Tuesday 31 May 2016

ऋणात राहणारा परिवार






माणसासाठी सर्वात सोपी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे दुसऱ्यावर टीका करणे. त्याच्या चुका दाखवून देणे. पाणउतारा करणे. जगातील सर्वच माणसे कमी अधिक फरकाने, वेळ प्रसंग पाहून हे काम करत असतातच. कारण स्वत:च्या चुका शोधणे, त्यावर मात करणे त्याच्यासाठी खूपच कठीण असते. आणि जगातील सर्वात अवघड गोष्ट  कोणती असेल तर दुसऱ्याचे जाहीर, मनापासूून कौतुक करणे. त्यातल्या त्यात सार्वजनिक जीवनात वावरत असणाऱ्या राजकारणी, साहित्यिक, कलावंतांसाठी दुसऱ्याची तारीफ करणे म्हणजे खूपच अशक्य गोष्ट मानली जाते. अर्थात काही मंडळी तोंडदेखले कौतुक करतात. मोजकेच जण हृदयापासून दुसऱ्याचे कौतुक करू शकतात. केवळ कौतुक करूनच थांबत नाहीत तर ज्या व्यक्तीने समाजासाठी मोठे योगदान िदले आहे, अशांचा जाहीर सत्कार सोहळाही करत असतात. कर्तृत्ववान मंडळींच्या ऋणात राहू इच्छितात. अशा ऋणात राहू इच्छिणाऱ्यांचा ग्रुप म्हणून रंगाई परिवाराची ओळख करून दिली तर ते गैर ठरणार नाही. २८ मे रोजी या परिवाराने लोककलावंतांचा जो सत्कार सोहळा केला तो पाहून तर हे निश्चितच म्हणावे लागेल. लोककला हा मराठी कलाक्षेत्राचा पाया असे वारंवार म्हटले जात असले तरी लोककलावंतांची जाण समाजाने ठेवली नाही. नाट्य, चित्रपट, मालिकेतील कलावंतांना जो सन्मान मिळतो. तो क्वचितच लोककलावंतांच्या वाट्याला येतो. त्यासाठीही त्यांना खूप प्रदीर्घ प्रवास करावा लागतो. मराठवाड्यातील प्रख्यात लोककलावंत विश्वास साळुंके यांनी असाच प्रवास करत स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. एवढेच नव्हे तर लोककलावंत घडवण्याचे

कामही केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या लोकनाट्यांनी एक दशकभर रसिकांना मनसोक्त हसवले आणि हसता हसता अंर्तमुखही केले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रा. डॉ. राजू सोनवणे यांच्या रंगाई परिवाराने मुंबई विद्यापीठ लाेककला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, खंजिरी वादक भारूडकार मीरा उमप,सोंगी भारूडकार निरंजन भाकरे, परसराम भुसळे, देविदास धोंगडे, जरिना सय्यद, शाहीर सुरेश जाधव, शोभा दांडगे आदींचा सत्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी असलेले गणेश चंदनशिवे आता भारतातील सर्वोत्कृष्ट लोककलावंतांमध्ये गणले जातात. प्रचंड लोकप्रिय झालेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील गीत त्यांनी गायले.

 यावरून त्यांची महती लक्षात येते. सोंगी भारूडकार निरंजन भाकरे यांच्याविषयीही हेच म्हणता येईल. सामाजिक समस्यांवर कठोर प्रहार करणारे त्यांचे भारुड

 ज्याने पाहिले त्याला ते आयुष्यभर विसरता येत नाही. एवढी भाकरे यांच्या सादरीकरणाची परिणामकारकता आहे. खंजिरी वादक आणि भारुडकार मीरा उमप या

देखील उत्तुंग कलावंत आहे. ज्या खुमासदार पद्धतीने त्या मांडणी करतात ती लाजबाब असते. शाहीर सुरेश जाधव यांनी तर आतापर्यंत शेकडो सभा, संमेलने पहाडी आवाजाने गाजवली आहे. शिवरायांचा धगधगता इतिहास सादर करताना प्रेक्षकांनाही सोबत घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. परसराम मुसळे, देवीदास धोंगडे, जरीना सय्यद हे देखील मातब्बर श्रेणीतीलच. या साऱ्यांचा गौरव रंगाई परिवाराने केला. याबद्दल खरे तर मराठवाड्याचे संपूर्ण कलाक्षेत्र रंगाई परिवाराच्या ऋणात राहू इच्छिते. या परिवाराची उभारणी करणारे प्रा. डॉ. राजू सोनवणेही अस्सल लोककलावंत आहेत. पारिवारिक अडचणी आणि स्वभावातील भिडस्तपणा यामुळे ते मुंबईतून परतले. त्यामुळे मुंबईकरांनीच नव्हे तर मराठी कलासृष्टीला त्यांच्यातील प्रतिभेचा अविष्कार तेवढ्या प्रमाणात पाहता आला नाही. मात्र, मुंबईतून आल्यावर १९९९ मध्ये प्रा. सोनवणे यांनी लोककला, नाट्य क्षेत्राची कास सोडली नाही. औरंगाबादेत राहून त्यांनी अत्युत्तम निर्मिती केली आहे. त्यांना नितीन कडू, सोमनाथ आहेर, शोभा दांडगे, अभिजित देशमुख, संजय चिंचोले, कैलास टापरे, अस्मिता पेशकार, रुपाली भावसार यांची साथ मिळाली. गिनिज बुकात नाव नोंदवणारे ‌वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी रंगाईच्या उपक्रमांना उपस्थित राहून त्यांच्या वाटचालीला दिशा दिली. सध्या रंगाईची धुरा अमर सोनवणे, रमेश लांडगे, प्रीतम चव्हाण, संतोष गारोळे, प्रेरणा कीर्तीकर, सीमा पठाडे, भावना अंबोदकर, सुप्रिया कादी, रोशन ठाकूर, अक्षय बनकर, नितीन गुडसूरकर, रोहीत बारवाल, अरुण शर्मा, ऋषिकेश डोखळे, अजिंक्य लिंगायत सांभाळत आहेत. या कलावंतांनी चार लघुपटांची निर्मिती केली. राज्यातील विविध एकांकिका स्पर्धेत पारितोषिके पटकावताना सवाई एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. प्रा. सोनवणे यांनी लिहून दिग्दर्शित केलेल्या जागरण : शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण या नाटकाने रसिकांची प्रचंड दाद मिळवली. त्यामुळेच बीड येथे झालेल्या नाट्य संमेलनात रंगाई परिवाराला सादरीकरणासाठी निमंत्रण मिळाले होते. केवळ कलाप्रांतात न राहता हा परिवार रक्तदान, वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमांतही आघाडीवर असतो, हे महत्वाचे. कलावंतामधील संवेदनशील माणूस जिवंत असल्याचेच हे लक्षण आहे ना?



Wednesday 25 May 2016

चोपडेपणाचा कळस नको...



एरवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर  होणाऱ्या राजकीय सोहळ्यांनाच उपस्थित राहणारे आमदार संजय शिरसाट काल विद्यापीठात दाखल झाले. एवढेच नव्हे तर त्यांनी कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चाही केली. या चर्चेची छायाचित्रे शिरसाट यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आली. सोबत शिरसाट यांनी कुलगुरुंना नेमक्या काय सूचना केल्या. कोणते पत्र दिले हे देखील लेखी स्वरूपात सांगण्यात आले. शिरसाटांकडून आलेली तीन-चार छायाचित्रे बारकाईने पाहिले असता चर्चेत कोणताही तणाव होता किंवा शिरसाट त्यांच्या शिवसेनेच्या कडक पद्धतीने कुलगुरुंशी बोलले असतील. किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून बोलताना काही टोकदार अपेक्षा व्यक्त केल्या असतील, असे वाटत नाही. एका अर्थाने ते योग्यच आहे. कारण आमदार आणि सत्ताधारी पक्षाचा असलो तरी कुलगुरुंसारख्या अत्युच्च पदावर कार्यरत व्यक्तीशी कशा पद्धतीने बोलावे. विद्यापीठाच्या कारभाराविषयीचे मत कोणत्या शब्दांत मांडावे, याचे भान शिरसाट यांना आहेच. पण त्यांनी जे पत्र कुलगुरुंना दिले आहे, ते अधिक महत्वाचे आहे. पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर शिरसाट विद्यापीठातही लक्ष घालतील, अशी अपेक्षा विविध विद्यार्थी संघटनांना होती. पण कार्यबाहुल्य आणि मतदारसंघातील विकासाची कामे यात ते अडकून पडले असावेत. शिवाय गेल्या वेळी राज्यात आघाडी सरकार होते. त्या सरकारचे प्रतिनिधी असलेले, पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आणि

त्यामुळे विद्यापीठाचा कारभार त्यांच्याकडेच एकहाती रहावा, असा उद्देश ठेवून शिरसाटांनी लक्ष घातले नसावे. खरेतर विद्यापीठे राजकारणमुक्त आणि शिक्षणयुक्त असावीत, अशी अपेक्षा आहे. तसे नामवंत मंडळी, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणीही म्हणतात. प्रत्यक्षात सर्वच विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप असतोच. तसा चव्हाण यांचा होता. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि सत्ताधारी असल्यामुळे कदाचित हस्तक्षेपाचा अतिरेक झाला असावा, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात असते.

वर्षभरापूर्वी झालेल्या राज्यातील सत्तापालटानंतर चव्हाण यांनी विद्यापीठातून लक्ष इतरत्र वळवले. त्यामुळे मवाळ स्वभावाच्या डॉ. चोपडे यांना काहीसा दिलासा मिळाला. त्यांनी त्यांच्या आवडत्या असलेल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये लक्ष घातले. विभागप्रमुखांच्या बैठका आयोजित करून विद्यादान हेच  आपले मुख्य काम आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे कळकळीचे आवाहनही केले. त्याचा थोडासा उपयोग झाल्याचे दिसू लागताच काही मंडळी सक्रिय झाली. चोपडे यांना प्रशासकीय कामाचा फारसा अनुभव नसल्याचे लक्षात घेऊन त्यांच्याभोवती तसे जाळे विणण्यात आले. त्यातील एका जाळ्यात ते अलगदपणे अडकले आहेत. फक्त १० लाख रुपये मूल्य असलेले सॉफ्टवेअर सहा कोटी रुपये खर्चून खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडण्यात आला. विशेष म्हणजे निविदा न काढताच खरेदीचा कार्यादेश काढला गेला. नागपूरच्या एनएसएसपीएल कंपनीसाठी ही मांडवली सुरू होती. त्यावर ओरड होताच २४ तासांतच कार्यादेश रद्द झाला. अधिकाऱ्यांनी मांडलेले प्रस्ताव पूर्ण अभ्यास करूनच मंजूर करणे, ही कुलगुरुंची जबाबदारी आहेच. पण परिपूर्ण आणि पारदर्शक प्रस्ताव मांडणे, याची जबाबदारी अधिकाऱ्यांचीच आहे. ती त्यांनी गांभीर्याने पार पाडलेली नाही, असे आतापर्यंत ज्या बाबी समोर आल्या त्यावरून स्पष्ट होते.

विद्यापीठाने दरमहा ४० हजार रुपये वेतनावर १२ प्रोग्रामर काही वर्षापूर्वी सेवेत घेतले आहेत. ही मंडळी प्रशासकीय कारभारासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठीच तैनात केली आहेत. मात्र, त्यांच्याकडून काम करून घेण्याऐवजी नागपूरच्या कंपनीला कंत्राट देण्याच्या वाटाघाटी का सुरू होत्या? या कंपनीला पूर्वी सॉफ्टवेअरच्या भाड्यापोटी दरमहा सुमारे अडीच लाख रुपये दिले जात होते. याचीही नोंद विद्यापीठाकडे असताना पुन्हा याच कंपनीतच्या घशात कंत्राट का दिले जात होते, याचे उत्तर कुलगुरु आणि  अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांसह विद्यापीठांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक खरेदीसाठी ई-टेंडरिंग करण्याचे बंधन आहे. त्याकडे डोळेझाक करत थेट निविदा का काढण्यात आली, हे कुलगुरुंनी जाहीर करावे. विद्यापीठाचे वित्त लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन कुलगुरूंकडे अंगुली  निर्देश करतात. कुलगुरुंना अडकवण्यासाठी काही मंडळी जाणिवपूर्वक असे प्रकार करत असावेत. २४ तासांच्या आत माघार घेऊन कार्यादेश रद्द करण्यात आला असला तरी तत्पूर्वी झालेल्या हालचाली संशयास्पद आहेत. सहा कोटींचे निविदा प्रकरण गंभीर आहे. असेही शिरसाट यांना वाटते. अशा प्रकारामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. ती पुसून काढत कुलगुरुंना आधार देण्याकरिता आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी शिरसाट विद्यापीठात गेले होते. प्रशासकीय कारभारात ठामपणा ठेवा. चोपडेपणाचा कळस गाठला तर अधिकाऱ्यांना ताब्यात ठेवणे कठीण जाणार आहे. यात मोजक्या मंडळींचा लाभ होणार असला तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, असे त्यांनी चोपडे यांना म्हटल्याचे सांगण्यात येते. त्यात तथ्य असेल तर आनंदच आहे. सर्वांचे ऐकून घेण्याचा आणि त्यात चांगल्या मुद्यांवर अंमलबजावणी करण्याचा माझा स्वभाव असल्याचे चोपडे सांगतात. त्यामुळे शिरसाटांच्या बोलण्यातील काही सूचना त्यांनी प्रत्यक्षात आणाव्यात. आणि शिरसाटांना फक्त सहा कोटींच्या निविदेपुरते मर्यादित राहू नये, असे वाटते. राज्यात सत्ता नसली तरी आमदार चव्हाण अजूनही पॉवरफूल आहेत. या पॉवरचा वापर त्यांनी विद्यापीठाच्या हितासाठी केला तर विद्यापीठाचा कारभार काही प्रमाणात का होईना भ्रष्टाचारमुक्त, शिक्षण युक्त होऊ शकतो. विद्यार्थ्यांना हेच तर हवे आहे.




शिरसाटांचे वैयक्तीक मित्र म्हटले जाणारे सतीश चव्हाण विद्यापीठावर बारकाईने लक्ष ठेवून होते. असे म्हटले जाते की, कोणी काय काम करावे, कोणावर काय जबाबदारी द्यावी. जबाबदारी पार न पाडणाऱ्यांना किती शिक्षा करावी. एवढेच नव्हे तर आंदोलन कोणत्या संघटनेने करावे. त्याला अधिकाऱ्यांनी कितपत प्रतिसाद द्यावा, हेही चव्हाण यांच्या सूचनेवरून ठरवले जात होते. कुलगुरुंना मोक्याच्या क्षणी सूचनेच्या शालीत लपटलेला आदेश दिला जात होता.

Wednesday 18 May 2016

हा ‘दरवळ’ आणखी पसरो

हा ‘दरवळ’ आणखी पसरो

विज्ञान कितीही प्रगत झालं. अगदी माणसासारखा दुसरा माणूस तयार करू लागलं. तरीही एका माणसाच्या मनात, खोल तळाशी नेमकं काय सुरू आहे, हे शोधणं त्यापेक्षा कठीण अगदी अशक्य मानलं जातं. माणसाचं मन समुद्रापेक्षाही अथांग आणि खोलवर असतं. त्यात प्रत्येक मायक्रो-मायक्रो सेकंदाला विचारांचे शेकडो बुडबुडे निर्माण होतात आणि तेथेच फुटून जात असतात. काही, बोटावर मोजण्याइतकेच बुडबुडे पृष्ठभागावर येत असतात. आणि त्यावरूनच आपण त्या माणसाविषयीचा अंदाज व्यक्त करत असतो. प्रत्यक्षात जेव्हा खोलात जाऊन चौकशी केली जाते. किंवा काही घटना घडल्यावर तपास केला तर असे लक्षात येते की आपल्याला कळाला त्यापेक्षा हा माणूस वेगळाच आहे. परंतु, आश्चर्य म्हणजे तपासात कळालेला माणूसही पूर्ण कळालेला नसतो. माणसाच्या अंतर्मनात होत असलेल्या या उलाढाली, गुंतागुंती लेखक, साहित्यिक, नाटककार, सिनेमा लेखक, चित्रकारांच्या आवडीचा विषय आहे. कारण त्यात तुम्ही जितके खोलात जाल तितके वर येत राहता. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, वावरणाऱ्या, आपल्याला भेटलेल्या किंवा स्मृतीत राहिलेल्या माणसाला जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या कुवती आणि गरजेनुसार करत असतोच. कारण सोबतच्या माणसाला जाणून घेतल्याशिवाय त्याला पुढचे पाऊल टाकताच येत नाही. जाणून घेण्यातून त्याचे जीवन काहीसे सोपे होत असते. पण जाणून घेतलेल्या माणसांना शब्दांत पकडणे. आणि त्यातून जीवनाचे काही मूलभूत सिद्धांत मांडणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. वस्तुतः आपल्या प्रत्येकाच्या भोवती अगणित माणसं वावरत असतात. त्यापैकी काहींच्या स्वभावातील विक्षिप्तपणा, मतलबीपणा, सत्ता लोलूपता, कुटिलता, नीचता डाचत असते. तर काहींचा दिलदारपणा, सौंदर्य, आसोशीने वागणे, संकटकाळात धावून येणे सुखावून टाकत असते. अशी माणसं शब्दांत टिपणे म्हणजे एक कसबच असते. आणि व्यक्तीचित्रणाच्या पलिकडं जाऊन माणसाविषयी सांगणं हे तर कसबाच्या पलिकडचं कौशल्य आहे. ते प्राप्त असलेल्या मंडळींपैकी एक म्हणजे अंबरीश मिश्र. त्यांच्या सिद्धहस्त, ओघवत्या शैलीतून राजहंस प्रकाशनामार्फत आलेलं `दरवळे इथे सुवास` हे पुस्तक त्यांच्यातील कसबापलिकडच्या कौशल्याची साक्ष तर देतेच शिवाय आपल्या आजूबाजूची माणसं कशी पाहावी, कशी निरखावी आणि कशी मांडावी, हे पण अगदी सोप्या पद्धतीनं सांगतं. माझ्या मते `दरवळे`  त्यामुळेच मनाला भिडत जातं. त्यात मिश्र यांनी सांगितलेली माणसं कळत नकळत समोर येऊन उभी राहतात. अशी एखाद्या कोपऱ्यात ठेवलेल्या मूर्तीसारखी ध्यानस्थ होतात आणि काही क्षणांनी त्यांच्याशी आपला संवाद सुरू होतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यानं सुखावतो. मध्येच त्याच्या आयुष्यातील दुःखाच्या तारेने आपल्याही हृदयावर चरचरीत रेघ उमटते. म्हणून त्या अर्थाने दरवळे इथे सुवास हे पुस्तक व्यक्तीचित्रणाच्या परंपरेतील वेगळ्या धाटणीचे ठरते.

मिश्र मूळचे उत्तर भारतीय असले तरी मुंबई हीच त्यांची कर्मभूमी. इंग्रजी पत्रकारितेत राहूनही मराठी माणूस हाच त्यांचा केंद्र बिंदू. आणि पत्रकार असूनही माणसं वापरण्याऐवजी माणसं खोलात जाऊन बघण्याचा छंद. असा त्रिवेणी संगम त्यांच्यात झालेला दिसतो. तो पुस्तक वाचूनच अनुभवता येईल.

खरं म्हणजे मिश्र यांच्या प्रमाणेच प्रत्येकाभोवती तऱ्हेवाईक, प्रामाणिक, मानी, दिलदार, लहरी माणसं असतातच. फक्त त्यांच्या या स्वभावगुणांना एका सूत्रात रचण्याची प्रतिभा आपल्यात नसते. किंवा आपल्या भोवतीच्या माणसाबद्दल सांगून आपल्याला काय मिळणार. असा स्वार्थी विचार समोर येत असावा. म्हणूनच मिश्र अधिक महत्वाचे ठरतात.

सेलिब्रिटी, नेत्यांच्या खालोखाल पत्रकारांच्या भोवती माणसांची गर्दी असते. सेलिब्रिटींना लोकांना भेटावंसं कारण ते त्यांना जीवन जगण्याची प्रेरणा, आनंद देत असतात. राजकारणी, अधिकाऱ्यांकडून लोकांना त्यांची कामे करून घ्यायची असतात. त्यामुळे ते त्यांच्याशी कामापुरतंच बोलतात. पत्रकारांकडे लोकच नव्हे तर सेलिब्रिटी, राजकारणी, अधिकारीही आनंद, दुःख मांडतात. अडचणी सांगतात. काही सामाजिक चळवळी पत्रकारच उभ्या करून टिपेला नेतात. पत्रकार आणि लोकांमधील आपुलकी, वैराचे नाते जोपर्यंत पत्रकाराला वाटत नाही तोपर्यंत टिकून राहते.

 त्या अर्थाने पाहिले तर माणूस जाणून घेण्याचे, खोलात शिरण्याचे आणि त्यातील वेगवेगळे पैलू शोधण्याचे साधन पत्रकाराच्या हातात असते. त्याचा तो कसा वापर करतो, यावर बरेच काही अवलंबून असते. मिश्र यांनी तो अचूक केल्याचे दिसते. त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेल्या किंवा त्यांनी ऐकलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या व्यक्तींचा दरवळ त्यांनी टिपला आहे. ब्लिटज्‌चे मालक रुसी करंजिया, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, प्रख्यात बंडखोर लेखिका इस्मत चुगताई, फिअरलेस नादिया यांना प्रत्यक्ष भेटीनंतर त्यांनी रेखाटले आहे. तर प्रख्यात संगीतदार मदनमोहन, गीतकार शैलेंद्र आणि दांडीचा सत्याग्रह, लॉरेन्स आॉलिव्हिए-विवियन ली याविषयी माहिती गोळा करून ओवली आहे. स्वतःच्या बहिणीविषयीही मिश्र यांनी यात लिहिले आहे.

ही सारी गुंफण करत असताना बहुतांश पत्रकारांमध्ये आढळणारा अहंकाराचा दर्प लिखाणात कुठेही दिसत नाही. जसे घडले तसे किंवा जसे वाटले तसे नम्रपणे मांडले आहे. शिवाय त्यात एक ललित वाङ्‌मय मूल्यही आहे. त्यामुळे प्रत्येक ओळ खोलवर जाणीव करून देणारी होत जाते. विचार करण्यास भाग पाडते. किमानपक्षी गुंतवून तर ठेवतेच. स्वतःची माणूस म्हणून पात्रता, पत्रकारितेची क्षमता जाणून न घेता स्वतःलाच थोर मानणाऱ्या, दुसऱ्यांच्या अपमानात आनंद शोधणाऱ्या आणि जातीय द्वेषातच अडकून पडलेल्या मराठी पत्रकारांसाठी तर हे पुस्तक नवीन वाट दाखवून देणारे, निर्मितीची दिशा सांगणारे आहे.

आपल्या आजूबाजूला असणारी माणसं अशा पद्धतीनं टिपण्याचा काही पत्रकारांनी प्रयत्न केला तर त्यातून एक भलंमोठं साहित्य विश्व उभे राहू शकते. चित्रपट, नाट्य, कादंबरी, कवितेसाठी शेकडो कथानकं उपलब्ध होऊ शकतात, एवढा खजिना पत्रकारांकडे आहे. मसाला बातम्या अन्‌ अहंकार, जातीय द्वेष, कुटिल राजकारण आणि सत्ताधीश होण्याची धुंदी चढलेले पत्रकार स्वतःच्या भल्यासाठी का होईना हा खजिना खुला करतील का?

Tuesday 10 May 2016

सीएमसाहेब, असं एकट्यानं स्मार्ट कसं होता येईल?

इतिहासवाले, पुरातत्व विभागाचे लोक जगभरात खोदकाम करत असतातच. त्यांना कुठं पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडतात. त्या काळात लोक वापरत असलेली भांडी गवसतात. तर कधी त्या काळच्या महिलांचे दागदागिने हाती लागतात. नदीच्या किनाऱ्यांवर होणाऱ्या खोदकामात एखादं शहरच सापडून जातं. मग ही संशोधक मंडळी त्या शहराची एकूण रचना कशी होती, याचे वर्णन करतात. ते शहर नागरी सुविधांच्या दृष्टीकोनातून कसे प्रगत होते. त्यात बाजारपेठा कशा विकसित होत्या. सांडपाण्याची गटारे कशी होती. पाण्याचे स्त्रोत कसे निर्माण केले गेले होते. पर्यावरणाच्या समतोलासाठी काय काय केले होते. याचे तपशील सांगितले जातात. थोडक्यात सांगायचे तर उत्खननात सापडणारी शहरे म्हणजे त्या काळच्या स्मार्ट सिटी, असे निष्कर्ष पुरातत्ववाली मंडळी काढत असतात. ती शहरं त्या काळात खरोखरच स्मार्ट होती की जुनं ते सोनं असं म्हणायचे असते. जुन्या काळातील स्थापत्याबद्दल आपुलकी, अभिमान असल्यानेही त्यांना स्मार्ट म्हटलं जातं, हा वादाचा, चर्चेचा विषय होऊ शकतो. पण एक मात्र की खरं त्या काळात राजाला अमुक एका ठिकाणी आपली राजधानी असावी असं वाटायचं आणि तो तसं फर्मान काढायचा. की लगेच सगळी नोकरशाही कामाला लागून राजधानी तयार करायची. कधी राजाला एखाद्या शहराचा बाज बदलावा असं वाटायचं. आणि प्रधानजी, मंत्रीगणापासून सैन्यही कामाला लागायचं.
वर्ष दीड वर्षापूर्वी मोदी सरकारनं जेव्हा स्मार्ट सिटीची योजना जाहीर केली. तेव्हा सरकारने योजनेतील बारकावे स्पष्ट केले होते. पण पूर्वी जसं राजा एखाद्या शहराची निवड करून टाकायचा तसं यात होणार नाही, हे सरकारने सांगितलंच होतं. शिवाय स्मार्ट सिटी म्हणजे काय आणि त्याच्या यादीत येण्यासाठी काय काय करावं लागणार याचाही तपशील दिला होता. मात्र, बहुतांश लोकांनी तो तपशील अभ्यासलाच नाही. राजकारण्यांनी तर नाहीच. नोकरशहांनीही नाही. भारतीय परंपरेनुसार जे मोदींचे समर्थक होते. त्यांनी योजनेचे समर्थन केले. जणू काही ही योजना कबाडी झालेल्या शहरांचे स्वर्गात रुपांतर करणार, असे ते सांगू लागले. तर मोदी विरोधकांनी स्मार्ट सिटी म्हणजे नागरी संस्कृतीच नष्ट करणार. गोरगरिबांवर विशेषतः दलित, अल्पसंख्यांकावर हल्ला होणार. त्यांची घरे उद्‌ध्वस्त होणार. श्रीमंतांची घरे आणखी टोलेजंग होणार असा गळा काढून ओरडायला सुरवात केली. त्यात काही मिडिआवालेही होते. त्यामुळे स्मार्ट होण्याच्या स्पर्धेत असलेल्या अनेक शहरांचा आणि तेथील नोकरशाही, राजकारण्यांचा गोंधळ उडाला. त्यात औरंगाबाद अग्रक्रमावर होते. अगदी योजना जाहीर झाल्यापासून ते पहिल्या यादीसाठीचा ड्राफ्ट पाठवेपर्यंत सगळेचजण चाचपडत होते. ग्रीनफिल्डमध्ये कोणता भाग समाविष्ट करायचा, यावरून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरेंमध्ये ओढाताण झाली. तिसगावचा कचरा डेपो लोकांच्या विरोधामुळे थांबला. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सोलापूर यादीत आलं. औरंगाबाद नाही. परीक्षेत पहिला क्रमांक राहू द्या पण किमान पासही होता आलं नाही, याचं दुःख होतंच. गेल्या काही महिन्यात काळाच्या महिम्यामुळे म्हणा किंवा मागे वळून पाहण्याची सवय नसल्यामुळे म्हणा स्मार्ट सिटीचा सर्वांना विसर पडला होता. तो शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात आणून दिला. स्वच्छ शहरांच्या अभियानासाठी घेतलेल्या बैठकीत त्यांनी `स्मार्टच्या दुसऱ्या यादीसाठी तयारी करा. यापूर्वी केलेल्या चुका टाळा` अशा सूचना केल्या. औरंगाबाद ऐतिहासिक शहर म्हणता मग ऐतिहासिक कामगिरी का करत नाही, असा त्यांचा सूर होता. गेल्या दहा वर्षांपासून नारेगावचा डेपो शहराबाहेर हलवण्याचा नुसत्या योजना सादर होतात, असे त्यांचे म्हणणे होते. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचे म्हणणे अतिशय रास्त आहे. पण केवळ महापालिकेला आणि औरंगाबादच्या स्थानिक राजकारण्यांना दोषी धरून कसे चालेल सीएमसाहेब? औरंगाबादला एकट्यानं स्मार्ट कसं होता येईल. याचा तर थोडा विचार करा. स्मार्ट सिटी योजनेत सर्वात महत्वाची भूमिका होती मनपा आयुक्तांची. ती तत्कालिन आयुक्त प्रकाश महाजन यांनी समर्थपणे बजावली का? हे तर एकदा तपासून घ्या. महाजनांची क्षमता, मर्यादा माहिती असतानाही त्यांना तुम्ही का खडसावले नाही? कुणाच्या भितीने खडसावले नाही. बरं महाजन काम करू शकत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांच्या मदतीला एखादा तगडा अधिकारी का दिला नाही. आणि निकषांच्या आधारावर शहरांची निवड झाली हे खरे असले तरी काही शहरांकरिता राज्य सरकारांनी विशेषाधिकार वापरल्याचे दिसते. तसा औरंगाबादसाठीही वापरता आला असता.

केवळ स्मार्ट सिटीच्या यादीत आल्यानेच औरंगाबादचा विकास होईल, असेही नाही. विकास करायचाच असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गेल्या दीड वर्षात रस्त्यांसाठीचे 25 कोटी सोडले (या रस्त्यांचा दर्जाही सुमार आहे.) तर युती सरकारने दुसरी ठोस मदत केलेली नाही. अपहरण करत आयआयएम नागपूरला नेले. त्याच्याऐवजी जाहीर केलेले आर्किटेक्टस्‌ स्कूल नेमके कोठे, कोणत्या अवस्थेत आहे, हे सीएमसाहेबांनी आता तरी सांगावे. लॉ स्कूलची अवस्था अशीच करून टाकली. समांतर जलवाहिनी योजनेचे घोंगडे अडकवले आहे. त्यामुळं स्मार्ट सिटीत अडकवून ठेवण्यापेक्षा औरंगाबादला राज्य, केंद्राकडून निधी द्या. त्याचा योग्य वापर होण्यासाठी कर्तबगार, ताज्या दमाचे अधिकारी द्या. मनपातील भ्रष्टाचाराला वेसण घालण्यासाठी महानगर प्राधिकरण तातडीने स्थापन करा. तरच फडणवीसांचा फड चांगल्या दिशेने रंगत असल्याचं औरंगाबादकरांना वाटेल.

खरंतर औरंगाबादसह मराठवाडा राजकीयदृष्ट्या भाजप, शिवसेनेकरिता सुपीक जमीन राहिला आहे. मराठवाडा अल्पसंतुष्टांचा प्रदेश आहे. एक भाकरी वाढतो म्हणून चतकोर दिली तरी त्यात समाधान मानणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. पण आता चतकोर म्हणून एक तुकडा दिल्यासारखा दाखवाल आणि नंतर तोही पत्रावळीतून उचलून घ्याल तर कसं चालंल? भुकेला माणूस एकतर मरंल किंवा तुकडा उचलून घेणाऱ्याला मारंल. होय ना?





Wednesday 4 May 2016

हीच काय पोलिसांची खरी मर्दुमकी






एक राजा प्रचंड लोकप्रिय आणि प्रजेचे हित पाहणारा असतो. दररोज दुपारी काही काळ  झोपण्याची त्याला सवय असते. त्या काळात त्याला कुणीही जागे करून  नये, म्हणून त्याने एका सैनिकाची नियुक्ती केलेली असते. राजासाठी सर्वात महत्वाचे काम करत असल्याने त्या सैनिकाच्या अंगात गर्व भिनू लागतो. कुणाचाही अपमान कर, कुणालाही त्रास दे. कुणालाही धमकाव. एखाद्याच्या अंगावर चालून जा. गोरगरिबांकडून पैसे लुट, असे उद्योग तो करू लागतो. याबद्दल काही दरबारी मंडळी राजाकडे तक्रारीही करून पाहतात. पण आपल्याला सर्वात प्रिय असलेल्या झोपेच्या सुखासाठी मदत करणाऱ्या सैनिकाविषयी राजा काहीही ऐकून घेण्यास तयार होत नाही. म्हणून दरबारी नाद सोडून देतात. एक दिवस राजा झोपला असताना एक माशी गुणगुणत वारंवार त्याच्या नाकावर बसू लागते. ते पाहून सैनिक तलवार काढून वार करतो. माशी जाते उडून आणि राजाचे नाकच कापले जाते. संतापलेला राजा सैनिकावर कठोर कारवाईचे आदेश देतो. पण दरबारी म्हणतात, महाराज, सैनिकावर कारवाई होईल. परंतु, तुमचे नाक कापले गेले त्याचे काय? तुमच्या लाडक्या सैनिकाने मर्दुमकी गाजवण्याच्या नावाखाली तुमची आयुष्यभराची बदनामी करून टाकली. ती कशी भरून निघेल?

औरंगाबादचे लोकप्रिय पोलिस आयुक्त अमितेशकुमार (प्रभारी आयुक्त कुलवंतकुमार) यांनाही औरंगाबादकर असाच प्रश्न विचारत आहेत. फक्त इथे आयुक्तांना नाक वाचवण्याची संधी आहे. आणि आपण खऱ्या अर्थाने निष्पाप सामान्यांच्या बाजूचेच आहोत, हेही दाखवून देण्याएवढा वेळ उपलब्ध आहे. हे सारे सांगायचे कारण म्हणजे पोलिस म्हणजे कायदा नव्हे. याचे भान बऱ्याचवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांना असते. पण हवालदार मंडळींपर्यंत हे भान, कायद्याचे ज्ञान अजून पोहोचलेलेच नाही. त्यामुळे ते बेभान होऊन धुमाकूळ घालत असल्याची अनेक उदाहरणे पाहण्यास मिळतात. त्यातील काहीच प्रकार सार्वजनिक होतात. २८  एप्रिल रोजीची घटना त्यापैकी एक. रात्री साडेदहाच्या सुमारास सिडको एन-५ भागात आसाराम चव्हाण, पंडित चव्हाण या दोन हवालदारांनी अंडा आम्लेटच्या गाडीजवळ उभ्या असलेल्या नीलेश शिवणकर या देऊळगावराजा येथील तरुणाला त्यांनी काहीही कारण नसताना गुरासारखे झोडपून काढले. मला का मारताय, अशी विचारणा केल्यावर आणखीनच जोरदार हल्ला चढवला. कायद्याचे बऱ्यापैकी ज्ञान आणि अमितेशकुमार यांचा नावलौलिक माहिती असल्याने निलेशने मला मारले तर मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करेन, असा इशाराही देऊन पाहिला. मग ते चव्हाणद्वय अधिकच संतापले. त्यांना त्याला चिश्तिया कॉलनीच्या पोलिस चौकीत नेऊन तेथे पुन्हा मर्दुमकीचा दुसरा प्रयोग केला. कमरेचा पट्टा आणि लाथाबुक्क्यांनी नीलेशची पाठ सोलून काढण्यात आली. असे करत असताना `सांग, आम्ही तुझ्या आईचे बाप आहोत की नाही? आम्ही तुझ्या बहिणीचे नवरे आहोत की नाही?` असे विचारण्याचा पराक्रमही या हवालदारांनी केला. मारहाण करून करून थकल्यावर निलेशला पोलिस चौकीबाहेर हाकलून देण्यात आले. वर `खबरदार या घटनेबद्दल कुणाला सांगितले तर` अशी धमकीही दिली. जाब विचारल्याचा आणि अमितेशकुमार यांच्याकडे धाव घेण्याचा इशारा दिल्याचा एवढा परिणाम या शेतकरी कुटुंबातील तरुणाला भोगावा लागला. तरीही त्याचा अमितेशकुमार यांच्यावरील विश्वास कायम होता. म्हणून तो त्यांना भेटला. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त संदीप आटोळे यांना लक्ष घालण्यास सांगितले. आटोळेंनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे फर्मान काढले. सिडको ठाण्यातील पोलिसांना या प्रकाराची पूर्ण माहिती असल्याने त्यांनी पूर्वतयारी केली होती. अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्यांनी नीलेशची बोळवण केली. खरेतर एखादे प्रकरण थेट पोलिस आयुक्तांपर्यंत गेले आणि त्यांनी कार्यवाहीचे आदेश दिल्यावर त्यात कायदेशीर बाबींचे पालन  अपेक्षित होते. मात्र, निलेशची वैद्यकीय तपासणी झाली नाही. मारहाण करणाऱ्यांवर कारवाईऐेवजी निलेशने योग्य त्या कोर्टात दाद मागावी, अशी समज त्याला लेखी स्वरूपात देण्यात आली. हे तर फारच धक्कादायक आहे. सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल असून चौकशी सुरू असल्याचे उत्तर दिले आहे.

गेल्या सात-आठ महिन्यात अमितेशकुमार यांनी काही चांगले निर्णय घेतले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कठोर पाठपुरावा केला. काही प्रकरणात ते स्वतःच्या निर्णयावर ठामही राहिले. स्वतःशी संबंधित नसलेली काही कामेही ते स्वतःवर ओढवून घेत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहेच. मात्र, दुसरीकडे त्यांच्या संरक्षणाचा अन्‌ आक्रमकपणाचा गैरफायदा घेतला जात आहे. विशेषतः काही हवालदार आणि त्यावरील मंडळी हात धुऊन घेत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष दिलेच पाहिजे, हे निलेशच्या मारहाण प्रकरणावरून त्यांना सांगणे अत्यावश्यक आहे. कारण लोकांचा दररोजचा संबंध हवालदार, उपनिरीक्षक, पोलिस निरीक्षकांशीच येतो. सर्वसामान्य माणसे त्रास सहन होईनासा झाला तरच पोलिस ठाण्याची पायरी चढतात. अशावेळी त्यांना मनापासून मदत करण्याऐवजी गुंड, लुटारूंना संरक्षण देण्यासाठीच पोलिस आटापिटा करत असतात. प्रत्येक तक्रारीतून कमाई हा तर त्यांनी स्वयंघोषित हक्क जाहीर केला आहे. तपास करायचा असेल तरी पैसा आणि नसेल तरी पैसा असा दुहेरी उद्योग सुरू आहे. त्यात निष्पापांना गुरासारखी मारहाण, खोट्या तक्रारीत अडकवणे, चौकशीचा ससेमिरा लावणे अशी मर्दुमकीची कामे वेळ काढून केली जात आहेत. राज्यातील सरकार बदलले असले तरी पोलिस, महसूल, मनपा अशी लोकांची रोज थेट कामे पडणारी खाती बदललेली नाहीत. लोकांची बेसुमार लूट आणि छळ सुरूच आहे. तो थांबवण्याची संधी अमितेशकुमार यांच्याकडे निश्चितच आहे. ती त्यांनी घेऊन नीलेशवर गुन्हेगारासारखा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा काही पोलिस कर्मचारी कधी पोलिस आयुक्तांच्या नाकावर कधी माशी बसेल याची वाट पाहत हातामध्ये तलवार घेऊन बसलेलीच आहेतच.