Thursday 28 February 2019

कुठे नेऊन ठेवणार औरंगाबाद माझे?

कधीही दंगल उसळू शकते असा माहोल असलेले, धुळीने, खड्डयांनी माखलेले, पाणी टंचाईने त्रस्त झालेले औरंगाबाद शहर सध्या लुटारूंच्या धुमाकूळाने गांगरले आहे. विशेषत: व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. आपले संरक्षण करण्याची जबाबदारी असलेले पोलिस दल कधी हल्लेखोर, लुटारूंना जेरबंद करणार आहे की नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण अशा सरकारी यंत्रणांकडून वर्षानुवर्षे निराशा पदरी पडली आहे. त्याची आता सवयही झाली आहे. एकमेव पोलिस दलाचा आधार होता. तो देखील निखळत चालला आहे की काय, असे त्यांना वाटू लागले आहे. कुठे नेऊन ठेवले औरंगाबाद माझे, अशी सूर आता व्यक्त होत आहे. हे सारे सांगण्यामागे गेल्या दोन-तीन आठवड्यातील धक्कादायक, चिंताजनक घटना आहेत. वर्धमान नागरी सहकारी संस्थेचे पिग्मी एजंट म्हणून काम करणारे दिलीप शांतीलाल पांडे गेल्या बुधवारी म्हणजे २० फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास ग्राहकांकडून रक्कम गोळा करून कार्यालयाकडे परतत असताना जुन्या मोंढ्याजवळील तक्षशिलानगर येथे लुटारूंनी त्यांच्यावर हल्ला करत ५५ हजार रुपये पळवले. पांडे काल एका विवाह समारंभास आले होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. आपण सुरक्षित नाहीत, हीच भावना व्यक्त होत होती. त्या आधीच्या आठ दिवसात चार व्यापारी अशाच लुटारूंना सामोरे गेले. तुमच्या कारमधील ऑइल गळत आहे, असे सांगून त्यांच्याकडील पैसे पळवण्यात आले. आता कोणी पोलिसांच्या बाजूने असेही म्हणू शकते की मोठ्या शहरात चोरीच्या, लुटीच्या घटना घडणारच. जेथे पैसा आहे तेथे हल्ले होणारच. पोलिस नेमके कुठे कुठे लक्ष ठेवणार. प्रत्येक गल्लीबोळीत तर गस्त घालता येणार नाही. हा मुद्दा मान्य आहेच. पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता एवढी नजर ठेवणे शक्यच नाही. पण हल्ला झाल्यानंतर, लूटारू पसार झाल्यावर त्यांचा माग काढणे. काही तास तर सोडा पण काही दिवसांत लुटारूंना जेरबंद करणे तर पोलिसांना शक्य आहे ना? दुर्दैवाने ते झालेले नाही. व्यापाऱ्यांना लुटण्याच्या पाच-सहा घटनांतील एकालाही पकडण्यात यश आलेले नाही. हे निश्चितच गंभीर आहे आणि म्हणून कुठे नेऊन ठेवले औरंगाबाद माझे, असा सूर लागत आहे. दिव्य मराठीने या संदर्भात एक ऑनलाईन सर्वे केला. त्यात सुमारे ५०० व्यापारी सहभागी झाले होते. ८९.८ टक्के व्यापारी म्हणाले की, पोलिसांचा धाक नसल्यानेच लूटमार वाढली आहे. तर ८८.६ टक्के व्यापारी म्हणाले की, अशी लूटमार कधीही आपल्यासोबत होऊ शकते अशी भिती वाटते. त्यांना असे वाटणे म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे असे पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनाही निश्चितच वाटत नसणार. पण केवळ अभिमान वाटत नाही. या घटना गंभीर आहे. तत्काळ उपाययोजना केल्या जातील, असे म्हणून त्यांना जबाबदारी ढकलता येणार नाही. तर कठोर पावले उचलून लुटमार करणारी टोळी गजाआड करावी लागणार आहे. बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते की, लुटीच्या सर्व घटना विशिष्ट भागांत झाल्या आहेत. लुटारूंची मोडस् ऑपरेंडी ठरलेली आहे. ही टोळी बाहेरच्या राज्यातील आहे. त्यामुळे त्यांचा तत्काळ सुगावा लागणे कठीण आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत. ज्यात परराज्यातील आरोपी होते. त्यांच्या मुसक्या औरंगाबादेतील पोलिसांनीच काही दिवसांच्या आत आवळल्या होत्या. मग याच प्रकरणात ते शक्य का होत नाही, असे व्यापारी वर्गात विचारले जात असले तर त्यात गैर काय? पोलिसांची संख्या कमी असल्याचेही एक कारण दिले जाते. त्यात तथ्यही आहे. पण पोलिसांच्या मदतीला आता तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर का होत नाही? सेफ सिटी प्रकल्पांतर्गत १२४ कोटी रुपये खर्चून संपूर्ण औरंगाबाद शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत आणण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी तत्कालिन पालकमंत्री रामदास कदम यांनी केली होती. त्याची खूप वाहवा झाली. सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. प्रत्यक्षात फक्त ४८ कॅमेरे लागले आहेत. त्यातूनही फार मोठ्या गुन्ह्यांचा सुगावा लागलेले नाही. साताऱ्यात एक राज्य राखीव दलाचा जवान मंगळसूत्र चोरायचा. त्याला सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पकडण्यात आले. त्यानंतरचे मंगळसूत्र चोर बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आधी पाठपुरावा करून औरंगाबादला सेफ सिटी करण्याचा प्रकल्प मार्गी लावला पाहिजे. आणि हे केवळ आयुक्तांचेच काम आहे, असे बोट महापौर नंदकुमार घोडेले, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, इ्म्तियाज जलील, संजय शिरसाट, विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दाखवू नये. कारण या शहरातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व ही मंडळीही करतातच. या सर्वांनी एकत्र येऊन ठरवले तर महिनाभरात जागोजागी कॅमेरे लागू शकतात. पुढील काळात लुटमारीच्या घटना थांबू शकतात. लोकांचे प्रतिनिधी असे मिरवणाऱ्यांनी लोकांसाठी का होईना एकत्र आले पाहिजे, असे वाटते.

Monday 11 February 2019

उघडे ठेवा डोळे

डोक्याचा कप्पा खुला अन् डोळं उघडं ठेवा! सालाबादप्रमाणं पुन्हा निवडणुकीचा धुरळा उडू लागलाय. राजकारणी लोकं पावलापावलावर भेटून नमस्कार, रामराम, आदाब, जयभीम करू लागलीयत. काही दिवसांतच तुमच्या मतदारसंघातले उमेदवार जाहीर होतील. ते घरात घुसून, चौकात भेटून, गल्लीत तुम्हाला गाठून काहीच्या काही सांगू लागतील. वोट द्या... तुम्हाला हे देतो... वोट द्या.. तुम्हाला ते देतो... असं सांगतील आणि कमरेलोक उडालेला धुरळा लिंबाच्या-आंब्याच्या टोकापर्यंत पोहोचंल. सारा गाव या धुळवडीत बुडून जाईल. महिनाभरानंतर निकाल लागंल. निवडून आलेला खासदार दिल्लीला निघून जाईल. तो पुढच्या निवडणुकीलाच परत येईल. मधली पाच वर्षं गावात पाणी नाही, वीज नाही, रस्ता नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडं खेट्या मारत बसाल. पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. कारण तुम्ही लोक डोळं उघडं ठेवून मतदान करीत नाहीत आणि डोक्याचा कप्पाही खुला ठेवीत नाहीत. त्याच्यामुळंच तुमचंच काय, शहरी भागातील लोकांचेही हाल होतात. आता खरं बोललं तर सख्ख्या आईलाही राग येतो. पण तुम्हाला कोणीतरी धाडस करून चार खऱ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत, अशी वेळ येऊन ठेपली आहे. शहरातील शहाणी मंडळीही जरा नीटपणे ऐका... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार देऊन देश घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर टाकली आहे. पण ती अनेक जण टाळतात. कशाला करायचं मतदान? असं म्हणतात आणि मग जो खासदार निवडून आला, जे सरकार आलं त्याच्या नावानं खडे फोडतात. हे चांगलं नाही गड्या. मताचा योग्य, अचूक वापर करण्याचं आपलं कर्तव्यच आहे. ते बजवायचं नाही आणि नंतर बोंब मारत सुटायचं, याला काही अर्थ आहे काॽ बरं दुसरंही तेवढंच महत्त्वाचं. बरेच लोक मला असेही माहिती आहेत. तुम्हालाही माहिती असतीलच की ते उमेदवार या जातीचा आहे का, त्या धर्माचा आहे का, त्या पंथाचा पुजारी आहे का हे पाहून बटन दाबतेत. तसं नसंल तर अमुक यांचा पाव्हणा आहे का, तमुकचा पाव्हणा आहे का, असं ठरवून मतदान करतेत. हेही नसंल तर मग शेवटचं फारच खतरनाक. ते म्हंजे एखादी दारूची बाटली, गांधी बाबाची नोट घेऊन मतदान होतं. म्हणजे बाबासाहेबांनी जे दिलं ते आपण विकूनच टाकतो नाॽ त्यात आपलं अन् देशाचंही नुकसान करतो. आतापर्यंत केलंच. मंडळी, आतापर्यंत जे झालं ते झालं. आता जमाना वेगानं बदलत चाललाय. नवी पिढी लई हुशार होऊ लागलीय. तसे तुम्हीही व्हा. जात, धर्म, पंथाच्या, पाव्हण्या-रावळ्याच्या पलीकडं पाहा. दारूची बाटली, गांधीबाबाच्या नोटांसाठी मत विकू नका. जो तुमच्या गावात पाणी, रस्ता, वीज देईल व तुमच्या पोरांसाठी चांगल्या शिक्षण, दवाखान्याची, शेतमालाला चांगला भाव देण्याची व्यवस्था करेल त्यालाच निवडा. मतदानाच्या आधी त्याच्याकडून या सगळ्या कामाचा करार करून घ्या. निवडून आला की करार घेऊन त्याच्या मागे हात धुऊन लागा. मग बघा, दहा पंधरा वर्षांत देश कसा प्रगती करतो तेॽ एवढं कराच ताई - माई - अक्का, अण्णा, भाई, भाऊ बप्पा. तुम्हाला आपल्या देशाची शप्पथ आहे. मग कराल ना एवढंॽ आपल्या देशासाठी. येणाऱ्या पिढीला चांगलं काही देण्यासाठीॽ  
--
शब्दांकन : मक्यासाठी

खास आहे ‘आम’ लोकांसाठी


औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकावर उतरून ज्युबिली पार्कमार्गे टाऊन हॉलच्या उड्डाणपुलावरून तुम्ही खाली उतरलात की डाव्या हाताला माझ्या अंगा-खांद्यावर लहान मुले, तरुण फुटबॉल खेळताना दिसतील. एका कोपऱ्यात पतंगबाजीही सुरू दिसेल. एका खांद्याला चिरून वर जाणारा रस्ताही लक्षात येईल. मग माझी ओळख सांगण्याची फारशी गरज नाही. तरीही औपचारिकतेचा भाग म्हणून सांगून टाकतो. मीच आमखास मैदान. होय. गेल्या जवळपास सहा दशकात औरंगाबादमध्ये घडलेल्या अनेक घडामोडींचा मी साक्षीदार आहे. खरं तर मला त्यापेक्षाही जुन्या काळातले पुसटसे आवडतंय. हिंदुस्थानचा शहेनशहा औरंगजेब माझ्यासमोरच्या जामा मशिदीमध्ये लवाजम्यासह आल्याचे मी पाहिले आहे. माझ्या पूर्वेकडील अंगाला लागूनच औरंगजेबाचा मुक्काम होता. सकाळच्यावेळी तो किलेअर्कच्या महालासमोर हातात जपमाळ घेऊन यायचा. नंतरच्या काळात उत्तरेकडे निघालेली पेशव्यांची फौज एकदा माझ्यासमोरून गेली होती, ते मला अंधुकसं आठवतंय. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी मी निजामाच्या ताब्यात होतो. पण माझं रूप तेव्हा एखाद्या ओसाड जागेसारखे होते. त्याला पटांगण, मैदानाचा आकार नव्हता. मोगलांच्या, निजामाच्या काळात सभा, समारंभाचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे माझा वापर त्या कारणासाठी झाला नाही. शिवाय औरंगाबाद शहर म्हणजे शेकडो  खुल्या जागांचे एक मोठे गाव होते त्या काळी. म्हणूनही कदाचित राजकीय मंडळी माझ्याकडं वळाली नसतील.
मला माझा जुना काळ अगदी स्पष्टपणे आठवतो, डोळ्यासमोर उभा राहतो. तो भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरचा. निजामाचे जोखड इथल्या जनतेने झुगारून दिल्यावर विजयोत्सवाच्या मिरवणुका माझ्या अंगाखांद्यांवरून खेळत सुभेदारी विश्रामगृहाकडे गेल्या होत्या. त्यातील काही पथकांनी केलेला भारतमातेचा जयघोष माझ्या कानात घुमतोय. औऱंगाबादचे पहिले आमदार माणिकचंद पहाडे यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभभाई पटेल यांची एक सभा गाजली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे एक जोशपूर्ण भाषणही मी ऐकले. त्यानंतरच्या काळात औरंगाबाद शहरातील सगळे राजकीय वातावरणच थंडावत गेले होते. पण तरुणाईचा माझ्याकडील ओढा वाढला होता. लहान मुले, कॉलेजमधील पोरे पतंगबाजीसाठी मोठ्या संख्येने येत होती. तेव्हा आताच्या एवढे फुटबॉलचे फॅड नव्हते. क्रिकेटच्या लढतीही रंगत. अशा सगळ्या वातावरणात मी पहिली जोरदार राजकीय सभा अनुभवली कामगारांचा बादशहा असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांची. आणिबाणी नुकतीच संपली होती. लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांचा ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू होता. त्याच काळात बीड, परभणीच्या दौऱ्यासाठी जॉर्ज औरंगाबादेत आले होते. तेव्हा बापूंच्या प्रचाराचे नियोजन करणाऱ्यांनी त्यांना विनंती केली. एवढ्या कमी वेळात गर्दी होईल का, अशी शंका जॉर्ज यांनी मिश्किल स्वरात विचारली होती. तेव्हा प्रचारकही थोडे विचारात पडले होते. कारण माझे आकारमान. तेव्हा मी चारही अंगाने पसरलेला होता. वरच्या बाजूला तटबंदीलगत घळी तयार झालेल्या होत्या. त्यातही लोक बसू शकत. त्यामुळे गर्दी किती होईल, मैदान किती भरेल असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नव्हते. पण तो काळ काँग्रेसविरोधी लाटेचा होता. जॉर्ज यांच्याभोवती सामान्य व्यक्तिमत्वाचा असामान्य माणूस असे वर्तुळ होते. त्याचा परिणाम झाला. माझ्या शरीराचा एकही कानाकोपरा रिकामा राहिला नाही. जागा मिळेल तिथे अगदी एका पायावरही लोक उभे होते. महिलाही त्यात मागे नव्हत्या. त्याच सभेत औरंगाबादच्या लोकसभेचा निकाल लागला होता. मी खास झालो आम लोकांसाठी.  त्यानंतरची मोठी सभा मला आठवते ती 1986ची. पंतप्रधान राजीव गांधी यांची. काँग्रेसने खूप गाजावाजा केला होता. पण अपेक्षेएवढे लोक आले नव्हते. आमखास मैदानाचा रिकामा भाग असं सांगणारी छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक सभा माझ्या साक्षीने झाली. तिला तुफान गर्दी उसळली होती. मग गर्दीकडे हात दाखवत बाळासाहेबांनी काँग्रेसची खिल्ली उडवली होती. आमखास मैदान भरवायचे म्हणजे अंगात दम लागतो, असं ते म्हणाले होते. आणि माझं नामकरण शिवाजी मैदान असेही करून टाकले होते. नंतर काय झाले कोणास ठावूक बाळासाहेब ठाकरे माझ्याकडे फिरकलेच नाही. त्यांनी माझा धाकटा बंधू असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे लक्ष वळवले होते. असो, ठाकरेंशिवाय पुढे चालून शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले, सोनिया गांधी यांच्याही सभा झाल्या. पण खच्चून गर्दी, पाऊल ठेवायला जागा नाही, असे कधी झाले नाही. त्यामुळे आता आपले काही खरे नाही, असे मला वाटू लागले. त्यातच चारही बाजूंनी अतिक्रमणे, बांधकामे होऊ लागली. आणि आता आपण कधीच भरणार नाही, अशी खात्री पटू लागली. ती अजूनही कायम आहे. अपवाद दोन-तीन वर्षांपासून होणाऱ्या असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांचा. त्यांच्या सभांना तरुणाईंची मोठी गर्दी उसळते आहे. ती आता किती दिवस, किती वर्षे कायम राहते. नवा एखादा दमदार नेता येतो का बघूयात.