Wednesday 14 March 2018

गौरव चालत्या-बोलत्या विद्यापीठांचा

कौतिकराव ठाले पाटील आणि इतर मंडळींमुळे साहित्य क्षेत्रातील वादांमध्ये 
मराठवाडा साहित्य परिषद अग्रभागी अगदी टोकावर असतेच. पण वादग्रस्त 
वक्तव्यांच्या पलिकडे मसापची कामगिरी झळकत असते. विविध 
स्वरूपाच्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन आणि मान्यवरांच्या नावाने 
कर्तृत्ववान, गुणीजनांना दिले जाणारे पुरस्कार हे मसापचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
 खरेच उत्तम कामगिरी करणाऱ्यांना आणि समाजापुढे काही आदर्श ठेवणाऱ्यांची 
पुरस्कारासाठी निवड करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. हे विशेष. 
आता हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे केवळ मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राच्या 
नाट्य जगतातील दिग्गज प्रा. डॉ. दिलीप घारे, प्रा. यशवंत देशमुख यांना मसापच्या 
वतीने जाहीर झालेला नटवर्य लोटू पाटील पुरस्कार. १२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता 
मसापमध्ये होणाऱ्या सोहळ्यात माजी कुलगुरु, प्रख्यात साहित्यिक प्रा. डॉ. नागनाथ 
कोत्तापल्ले यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तो केवळ 
नाट्य जगतातील दिग्गज आणि ज्येष्ठ रंगकर्मींचा नव्हे तर खऱ्या अर्थाने 
नाट्यशास्त्राच्या चालत्या बोलत्या विद्यापीठांचाच गौरव असेल.
१९८० च्या दशकात जेव्हा टीव्हीचा नुकताच उदय झाला होता. मुंबई-पुण्यात 

नव्या पद्धतीने नाट्य संहिता, सादरीकरणाचा विचार होऊ लागला होता. तेव्हा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाची सूत्रे 
वऱ्हाडकर प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडेंच्या हातात होती. वऱ्हाडमुळे ते यशाच्या शिखराकडे 
निघाले होते. विद्यार्थी घडवण्याचे काम प्रा. अलोक चौधरी, प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब, 
प्रा. कुमार देशमुख, प्रा. प्रताप कोचूरे करत होते. विद्यापीठाच्या विभागाला मोठे 
वलय असले तरी तो कायम वादाच्या भोवऱ्यात होता. दुसरीकडे सरस्वती भुवन 
कला व वाणिज्य महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग होता. तेथे 
प्रा. घारे, प्रा. देशमुख ही जोडगोळी अक्षरशः विद्यार्थ्यांमध्ये अभिनय, लेखन, 
संगीताचा तप्त रस ओतत होती. प्रा. देशमुख म्हणजे विभागाचे अनिभिषिक्त 
सम्राट तर प्रा. घारे म्हणजे कल्याणकारी भावना प्रबळ असलेले राजे होते. 
दोघांचे ध्येय एकच. मुलांना घेऊन नवनवीन प्रयोग करत राहणे. नाटक 
म्हणजे काय नेमकं माहिती नाही. रंगमंचावर कसे उभे राहायचे हेही ठावूक नाही. 
तोंडातून एक शब्दही धडपणे बाहेर पडेल तर शप्पथ. अशा अवस्थेतील 
मुला-मुलींना अभिनेते, अभिनेत्री, लेखक-तंत्रज्ञ म्हणून घडवण्याचे 
शिवधनुष्य त्यांनी त्यावेळी उचलले होते. त्यातून किमान शंभर उत्तम 
रंगकर्मी निश्चित निर्माण झाले. रंगभूमीचे जाणकार किती तयार झाले 
याची मोजदाद करणे कठीण आहे. आणि त्यापेक्षाही त्यांनी तयार केलेली 
संवेदनशील माणसे अफाट आहेत. ते दोघेही विद्यार्थ्यांना सांगत, इथं प्रवेश घेतला 
म्हणून तुम्हाला नाट्यकर्मी म्हणून आम्ही घडवूच. पण त्यापेक्षाही जास्त तुम्ही 
माणूस म्हणून घडणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. यावरून दोघांच्या दृष्टीचा, 
आवाक्याचा आणि त्यांनी उद्दिष्ट ठेवून केलेल्या कामाचा अंदाज येऊ शकतो. 
एकांकिका स्पर्धा, युथ फेस्टीव्हल, स्नेहसंमेलनासाठी हे दोघे ज्या तालमी घेत 
त्या पाहणे, अनुभवणे म्हणजे एक धडाच असायचा. आवाजाचे आरोह, अवरोह. 
विनोदातून निर्माण होणारा ध्वनी, दोन शब्दांमधील मूक आणि बोलक्या जागा. 
रंगमंचावरील वावर, संगीताचा लयीत चालणे अशा एकना अनेक असंख्य गोष्टी 
ते तालमींमध्येच तयार करून घेत. आणि तालीम झाल्यावर झडणाऱ्या मनमोकळ्या 
चर्चा, गप्पांमध्ये माणूस असण्याची काय लक्षणे आहेत, अशी सुरुवात करून ही 
लक्षणे पेरत. त्याचा परिणाम असा झाला की, सर्वच विद्यार्थी काही उत्तम अभिनेते, 
लेखक, तंत्रज्ञ बनले नाही. पण ते ज्या ज्या क्षेत्रात गेले तेथे त्यांनी वेगळेपण 
सिद्ध केले. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा लाभ फक्त त्यांच्या विभागात 
असणाऱ्यांनाच मिळाला असे नाही. तेथे सर्वांना खुला प्रवेश होता. खऱ्या अर्थाने 
ती मुक्त विद्यापीठे होती. प्रा. देशमुख अचानकपणे सेवानिवृत्ती स्वीकारून पुण्यात 
निघून गेल्यावरही अनेक वर्षे प्रा. घारे यांनी अत्यंत जिद्दीने हे काम केले. 
दोघांमध्ये अभिनयाच्या अपार क्षमता. गाजराची पुंगी या त्याकाळी प्रचंड 
गाजलेल्या द्विपात्री नाटकात ते सिद्ध झालेच. प्रा. देशमुख  तर ७० च्या दशकात 
मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी गाजवत होते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 
औरंगाबादेत यावे  लागले. पण त्यांनी त्यांचे मोठेपण कधीच विद्यार्थ्यांवर 
लादले नाही. आता अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये गाजत असलेल्या 
प्रा. घारेंचा विश्वास कधीच कोणतीही गोष्ट लादण्यावर नव्हताच. त्यामुळे दोघांभोवती 
कायम नव्या पिढीचे मोहोळ राहिले. आजही आहे आणि पुढेही कायम राहिल. 
या दोघांचे उत्तुंग कार्य काहीसे  उशिरा का होईना मसापच्या लक्षात आले, 
हेही नसे थोडके. होय ना?
 

दायाद : ‘नाट्यत्रयी’चा दस्तऐवज

 मराठवाड्याचं मागासपण केवळ सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा, 
सरकारी नोकऱ्यांपुरते नाही. ते त्या पलीकडच्या मानसिकतेत आहे. 
ज्या क्षेत्रात आपण मागास आहोत, त्याची शास्त्रशुद्ध नोंद ठेवण्यातही 
मराठवाडा कमालीचा मागास आहे, असा अनुभव येतो. एवढेच नव्हे, तर 
जी काही चांगली कामे झाली त्यांचा इत्थंभूत आराखडा, इतिहास, खाचाखोचा 
पुस्तकरूपात तयार करण्याचे कामही फारसे झाले नाही. विशेषतः कला प्रांतात 
ते ठळकपणे जाणवते. नाटक लोकांना आवडले ना? मग झाले तर. आपले काम 
संपले, असे मानणाऱ्यांची संख्या मराठवाड्यात प्रचंड आहे. आपण केलेली 
निर्मिती शब्दबद्ध करावी आणि तो वारसा अभ्यासासाठी, आठवणींकरिता 
पुढील पिढीसाठी द्यावा, असे वाटणारे बरेच असतील. पण त्यासाठी प्रत्यक्ष 
काम करणारे नाहीतच. कारण तसा संस्कार कधी मराठवाड्यात झालेला नाही.
 हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे प्रख्यात नाटककार प्रशांत दळवी यांनी 
संपादित केलेले दायाद : वारसा ‘वाडा’त्रयीचा हे पुस्तक. महान नाटककार 
महेश एलकुंचवार लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित वाडा चिरेबंदी, 
मग्न तळ्याकाळी, युगांत या त्रिनाट्यधारेने रंगभूमीवर इतिहास निर्माण केला.
 सलग तीन नाट्यप्रयोग एकाच दिवसात, अशी केवळ अशक्य वाटणारी घटना  
प्रत्यक्षात आणली गेली. हे कसे शक्य झाले. मुळात वाडा चिरेबंदीच्या पुढे
एलकुंचवारांनी मग्न तळ्याकाठी, युगांत कसे लिहिले. ते कुलकर्णींकडे कसे आले. 
कलावंत भूमिकांत कसे शिरले. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनेसाठी काय 
अभ्यास झाला, हे सारे नाट्य रसिकांसमोर पुस्तकरूपातच येणे आवश्यक होते. 
आणि तसे कुलकर्णी – दळवींच्या जिगिषा प्रकाशनाने आणले आहे. त्याबद्दल 
त्यांचे कौतुक करावे, त्यांना तमाम नाट्यकर्मींतर्फे द्यावेत, तेवढे धन्यवाद 
कमीच आहेत. मूळचे मराठवाड्यातील असले आणि मराठवाड्याचे असल्याचा 
अभिमान वाटतो, असा दावा ते म्हणजे विशेषतः कुलकर्णी करत असले तरी 
मराठवाड्याच्या मुळात असलेले मागास, आळसपण, जाती-धर्म, प्रांतवादात 
घुटमळणे त्यांच्यात नाही. औरंगाबादमध्ये काम करत असतानाच 
त्यांच्यात व्यावसायिकता कमालीची भिनलेली होती. मुंबईत तर त्यावर
झळाळी चढली. आपल्या भोवतीच्याच वर्तुळाला घेऊनच पुढच्या पायरीवर 
पाऊल ठेवायचे, हा शिरस्ता पाळत कुलकर्णी चालत गेले. त्या अर्थाने 
दायादमध्ये मांडलेला नाट्यत्रयीचा चित्तवेधक इतिहास म्हणजे त्याचेच 
पुढचे पाऊल आहे. संपादक म्हणून प्रशांत दळवी यांनी दायादची अतिशय 
आकर्षक मांडणी केली आहे. नाट्यत्रयीला जागतिक पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या 
कुलकर्णींच्या संवादापासून पुस्तकाचा प्रवास सुरू होतो. तो श्याम चौघुले या 
नौकानयनपटूंच्या प्रतिक्रियेनं थांबतो. मधल्या पानांवर नेपथ्यकार प्रदीप 
मुळ्ये, संगीतकार राहुल रानडे यांच्यासह निवेदिता सराफ, वैभव मांगले, 
प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर आदी रंगमंचावर विविध भूमिका साकारणारे 
त्यांची प्रांजळ मते नोंदवतात. शिवाय नाट्यत्रीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका 
बजावणारे श्रीपाद पद्‌माकर यांचाही अनुभव वाचण्यास मिळतो. जयंत पवार, 
रवींद्र पाथरे, राज काझी, श्रीपाद ब्रह्मे, सुधीर पटवर्धन, विजय तापस या 
मुंबई-पुणेकर समीक्षकांनी तेव्हा काय म्हटले होते, हेही कळते. शिवाय भालचंद्र
 मुणगेकर, निळू दामले, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, संदीप कुलकर्णी, 
सुनील बर्वे, क्षितिज पटवर्धन, प्रा. दासू वैद्य, अनिकेत सराफ यांना नाट्यत्रयीतून 
नेमके काय गवसले हेही समोर येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुराधा कपूर यांनी 
घेतलेली महेश एलकुंचवारांची १५ पानांची प्रदीर्घ मुलाखत यात आहे. यात एलकुंचवार 
यांनी त्यांचे सामाजिक स्थित्यंतराबद्दल मांडलेले चिंतन नाट्यकर्मींसाठी 
खूपच उपयुक्त दस्तऐवज आहे. तसेच काहीसे कुलकर्णींच्या लेखात आहे. त्यात त्यांनी 
स्वतःतील दिग्दर्शकीय कौशल्याबद्दल ओघवत्या शब्दांत सांगितले आहे. दिग्दर्शक होऊ
 इच्छिणाऱ्या नव्या पिढीसाठी त्यांचे ओघवते सांगणे म्हणजे मैलाचा दगड ठरू शकते,
 एवढी ताकद त्यात आहे. वाडा आणि नाट्यत्रयीचे प्रयोग केव्हा झाले. कुलकर्णींच्या 
दिग्दर्शकीय नोंदी कशा होत्या. प्रदीप मुळ्येंनी नेपथ्य रेखाटन कसे केले होते, असे 
अनेक महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात वाचण्यास, अभ्यासण्यास मिळतात. म्हणून 
ते पानागणिक सखोल आणि समृद्ध करणारे होत जाते. मुंबईच्या यशवंतराव 
चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत 
आणि त्यांचे सहकारी सुबोध जाधव यांनी हे पुस्तक विविध माध्यमांकडे पोहोचवले. 
त्यामुळे तेही या अमोल ठेव्याचे मानकरी आहेत. कलाकृतीची टिपणे तयार करणे, 
ती जपून ठेवणे, नंतर ती अभ्यासणे. नाटकाची छायाचित्रे, नाटक बांधणीसाठी 
दिग्दर्शकाने कागदावर उतरवलेली कॉम्पोझिशन्स, प्रकाश योजनेचे चार्ट हे सारे
 म्हणजे नाटकाच्या आयुष्यभराच्या प्रवासाची ऐतिहासिक कहाणी असते. 
मराठवाड्यात निर्माण झालेल्या स्मारक, वऱ्हाड निघालंय लंडनला, थांबा रामराज्य 
येतंय, गाजराची पुंगी या आणि अशा अनेक नाट्यकृतींनी तर अस्सल इतिहास 
निर्माण केला आहे. या प्रत्येकाचा पुस्तकरूपात दस्तऐवज तयार होऊ शकला असता 
तर रंगकर्मींच्या विश्वात मोठी भर पडली असती. पण ते मराठवाड्याच्या मागास, 
आळशी मनोवृत्तीमुळे शक्य झाले नाही. जे होऊन गेले त्यावर बोलून उपयोग नाही. 
म्हणून आता नव्या पिढीने विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 
विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून काही 
नाट्यकृतींना पुस्तकात आविष्कृत केले तर ती मोलाची कामगिरी निश्चित ठरेल.