Friday 31 July 2015

उथळ आंदोलनाचे उड्डाण अन् महामंडळाचे ‘दिवे’

दिव्य मराठी भूमिका

---
वर्दळीच्या जालना रोडवरील मोंढा नाका उड्डाणपुलावर बुधवारी अंधारलेल्या सायंकाळी अपघात झाला. एका भरधाव कारने धडक दिल्याने दांपत्य जखमी झाले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोणताही अपघात झाला की त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर पोलिस शोधतील. अर्थात सर्वच दोषी सापडतील, असेही नाही. कारण अपघातात काहीजण छुपे दोषी असतात. त्यांना कायद्याच्या चौकटीत पकडता येत नाही. तरीही त्यांच्यावरील जबाबदारी कमी होत नाही. कालच्या घटनेत मोंढा नाका उड्डाणपुलावरील अपघातास  उथळ आंदोलन आणि महामंडळाचे दिवे  छुपे दोषी असल्याचे दिसते. शहरातील इतर सर्व उड्डाणपूल प्रदीर्घ काळापासून रखडले असताना मोंढा चौकातील पूल त्या तुलनेत लवकर पूर्ण झाला. लोकांच्या उपयोगासाठी बांधलेला पूल तत्काळ खुला करणे हे महामंडळाचे कर्तव्य होते. मात्र, कोणत्याही विकास कामाला राजकारण्यांचा हात लागलाच पाहिजे, या दुराग्रहापोटी उद्घाटनाचे मुहूर्त लांबवण्यात आले. काही सामाजिक  संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर २५ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र, ऐनवेळी ते रद्द करण्यात येऊन एक ऑगस्टचा नवा मुहूर्त जाहीर झाला. याचे राजकीय भांडवल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केले. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना न जुमानता त्यांनी पूल खुला करून टाकला. मुबलक प्रसिद्धी मिळवली. दोन वर्षापूर्वी संग्रामनगरचा उड्डाणपूल शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना असाच खुला करून टाकला होता. त्याची राजकीय परतफेड करण्याचे समाधान काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळवले असले तरी मोंढा नाका पुलावर पथदिव्यांचे सोय झालेली नाही. रात्री वाहनचालकांचा जीव धोक्यात पडू शकतो, हा विचार केलाच नाही. या आंदोलनामुळे जागे झालेल्या महामंडळाने पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी पूलावरून ये-जा करणे धोक्याचे असल्याचा इशारा देऊन टाकला. खरेतर  २५ जुलैला उद्घाटनाची पहिली तारीख जाहीर करतानाच त्यांना दिवे लावणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी त्याचे भान पाळले नाही. अजूनही दिवे लागलेलेच नाहीत. एक ऑगस्टचा नवा मुहूर्त माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे रद्द झाला आहे. तीन ते पाच ऑगस्ट दरम्यान, दिवे लावू, असे महामंडळाकडून सांगितले जात आहे. म्हणजे महामंडळाचा बेजबाबदारपणा आणि उथळ राजकीय आंदोलनामुळे दांपत्यावर अपघाताचे संकट कोसळले आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि महामंडळाने त्यांना मदत केली तरच त्यांना लोकांच्या दु:खाची जाणिव असल्याचे सिद्ध होईल, हे तमाम औरंगाबादकरांनी लक्षात घ्यावे.







Tuesday 28 July 2015

गळ्यात अडकलेल्या हाडावर...


तहानलेल्या औरंगाबादकरांना मुबलक पाण्याची हमी देणारी समांतर जलवाहिनी योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दोन घटनांनी या गटांगळ्या आणखी खोलवर गेल्याचे दिसले. पहिल्या घटनेत महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणजे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समांतर योजना म्हणजे गले की हड्डी झाली आहे.  ना निकलती है, ना निगलती है, असे हताश उद्गार काढले. तर दुसऱ्या घटनेत या योजनेचे सर्वेसर्वा खासदार चंद्रकांत खैरे यांनी समांतरच्या ठेकेदाराला काम सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला. सोबत या योजनेत माझी आणि मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांची पार्टनरशिप असल्याचे लोक म्हणतात, असेही सांगून टाकले. आता त्यात खरे किती आणि खोटे किती माहिती नाही. पहिली घटना घडली विधी मंडळाच्या अधिवेशनात म्हणजे विधान परिषदेत. तिथे आमदार सुभाष झांबड आणि आमदार सतीश चव्हाण या राज्याच्या सत्तेत, महापालिकेतही विरोधात असलेल्या आमदारद्वयाने  समांतरवर तिखट हल्ला चढवला. मुळात २००६ मध्ये ७५० कोटी रुपयांची योजना आता एक हजार कोटींवर कशी गेली? कुणी नेली? असा झांबड यांचा सवाल होता. एकीकडे कंपनीला मीटर लावू नये, असे आदेश पालकमंत्री रामदास कदम, महापौर त्र्यंबक तुपे देतात. ते आदेश मोडून काढत मीटरची सक्ती केली जाते. बाजारात एक हजार रुपयांत मिळणाऱ्या मीटरसाठी नागरिकांकडून साडेतीन हजार रुपये कसे वसूल केले जातात, असे त्यांचे म्हणणे होते. सर्वात महत्वाचे म्हणजे एका स्थानिक पुढाऱ्याच्या मुलाचे उखळ पांढरे करण्यासाठी मीटर सक्ती होत असल्याचा त्यांचा थेट आरोप होता. या पुढाऱ्याचे नाव त्यांनी जाहीर  केले नाही. पण उशिरा का होईना, झांबड सक्रिय झाले आहेत.  मुळात जेव्हा २००६ ते २००९ या काळात समांतर योजना कागदावर तयार होत असताना, त्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी येत असताना काँग्रेसची भूमिका आक्रमक विरोधकाची नव्हती. पक्षाचे स्थानिक नेतृत्व  त्याविषयीही काहीही बोलत नव्हते. त्यामुळे झांबड आता नेमके का सक्रिय झाले. त्यांना खरेच समांतर योजनेतील भ्रष्टाचार खोदून काढायचा आहे का? त्यांच्या टीकास्त्रामागे भाजपची प्रेरणा असल्याचे म्हटले जाते. आता त्यात खरे किती आणि खोटे किती माहिती नाही. आमदार सतीश चव्हाण प्रारंभापासूनच समांतरच्या हेतू आणि कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही ते समांतरवर हल्ला चढवत होतेच. अगदी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकांमध्येही खैरेंची कोंडी करत होते.  योजना झालीच पाहिजे. मात्र, त्यासाठी वेगळी सरकारी यंत्रणा हवी, असे त्यांचे म्हणणे होते. ते त्यांनी राज्यात, केंद्रात त्यांची सत्ता असताना का केले नाही, असा प्रश्न शिवसेनेच्या समांतर समर्थक गोटातून विचारला जातो.  चव्हाणांचा विरोध केवळ विरोधकाच्या भूमिकेतीलच होता, असेही म्हटले जाते. त्यात खरे किती आणि खोटे किती माहिती नाही. समांतरचा प्रस्ताव आणण्यापासून ते मंजूर करण्यापर्यंत भाजपच्या तत्कालिन महापौर विजया रहाटकर आघाडीवर होत्या. योजनेत भ्रष्टाचार होत होता तर त्याचवेळी भाजपने आवाज का उठवला नाही.  प्रस्ताव रोखला का नाही? समांतरच्या अटी, शर्ती नंतर बदलल्या  गेल्या असेही भाजपचे म्हणणे आहे. हे होत असताना भाजपने कोणाच्या सांगण्यावरून मौन बाळगले, याचीही अर्थपूर्ण चर्चा होत असते. त्या अर्थपूर्णतेत किती खरे किती खोटे  किती माहिती नाही. वर्षभरापूर्वी आमदार अतुल सावे यांनीच विधानसभेत समांतरविषयी प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा याच मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले? आता ते समांतर गले की हड्डी झाल्याचे म्हणतात. पण हड्डी गळ्यात टाकण्याचे काम सुरू असताना भाजपचे नगरसेवक, स्थानिक नेतृत्व त्यात सहभागी होते. किमान मूकपणे तो प्रकार पाहत होते, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात नसावे. किंवा त्यांनी जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले असावे. पालकमंत्री कदम यांनीही मनपा निवडणुकीच्या काळात चौकशीचे जाहीर केले होते. ती भूमिका त्यांनी नंतर बदलून टाकली. समांतरचा ठेकेदार  चर्चेसाठी आल्यावर चौकशी थंडावली असे म्हणतात. त्यात खरे किती खोटे किती  माहिती नाही. फडणवीसांनी विधीमंडळात चौकशीची दुसऱ्यांदा घोषणा केल्यावर खासदार खैरे सक्रिय झाले. महिनाभरात काम मार्गी  लावा नाहीतर मीच मीटर फोडून टाकतो, अशी धमकी त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवरून सर्वांचे लक्ष वळवण्यासाठी त्यांनी हे केले असावे, अशी शंका विरोधक व्यक्त करतात. त्यात खरे किती खोटे किती माहिती नाही.  आठ वर्षापूर्वी जेव्हा  समांतरचा मुळ प्रस्ताव रद्द करून नवा मंजूर करून घेण्यात आला. योजनेसाठी केंद्र, राज्य सरकारकडून निधी आणण्यासाठी खैरे यांनी पावले टाकण्यास सुरूवात केली. तेव्हापासूनच समांतरच्या गटांगळ्या सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षभरात त्या आणखीनच वाढल्या आहेत. मूळ हेतू साफ, स्वच्छ, लोकोपयोगी नसला तर कोणत्याही योजनेचे काय होते, याचे मूर्तीमंत उदाहरण समांतर योजनेने  दाखवून दिले आहे. हे उदाहरण पुसून टाकत लोकांना मुबलक पाणी देणारी योजना अंमलात आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनाच उचलावी लागणार आहे. गळ्यात अडकलेलेे हाड काढण्यासाठी काही जणांना सक्तीने एनेस्थेशिया देऊन  शस्त्रक्रिया करावी लागली तरी औरंगाबादकरांची मुळीच हरकत राहणार नाही.  कारण ३६५ दिवसांची पाणीपट्टी भरून फक्त ८० दिवस पाणी मिळण्याचे दु:ख भोगून लोक कंटाळले, चिडले आहेत. त्याचे रुपांतर रौद्ररुपात होण्याआधी शस्त्रक्रिया झालेली बरी. अन्यथा लोक म्हणतील, सत्ताधाऱ्यांना खरेच लोकांचे हित कळत नाही. आणि लोकांचे हे म्हणणे खरेच असेल. होय ना?



तोतये सर्वत्रच असतात



पानिपताच्या युद्धात मरण पावलेल्या सदाशिवभाऊंचे तोतये पुण्यात दाखल झाले होते. त्यामुळे पेशवाईत बराच हलकल्लोळ उडाला होता. बऱ्याच तपासणीनंतर ते तोतये असल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांना चाबकाच्या फटक्यांनी फोडून काढण्यात आले, अशा ऐतिहासिक नोंदी आहेत. पण तोतये ही काही पेशवेकालीन काळापुरती किंवा सदाशिवभाऊंपुरती मर्यादित घटना नाही.

गेल्या आठवड्यापासून प्रख्यात साहित्यिक, संशोधक आणि आगामी विश्व साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष शेषराव मोरे यांनी लिहिलेले ‘मुस्लिम मनाचा शोध’ हे पुस्तक वाचणे सुरू आहे. त्यात इस्लाम धर्माचे संस्थापक, अल्लाचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या कार्यकाळातील अनेक ऐतिहासिक नोंदी संदर्भांसह नोंदवल्या आहेत. त्यातील एक प्रकरण तोतयांचे आहे. त्या काळात म्हणजे पैगंबर कर्तृत्वाच्या ऐनभरात असताना त्यांनाही तोतयांचा सामना करावा लागला होता. त्यातील एका तोतयाने मीच अल्लाचा अखेरचा प्रेषित असल्याचे जाहीर केले होते. कारण त्यानेही तहानलेल्यांना पाणी मिळवून देण्यासाठी  झरा शोधून काढला होता. दुसरा आणि तिसरा तोतयाही अशाच चमत्कारांचा दावा करत होता.  त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश पैगंबरांनी त्यांच्या सेनापतींना दिले होते. त्यातील एक तोतया त्याला धडा शिकवण्यापूर्वीच मरण पावला. उर्वरित दोघांना सेनापतींनी ठार केले.

खरे म्हणजे कोणीही माणूस स्वत:च्या कर्तृत्वाने मोठा झाला. उंच शिखरावर पोहोचला की त्याच्या यशाचे श्रेय घेण्यासाठी अनेक मंडळी अचानक उगवतात. मीच त्याचे जीवन घडवले, असे म्हणू लागतात. तोतये ही अशा मंडळींची पुढील आवृत्ती म्हणावी लागेल. इतरांच्या कामाचे श्रेय लाटणाऱ्यांचा बंदोबस्त योग्य वेळी होत असतोच. पण अशी मंडळी आपल्या आजूबाजूला नाही ना, याची वारंवार खात्री करून घेतली पाहिजे. कारण ही मंडळी छुप्या पद्धतीने त्यांचे जाळे विणत असतात. त्यात अडकून पडल्यास आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण हिरावले जातात. मुळात म्हणजे सदाशिवभाऊंच्या तोतयांचा बंदोबस्त करण्यासाठी  पेशव्यांकडे सरदार होते. प्रेषित मोहंमद पैगंबरांकडे सेनापती होते. आपण त्यांच्याएवढे कर्तृत्ववान आणि महान नसलो तरी आपल्यालाही अशा उपटसुंभांचा मानसिक त्रास होत असतोच. तो टाळण्यासाठी आधीच काळजी घेतलेली बरी.

Sunday 26 July 2015

बाहुबली : अफाट, अचाट अन्‌ अद्‌भुत


आपल्यापैकी अनेकजण दाक्षिणात्यांना कितीही नावे ठेवत असले. लुंगीवाले, मद्रासी, कारकुंडे असे म्हणत त्यांना नावे ठेवण्याचा अभिमान बाळगत असले तरी ती मंडळी आपल्यापेक्षा अफाट, अचाट विचार करतात. तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाची बाजी लावतात, हे तुम्ही आम्ही मान्य केले नाही तरी सत्य आहे. कितीही झाकून ठेवले तरी ते जगाला कळतेच. या अशा अफाट, अचाटपणामुळे त्यांच्यात अतिशयोक्तीची परंपरा निर्माण झाली असे म्हटले तरी अतिशयोक्ती किती अद्‌भुत, कलात्मकतेने, ताकदीने करता येऊ शकते, हे देखील त्यांच्याकडे पाहूनच शिकावे लागेल. अनेक प्रांतात दाक्षिणात्य मंडळी आपल्यापुढे गेलेली आहेत. त्यातील एक म्हणजे सिनेमा. मराठी माणसाचे बोट धरून त्यांनी सिनेमाची निर्मिती सुरू केली. आणि पाहता पाहता ते आशय, विषय, कथानक, मांडणी, चित्रीकरण, पटकथा, भडकपणा, मसाला या साऱ्यामध्ये आपल्या पुढे निघून गेले आहेत. केवळ मराठीच नव्हे तर सर्व भाषिकांवर त्यांची मोहिनी चालत आहे.

सध्या रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालत असलेला बाहुबली चित्रपट पाहून दक्षिणेतील मंडळी किती टोकाची भव्य दिव्य निर्मिती करू शकतात. साध्या कहाणीला भावना, तत्वांची जोड देत, एक ठोस संदेश सांगत खिळवून ठेवू शकतात. तंत्रज्ञानाचा वापर करून तोंडात बोटेच नव्हे तर पूर्ण हात घालायला लावू शकतात, याची प्रचिती येते.

हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याचा बजरंगी भाईजानही बाहुबलीसारखी तुफान गर्दी खेचतोय. पण थिएटरमधून बाहेर पडणारी रसिक मंडळी ज्या कॉमेंट नोंदवत आहेत. शेवट अर्धवट ठेवलेल्या बाहुबलीचा दुसरा भाग 2016मध्ये पाहण्याची आतापासून तयार करत आहेत. त्यातील प्रत्येक प्रसंग, व्यक्तिरेखा, पात्रे, तंत्रज्ञान, सेटस्‌बद्दल चर्चा करत आहेत. ते पाहता अखेरच्या टप्प्यात बाहुबली बजरंगीवर वरचढ चढणार हे स्पष्ट दिसते. आजकाल एखादा सिनेमा दुसऱ्यांदा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचे दिवस दुर्मिळच. बाहुबलीने ते परत आणले आहेत. कुटुंबेच्या कुटुंबे तिकीटासाठी रांगा लावत असल्याचे पाहण्यास मिळाले.

तसं पाहिलं तर बाहुबलीची कहाणी घिसीपिटी. शेकडो हिंदी मसाला सिनेमात येऊन गेलेली. म्हणजे एक चांगला माणूस असतो. त्याचे एक छान कुटुंब असते. एक दिवस एका दुष्ट माणसाची त्याच्यावर छाया पडते. तो कुटिल कारस्थान करून चांगल्या माणसाचा संसार उध्व्सत करतो. पण देवाची कृपा म्हणून त्या चांगल्या माणसाचा छोटा मुलगा वाचतो. पुढे चालून हा छोटा मुलगा मोठा होऊन दुष्ट माणसाचा खात्मा करतो. बाहुबलीत हेच कथानक मांडण्यासाठी एक दीड हजार वर्षापूर्वीचा काळ निवडला आहे. एक संपन्न राज्य. त्याचा एक प्रचंड सामर्थ्यशाली राजा. तेवढेच सामर्थ्य अन्‌ कुटिल बुद्धीचा भाऊ. डोळे दिपवून टाकणारे महाकाय राजवाडे. तुफानी लढाई. नजरेला खिळवून ठेवणारेच नव्हे तर भुरळ पाडणारे निसर्ग सौंदर्य. एखाद्या व्यक्तीरेखेप्रमाणे जागा मिळवणारा धबधबा. दीड हजार वर्षापूर्वीचा काळ जिवंत करणारी रंगभूषा, वेशभूषा. प्रकाशाचे त्रिमितीकरण अशा एकना अनेक बाबींवर तुफान मेहनत झाली आहे. त्यामुळे एका गाण्याचा अपवाद वगळता बाहुबली त्यातील धबधब्यासारखा रसिकांच्या अंगावर तुफान वेगात कोसळत राहतो. हालचाल करण्यास जागाच ठेवत नाही. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाचा शेवट पूर्ण नाही. तो पाहण्यासाठी बाहुबली पार्ट 2 ची वाट 2016 पर्यंत पाहा, असे सांगण्याचा जुगार निर्माता, दिग्दर्शकाने खेळला आहे. खरेतर शेवट मनासारखा नसेल किंवा अर्धवट ठेवला असेल तर रसिक नाराज होतात. पण बाहुबलीत पुढील भागामध्ये नेमके काय असेल, अशीच चर्चा थिएटरबाहेर होते. तेव्हा जुगार यशस्वी झाल्याचे लक्षात येते.

छायाचित्रण, तंत्रज्ञान, निसर्ग आणि भव्य सेटस्‌ याच बाहुबलीच्या शक्तीस्थानी आहेत. दिग्दर्शक राजामौलीचे प्रभुत्व प्रत्येक फ्रेममध्ये दिसते. त्यांनी घेतलेली मेहनत दर क्षणाला जाणवते. नजीर, रमय्या, राणा दग्गूबाती, तमन्ना आणि अनुष्का शेट्टीने भूमिकेत जीव ओतला आहे. अनुष्का तर दक्षिणेतील ऐश्वर्या रॉय मानली जाते. तरीही तिने जख्ख म्हातारीचे काम स्वीकारले. बहुधा पुढल्या भागात ती तिच्या मूळ रुपात, वयात दिसणार आहे. बाहुबलीच्या मुख्य भूमिकेत प्रभास खूपच शोभून दिसला आहे. जणूकाही तोच दीड हजार वर्षापूर्वीचा खरा बाहुबली असावा असे वाटत राहते. हे त्याच्या व्यक्तिमत्वाला मिळालेली पावतीच आहे. बाहुबलीला त्याचा सर्वात विश्वासू सरदार कटप्पाच मारतो. त्यामागे नेमके कोण असते हे पुढल्या भागातच कळणार आहे. हा भाग प्रदर्शित होऊपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अशी वाट रसिकांना पाहण्याचे भाग्य एक दिवस मराठी चित्रपटालाही लाभो. त्या दिवशी खरेच मराठी रसिकाच्या बाहुत अभिमानाचे बळ येईल.


एक असाही संदेश : राजामौलीचा बाहुबली केवळ मनोरंजन करत नाही तर राजसत्ता कशी असावी, याचाही संदेश देतो. त्यात रामय्याच्या तोंडी एक वाक्य आहे.  ती म्हणते – केवळ शत्रूपासून गोरगरिब प्रजेचे रक्षण करणे हेच राजाचे कर्तव्य नाही. तर शत्रूशी लढताना गरिबांचे प्राण जाणार नाही, याचीही काळजी घेतो तोच खरा राजा.



चांगुलपणाची ताकद : बऱ्याच वेळा समान ताकदीचे, एकसारखी क्षमता असलेले दोन लोक प्रगतीच्या वाटेवर दीर्घ काळ सोबत चालतात. एक दिवस अचानक त्यातील एकजण पुढे निघून जातो. लोकप्रिय होतो. लोकांच्या हृदयावर राज्य करू लागतो. असे का होते...कारण केवळ ताकद, शक्ती, बलशाली असून जनतेच्या मनावर ताबा मिळवता येत नाही. त्यासाठी चांगुलपणा अत्यावश्यक असतो. त्यापुढे सगळी शक्ती, बळ फिकी पडतेच. सुरुवातीच्या काळात बळ, शक्ती, डावपेच पुढे जाताना दिसले तरी अखेरच्या टप्पयात चांगुलपणाच त्यावर मात करत लोकांची मने कायमसाठी जिंकतो. म्हणूनच तर चांगुलपणाचे बीज फार कमी लोकांना सापडते. बोटावर मोजण्या इतक्यांना ते फुलवता येते आणि एखाद्यालाच ते जगवता, वाढवता, पेरता येते. असा एखादाच मग बाहुबली होतो. 

Friday 24 July 2015

मस्सान : मनात घर करत नाही

बऱ्याच वेळ पडदा अंधूकच असतो. मग हळूहळू आवाज येऊ लागतात. चित्र दिसते पण तेही धूसरच असते. कोण काय बोलते, हे अगदी लक्षपूर्वक ऐकावे लागते. काही काळाने पात्रांच्या रुपातील व्यक्तीरेखा उलगडत जातात. पण त्यातही अाखीव रेखीवपणा नसतोच. प्रसंग बदलतात. कहाणी  किंचित वेग घेत असली आणि प्रेक्षकांची भाषा बोलत असली तरी त्यात अति वास्तववाद असल्याने मन त्यात खूप काळ गुंतत नाही. अखेरीस मन सुन्न झाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात चित्रपटगृहाच्या पायऱ्या उतरेपर्यंत सुन्नपणा टिकत नाही. ही सारी आहेत समांतर चित्रपटाची वैशिष्ट्ये. १९८० च्या दशकात आलेले बहुतांश चित्रपट (शाम बेनेगल आदी प्रतिभावान मंडळींच्या प्रतिभेबद्दल अजिबात शंका नाही तरीही) याच प्रकारातील होते. त्यामुळे ते महोत्सवात गाजले. परदेशी मंडळींनी त्याचे तोंड भरून कौतुक केले. भारतीय समीक्षकांना भारतीय प्रेक्षक चांगलेच ठाऊक असल्याने तेही हे चित्रपट क्लाससाठी आहेत. माससाठी नाहीत, असे समीक्षेत आधीच सांगून टाकत स्वत:ला क्लासमधील असल्याचे जाहीर करत होते. गेल्या काही वर्षात जागतिकीकरणाचा आणि मसाला, मनोरंजनाचा झपाटा सुरू झाला. शाम बेनेगल आदी मंडळी मसाला मिक्स समांतर अशा मार्गाने जाऊ लागल्याने समीक्षकांना क्लास, मास अशा वर्गीकरणाची संधी मिळाली नाही.

ती ‘मसान’ या नीरज घेवान या तरुण दिग्दर्शकाच्या चित्रपटाने नुकतीच ही संधी मिळवून दिली आहे. गँग्ज ऑफ वासेपूर या अनुराग कश्यपच्या तुफान गाजलेल्या चित्रपटात नवाजोद्दीन सिद्दीकीच्या आईची भूमिका करणाऱ्या रिचा चढ्ढाची मसान मध्ये प्रमुख भूमिका असल्यानेही मसान चर्चेत आला. कान्स महोत्सवात मसानचे कौतुक झाले.  एनडीटीव्ही, मटामधील परीक्षणात मसान अप्रतिम आहे. असे म्हटले होते. त्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या. किमान क्लासचा हा चित्रपट असणारच. शिवाय त्यात थोडी व्यावसायिक गणिते मांडली असतील. प्रेक्षकांना कुठलाही चित्रपट पाहताना जो वेग अपेक्षित असतो, तो असेल असेही वाटले होते. कहाणी, पटकथा, चित्रीकरणावर मेहनत घेतली असेलच, याचीही खात्री होती.

प्रत्यक्षात मसानमध्ये यातील काहीही नाही. जीवन म्हणजे फक्त मसान (स्मशान) नाही. स्मशानात जाईपर्यंतही एक जग आहेच. म्हणून, जे होऊन गेले ते विसरून जा. दु:ख बाजूला ठेवा आणि नव्या क्षणांना आनंदीपणे सामोरे  जा, असा संदेश या चित्रपटात आहे. तो देण्यासाठी रचलेली कहाणी खूपच तुकड्या तुकड्यात आहेत. 

शारीरिक, मानसिक सुखाचा आनंद घेण्यासाठी  मित्रासोबत एका हॉटेलात गेलेली रिचा चढ्ढा पोलिस छाप्यात अडकते. मित्र आत्महत्या करतो. मग पोलिस इन्सपेक्टर या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी रिचाच्या वडिलांकडे (ते बनारसच्या घाटावर दशक्रिया विधीचे सामान विकत असतात.) तीन लाख रुपये मागतात. या संकटातून सुटण्यासाठी ती  अलाहाबादला जाते. 

दुसरीकडे बनारसच्या घाटावरील डोंब कुटुंबातील दीपक (विकी कौशल) एका उच्चवर्णीय मुलीच्या प्रेमात पडतो. दोघे जातीपातीची बंधने झुगारत लग्न करण्याचे ठरवतात. पण एका अपघातात ती मुलगी मरण पावते. तिचे प्रेत जाळण्याचे काम दीपकला करावे लागते. या जबर धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तोही अलाहाबादला जातो. तिथे गंगा-जमुनेच्या संगमावर त्याची रिचा चढ्ढाशी भेट होते. दोघे एकाच नावेत बसतात.

खरेतर हा सारा प्रवास एखाद्या कादंबरीसारखा आहे. त्यातील सगळ्याच व्यक्तिरेखा मनाला घर पाडत जातात. पण मनात घर करत नाही. कारण दिग्दर्शकाने पू्र्ण मांडणी, सादरीकरण अतिशय संथ लयीत, कादंबरीची पाने उलटल्यासारखे केले आहे. त्यामुळे अनेक प्रसंगांतील पंच टोचत नाही. तो अंगावर येत नाही. खरेतर प्रायोगिक, समांतर चित्रपट म्हणजे त्यातील बोचणी दीर्घकाळ टिकणारीच हवी. तशी ती होतच नाही. रिचा चढ्ढासह साऱ्यांचाच अभिनय वास्तववादी असला तरी त्यात जिवंतपणाची एक पोकळी शिल्लक राहतेच. संवाद सहज बोलीतील अाहेत. त्यामुळे पहिले पाच मिनिटे ते छान वाटतात. नंतर त्यात एक मोनोटोनसपणा येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे पुढे काय घडू शकते, याचा अंदाज येत राहतो. या साऱ्यामुळे मसान अपेक्षित उंचीवर जातच नाही.

दोन  संदेश : त्यातील पहिला म्हणजे काळ्या मार्गाने पैसा कमावण्यासाठी पोलिस कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांची नितीमत्ता पूर्णपणे लयास गेली आहे.  सामान्य माणसाला संरक्षण, न्याय देण्याचे काम पोलिस कधीच करू शकत नाहीत.

दुसरा म्हणजे तुम्हाला सुखी व्हायचे असेल. मनासारखा जोडीदार हवा असेल तर जाती-पातीच्या पलिकडे जा. कदाचित तुमचा जीवन प्रवास आनंदी होऊ शकतो. काल गेलेला दु:खी क्षण आज बाजूला ठेवायला शिका.

Wednesday 22 July 2015

बोंबल्या मारुती

समीर : आमच्या बापजाद्यांना कोण हिंगलत होतं? त्यांना देवळातपण येऊ देत नव्हते.  आमची पोरं चांगली शाळा शिकतील, नोकरी करतील. आणि त्यांच्या बापाला जाळायला नेतानी तर त्यांना कोणी विचारणार न्हाई. रस्ते चकचकीत झाले की सुसाट गाड्या धावतील. मग चिखल न्हाई. पावसाचा त्रास न्हाई. कुणाला खांदे द्येयला नकोत. लाल दिव्याच्या अँब्युलन्स आरामात नेऊन पोहोचवतील मला. बघ मला दिसतंय. ते बघ माझी मुलं. छान-छान इंग्रजी बोलतायत. कुणी काही विचारणार नाही त्यांना. अन् हां, वाटेत देवाला पण नेलं मला. कोणी म्हटलं न्हाई हा तुमच्या समाजाचा देव हाय का म्हणून? कशाला म्हणतील आता. बघितलंस का माझ्या पोरांनी कसे चकचकीत कपडे घातलेत. त्यांनी लावलेल्या परफ्युमच्या वासातच गार पडलाय तिथला पुजारी.


विलास : मला सारखं वाटतं दूरवर पसरलेल्या काळ्याभोर जमिनीवर मी छोटी-छोटी रोपं लावत चाललोय मी. मिळेल त्या जागेत रोपं लागतायत. क्षणभर मला वाटतं की रोपं वाढतायत. पण क्षणभरासाठीच.  दुसऱ्या क्षणी लक्षात येतं की आपल्या मागं झप, झप, झप कुणीतरी येतंय आणि वाढणारी रोपं कापून टाकतंय. आता  वेग वाढतोय. सपासप, सपासप. त्यासरशी मी धावतोय. कापतायत ते सपासप. मी जातो तिथं तर कुणीच दिसत नाही. भयानक दमतो मी आता. धापा टाकतो. रोपं जातात. डांबरी चकाचक रस्ते वर येतात. ब्रिज तयार होतात. खटाखट. मशिनसारखे. आणि त्यावरनं सावकाशपणे चढतात हत्ती. पांढरे शुभ्र. बघ ते हत्ती इकडे येतायत. दिसतायत तुला? मला तर त्यांचे चकाकणारे सुळे आणि त्यांची लोंबणारी सोंड दिसतेय.

पु्ण्यातील नाट्य लेखक आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक आशुतोष पोतदार यांनी लिहिलेल्या पुलाखालचा बोंबल्या मारुती या नाटकातील दोन व्यक्तीरेखांच्या भूमिका उपरोक्त संवादातून स्पष्ट होतात. आणि जमिनीशी नाते असलेल्या, जमिनीत खोलवर पाळेमुळे रुतलेल्यांना नव्या भूसंपादन कायद्याबद्दल काय वाटते, हेही लक्षात येते. मात्र, पुलाखालचा बोंबल्या मारुती केवळ भूसंपादनाविषयी बोलत नाही. तर तो देशीवाद, गावाची संस्कृती, धार्मिक परंपरा, गावांमधील जातीय तणाव आणि विकासाचा जातीपातींवर होणारा परिणाम याबद्दलही कधी तिखट, टोकदार तर कधी वळसे घेत भाष्य करतो. सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या रंगयात्रा उपक्रमात रविवारी बोंबल्या मारुतीचे धीरगंभीर नाट्य अभिवाचन झाले. त्यात एका सामाजिक, धगधगत्या विषयाची कलावंतांच्या दृष्टीकोनातून केलेली मांडणी प्रामाणिक वाटली.

प्रामाणिक यासाठी की बहुतांश भारतीय माणसे दांभिकतेच्या चिमटीत अडकलेली आहेत.  विकास झालाच पाहिजे. गावांपर्यंत रस्ते पोहोचले पाहिजे. गावातील माणसाला कारखान्यात रोजगार मिळालाच पाहिजे. शेतकरी सुखी झालाच पाहिजे. मुलांना इंग्रजी शिक्षण मिळालेच पाहिजे. असे एकीकडे सर्वांसमोर ओरडून सांगणारी माणसे खासगीत आमचे मत वेगळे आहे हां, असे म्हणतात. स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी निरनिराळे बुरखे ओढून जगतात. ठोस भूमिका घेण्याची वेळ येताच पळ काढतात. काही समाज सुधारणावदी, नाट्य लेखक, कादंबरीकार, नामवंत कवीही  असेच दांभिकतेच्या कोशात असतात. त्या पार्श्वभूमीवर पोतदार यांचे लेखन अतिशय प्रामाणिक आहे. शहरातील माणसे वाईट, मातीपासून नाळ तुटलेली. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख माहितच नाही. शेत जमिनीवर बुलडोझर फिरवून विकास झाला पाहिजे, असे वाटणारी असतात. दुसरीकडे खेडेगावातील माणसे कमालीची प्रामाणिक. विकासाला विरोध करणारी. जाती-पाती टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारी, असे दोन समज तयार केले आहेत. वस्तुत: शहरी माणसालाही गावांचे पर्यावरण, अर्थकारण टिकून ठेवत विकास झाला पाहिजे, असे वाटत असते आणि गावातील लोकांनाही शहरांसारखा आपलाही विकास झाला पाहिजे. आपल्या गावाजवळून चांगला रस्ता गेला पाहिजे, असे वाटत असते. पोतदार यांनी या दोन्ही बाजू रसिकांसमोर ठेवल्या आहेत. त्यात त्यांनी कोणाचीही बाजू घेतली नाही. किंवा त्यासाठी आकांडतांडवही रचलेले नाही. हेच बोंबल्या मारुतीचे शक्तीस्थान आहे. प्रत्येक प्रसंगात सादरीकरणाची किंवा नेमका आशय पोहोचवण्याच्या दोन-तीन शक्यता त्यांनी खुल्या ठेवल्या आहेत. तेवढे स्वातंत्ऱ्य दिग्दर्शक, कलावंतांना दिले आहे. सामाजिक च‌ळवळीचा जवळून अभ्यास केल्याने त्यांच्यात ही प्रगल्भता आली आहे. शिवाय भारतीय माणसाची दांभिकता किंवा सोयीनुसार मते बदलण्याची मानसिकता पक्की ठाऊक झाल्यामुळेही त्यांनी तसे केले असाव े. यामुळे नाटक चर्चात्मक होते.

एकाचवेळी दहा-पंधरा व्यक्तीरेखांमधून अनेक विषय पटलावर मांडणारी ही संहिता अभिवाचनातून जिवंत करण्याचे काम पद्मनाभ पाठक यांच्या दिग्दर्शनाखाली प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. किशोर िशरसाट, सुजाता पाठक, निकिता मांजरमकर, आकाश  थोरात, विकी वाघमारे यांनी ताकदीने केले. आशुतोष त्यांनी सादरीकरणासाठी निवडलेला  फॉर्मही प्रायोगिकतेच्या अंगाने जाणारा. त्यामुळे पद््मनाभ यांनी नाट्य वाचनात त्यात जिवंतपणा येईल, यावर भरपूर मेहनत केली होती. आवाजातून प्रत्येक व्यक्तिरेखा आणि तिच्या संवादामागे लपलेले व्यक्तिमत्व उघड होईल, यावर भर दिला होता. रंगमंचीय सादरीकरण करताना त्यात त्यांना आणखी काही नव्या जागा सापडतील. मराठवाड्यातील कलावंत मंडळी आमचे जमिनीशी नाते आहे, असे सांगतात आणि विकासाचे वारे मराठवाड्यात वाहत नसल्याचीही ओरड करतात. अशा दोन्ही प्रकारच्या कलावंतांसाठी बोंबल्या मारुती म्हटले तर संधी आणि म्हटले तर आव्हान आहे. हे आव्हान ते पेलतात की नाही, हे लवकरच कळेल. पोतदार यांनी मांडलेला विषय तेवढ्याच ताकदीने रंगमंचावर आला तर प्रदीर्घ काळानंतर एका सामाजिक प्रश्नाला हात घालणारे नाटक पाहण्याचा आणि त्यानिमित्ताने भूसंपादन कायद्यामुळे होऊ घातलेल्या सामाजिक बदलांवर आणखी चर्चा होऊ शकेल. किमान अशी चर्चा घडवून आणण्याची संधी पद्मनाभ आणि त्यांचे सहकारी दवडणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.



Thursday 16 July 2015

परमेश्वराचे संदेश

परमेश्वराचे संदेश

तुमच्यापर्यंत सातत्याने येत असतात.

मात्र, बऱ्याच वेळा हे संदेश येत असल्याचे 

तुम्हाला कळतच नाही...

हा प्रकार म्हणजे आपल्या मोबाईलसारखाच असतो...

कुणी आपल्याला कॉल करत असेल 

आणि आपण गाडी चालवत असू तर तो कॉल उचलत नाहीत

किंवा

आपण मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला असेल तर

कॉलची रिंग ऐकूच येत नाही

परमेश्वराच्या संदेशाचेही असेच असते.

हे संदेश तुम्हाला त्याचवेळी ग्रहण करायचे असतील

तर मन शांत आणि निर्मळ ठेवावे लागते

कुणाविषयी द्वेष, राग, तिरस्कार साठला

की आपला मोबाईल सायलेंट मोडवर जातो

किंवा कॉलची रिंग आपल्याला द्वेष, तिरस्कार, रागाच्या 

गोंधळात ऐकूच येत नाही.

Tuesday 14 July 2015

म्हातारी मेलीय अन्‌ काळही सोकावलाय

एखादी चांगले काम करायला जा किंवा एखादी लोकांच्या उपयोगाची वाटणारी,
भासणारी योजना प्रत्यक्षात आणायला जा. 
अगदीच हे जमले नाही तर कुठे काही नियम मोडून सुरू असलेले काम 
बंद करायला जा. अशा कुठल्याच गोष्टीत औरंगाबाद महापालिकेच्या 
पदाधिकाऱ्यांना यश येत नाही. बरे यश मिळणे तर दूरच. 
त्या कामात त्यांचेच हात अडकून जातात. पाचरीत अडकल्यासारखी 
त्यांची अवस्था होऊन जाते. कोणतीही योजना, काम अखेर यशस्वी, 
लोकांच्या फायद्याचे होण्यासाठी त्यामागे हेतू शुद्ध असावा लागतो. 
तो बहुतांश कामांमध्ये नसतोच. म्हणून पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर 
धाक निर्माण होत नाही. नियमाती कामांनाही अधिकारी फाटे फोडतात.
दिरंगाई करतात. त्यात त्रुटी ठेवतात, असा अनेक पदाधिकाऱ्यांचा अनुभव आहे.
ज्योतीनगरातील राकाज लाईफस्टाईल क्लबवर झालेली कारवाई 
आणि त्यानंतरची नाचक्की त्यातीलच प्रकार आहे.
महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या आदेशावरून
 राकाजला ठोकलेले कुलूप न्यायालयाच्या आदेशाने उघडावे लागले. तेही केवळ ७२ तासात.
कोणतीही माहिती न घेता, अभ्यास न करता किंवा अर्धवट
माहितीच्या आधारे कुलूप ठोकण्याची कारवाई झाली होती, असे यात दिसून येते. 
महापौर, उपमहापौरांच्या हेतूविषयी सध्या शंका घेता येत नाही. 
मात्र, राकाजच्या निर्मितीपासून ते अगदी कारवाई रोखण्यासाठी महापौरांवर दबाब आणणाऱ्या नेत्यांबद्दल संतापाची ठिगणी पडली आहे. 
तिचे रुपांतर पुढे वणव्यात होईल का हे आताच सांगता येत नाही.
 मात्र, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची इच्छा असलेला प्रत्येक औरंगाबादकर वणव्याची 
अपेक्षा करत आहेच. 
मुळात राकाज क्लब कसा उभा राहिला, याची तपशीलात माहिती घेतली 
तर त्याची पाळेमुळे कुठपर्यंत पोहोचली आहेत, याचा अंदाज येतो. 
2008-2009 मध्ये तत्कालिन मनपा आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी महापालिकेच्या 
मालकीचे, अखत्यारीत असलेले पण आरक्षित 
भूखंड खासगीकरणातून विकसित करण्याचे 'धोरण' आणले. 
त्यामुळे तत्कालिन पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. 
आपण आपले भूखंड कधीच विकसित करू शकणार नाही. 
तेवढा पैसा महापालिकेच्या तिजोरीत नाही. लोकांना सुविधा देणे, भूखंडाचे रक्षण करणे, 
त्याचा योग्य वापर करणे आपले कर्तव्य आहे. 
ते बजावण्यासाठी भूखंड खासगी मालकाच्या ताब्यात दिलाच पाहिजे. 
त्यावर होणाऱ्या बांधकामातून महापालिकेला पैसे मिळतील. 
लोकांना पैसा मोजून का होईना पोहायला मिळेल, असा दावा 
त्यावेळी करण्यात आला. राका भूखंड राखतील, औरंगाबादची शान वाढवतील, 
अशी भाबडी आशाही काहीजण व्यक्त करत होते. अधिकाऱ्यांसाठी तर 
असे काही काम म्हणजे लोण्याचा गोळाच असतो. त्यांनी राकाज सोबत
केलेल्या कराराची ओळ ना ओळ सर्वसाधारण सभेसमोर ठेवली नाही.
स्वतःला विश्वस्त म्हणून घेणाऱ्या नगरसेवकांनीही 
तशी मागणी केली नाही. सामाजिक चळवळीत लढणाऱ्यांनाही ते भान नव्हते. 
म्हातारी मरावी. काळाने काळाचे बघून घ्यावे, अशी स्थिती होती.
 त्यावेळचे पदाधिकारी तर राकाजच्या पाण्यात डुंबत होतेच. 
त्यामुळे स्विमिंग पूलसोबत मसाज पार्लरसाठी परवानगी दिल्याचे
त्यांच्या स्मरणात राहिलेच नाही. मग त्याचा गैरफायदा राकाजच्या संचालकांनी
घेतला नसता तरच नवल होते. आजूबाजूच्या लोकांची, ज्योतीनगरातील
मध्यमवर्गीय संस्कृतीची तमा न बाळगता त्यांनी तेथे हुक्का पार्लर सुरू करून टाकले.
तेही बिनापरवानगी. खरे तर राकाज शहरातील प्रतिष्ठित, धनिक वर्गात गणले जातात.
तरीही त्यांनी केवळ स्वतःची कमाई वाढवण्यासाठी हुक्क्यांचा धूर स्विमिंग पूल परिसरात 
सुरू केला. एवढेच नव्हे तर दोन हजार चौरस फुटापेक्षा जास्त जागेवर 
अतिक्रमण करून बांधकामही केले. याची 
खबरबात अधिकाऱ्यांना नव्हती. नगरसेवक आणि राकाजपासून काही 
अंतरावर राहणाऱ्या आजी, माजी पदाधिकाऱ्यांना कळाली नाही, 
असे म्हणणे म्हणजे मांजरीला समोर ठेवलेले दूधाचे भांडे दिसले नाही, 
असे म्हणण्यासारखेच आहे. या मांजरींनी कितीही कानाडोळा केला तरी 
औरंगाबादकरांचे नशिब बलवत्तर की इथे पोलिस आयुक्त अमितेशकुमार 
यांच्यासारखा कर्तव्यक्षम अधिकारी आहे. त्यांनी हुक्का पार्लरवर धाड टाकली. 
त्यामुळे तुपे, राठोड जागे झाले. त्यांनीही पोलिसांच्या स्टाईलने पाहणी केली. 
त्यात मनपानेच परवानगी दिलेले मसाज पार्लर बेकायदा आहे. 
तेथे सीसीटीव्ही आहेत, असा शोध लावला. वरच्या मजल्यावरील काचेतून स्विमिंग पूल 
दिसतो हे ढळढळीत सत्य सर्वांसमोर आणल्याचा दावा केला. 
एवढेच नव्हे तर करार न तपासताच राकाजला कुलूपही ठोकून दिले. 
ज्याक्षणी कुलूप लावले. त्याचक्षणी ते न्यायालयातून उघडण्याचा मार्ग 
राकाजला खुला झाला होता. ज्या सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे कानाडोळा झाला
ते म्हणजे राकाजचे अनधिकृत बांधकाम. शहरातील एवढ्या उच्च प्रतिष्ठित
वसाहतीत, एक नामवंत प्रख्यात आर्किटेक्ट दोन हजार चौरस फुटांपेक्षा
जास्त जागेवर बिनदिक्कत अतिक्रमण करतो. ती जागा खुलेआम वापरतो. 
त्यावर रेस्टॉरंट चालवतो, हाच किती भयंकर प्रकार आहे. त्याबद्दल मनपाने गुन्हा दाखल 
करायला हवा होता. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले (की केले) असे दिसते. 
महापौर, उपमहापौरांनी कारवाईची पावले उचलण्यास सुरूवात करताच 
काही नेत्यांचे दबाबवतंत्र सुरू झाले. हे नेते कोण, याची माहिती फार 
काळ लपून राहणार नाही. राकाजच्या करारापासून ते त्यांच्या 
अतिक्रमित बांधकामाला संरक्षण देणारीच मंडळी दबाबासाठी पुढे येत आहेत, हे स्पष्टच आहे.
आणि त्यासाठी त्यांना महापालिकेचे अधिकारीच मदत करत आहेत. 
बड्यांची अतिक्रमणे वाचवण्यासाठी नेत्यांच्या अधिकाऱ्यांची फौज असे चित्र 
राकाजच्या निमित्ताने पाहण्यास मिळाले. महापालिकेच्या मोक्याच्या जागा विकासाच्या 
नावाखाली धनदांडग्यांच्या ताब्यात देण्याचा 
जो पाया आठ-दहा वर्षापूर्वी रचण्यात आला. त्यातील एक-एक 
भानगडी पुढील काळात समोर येतील. आता राकाजशी केलेला करार रद्द होण्याची 
शक्यता नाही. तेवढी पदाधिकाऱ्यांमध्ये ताकदही नाही. मग किमान राकाजने 
मनपाच्या जागेचा गैरवापर करून केलेली कमाई मनपाच्या तिजोरीत जमा 
करण्याचा निर्धार तुपे, राठोडांनी केला आणि तो अंमलात आणला तरी तो 
लोकांच्या फायद्याचा होईल. असा निर्धार करण्याएवढे बळ 
सुजाण औरंगाबादकरांनीच त्यांच्या पाठिशी उभे केले आहे. 
ते तुपे, राठोडांनी निरखून पाहावे आणि आम्ही नव्या पिढीतील नेते आहोत. 
काही चांगले करण्यासाठीच सत्तेत आहोत, असे ठणकावून सांगावे. 
अन्यथा म्हातारी तर मेली आहेच. काळही सोकावला आहे. खरे ना?

Friday 10 July 2015

God`s Divine Message

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी कार्यालयीन प्रगती होते, 
तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच.
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा, तसा. 
हा निसर्गाचाच नियम आहे.
कधी कधी आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. 
पण संत एकनाथ म्हणालेच होते की, विरोधाला कार्यकारणभाव नसतो. 
तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भणभणू लागते.
तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. 
खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात
आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे, गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे !
तुम्ही भांबावता, हडबडून जाता. 
कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. 
आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. 
शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. 
आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. 
सत्यनिष्ठ, प्रामाणिक कर्मचारी कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; 
पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातो. 
त्याच्या आत्मविश्वासाला तडा जातो.
आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत 
तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. 
नुकसान हे या क्षणाला होते. 
त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, तेंव्हा  विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील.  तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते 
चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील. 
तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे. यातच खरे शहाणपण आहे.
हा पळपुटेपणा नाही. 
ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. 
तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. 
प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे 
एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. 
प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. 
अपमान विसरायचे नसतात
तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. 
त्यांची बोच रोज लागता कामा नये; 
पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. 
कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो. 
यश पचविणे एक वेळ सोपे; 
पण आरोप रिचवणे खूप कठीण. 
'हेचि फळ काय मम तपाला' ? 
याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.
कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. 
 
मग हे शिकायचे कसे?

वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. 
आरडाओरड करायला शक्ती लागत नाही. ती शांत राहायला लागते.
अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून 
तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे 
आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. 
तिचा 'थेंबे थेंबे' संचयच करावा लागतो. 
तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो. तर ती तुमची प्रगल्भता असते. 
आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच 
आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. 
तोपर्यंत तुम्ही बरेच लांबवर, खूप पुढे गेलेले असता...

Tuesday 7 July 2015

समथिंग इज व्हेरी डिफ्रंट

एखाद्या वैभवशाली कुटुंबातील मुले पैसे कमावण्यासाठी परदेशी जाऊ लागतात. गावातील कुटुंबाचा वाडा ओस पडू लागतो. शेती-भातीकडे कुणी पाहण्यास तयार होत नाही. सारं गाव हताश होऊ लागतं. नव्या पिढीतील मुलं असंच वागणार. गावाच्या वैभवाची वैरी होणार. असं वाटत असतानाच काहीतरी चमत्कार होतो.  परदेशात गेलेली, जाण्यास निघालेली मुलं गावाच्या वेशीजवळच थबकतात. कुठल्यातरी अनामिक ओढीनं घराकडे परततात. नको परदेशाची वाट. त्यापेक्षा आपल्या गावातील मातीचा गंधच लाखमोलाचा असं म्हणत नवं आयुष्य सुरू करतात. पाहता पाहता गावालाच संजीवनी देतात. असं काहीसं औरंगाबादच्या नाट्यक्षेत्रात घडू लागलंय. त्याचं प्रमाण अत्यल्प असलं तरी ते अमूल्य आहे. ते अमूल्य केलंय अस्सल लोककलावंत प्रा. राजू सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची. दीड महिन्यापूर्वी त्यांनी सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाने  प्रायोगिक रंगभूमीचा एका नवा ट्रेंड तयार झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मराठी नाटकासाठी काही रसिक तयार करण्याचं कामही यातून होणार आहे.

आता सध्या रंगभूमी, चित्रपट विशेषत: मालिकांमध्ये एक नजर टाकली तर तिथं औरंगाबाद, मराठवाड्यातील कलावंत तुफान नाव कमावत असल्याचे दिसतं. त्याचा प्रत्येक नाट्य रसिकाला आनंद होतोच. मात्र, औरंगाबादमधल्या नाट्य चळवळीचं काय. इथल्या रसिकांना प्रायोगिक, नव्या आशयाच्या संहिता कसदार रुपात कधी पाहण्यास मिळणार असंही वाटत होतं. त्याचं उत्तर मिळण्याची सोय प्रा. सोनवणेंनी केलीच आहे. ती देखील आगळ्यावेगळ्या रुपात. अगदी तुमच्या घरात बसून तुम्हाला नाटक पाहण्याचा आनंद ही मंडळी देतात. ‘समथिंग इज मिसिंग’ हे ५० मिनिटांचे नाटक कोणत्याही नेपथ्याशिवाय घरातील दिवाणखान्यात सादर होते. त्याचे मूल्य फक्त प्रेक्षकांचा प्रतिसाद एवढेच असते. एकूणात ‘समथिंग इज मिसिंग’चा प्रकारच ‘समथिंग इज व्हेरी डिफ्रंट’ असा आहे. आधी औरंगाबादच्या नाट्य चळवळीत लक्षणीय कामगिरी केल्यावर सोनवणेंनी १९९५ मध्ये मुंबई गाठली. मात्र, त्यांच्यातील लोककलावंताला मायानगरीची माया मानवली नाही. त्यामुळे औरंगाबादला परतल्यावर त्यांनी एमजीएममध्ये दीर्घकाळ नाट्यशास्त्राचे अध्यापन केले. नवे कलावंत तयार केले. नाट्य स्पर्धा गाजवल्या. बक्षिसे पटकावली. हे सारे करत असताना इथं नाटकाचे रसिक तुलनेने कमी होत चालले आहेत. प्रायोगिक नाटकांची चळवळ मर्यादित वर्तुळात फिरत असल्याचं त्यांना प्रकर्षानं जाणवू लागलं. हे वर्तुळ बदललं पाहिजे किमान विस्तारलं पाहिजे या भावनेतून त्यांनी घरोघरी जाऊन नाट्य प्रयोगाच्या सादरीकरणाची कल्पना सहकाऱ्यांपुढे मांडली.  नव्या वाटांवर चालण्याची ओढ असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कल्पना एका क्षणात मान्य केली. आजमितीला समथिंगचे १६ प्रयोग झाले आहेत. त्यातील संहिता मूल्य, अभिनयाची क्षमता, संवादशैली, समकालीन मूल्य आदी बाबींवर वेगळ्या संदर्भात चर्चा होऊ शकते. मात्र, या रंगकर्मींचे हे धाडस दाद देण्यासारखेच आहे. मराठी नाटकावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांनीच हा प्रयोग पाहून धाडसाला यशस्वी करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. १९८० च्या दशकात ‌वऱ्हाडकार लक्ष्मण देशपांडेंनी वऱ्हाड निघालंय लंडनला या एकपात्री नाटकाचे प्रयोग सुरू केले. प्रारंभीच्या काळात प्रेक्षक कुठून मिळवायचे असा प्रश्न वऱ्हाडकारांपुढेही होता. तो त्यांनी त्यांच्या शैलीत सोडवला. घराच्या गच्चीवर, अंगणात अगदी एक खोली असलेल्या घरात सादरीकरण त्यांनी धमाल उडवून दिली. इतिहास रचला. प्रा. यशवंत देशमुख, प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलेल्या गाजराची पुंगी या द्विपात्री नाटकाची वाटचालही अशीच झाली. प्रा. सोनवणे आणि त्यांच्यासोबतच्या कलावंतांनी तोच कित्ता गिरवला. अनेक पथनाट्यांमध्ये काम केल्यामुळे रंगमंचाशिवाय अभिनय करण्याचा त्यांचा पाया पक्का झाला होता. म्हणून घरात प्रयोग करताना कुठलीच अडचण आली नाही आणि एक नवा अध्याय औरंगाबादच्या नाट्य चळवळीत सुरू झाला आहे. महत्वाचे म्हणजे केवळ नाटकाचा प्रयोग करून स्वत:ची हौस भागवून घेणे किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हा या मंडळींचा उद्देश नाही. तर मराठी नाटकांपासून दुरावलेला रसिक नाट्यगृहाकडे खेचला जावा. त्याला मराठी नाटकांची परंपरा, त्यातील सामाजिक मूल्य कळावं असा मूळ हेतू आहे. चार दोन नाट्य स्पर्धांमध्ये झळकताच मुंबई गाठून मालिकांमध्ये काम करणाऱ्या तरुण कलावंतांना समथिंगने दाखवलेली नवी दिशा महत्वाची वाटते. त्यावर सोनवणे व त्यांचे सहकारी चालतीलच. पण त्यांना चालण्याचे बळ देण्याची जबाबदारी प्रायोगिक नाट्य प्रयोगांच्या स्वागताची भाषा बोलणारे औरंगाबादचे रसिक स्वीकारतील का? त्यांनी स्वीकारले तर इथलं सांस्कृतिक वैभव घरच्या अंगणात नक्कीच झळाळून निघेल.





हं कसा असेल

विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात सारेच नवशिके कलावंत. फार झाले तर एखाद दुसऱ्या एकांकिका स्पर्धेत चमकलेले. विभागातील मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या खुल्या जागेत गोलाकार उभे. आवाजावर हुकुमत आणि रंगमंचावरील कॉम्पोझिशन्सची अचूक जाण असलेले प्रतिभावान रंगकर्मी प्रा. कुमार देशमुख कलावंतांच्या मध्यभागी येत आणि आज आपल्याला एक खेळ खेळायचा आहे, असे सांगत. नाट्यशास्त्रात कुठला खेळ, असा प्रश्न कलावंतांच्या चेहऱ्यावर.  मग प्रा. देशमुख एखाद्यावर नजर रोखून सांगत आता तु ‘हं’ म्हणायचे. त्याने ‘हं’ म्हटल्यावर दुसऱ्यालापण ‘हं’ म्हणण्यास सांगायचे. अट फक्त एकच होती. आधीच्या कलावंतांने ज्या सूरात ‘हं’ चा हुंकार दिला. त्याच्यापेक्षा दुसऱ्याचा ‘हं’ वेगळा असलाच पाहिजे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आधीच्याने ‘हं’ कसा म्हटला आहे, यावर बारकाईने लक्ष ठेवायचा. आपला ‘हं’ वेगळा कसा असेल याचा विचार करायचा. सर्वात महत्वाचे म्हणजे या साऱ्या व्यक्त करण्यासाठी काही सेकंदांचाच अवधी मिळायचा. काही मिनिटांतच कलावंतांचे वेगवेगळ्या आवाज, सूरातील ‘हं’ चे वर्तुळ पूर्ण व्हायचे. मग प्रा. देशमुख प्रत्येकाला ‘हं’ कोणत्या अर्थाने म्हटले. त्या मागे काय विचार केला आणि कोणते वाक्य मनात योजून ‘हं’ म्हटले, असे विचारायचे. काहींचे स्पष्टीकरण अचूक तर काहींचे अचूकतेजवळ जाणारे असायचे. सुमारे तास-दीड तास चालणाऱ्या या खेळातून नाटकाच्या सादरीकरणात प्रत्येक शब्दाला आणि त्याच्या उच्चारणाला किती महत्व आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव कलावंतांना येत होता. ‘हं’ २७ प्रकारे म्हणता येते आणि त्यातील प्रत्येक ‘हं’ चा एक स्वतंत्र अर्थ आहे. त्यातून भावना व्यक्त होतात, हेही लक्षात येत होते. प्रा. देशमुख यांची कलावंतांचा अावाज घडविण्याची, शब्दांचे महत्वही अधोरेखित करून घेण्याची ती शैली  होती. अजूनही विभागात बऱ्याचवेळा अशाच पद्धतीने काम केले जाते. विशेषत: प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर  संवादशैलीवर प्रचंड मेहनत करून घेतात. प्रत्येक शब्दाची फोड करून त्यातील अर्थ ध्वनित झाल्याशिवाय कलावंताला पुढे सरकू देत नाहीत.

हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे औरंगाबादेत काही रंगकर्मी नाट्य अभिवाचनाचे करत असलेले प्रयोग. आणि या प्रयोगांना रसिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद. काळाच्या ओघात पल्लेदार, संगीत नाटकांचे रुप बदलले. आधी तीन नंतर दोन अंकांची नाटके रंगमंचावर अवतरित होऊ लागली. त्याही पुढे जाऊन दीर्घांक आले. कारण रसिकांना दीर्घकाळ रंगमंदिरात खिळवून ठेवणे अवघड होत चालले होते. त्याच काळात नाट्य अभिवाचनाचेही प्रयोग मुंबई, पुण्यात मर्यादित स्वरूपात का होईना होत होते. त्याला बऱ्यापैकी यशही मिळत होते. नाट्यानंद देणारा हा वेगळा प्रवाह औरंगाबादेत तरुण पिढीतील सृजनशील दिग्दर्शक  पद्््मनाभ पाठक यांनी सुरू केला आहे. त्यामागची त्यांची संकल्पना अत्यंत सुस्पष्ट आहे. ती म्हणजे नाट्यकलेशी रसिकांना बांधून ठेवणे आणि त्यांना नाटकांचा  आनंद वेगळ्या रुपात मिळवून देणे. खरे तर कोणतेही नाटक मग ती एकांकिका असो किंवा दीर्घांक, दोन अंकी. त्यासाठी पहिल्या टप्प्यात संवाद वाचनाच्याच तालमी होतात. प्रत्येक कलावंताच्या हातात संहितेची एक प्रत असते आणि तो मग स्वत:च्या वाट्याला आलेल्या व्यक्तीरेखेचे संवाद म्हणू लागतो. लेखक, दिग्दर्शकासोबत संवादशैलीवर, त्यातील अर्थ अनर्थ, अारोह-अवरोहावर, गतीवर, पॉझवर प्रदीर्घ चर्चा होणे अपेक्षित असते. यातून अनेक कलावंतांना त्यांच्या व्यक्तिरेखेचा लेखकाला अपेक्षित असलेला सूर सापडतो.

एकूणात नाट्य वाचन हा नाटक उभारणीचा सर्वात महत्वाचा पाया आहे. तो अलिकडच्या काळात दुर्लक्षित होत असल्याचे पद्मनाभ पाठक यांना जा‌णवले. एकांकिका स्पर्धांसाठीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे संहिता हाती देऊन थेट तालमी सुरू करण्याचा प्रघात सुरू झाला असावा. परिणामी प्रतिभा असूनही कलावंत सादरीकरणात कमी पडतात. शब्दांचा अर्थ रसिकांना उलगडून सांगण्यात दिग्दर्शकाला अपेक्षित यश येत नाही, असे अनेक स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम पाहताना पाठक यांना जाणवले. मग याविषयी इतरांना काही सांगण्यापेक्षा आपणच याबद्दल आणखी सखोल काम का करू नये, असे त्यांना वाटू लागले. नव्या संकल्पनांसाठी ओळखले जाणारे प्रख्यात नाटककार प्रा. अजित दळवी त्यांच्या पाठिशी उभे पाहिले. त्यातूनच दोन वर्षापूर्वी नाट्य अभिवाचनाच्या उपक्रमाचा प्रारंभ झाला. चं. प्र. देशपांडे यांचा दुरुस्ती आणि देखभाल हा दीर्घांक, प्रा. अजित दळवी यांचे प्रचंड गाजलेल्या डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक, डॉ. भवान महाजन यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी त्या पुस्तकातील काही उतारे, असगर वसाहत यांचे गोडसे  ऍट
 द रेड गांधी डॉट कॉम असे अभिवाचनाचे प्रयोग प्रा. अनुया दळवी, लक्ष्मीकांत धोंड, वसंत दातार, सुजाता पाठक, पद्मनाभ पाठक, सीमा मोघे, सुधीर मोघे, नीना निकाळजे, श्रीकांत उमरीकर यांनी केले. सर्वच कलावंत मंडळी रंगभूमीर दीर्घकाळ काम केलेली आणि शब्दांची ताकद जाणणारी होती. सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ वाचनातूनच नाट्यानुभव द्यायचा असेल तर त्यासाठी संगीत, प्रकाश योजनेवरही काम करावे लागेल, याची काळजी  पद्मनाभ यांनी घेतली. यामुळे जाणकार रसिकांना संहिता आस्वादता आली. 

सध्या मुंबई, पुण्यात नाट्य रसिकांना नाटकांशी बांधून ठेवण्यासाठी अभिवाचनाची चळवळ जोरदारपणे सुरू आहे. पुल अकादमीमध्ये दर आठवड्याला अभिवाचनातून कलावंत आणि रसिक घडवण्याचे कार्य सुरू आहे. ते औरंगाबादेतही होऊ घातले आहे. तरुण पिढीतील कलावंतांनी त्यात सहभाग घेतला आणि मराठवाड्यातील इतर शहरांतही अभिवाचनाचा प्रवाह सुरू केला तर टीव्ही मालिकांत अडकलेले नाट्य अधिक जिवंत आणि रसरशीत होईल. नाही का?



लक्ष्मणांच्या रेषा

पूर्वी असे म्हणायचे की, माणूस आणि पशु-पक्षांमध्ये दोन महत्वाचे फरक आहेत. एक म्हणजे पशु-पक्ष्यांना बोलता येत नाही. दुसरे म्हणजे त्यांना हसता येत नाही. अलिकडील काळातील संशोधन असे सांगते की, पशु-पक्ष्यांना माणसासारखे बोलता येत नसले  तरी त्यांची विशिष्ट अशी एक भाषा आहे. ते एकमेकांशी त्या भाषेत बोलतात. मात्र, त्यांना हसता येते की नाही, हे अजूनही ठामपणे सिद्ध झालेले नाही. म्हणजे एक प्रकारे किमान हसण्याच्या बाबतीत माणूस पशुंपेक्षा निश्चितच वेगळा आहे. त्यांच्या मनात ताण-तणावाचे प्रसंग येतच असणार. त्यावर ते कसे मात करतात, याचाही उलगडा झालेला नाही. माणूस त्या तुलनेत काहीसा सुखी म्हणावा लागेल. हसण्यासाठी माणसाने अनेक उपाय शोधून काढले आहेत. हसणारी, आनंदाने जगणारी माणसे सर्वांनाच आवडतात. पण तसे जगणे प्रत्येकाला जमत नाही. अनेकजण दुसऱ्यांच्या उण्या-दुण्यावर बोट ठेवून, द्वेष करत, खालच्या पातळीवर जाऊन टिका टिप्पणी करण्यात हास्य शोधत असतात. बोटावर मोजण्याइतकीच मंडळी स्वत:वर, स्वत:च्या चुकांवर बोट ठेवून मनमोकळेपणे हसतात. आणि समाजातील व्यंग टिपत, त्यातून नेमकेपणाने भाष्य करत सर्वांना खळखळून हसवण्याचे आणि हसवता हसवता अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य फारच थोड्या प्रतिभावंतांकडे आहे. त्यातही कुंचल्याच्या फटकाऱ्यांतून दीर्घकाळ निखळ हास्य निर्माण करणारे व्यंगचित्रकार अत्यल्प आहेत. त्यामध्ये अर्थातच रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजे अर्थातच जगद्विख्यात आर. के. लक्ष्मण यांचा समावेश आहे. कसं बोललात या मथळ्याखाली तब्बल पाच दशके भारतीय मनावर राज्य करणाऱ्या या अनोख्या सम्राटाची व्यंगचित्रे आजही ताजी आहेत. त्यातील समकालीन मूल्य आजही टिकून आहे, हे महत्वाचे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रावर अप्रतिम भाष्य करणारी त्यांची व्यंगचित्रे म्हणजे तणावात जगताना हसण्याचे सामर्थ्य देणारा खजिनाच आहे. तो मेहता पब्लिकेशन हाऊसने सात छोटेखानी पुस्तकांच्या रुपात खास मराठी रसिकांसाठी प्रसिद्ध केला आहे. त्यात सुमारे १४०० व्यंगचित्रे मराठी भाषेत उपलब्ध आहेत.

जीवनातील धावपळीला, कटकटींना वैतागलेल्या, त्रासलेल्या अन्् सतत कुठल्यातरी तणावाखाली वावरणाऱ्या सर्व तणावग्रस्तांना हसण्यासाठी हा खजिना खुला करण्यात आल्याचे मराठी रुपांतरकार अविनाश भोमे यांनी म्हटले आहे. ते अगदी रास्तच आहे. मनोगतात ते म्हणतात वेगवेगळ्या शहरांमध्ये सकाळी जोरात चालणारे हास्यक्लब विनोदाचे व हास्याचे जीवनातील महत्व सांगतात. पण अशा क्लबमध्ये अनुभवास येणारे हास्य बरेचसे कृत्रिम, बळेच ओढून-ताणून आणलेले असते. या उलट एखादे व्यंगचित्र पाहिल्यावर येणारे हास्य पूर्णत: नैसर्गिक असते. मनाला आतून गुदगुल्या करणारे, दिलखुलास, मनमोकळे असते. खरेतर निसर्गाने माणसाला दिलेली हास्याची देणगी आपण किती विसरत चाललो आहोत, हेच हास्यक्लब पाहून वाटते. त्यावरही विनोद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे की काय, अशी आजूबाजूची स्थिती आहे. म्हणूनच आर. के. लक्ष्मण यांचा हा खजिना बहुमोल, अमूल्य आहे. लक्ष्मण यांच्याच म्हणण्यानुसार सर्वसामान्य माणूस त्याच्या रोजच्या जीवनात फारतर सहा तास त्याच्या नित्य कामाला गंभीरपणे देत असतो.  उरलेला सारा वेळ तो इतरांची खिल्ली उडवण्यात व इतरांनी केलेल्या विनोदाला हसून दाद देण्यात घालवत असतो. या सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून लक्ष्मण यांनी कुंचल्याचे फटकारे चालवले आहेत. विलक्षण प्रतिभा असलेल्या भारतीय व्यंगचित्रकारांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव अग्रक्रमावर घ्यावे लागेल. त्यांनीही प्रारंभीच्या काळात सामान्य माणसाच्या नजरेतूनच समाजव्यवस्था पाहिली. त्यावर टीकेचे प्रहार केले. मात्र, नंतर ते राजकारणात गेल्याने त्यांची व्यंगचित्रे राजकीय अंगानेच राहिली. लक्ष्मण यांनी राजकारणापासून स्व त:ला दूर ठेवले. तरीही राजकीय व्यक्ती, राजकारणी त्यांच्या प्रहारांतून सुटले नाहीत. उलट ते अधिकाधिक सखोल आणि तिखट होत गेले. अर्थात लक्ष्मण यांनी केवळ राजकारणी एवढेच लक्ष्य ठेवले नाही. तर हवामान खाते, चित्रपट कलावंत, वैज्ञानिक, संशोधक, महापालिकेचे अधिकारी, सत्ताकेंद्रातील बडे अधिकारी, उजव्या डाव्या चळवळीतील कार्यकर्ते अशा साऱ्यांच्या बोलण्यातील आणि वागण्यातील दुटप्पीपणाही त्यांनी मनोरंजकपणे रेखाटला. तो पाहून आजही हसू येते. त्या साऱ्यांचा तपशील सांगणे शक्य नाही. तो अनुभवण्यासाठी ही पुस्तकेच उपयुक्त ठरतील.

युवक महोत्सवांमध्ये स्कीट म्हणजे प्रहसन या सादरीकरणाचा प्रकार नाट्य वर्गात समाविष्ट केला आहे. त्यातही समाजातील घटना-घडामोडींवर तिखट भाष्य केले असते. केवळ दहा मिनिटांत सहा ते सात पात्रांच्या मदतीने स्कीटची मांडणी होते. आता या घटना घडामोडी निवडायच्या कशा असा अनेकवेळा लेखक, कलावंतांसमोरील प्रश्न असतो. त्याचेही उत्तर या पुस्तकांतून मिळू शकते. दहा-बारा व्यंगचित्रांना एका कथासूत्रात बांधले तर उत्तम स्कीट तयार होऊ शकते. आणि केवळ स्कीटच नव्हे तर एक सामाजिक भाष्य करणारा, तिरकस बाणांचा वर्षाव असलेला दीर्घांकही रंगमंचावर अवतरित होऊ शकतो. मराठवाड्यातील रंगकर्मींनी ही पुस्तके नजरेखालून घातली तर ते सहज शक्य आहे. अशी त्यांची तयारी आहे का?