Friday 25 December 2015

देह देवदान


देह देवदान 
-- १ --

अजगराच्या आतड्यासारखी पसरलेली अंधारी बोळ तिच्या अगदी सरावाची झाली होती. कोणी रुमालाने बांधून डोळे झाकले तरी ती सहज बोळ पार करू शकली असती. 
पंधरा-वीस हात लांबीची बोळ संपली की धुरकट झालेल्या, झिजलेल्या लाकडी पायऱ्या. प्रत्येक पायरीवरील पोत्याची पायपुसणी. 
नाव प्रिन्स पॅलेस असलं तरी तिथं ना कधी प्रिन्स येई ना इथल्या खोल्या पॅलेससारख्या. 
इथं येणारे-जाणारे लोकच वेगळे. प्रत्येकाचे चेहरे वासनांनी रंगलेले. वखवखलेले, पेटलेले, भुकेले लोक येथे दुपारपासून येतात आणि पेटलेल्या भट्टीत लाकडानं स्वतला झोकून द्यावं तसं भडभडून पडतात. 
रेल्वेस्टेशनच्या पाठीलाच लागून पॅलेसची भिंत. दररोजच्या वीस-पंचवीस रेल्वेगाड्या, पाचपन्नास मालगाड्या धडधडून जातात. तेव्हा पॅलेससोबतची दहाबारा हॉटेलं, खानावळी दमेकऱ्यासारख्या खोकतात. त्याचीही तिला सवय झालीय.  पण ती पहिल्यांदा गिऱ्हाईकासोबत आली तेव्हा फार घाबरली होती. त्यात तो कॉलेजचा पोरगा होता. तिच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी लहान. तेव्हा थेट तिसऱ्या मजल्यावर तिला रेल्वेचा हादरा जाणवला होता. तोही दचकला होता. पण हळूहळू भीती गेली. आता तर हादरे नसले तर तिला मजाच येत नव्हती.
गेल्या काही वर्षांपासून ती न चुकता येत होती इथं. तिची चप्पल उंच टाचेची. अणकुचीदार टोकाची. नेहमीच नव्या फॅशनच्या चपला घालायची आवड. पायपुसण्यातला चिखल कधी तिच्या पायाला लागला नाही. अंधाऱ्या बोळीत कधी पाय लडखडले नाही तिचे. फक्त चपलेच्या टाचाचे टोक निमुळते होत गेले आणि ब्लाऊजच्या पाठीचा, गळ्याचा आकार वाढत गेला.
प्रिन्स पॅलेसवर कितीही पटवून आणलं असलं तरी सोबतचा माणूस नाराज होतो बोळीत पाऊल ठेवताना. नवखा असेल तर चीड-चीड करतो तो. समजता समजत नाही. मग कमरेत हात घालून,  एखादवेळी थेट त्याच्या खिशातून खाली स्पर्श करत आणावं लागतं त्याला. एखादा तर पैशातही कमी करायला बघतो. तीदेखील काही कमी नाही म्हणा. गोड बोलून, गळ्यात हात टाकून, मुरका मारून पैसा काढून घेण्याची टॅक्ट जमवून घेतली आहे तिनं. गिऱ्हाईक बोळीत आलं की त्याच्याशी लगट करत त्याला गरम करायचं, ते अभ्यासासारखं पाठ केलं होतं. 
अलीकडं या पाठांतराचीही तिला कंटाळा आलाय. तेच लोक. तेच चेहरे. त्याच अंधारलेल्या खोल्या. काळपट पडदे. हिरवे, पिवळे दिवे. तोच धंदा. थोडासा पैसा पदरात पाडून घेण्यासाठी दिवसरात्र परेशानी. अधून-मधून पोलिस आहेतच. त्यांच्यासाठी कधी पैसे, तर कधी रात्र काळी. पोलिस स्टेशनच्याच खोलीत. सुरुवातीला झाला त्रास; पण आता सगळंच अंगवळणी पडलंय.
घरी दोनशे आणि खर्चायला शंभर रुपये मिळवायचे एवढंच डोक्यात ठेवून घराबाहेर पडते ती. पूर्वीची गोष्ट वेगळी होती तिची. हजार-दीड हजार, अगदी दोन हजार पण मिळायचे. नोटांच्या गादीवरच झोपवायचे काही जण. म्हणून तर दोन खोल्यांचं घर झालं. पोराला बऱ्यापैकी शाळेत टाकता आलं. बापाचंं दवाखान्याचं एवढं मोठं बिल एकाच फटक्यात मोकळं झालं. 
त्या काळात ती कारमधूनच फिरायची. कधी मालकाची, तर कधी ट्रॅव्हल्सची. त्या वेळी तिला वाटायचं की हे असंच सुरू राहील. पैसा कमी होऊन होऊन किती कमी होईल. हजाराऐवजी पाचशे मिळतील. दोनाच्या ऐवजी चार जण गाठावे लागतील.
पण तिला वाटलं तसं कधीच तिच्या आयुष्यात घडलं नाही. अगदी दहावीत भेटलेल्या वसंतापासून ते तीन वर्षांपूर्वी कुंकू पुसलं जाण्यापर्यंत.
बरा चालला होता संसार. रिक्षावरून टेंपो घेतला होता प्रकाशनं. आपल्यालाही घराबाहेर फार पडायची गरज राहिली नव्हती. त्यानं अटच घातली होती ना लग्नापूर्वी. तरीही कधी पैशाची नड पडली तर जावंच लागायचं; पण ते आपल्या मनावर होतं. पैसा मनासारखा मिळत असला तरच जायचो. तेही देवाला मान्य झालं नाही. टेंपो उडवून टाकला ट्रकनं.
सगळं आठवायला तिला वेळ नव्हता. इच्छाही नव्हती. तिनं मागं घडून गेलेल्या सगळ्या काळ्याकुट्ट घटनांचं गाठोडं बांधलं अन् थुंकीची लांबलचक पिचकारी सोडली.
तेवढ्यात मागून आवाज आलाच गुल्ल्याचा.
छाया... ओ छाया चहा घ्यायची का? 
रोज काय विचारतोस. ठेव काउंटरवर. 
वैतागलेल्या आवाजात तिनं उत्तर दिलं. तिला त्याच्याशी बोलण्याचा कंटाळा आला होता. पण प्रिन्स पॅलेसमध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना-घडामोडींची माहिती तिला गुल्ल्याकडूनच कळणार होती. त्यामुळं त्याला टाळणं कठीण होतं. साडेअकरा वाजले तरी सेठ अजून काउंटरवर आला नव्हता. गेल्या चार-पाच दिवसांपासून भेटलाच नव्हता. तिची नेहमीची तिसऱ्या मजल्यावरची चांगली खोली तिला अलीकडं मिळत नव्हती. त्या मागं नेमकं काय कारण हे तिला गुल्ल्याच सांगू शकत होता.
म्हणून चहाचा ग्लास ठेवताच तिनं त्याच्यावर नजर रोखली. पदर खांद्यावरून पूर्ण घसरू देत डावा डोळा किंचित बारीक करत म्हणाली, 
‘काय रे, सेठ कुठंय चार-पाच दिवसांपासून. रोज मी त्याला विचारून जातीय. मोबाइलही उचलत नाही माझा. पैसे पण दिले नाहीत माझ्या वाट्याचे. काय गावाला गेलाय की काय.’
मजबूत हाडापेराचा, किंचित बसकं नाक असलेला गुल्ल्या चेहऱ्यावरची रेषही न हलवता तिच्या समोरच्या सोफ्यात रेलला. ‘स्साली चार वर्षांपूर्वी अंगाखाली आली असती तर जिंदगीत तहलका झाला असता. आता पार उतरलीय. शंभर-दोनशेचं गिऱ्हाईक मिळवण्यासाठी रेल्वेस्टेशन, बसस्टँडवर फिरावं लागतंय हिला.’
हा आपल्याशीच एेश करायला बघतोय, हे त्याच्या नजरेवरून लक्षात आलं; पण दुसरा पर्याय पण नव्हता. ती उठून सरळ त्याच्या बाजूला जाऊन बसली. अगदी चिकटून. नवीन पोरींची चटक लागलेल्या गुल्ल्याला त्या चाळीस बेचाळीस पावसाळे-उन्हाळे ओलांडून गेलेल्या शरीरात रस उरला नव्हता. तो पटकन उठत म्हणाला,
‘चला, मला खोल्या आवरायच्यात. तुझ्या बाजूला बसलो तर कामंच होणार नाहीत.’
त्याच्या अशा उठून जाण्यानं छायाचं डोकं भडकलं होतं.
चाळिशी ओलांडली म्हणून हॉटेलमधल्या स्वयंपाक्यानं, आपलीच भाड खाणाऱ्यानं आपल्याला झटकून टाकावं? चेहऱ्यावर सुरकुत्या नाहीत आपल्या. पोटावर थोडं टायर वाढलंय. डोळ्याखाली काळी रेष दिसतीय. पण फिगर काही एवढी कामातून गेलेली नाही. बेडवर तिघांना भारी आपण. आणि हा गुल्ल्या तरी कोण? पोळ्या-भाज्या, चिकन-मटण करणारा. 
सेठसोबत वीस वर्षांपासून काम करतोय, या पलीकडं काय लायकी आहे त्याची. नुसता लाळ घोटत होता. फुकटात पाहिजे होतं त्याला सगळं. तरीही सगळा अपमान गिळत ती पुन्हा त्याच्याजवळ गेली. आवाजात आणखी गोडवा आणत म्हणाली
ए, राजा...सेठ कुठं गेलाय. माझ्या नोटा ठेवल्यात का त्यानं. चल रूमची चावी तरी देऊन टाक ना. मी तयार होते.
गुल्ल्यानं किचन बॉक्समध्ये लावलेली किल्ली काढून तिच्या अंगावर भिरकावली. 
चांगली तयार होऊन ये. आज तीन तरी गिऱ्हाईकं झाली पाहिजेत.
आँ, माझ्या गिऱ्हाईकांची तुला काय काळजी. तीन मिळतील नाही तर दहा.
दहा? तुला?
का. केली नाहीत का मी? 
ए...छाया...मला नको सांगू हां. आणलेली दहा गिऱ्हाईकं तू कशी वाटी लावली ते. दारूच्या नशेतल्या पोरांना तर काय झालं तेच कळत नव्हतं. फक्त ब्लाऊज उतरवताच गळून जात होती पोरं...
ऐ धंद्यात बेइमानी केली नाही हां कधी. तुझा विश्वास नाहीये माझ्यावर...
तुझ्यावर? वीस वर्षांपासून धंद्यात असलेल्या बाईवर? एकेकाळी होता तुझा धंदा छाया. गिऱ्हाईक तुला शोधत फिरत होतं. मुंबई, पुण्याहून येऊन घेऊन जायचे तुला. राजस्थान, दिल्लीचे सेठ लोक माणसं पाठवायचे. एसी कारनं, रेल्वे फर्स्ट क्लासनं  गेलीस तू त्या वेळी. पण आता तसं राहिलं नाहीये. एक्सपिरिअन्स एवढा झालाय तुझ्याकडं की तू आँटी व्हायला पाहिजे. पण तूच अजून तोंड मारत फिरते इकडं तिकडं. कॉलेजची पोरं पकडतेस. त्यांच्याकडून काय पैसे मिळणार. रात्रभराचा मोठा कस्टमर पाहिजे. तुझी, तुझ्या धगड्याची अन् पोराची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. कडवं प्रवचन आहे गुल्ला महाराजाचं. वाईट दिवस येण्याच्या आधीच शहाणी होऊन जा. पोरा-सोरांपेक्षा जरा म्हातारे, कारवाले पकड. पैसा जास्त अन् शरीरालाही त्रास कमी.
असे अपमानाचे अनेक क्षण तिने पचवले होते. पोलिस ठाण्यात दोन रात्री ती नागडीच बसली होती. एकदा हैदराबादला तर इन्सपेक्टरीणबाईनंच मजा लुटली होती. नंतर मारहाण करून हैदराबादबाहेर आणून सोडलं होतं. तिथून दहा किलोमीटर चालत येऊन मग ती एका स्टॉलवाल्यासोबत रात्र घालवून परतली होती. त्या वेळी ती इन्सपेक्टरीण तोडक्या मोडक्या हिंदीत हेच तर सांगत होती. तिच्यापेक्षा गुल्ल्याचं बोलणं अधिक खुपणारं, दुखावणारं होतं. त्यात खरेपणा होता. गिऱ्हाईक मिळवता मिळवता नाकीनाऊ येत होतं तिला. दोन दिवसांपासून एकही जण फिरकला नव्हता. बसस्टँड, रेल्वे स्टेशनला चार-पाच चकरा झाल्या. कॉलेजेसपाशी घुटमळून पाहिलं. एक फालतू सिनेमाही पाहिला. पण नाहीच. सगळ्यांना कॉलेजच्या पोरीच पाहिजे होत्या. अन् कॉलेजच्या पोरांना कमी पैशात ट्रिपल सीट चालायचं होतं. 
एक जबरदस्त सणक गेली तिच्या अंगातून. समोरच्या भिंतीवर लावलेल्या गणपती, लक्ष्मी, तिरुपतीच्या फ्रेमकडं तिनं त्वेषानं कटाक्ष टाकला. उद्या शांतारामला, पोराला जेवायला मिळालं नाही तर माझ्या घरात काही काम नाही तुमचं, तिनं देवांना बजावलं. अन् सारं अवसान एकत्र करत खोलीचं कुलूप उघडलं.
शॉवरचं थंडगार पाणी अंगावर पडताच छायाच्या अंगात जणू नवं जीवन संचारलं. चेहऱ्यावर हास्य उमटलं. ओलेत्या अंगानंच ती बाहेर आली. आरशासमोर उभी राहून स्वत:ला न्याहाळू लागली. डोळ्याखाली बारीक काळसर रेष आली होती. पर्समधून लाली काढून तिनं रेषा पुसून टाकल्या. निळेशार लिपस्टिक ओठांना चोपडलं. डोळ्यांमध्ये भरपूर काजळ भरले. मग स्वत:लाच एक छानसा डोळाही घातला. केस विंचरून छान अंबाडा बांधला. मग कपाटातला छानसा काळपट हिरव्या रंगाचा, भल्या मोठ्या पाठीचा स्लीव्हलेस ड्रेस बाहेर काढून अंगावर चढवला. गॉगल कपाळावर खोचला. त्याच झोकात किल्ली गुल्ल्याच्या अंगावर फेकली आणि  त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत तिनं पायऱ्या उतरल्या.

-- २ --

बसस्टँडवर गिऱ्हाईक मिळणारच. तिला पक्की खात्री होती. पण गुल्ल्याचं बोलणं घुमत होतं. मोठं पाकीट पाहिजे. बसस्टँडवर सगळे खेडेगावातले. पन्नास- शंभर रुपये जास्त देतील. गुल्ल्या स्साला. हरामी. छाया...छाया करून अंगचटीला येतो. मांडीवर बसवायला बघतो. पण अजून त्याला मी कळालेलीच नाही. माझं नाव छाया नाही. प्रभा आहे. प्रभावती दिलीप गोंदेकर. हेही त्याला २० वर्षांत कळालं नाही. पण या धंद्यात नावाला काय अर्थय म्हणा. छाया काय, माया काय, डॉली, शबनम, पारु, रेखा, सुनीता...सगळ्यांचं नशीब एकच. 
तिच्या कपाळावर चिंतेचं जाळं पुन्हा तयार झालं. सेठ आता आला असेल हॉटेलवर. गुल्ल्या त्याचे कान भरत असंल. पैसा पाहिजे सेठला. सेठचंही बरोबर होतं. त्याला पोलिस, नगरसेवक, फुटकळ कार्यकर्ते सगळ्यांनाच पैसा द्यावा लागत होता. एखादा अगदीच ऐकत नसला तर पैशांनी तर तो एखादी पोरगी पाठवून देतो त्याच्याकडं. छायालाही दोन-तीन वेळा जावं लागलंच होतं. पण मजा आली. पैसाही मिळाला. रात्रभर परेशान करणाऱ्या साहेबाला तिनं असंच पाठलाग करून एका हॉटेलात गाठलं. तो त्याच्या साहेब अन् मित्रासोबत होता. अलीकडच्या टेबलावर बसून कचकन डोळा मारला तर पंटरमार्फत पाचशेची नोट पाठवली होती त्यानं.
आता फार मोठा माणूस झालाय तो. तसा गठायला पाहिजे पुन्हा  एकदा. म्हातारपणी त्याची साथ मिळू शकते. पण त्यालाही बायका-पोरं आहेत. तो कशाला सांभाळेल आपल्याला. देव...तिच्या डोळ्यासमोरून रांगेने साऱ्या देवांच्या मूर्ती येऊन गेल्या. तशी ती पचकन थुंकली. 
चटचट पायऱ्या चढून बसस्टँडच्या भल्या मोठ्या बाजारात शिरली. ते हजारो लोकांनी भरलं होतं. दुपारचे दोन-अडीच वाजले होते. आपल्याकडं कोण कोण पाहतंय, हे कोपऱ्यातून न्याहाळत तिनं चाल मंदावली. चेहऱ्यावर हसू पांघरत ती मुद्दाम दोन- चार जणांच्या अंगाला अंग घासून गेली. पण आज काय झालं होतं कुणास ठाऊक. कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही. दहा-पंधरा मिनिटांत तिनं सगळे प्लॅटफॉर्म  धुंडाळले. पुस्तकाच्या दुकानासमोर घुटमळली. कँटीनमध्ये बसून एक कप चहा पिऊन पाहिला. तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या काही गावरान खेडूतांना डोळ्यांनी खुणावून पाहिलं. पण उपयोग होईना. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिला हाच अनुभव येत होता. आता इथं थांबून फार वेळ जाईल, हे तिच्या लक्षात आलं. मग तिने तिच्या खात्रीच्या हॉटेलकडं नजर टाकली. दोन-चार जण बाहेर उभे होते. पण ते तिला भरवशाचे वाटले नाहीत. शिवाय त्यांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या होत्या. म्हणजे त्यांना बाहेरगावी जायचे असणार. तासभर थांबायची अशांची तयारी नसते, हे अनुभवावरून तिला माहिती होते. 
म्हणून ती थेट हॉटेलात शिरली. काउंटरवर बसलेल्या बाबा पठाणला आदाब करून थेट कोपऱ्यातील खास टेबलावर तिने पर्स फेकली. बेसिनपाशी जाऊन नळ सोडला. कोणत्या टेबलवर कोण बसलंय, ते आरशातून मागे पाहत न्याहाळून घेतलं. मग पर्समधून रुमाल काढला. पाणी पुसले. पुसता पुसता चौथ्या नंबरच्या टेबलावर माणसाकडे तीक्ष्णपणे पाहून एक डोळा बारीकही केला. काही क्षण तिने त्याच्या प्रतिसादाची वाट पाहिली. तो तिच्याकडे रोखून पाहतच होता. निम्मे काम झाले होते. तो बऱ्यापैकी पैसेवाला दिसत होता. दिसायला पण ठीकठाक होता. हा हातातून सुटला तर...विचारानेच तिचे मन थरथरले. मग तिने फारसा वेळ घालवला नाही. टेबलावर वसून तिने मुद्दाम वेटरला मोठ्याने एक गोल्डन चहा अशी ऑर्डर दिली. ते देत असताना गिऱ्हाईकाकडे मंदसे स्मित फेकले. तसा तो घायाळ झाला. टक लावून तिच्याकडे पाहू लागला. पाच मिनिटांत पुढचा व्यवहार पक्का. याला रिक्षातूनच घेऊन जाऊन पॅलेसवर, असेही तिने ठरवून घेतले. तेवढ्यात तो उठला. काउंटरपाशी पोहोचला. तिला खुणावतच त्याने तिच्या चहाचे पैसे देऊन टाकले. तशी ती झटपट उठली. पर्स उचलून घेत त्याच्यापाशी जाऊन पोहोचली. तसा त्याचा चेहरा तिला अगदी स्पष्ट दिसला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पूर्वीची ओळख असल्यासारखी. इतके गिऱ्हाईक पाहिले. त्यात कुणाचाही चेहरा निरखून पाहण्याच्या भानगडीत ती कधी पडली नव्हती. पण तरीही  पाहिल्यासारखे वाटत होते. या अवघडलेल्या स्थितीतून त्यानेच तिची सुटका केली. 
मी सुरेश...सुरेश भाबळे...तुमच्या पलीकडं तीन गल्ल्या सोडून राहतो. प्रकाशसोबत आलो होतो मी तीन वर्षांपूर्वी तुमच्या घरी. 
हं...हरामी...तरीही अधाशासारखा बघत होता. आपल्याला दुरून लक्षातच आलं नाही. आणि आता याला कसं इथूनच कटवायचं. ती मनाशी बोलता बोलता त्याच्याशी लपवाछपवी करत बोलू लागली. एक तर हा ओळखीचा निघाला. हातातून निसटला. पंधरा-वीस मिनटं वाया गेली. नवा माणूस शोधावा लागणार. 
हे इथं बसस्टँडवर आले होते. माझ्या मावशीची मुलगी होती ना धुळ्याला. तिला सोडायसाठी आले होते. बसवलं तिला बसमध्ये आणि तहान लागली म्हणून आले होते इथे तर इथेच चहा पिला. चला, निघते मी.
काउंटरवर बसलेल्या बाबा पठाणलाही गडबड कळली; पण सुरेशचं समाधान झालं नव्हतं.
धुळ्याला कुठंय आता बस.
हो. आहे तर. मी आताच बसवलं तिला.
मी एसटीमध्येच आहे नोकरीला. धुळ्याच्या बसला अजून चाळीस मिनिटं आहेत. 
ती पूर्णपणे फसली होती. संतापाने डोक्याची शीर उडत होती. त्यात संध्याकाळच्या जेवणाची, पोराच्या फीसची काळजी. आता याला काय सांगावे. कसं सुटावे, हे तिला सुचेना. तेवढ्यात बाबा मदतीला आला धाऊन. 
अरे साब, मॅडमने बसस्टँड के बाहरही छोड दिया होगा, नही तो टॅक्सी में बिठाया होगा...
हा हा..टॅक्सीतच बसवलं मी. बससारखी होती ती. चला येते मी.
काही मिनिटांतच दोन जण गळाला लागले. मग तिनं थेट गळ्यापर्यंत हात घालत घाम पुसून काढला. मंगळसूत्र बाहेर काढून त्याच्याशी चाळा करत ते पुन्हा आत टाकलं. तसा समोरच्या माणसाचा डोळा चमकला. गठला. पैसेवालाही दिसतोय. दोन हजारापासून सुरुवात करून हजारावर निपटू, असा विचार करत तिनं त्याला मैदानावर साचलेल्या बाभळीच्या झाडाकडं येण्याची खूण केली. ते धंदेवाल्या बायकांसाठी सुरक्षित ठिकाण होतं. 
चलायचं का...
बाभळीच्या झाडामागं...
नाही. खास अॅरेजमेंट आहे.
पण माल गरम आहे का.
आहे तर तुझ्यासमोरच उभा आहे की...
तू...? गरम? तुला गॅसवर ठेवलं तरी गरम व्हायची नाहीस. मलाच थंड करून टाकशील. जा दुसरी एखादी घेऊन ये. 
असं इथं उभ्या उभ्या...कुणाचं थंड गरम कळतं का. त्याच्यासाठी बेडरूममध्ये मऊशार पलंगावर पडायला पाहिजे.
तुझ्या घरी जायचं का?
घरी...माझ्या...कशाला. घरापेक्षा भारी व्यवस्था आहे.  
मगाशी मंगळसूत्र खालून वर काढलं...पुन्हा आत टाकलं...तर...
तर..काय
मला वाटलं तुझा नवरा नाही घरी...असं सांगितलं तू..
आँ...आयला मजाक करतो यार तू....बरं चल...इथं हॉटेलंय.
हॉटेल...नको...हॉटेलात नाही परवडत
अरे. फक्त दोन हजार..एकदम फूल एैश. तू जशी म्हणशील तशी.
दोन हजार. जा दुसरीकडं बघ कुणाला तरी.
हॉटेल एकदम खासंय.
त्याला काय चाटायचंय का. मला काय घरी गादीवर झोपता येत नाही का रात्रभर?
दीड हजार...बाराशे...एकदम...फायनल
ऐ, एवढ्यात तर कॉलेजच्या कवळ्या पोरी मिळतात. 
मग त्यांना घेऊन गावाबाहेर जावं लागतं. हॉटेलचा खर्च.
अरे पण मजा. तुझ्यात अन् तिच्यात फरक किती...
गिऱ्हाईकाशी शब्दाचा खेळ खेळता खेळता छाया थकून गेली. घरातली रिकामी भांडी डोळ्यासमोर नाचू लागली होती. गांजाच्या नशेत शांताराम अंगावर पट्ट्याचे वार करतोय, असंही तिच्या डोळ्यासमोर दिसून गेलं. काहीही झालं तरी आज एक गिऱ्हाईक झालंच पाहिजे, असं तिनं मनाला बजावलं. पाचशे रुपये पाहिजेतच. 
चेहऱ्यावर थोडेसे आणखी मादक भाव आणत, मंगळसूत्राशी खेळत, केसाची लांबसर बट आणखी उडवत तिने गिऱ्हाईकाशी आणखी चाळा सुरू केला. 
बघा, लास्ट सांगते. पाचशे रुपये. त्याच्यापेक्षा कमी पाहायची असंल तर झोपडपट्टीत जा समोरच्या. 
आम्ही कशाला जावं झोपडपट्टीत. मला तर तूच पाहिजे. 
मग चल की लवकर. कशाला वेळ घालवतो.
माझ्याकडं फक्त शंभराची नोट आहे. त्याने खिशात हात घालून नोट तिच्यासमोर नाचवली. तो तिच्याकडे थंडगार डोळ्यांनी पाहू लागला. तशी छायाच्या डोक्यात जोराची सणक भरली. 
एवढं सोन्यासारखं शरीर फक्त शंभर रुपयांत. आतापर्यंत एवढी खालची वेळ कधी आली नव्हती. हरामी स्साला. बाईच्या शरीराची एवढी  कमी किंमत लावतोय. तिनं तटकन त्याच्याकडं पाठ फिरवली. तडातडा चालत शंभर-दीडशे फूट पुढं गेली. एकाएकी तिला वाटलं की तो पाठीमागून चालत येतोय.  तसा तिनं वेग थोडासा मंद केला. अंगावरचा पदर पूर्णपणे खाली पाडला. आणि तो उचलण्याचा मादक अंदाज घेत डोळ्याच्या  कोपऱ्यातून मागे पाहिलं तर...तर तिथं कुणीच नव्हतं. प्रिन्सवर तिच्यासोबत धंदा करणाऱ्या रेश्मा, सलमा, यास्मीन, मंदा, गौरी मात्र झाडाखाली बसून गप्पा करत गिऱ्हाईकं शोधत होत्या. इशारे करीत हसत खिदळत होत्या. ते पाहून छायाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आपल्या हातून गिऱ्हाईक गेल्याच्याच आनंदात हसतायत या. असं म्हणत तिनं एक बारीक दगड उचलला आणि त्यांच्या दिशेने भिरकावला. तशा त्या अजूनच खिदळू लागल्या. त्या साऱ्या छायापेक्षा पाच-सात वर्षांनी लहान होत्या. लग्नं झाली असली तरी एकीलाही पोर-बाळ नव्हतं. संसाराचा फारसा ताप नव्हता.
मंदा ओरडली-
छाया, एखादा म्हातारा पाहा. त्याच्याकडूनच मिळतील शंभर-दोनशे.
रेश्मानं पण आवाज चढवला.
तुला आता इकडं धंदा नाही. एखाद्या कॉलनीत जा. तिथल्या बंगल्यात राहणाऱ्या म्हाताऱ्यांना लागत असती बाई. ती बरकतपुऱ्यातली काळी सुलू गेली होती. दोन रात्रीचे  हजार रुपये मिळाले. अन् म्हाताऱ्यानं केलं तर काहीच नाही. कपडे काढले की ढँ...झाला. 
रेश्मानं खरं तर हा किस्सा तिसऱ्यांदा सांगितला होता, तरीही छायाला चिडवण्यासाठी त्या जोरजोरात खिदळल्या. 
आता तिथं थांबणं शक्यच नव्हतं. एक प्रदीर्घ श्वास घेऊन छाया पुढं निघाली. का आपल्या नशिबी हे रांडेचं जगणं आलं. का नाही आपल्याला लहानपणी चांगले आई-बाप मिळाले. का नाही आपले आई-बाप आपण किमान तरुण होईपर्यंत जगले. का त्यांचं घर झोपडपट्टीतच होतं. का त्यांनी आपल्याला शाळेत शिकू दिलं नाही. आणि आपल्याला काकूकडे पाठवून आईनं स्वतला का पेटवून घेतलं. बापानं आपल्याला शेजारच्या पोस्टातल्या शेळकेकडे पाठवून बाहेरून दरवाजा बंद करून घेतला. आपण  पण का शेळकेला अंगचटीला येऊ  दिलं. का त्याला चपलांनी बडवलं नाही. पोलिसांना का सांगितलं नाही. पोलिस बापाला पकडायला आले तेव्हा देवाची शप्पथ घेऊन खोटं का बोललो. बापानं पलंगाखाली गांजाची पिशवी लपवल्याचं पाहूनही ती शेजारच्या प्रकाशनंच ठेवल्याचा आरडाओरडा बापाच्या सांगण्यावरून का केला. एकसाथ शेकडो प्रश्न वादळासारखे छायाभोवती फिरू लागले. त्याचा वेग एवढा प्रचंड होता. की वाऱ्याच्या झोतानं आपण उडून चालल्याचा भास तिला झाला. त्यामुळे ती थोडी भानावरही आली. तेव्हा सूर्य तिरपा होऊन तळपत होता. एकदम कडक. तिला भोवळल्यासारखं झालं. घशाला कोरड पडली होती. दुपारी तीनपर्यंत काहीच कमाई नाही. पुन्हा डोक्यात तोच विचार. कुठून आणायचं कुणाला. एखादा कॉलेजातला पोरगाही दिसेना. कुणी म्हातारा नजरेला पडेना. आज जणू काय सगळे कामपिपासू पुरूष संपावर गेले होते. कुणी तिच्याकडं ढुंकूनही पाहायला तयार नव्हतं.  


-- ३ --

तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरून एक कार गल्लीत वळाली. चालविणाऱ्यानं हलकेच काच खाली घेतली. बोटभरच. त्यातून माणिकचंदची रिकामी पुडी बारीक, चपटी करून कॅरमच्या स्ट्रायकरसारखी बाहेर भिरकावली आणि काच पुन्हा चढवली. तेवढ्या चार-पाच सेकंदांत छायानं त्याला आणि त्यानं छायाला न्याहाळून घेतलं. सकाळपासून कार चालवत असल्यानं थकलेले त्याचे डोळे चमकले. छायानं डोळा थोडासा बारीक केला आणि त्याच्याकडे टोकदारपणे पाहिलं. त्याला खूण पटली.
त्याला वाटलं इथंच कार थांबवावी. या बाईला गाडीत बसवावं आणि कारमध्येच शरीर शांत करून घ्यावे. तेवढ्यात बायकोचा चेहरा समोर आला. आधी मंदिरात जाऊन दर्शन घ्या...मग चहा, नाष्टा, जेवण करा, असं तिनं दोन-तीन वेळा बजावलं होतं. जागृत महादेव मंदिरात जाऊन प्रसाद घेऊन या. त्यामुळं आधी दर्शन करून, नारळ फोडायचं नंतर या बाईला शोधून काढू, असं मनाशी बोलत त्यानं झर्रकन गाडी मंदिराकडे वळवली. तत्पूर्वी तिचा चेहरा साइड ग्लासमधून न्याहाळून घेतला. तिचा आक्रमक, रापलेला चेहरा, कपाळावरचं दाट कुंकू, मुद्दाम सोडलेली केसाची बट, उघड्या पाठीच्या ब्लाऊजमधून दिसणारं गच्च शरीर त्यानं डोळ्यात भरून घेतलं.
मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. त्यामुळे सदानंदनं मंदिराच्या खूप अलीकडं कार लावली. पायी चालत तो निघाला. तेव्हा भिकाऱ्याच्या पोरांनी त्याला गराडा घातला. त्यांना वाटलं हा कार मालकच आहे. बोंबलत सुटलेल्या पोट्यांना हाकलून लावत तो मंदिरात पोहोचला. तेव्हा त्याचं लक्ष तिच्या येण्याकडंच होतं. त्यानं हलकेच डोळ्याच्या कोपऱ्यातून नजर फेकली तेव्हा ती झपझप पावले टाकत येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. साहेबाला रात्री नऊ वाजता हॉटेलावर घ्यायला जायचे आहे. तोपर्यंत सगळं साध्य होईल. असा विचार त्याने केला. खिशातील पाकीट काढून पाचशेची नोट आहे की नाही, याची खात्री करून घेतली. मनाशी खुदकन हसत तो मंदिरात वळाला.  झपझप पावलं टाकीत छाया मंदिराच्या रस्त्यावर निघाली. आज मंगळवार. देवीचा वार. या महादेव मंदिराच्या जवळच रेणुकादेवीचं मंदिर होते. लग्न झाल्यावर ती आणि शांताराम दोन-तीन वेळा आले होते दर्शनाला. पुढं या धंद्यात पडल्यावर सगळंच संपत गेलं. पापात बुडालेलं शरीर घेऊन देवीपुढे कसं जायचं असाच प्रश्न पडत होता तिला. हळूहळू देवीचा आणि त्या प्रश्नाचाही विसर पडत गेला. 
आज महादेव मंदिराकडे निघाल्यावरही तो प्रश्न पुन्हा तिच्यासमोर आला. अनेक पुरुषाशी संग करून बाटलेलं आपलं शरीर. पैशासाठी धंदा करत असलो तरी कधी-कधी आपणही तीन- चार जणांशी मनापासून रत झालोच होतो ना, याचीही तिला आठवण झाली. आपण शीलभ्रष्ट, शरीर भ्रष्ट, मन भ्रष्ट, विचार भ्रष्ट. आणि आता तर आपण गिऱ्हाईकाला खेचून आणण्यासाठी मंदिरातच चाललो आहोत. काय हे...किती मर्यादा सोडली आपण. काही लाजच नाही आपल्याला. चक्क मंदिरात जाऊन त्या मोटारकारवाल्याला इशारा करायचे म्हणजे...आपली हद्दच झाली. नाही नाही...ते हातातून गेलं तरी चालंल. दुसरा कुणीतरी शोधू पण मंदीरात रंडीबाजी नाही. धंदा नाही करायचा. मंदिरातच जायचं नाही...तिनं ठरवलं...
तसं एक छोटंसं पोरगं रडत रडत तिच्यासमोरून पळत गेलं आणि मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या दाट झाडीत नाहीसं झालं. छायाच्या मनात कालवाकालव सुरू झाली. अरुणही याच पोराच्या वयाचा. आपण मागं लागून त्याला शाळेत पाठवतोय. फी भरली नाही म्हणून हाकलतील का त्याला. अन् संध्याकाळचं जेवण त्याचं. दोनशे रुपयांची सोय झालीच पाहिजे. हे गिऱ्हाईक गेलं हातातून तर काही खरं नाही. देव गेला उडत. एवढीच काळजी माझी देवाला तर कशाला धंद्याला लावलं त्यानं मला. कशाला शांतारामसारख्या गंजेटीला पदरात मारलं. मी काय देवाचं नुकसान केलं होतं. आणि आता आणखी काय वाईट करणारंय ते करून घ्यावं देवानं...देवाला जसा त्याचा संसार महत्त्वाचा तसा मलाही माझा संसार महत्वाचा. मी काही देवळाच्या गाभाऱ्यात शेज नाही सजवणार. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडीत घेऊन जाणारंय गिऱ्हाईकाला. नाहीतर त्याच्याच गाडीत बसून जाईन तो म्हणंल तिथं. पण मला आज देवाच्या साक्षीनं देहदान करायचंय. मनात विचारांची वावटळ उडवतच छाया मंदिराच्या पायऱ्यांवर पोहोचली. उंच टाचेच्या सँडल काढून ठेवताना साडी खूपशी वर येईल. सदानंदची त्यावर नजर पडेल याची काळजी तिनं घेतली. त्याच्या डोळ्यातली चमकही तिनं टिपली. त्यानं डोळ्यावरचा गॉगल कपाळावर ठेवला आणि तिला हलकासा डोळा घातला. तिच्या अंगातून एकदम वारा शिरशिरून गेला. कॉलेजमधला रवींद्र सातपुते तिच्या काळजावरून चालत गेला. त्याच्या सारखाच दिसतोय, असं पुटपुटत तिनं केसाची बट पुन्हा कानामागे अडकवण्याचं नाटक केलं. आणि ती झपकन गाभाऱ्यात शिरली. महादेवाच्या मूर्तीसमोर हात जोडले असले तरी मन बाहेरच होतं. ते कसंबसं ताब्यात आणत तिनं देवाला सांगूनच टाकलं. 
हे तुला पाप वाटत असलं तरी मला वाटत नाही. कारण हे मी माझ्या संसारासाठी करतेय. तूच या गिऱ्हाईकाला इथं तुझ्या देवळात आणलंय. म्हणून मी त्याच्या मागंमागं इथं आलीय. उगाच मला शिक्षा करण्याच्या भानगडीत पडू नको, असं बजावून ती झपकन बाहेर पडली.
झाडाच्या दाट गर्दीत पाच मिनिटांतच सदानंद आणि छायानं शरीरं मोकळी केली. कपडे साफसूफ करून केस विंचरून छाया त्याच्याकडं पाहू लागली. आता हा बाबा पैसे देणार की नाही, असा तिचा अाविर्भाव होता. तो ओळखत सदानंदनं तिच्या दिशेनं पैशाचं पाकीट भिरकावलं. प्रसंगावधान राखून पदराची झोळी करत तिनं ते पकडलं. तो म्हणाला,
खरं तर मी पाचशे रुपये देणार होतो. पण आता विचार बदललाय. दोन हजार रुपये आहेत पाकिटात तेवढे घेऊन टाक.
नाही नाही. जेवढे ठरले तेवढेच दे. मेहरबानी करायची गरज नाही. धंदेवाली असली तरी लुटारू नाही मी.
मेहरबानी नाही. तुझी चव आवडली मला. माझ्याकडं येण्याआधी देवाच्या पाया पडून आलीस ना तू. ते पाहूनच मला कळलं तू कोण आहेस ते.
आश्चर्यचकित झालेल्या छायाच्या तोंडून शब्दही फुटेनात.
तिनं कसंबसं विचारलं –
पण तू कोण आहेस.
मी ड्रायव्हर आहे. एका साहेबाच्या गाडीवर. नेहमी येत असतो इथं.
मग यापूर्वी कधी दिसला नाहीस. मी तर येत -जात असते मंदिरासमोरून.
मी पण नाही येत कधी या मंदिरात. कदाचित आज तुझ्या शरीराची चव घेण्याचं नशिबात होतं माझ्या. 
आणि माझ्या नशिबात...असा प्रश्न छायाच्याही मनात आला, पण गिऱ्हाईकाच्या बोलण्यात फारसं अडकायचं नाही, हे तिनं यापूर्वीच ठरवलेलं आणि अमलात आणलं होतं. आताही त्याच्याकडे चमत्कारिक आणि तुटलेल्या नजरेनं पाहत तिनं पुन्हा पायात सँडल चढवल्या. आता पायाचा थोडासाही भाग दिसू दिला नाही. पाठीवरून पूर्ण पदर घेत तिनं केसाचा अंबाडा बांधला आणि झोकदारपणे ती झाडीतून बाहेर पडली. मंदिराच्या बाहेरूनच महादेवाला हात जोडले. तेव्हा ती कमालीची शांत झाली होती. कोणताच विचार तिच्या मनात येत नव्हता. जणूकाय आपण आपला देह देवालाच दान केलाय, असा तिला भास होऊ लागला होता. त्या भासातच तिनं कधी मंदिराच्या पायऱ्या उतरल्या ते तिचं तिलाही कळलं नाही. हाताच्या मुठीत दोन हजाराच्या नोटा चिंब भिजत होत्या. 

000000
पूर्व प्रसिद्धी दिव्य मराठी दिवाळी अंक 2015

0000 
- श्रीकांत सराफ
९८८१३००८२१ 

Wednesday 23 December 2015

स्नेहांकित : मैत्र रंगकर्मींचे

  

 व्यावसायिक, हौशी, समांतर रंगभूमीचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड क्षमता असलेली मंडळी त्यावर एकत्र येतात. काही दिवस रसिकांना काहीतरी भन्नाट, अचाट प्रयोग  पाहण्यास मिळतात. चकित करणारे विषय मांडले जातात. त्यातून काही जण विलक्षण प्रतिभेचे असल्याचे लक्षात येऊ लागते. आणि त्यानंतर काही वर्षांतच हे रंगकर्मी वेगवेगळ्या रस्त्यांनी निघून जातात. त्यातील मोजके जण चमकदार कामगिरी करत राहतात, तर बहुतांश जण नोकरी, व्यवसाय आणि संसारात अडकून जातात. ते कालांतराने नाट्यप्रयोग पाहण्यापुरतेच राहतात. अगदी मुंबई, पुण्यातील रंगायन, अाविष्कार, पीडीए ते औरंगाबादेतील रंगकर्मी, नाट्यरंग, दिशांतर अशा संस्थांची  उदाहरणे देता येतील. आठ, दहा वर्षांपलीकडे अशा रंगकर्मींचा एकत्रित प्रवास राहत नाही, असा अनुभव आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दशकांपासून म्हणजे तब्बल तीस वर्षे कार्यरत असलेल्या स्नेहांकित संस्थेचे योगदान अमूल्य आहे. नाट्य प्रयोग करत राहणे, एवढेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत केलेला त्या साऱ्यांचा निरंकारी प्रवास थक्क करणारा आहे. १९ डिसेंबर रोजी स्नेहांकितच्या तीन दशकपूर्तीचा सोहळा तापडिया नाट्यमंदिरात झाला. त्यास तमाम रंगकर्मी आवर्जून उपस्थित होते. 

 मराठी रंगभूमीच्या इतिहासात नोंद होणाऱ्या संस्थेची पायाभरणी १९७९ मध्ये झाली. त्या वेळी औरंगाबादेत सिडको-हडकोची वसाहत अस्तित्वात आली होती. तेथे मराठी कुटुंबांचे प्रमाण लक्षणीय होते. मराठवाड्याच्या विविध शहरांतून आलेली धनंजय सरदेशपांडे, रमाकांत मुळे, शरद कुलकर्णी, बबन माळी, दिनेश मानवतकर, श्रीकांत देशपांडे, अरुण दप्तरे, सुनिल कुलकर्णी, बाबा शेडगे, मोहन वाखारकर, मदन मिमरोट, जितेंद्र दाशरथी ही तरुण मंडळी  सांस्कृतिक चळवळीत काही योगदान देता येईल का, याचा विचार करत होती. प्रस्थापित कलावंत, नाट्यसंघांकडे अनुभवासाठी जाण्याऐवजी त्यांनी स्वत:चा छोटेखानी ग्रुप तयार केला. धनंजय यांच्याकडे लेखनाचे कौशल्य होते. त्यांनी निष्कलंक, वृक्षारोपण झालेच पाहिजे, अशा सामाजिक आशयाच्या एकांकिका लिहिल्या. रमाकांत मुळे यांच्यात प्रत्येक विषयाच्या तळाशी जाऊन खोलवर विचार करण्याची प्रचंड क्षमता. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. दोन्ही  एकांकिकांसह ‘गणपती बप्पा हाजीर हो’ हे बालनाट्य लोकप्रिय झाले. १९८५ पर्यंत एकत्रितपणे काम केल्यावर आपल्या सर्वांची मने जुळली आहेत. आता आपण एक संस्था स्थापन केली पाहिजे, असा विचार मुळे यांनी मांडला आणि स्नेहांकितचा जन्म झाला.   

 धनंजय यांनी लेखन करायचे, मुळे यांनी ते  दिग्दर्शित करायचे आणि शरद कुलकर्णी, दिनेश मानवतकर, श्रीकांत देशपांडे, ज्योती सातघरे, अंजली कुलकर्णी आदींनी त्यात भूमिका करायच्या. गंगाधर भांगे, शरद हिवर्डे, मोहन वाखारकर आदींनी तांत्रिक बाजू सांभाळायच्या अशा जबाबदाऱ्या ठरवण्यात आल्या. स्थापना होतेवेळीच रोपण खड्डा ओपन ही एकांकिका धनंजय यांनी लिहिली होती. ग्रामीण भागात वृक्षारोपण मोहिमेची कशी वाट लावली जाते, याची भेदक मांडणी त्यात होती. प्रत्येक व्यक्तिरेखेला ठसठशीत करण्याची किमया त्यात साधण्यात आली होती. मुळे यांनी संहितेची मूळ बांधणी अधिक घट्ट आणि आशयपूर्ण केली होती.  पाहता पाहता ‘रोपण’ लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. प्रत्येक स्नेहसंमेलनात, स्पर्धांमध्ये त्याचे प्रयोग गाजू लागले. स्नेहांकितशिवाय इतर तरुण, हौशी मंडळी गावोगावी प्रयोग करू लागले. १९८७ ते १९८९ या काळात तर औरंगाबादेतील त्या वेळचे रंगकर्मी ‘मी रोपण करतोय,’ असे अभिमानाने सांगत होते.  दुसरीकडे स्नेहांकितने ‘अब तुम्हारे हवाले वतन’, ‘कशाचा भारत बसलो चरत’ ‘इथं वेळ आहे कुणाला’, ‘गर्भरेषा’, ‘फारच टोचतंय’या एकांकिकांचा धडाका लावला होता.  

 त्यानंतर त्यांनी दोन अंकी नाटकांकडे लक्ष वळवले. यकृत, खोल खोल पाणी, महापूर ही प्रख्यात लेखकांची नाटके केली. त्यातील बारकावे जाणून घेतल्यावर धनंजय यांनी मराठी रंगभूमीचे लक्ष वेधणारी उलगुलान, तर्पण, वेग वाळूचा या दोन अंकी संहिता लिहिल्या. या साऱ्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळालाच. तर्पणचे हिंदीत रूपांतर झाले. राज्य नाट्य स्पर्धेत तिसरा क्रमांकही पटकावला.  

 एकीकडे एवढे लक्षणीय यश मिळत असतानाही स्नेहांकितच्या एकाही कलावंताच्या डोक्यात हवा शिरली नाही. आपापली नोकरी, व्यवसाय सांभाळून ही मंडळी झपाटून जात काम करत राहिली. बऱ्याच वेळा एखाद्या संस्थेत स्थिरावलेल्या उत्कृष्ट कलावंताला दुसऱ्या संस्थेतून निमंत्रण येते. आणखी यश, नवा अनुभव अशा नावाखाली तोदेखील दुसऱ्या संस्थांमध्ये  काम करू लागतो आणि हळूहळू मातृसंस्थेला दुरावतो; पण स्नेहांकितबद्दल असे काहीच झाले नाही.  इतर संस्थांच्या नाटकांमध्ये काम करत असतानाही स्नेहांकितबद्दलच ओलावा, आपुलकी मुळीच कमी झाली नाही. उलट नंदू काळे (सीआयडी मालिकेचे सहायक दिग्दर्शक), मंगेश देसाई (मराठी चित्रपटातील लक्षवेधी अभिनेता), रोहित देशमुख (जय मल्हार मालिका) योगेश शिरसाट, विनित भोंडे  (कॉमेडीची बुलेट ट्रेन), गटशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, गजेंद्र बिराजदार, मधुकर कांबळे, प्रेषित रुद्रावार यासह अनेक जण स्नेहांकितसाठी काम करत राहिले. नंदू काळे यांनी दिग्दर्शनाचा पहिला धडा स्नेहांकितमध्येच गिरवला. सहसा नाट्य संस्थांमध्ये परस्परांबद्दल छुपा द्वेष असतो. तो अनेक स्पर्धा, महोत्सवाच्या निमित्ताने कमी-अधिक प्रमाणात उघड होतो. धनंजय सरदेशपांडे, रमाकांत मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी द्वेषाला कधीच थारा दिला नाही. उलट दुसऱ्या संघांचे नाट्य प्रयोग यशस्वी होण्यासाठीच मदत केली. इतरांचे सादरीकरण झाल्यावर त्याचे कौतुक करण्यात, प्रोत्साहन देण्यात, मार्गदर्शन करण्यात कधीच हात आखडता घेतला नाही.  खऱ्या अर्थाने त्यांनी मैत्र रंगकर्मींचे अशी भूमिका मनापासून बजावली. त्यामुळेच त्यांचा इतका दीर्घ अन्् आदर्श  प्रवास अनंत अडचणींना तोंड देऊनही यशस्वी झाला. नव्या पिढीच्या कलावंतांना सोबत घेत, घडवत तो यापुढेही असाच होईल, याविषयी मुळीच शंका नाही.



Monday 21 December 2015

अनुकंपा (अनुवादित उर्दू कथा : मूळ लेखक : सलीम अहेमद)




-- १ --

घामानं, धुळीनं भिजलेल्या चेहऱ्याचा त्याला प्रचंड वैताग आला होता.
 अशा मातकट तोंडानं घरात जायचं का, असा विचार करून त्यानं 
खिशात हात घालत रुमाल बाहेर काढला. 
एकक्षण रुमालाकडं पाहिलं. मातीनं एवढ्या भिजलेल्या रुमालानं 
तोंड पुसलं जाण्याऐवजी  आणखीनच काळं
 होईल आपल्या नशिबासारखं, असं पुटपुटत त्यानं रुमाल पुन्हा खिशात कोंबला. जड पावलानं 
गल्लीत वळाला. त्याचं अख्खं बालपण खाऊन टाकणारा महाकाय, जुनाट वाडा तसाच आपल्या
 जागी उभा होता. जागोजागी पडझड झालेल्या वाड्यात प्रत्येक कोपऱ्यावर झाडं उगवली होती. 
त्याच्या आडोशाला कशाबशा तग धरत पाच-सहा खोल्या होत्या. लोकांनी आडोशाचा वापर मुतारी 
म्हणून सुरु केल्यानं दुर्गंधीची भपकारे नाकात शिरत होते. वाड्याच्या मागच्या बाजूला तयार झालेली 
कचराकुंडी आणि त्यावर फिरणारी भटकी कुत्री वैताग आणत होती. हे सारं नजरेआड करत तो
 वाड्यात शिरला. डाव्या बाजूला असलेली अंधारलेली जुनाट खोली म्हणजे त्याचं घर.
 दारासमोर चप्पल काढताच आतून आईचा हृदयावर चरका ओढणारा आवाज आला.
काय झालं संभा? इंटरव्ह्यू झाला का?
दर महिन्याला तीन-चार वेळा येणारा हा प्रश्न संभाजीच्या सरावाचा झाला होता. 
खरं तर आपल्या येण्यावरून तिला सगळं कळतं तरीही ती का विचारते, 
असं वाटून त्याचाही आवाज चिरकला.
काय होणार. सांग ना तू? नवीन काय होणार? आतापर्यंत जे झालं तेच आजही झालं. कळालं का?
दम्यानं आधीच खोलवर गेलेला आईचा आवाज संभाजीच्या या उत्तरानं आणखीनच दबला. 
अरे, देवा...असं म्हणत ती भांडी आवरू लागली. तेवढ्यात अण्णा जागे झाले. अरे काय झालं. 
का ओरडताय. माझ्या घशाला कोरड पडलीय रे. कुणी पाणी देता का? संभाजी जागचा हलला नाही. 
जणूकाय त्याच्या पायातील त्राणच गेले होते. आईनं एक मिनिट त्याच्या हलण्याची वाट पाहिली. 
मग खिडकीत ठेवलेल्या गोळ्या उचलून पाण्याचा ग्लास तिनं अण्णांसमोर केला. 
थोड्याच वेळात खोलीत स्मशानशांतता पसरली. संभाजीनं कपडे बदलले. 
हातात एक पुस्तक घेऊन तो खोलीबाहेर पडला. नेहमीप्रमाणे वाड्याच्या वरच्या बाजूला असलेल्या 
पडक्या माळवदावर अंग पसरण्यासाठी. काही खायचं नाही का? हा आईचा आवाजही त्याच्या
 कानावर पडला नाही. माळवदावर पोचताच त्यानं चटई अंथरली. रस्त्यावरील दिव्यामुळे 
येणाऱ्या उजेडाचा आधार घेत डोळ्यासमोर पुस्तक धरून काहीतरी वाचायचा प्रयत्न केला. 
पण एकही शब्द दिसेना. डोळ्यात पाण्याचा तवंग जमा होऊ लागला होता. 
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या परवडीची दृश्ये डोळ्यासमोरून झपाझप जाऊ लागली.
अनेक ठिकाणी झालेले अपमान आठवू लागले. दोन दिवसांपूर्वी स्टील ग्लास कंपनीतील अनुभव तर
ताजाच होता. रिसर्च असिस्टंट म्हणून कामावर घेतले मॅनेजरने. वाटले होते की हा 
आपल्या शिक्षणाच्या दर्जाला शोभेसा जॉब आहे. सुरुवातीला पैसा कमी आहे. पण हळूहळू वाढेल. 
पहिल्या पगारात किमान आईला एखादी साडी तर नक्कीच घेता येईल.  बाकीचे पैसे अण्णांच्या
 औषधासाठी द्यावाच लागेल. किती वर्ष झाले आपण एखादे चांगले नाटक पाहिले नाही.
 सिनेमालाही गेलो नाही. पगार हाती पडला की त्याच दिवशी अण्णा, आई आणि विमल, कुमुद आणि 
शरयूलाही सिनेमाला घेऊन जायचे. त्या पोरींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देण्याची जबाबदारी आपलीच
 आहे ना. त्यांच्या शाळेच्या फीसची तजवीज करता करता आई, अण्णा थकून गेले आहेत. 
आता त्यांची फीस मी भरणार असे आपण अण्णांना जेव्हा सांगू तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर किती 
आनंद होईल, याचा विचार करूनच आपण कंपनीत पाऊल ठेवले. पण दोनच दिवसात
 मॅनेजरने रंग दाखवले. ग्लास पुसणे, फायलींचे गठ्ठे हलवणे अशी कामे करण्यास सांगितले. 
रिसर्च असिस्टंटला ही कामे का, असे विचारले तर हात धरून गेटबाहेर हाकलून दिले. 
असा अपमान कशामुळे आपल्या पदरी पडतो, हेच कळत नाही, असे वाटून संभाच्या
 डोळ्यात पुन्हा पाणी दाटून आले. त्याने पुस्तक घडी करून बाजूला ठेवून  िदले. 
तेवढ्यात खालून अण्णांचा आवाज ऐकू आला. त्याला वाटले की आपल्याला बोलवतायत
 की काय म्हणून त्याने कानोसा घेतला. तर अण्णा म्हणत होते.
‘मला माझी काही चिंता नाहीये. लाकडासारखं वाळलेलं शरीर आहे. चितेवर ठेवताच एका
 मिनिटात खाक होऊन जाईल. पण तुमचं काय. रिटायरमेंटसाठी काही महिनेच बाकी आहेत. 
काय सांगता येतं. तुम्ही सारखे आजारी असता असे म्हणून साहेब आधीच काम थांबवून टाकतील.
 संभाजीला नोकरी असती तर हा ताण झालाच नसता.  पोरींच्या शिक्षणाची, तुझी काळजी घेतली असती त्यानं.’
त्यावर आई म्हणाली
अहो, जगात कामं काय कमी आहेत का? हमाली करूनही लोक जगतातच ना?
 काबाडकष्ट करूनच अनेक लोक मोठे झालेत. पण आपल्या साहेबांना कामाची लाज.
 हे काम माझ्या शिक्षणाला शोभेसे नाही. ते काम मी कसे करणार? असं भपका असतो. 
चांगली नोकरी मिळेपर्यंत हमाली केली तरी काय हरकत आहे हो?
हं...तेही आहे म्हणा. पण मी एवढा पोटाला टाच देऊन त्याला शिकवलं. एमएस्सी केलं.
 त्यानंही जिद्दीनं शिक्षण घेतलं तर त्याला त्याच्या मनासारखी नोकरी पाहिजेच ना.
 हमालीच करायची होती तर दहावीनंतर त्याला रेल्वे स्टेशनवर मीच पाठवून दिलं असतं ना?
मग अण्णा बराच वेळ खोकत खोकत बोलत राहिले. आई त्यांना उत्तर देत राहिली. 
ती ऐकत ऐकत कधी झोप लागली ते संभाजीला कळालंच नाही.

-- २--

प्रचंड कलकलाटानं भरलेली ती निमुळती गल्ली म्हणजे संभाजीचं आवडतं ठिकाण. 
एका टोकाला एक भलामोठा जुनाट अन्् पडझड झालेला ऐतिहासिक दरवाजा अन््
 दुसऱ्या टोकाला एक तेवढीच जुनी मशिद. तिच्यासमोर एक पुरातन वडाचे झाड. 
आणि या दोन्ही टोकांच्या मध्ये पाच-दहा फूट एवढीच रुंदी असलेल्या सात-आठ पानाच्या टपऱ्या. 
वीस-पंचवीस कुलूप, छत्ऱ्या, कुकर, मिक्सर दुरुस्तीची दुकानं. काही मोबाईल दुरुस्तीची खोपटं. 
काही भेळ-पुरीच्या गाड्या. रस्त्यावर कढया लावून जिलेब्या, भजे तळणारे तर दोन-दोन 
फुटांवर बसलेले. त्यातून एखाद्या सायकलला वाट काढता आली तर त्या सायकलवाल्याचेच नशिब. 
तरीही तिथून अनेक रिक्षावाले घुसत. कढया बाजूला सरकायला लावून पुढे जात.
कुलूप, छत्री, मोबाईल दुरुस्तीसाठीचे शहरातील सर्व लोक या गल्लीतच येत
 आणि तिथं जिलबी, भज्यांवर ताव मारत. भेळपुरी खात. 

त्यामुळं सकाळी आठ ते रात्री एक दीडपर्यंत ही गल्ली म्हणजे कलकलाटाचं केंद्रच होतं.
तिथली पारस हॉटेल आणि त्याच्यासमोरची खुद्दूसची पानटपरी म्हणजे संभाजीचं अनेक वर्षाचं 
आवडतं ठिकाण. खिशात पैसा असेल तर एखादा चहा आणि त्यानंतर सिगारेट त्याला भारी आवडायची. 
अलिकडच्या काळात अण्णांकडून पैसे मागायची लाज वाटायची. 
त्यावर त्याने करीमशी दोस्तीचा उपाय शोधून काढला होता.
 शिवाय त्याच्या वाड्याजवळ राहणारे मंगेश, प्रशांत त्या गल्लीत भेटायचेच. त्यांची रद्दी विक्रीची दुकानं होती. 
त्यांच्या चहा पिण्याच्या वेळा त्याने पाठ करून ठेवल्या होत्या. ते दोघे असताना हॉटेलात गेले की 
चहा अन्् सिगारेटचे चार-पाच झुरके मिळायचेच.

आजही तो अचूक वेळ साधूनच गल्लीत दाखल झाला. आधी त्यानं प्रशांत कुठे आहे याचा शोध घेतला. 
त्याच्या दुकानावर काम करणाऱ्या पोराला खुणेनंच विचारलं. त्यानंही सरावानं गेलेत ते तिकडं असं
 खुणेनंच उत्तर दिलं. मग पुढं आल्यावर मंगेशच्या दुकानात त्याचा काका बसला होता. 
त्यानंही तो गेलाय तिकडे केव्हाचा. आता यायच्याच मार्गावर असेल असं सांगितलं. 
तेव्हा आता आपला चहा हुकला. सिगारेटचे झुरके गेले, असे वाटून संभाजीनं झपाझप पावलं टाकली 
अन्् हॉटेलसमोर येऊन उभा राहिला. आत पाठमोरे बसलेले प्रशांत, मंगेश पाहून
 त्याला कमालीचं हायसं वाटलं. त्याचा चेहरा तेवढ्या तणावातही हसरा झाला.

त्या दोघांच्या जवळ पोहोचण्यापूर्वी त्यानं मोडकं स्टूल उचललं आणि त्यांच्याजवळ बस्तान मांडलं. 
त्याला पाहून ते दोघेही खुलले. या सरकारीसाहेब, असं नेहमीप्रमाणे म्हणत प्रशांतनं त्याला स्टूलवर 
नीट बसा हां, असं बजावलं. 
हो...हो काळजीच नको. मी एकदम व्यवस्थित आहे या स्टूलावर. माझा नेहमीचाच आहे तो.
हां...हां...सरकारीसाहेब कधी कधी नेहमीच्याच गोष्टी दगा देतात हां. कुणावर एवढा कायमचा भरोसा 
चांगला नसतो हां. मंगेशनं त्याच्या धंद्यातील खाचखळगे आठवत सांगितलं.
त्यावर प्रशांत मनमोकळं हसत म्हणाला
ओ, रद्दीवाले तुमचे विचार पण रद्दीसारखेच झाले आहेत हां. 
अरे, आपले संभाजी म्हणजे सरकारीसाहेब आहेत. आपल्यापेक्षा दहापटीनं जास्त शिकले आहेत. आपण पाचवी-सहावीतच शाळा सोडली आणि सरळ गल्ल्यावर येऊन बसलो. 
पण साहेब पहा किती शिकले आहेत. मोडक्या स्टुलावर कसं बसावं, याचाही अभ्यास
 त्यांनी केलाच आहे. 
प्रशांतचं हे बोलणं म्हणजे कौतुक आहे की टोला अशा विचारात संभाजी पडला असतानाच कलीम
 वेटरनं त्याची तंद्री मोडली. 
साब, क्या चाहिए. स्पेशल चाय, मसालेवाली चाय या फिर गोल्डन
संभाजीकडून ऑर्डर दिली जाण्याचा प्रसंग विरळाच. तरीही कलीम त्यालाच नेहमी 
ऑर्डरबद्दल विचारायचा. 
एक दिवस संभाजी सरकारीसाहेब होणारच, अशी खात्रीही तो द्यायचा. पण ऑर्डर देण्याचे काम प्रशांत
किंवा मंगेशच द्यायचे. आजही प्रशांत म्हणाला,
अरे कलीम तीन दिन बाद आए है. आज धंदाभी अच्छा हुआ है. तो तीन गोल्डन लाओ.
कलीम वळाल्यावर प्रशांत संभाजीकडे रोखून पाहात म्हणाला,
काय हो, सरकारीसाहेब...काही झालं की नाही?
कशाचं?
अहो, तुमच्या नोकरीचं. एवढ्या पेपराला जाहिराती असतात. असा
 माणूस पािहजे, तसा माणूस पाहिजे. तुम्ही तर एवढे हुशार. शिकलेले. तुम्हाला तर लगेच नोकरी मिळाली पाहिजे ना. इतके दिवस तुम्हाला
खाली ठेवणं सरकारला शोभतच नाही. 
ए पश्या, अरे बाबा कुठल्या जगात राहतो. आता सरकारी नोकऱ्याच राहिल्यात कुठं? झिरो 
बजेट सुरू आहे. 
झिरो बजेट. अरे, काही पण असू दे रे. सरकार चालवायसाठी माणसं तर लागत असतीलच ना.
सरकारकडं खूप माणसं झालीत म्हणे. आणि समजा एखादी जागा निघालीच तर पैसा लागतो पैसा. 
पाच - दहा लाख लागतात.  एवढा पैसा कुणाकडं आहे. काय हो सरकारीसाहेब बरोबर ना.
एक सुस्कारा सोडत संभाजी म्हणाला, एकदम खरंय दोस्तांनो. माझ्यासारख्या गरीब माणसाला 
सरकारी नोकरी शक्यच नाही. घरी आई-वडिल आजारी. तीन बहिणी. मी हा असा.
पण तुझ्या वडिलांना तर सरकारी नोकरी आहेच ना.
ती त्यांची आहे ना. ती कशी मला मिळणार.
कलीमनं आणलेल्या गोल्डनचा एक छान घोट घेताच मंगेशचा चेहरा आणखी फुलला. 
फुललेल्या चेहऱ्यानंच तो म्हणाला, कुछ चिंता मत करो. सब अच्छा हो जाएगा. मिळेल आपल्या
 सरकारीसाहेबांना सरकारी नोकरी. माझ्या मामाचा पोरगा होता ना. तो अविनाश नाही का रे.
त्याला कशी नोकरी मिळाली माहितेय का?
संभाजी अन्् प्रशांतनं हो...नाही म्हणण्याच्या आत त्यानं सांगून टाकलं.
अरे, बारावी पास झाल्यावर ना आरोग्य खात्याची एक परीक्षा दिली होती त्यानं. मग कुणीतरी 
त्या परीक्षेविरुद्ध कोर्टात अर्ज करून टाकला. चार-पाच वर्ष वाट पाहून अविनाश थकला. 
आपल्या सरकारीसाहेबासारखीच त्याच्याही घरची स्थिती. मामा मरायलाच टेकला होता. 
एक दिवस त्याला म्हणाला, नोकरी मिळत नसलं तर जा. जाऊन मर कुठेतरी. तर हा खरंच जीव 
देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेला. तेवढ्यात त्याचा एक पानटपरीवाला मित्र धावत-धावतच
 रेल्वे स्टेशनवर आला. त्यानं एक पत्र त्याच्या हातात दिलं. ते वाचून हा स्टेशनावरच नाचू लागला. 
त्या पत्रात ना ताबडतोब नोकरीला या, असं म्हटलं होतं. एक रुपयाही खर्च झाला नाही त्याचा. 
आता चंद्रपूरला असतो. छान बायको केलीय. दोन पोरं आहेत. तसंच एक दिवस
 आपल्या सरकारीसाहेबांचंही होईल. 
मंग्या, तुझ्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. पण मी इतक्या परीक्षा दिल्यात कुठूनही रिस्पॉन्स नाही. 
खासगी कंपन्यांमध्येही मला पाहिजे तसं कामच मिळत नाही. 
धीर धरा साहेब. होईल. होईल. तुझ्या वडिलांसारखी नाहीतर तुझ्या वडिलांचीच नोकरी मिळेल.
संभाजीनं पुन्हा एकदा सुस्कारा सोडला. सुसाट निघालेली रेल्वे आणि रुळावर आपण पडलेलो 
असंही दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून गेले. तो पुन्हा चिंतामग्न झाला. ते पाहून प्रशांत मैफल मोडण्याचं ठरवलं.
चला, खुद्दूस आठवण करतोय, असे म्हणत त्यानं जागा सोडली. तसा मंगेशही निघाला.
त्याच्या पाठोपाठ संभाजीही.

-- ३ --

आओ, आओ तिकडीबाज
खुद्दूसनं त्याच्या खास शैलीत स्वागत केलं. मग पानाची पिंक अचूकपणे टपरीच्या बाहेर टाकत 
तो म्हणाला,
क्या बात है. संभाजीसाब खूपच नाराज दिसतायत. आज सिगारेट पिण्याचा मूड नाही का?
संभाजीनं काही बोलण्याच्या आतच प्रशांतनं खुद्दूसला नजरेनंच शांत राहण्याचा इशारा केला. 
पण खुद्दूस ऐकण्याच्या तयारीत नव्हता. सिगारेटचं पाकिट काऊंटरवर ठेवत त्यानं बोलणं सुरूच ठेवला 
संभाजीसाहेब, नोकरीचा नाद सोडा. काहीतरी कामधंदा शोधा. बघा, मी पण बारावी झालो. 
गावातल्या कॉमर्स कॉलेजला अॅडमिशनपण झालं होतं. पण घरची गरिबी होती. बारदानाही भला मोठा. 
अब्बा सरकारी गेस्ट हाऊसवर खानसामा. त्याच्या पगारात कातही होत नव्हता. 
मग तो म्हणाला, जा तू शैरात. खय्युमचाचू तुला काहीतरी कामधंदा देतील. नोकरी तर मिळंलच. 
मग काय आलो इथं. तर कशाची नोकरी अन्् कशाचं काय. 
मुसलमानायला कोन फटकू पन देत  नाईत. 
गब्बर मुसलमान तर लईच कानकून करतेत. मग काय घेतली जागा बशीरसेठकडून 
अन्् टाकली टपरी. खुद्दूसची एक्सप्रेस थांबल्याचे पाहून मंगेशनं सिगारेट संभाजीकडं 
सरकवली.  संभाजीला एकदम हुरूप आला. त्याने दणादण दोन कश घेत त्याचा धूर हवेत भिरकावून दिला. 
प्रशांतची दुसरी सिगारेट सुरू झाली होती. त्यानं वीस रुपयांची नोट ठेल्यावर टेकवत खुद्दूसला विचारलं,
आता, घरचे सगळे मजेत ना?
फिर क्या. मैं यहाँ महिने कू कमसे कम एक हजार रुपये भेजताच. आता घरी अब्बा नाही. 
फक्त आई, दोन बहिणी आहेत.
का? 
मी इकडं आलो अन्् अब्बा गुजरले. त्यांची नोकरी धाकट्या भावाला मिळाली. 
पण तुम्हाला सांगतो जमाना लईच बेकार. अनुकंपा का काय तेचात सलीमला नोकरी मिळाली 
अब्बाच्या जागेवर. दोन महिन्यातच मालेगावची छान पोरगीही मिळाली.
 निकाह होऊन सहा महिने झाले की लगेच कुरकुर सुरू केली त्याच्या बायकोनं. झाला वेगळा.
 आता अम्मा दोन-तीन घरचे कामं करती. मी इकडून जमा उतना भेचताच.  
आता बहिणीच्या निकाहची तयारी सुरू आहे.
त्यात भावाची काही मदत?
आँ. अरे पलटके देखताच नई. नशिब त्याचं त्याला अब्बाच्या जागेची नोकरी मिळाली. 
मग तु का नाही केला प्रयत्न?
अरे, जाने दो जी. हो गया वो हो गया. उसका पेट भर रहा ना. अब ये देखो सरकारकी कमाल.
असं म्हणत त्यानं एका वर्तमानपत्राचं एक पान पुढं सरकवलं.
हे काय आहे, प्रशातनं विचारलं. त्यावर खुद्दूस म्हणाला
वाचा की, सरकार म्हणतंय आता जे लोक सरकारी नोकरीत हायेत. त्यांच्या नोकरीचा काळ अजून
 वाढविलाय. म्हणजे जे आता दोन महिन्यांनी रिटायर 
होतील त्यांना आणखी दोन वर्षे काम करता येईल.
अरे व्वा. चांगलंच आहे की. 
काय चांगलंय रे. म्हाताऱ्यांकडून काम होत नाही. तरीही त्यांना काम करायला लावायचं आणि
 जी पोरं कामासाठी धडपडतायत त्यांचं काय? प्रशांतनं त्याचा मुद्दा मांडताना काय हो सरकारी 
साहेब, अशी विचारणा केली. पण संभाजीचं फारसं लक्ष नव्हतं.
काय, काय झालंय?
अहो, साहेब सरकारी नोकरीचं वय वाढवलंय.
म्हणजे
रिटायरमेंट साठ वर्षावर करणारंय सरकार एक-दोन दिवसांत.
आँ...कोण म्हणतंय असं?
खुद्दूस. म्हणजे खुद्दूसनं पेपरमध्ये बातमी वाचलीय. तुम्ही पण वाचा. 
संभाजीनं घाईघाईत पेपर ओढून घेतला. झरझर बातमीवर नजर टाकली. आणि तो आणखीनच 
अस्वस्थ झाला. थोटकापर्यंत सिगारेट ओढण्याची नेहमीची सवय बाजूला ठेवत त्याने ती प्रशांतच्या
 हातात सरकवली. बराच काळ शांतता पसरली होती. सरकारीसाहेबाला नेमकं 
काय झालं ते कुणालाही कळेना. ओ सरकारीसाहेब, काहीतरी बोला राव, असं 
खुद्दूस म्हणेपर्यंत संभाजीनं रस्ता ओलांडला होता.

-- ४ --

वाड्याजवळ तो पोहोचला तेव्हा चांगलेच अंधारून आले होते. जोरदार वाऱ्यामुळे धुळीचे लोट उडू लागले होते.
 थोड्याच वेळात जोरदार पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागली होती. माळवदावर ठेवलेली 
पुस्तके भिजून गोळे होण्याच्या शंकेने तो धावतच आत शिरला. आणि माळवदावर जाण्यासाठी 
जिन्याकडे वळला. तेवढ्यात शरयू धावत धावतच आली.
दादा, कुठे होतास तु इतका वेळ? दुपारपासून आम्ही तुझी वाट पाहतोय.
का काय झालं.? 
अरे, अण्णांची तब्येत खूपच बिघडलीय. डोळे सारखे पांढरे करतायत. श्वासही घेता येत नाहीये त्यांना.
अरे, मग कुणाला तरी पाठवायचं ना मला बोलवायला. आणि डॉक्टरांना घेऊन यायचे ना?
ते पाटकर डॉक्टर नाही म्हटले यायचे. मागचे १३०० रुपयांचे बिल बाकी आहे म्हटले ते.
च्या मायला या डॉक्टरांच्या. मग दुसरा कुणी नव्हता का?
आहेत. आले आहेत डॉक्टर. मी, आई, कुमूद तिघेही गेलो होतो त्या पाटकरांकडे. त्यांच्या 
हाता पाया पडून आणलं त्यांना. आताच आलेत ते. तू चल पटकन आत.
संभाजी धावतच आत शिरला. 
काय झालंय? सकाळी तर सगळं ठीक होतं ?
डॉक्टर पाटकरांनी त्याच्याकडे रोखून पाहत तुम्ही जरा शांत रहा. पेशंट
 सिरीअस आहे, असं सांगितलं. तेव्हा संभाजीचा चेहरा आणखीनच काळवंडला. 
तो अण्णांजवळ गेला. त्यांच्याकडे निरखून पाहू लागला. तर त्यांच्या पायाला जोरदार झटके सुरू होते.
 श्वास घेताना छाती भात्यासारखी फुलत होती. 
आईनं पदराचा बोळा तोंडात कोंबला होता. शरयू, कुमुदचे डोळे पाण्यानं डबडबलेले होते. 
वाड्यात बाजूला राहणारे काळे काका, ताई मावशी, गणेशराव, 
त्यांची पोरं दरवाजापाशी येऊन थांबली होती.
डॉक्टर, काहीतरी करा ना...
पाटकरांनी डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर सरकवत थंडपणे बॅगमधून लेटरहेड काढले. 
अन् ते तेवढ्याच थंडपणे म्हणाले,
खूप मोठा अॅटॅक आहे. लंग्ज जवळपास डॅमेज झाले आहे. तरीही मी माझ्यापरीने प्रयत्न करतो. 
या काही गोळ्या आहेत. ताबडतोब घेऊन या.
अं...काय...
गोळ्या...गोळ्या घेऊन या...थोडासा फरक पडेल त्याने आणि सलाईनची बाटली घेऊन या.
संभाजीच्या पोटात गोळाच आला. त्यानं धीर एकवटत आईला विचारलं
तुझ्याकडं काही पैसे आहेत का?
आई तटतटून उठली. आतल्या बाजूला जाऊन तिनं डब्यांची उलथापालथ केली. तीनशे रुपये घेऊन
संभाजीच्या हातात देत ती म्हणाली,
जा आता पटकन. फार उशिर नको करूस.
पाटकर पटकन म्हणाले, अहो, तीनशे रुपयांनी काय होणार किमान दीड हजार रुपये लागतील.
डॉक्टर एवढे पैसे नाहीयेत हो आमच्याकडं.
काही काळ खोलीत काळसर शांतता पसरली. ती पाहून काळेकाका आत आले. संभाजीच्या 
हातात एक पाचशेच्या तीन नोटा कोंबत म्हणाले,
राहू दे. नंतर दे. तुला नोकरी लागल्यावर.
संभाजी त्यांच्याकडं पाहतच राहिला. गणेशरावांनी त्याला हाताला ओढतच खोलीबाहेर काढलं.
वेळ घालवू नको. बापाला वाचवायचं आहे की नाही? 
संभाजी धावतच वाड्याबाहेर पडला. पायात चप्पल सरकवायचंही भान त्याला राहिला नाही. 

-- ५--
पावसाचा जोरदार मारा सुरू झाला होता. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते.
 त्यातून वाट काढणं मुश्किल जात होतं. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली होती. अण्णांचा गलितगात्र, 
अखेरच्या घटका मोजणारा, आईचा गलबललेला चेहरा समोर येत होता. आपण दुपारीच घरी आलो 
असतो तर कदाचित...असाही विचार मनात आला. त्यापाठोपाठ त्याला खुद्दूसचं बोलणं कानावर पडलं. 
त्यानं पुढं सरकवलेलं वर्तमानपत्र डोळ्यासमोर आलं. सरकारी नोकरदारांच्या नोकरीला
 मुदतवाढीची बातमी मोठ मोठ्या अक्षरात दिसू लागली. 
आणखी दोन वर्षे अण्णांची नोकरी...
आणखी दोन वर्षे अण्णांची नोकरी...
पाण्याच्या लोटातून मार्ग काढणारी त्याची पावलं मंदावली. काही क्षणात तर ती थबकलीच. 
समोर दिसत असलेल्या मेडिकल स्टोअरकडे पाहत पाहत तो डावीकडं वळाला. 
पावलांचा वेग त्यानं वाढवला तसा पावसाचा जोरही अचानक कमी झाला. 
चालत चालत तो संजूच्या गजानन पान सेंटरपाशी येऊन थबकला. तर  संजू टपरी बंद करून निघतच होता.
काय, एवढ्या पावसात इकडं कशी चक्कर केली. 
आलो असाच.
घरी सगळं बरं आहे ना?
हो...एकदम मजेत आहे सगळे. आणि लवकरच सगळं मजेत होणार आहे?
संजूला काही कळालंच नाही. त्यानं विचारलं 
म्हणजे काय म्हणता संभाजीराव...कसं  काय सगळं मजेत होणार? भविष्य सांगताय की काय?
हो...हो...तेच तर सांगतोय. चल, आधी दोन सिगारेट  दे.
दोन?
होय...दोन...एकदम भारी ब्रँडच्या. हे घे शंभराची नोट. मागचे तीस रुपये पण कापून घे.
आश्चर्यचकित होत संजूनं दोन सिगारेटी काढल्या.
त्यातील एक खिशात टाकत संभाजीनं दुसरी पेटवली.
आणि
धुराचे ढीगच्या ढग तो वरती फेकू लागला. त्यात त्याला अण्णांचा निष्प्राण चेहरा,
 घरातील रडारड स्पष्ट दिसू लागली. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान उमटू लागले होते.


मूळ उर्दू कथा - सलिम अहेमद (९३७०३६२९७१)
अनुवाद - श्रीकांत सराफ (९८८१३००८२१)




Tuesday 15 December 2015

जाणून घ्या, रंगभूमीवरील दिग्गजांचा कला प्रवास




नाट्यक्षेत्रातील कोणताही कलावंत घडत असताना त्याला एका चांगल्या मार्गदर्शकाची आणि सहकलावंताची गरज असतेच. पण त्याच बरोबर त्याला स्वत:चे एक संवेदनशील मन असावे लागते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचे कधी तटस्थपणे तर कधी एकरूप होऊन आकलन करावे लागते. निरीक्षणाची एक मूळ शक्ती कलावंत होऊ पाहणाऱ्यामध्ये असतेच. काहीजणांमध्ये ती जन्मजात देणगी म्हणून येते. तर काहीजणांना नाट्यप्रवासात त्याचा उलगडा होत जातो. हळूहळू त्यांची निरीक्षण आणि अनुकरणाची शक्ती वाढत जाते. नाट्यशास्त्र विभागात किंवा नाट्यसंघात काम करणाऱ्या बहुतेकांना याचा अनुभव येतोच. या साऱ्यामध्ये आणखी एका बाबीची गरज असते. ती म्हणजे व्यावसायिक, प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमीवर काम करणाऱ्या दिग्गजांना जाणून घेण्याचे ओढ असावी लागते. अशा दिग्गजांचा रंगभूमीवरील प्रवास, त्यांची विविध विषयांवरील मते, भूमिका करताना ते करत असलेला अभ्यास किंवा दिग्दर्शन करताना वापरलेल्या क्लृप्त्या याची माहिती असावी लागते. शिवाय ही मंडळी नाटक करतात म्हणजे नेमके काय करतात. त्यांच्या जीवनातील कोणत्या महत्वाच्या घटनांनी ते नाट्यक्षेत्राकडे ओढले गेले आणि स्थिरावले. त्यांची पाळेमुळे कशी रुजत गेली. त्यांच्यासभोवती घडणाऱ्या घडामोडींकडे ते कसे पाहतात. त्यांच्या समोरील अडचणी त्यांनी कशा दूर केल्या. हे सर्व काही नवख्यांना कळाले तर त्यांचे कलावंत म्हणून घडणे अधिक सकस होऊ शकते. मुंबई, पुण्यामध्ये दिग्गजांना जाणून घेण्याची संधी बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकते. कारण तमाम बडी मंडळी तेथेच वावरत असतात. त्यांच्या नाटकांचे प्रयोग होतात. कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना भेटणे, जाणून घेणे सोपे जाते. मात्र, महाराष्ट्रातील इतर भागांत ते शक्य होत नाही. संमेलन, परिषद किंवा नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मंडळी येत असली तरी त्यांच्या मनमोकळा संवाद होणे तसे कठीणच असते. त्यातच ही कलावंत मंडळी डॉ. श्रीराम लागू, बी. व्ही. कारंथ, सुहास जोशी, विजया मेहता, रतन थियम, गिरीश कर्नाड, सतीश आळेकर, सुलभा देशपांडे आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासारखी असतील तर संवाद दुरापास्तच असतो. ही कमतरता पुण्यातील प्रख्यात नाट्य समीक्षक, अभ्यासक माधव वझे यांनी त्यांच्या रंगमुद्रा पुस्तकातून भरून काढली आहे. त्यांनी एक विशेष अभियान हाती घेत या साऱ्यांना बोलते केले आहे. या कलावंतांच्या घडणीमध्ये त्यांच्या बालपणीचा, तरुणपणीचा वाटा किती. तिथून ते रंगभूमीकडे कसे ओढले गेले. रंगभूमीची समकालीनता त्यांच्या दृ्ष्टीने नेमकी कशी आहे. लेखन, अभिनय किंवा दिग्दर्शनाकडे ते कसे पाहतात. नाट्य प्रशिक्षणाविषयी त्यांची मते काय आहेत. शास्त्रीय संगीताप्रमाणे नाट्यक्षेत्रात गुरु-शिष्य परंपरा असते का? असेल तर त्याचे स्वरूप काय आहे. १९६० ते १९९० च्या कालावधीत रंगभूमीवर काय काय घडत होते. त्याविषयी त्यांना काय वाटते, अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी मिळवली आहेत. वझे यांचा नाटकाचा अभ्यास दांडगा. अभिनेता, दिग्दर्शक, नाट्यशिक्षक, समीक्षक अशीही त्यांची ओळख. राज्य नाट्य स्पर्धेत तीनदा उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक त्यांनी मिळवले. शामची आई व वहिनीच्या बांगड्या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी केलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे सभासद. या साऱ्यामुळे तमाम दिग्गजांच्या वर्तुळातील एक असे ते होते. तरीही त्यांनी मुलाखती घेताना नव्या पिढीच्या कलावंतांचे प्रश्न गिरीश कर्नाड, विजया मेहतांपर्यंत पोहोचवले. त्यांची निखळ उत्तरे घेतली आणि ती जशीच्या तशी नोंदवलीही आहेत. घाशीराम कोतवाल या जगप्रसिद्ध नाटकाचे संगीतकार भास्कर चंदावरकर यांना घाशीरामविषयी फारसे प्रश्न विचारलेले आवडत नाही, असे कळाल्यावर त्याभोवतीचे प्रश्न विचारून त्यातील मर्म जाणून घेण्याचे त्यांचे कसब मुलाखत वाचल्यानंतरच लक्षात येते.
रंगभूमीवरच नव्हे तर चित्रपट, मालिकांमध्ये ठसा उमटवणाऱ्या या कलावंतांना इतर कलावंतांविषयी काय वाटते, असा एक मूळ प्रश्न असतो. त्याचेही उत्तर त्यांनी मिळवले आहे. त्यातील काही धक्कादायक आहेत. म्हणजे सुहास जोशी म्हणतात की, विजया मेहता रंगमंचावर बोलतात - ती त्यांची एक पद्धत आहे. त्यांचे स्वर वेडेवाकडे असतात. सुलभा देशपांडेच्या मते सुहास जोशींना पाहताना वाटते की विजयाबाई डोकावतात त्यांच्यामध्ये. विजयाबाई नटमंडळींबद्दल भाष्य करतात. त्या म्हणतात की, आपल्याकडे नटाच्या मोकळेपणाबद्दल वेगळे प्रश्न आहेत. आपल्या नटांना शॉर्टकट घेण्याच्या सवयी लागल्या आहेत. त्यातून त्याला कसं मोकळं करायचं, हा प्रश्न आहे. तो अधिकाधिक संवेदनाक्षम कसा होईल. येणारे नवनवीन अनुभव स्वीकारण्याच्या मन:स्थितीत त्याला कसं आणायचं, हा आपल्याकडे प्रश्न आहे. नट अनेकदा अति नैसर्गिक अभिनयशैलीत अडकतात. नटसम्राटचे दिग्दर्शक पुरुषोत्तम दारख्हेकर यांच्याविषयी डॉ. श्रीराम लागू म्हणतात की, माझ्या भूमिकेत त्यांनी हस्तक्षेप केला नाही. मी तालमीतून बाहेर पडल्यावर ते इतरांना सांगायचे , हे पाहा डॉक्टर प्रायोगिक रंगभूमीवरचे आहेत. ते त्यांच्या पद्धतीने काम करणार. प्रभाकर पणशीकर यांनी जयवंत दळवी आपल्याचे कादंबऱ्यांचे कानामात्रा बदलून नाटककार झाले, असे विधान केले. विजय तेंडूलकर लिहितात ते तेवढं विदारक दर्शन म्हणून त्यांची पाठ थोपटणं मला मान्य नाही, असेही ते म्हणतात. गिरीश कर्नाड, कारंथ आणि पूर्व भारतातील महान दिग्दर्शक रतन थियम यांची एकूण भारतीय नाट्य परंपरेविषयीची मते नव्या पिढीच्या ज्ञानात भर टाकणारीच आहेत. त्यामुळे हे पुस्तक नाट्यक्षेत्रासाठी एक महत्वाचा दस्तावेज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह सर्वच नाट्यशास्त्र विभागात त्याचा अभ्यास व्हावा. अभ्यासक्रमाच्या पातळीवर करणे शक्य नसले तर ज्यांना कलावंत म्हणून उत्तुंग शिखर गाठण्याची इच्छा आहे. त्यांनी वैयक्तीक पातळीवर त्याचे जरुर चिंतन करावे, असे वाटते.