Tuesday 23 November 2021

एक बदल : २७ वर्षे

भांडवलशाही नष्ट झालीच पाहिजे. भांडवलदारधार्जिणे सरकार हाकला, असं कितीही म्हटलं तरी ती काही नष्ट होत नाही. कारण भांडवलशाहीच्या जागी लोकांच्या पोटापाण्याची काळजी वाहणारी दुसरी मजबूत, कायमस्वरूपी यंत्रणा भांडवलशाहीच्या विरोधकांनी उभी केलेली नाही. म्हणून अवघे जगच भांडवल्यांची बाजारपेठ होत आहे. त्याने एकीकडे शोषण वाढत आहे. दुसरीकडे नवे शोधण्याची, नवनिर्मितीची संधी मिळत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पैसा कमावणे शक्य होतंय. तसं म्हटलं तर या भांडवली व्यवस्थेची अनेक वैशिष्ट्ये, बलस्थाने आहेत. त्यात जाहिरात ही एक महत्वाची शक्ती आहे. या माध्यमाचा अत्यंत प्रभावी वापर, मारा सुरू आहे. पण त्यातून कधीकधी सामाजिक बदलांची नोंदही होते. चांगल्या अर्थाने समाज बदलावा, असेही सुचवले जाते. नुकत्याच दुबईत आयपीएल क्रिकेट लढती झाल्या. त्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण सुरू असताना झळकलेली एक जाहिरात अशा बदलांचे उत्तम उदाहरण. पण हा बदल होण्यास आणि तो जाहिरातीमधून अतिशय खुमासदार पद्धतीने येण्यास २७ वर्षे लागली. या जाहिरातीची बीज पेरणी १९६०मध्ये झाली. त्यावेळचे देखणे भारतीय फलंदाज अब्बास अली बेग यांचे एका तरुणीने अचानक मैदानात शिरून चुंबन घेतले होते. तो प्रसंग अनेकांच्या स्मृतीवर कायमस्वरूपी कोरला गेला. दुसरी घटना १८ एप्रिल १९८६ रोजीची. जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत पाकिस्तानला आशिया कप मिळवून दिला. मैदानात चाहता शिरणे आणि अखेरच्या चेंडूवर षटकार या दोन्हीचे अचूक मिश्रण करणारी ओगेल्व्हे कंपनीनिर्मित, महेश मथाई दिग्दर्शित एक शानदार जाहिरात १९९४मध्ये झळकली. शेवटच्या चेंडूवर फलंदाज षटकार खेचतो आणि प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची प्रेयसी सुरक्षा रक्षकांना नृत्याच्या तालावर हुलकावणी देत मैदानात शिरते. प्रियकर, फलंदाजाला आलिंगन देते. तिच्या धाडसी प्रेमवर्षावाने तो सुखावतो, लाजतो. अशी मांडणी त्यात होती. त्यातील प्रेयसीची भूमिका करणाऱ्या शिमोना राशी रातोरात स्टार झाल्या. पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आणि एका नव्या रुपात पुन्हा ती जाहिरात २०२१ च्या आयपीएलमध्ये अवतरली. ती पाहून भारतीयच नव्हे तर जगभरातील लोक सुखावले. महिलामध्ये तर विशेष कौतुक झाले. खरेतर नवी जाहिरात जुन्याची रिमेक होती. पण त्यात एक अतिशय महत्वाचा बदल होता. तो म्हणजे अखेरच्या चेंडूवर पुरुष नव्हे महिला क्रिकेटपटू षटकार खेचते. आणि तिचा प्रियकर सुरक्षारक्षकाला हुलकावणी देत मैदानात शिरतो. तिला अभिवादन करतो. आलिंगन देतो, असा आनंदाच्या लाटा उसळवणारा बदल दाखवला आहे. मूळ संकल्पना अत्यंत प्रभावी, कसदार. उच्च दर्जाचे चित्रीकरण. पियूष पांडेंच्या शब्दरचनेला शंकर महादेवन यांचा सुरेख स्वर. शिवाय अभिनेत्री, अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील रेष न रेष काहीतरी सांगणारी. त्यामुळे जाहिरातीची परिणामकारकता हजारपटीने वाढली आहे. नव्या पद्धतीने मांडणी करताना जुन्याची मोडतोड होणार नाही. उलट नवे अधिक चैतन्यदायी होईल, याची काळजी दिग्दर्शकाने घेतली. महिला क्रिकेटपटूची भूमिका साकारणाऱ्या अन् काहीसा अलिया भटसारखा चेहरा असलेल्या काव्या रामचंद्रन चेन्नईच्या रहिवासी. तेथील रंगभूमीवर त्या काम करतात. शिवाय सुखा एज्युकेशन फाऊंडेशनमध्ये कार्यरत आहेत. हे फाऊंडेशन विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि रोजगार मिळावा, यासाठी काम करते. काव्या राष्ट्रीय जलतरणपटूही आहेत. १९९४मध्ये पहिली जाहिरात आली त्याच वर्षी त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे जुनी जाहिरात त्यांच्या कधी पाहण्यात आली नव्हती. नव्या जाहिरातीसाठी दिग्दर्शक शशांक चतुर्वेदींनी निवड केल्यावर मात्र त्यांनी ती असंख्यवेळा पाहिली, अभ्यासली. मुंबईच्या ब्रेवॉर्न स्टेडिअमवर चित्रीकरण झाले. तत्पूर्वी तीन दिवस षटकारासाठी हुकचा फटका मारण्याचा कसून सराव करून घेतला. आता त्यांच्या अभिनयक्षमतेचे जगभरात कौतुक होत आहे. त्यामुळे त्या सुखावल्या आहेत. अलिकडील काळात कित्येक महिला खेळाडू, क्रिकेटपटू स्टार झाल्या आहेत. त्यांच्याविषयीचा अभिमान या जाहिरातीत आहेच. शिवाय ही जाहिरात सामाजिक बदल नोंदवणारी, महिलांमध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण करणारी आणि आता पुरुषांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाच पाहिजे, असं सांगणारी आहे, असं काव्या सांगतात. भगवान गौतम बुद्धांनी म्हटलंय की, या जगात काहीच कायम नाही. सगळेकाही बदलत असते. ते त्रिकालाबाधित सत्य आहे. फक्त चांगल्या सामाजिक बदलांसाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. या जाहिरातीच्या रुपाने किमान त्याची सुरुवात झालीय. आता काव्या रामचंद्रन यांना पुरुषांकडून अपेक्षित असलेला बदल समाजात प्रत्यक्षात कधी येईल, याची वाट पाहावी लागणार आहे.

Tuesday 16 November 2021

गुलजार सिनेमा

सिनेमा पेराडिजो नावाचा एक नितांत सुंदर सिनेमा आहे. १९८८चा. त्यात अभिनय, कहाणी, मांडणी, दिग्दर्शन तर अप्रतिम आहेच पण सिनेमा टॉकीजची वास्तूही त्यात अभिनय करते. सिनेमा संपल्यावरही ती डोळ्यासमोर रेंगाळत राहते. खुपत राहते. खूप काही सांगत, बोलत राहते. चाळिशी ते नव्वदीत असणाऱ्या अनेक सिनेमाप्रेमींसाठी सिंगल स्क्रीन म्हणजे एक पडद्यावाली टॉकीज ही केवळ पैसे घेऊन मनोरंजन देणारी इमारत नव्हे तर एक टुमदार, उबदार घरच होते. मनापासून, हृदयापासून प्रेम असलेले. त्या घराच्या भिंतींना, पडद्यांना एक सुरेख गंध होता. टॉकीजच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे कुटुंबासारखा वाटत होता. १९७०च्या दशकात औरंगाबाद शहर म्हणजे अशा अनेक टुमदार, उबदार घरांची वसाहत होती. त्यातली एक होती गुलजार. नावच किती छान आहे ना. गुलजारला जाऊन येतो, असं म्हणताना त्या काळी मनात आनंदाच्या लाटा उसळत. जणूकाही एखाद्या आवडत्या मैत्रिणीनं बोलावलंय, असा भाव चेहऱ्यावर उमटत असे. गुलमंडीकडून पानदरिब्याकडं जाताना केळीबाजार ओलांडला की डाव्या बाजूला गुलजारचं दर्शन घडतं. आजही तिथं बाहेरच्या बाजूला जुन्या सिनेमांची भली मोठी पण अंधुक, पुसट झालेली पोस्टर्स दिसतील. पन्नास – साठ वर्षांपूर्वी ही पोस्टर्स अतिशय ठळक होती. गुलजारमध्ये कोणता सिनेमा लागणार आहे, याची घोषणा करणारा एक टांगा फिरायचा. त्याच्या दोन्ही बाजूला सिनेमाची पोस्टर्स बांधलेली असायची. मानेपर्यंत कुरळे केस रुळत असलेला, कपाळाला गंध लावलेला गुलजारचा कर्मचारी त्यात बसलेला असायचा. तो मोठ्या कर्ण्यावरून (माईक) आइए गुरुवार को देखीए पाच शो. ग्रेट गँबलर के. अमिताभ, झीनत, नीतू के साथ. असं सांगत फिरायचा. पाच-सात वर्षांची अनेक पोरं चड्डी सावरत त्या टांग्याच्या मागे मागे अक्षरश: सात-आठ किलोमीटर फिरायची. माझ्या आठवणीप्रमाणे गुलजारला कधी बिग बजेट सिनेमा पहिल्या स्लॉटमध्ये लागला नाही. रिपीटमध्ये मात्र गुलजारने कोणालाही सोडलं नाही. त्या काळी धार्मिक म्हणजे रामायण, महाभारत असे सिनेमेही गुलजारची मक्तेदारी होती. मोडकळीस आलेल्या पाच-सहाशे खुर्च्या असलेल्या या टॉकीजचा पाठिराखा दुय्यम, तिय्यम दर्जाचा प्रेक्षक होता. त्याला दर्जेदार कहाणी, सामाजिक संदेशाशी फारसे देणेघेणे नव्हते. दिवसभर काम करून आंबलेले मन मनोरंजनात बुडवून टाकण्यासाठी येथे लोक संध्याकाळ आणि रात्रीच्या शोला गर्दी करत. त्यामुळे सकाळ, दुपारचा शो म्हणजे प्रेमी, लफडेबाजांसाठी सुवर्णसंधी होती. मल्टीप्लेक्सवाले जशी गर्दी पाहून तिकिटाचा दर कमी जास्त करून टाकायचे. तशी सोय तेव्हा नव्हती. नाहीतर प्रेमी जोडप्यांकडून भलीमोठी कमाई करता आली असती. जुन्या औरंगाबादचे वैभव असलेली गुलजार टॉकीज माझ्या अंदाजाप्रमाणे दहा हजार चौरस फुट जागेत बसलेली असावी. त्यातील चार हजार खुली जागा होती. त्यावर संध्याकाळ, रात्रीच्या शोला मध्यंतरात मोठी मजा असायची. चटकदार भेळ, गरमागरम भजी, वडे, समोशाचे दोन गाडे असायचे. भल्यामोठ्या परातीत शेंगदाणे रचून त्यावर एक छोट्याशा मातीच्या भांड्यात भट्टी लावलेले तीनचारजण लोकांना खेचायचे. शिवाय गोटी सोडाची एक हातगाडी होती. त्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या, चॉकलेटी रंगाच्या बाटल्या ठेवलेल्या असायच्या. मध्यंतरात गाडीला सोडाप्रेमींचा गराडा पडायचा. सोडावाला आणि त्याचा कर्मचारी मोठ्या झोकात बाटलीचं झाकण उघडायचा. त्याचा टॉ … S S S क असा आवाज यायचा. फेस उसळायचा. सोड्याच्या चव घशात ठेवूनच लोक पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी पळायचे. गुलजारकडून थोडं पुढं सराफ्याकडं जाताना अगदी चिंचोळ्या, अंधारलेल्या गल्लीत रिगल टॉकीज होती. खरं तर एवढ्या दाटीवाटीच्या वस्तीत चांगली सहा-सातशे खुर्च्यांची टॉकीज म्हणजे आश्चर्यच होतं. पण जुन्या औरंगाबादमध्ये त्या काळात ते सहज शक्य झालं. कारण साठ-सत्तर वर्षांपूर्वी शहर फारसे गजबजलेले नव्हते. आणि निर्जन ठिकाणी टॉकीज करणं वेडेपणा. त्यामुळं मला वाटतं १९५१-५२मध्ये मालकानं योग्य निर्णय घेतला. हळूहळू रिगलला दुकानांनी घेरले. मग ती बंद पडली. आणि १९८०-८१मध्ये पुन्हा रसिकांच्या सेवेत आली. त्या काळी सोशल मिडिआ नाही. अनेक पेप्रावाले सिनेमाबद्दल सांगणं म्हणजे भ्रष्ट झालो, असा अविर्भाव आणत. त्यामुळं रिगल पुन्हा सुरू झाल्याची बातमी कळाल्यावर खूप लोक तिथं गल्लीत येऊन दुकानदारांना विचारून खात्री करून घेत. रविवार दिवस इथं खास असायचा. लष्करी छावणीतील वीस-बावीशीतले सैनिक सायकली घेऊन शहरात यायचे. किरकोळ खरेदी, एखाद्या हॉटेलात नाश्ता पाणी आणि सिनेमा असा त्यांचा बेत असायचा. मजबूत अंगकाठीच्या, उंचापुऱ्या, खळखळून हसणाऱ्या सैनिकांची गर्दी रिगलपाशी जास्त असायची. कारण काचीवाडा आणि इतर भागांतील पंधरा-वीस वेश्या तिथं दुपारच्या वेळी आलेल्या असायच्या. सैनिक येत म्हणून त्या यायच्या की वेश्यांवर तरुणाईतील गर्मी उधळण्यासाठी लष्करी यायचे, हे नक्की सांगता येणार नाही. पण मागणी तसा पुरवठ्याचा नियम यातही लागू होतोच. तर रंगरंगोटी केलेल्या, भडक रंगाचे ब्लाऊझ, साडी नेसलेल्या या वेश्या दुकानांसमोर, टॉकीजच्या दरवाजाजवळ उभ्या असायच्या. त्यांच्याजवळ तिकीटे असायची. यातील बहुतांशजणी सैनिकांपेक्षा थोड्या अधिक वयाच्या असाव्यात. तीस-बत्तीशीच्या. ज्या सैनिकासोबत त्यांचा व्यवहार पक्का होत असे. त्याला घेऊन त्या टॉकीजमध्ये जात. जणूकाही नवरा – बायको अशा झोकात डोअरकिपरला तिकीट देत. त्यालाही हे सारं माहिती असल्यानं तो गालातल्या गालात हसत असे. पण काही सैनिकांना सिनेमात स्वारस्य नसे. मग तो तिला सायकलवर बसवून मोठ्या खुशीत, शिट्टी वाजवत घेऊन जायचा. शहागंज भागातून तिला एखादं घड्याळ, साडी किंवा चप्पल खरेदी करून द्यायचा. त्या काळात किमान सैनिक-वेश्येच्या किमान तीन चार प्रेम कहाण्या रिगलच्या साक्षीने फुलल्या असतील. १९९५नंतर पुन्हा रिगल वादात अडकली आणि बंद पडली. ती कायमचीच. सात-आठ वर्षांपूर्वी विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला डर्टी पिक्चर प्रचंड गाजला. त्यात तिनं १९७० ते १९९० मध्ये प्रचंड गाजलेल्या साऊथ सेक्स बाँब सिल्क स्मिताची भूमिका केली. डर्टी पिक्चरमध्ये अर्थातच अनेक गरमागरम प्रसंगांची रेलचेल होती. शिवाय त्यातून सिल्क स्मिताच्या व्यक्तिगत जीवनाची थोडीशी माहिती सर्वांसमोर आली. कमालीची मादक, सेक्स बाँब असली तरी ती माणूस म्हणून पूर्णपणे अपयशी होती. तिनं काहीजणांचे आणि काहीजणांनी तिचं शोषण केलं. प्रेम मिळत नाही, असं म्हणून तिनं अकाली जीवन संपवलं. आणि ती प्रसिद्धीच्या आणखी एका लाटेवर आरुढ झाली. तिची औरंगाबादकरांना पहिली ओळख सदमा सिनेमातून १९८३ मध्ये झाली. पण तिचा सर्व वर्गात प्रचार, प्रसार झाला तो शहागंज सिटी चौक रस्त्यावरील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत लपलेल्या मोहन टॉकीजमध्ये. एखाद्या गोदामासारखं रूप असलेल्या मोहनची सुरुवात धर्मेंद्र – झीनत अमानच्या शालिमार सिनेमानं झाली होती. पहिला शो सकाळी आठ वाजताच होता. तुफान गर्दी उसळली होती. जेवढ्या वेगात शालिमार वर गेला तेवढ्याच वेगानं खाली आला. पुढं मोहनमध्ये मुकद्दर का सिकंदर, सरगम असे सिनेमे प्रचंड चालले. पण बहुधा बडे सिनेमा वितरक आणि मोहनच्या मालकांचा खटका उडला असावा. मोठ्या बॅनरचे, लोकप्रिय सिनेमे येणे कमी होत गेले. त्यांची जागा देशी ब्ल्यू फिल्म कॅटेगरीत टाकता येतील, अशा दक्षिणेतील सिनेमांनी घेतली. टॉकीजच्या एंट्री पॉईंटला म्हणजे अगदी वर्दळीच्या रस्त्यावर या सिनेमातील नट्यांची तुफानी पोस्टर्स लागलेली असायची. अजिंठा पेपरमध्ये भल्यामोठ्या टायपात अत्यंत उत्तेजक जाहिराती असायच्या. सोबत इतर उत्तान फोटो. तो पाहून लोक जायचे. त्यांना काहीवेळा रंगात आलेला सिनेमा ऑपरेटर थेट पाश्चिमात्य सिनेमाचा काही भाग दाखवायचा. चेकाळलेली तरुणाई ऑपरेटरची करामत मीठ मसाला लावून दहा मित्रांना सांगायची. मग काय प्रत्येक शो हाऊसफुल्ल. पाऊल ठेवायला जागा नसायची. पाच रुपयांचं तिकीट पंचवीसलाही मिळवता मिळवता मारामार व्हायची. मोहनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मागील बाजूला नाचगाण्याचे कोठे होते. शौकिन लोक सिनेमा पाहून तिथं जात. वीस – पंचवीस वर्षांपूर्वी कोठेवाल्या परागंदा झाल्या. काहीजणींनी कुंटणखाने सुरू केले. इकडे मोहनच्या इंग्रजी सिनेमा प्रेमाची महती पोलिसांकडे पोहोचली. मग त्यांनी धाडी टाकण्याचे नाटक केले. खिसे गरम होताच नाटकावर पडदा पाडला. महत्वाचा मुद्दा म्हणजे मोहनमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची मालिका सुरू होण्याच्या काळात रंगारगल्लीसह काही ठिकाणी व्हिडिओ पार्लर सुरू झाली होती. तिथं थेट ब्ल्यू फिल्म दाखवल्या जायच्या. पार्लर खच्चून भरलेले असायचे. पण एकाच वेळी वीस-पंचवीसपेक्षा जास्त शौकिनांसाठी जागा नसायची. शिवाय ब्ल्यू फिल्म म्हणजे त्यात ना कहाणी ना भारतीयपणा, ना भारतीय चेहरे. त्यामुळे पार्लरनी मोहनचे फारसे नुकसान केले नाही. मोहनचा धंदा जोरात सुरू राहिला. तो तसाच राहिलाही असता. पण म्हणतात ना की, कोणतीही गोष्ट मग ती चांगली असो की वाईट. टिपेला जाऊन तुटते. तिची घसरण होतेच. हा निसर्गाचा नियम आहे. त्याला या जगाच्या इतिहासात कोणीही आव्हान दिलेलं नाही. तर मोहनच्या गरमागरम सिनेमांना इंटरनेटचं ग्रहण लागलं. मोठ्या पडद्यावर जे काटून छाटून दाखवलं जात होतं. त्याच्या एक हजार पटींनी जास्त उघडंनागडं, बिभत्स मोबाईलवर दोन-तीन रुपयांत मिळू लागलं. मग मोहनकडं जाणाऱ्यांचा ओघ कमी कमी होत गेला. अर्थात तो अजून पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाचं संकट संपल्यावर कदाचित पुन्हा मोहन फुलेल. मोठ्या पडद्यावर सर्व काही पाहण्याची मौज लुटणारे आंबटशौकिन मोहनला तारतील. त्यावेळी बहुधा शहागंजातील स्टेट टॉकीजशी मोहनची स्पर्धा असेल. कारण स्टेटमध्येही १९९० नंतर अश्लिल सिनेमांचे माहेरघर तयार झाले. खरेतर स्टेट म्हणजे औरंगाबादच्या सिनेइतिहासाचा मानबिंदू. अनेक मोठ्या कलावंतांनी स्टेटला भेट दिली. हिंदी सिनेमा जगात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेलेला शोले इथेच लागला होता. तेव्हा औरंगाबादलगतच्या खेड्यातून लोक टांगा, बैलगाडीनं येत. स्टेटच्या आवारात टांगा, बैलगाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था होती. तेव्हाच्या पेप्रात स्टेटच्या मालकांविषयी बरंच चांगलं छापून येत असे. मुबलक पैसा बाळगणाऱ्या स्टेटच्या मालकांना बहुधा कौटुंबिक अडचणींनी ग्रासलं असावं. त्यामुळे त्यांचे लक्ष कमी होत गेले. वितरकांशी संबंध बिघडले असावेत. त्यामुळे चांगल्या सिनेमांचे प्रमाण झपाट्याने घसरत गेले. त्याऐवजी भडक सिनेमे झळकू लागले. इंटरनेटच्या आक्रमणानं मोठ्या पडद्यावरील सेक्सचे आकर्षण संपवून टाकले. त्याचा परिणाम स्टेटवर होत गेला. कोरोनापूर्वीच्या तीन-चार वर्षात स्टेट फक्त बातम्यांपुरतीच चर्चेत राहिली. जवळपास मोहन, स्टेटएवढेच आयुष्य आणि त्याच स्वरूपातील अडचमी असलेल्या सादिया टॉकीजने कधी कायमस्वरूपी आंबट मार्ग स्वीकारला नाही. जुन्या औरंगाबादच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सादियाला समोरच्या बाजूनं मोठं मोकळं मैदान लाभलं होतं. इथं औरंगाबादकरांना नेहमीच चांगले सिनेमे पाहण्यास मिळाले. अधूनमधून इंग्रजी सिनेमेही लागत पण तेही दर्जेदार असतील, याची काळजी टॉकीजमालक घेत. मल्टीप्लेक्सचे युग सुरू झाल्यावरही ते सिंगल स्क्रिनवर कायम राहिले. त्याचा तोटा त्यांना झाला. हक्काचा प्रेक्षक कमी कमी होत गेला. सादियाच्या कँटीनमध्ये त्या काळात मिळणारे सँडविच अफलातून होते. अत्यंत चविष्ट असे हे सँडविच खाण्यासाठी ठिकठिकाणाहून खवय्यै येत. तृप्त होऊन जात. आता जर तो सँडविचवाला असता तर नक्कीच वर्षभरात लखपती आणि नंतर करोडपती झाला असता. मल्टीप्लेक्स अवतरण्यापूर्वी औरंगाबादचा सिनेमा अंजली टॉकीजनं बदलला. १९८१मध्ये सावे कुटुंबियांनी सुरू केलेल्या अंजलीनं दर्जेदार सेवा म्हणजे काय याचा अनुभवर रसिकांना दिला. प्रशस्त जागा. आरामदायक खुर्च्या आणि उच्चप्रतीचा पडदा, असा त्रिवेणी संगम अंजलीत होता. भारतातील सर्व मोठ्या वितरकांशी सावे कुटुंबियांची थेट ओळख असल्याने त्या काळात सर्वोत्तम सिनेमे अंजलीतच येत. जेम्स बाँड, उर्सूला अँड्रेसच्या सिनेमांचे दर्शन अंजलीनेच घडवले. सुपरमॅन, सुपरवुमन असे हॉलिवूडपट येथेच पाहण्यास मिळाले. एवढेच नव्हे तर नट-नट्यांच्या पत्रकारांशी गप्पा असा नवा ट्रेंड त्या वेळी सावेंनी सुरू केला. टॉकीजवर टॉकीज हा प्रकारही औरंगाबादकरांनी अंजली – संगीताच्या रुपात पाहिला. संगिता म्हणजे आजकालच्या मल्टीप्लेक्ससारखं रूप होतं. फार झालं तर दीड-दोनशे खुर्च्या होत्या. त्यात लोकांना बऱ्यापैकी मराठी आणि दुय्यम दर्जाचे हिंदी सिनेमे पाहण्यास मिळत. औरंगाबादमध्ये नव्या संस्कृतीचा पाया रचणारी आणखी एक टॉकीज होती सत्यम. रेल्वे स्टेशन एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला सत्यमची सुंदर, आखीव, रेखीव इमारत होती. हॉरर इंग्रजी सिनेमे पाहायचे असतील तर सत्यमशिवाय पर्यायच नाही, अशी १९९०मध्ये स्थिती होती. इंग्रजीप्रेमी रसिकांची चांगली गर्दी होत होती. पण तेवढ्यावर बहुधा टॉकीजचा खर्च चालत नसावा. सिनेमे आणून लोकांचे मनोरंजन करण्यापेक्षा निवासी इमारती बांधून पैसा कमावणं टॉकीजमालकाला सोपं वाटलं असावं. एक दिवस सत्यम बंदची घोषणा झाली. रॉक्सी टॉकीजचंही हेच झालं. तिथं आता दुकानंच दुकानं झाली आहेत. एकीकडं असं चित्र असताना मोक्याच्या जागेवरील अंबा-अप्सरा, अभिनय, अभिनित टॉकीज सर्व संकटांना तोंड देत उभ्या आहेत. औरंगाबादेतील सिनेमाहॉल संस्कृती टिकवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या मालकाला, व्यवस्थापनाला जेवढे सलाम करावेत, तेवढं कमी आहे. चार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका महाकाय माध्यम समूहाच्या एमडींनी सिनेमा टॉकीजचे काय होणार ते सांगितले. ते म्हणाले होते की, नेटफ्लिक्स ही अमेरिकन कंपनी पुढील काही वर्षांत भारतामध्ये किमान २५ हजार कोटी रुपये ओतणार आहे. बिग ते लो बजेट सिनेमे मोबाईलवरच रसिकांना पाहण्यास मिळावेत, अशी व्यवस्था नेटफ्लिक्स करणार आहे. त्यामुळे मल्टीप्लेक्स संस्कृती येत्या काही वर्षांत मोडकळीस येणार आहे. अर्थात भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. सिनेमा ही टॉकीजमध्ये जाऊनच पाहायची गोष्ट असते, यावर ठाम विश्वास असलेले कोट्यवधी लोक आहेत. त्यामुळे मल्टीप्लेक्स सुरू राहतील. फक्त मध्यम, उच्च मध्यमवर्गीय रसिक मोबाईलवर झपाट्याने वळेल. त्यामुळे टॉकीजची भरभराट होणे कठीण आहे. हळूहळू त्यांची आर्थिक गाडी घसरू लागेल. दहा-बारा वर्षांत हे सर्व होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. तो दोन वर्षांतच खरा ठरू लागला आहे. अर्थात त्यात कोरोनाचा वाटा खूप मोठा आहे. पण एक गोष्ट अत्यंत सत्य आहे की, संकटं कायमस्वरूपी मुक्कामी नसतातच. एकदा माणूस लढण्यासाठी तयार झाला की ती माघार घेतात. पळून जातात. त्यामुळं येत्या वर्षाच्या मार्चमध्ये कोरोना अखेरचे आचके घेत असेल. तोपर्यँत टॉकीज नव्या रुपात, पूर्ण ताकदीनं उभ्या राहतील. मोबाईलमधून बाहेर पडलेल्या रसिकांच्या वर्दळीनं गजबजतील. मल्टीप्लेक्सची जागा वेगळ्याच रचनेतील सिंगल स्क्रिन घेतील. टॉकीज संस्कृती मोडीत काढण्याचं नेटफ्लिक्सवाल्यांचं स्वप्न मोडीत निघेल. उलट ते त्यांचे सिनेमे टॉकीजमध्ये दाखवू लागतील. सिनेमाच्या मध्यंतरामध्ये पुन्हा सोड्याच्या बाटलीची झाकणं टॉ … क असा आवाज करून उघडू लागतील. वडे, भेळ, समोसे, भज्यांचा गंध दरवळेल. औरंगाबादचं जग गुलजार होऊन जाईल, असं वाटतंय.

Wednesday 10 November 2021

फाळणी : द्वेषाची पेरणी

धर्म, जात असं काही नसतं. शेवटी माणुसकी हाच खरा धर्म. धर्म म्हणजे अफुची गोळी. धर्माच्या आधारावर निर्माण होणाऱ्या राष्ट्राचे काही खरं नाही, असा प्रचार, प्रसार गेल्या काही वर्षांपासून जगभरात सुरु असला तरी प्रत्यक्षात धर्म, जातीभोवतीच गेली किमान दहा हजार वर्षे पृथ्वी फिरत आहे. माणुसकीचा अनुभव वैयक्तिक पातळीवर येत असला तरी मानवी समूहातून ती केंव्हाच परांगदा झालीय. धर्माच्या नावाखाली निर्माण झालेली बहुतांश राष्ट्र बऱ्यापैकी जगत आहेत. खडतरपणे का होईना पाकिस्तान, बांगलादेश या कट्टर इस्लामी देशांची वाटचाल सुरु आहे. ते भारतात सामिल, विलीन होण्याची शक्यता नाही. पश्चिम आणि पूर्व जर्मनीसारखं भारतीय उपखंडात होणे नाही. कारण दुसऱ्या महायुद्धातील विजयानंतर कम्युनिस्ट आणि भांडवलशाही शक्तींनी जर्मनीचे राजकीय विचारसरणीनुसार तुकडे पाडून घेतले होते. दोन्ही बाजूंच्या जर्मनांमध्ये एकमेकांविषयी खरेच प्रेम होते. रक्ताच्या थेंबाथेंबात मुरलेल्या धर्माचा, त्यातील द्वेषाचा मुद्दा नव्हता. बर्लिनची भिंत पाडण्यासाठी दोन्ही बाजूंचे लोक धावले होते. तशी स्थिती इथे नाही. उलट कमालीचा द्वेष पसरला आहे. फाळणीने तो कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट लढतीत त्याचा अनुभव आला. भयंकर महायुद्ध. ते भारत जिंकणारच. जिंकायलाच हवे, अशी मिडिआवाल्यांनी हवा तयार केली. तशा बातम्या छापून आणल्या गेल्या. दाखवल्या गेल्या. आणि भारताने हजार टक्के सपाटून मार खाल्ला. मग भारतातील कश्मिर प्रांताच्या तरुणांनी पाक जिंकल्याचा जल्लोष साजरा केला. त्यानं भारतात पाकविषयी धार्मिक द्वेष आणखी वाढला. खरं तर दोन कब्जेदारांत प्रॉपर्टीची वाटणी झाली. सुरुवातीची काही वर्षे दोघेही जे हवे ते मिळाले म्हणून खुश होते. हलके हलके का होईना एकमेकांचे गोडवे गात होते. त्यामुळे झालं ते बरंच झालं. धार्मिक द्वेष आटोक्यात राहिल, असं जगाला वाटू लागलं. पण नंतर गोडव्याचे सूर अत्यंत कडवट, हिंसक होत गेले. एकाच्या दोन फाळण्या होऊन भारत, पाकिस्तान, बांगलादेशात कायम अस्वस्थता आहे. तिन्ही देशांतील लोक भूभागाचे तुकडे करण्यातून द्वेषापलिकडे काहीही शिकलेले नाहीत. अडीच महिन्यांपूर्वी अफगणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यावर जी राजकीय, सामाजिक, आर्थिक समीकरणे तयार होत आहेत. देशांच्या सीमेवर ज्या घडामोडी होत आहेत. तिन्ही देशात आणि आसपास राजकारण जे वळण घेत आहे. ते पाहता फाळणीविषयी प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार विचारमंथन करणे आवश्यक आहे. या मंथनासाठी प्रतिभा रानडे यांचे फाळणी ते फाळणी हे दस्तावेजी पुस्तक भरीव मदत करते. येणाऱ्या काळात काय घडू शकते, याचे संकेत देते. फाळणीच्या पोटात दडलेला द्वेष समजून घेण्यात, समजावून सांगण्यात महत्वाची भूमिका बजावते. एक तपापूर्वी म्हणजे २००९ मध्ये राजहंस प्रकाशनातर्फे ‘फाळणी ते फाळणी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्या वेळेपेक्षा आता त्यातील माहितीमूल्य निश्चित वाढले आहे. काही संदर्भ अधिक खोलवर जाऊन काही सांगत आहेत, असे लक्षात येते. रानडेंनी इतिहासकाराप्रमाणे अतिशय चिकाटी, तटस्थपणे फाळणीचा, पाकिस्तान जन्माचा अभ्यास केला. त्यासाठी आवश्यक पुस्तके अमेरिकेतून मिळवली. मुंबई विद्यापीठातील एशियन सर्व्हे आणि इतर देशी-विदेश नियतकालिकांचे वर्षानुवर्षांचे अंक अभ्यासण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यामुळेच त्यांना या चार प्रकरणांच्या २०९ पानी पुस्तकात सामान्य वाचकांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या अनेक गोष्टी सांगता आल्या आहेत. उदा. फारुख अब्दुल्लांचे वडिल शेख अब्दुल्ला पाकिस्तानकडे कसे झुकले होते, याची माहिती त्या देतात. मोहंमद अली जिनांनी २३ जुलै १९४३ रोजी फाळणीविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेण्याचे ठरवले होते. आणि या भेटीची बातमी पेप्रांमध्ये प्रसिद्ध होऊ नये, अशी व्यवस्थाही केली होती, असं त्या सांगतात. १९५३ साली लाहोरमध्ये अहमदिया पंथियांचे शिरकाण झाले. त्याच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती मोहंमद मुनीर, कयानी यांचा आयोग नेमण्यात आला. त्याच्यासमोर घटना समितीचे सदस्य भूपेंद्रकुमार दत्त, राजकुमार चक्रवर्ती काय म्हणाले. आणि शेवटी न्यायमूर्ती मुनीर यांनी काय् अहवाल दिला, या सह रानडे यांनी पानापानांवर सांगितलेल्या अनेक गोष्टी चारही दिशांना चौकसपणे पाहण्यास सांगतात. मिडिआतून जे पेरले जाते. त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असा संदेश देतात. विशिष्ट अजेंडा ठरवून काहीजण काहीही लिहित, बोलत असले तरी प्रत्यक्षात काय घडते, हेच महत्वाचे असते. म्हणून ऐतिहासिक तथ्य, पुराव्यांतून मांडणी करणारे ‘फाळणी विरुद्ध फाळणी’ पुस्तक आता नव्या घडामोडी डोक्यात ठेवून अभ्यासू मनाने वाचावे असे नक्कीच आहे.