Thursday 25 June 2020

त्याला शारियाचा खून करायचा होताॽ

सूरजभानसिंग आता पंचेचाळिशीत पोहोचले होते. पंचवीस वर्षांपूर्वी ते गावाकडून शहरात आले. तेव्हा त्यांच्याकडे खिशात चारशे रुपये आणि रोजच्या वापराचे कपडे ठेवण्यासाठी पिशवी होती. आज ते एका तीन मजली घराचे मालक होते. सहा भल्या मोठ्या चारचाकी त्यांच्याकडे होत्या. सर्वात गजबजलेल्या भागात पॉश गणल्या जाणाऱ्या इमारतीतील एक अख्खा मजला त्यांच्या केएस ॲडस् कंपनीचा होता. किमान साठजणांची कुटुंबे ते चालवत होते. दरमहा चाळीस लाखांची उलाढाल करत होते. हे सारे त्यांना कसे साध्य झाले. याच्या सुरस कहाण्या अधूनमधून वर्तमानपत्रांमध्ये झळकायच्या. एका खेडेगावात गरिब माता-पित्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ते जेमतेम दहा वर्षांचे असताना त्यांचे आई-वडिल पुरात वाहून गेले. मग नातेवाईकांच्या घऱी तालुक्याच्या गावात त्यांनी आश्रित म्हणून राहणे सुरू केले. तेथेच शिक्षण घेतले. उत्तम चित्र काढण्याची कला त्यांच्यात अंगभूत होती. कॉलेजातील शिक्षकांनी त्यांना शहरात जाऊन याच गुणावर नोकरी शोध, असा सल्ला दिला. त्यानुसार ते मॉरिस बुकानन यांच्या केएक्स ॲडस कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून दाखल झाले. अंगभूत कला, जिद्द, चिकाटीमुळे ते पाहता पाहता एक एक पायरी चढत गेले. एकवेळ अशी आली की, बुकानन यांनी इंग्लंडला कायमस्वरूपी परतण्यापूर्वी अख्खी कंपनी त्यांच्या ताब्यात देऊन टाकली. हे सगळे सुरू असताना सूरजभानसिंग यांचे तालुक्याला शिक्षण करणारे त्यांचे मामा त्यांच्या मुलीला म्हणजे सुमित्राला घेऊन आले. दिसायला बऱ्यापैकी असलेल्या मुलीचा स्वीकार कर असे मामाचे म्हणणे होते. सूरजभान यांच्या कर्तृत्वाचा सूर्य नुकताच उगवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यांनी फारसा विचार न करता सुमित्राचा स्वीकार केला. तिचा पायगुणही कदाचित कारणीभूत असावा. सूरजभानसिंग यांची प्रगती लग्नानंतर वेगात झाली. त्याबद्दल त्यांच्या मनात सुमित्राबद्दल विलक्षण आदर होता. पण कंपनीत काम करणाऱ्या आणि इतर निमित्ताने भेटणाऱ्या लक्षवेधी, खट्याळ, चटपटीत महिलांपासून अंतर राखणे त्यांना गेल्या पाच वर्षांत शक्य झाले नव्हते. आयुष्यात जी सुखे कधी मिळाली नाही. ती दैवयोगाने चालून येत असतील तर आपण का टाळावीत, असा प्रश्न त्यांच्यापुढं होता. त्यामुळे कंपनीतील सिनिअर आर्टिस्ट भारती, अनिता आणि एका मॉलची व्यवस्थापक शारिया अशा तिघांशी त्यांनी प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. भारती विवाहित होती. तर उच्चभ्रू कुटुंबातील शारियाचे राजदीप आणि अब्राहमशी घटस्फोट झाले होते. आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी सूरजभानसिंग तिघींना भेटत. या साऱ्या कामात त्यांचा आधार होता ड्रायव्हर काशिनाथ. मालकाचं हे आयुष्य त्यानं मनाच्या गुपित तिजोरीत बंद करून ठेवलं होतं. अगदी महिनाभरापूर्वी शारियाशी मालकांनी विवाह केला. ही खबरही त्यानं सुमित्रासह कुणाला कळू दिली नाही. ‘मालक हेच माझं विश्व’ असं तो सांगायचा. अर्थात त्याचा जीवलग मित्र, अनिताचा एकेकाळचा सहकारी असलेल्या कल्याणसिंगला हे मान्य नव्हतं. तो तुला महिन्याला फक्त दहा हजार देतो आणि त्या बायकांवर एका रात्रीत दहा हजार उधळतो, असं तो वारंवार म्हणायचा. पण काशिनाथ ठामपणे मालकावर कोणतंही संकट येता कामा नये, अशी प्रार्थना करायचा. मात्र, नियतीला बहुधा हे मान्य नसावं. एक दिवस शारियाची मोलकरीण नेहमीप्रमाणे फ्लॅटवर पोहोचली. दहा मिनिटं बेल वाजवूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं तिनं आरडाओरड केली. दरवाजा तोडला तर आत शारियाचा मृतदेह पडला होता. पोलिस इन्सपेक्टर नरवडे घटनास्थळी दाखल झाले. कपाटातून पन्नास हजार रोख आणि एक लाखाचा हार गायब झाला होता. नरवडेंसमोर अनेक संशयित होते. त्यांनी अचूक आरोपी शोधला. कोण असावा तोॽ

खुशवंतसिंह ... सुशांतसिंह आणि आनंदी जगण्याची सहा सूत्रे

काय भयंकर लिहिलंय. पूर्ण अश्लिल आहे. महिला-पुरुष संबंधांची अशी कुठं वर्णनं असतात काॽ याला साहित्य म्हणणं म्हणजे पाप आहे पाप. ही पिवळी पुस्तके आहेत. पहिल्यांदा बंदी घातली पाहिजे यावर, असं म्हणत म्हणत ज्यांची पुस्तके सर्वात जास्त वाचली गेली. अनेक पुस्तकांच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघाल्या. ज्यांना जगभरातील उच्च वर्तुळात महत्वाचे स्थान मिळाले. जे कायम चर्चेत राहिले, असे एकमेवद्वितीय प्रख्यात, वादग्रस्त लेखक म्हणजे खुशवंतसिंह. 
चार वर्षांनी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल. जगण्यातला प्रत्येक दिवस ते अत्यंत आसोशीने, दिलखुलासपणे जगले. श्रीमंत कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांच्यापुढे आर्थिक विवंचना नव्हती. उच्च शिक्षणात काहीही अडचण आली नाही. कौटुंबिक पातळीवर सारेकाही स्थिरसावर होते. पण नव्व्याण्णव वर्षांच्या प्रदीर्घ काळात त्यांच्यासमोर कधी संकटे आले नाहीत. त्यांच्या जीवनात वादळे घोंगावली नाहीत, असे नाही. त्यांनीही वेळोवेळी याचा सामना केला. यातली काही प्रकरणे तर त्यांनी स्वतःहून ओढावून घेतली होती. ते ज्या क्षेत्रात अखेरपर्यंत वावरत होते. तेथे महिलांविषयी लेखणी मनसोक्त चालवल्याने वादात ओढले गेले. त्यालाही ते मनापासून सामोरे गेले. कोर्टात चकरा मारत राहिले. प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होताना कधी गटांगळ्या खाल्ल्या. कधी लाटेच्या धारेवर आनंदाने नाचले. कोणाच्या जीवनाशी, स्वभावाशी इतरांची तुलना होऊच शकत नाही. इथला प्रत्येक जीव दुसऱ्यापेक्षा वेगळा आहेच. तरीही प्रत्येकाने जगणं पूर्ण मनापासून जगलं पाहिजे.  अर्धवट अवस्थेत जग सोडून जाता कामा नये, अशी अपेक्षा आहे.
गेल्या आठवड्यात तरुण पिढीतील उमदा अभिनेता सुशांतसिंह राजपूतने अचानक जीवन संपवून टाकले. त्याचे असे जाणे धक्कादायक, त्रासदायक आहेच. पण, कोरोना लॉकडाऊनने आधीच भयभीत झालेल्या कोट्यवधी लोकांवर त्याचा खोलवर परिणाम झाला आहे. आपल्याही आयुष्यात अस्थिरता आली आहे. पुढे हातांना काम मिळणार की नाही, अशा शंकेने त्यांना ग्रासले आहे. ज्या व्यक्तीला आपले मानले. ती दुसऱ्या कोणामध्ये गुंतल्याचं लक्षात येऊ लागलंय. त्यामुळं आपणही स्वतःला संपवले पाहिजे, अशी भावना अनेकजण मानसोपचारतज्ज्ञांकडे व्यक्त करत आहेत. ते ऐकून वादळांना अंगावर घेत लढण्याऱ्या खुशवंतसिंहाची आठवण झाली.  ते अभिनेते किंवा रंगमंचावरील कलावंत नसले तरी क्रिएटीव्ह जगातील मातब्बर होते. ज्या गोष्टींना समाजातील एक वर्ग नावे ठेवतो. अश्लिल मानतो. त्या खरेतर जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्यापासून लपता, पळता येणार नाहीच, असं खुशवंतसिंह कायम सांगत राहिले.  
‘खुशवंतसिंह की संपूर्ण कहानियाँ’ नावाचे एक पुस्तक आहे. यात एका ठिकाणी ते म्हणतात, मला भेटणाऱ्या बढाईखोरांना मी बोलण्यासाठी भाग पाडतो. आणि ते जे काही रचून सांगतात. त्यात मी कथाबीज, व्यक्तिरेखा शोधत राहतो. म्हणजे जगण्यासाठी काहीतरी निमित्त शोधावे लागते. आणि त्या निमित्ताभोवती गुंतावे लागते. 
सुशांतसिंहच्या अकाली जाण्यानंतर सिनेमासृष्टीत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. याच्यामुळे तो गेला. त्याच्यामुळे त्याने फाशीचा दोर हाती घेतला, असे म्हटले जात आहे. त्यात तथ्य असेलही. पण मूळ कारण जगण्यासाठी सबळ कारण सुशांतसिंहकडे नसावे. ते त्याने शोधले नाही, असे वाटते. 
प्रख्यात लेखक, प्रकाशक अशोक चोप्रा यांनी ‘रोचक आठवणींची पाने‘ पुस्तकात जे लिहलंय त्यावरून खुशवंतसिंह यांनी लेखनाभोवती स्वतःला किती, कसे गुंतवून ठेवले होते, हे कळते. चोप्रा म्हणतात, मार्च १९८० चे शेवटचे दिवस. मी हिमाचल प्रदेशातील कसौली येथील राज व्हिलामध्ये खुशवंतसिंहांचा पाहुणा म्हणून राहतोय. येथे खुशवंतसिंह वर्षातून निदान तीनदा विश्रांतीसाठी येऊन राहतात. विश्रांती-सुट्टी हे शब्द कदाचित गैरलागू  आहेत. कारण नेहमीच्या घरीही त्यांचा दिवस असाच असतो. भल्या पहाटे उठून न्याहारीपर्यंत लेखन काम करणे, वृत्तपत्रवाचन, पुन्हा जेवणापर्यंत लेखन. मग वामकुक्षी, पुन्हा ५ वाजेपर्यंत लेखन. नंतर तासाभराची चालत चक्कर. घरी परत आल्यावर एकांतात बसून तीन प्याले मद्यपान किंवा कसौलीतल्या कुणा महत्वाच्या व्यक्तीबरोबर नर्मविनोदासह पेयपान. रात्री ९ वाजता झोप.
अशा या खुशवंतसिंहांनी आनंदी जगण्यासाठी सांगितलेली सूत्रे काहीजणांना माहिती असावीत. ती अशी.
१. उत्तम आरोग्य  - जर तुम्ही पूर्ण तंदुरुस्त नाहीत. तर तुम्ही कधीही खुश राहू शकत नाही. आजारपण छोटे असो की मोठे. तुमचा आनंद हिरावून घेते. 
२. थोडीशी पुंजी – चांगले जीवन जगण्यासाठी खूप श्रीमंत असणं गरजेचं नाही. पण बाहेर जेवण, सिनेमा पाहणं, समुद्र पर्यटनासाठी तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही खुश राहू शकता.
३. स्वतचं घर – अगदी एक खोली असली तरी चालेल पण स्वतःचं घर हवं. घरासमोर छोटीशी बाग असेल तुमचं जीवन खूप आनंदी होऊ शकतं. 
४. समजंस जीवनसाथी – हे नसेल तर जीवन नरक होईल.
५. द्वेष सोडा – कोणी तुमच्यापेक्षा प्रगती करत असेल. तर त्याचा द्वेष करणे सोडा. कारण तो करता करता तुम्ही स्वतः कधी खाक होऊ लागतात, तेच लक्षात येणार नाही.
६. चुगल्या थांबवा – चुगल्या करणे, अफवा पसरवणे, एखाद्याला माघारी शिव्या देणे ताबडतोब सोडा. कारण हे करणं तुम्हाला खूप थकवते. मेंदूत विष निर्माण करते. 
खुशवंतसिंह हे एक अजब रसायन होतं. जगण्याकडं ते गंभीरपणे पाहत होते. सुशांतसिंहसारख्या हळव्या मनाच्या तरुणाईने, तमाम कलावंत, लेखकांनी त्यांची सूत्रे अंमलात आणली तर जगणं बहारदार होईल, नाही काॽ

Sunday 21 June 2020

आपली रेष मोठी होईलॽ

लॉकडाऊनमध्ये बहुतांश लोक इंटरनेटवर तुटून पडले. कारण मनोरंजनासाठी दुसरा पर्याय नव्हता. बहुतांश मराठी घरांमध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन, मॅक्स प्लेअर, झी हाच आधार आहे. तमाम हलक्या फुलक्या, विनोदी मालिकांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. साऊथचे अक्षरश: शेकडो हिंदी डब सिनेमे एकापाठोपाठ एक पाहणे सुरू आहे. त्यात राजामौलींचा बाहुबलीअजूनही हिट आहे. तो आणि इतर अनेक साऊथ सिनेमे पाहताना असे वाटत होते की, मराठीमध्ये एवढी भव्य, दिव्य, वैविध्यपूर्ण निर्मिती होऊ शकते काॽ कदाचित लवकरच. पण त्यासाठी काही गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील. त्यातील पहिली म्हणजे भाषा, राहणीमान, खान-पान आदी मुद्यांवरून कलावंतांनी इतर प्रांतीयांची टिंगल टवाळी उडवणे तत्काळ थांबवले पाहिजे. उलट त्यांच्यातील काही चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत. कठोर मेहनत, कल्पकता, नाविन्य, मानवी मूल्ये हेच कला निर्मितीचे प्रमुख सूत्र असले पाहिजे. दुसऱ्याची रेष पुसल्याने काही होऊ शकत नाही. आपल्याला मोठी रेष ओढावी लागेल. हा संदेश मराठी माणसाच्या मनामध्ये मराठी एकांकिका, नाटक, मालिका, सिनेमांमधून सातत्याने पेरण्याचे काम मराठी कलावंतांना खूप मनापासून करावे लागणार आहे.

 

आपल्यापैकी अनेकजण दाक्षिणात्यांना कितीही नावे ठेवत असले. लुंगीवाले, मद्रासी, कारकुंडे असे म्हणत त्यांना नावे ठेवण्याचा अभिमान बाळगत असले तरी ती मंडळी आपल्यापेक्षा अफाट, अचाट विचार करतात. तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाची बाजी लावतात, हे तुम्ही, आम्ही मान्य केले नाही तरी सत्य आहे. कितीही झाकून ठेवले तरी ते जगाला कळतेच. या अशा अफाट, अचाटपणामुळे त्यांच्यात अतिशयोक्तीची परंपरा निर्माण झाली असे म्हटले तरी अतिशयोक्ती किती अद्‌भुत, कलात्मकतेने, ताकदीने करता येऊ शकते, हे देखील त्यांच्याकडे पाहूनच शिकावे लागेल. अनेक प्रांतात साऊथवाली मंडळी आपल्यापुढे गेलेली आहेत. त्यातील एक म्हणजे सिनेमा. मराठी माणसाचे बोट धरून त्यांनी सिनेमाची निर्मिती सुरू केली. आणि पाहता पाहता ते आशय, विषय, कथानक, मांडणी, चित्रीकरण, पटकथा, भडकपणा, मसाला या साऱ्यामध्ये आपल्या पुढे निघून गेले आहेत. केवळ मराठीच नव्हे तर सर्व भाषिकांवर त्यांची मोहिनी चालत आहे.

 

बाहुबली, थडम, एट बुलेटस् किंवा इतर अनेक सिनेमे पाहून दक्षिणेतील मंडळी किती वैविध्यपूर्ण निर्मिती करू शकतात. साध्या कहाणीला भावना, तत्वांची जोड देत, एक ठोस संदेश सांगत कसे खिळवून ठेवतात. तंत्रज्ञानाचा वापर करून तोंडात बोटेच नव्हे तर पूर्ण हात घालायला लावतात, याची प्रचिती येते.

 

तसं पाहिलं तर बाहुबलीची कहाणी घिसीपिटी. शेकडो हिंदी मसाला सिनेमात येऊन गेलेली. म्हणजे एक चांगला माणूस असतो. त्याचे एक छान कुटुंब असते. एक दिवस एका दुष्ट माणसाची त्याच्यावर छाया पडते. तो कुटिल कारस्थान करून चांगल्या माणसाचा संसार उद्ध्वत करतो. पण देवाची कृपा म्हणून त्या चांगल्या माणसाचा छोटा मुलगा वाचतो. पुढे चालून हा छोटा मुलगा मोठा होऊन दुष्ट माणसाचा खात्मा करतो. बाहुबलीत हेच कथानक मांडण्यासाठी एक दीड हजार वर्षापूर्वीचा काळ निवडला आहे. त्यात दाखवलेले राज्य दाक्षिणात्य असले तरी त्यात इतर राज्यांचा दु:स्वास नाही. दक्षिणेत एकेकाळी एवढे संपन्न राज्य होते, असे दर्पाने सांगणारे एकही वाक्य नाही. प्रसंगही नाही. 

 

राजामौलीचा हा सिनेमा केवळ मनोरंजन करत नाही तर राजसत्ता कशी असावी, याचाही संदेश देतो. त्यात रामय्याच्या तोंडी एक वाक्य आहे.  ती म्हणते शत्रूपासून गोरगरि प्रजेचे रक्षण करणे हेच केवळ राजाचे कर्तव्य नाही. तर शत्रूशी लढताना गरिबांचे, प्रजेचे प्राण जाणार नाही, याचीही काळजी घेतो तोच खरा राजा.

 

बऱ्याच वेळा समान ताकदीचे, एकसारखी क्षमता असलेले दोन लोक प्रगतीच्या वाटेवर दीर्घ काळ सोबत चालतात. त्यातील एकजण पुढे निघून जातो. लोकप्रिय होतो. लोकांच्या हृदयावर राज्य करू लागतो. असे का होते...कारण फक्त ताकदीने जनतेच्या मनावर ताबा मिळवता येत नाही. त्यासाठी चांगुलपणा अत्यावश्यक असतो. त्यापुढे सगळी शक्ती, बळ फिकी पडतेच. सुरुवातीच्या काळात बळ, शक्ती, डावपेच पुढे जाताना दिसले तरी अखेरच्या टप्पयात चांगुलपणाच त्यावर मात करत लोकांची मने कायमसाठी जिंकतो. म्हणूनच तर चांगुलपणाचे बीज फार कमी लोकांना सापडते. बोटावर मोजण्या इतक्यांना ते फुलवता येते आणि एखाद्यालाच ते जगवता, वाढवता, पेरता येते. असा एखादाच मग बाहुबली होतो. किमान मराठी कलावंतांनी हे लक्षात घ्यावे, असे लॉकडाऊनच्या काळातील चिंतन सांगते.

 


Saturday 20 June 2020

लपून-छपून प्रेम...

प्रभा म्हणजे गजबजलेल्या भाजी बाजाराची शान होती असं म्हटलं तर वावगं ठरलं नसतं. भल्या पहाटे ती मोठ्या मार्केटमधून भाज्यांची गाठोडी घरी आणायची. काही भाज्या हातगाडीवर रचून पुतण्या रवीला शहरभर फिरण्यासाठी पाठवायची. मग स्वतः रिक्षात भाजी लादून बाजारात पोहोचायची. हारुनच्या मदतीनं मोठ मोठी गाठोडी उतरवून घ्यायची. तिथं तिच्या नवऱ्याच्या प्रभाकरच्या नावावरील गाळा होता. नवऱ्याकडून फार काही मिळालं नाही. पण गाळा तर पदरात पडला. महिनाकाठी वीस हजार मिळतात, याचं समाधान होतं. प्रभाकर एका कंपनीत कामगार होता. अपघातात हात मोडल्यावर मिळालेले ५ लाख रुपये त्यानं बँकेत गुंतवले. व्याजाच्या पैशातून भिशी सुरू केली. त्याची साखळी चांगली सुरू झाली होती. दर महिन्याला चांगला पैसा येत होता. प्रभा जेवढं खूप मेहनत करून कमावत होती. तेवढं तो घरबसल्या मिळवू लागला होता. रवीची कमाईही वाढत होती. आणि प्रभाची तर गोष्टच काही वेगळी होती. ती पूर्ण भाजी बाजाराची लीडर होती. काही वर्षांपूर्वी तिने कुख्यात गुंड अझीमची भर बाजारात धुलाई केली. त्याच्या हातातला चाकू हिसकावून घेत त्याच्याच मांडीत खुपसला होता. तेव्हापासून प्रभा म्हणजे सगळ्या विक्रेत्यांसाठी जीव की प्राण होती. अनेकजण तिच्या प्रेमातही पडले होते. कारण ती होतीच तशी. जेमतेम तिशीची. काळी-सावळी, तरतरीत, साडेपाच फूट उंची. भेदक डोळे आणि खळखळून, मनमोकळं हसणं. तिच्या गाळ्यासमोर चहाचं दुकान चालवणारा वासुदेव पागल होऊन चालला होता. त्याची बायको वर्षभरापूर्वी निर्वतली. तेव्हापासून तर प्रभाशी आपले सूत जुळले आहे, असे स्वप्न तो पाहायचा. पण प्रत्यक्षात सांगण्याची कधीच हिंमत होत नव्हती. तसे तिच्याशी त्याचे संबंध अगदी चांगले होते. प्रभाकरचा अपघात झाला. तेव्हा त्यानं पैसे दिले. दवाखान्यात तो त्याची विचारपूस  करण्याच्या निमित्ताने तिला पाहायला जायचा. पण वासुदेव एकटाच तिच्या मागं लागला होता, असं नाही. शेजारचा गाळेवाला हारुन, भाजी मार्केट समितीचा अध्यक्ष फुलचंद, नगरसेवक लक्ष्मीकांत तिच्या आशेवर होते. त्यातल्या त्यात हारुनचा आणि तिचा आठ वर्षांतील सहवास अधिक होता. तो तिच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जात होता. त्याचे घरी येणे-जाणेही होते. ते प्रभाकरला कधीच खटकले नाही. कारण प्रभाच्या वागण्या-बोलण्यातील मोकळेपणा म्हणजे प्रेम नाही, याची त्याला पक्की खात्री होती. पण तारुण्याच्या उंबरठ्यावरील रवीला प्रभाचं हारुनसोबत राहणं, फिरणं, बोलणं कमालीचं खटकत होतं. तिच्या डोळ्यात, मनात हारुनबद्दल प्रचंड प्रेम आहे, असं त्याला ठामपणे वाटत होतं. काकी, त्याच्यापासून दूर राहा, असं त्यानं एकदा म्हणूनही टाकलं. तिनं परक्यांशी कामापुरतंच बोलावं, अशी त्याची तीव्र भावना होती. पण प्रभाला ते मुळीच मान्य नव्हतं. माझ्याकडं कायम संशयानं पाहणारी तुझी नजर, विचार बदल, असं ती उसळून, रागारागात म्हणायची. पण ते मुळीच खरं नव्हतं. हारुन हाच आपला सखा, मित्र, जीवाचा जिवलग आहे, अशी तिची भावना होती. त्याची कजाग बायको माहेरीच राहते. हाच दोन चिमुकल्यांचा सांभाळ करतोय आणि प्रभाकरकडून आपल्याला कधीच मूल मिळणार नाही, हे कळाल्यावर तर प्रेम उसळू लागलं होतं. त्याच्यासाठी ती हमखास टिफिन घेऊन यायची. दुपारी दोघं एकत्र जेवायचे. दोन-तीनदा त्यांना सिनेमा थिएटरात राजरोस चिटकलेले पाहून वासुदेव कळवळला. प्रभा कितीही लपवत असली तरी हे प्रेम प्रकरण प्रत्यक्षात येणार, हे त्याला स्पष्टपणे लक्षात आले. धुमसत त्यानं ही माहिती फुलचंदला दिली. ज्या गुंडाला एकेकाळी प्रभानं धडा शिकवला तो अझीम म्हणजे हारुनचा दूरचा भाऊ आहे, असंही सांगितलं. पण अशा बाईमध्ये फार गुंतणं चांगलं नाही. असा सल्ला देऊन त्यानं वासुदेवला रवाना केलं. प्रसंग येईल तेव्हा प्रभाला आपण आपलं प्रेम सिद्ध करून दाखवू. तिच्यावर कोणतंही संकट कोसळलं तरी मदतीला धावून जाऊ, असं मनाशी म्हणत तो फुलचंदच्या बंगल्यातून बाहेर पडला. प्रभाकडं नुसतं शरीर नाही. तर भरपूर पैसाही आहे. त्यामुळं फार घाई करून चालणार नाही, हे फुलचंदला माहिती होतं. तर नगरसेवक लक्ष्मीकांतची नजर प्रभाचं शरीर, पैसा आणि गाळा शिवाय प्रभाकरकडच्या पैशावर होती. एकूणात सारे प्रभाभोवती फिरत होते. तरीही भाजी बाजारपासून एक किलोमीटरवर असलेल्या कचऱ्याच्या ग्राऊंडवर प्रभाचा मृतदेह सापडला. इन्सपेक्टर दावणेंनी धागे जुळवणे सुरू केले. आणि खुनी शोधला. कोण असावा तोॽ


मित्राने आवाज दिला अन्...

पंचविशी पार केलेला निशांत म्हणजे केएलआर फायनान्स कंपनीतील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व होते. कारण हसतमुख चेहऱ्याचा निशांत सर्वांच्या मदतीला तयार असायचा. कंपनीचे स्थानिक प्रमुख अदिल खान यांच्यासाठीही तो अत्यंत महत्वाचा व्यक्ती होता. कितीही अडचणीचे काम असो निशांतला सांगितले तर ते होऊन जाईलच. किमान त्यातील निम्मे अडथळे हा तरुण एकटाच दूर करेल, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे ते त्याच्यावर मोठ्या जोखमीच्या जबाबदाऱ्या सोपवत. कधी रात्री-बेरात्री पाच-दहा लाखांची रोख रक्कम घरी घेऊन जाताना ते निशांतला हमखास कारमध्ये सोबत घेत. अशा या तरुणावर कंपनीतील मुली जीव टाकत नसतील तरच नवल. समिधा आणि नेत्रा त्याला येता-जाता निरखून बघत. कधी-कधीआम्हीपण इथंच काम करतोअसे टोमणेही मारत. दोघींनी त्याला वेगवेगळे गाठून आडपडद्याने जीवनसाथी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण निशांतने त्यांना फारसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यामागे त्या मुली त्याला आवडल्या नव्हत्या, असे नव्हते. पण तो आई-वडिलांचा एक आज्ञाधारक मुलगा होता. त्यातल्या त्यात अपंग आई म्हणजे त्याचा जीव की प्राण होती. तिच्यामुळेच आपल्याला शिक्षणाची गोडी लागली. तिने सारखा धोशा लावून लहानपणी आपले गणित पक्के करून घेतले. त्यामुळेच फायनान्स कंपनीत नोकरी मिळू शकली. वडिलांनी कधीही लाड, कौतुकात कमतरता ठेवली नाही. कायम भक्कमपणे ते पाठिशी उभे राहिले. कॉलेजात असताना झालेल्या जीवघेण्या अपघातात वडिलांनीच आपली सेवा केली. मृत्यूच्या दारातून खेचून आणले. आता ते अधूनमधून बिछान्यावर खिळतात. त्यामुळे सून म्हणून घरात येणारी मुलगी आई-वडिलांची सेवा करणारीच हवी, असे त्याने ठरवले होते. समिधा, नेत्रा स्वभावाने चांगल्या, दिसण्यास आकर्षक असल्या तरी वृद्ध माता-पित्यांची सेवा करणे दोघींच्याही रक्तात नाही, असे त्याला ठामपणे वाटत होते. म्हणून त्याने आई-वडिलांनी सुचवलेले मधुराचे स्थळ एका क्षणाचा विलंब न लावता स्वीकारून टाकले. अर्थात त्याला मधुरा आवडली नव्हती, असे नव्हते. उलट पदवीधर असलेली, धारदार नजरेची, अत्यंत शांत व्यक्तिमत्वाची ही मुलगी आपल्याला खरी साथ देईल, असे त्याला वाटले. तिचे आई-वडिलही अत्यंत साधे, सरळ. लग्नाचा बार उडाला. अदिल खान यांनी गोव्यात आठ दिवस मधुचंद्राची व्यवस्था केली होती. निशांत उत्साहाने पत्नीला घेऊन गेला. पण तीन दिवसांतच हे जोडपे परतले. कारण समुद्री वातावरण पचत नसल्याचे मधुरा म्हणू लागली होती. त्यानंतरच्या काही दिवसांत निशांतला जाणवू लागले की, मातापित्यांची सेवा अतिशय मन लावून करणारी मधुरा शांत नव्हे तर अत्यंत अबोल आहे. एवढंच नाही तर तिला कोणत्याही विषयांवर आपल्याशी बोलण्यात काहीच स्वारस्य नाही. ती अत्यंत तुटक वागते. पण हळूहळू होईल सगळं सुरळित. तिला गावात रोज कुठेतरी फिरायला घेऊन जात जा, असं अदिल खान यांनी सांगितलं. मग त्यानं तो प्रयोग सुरू केला. मग ती खुलू लागली. थोडं थोडं बोलणं सुरू झालं. एक दिवस असेच ते बाहेर पडले. आणि निशांत गायब झाला. आम्ही दोघे भेळ खात असताना कोणाचा तरी आवाज आला म्हणून ते गेले. असे तिने त्याच्या आई-वडिलांना सांगितले. तीन दिवस वाट पाहून निशांतचा पत्ता लागत नसल्याने अदिल खान यांना सांगून आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. निशांतला आवाज देणारा कोण होता, हे खरंच मला माहिती नाही, असं मधुरानं वारंवार, ठामपणे सांगितल्याने पोलिस इन्सपेक्टर बनसोडे चक्रावले. त्यांनी थोडा तिच्या पूर्वायुष्याचा मागोवा घेतला. तेव्हा तिच्या माहेरच्या घराशेजारी राहणाऱ्या बलरामसोबत तिचे अतिशय मित्रत्वाचे संबंध होते. पण त्यात प्रेमाचा अंश नसावा, असं खबऱ्यांचं म्हणणं होतं. निशांत गायब झाला त्या दिवशी बलराम त्याच्या गॅरेजमध्येच काम करत होता, असं त्याच्याकडचे कर्मचारी सांगत होते. समिधा, नेत्राआमचा काय संबंधअसं म्हणत होत्या. मग कोणी केलं असावं निशांतला गायब? त्याचा मृतदेह का सापडत नाही? इन्सपेक्टर बनसोडेंसमोर गुंता वाढला.


इथं नको ढकलाढकली

मराठी माणसाला राजकारण आणि नाटकांत अधिक स्वारस्य. त्यानं दोन्हींचा छान गुंताही करून ठेवला आहे. काही मंडळी त्याचा खुबीने वापरही करतात. पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना पास वर्गात ढकलण्यावरून जे काही सुरू आहे, ते याचं सध्याचं उत्तम उदाहरण आहे. मराठी म्हणवून घेणारा एकमेकाविषयी किती विखारी बोलतो. द्वेषाचा विषाणू किती ताकदीने पसरवू शकतो, हेच यातून लक्षात आले. गेला महिनाभर सत्ताधारी संघटनांचे कार्यकर्ते, प्रसारमाध्यमांतील समर्थक भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर तुटून पडले. अगदी कोश्यारींच्या धोतराला हात घालण्यापर्यंत काहींच्या कॉमेंटस् सोशल मिडिआवर होत्या. दुसरीकडं असाच प्रकार भाजप समर्थकांनी केला. त्यांनीही सत्ताधाऱ्यांवर गल्लीबोळातले हल्ले केले. हातची सत्ता गेल्याचे वैफल्य दाखवून दिले. यामुळे सगळ्या घटनाक्रमाकडे तटस्थपणे पाहू शकणाऱ्यांचे बऱ्यापैकी मनोरंजन तर झाले. परंतु, पुढील काळात किमान एक नाटक, दोन सिनेमा आणि दोन बेवसिरीजचा मसाला राजकारण्यांनी लेखक, दिग्दर्शक, कलावंतांना नक्कीच पुरवला. शैक्षणिक पटलावरील एका कादंबरीची बीजे या संघर्षात आहेतच.

सत्ताधाऱ्यांनी काहीही म्हटलं की विरोधकांनी त्याला विरोध करायचा आणि विरोधकांनी काही सांगितलं तर सत्तेतल्या लोकांनी त्याची खिल्ली उडवायची, ही सत्तेच्या सारीपाटावरील एक मुव्ह असतेच. त्याचदृष्टीने पास – नापासाची ही लढाई होती. त्यातील एक मुद्दा होता, दोन वर्षांचे सरासरी गुण पाहून तिसऱ्या वर्गात पास करून टाकणे. आता त्या अभ्यासक्रमाची इतर कशाशीही तुलना होऊच शकत नाही. त्यात पास करण्याचे निकष अत्यंत वेगळे आहेत. परीक्षा पद्धतीतही जमिन अस्मानाचा फरक आहे. पण तरीही हे पाहून अनेक रंगकर्मी, नाट्यकर्मींच्या पोटात नक्कीच गोळा आला असणार. त्यांना अशी ढकलाढकली कधीच मान्य होणार नाही. काहीही करा पण आमची परीक्षा घ्या. राज्य नाट्य, कामगार नाट्य, एकांकिका स्पर्धा घ्या. असा त्यांचा आग्रह असेल. कानाकोपऱ्यातील एकांकिका स्पर्धांना हौस म्हणून हजेरी लावणारे आणि परीक्षकांकडून अन्याय होतोय, अशी भावना कायम व्यक्त करणारेही स्पर्धा झालीच पाहिजे. आमचं सादरीकरण पाहिल्याशिवाय, आमची कठोर परीक्षा घेतल्याशिवाय पुढं ढकलू नका, असंच सांगतील.  कारण, रंगमंचावरील स्पर्धा हा प्रकारच एकेकाळी कठोरतेच्या मुशीत तयार झाला आहे. अनेकांना राज्य, कामगार नाट्य स्पर्धेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. मराठी रंगभूमीचा इतिहास जेव्हा कधी मूळापासून आणि विविधांगानी लिहिला  जाईल. तेव्हा या स्पर्धांचे पान सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल. कारण. किमान १५० उच्च दर्जाचे लेखक, तेवढेच दिग्दर्शक आणि दुपटीने तंत्रज्ञ, चौपटीने कलावंत केवळ या स्पर्धांनी सिनेमा, नाट्यसृष्टीला दिले आहेत. त्यातून विचारी, संयमी, चिंतनशील समाज किती घडला याची मोजदाद सध्या करणे शक्य होणार नाही. पण राज्य, कामगार नाट्य स्पर्धेने त्यासाठी आटोकाट प्रयत्न केला एवढा नक्की. आणि मधला काहीसा साचलेपणाचा काळ मागे पडला आहे. ही स्पर्धा नाविन्याच्या शोधात निघाली आहे. गेल्या काही वर्षांत उत्तम संहिता आल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई, पुणे, नागपूरपुरती असलेली मर्यादा या स्पर्धेने मोडीत काढली आहे. अगदी ग्रामीण भागातील छोट्याशा गावातील कलावंतही रंगमंचावर स्वतःची चमक दाखवू शकतील, अशी यंत्रणा राबवली जात आहे. बाल नाट्यातून छोटे कलावंत आणि छोट्यांसाठी खास लिहिणारे, दिग्दर्शक तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी ही स्पर्धा थांबू नये, अशी तमाम रंगकर्मींची मनोमन इच्छा आहे.

अंबाजोगाईतील रंगभूमीचे विद्यापीठ अशी ओळख असलेले, कालच काळाच्या पडद्याआड गेलेले प्रा. केशव देशपांडे यांनी काही वर्षांपूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते की, नाटकाच्या ग्रुपमधील काही कलावंत अत्यंत चमकदार कामगिरी करतात. प्रेक्षकांना भावतात. लोकप्रिय होतात. पण काहीजण मागे पडतात. यश मिळाले तरी ते टिकत नाही. त्यामागे मुख्य कारण म्हणजे तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर आणि तरच तुमच्यात नवीनतेची उर्जा सातत्याने निर्माण होत राहते. ती रसिकांना आवडत जाते. म्हणून आपण माणूस म्हणून किती चांगले आहोत, हे कलावंताने सातत्याने तपासत राहिले पाहिजे. थोडी कमतरता पडली असे वाटले तर ती शोधून दूर केली पाहिजे. प्रा. देशपांडे यांनी जे सांगितले, ते अंमलात आणण्यासाठी तरुण कलावंत आता अधिक उत्सुक असतील. त्यांच्याकडे नाटकाची कला जिवंत ठेवण्याचे, कमतरता दूर करण्याचे अफलातून तंत्र असेलच.   

तर मुद्दा असा आहे की, नाटकाच्या सादरीकरणातील चुका कोण दाखवून देणारॽ तर त्याला परीक्षकाशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे ते गटबाजी करतात. अन्याय करतात. नाटक न पाहताच मार्क देऊन टाकतात. असे आरोप काही कलावंत करत असले तरी परीक्षाच नको, ढकलाढकली करा, असं त्यांचं कधीच म्हणणं असणार नाही. फार झालं तर परीक्षेची पद्धत पारदर्शक करावी. परीक्षकांवर निरपेक्षतेचा दबाब असावा, असा त्यांचा रास्त आग्रह असेल. कोरोनानं किमान पारदर्शकतेची संधी आणून दिली आहे. रंगकर्मींनी नाटकाचे सादरीकरण ऑनलाईन करावं. परीक्षकांनी ते घरीच बसून पाहत गुण द्यावेत. आणि नंतर ते सादरीकरण लगेच यु ट्युबवर उपलब्ध करून द्यावे. त्यावर रसिकांचे एसएमएस मागवावेत. एसएमएसमधून होणाऱ्या कमाईचा वाटा नाट्यसंघाला द्यावा. म्हणजे पारदर्शक परीक्षण, रसिकांचा सहभाग आणि थोडेसे अर्थकारणही साधले जाईल. शेवटी सगळी नाटकं करता येतात. पण पैशाचं नाटक करता येत नाही. होय नाॽ


Monday 8 June 2020

मिडलक्लास चितचोर

जगभरात मध्यमवर्गीयांचा बोलबाला. म्हणजे असं म्हटलं जातं की, हा वर्ग फक्त ट्रेंड सेट होण्याचीच वाट पाहत असतो. एकदा का तो सेट झाला की, त्या ट्रेंडला लोकप्रिय करण्याची जबाबदारी त्याची असते. कराचा भरणा असो, काही नियमांचे पालन असो. नवी खरेदी किंवा एखाद्या खरेदीवर बहिष्कार. मध्यमवर्गीय म्हणजे चाकरमाना इमानेइतबारे त्यात सहभागी होतो. अर्थव्यवस्थेचे एक चाक तो कुरकुरत, सरकारला शिव्याशाप देत चालवत राहतो. मनाला पटत नसलेल्या अनेक गोष्टी सहन करतो. काहीवेळा चुकीचे पायंडेही पाडतो. अनेकदा एखादा पायंडा चुकीचा पडत आहे, असे लक्षात आल्यावर तो पायंडा मोडण्यासाठीही इकडंतिकडं बघत, सावधपणे पुढं येतो. म्हणजे स्वतःहून अन्यायाविरुद्ध लढून क्रांती करणार नाही. पण कोणी तसं काही करत असेल आणि त्याला ते पटलं तर काही काळासाठी पूर्ण ताकदीनं क्रांतीला शक्ती देईल. एकदा त्याला अपेक्षित असलेला क्रांतीचा भाग संपला की त्यातून अंग काढून घेईल. सरकारकडून असलेल्या आशा, आकांक्षा, अपेक्षा मध्यममार्गानेच व्यक्त करत राहिल. कोणाला आवडो अथवा न आवडो मध्यमवर्ग हा कोणत्याही व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. अनेकांना याच वर्गात समाविष्ट होणं म्हणजे जीवनाचं सार्थक आहे, असं वाटत आलं आहे.

पण तरीही १९७०च्या दशकानंतर राजकारण, साहित्य, प्रसारमाध्यम, सिनेमामध्ये मध्यमवर्गाला लक्ष्य करण्यात आले. विशेषतः डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या पत्रकार, लेखक, नाटककारांनी मिडलक्लासवर जबर हल्ला चढवला होता. या वर्गात प्रचंड दंभ माजला आहे. हा एक विकृतीने भरलेला, सुखलोलूप, केवळ स्वतःपुरते पाहणारा, अप्पलपोटा समूह आहे. तो कधीच गरिबांचे भले होऊ देत नाही. होऊ देणार नाही. हा वर्ग म्हणजे एक प्रकारे देशाचा शत्रू, असं सर्रासपणे सांगितलं जात होतं. अजूनही ते पूर्णपणे थांबलेले नाहीच. पण त्यातील विखारी धार दुसरीकडं वळाली आहे. पण ज्या काळी हे सगळे हल्ले भरात होते. त्याला अर्थातच मध्यमवर्गीयांच्या एकूण स्वभावानुसार थेट विरोध झाला नाही. उलट ती टीका त्यानं अंगावर घेतली. त्यांना टीकेचा अधिकार आहेच. त्यांना आपण कसा, कशाला विरोध करायचा, असा सूर होता. मात्र, आमच्याबद्दल कोणी काही चांगलं सांगणार आहे की नाही. आमच्यात दुःख, वेदना, संघर्ष आहे. त्याची तीव्रता तुम्हाला अपेक्षित नसली तरी ते सिनेमा, साहित्य, पेप्रात मांडलं जाणार की नाही, असा विचार हा वर्ग त्या काळात करत होता. आणि असं म्हणतात ना की, विचार प्रत्यक्षात येतोच. तसेच झाले.

बासु चटर्जी नावाचा एक कलावंत, दिग्दर्शक माणूस आला. त्यानं रुपेरी पडद्यावर त्या काळच्या मध्यमवर्गाला हिरो केलं. दुचाकीवर ऑफिसला जाणारा, सायंकाळी टेबल टेनिस खेळणारा आणि अगदी सामान्य चेहऱ्याचा लाजरा-बुजरा तरुण मध्यवर्ती भूमिकेत असू शकतो. त्याची लव्हस्टोरी प्रेमाचं मूल्य वेगळ्या रुपात सांगते. एखाद्या कंपनीच्या कार्यालयात कारकून म्हणून काम करणारी मुलगीही हिरोईन होऊ शकते. तिचं जगणं भावविश्व समजून घेणं आवश्यक आहे, असं बासुदांनी सांगितलं. कोळसा विकणाऱ्याची मठ्ठ मुलगी आणि गावातल्या मुलाचीही प्रेमकहाणी रंजक, वास्तववादी असते. त्यात व्हिलन मुलीचा मामा असतो, असं त्यांनी चमेली की शादीमध्ये मांडले.

पडद्यावर कथानक, व्यक्तिरेखा उलगडण्याची त्यांची पद्धतही मध्यमार्गीच होती. त्यात त्यांनी कधीच आक्रस्ताळेपणा केला नाही. एका मोठ्या वर्गाच्या भाव-भावनांचे प्रतिबिंब उमटवण्याचा माझा प्रयत्न आहे. मला जे आजूबाजूला दिसतंय, जाणवतंय ते सांगितलं पाहिजे. मध्यमवर्गीयही माणसेच आहेत. त्याच्या जगातही प्रेम, राग, लोभ, विश्वासघात आहे. ते इतर समाजाचे शत्रू नाहीत, अशी त्यांची भूमिका होती. आणि त्यापासून ते कधी बाजूला हटले नाहीत. रजनीगंधा, चितचोर, खट्टा मीठा, बातो बातो में, छोटीसी बात’, अशा त्यांच्या सगळ्या सिनेमातील हिरो-हिरोईन, कथानके डोळ्यासमोर आणली की त्यातील हा धागा ठळकपणे जाणवतो. माझ्या सिनेमात दिसतात तसेच लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. ते समाजाला फार पुढे नेत नसले तरी मागे खेचत नाहीत. स्वत:तील भंपकपणावर फारकाळ पांघरुण टाकत नाहीत. त्यामुळे या कळपालाही समजून घ्या, असंच बासुदांच्या सिनेमांनी इतर कळपांना कायम सांगितलं. तेही अतिशय सहजपणे, हलक्याफुलक्या कथानकांतून.

 

आताचा जमाना भडकपणाचा आहे. आक्रमकपणे मांडणाऱ्यांचा आहे. खरी गोष्ट लपवून खोटी गोष्ट आरडाओरड करत विकणाऱ्यांचा आहे. अनेकांनी एकाच पट्टीतील आवाजात खोटे रेटून सांगण्याची कलाही प्राप्त केली आहे. ही सारी मंडळी काही काळासाठी विश्रांती घेतील आणि कोरोना संकट ओसरेल. तेव्हा बासुदांची कमतरता प्रकर्षाने जाणवेल. बहुधा मध्यमवर्गाला.