Sunday 31 May 2020

अपघात नाही...मग?


सत्यजित कम्युनिकेशन्स, सत्यजित कन्स्ट्रक्शन्स, सत्यजित फॅशन्स अशा किमान पंधरा कंपन्यांचा मालक असलेला सत्यजित म्हणजे एकदम तरणेबांड, देखणे व्यक्तिमत्व. त्याच्याकडे कामाचा प्रचंड पसारा होता. अर्थात कारभार चालवण्यासाठी काहीजणांची मदत मिळत होतीच. त्यातील एक होते. त्याचे वडिल भैरवसिंग. वय साठीच्या पुढे ढळले, एका पायाने किंचित अधू असले तरी त्यांच्यात उत्साहाची मुळीच कमतरता नव्हती. साऱ्या कंपन्यांच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे व्यवस्थापक उत्तमसिंग हे देखील सत्यजितच्या विश्वासू कर्मचाऱ्यांमध्ये गणले जात होते. त्यांना साऱ्या व्यवहाराची खडा न खडा माहिती होती. मालकाच्या बंगल्यात थेट आतपर्यँत त्यांना प्रवेश होता. सत्यजित, भैरवसिंगांनी काय खावे, काय खाऊ नये, हे देखील तेच ठरवत. किचनचा प्रमुख मनोहरसिंग आणि त्याची पत्नी रुपाराणीला ते आठ दिवसांचा मेन्यू ठरवून देत. गेल्या काही महिन्यांपासून उत्तमसिंग अशा प्रयत्नात होते की, लवकरात लवकर सत्यजित विवाहबंधनात बांधले जावेत. माझे आता वय होत चालले आहे. फारकाळ मी सेवा करू शकणार नाही. त्यामुळे एखाद्या रुपवान, सुंदर मुलीशी लग्न करा, असे ते सत्यजित यांना सुचवत होते. भैरवसिंग यांनाही त्यांनी तसे सांगितले. पण त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मुलगा तरुण आहे. त्याला आणखी काही वर्षे जीवनाचा आनंद घेऊ द्या, असं ते म्हणत होते. तरीही उत्तमसिंग यांनी त्यांची नातेवाईक असलेल्या कामिनीचे फोटो सत्यजितला दाखवले. त्याला ती आवडली असे वाटल्यावर दोघांच्या काही भेटीही त्यांनी घडवून आणल्या. एवढ्या मोठ्या साम्राज्याची राणी होण्याची कामिनीची इच्छा सत्यजितची भेट झाल्यावर आणखी बळावली. आता लग्न करेन तर याच्याशीच असे तिने आडपडद्याने उत्तमसिंगांना सांगूनही टाकले. ती अतिशय उच्चशिक्षित तर होतीच. शिवाय महत्वाकांक्षीही होती. तिने तिच्या काही मैत्रिणींमार्फत माहिती काढली. तेव्हा सत्यजित फॅशन्सच्या सीईओ मालविका माथूरसोबत आपल्या भावी नवऱ्याचे प्रेमप्रकरण नुकतेच संपले असावे, असे तिला कळाले. मालविकाही महत्वाकांक्षी. तिलाही मोठ्या साम्राज्याची सम्राज्ञी होण्याची मनापासून इच्छा होती. पण एका पार्टीत मद्यपान करण्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्याचे रुपांतर ब्रेकअपमध्ये झाले. सत्यजित नव्या साथीदाराच्या शोधात असतानाच कामिनी त्याच्या आयुष्यात आली होती. पण त्याचे मन अधूनमधून मालविकाभोवती फिरतच होते. तिच्यातील व्यावसायिक चाणाक्षपणा त्याला भावत होता. त्यामुळे वैयक्तिक संबंध बिघडले असले तरी त्याने तिच्या नोकरीवर गदा आणली नव्हती. मात्र, ती दुसरी कंपनी शोधत होती. किरकोळ कारणावरून पार्टीत आवाज वाढवणाऱ्या सत्यजितला धडा शिकवावा, असे तिला तिचे मन वारंवार सांगत होते. अनेक वर्षांपासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा अमरसिंग त्यासाठी मदतीला तयारच होता. पण घडले वेगळेच. एक दिवस सायंकाळी कंपनीतून घरी परतताना ओसाड ठिकाणावर सत्यजितच्या कारला एका ट्रकने हुलकावणी दिली. कार दोन तीन कोलांटउड्या घेत थांबली. सत्यजित रक्ताच्या थारोळ्यात पडला. आठ दिवसानंतर सत्यजित शुद्धीवर आला. इन्सपेक्टर गुर्जरांनी जबाब घेत चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा अपघात नव्हे घातपाती हल्ला असावा. त्यांना अशीही माहिती मिळाली की, भैरवसिंग सत्यजितचे सख्खे वडील नाही. आई हेमावतीदेवीही सख्ख्या आई नाहीत. उत्तमसिंग हेमावतीचे दूरचे काका होते. अमरसिंगशीही त्यांचे नाते होते. त्यामुळे नेमका कोणी घातपात घडवून आणला असावा, असा प्रश्न गुर्जरांना पडला.

झाकोळलेल्या वाटेवरचा रंगयात्री

कोरोनाच्या संकटाने मोठी पडझड सुरू आहे. अनेकांच्या घरांचे आधारस्तंभ कोसळत आहेत. त्यात सौम्य व्यक्तिमत्वाचे, चिंतनशील आणि चतुरस्त्र लेखक रत्नाकर मतकरी यांचे जाणे म्हणजे रंगमंचावर नेपथ्यकाराने मोठ्या प्रयत्नाने उभा केलेला चिरेबंदी, देखणा वाडा कोसळण्यासारखेच आहे. आयुष्यभर इतरांच्या वाटचालीची काळजी घेणारा हा नाटककार अशा नाट्यमयरित्या आपल्यातून असा निघून जाईल, अशी कोणी कल्पनाच केली नव्हती. वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे १९५५ साली ‘वेडी माणसं’ नावाची एकांकिका मतकरींनी लिहिली. ती बऱ्यापैकी गाजली. मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘माझे रंगप्रयोग’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात त्यांनी त्या काळातील दिवसांचे अतिशय तटस्थपणे वर्णन केले आहे. त्यात ते कुठेही गुंतलेले दिसत नाहीत. चुकांची जबाबदारी आपल्यावर घेणे आणि यशाचे श्रेय इतरांना देणे, हा त्यांचा स्वभाव असल्याचे पानापानावर जाणवत राहते. मराठी रंगभूमीने १९६०नंतर मोठे वळण घेतले. दिवाणखाना, कौटुंबिक समस्या आणि मनोरंजनात अडकलेले मराठी नाटक वास्तवाशी भिडू लागले. समाजात दिसणाऱ्या समस्या रंगमंचावर येऊ लागल्य आजूबाजूला दिसणारी, क्रूरपणे वागणार हिंसक होणार धार्मिकतेचा लेप लावून बसलेली व्यक्तिमत्वे धडकू लागल रंगमंचाचा अवकाश मोडून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली त्याचे श्रेय निर्विवादपणे विजय तेंडूलकर, जयवंत दळवी, प्रेमानंद गज्वी, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांना द्यावे लागेल. त्याच काळात हिंदी रंगभूमीवर मोहन राकेश, शंकर शेष, गिरीश कर्नाड यांचा दबदबा सुरू झाला होता. राज्य नाट्य कामगार नाट्य स्पर्धांमध्ये तेंडूलकर आणि इतर समकालीनांची नाटके बहुचर्चित होती. त्यावर तत्कालिन प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा होत असे नाटकातील व्यक्तिरेखा मांडणी आणि लेखकाने दिलेला संदेश यावर अनेकदा गदारोळ ठरलेला असे एकीकडे असे सारे सुरू असताना रत्नाकर मतकरी वेगळी वाट निवडून त्यावर एक एक पाऊल निश्चयाने टाकत होते. कदाचित अभिनिवेशाने काही करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. ती त्यांची जडणघडण नव्हत. त्यांचा तो पिंड नव्हता. त्यामुळे १९६०-७०च्या दशकात मराठी रंगभूमी राजकीय, सामाजिक नाट्यांनी आणि लेखकांच्या वादग्रस्त विधानांनी ढवळून निघत असताना मतकरी त्यात कधीच रंगले नाहीत. नर्मदा बचाओ आंदोलन व निर्भय बनो आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पण स्वतः तयार केलेल्या, किंचित झाकोळलेल्या वाटेने चालणे बहुधा त्यांना आवडत असावे याचा अर्थ त्यांना सामाजिक भान नव्हते असे मुळीच नाही परंतु ते सांगण्याचा, व्यक्त होण्याचा त्यांचा मार्ग खूपच वेगळा होता. तो त्यांनी लोककथा ७८ मध्ये दाखवून दिला. अंगावर शहारे आणणारे, जात, वर्ण, वर्ग व्यवस्थेवर कठोर प्रहार करणारे नाट्य त्यांनी अतिशय ताकदीने लिहिले. साधारणत तीस वर्षांपूर्वी विजय देशमुख यांच्या दिग्दर्शनात बजाजच्या संघाने औरंगाबादला कामगार नाट्य स्पर्धेत लोककथाचा प्रयोग केला होता. सर्वच कलावंतांना जीव ओतून भूमिका केल्या होत्या. त्यामुळे पडदा पडत असताना ललित कला भवनात टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्याचे मोठे श्रेय अर्थातच मतकरींच्या लेखणीला होते. तेव्हा मला ते खूप बंडखोर आणि उग्र व्यक्तिमत्वाचे असावेत असे वाटले होते. पण ‘खोल खोल पाणी’ नाटकाच्या एका प्रयोगासाठी परवानगी घेण्याकरिता रमाकांत मुळे सरांसोबत मी मतकरींच्या घरी गेलो. दादरच्या हिंदु कॉलनीत सकाळच्या वेळी पोहोचलो. तेव्हा त्यांनी मृदू हास्य करत आमचे स्वागत केले. "केव्हा पोहोचलात अशी चौकशी केली आणि एका क्षणात प्रयोगाच्या परवानगीचे पत्रही दिले.मतकरींचे रंगभूमीवरील योगदान अतिशय व्यापक आहेच. पण त्यांना केवळ नाटककार म्हणणे म्हणजे त्यांच्यातील इतर प्रतिभांवर अन्याय करणे होईल. कारण ते कधीच नाटकांच्या चौकटीत बांधून राहिले नाहीत. त्यांनी बालनाट्य कथा, गूढकथा, ललित लेखन, वैचारिक साहित्य असे चौफेर लेखन केले. त्यांच्या ॲडम कादंबरीने त्या काळी तरुणाईत मोठा धुमाकूळ घातला होता. आणि थरारक गूढकथा. त्या कशा विसरता येतील. खरेतर मतकरी म्हणजे साधे, सरळ व्यक्तिमत्व. त्यामुळे त्यांच्यात हा गूढकथांचा थरार कुठून आला हे खरेतर त्या अर्थाने रहस्यच म्हणावे लागेल. माझ्या मते त्यांचे सर्वात मोठे योगदान बालरंगभूमीसाठीचे आहे. त्यांच्या आत्मचरित्रवजा कथनात त्यांनी जे काही सांगितले ते वाचून मन थक्क होते. ज्या काळात मुलांच्या मनोरंजनाचा कोणी फार विचार करत नव्हते. त्या काळात त्यांनी शाळा-शाळांत जाऊन बालनाट्ये केली. प्रसंगी आर्थिक फटका सहन केला. पण मुलांमध्ये नाटकाची आवड निर्माण करणे हे आपले कर्तव्यच आहे, या जाणिवेपासून तसूभरही मागे हटले नाही. पै – पै जोडून, खस्ता खात, संसाराला टाके देत प्रयोग करत राहिले. अशा सरळमार्गी, सामाजिक भान राखणाऱ्या व्यक्तिमत्वाविषयी सांगणाऱ्या लोककथा काही वर्षांनी नक्कीच तयार होतील. होय नाॽ

Sunday 24 May 2020

हायवेवर कोणी टाकला मृतदेह?


मी आत्मानंद. मला पोलिस कंप्लेंट नोंदवायची आहे, असं तो पस्तिशीतील तरुण म्हणाला. तेव्हा इन्सपेक्टर गायकवाडांना त्याच्या चेहऱ्याकडं पाहून वाटलं की, बहुधा दुचाकी किंवा मोबाईल चोरी असावी. फारच झालं तर घरफोडी असावी. म्हणून त्यांनी त्याला बाहेर हवालदार आहेत. त्यांच्याकडे जा, असा सल्ला दिला. पण त्यानं ऐकलं नाही. गायकवाडांसमोरची खुर्ची ओढून घेत त्यावर बसकण मारली. आणि ढसढसा रडू लागला. गायकवाडांनी पटकन आवाज देऊन दोन-तीन सहकाऱ्यांना बोलावून घेतलं. एकानं ग्लासभर पाणी पिलं. एक घोट पिल्यावर आत्मानंद थोडासा सावरल्यासारखा झाला. आणि म्हणाला, साहेब, माझी कंप्लेंट घ्या. माझी बायको पळून गेलीय. नऊ वर्षांचा संसार सोडून गेलीय ती. शुक्रवारी पहाटेच्या वेळी मी दूध आणण्यास गेलो. तासभर फिरून, व्यायाम करून, दूध घेऊन आलो. तर ती गायब होती. म्हणजे बहुधा मध्यरात्रीच केव्हातरी गेली असावी. मग मी तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. आत्या आहे तिला फक्त. पण ती नव्हती त्यांच्याकडं. येईल दोन तीन दिवसांनी राग शांत झाल्यावर, असं वाटलं. म्हणून वाट पाहिली. आणि आज तुमच्याकडं आलोय. एवढं सगळं एका दमात सांगून तो थांबला. गायकवाडांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला. हवालदार साबळेंना सांगत तक्रार नोंदवून घेतली. मिसेस आत्मानंद म्हणजे रिद्धिकाच्या फोटोवर नजर फिरवली. हजारात एक आहे, चेहरा आणि एकूण व्यक्तिमत्व, असं त्यांनी मनात मत नोंदवलं. आणि दुपारनंतर आत्मानंदच्या घराची पाहणी करण्यास गेले. एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम असलेला आत्मानंद सहा मजली अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर राहत होता. तीन बेडरुमचा फ्लॅट होता. दोन कार होत्या. एक बायकोसाठी, एक स्वतःसाठी. एक मुलगा. तो पाचगणीला असतो. एकूणात संपन्न घरातील ती महिला का निघून गेली असावीॽ गायकवाडांनी माहिती घेणं सुरू केलं. तेव्हा समोर आलं की, आत्मानंद कमालीचा देवभक्त. रोज सकाळ, संध्याकाळ घरात होम हवन. मंत्र जाप. तर जेमतेम बारावी पास असलेली रिद्धिका त्याच्या उलट. काहीशी उथळच. नवऱ्याची चांगली कमाई असली तरी आपणही काहीतरी उद्योग केला पाहिजे. चार पैसे कमावले पाहिजेत, असं तिला वाटत होतं. म्हणून तिनं साड्या, दागिने, खाद्य पदार्थ विक्रीचा घरगुती व्यवसाय सुरू केला होता. त्यात तिचा हळूहळू जम बसू लागला होता. त्यानिमित्ताने काहीजणांची ये-जा सुरू झाली होती. त्यात एक होती मीना. तिच्यासारखीच व्यावसायिक. मीनाचा नवरा अभय. एकदम देखणा आणि कायम खुसखुशीत विनोद सांगणारा. साड्यांचा पुरवठा करणारा विशालही तरुणच. पण एकदम शांत वृत्तीचा. याशिवाय अपार्टमेंट सोसायटीचे चेअरमन धनंजयही काहीना काही निमित्त काढून आत्मानंदच्या फ्लॅटमध्ये ये-जा करत होते. पण ते बरेच वयस्कर होते. उथळ रिद्धिकावर नजर ठेवणे हा आपला उद्देश असल्याचं ते त्यांच्या पत्नीला सांगायचे. धनंजयरावांशी बोलल्यावर इन्सपेक्टर गायकवाडांना कळालं की, आत्मानंदला रिद्धिकावर संशय होता. तिचं कुठंतरी प्रेम प्रकरण सुरू आहे, असं त्याला वाटत होतं. त्यावरून त्यांच्यात जोरदार धमश्चक्री होत होती. त्यामुळंच ती वैतागून गेली असावी. मग गायकवाडांनी सगळ्या पोलिस ठाण्यांना, खबऱ्यांना रिद्धिकाचे फोटो पाठवले. तेव्हा आठ-दहा दिवसांत काहीतरी हाती लागेल असं त्यांना वाटलं. पण तीन महिने उलटून गेले तरी रिद्धिका बेपत्ताच होती. तिचा मोबाईल तर घरीच होता. त्यामुळं लोकेशन कळण्याचा संबंधच नव्हता. शिवाय तिनं काही चिठ्ठीही ठेवली नव्हती. पोलिसांचे एक पथक पाचगणीलाही जाऊन आलं. पण ती मुलाला भेटण्यासाठी गेली नव्हती. अभय, विशाल, मीनावर प्रश्नांचा वर्षाव केला तरी धागा सापडत नव्हता. आणि अचानक हायवेवर एका कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची बातमी त्यांच्यासमोर आली. हा तरुण आत्मानंदचा दूरचा चुलतभाऊ सुखानंद होता. एकटाच रहात होता. साड्या, दागिने पुरवठा करणाऱ्या एका कंपनीत मोठ्या पदावर होता. पहिल्या वेळेला पाचशे साड्या देण्यासाठी आत्मानंदच्या घरी आला होता. नंतर फिरकलाच नाही. आत्मानंदशी त्याचे ठीकठाक संबंध होते. कोणी केला असावा सुखानंदचा खून. मृतदेहाजवळच्या मोबाईलने महत्वाचे धागे मिळवून दिले. तीन दिवसांतच इन्सपेक्टर गायकवाड खुन्याजवळ पोहोचले.   

Tuesday 19 May 2020

ॲपेकॅलिप्टो : जंगलाकडं जायला हवंॽ


रात्रीची वेळ. टीव्ही चॅनेल्स सर्फिंग करताना अचानक स्र्क्रीनवर काहीतरी अद्‌भुत दिसू लागतं. रिमोटवरील बोट तसेच राहते. काही क्षणात तुमचा मेंदू पडद्यावरील प्रत्येक हालचालीत, कथानकात झपाट्याने गुंतत जातो. सबटायटल्स, दृश्यांची सांगड घालत अर्थ समजून घेऊ लागतो. एकाबाजूला त्यातील पिळवटून टाकणारा आदीम संघर्ष क्षणाक्षणाला अस्वस्थ करतो. दुसरीकडं चित्रीकरणाची भव्यता, अद्‌भुतता पाहून आश्चर्यचकित करत जाते. मानवी इतिहासाचे एक निराळेच रूप दाखवून पडद्यावरचे कथानक थांबते. पण शेवटच्या ऐंशी सेकंदातील चारच संवादांनी अख्खा सिनेमा पुन्हा डोळ्यांसमोरून फिरू लागतो. एवढी शक्ती शेवटामधील प्रत्येक शब्दांत ओतली आहे.  
हा सिनेमा आहे, मेल गिब्सन यांचा ‘ॲपेकॅलिप्टो’. सिनेजगताच्या इतिहासातील सर्वोत्कृष्टपैकी एक असलेल्या ‘ॲपेकॅलिप्टो’ची कहाणी, मांडणी, सादरीकरण थरारक. ध्वनी, रंगभूषा, वेशभूषा सारेच नजर खिळवून ठेवणारे. कधीकधी त्यातील तपशील पाहता पाहता थकवून टाकतो. कारण मेल गिब्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर अतिप्रचंड मेहनत घेतली आहे. कोलंबसने पंधराव्या शतकात अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वीची तेथे माणूस कसा राहत होता, याचे डोळे विस्फारून टाकणारे दर्शन घडवले आहे.
असे म्हटले जाते की, मूळचा इटालियन कोलंबस स्पेनच्या राणीच्या आदेशावरून भारताच्या शोधासाठी निघाला होता. कारण त्या काळात भारतात आर्थिक सुबत्ता होती. येथील संपत्तीवर स्पेनला कब्जा करायचा होता. पण त्याच्या गलबताची दिशा हुकली आणि तो पोहोचला अमेरिकेच्या किनाऱ्यावर. त्याला वाटले तो भारतातच पोहोचला. म्हणून त्याने तेथे हजारो वर्षांपासून राहणाऱ्या माणसाला रेड इंडियन असे नाव दिले. त्याने तसेच त्याच्यानंतर आलेल्या युरोपियनांनी रेड इंडियन्सच्या क्रूर कत्तली केल्या. त्याच्या शेकडो कहाण्या आहेत.
पण कोलंबसचे पाऊल अमेरिकन खंडात पडण्यापूर्वी तिथं नेमकं काय होतं. तिथं माणूस कसा राहत होता. त्यांच्यातील नाते-संबंध कसे होते, याचा शोध मेल गिब्सनने ‘ॲपेकॅलिप्टो’मध्ये घेतला. तेव्हा माणूस मग तो कुठल्याही कालखंडातील, प्रदेशातील असो. माणूस कायम माणसाच्या रक्तासाठी आसूसलेलाच आहे. कोणत्यातरी कारणावरून दुसऱ्यावर हल्ला करणे, सूड उगवणे, भोसकणे, गुलाम बनवणे, दगाबाजी, मुडद्याच्या छातीवर नाच करत थयथयाट करणे यात माणूस रंगलेला आहे, असेच दिसले. मग मेक्सिकोतील मायन संस्कृतीचे जे अवशेष शिल्लक आहेत. पुरावे उपलब्ध आहेत. त्यावरून त्याने कथानकाची रचना केली आहे. ते असे आहे की, मायन साम्राज्याचा ढासळलेला पाया सावरण्यासाठी आणखी काही मंदिरे बांधा, असा सल्ला राजाला त्याचा ज्योतिषी देतो. या बांधकामासाठी मजूर हवेत. ते आणण्यासाठी मायन साम्राज्याचा क्रूर सेनापती जंगलांतील खेडेगावांत शिरतो. तेथील आदिवासींवर हल्ला करतो. त्यांना गुलाम बनवून साम्राज्यात आणतो. पण त्या गावचा तरुण नायक जग्वार तेथून निसटतो. गावाकडे धावत सुटतो. त्याला मारण्यासाठी सेनापती, त्याचे सैनिक जीवघेणा पाठलाग करतात. दरम्यान, हल्ल्यातून नशिबाने बचावत गावात राहिलेली जग्वारची गर्भारशी पत्नी एका खोल खड्ड्यात पडते. तुफानी पाऊस सुरू होतो. तिला प्रसववेदना सुरू होतात. पाठलागावरील एकेक हल्लेखोराला टिपून यमसदनाला पाठवत जग्वार गावात पोहोचतो का. पावसाने भरत जाणाऱ्या खड्ड्यातून त्याची पत्नी कशी बाहेर येते का, याचा थरार पडद्यावरच पाहावा, असा आहे. काळ उभा करणे, यात हॉलिवूडवाले एकदम मास्टर आहेत. ‘ॲपेकॅलिप्टो’ पाहताना ते आणखी ठसते. आपण चौदाव्या शतकातील अमेरिकन जंगलात आहोत, असेच वाटत राहते. त्यासाठी मेल गिब्सनने अचूक वातावरण निर्मिती केली आहे. शिवाय त्यावेळच्या लोकांची एक भाषा तयार केली आहे. त्या अपरिचित भाषेच्या आरोह-अवरोहांवर कलावंतांनी जो अभिनय केला तो शब्दांच्या पलिकडला आहे. बाळाच्या जन्माचा प्रसंग रोमांच उभा करतो.
अनेक अंगांनी चकित करणाऱ्या या सिनेमाचा शेवट अत्यंत प्रभावी. एकूणच मानव जातीला काहीतरी सांगणारा. क्रूर मायन सेनापतीच्या हल्ल्यातून बचावलेला आदिवासी नायक जग्वार, त्याची पत्नी निबिड जंगलात निघाले आहेत. सोबत एक नवजात आणि दुसरा तीन-चार वर्षांचा मुलगा आहे. उंच डोंगरावरून ते दोघे किनाऱ्यावर नजर टाकतात. तेव्हा कोलंबसचे जहाज अमेरिकेच्या किनाऱ्यावर लागले आहे. जग्वारची पत्नी त्याला विचारते, ‘आपण त्यांच्याकडे जायचंयॽ’ जग्वार ठामपणे उत्तर देतो, ‘आपण पुन्हा जंगलाकडं जायला हवं. नवी सुरुवात करण्यासाठी.’
कोरोनामुळे काही माणसांना जंगल तोडीची आठवण येतेय. श्रीमंत होण्यासाठी आपण पर्यावरणाचा खूपच नाश केलाय, असं काहीजणांना वाटतंय. मीच शक्तीशाली असं म्हणत जाती-धर्माच्या नावाखाली एकमेकांचे रक्त पिणं चूक आहे, असेही विचार बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या मनात घोळू लागले आहेत. त्यांच्यासाठी ही ‘ॲपेकॅलिप्टो’ची कहाणी सांगितली. बाकी काही नाही.     


डल्ला मंदिराच्या दागिन्यांवर


भय्यासाहेब वट्टमवार म्हणजे मातब्बर असामी. त्यांचे कुटुंब भलेमोठे. नऊ भाऊ आणि सात बहिणी. प्रत्येकाचे एक कापडाचे आलिशान दुकान. शिवाय किमान पन्नास एकर शेती. बहिणीही अतिशय सुखवस्तू घरात दिल्या होत्या. कोणे एकेकाळी म्हणजे अडीच – तीनशे वर्षांपूर्वी भय्यासाहेबांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील एका खेडेगावातून या शहरात आले. गावाचे सेवेकरी म्हणून पूर्वज काम करू लागले. हळूहळू पैसा पैसा जोडत त्यांनी मोठे साम्राज्य निर्माण केले. पण जे काही वैभव आहे. ते तिरुपती बालाजीच्या कृपेने आहे, असे ते ठामपणे सांगत. तीनशे वर्षांत वट्टमवार वंशाचा विस्तार किमान तीन हजार सदस्यांमध्ये झाला असावा. प्रत्येक घरात तिरुपती हेच दैवत. भय्यासाहेबांच्या पूर्वजांनी त्या काळात एक छोटेसे बालाजीचे मंदिर बांधले होते. मंदिर पूर्ण झाल्यावर उत्कर्ष सुरू झाला अशी त्यांची धारणा होती. गावकऱ्यांनीही ते डोळ्यांनी पाहिल्याने मंदिराचे महत्व दिवसेंदिवस वाढत गेले. ज्यांना दर्शनाचा फायदा झाला. त्यांनी तिरुपतीप्रमाणे इथंही सोनं-नाणं देणे सुरू केले. मूर्तीवर पन्नास लाखांचे दागिने चढले. शेकडो लोकांचे अर्थकारण मंदिराभोवती फिरू लागलं. सरकारचीही त्यावर नजर होतीच. त्यामुळं मंदिराच्या कारभारासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला. जिल्हाधिकारी ट्रस्टचे कायमस्वरूपी अध्यक्ष राहतील. वट्टमवार कुटुंबियातील एक व्यक्ती सचिव असेल. त्याच्याकडंच बहुतांश आर्थिक अधिकार असतील आणि ट्रस्टवरील नऊ कार्यकारी सदस्यांमध्येही सहाजण वट्टमवारच असतील, अशी घटना तयार झाली. कामाचा व्याप वाढत चालला. त्यामुळे मंदिरातील शिस्त, स्वच्छता आणि दागिन्यांच्या सुरक्षेसाठी भय्यासाहेबांनी काही वर्षांपूर्वी एमकेएस एजन्सीची नियुक्ती केली होती. एजन्सीचे दहा गार्ड आणि त्यांचा प्रमुख अरविंदसिंग कायम नजर ठेवून असत. गाभारा वगळता सगळीकडे सीसीटीव्ही होते. मंदिराच्या आवारात मुख्य पुजारी प्रल्हादअप्पा, त्यांची तीन मुले नारायण, शिवानंद, कालिचरण आणि त्यांच्या बायका राहत होत्या. अलिकडील काळात भय्यासाहेबांच्या खालोखाल कर्नाटकातील कुठल्यातरी खेडेगावातून आलेल्या प्रल्हादअप्पांचं महत्व वाढलं होतं. कारण ते थेट बालाजींशी संवाद साधतात, अशी वदंता पसरली होती. त्यांनी दिलेले दोन-तीन तोडगे फार फायद्याचे ठरले, असे सोन्या-चांदीचा प्रख्यात व्यापारी लालचंद सगळीकडं सांगत फिरत होता. भय्यासाहेबांच्या कानावर ही गोष्ट पडली. तेव्हा त्यांनी अप्पांकडं नाराजी व्यक्त केली. हे मंदिर खऱ्या श्रद्धाळूंसाठी आहे. त्याचे रुपांतर अंधश्रद्धांमध्ये होणार नाही, याची काळजी घ्या, असं त्यांनी कडक शब्दांत बजावलं. तेव्हा अप्पांची तिन्ही मुले आणि सुनाही साक्षीदार होत्या. भय्यासाहेब बाहेर पडताच कालिचरण भडकला. आम्ही एवढी मनापासून मंदिराची काळजी घेतो. सर्व व्यवस्था पाहतो. कधी त्यांच्याकडं कुठली तक्रार जाऊ देत नाही. एका पैशाचा घोळ नाही. तरीही केवळ लालचंदवरून त्यांनी असं बोलणं योग्य नाही, असं त्याचं म्हणणं होतं. तर नारायणला मनातल्या मनात विचार करत होता की, मंदिर परिसरातील दुकानांच्या भाड्यातून काही रक्कम आपण परस्पर खिशात घालतोय. हे बहुधा अजून भय्यासाहेबांना कळालेलं नाही. तर लालचंद आपल्या बापाबद्दल बाहेर काही चांगलं सांगत असेल तर त्यात आपल्या बापाची काय चूक आहे, हे शिवानंदला कळत नव्हतं. रात्री उशिरा गाभारा बंद करताना त्यानं मनातली खदखद अरविंदसिंगकडं बोलून दाखवली. तेव्हा अरविंदचा खास माणूस असलेल्या हरीसिंगनं ते पटकन टिपून ठेवलं. नंतर तो म्हणाला सुद्धा की, मंदिरात लवकरच काहीतरी गडबड होईल, अशी शंका वाटते. अरविंदसिंगनं त्याला खोदून खोदून विचारलं पण त्यानं समाधानकारक उत्तर दिलं नाही. मात्र, मंदिरातील भाडेकरूंच्या खोलीत राहण्यास आलेली अलकादेवी आणि तिची मुलगी मंगला संशयास्पद वाटतात. त्या बारकाईनं मंदिर बघत सारखं भटकत असतात. रात्री उशिरापर्यंत जाग्या असतात. आता त्या शिवानंदच्या नातेवाईक आहेत. म्हणून त्यांना थेट काही बोलता येत नाही, असं सांगू लागला. हरीसिंगच्या बोलण्याकडं अरविंदसिंगनं फारसं लक्ष दिलं नाही. पण त्याची ती चूक ठरली. भल्या पहाटे प्रल्हादअप्पा मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा उघडण्यास गेले तर तो उघडाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी जोरात बोंब ठोकली. सगळं शहर जागं झालं. पोलिसांचं पथक आलं. भय्यासाहेब, वट्टमवार कुटुंबातील अनेक सदस्य आले. बालाजीच्या मूर्तीवरील वीस लाखांचे दागिने गायब झाले होते. अंगभर काळे कपडे पांघरून आलेले तिघे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. इन्सपेक्टर कदम काही दिवसांत चोरट्यांच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचले.

Thursday 7 May 2020

आधे – अधुरे : पूर्ण नाट्य

मराठी रंगभूमीवर चमकदार कामगिरी करणारे अनेकजण एनएसडी म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी. पण एनएसडीवर कायम हिंदी भाषकांचेच वर्चस्व राहिले. तेथील सादरीकरणाची भाषा हिंदीच राहिली. एकतर त्यांच्या प्रांतात हे स्कूल आहे. दुसरे म्हणजे तिथल्या शिक्षकांमध्ये मराठी दुर्मिळच. जे होते. त्यांना मराठीचा दुस्वास होता किंवा सवतासुभा निर्माण केल्याची कुठेही नोंद नाही. पण तरीही हिंदी पट्ट्यातील विद्यार्थी जास्त. प्रेक्षकांमध्येही तेच. त्यामुळे अनेक दमदार मराठी नाटके तेथे सादर होण्याचा वेग कमी राहिला. त्यात १९६०नंतर महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी, मराठी विरुद्ध दाक्षिणात्य, मराठी विरुद्ध इंग्रजी असे राजकारण पेटले. समाजकारण धुमसून निघाले. त्याचा बराचसा फायदा त्यावेळच्या मराठी तरुणांना झाला. राजकारणी यशस्वी झाले. पण सांस्कृतिकदृष्ट्या पडलेले अंतर कायम राहिले. प्रसारमाध्यमांतून मराठी लेखक, अभिनेते, तंत्रज्ञ हिंदी भाषिकांसमोर जात राहिले. तरीही त्यांच्यातील प्रतिभेचे दर्शन सातत्याने घडलेच नाही. मराठी आणि हिंदी रंगभूमीमध्ये एकमेकांत मिसळून जाण्याची भावना कधी निर्माण झालीच नाही. किमान निकोप, गुणवत्तेची स्पर्धाही झालेली दिसत नाही. भाषेचा, संस्कृतीचा पोलादी पडदा कायम राहिला. अगदी नाट्य पंढरी मानल्या गेलेल्या मुंबईत मराठी रंगभूमी वेगळी आणि हिंदी वेगळी अशीच राहिली. हिंदीतील सर्वोत्तम नाट्य कलाकृती मराठीत फारशा आल्याच नाहीत. स्वीकारल्या गेल्या नाहीत.

अर्थात त्याला एक-दोन नाटकांचा अपवाद राहिला. यामध्ये सर्वात अग्रक्रमावर राहिले ते मोहन राकेश यांचे आधे अधुरे’. त्याचे शेकडो प्रयोग मराठी रंगभूमीवर झाले. कित्येक दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रींनी त्यात भूमिका करून स्वत:तील ताकद जोखून घेतली. केवळ ४७ वर्षांचे आयुष्य लाभलेले प्रतिभावान लेखक मोहन राकेश १९७२मध्ये जग सोडून गेले. त्यांच्या नाट्य लिखाणाचा अखेरचा टप्पा सुरू असताना मराठी रंगभूमी बहरात येत होती. विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, चिं. त्र्यं. खानोलकर असे अनेक लेखक उदयास आले होते. दिवाणखान्यात, हास्यविनोदात आणि कौटुंबिक विवंचनेत अडकलेले नाटक वास्तववादी करण्यात ते यशस्वी होत होते. मोहन राकेश यांना अधिक आयुष्य लाभले असते तर कदाचित मराठी-हिंदीतील दुरावा त्यावेळी काही प्रमाणात दूर झाला असता. कारण ते केवळ लिखाणात वास्तववाद मांडत नव्हते. तर प्रत्यक्ष जीवनातही वास्तवाशी भिडणारे होते. तेंडुलकरांप्रमाणेच सामाजिक विषमता, कुटुंब व्यवस्थेतील दांभिकता त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू होता. त्यांनी हिंदी रंगभुमीला एक वेगळा चेहरा मिळवून दिला.
तर मुद्दा असा आहे की, त्यांच्या आधे-अधुरेचा प्रयोग आजही ताजा, समकालीन वाटतो. अगदी हे नाट्य १९६०च्या दशकातील भारतीय शहरी संस्कृतीतील असले तरी. कारण त्यात त्यांनी ठसठशीतपणे आणि अगदी खोलवरपणे मानवी जीवनातील मूल्ये पेरली आहेत. एका ओळीत त्याचे कथानक एका कनिष्ठ मध्यमववर्गीय स्त्रीची विविध रुपे दर्शन असे आहे. त्याची सुरवात अगदी वेगळी. गुंतागुंतीची. पण ही गुंतागुंत हळूहळू उलगडू लागते आणि एकूणच भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीचे काय स्थान आहे. हे स्थान बदलण्यासाठी तिला काय करावे लागत आहे. संपर्कात येणाऱ्या पुरुषाशी ती कशी नाते संबंध प्रस्थापित करत जाते. आणि मग टप्प्या-टप्प्याने स्वतःच कशी तुटत जाते, याचे विदारक चित्रण होत जाते. त्यामुळे लेखकाला नाटकाची नायिका भारतीय समाजव्यवस्थेच्या, मानवी जीवन मूल्याच्या रुपात मांडायची आहे, असे लक्षात येते. केवळ भारतीयच नव्हे तर पुरुषी संस्कृतीतील अनेक घरांमध्ये कमी अधिक फरकाने असेच घडत असणार, असेच ठसत जाते. त्यासाठी मोहन राकेश यांनी अतिशय टोकदार संवाद लिहिले आहेत. दोन ओळींमध्ये दिलेली विश्रांती विलक्षण बोलकी केली आहे. जितक्या ताकदीचा अभिनेता, अभिनेत्री तेवढी व्यक्तिरेखा खुलत राहिल. दिग्दर्शक जेवढा कल्पक तेवढ्या सादरीकरणात दिग्दर्शकीय जागा तयार करता येतील. अशी लेखनात एक अजबता असलेली कलाकृती म्हणजे ‘आधे - अधुरे’ आहे, असे म्हटले तरी चालेल. कोरोनामुळे सगळे जग एकमेकांजवळ येत चालले आहे. जात, धर्म, पंथ, भाषांचे भेदभाव काही उपयोगाचे नाही, हे काहीजणांना कळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याचा फायदा घेऊन कोरोनानंतर आधे-अधुरे किंवा मोहन राकेश यांच्याच आषाढ का एक दिन किंवा अन्य हिंदी लेखकांच्या नाटकांचे अधिकाधिक प्रयोग झाले तर दोन भाषांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होण्यास थोडीशी मदत होईल, असा लॉकडाऊनच्या काळात टोचणारा विचार.


घरभेदी

एकेकाळी लोकप्रिय कामगार नेता असलेल्या रामपालसिंगवर गोळीबार झाला. दोन गोळ्या छातीत आणि एक पोटात गेली. तो ज्या वसाहतीत राहत होता. त्याच्या मागील बाजूस असणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काही घरगुती सामान खरेदी करण्यासाठी तो निघाला होता. तेव्हा मारेकऱ्यांनी डाव साधला. एकाच दुचाकीवरून आलेले तिन्ही हल्लेखोर तोंडाला रुमाल, मफलर बांधलेले होते. रामपाल पोहोचण्याच्या दहा मिनिटे ते कॉम्प्लेक्सपाशी आले. त्यातल्या दोघांनी सिगारेटी फुंकल्या. मग ते निघून गेले आणि रामपाल येण्याच्या दोन मिनिटे पुन्हा परत आले. गोळीबार करून भरधाव निघून गेले. दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. पण ती जुनी इंड सुझुकी मोटारसायकल असावी, असे सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांच्या लक्षात आल्याचे बातम्यांमध्ये सांगण्यात आले. रामपालसिंग एकेकाळचा गाजलेला कामगार नेता. त्याची दहशत होती आणि लोकप्रियताही. पण तो काळ ओसरला. त्याच्याभोवतीचे वलय कमी झालं, असा पोलिसांचा अंदाज होता. तो साफ चुकीचा ठरला. त्याच्या अंत्ययात्रेला तोबा गर्दी होती. दहा-बारा वर्ष कामगारांच्या हक्कासाठी आंदोलने करण्यात रामपाल आघाडीवर होता. त्याचे अनेक राजकीय शत्रू होते. कंपन्यांचे मालक तर खार खाऊन होते. त्या काळात त्याच्यावर एकदोन खुनी हल्लेही झाले होते. त्यामुळे काही मित्रांच्या आग्रहावरून तो नेतेगिरी सोडून फ्लॅट विक्री, प्लॉटिंगच्या धंद्यात उतरला. वर्ष, दोन वर्षांत स्थिरावला. त्याचे राजकीय विरोधक म्हणत प्लॉटिंगचा धंदा तर बनाव आहे. खरेतर कंपनी मालकांकडून त्याला दरमहा घसघशीत रक्कम मिळते. त्यामुळे जुने वैमनस्य हल्ल्याचे एक कारण असू शकते, असे म्हणत रेड्डी यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तेव्हा खबऱ्यांकडून एक एक माहिती मिळत गेली. रामपालचे सर्वात गाजलेले, हिंसक आंदोलन प्राईम प्लास्टिक इंडस्ट्रीजमधले होते. अगदी कंपनी मालक हरप्रीतसिंग गिल यांच्या कॉलरला हात घालण्यापर्यँत रामपाल पोहोचला होता. नंतर कंपनी बंद झाली. गिल निवर्तले. त्यांची दोन्ही मुले कॅनडात निघून गेली. मुलगी प्रीतमकौरने एका उद्योजकाशी लग्न केले. प्राईम बंद झाल्यावरच रामपालने नेतेगिरीतून बाहेर पडण्याचे ठरवले. त्याने गावाकडे शेती सुरू केली. तेव्हा चुलतभाऊ शिवपालसिंग, जसपालसिंगसोबत यांच्यासोबत त्याची तुफान हाणामारी झाली. अगदी एकमेकांवर बंदुका ताणण्यापर्यँत प्रकरण गेले होते. त्यानंतर शेतीच्या वाटण्यावरून सख्खे भाऊ अवधेश, जगमोहन यांच्याशी वाद झाले. दोन्ही भावांनी मिळून रामपालला चांगलेच तुडवून काढले होते. त्यामुळे त्याने गावाकडचा गाशा गुंडाळला. शहरात परतल्यावर तो गुंडगिरीकडे वळण्याच्या बेतात असताना अचानक त्याचे आयुष्य बदलले. त्याच्या आंदोलनामुळेच बंद पडलेल्या एका कंपनीतील रिसेप्शनिस्ट रेखा त्याच्या संपर्कात आली. दोघे प्रेमात पडले आणि तिने त्याला प्लॉटिंगच्या धंद्याकडे वळवले. कारण तिच्या बहिणीचा नवरा शरद हेच काम करत होता. रामपाल, रेखा आणि शरद या त्रिकुटाने कंपन्यांच्या रिकाम्या पडलेल्या जागा त्यांनी झपाट्याने बिल्डरांच्या घशात घातल्या. त्यातल्या दोन कोटींच्या देवाणघेवाणीवरून बिल्डर गहलोत, वर्मांसोबत त्याची अलिकडेच कटकट झाली होती. देखण्या, अतिमहत्वाकांक्षी, उच्चशिक्षित रेखाशी त्याचे खटके उडू लागले होते. तिची बिल्डरांशी वाढलेली घसट त्याला मान्य नव्हती. तिने त्यांच्या पार्ट्यांमध्ये जाता कामा नये, असे रामपाल बजावत होता. तर हाय सोसायटीत बस्तान बसवण्यासाठी हे सगळे करावेच लागणार. मी फक्त बिल्डरांना थोडे झुलवत आहे. त्यांच्याकडून दहा पैसे जास्त मिळवत आहे. त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत नाहीये. मी तुझे जीवन बदललेय हे विसरू नको, असे ती सांगत होती. उलट प्रॉपर्टी डिलिंगमध्ये कागदपत्रे तयार करून देणाऱ्या दोन मुलांची आई असूनही अत्यंत आकर्षक असलेल्या वकिल निलोफरसोबत तु गुंतत चालला आहे. तिच्या घरी विनाकारण फेऱ्या मारतोयस. असा म्हणत रामपाललाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत होती. त्यामुळे भाडोत्री हल्लेखोरांच्या मागे डोके कोणाचे असावेॽ असा प्रश्न इन्सपेक्टर रेड्डींपुढे होता.