेत्याच्या भल्यामोठ्या दुकानासमोर उभी केली. काहीवेळातच त्यांना खुनी कोण असावा, हे लक्षात आलं.  
x