Wednesday 20 April 2016

तंतू : अस्वस्थ मनाचा आक्रंद









तंतू  :  अस्वस्थ मनाचा आक्रंद



भारत स्वतंत्र होऊन ६९ वर्षे उलटून गेली. महाकाय प्रदेश, अनेकविध धर्म. हजारो जाती. लाखो परंपरा. कोट्यवधी लोक असलेल्या या देशाने खरंच प्रगती केली की नाही, असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. भारतावर प्रदीर्घ काळ काँग्रेसने सत्ता केली. त्यामुळे काँग्रेस समर्थक मंडळी काँग्रेसच्याच सत्ताकाळात प्रगती झाली असे म्हणतात. भाजप किंवा अन्य विरोधी पक्ष गरीबी अजून कायम म्हणजे प्रगती का? दलित, आदिवासी, मुस्लिम स्वातंत्र्यपूर्व काळात होते. त्याच्या तसूभरही पुढे सरकले नाही. हीच काँग्रेसची निती का, असा सवाल करतात. तर भाजप धर्माधिष्ठित राजकारण करतो. जाती-धर्मात फूट पाडून सत्ता बळकावतो. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्यास भाजप किंवा अन्य हिंदुत्ववादी पक्ष तयार असतात. त्यांना भारताच्या विकासाशी काहीही देणेघेणे  नाही. भाजप मुस्लिम, दलितविरोधी असल्याचे टीकास्त्र काँग्रेस आणि भाजपविरोधकांकडून अलिकडे वारंवार सोडले जाते. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून या टीकास्त्राला धार चढली आहे. मोदींमुळे समाजात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करत प्रारंभापासूनच भाजपविरोधी भूमिका असलेल्या काही साहित्यिक, वैज्ञानिकांनी पुरस्कार वापसी केली.

राजकारण म्हटले की, हे सगळे होणारच. पण मूळ मुद्दा भारतीय समाजाचा विकास झाला आहे का, असा आहे. तर त्याचे उत्तर काही मंडळी बराच झाला तर काहीजण थोडाफार झाला, असेच देतील. मात्र, भारतीय समाजमनाची वेगाने घसरण सुरू आहे. यावर बहुतांशजण सहमत होतील, अशी स्थिती येऊन ठेपली आहे. विकासाचे काम कसे झाले यापेक्षा ते कोणत्या जातीच्या, कोणत्या धर्माच्या, कोणत्या पंथाच्या माणसाने केले, याकडे लोकांचा कल वाढला आहे. एखादा गुन्हा केला तर त्यालाही जाती-पातीचा, धर्माचा रंग दिला जात आहे. एकीकडे भौतिक प्रगती सुरू असताना असा कल वाढत जाणे पुढील काळात देशासाठी भयानक घातक ठरणार आहे. मात्र, सामान्य माणसाच्या जीवनातून नैतिकतेची ही घसरण आताच नव्हे तर १९७०च्या दशकापासून सुरू झाली आहे. इंदिराजींच्या अमर्याद सत्तेमध्ये घसरणीची, जाती, धर्म द्वेषाची बीजे रोवली गेली. तेव्हापासून असहिष्णुतेचा पाया रचणे सुरू झाले. हिंसा सहसा नष्ट होत नाही. ती वाढतच राहते. जुलमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही प्रवृत्तींचा कल स्वतःची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो. परंतु, विचारांवर कुणाचीही हुकूमत चालत नसल्याने या प्रवृत्ती हल्ल्यांचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंतांकडे वळवतात. आणीबाणी घोषित होण्यापूर्वी बराच काळ आभाळ झाकोळून आले होते. राज्यकर्त्यांचा हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. `न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी…` अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती, असे प्रख्यात साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, भारतातील सर्वश्रेष्ठ लेखकांमध्ये गणले जाणारे एस. एल. भैरप्पा त्यांच्या तंतू या कादंबरीतून सांगतात. तेव्हा मन सुन्न होते. भारतापुढे काय वाढून ठेवले, या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता मन आक्रंदून जाते. खरेच आपल्याला स्वातंत्र्याचे महत्व कळाले आहे का. की आपल्याला फक्त जाती, धर्म, पंथ आणि त्यातील द्वेषातच स्वारस्य आहे. राजकारण्यांच्या हातचे कोलीत बनून राहणेच आपल्याला पसंत आहे का? ही घसरण थांबवण्याची कुणाची ताकद आहे का? घसरण सुरू असल्याचे कुणाच्या लक्षात तरी येतेय का? येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, या प्रश्नांनी आपण अस्वस्थ होतो.

समाजाची घसरण या मुद्याभोवती भैरप्पांनी `तंतू`चा पट मांडला आहे. त्यासाठी त्यांनी एका दैनिकाच्या संपादकाला नायक म्हणून केंद्रस्थानी ठेवले आहे. मुद्याचा विस्तार करण्यासाठी भैरप्पांनी जी अनेक वळणे घेतली आहेत. त्यात नवनवीन व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. त्यातील बारकावे, तपशील थक्क करून टाकतो. प्रत्येक व्यक्तिरेखा वाचकाच्या हृदयात केवळ उतरणार नाही तर दीर्घकाळ रेंगाळत राहिल. अशी मांडणी ते करतात. बऱ्याच व्यक्तिरेखा तर जणूकाय आपल्याभोवतीच आहेत. आपल्याशी बोलत आहेत, असे वाटू लागते. त्यांच्यातील काहींशी तर नाते जोडले जाते. तंतूत मांडलेल्या बहुतांश घटना आश्चर्यकारक वाटत असल्या तरी त्या अशक्य वाटत नाहीत. होय, असे घडू शकते. अरे, असे घडत आहे. होय, प्रत्येक गोष्टीला जाती-धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची आणि त्यावरच बोलण्याची सवय लोकांना लागली आहे. भौतिक सुख सर्वश्रेष्ठ मानत अनिष्ट गोष्टी वेगाने घडू लागल्या आहेत, असे प्रत्येक पान वाचताना

ठसत राहते. हीच भैरप्पांच्या लिखाणाची ताकद आहे. फक्त त्यांनी तंतूचे लिखाण केले त्यावेळी वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे जातीय, धार्मिक द्वेषापासून काही अंतरावर असावीत. त्यामुळे अलिकडील काळात मिडिआत उफाळलेला जातीय, धार्मिक द्वेष तंतूमध्ये आढळत नाही. एवढा एक मुद्दा सोडला तर तंतूचे समकालीन मूल्य कायम आहे.

बेंगळूरु येथे एका राष्ट्रीय दैनिकाचा संपादक, ब्राह्मणी संस्कृतीत वाढलेला रवींद्र त्याच्या गावाकडे जातो. आजोबांनी गावात कोणे एकेकाळी उभारलेले रुग्णालय कोणत्या अवस्थेत आहे, हे पाहण्यासाठी गेल्यावर त्याला वस्तुस्थितीचे तडाखे बसू लागतात. दुसरीकडे त्याचा मुलगा, पत्नी भौतिक प्रगतीमागे धावू लागतात. या धावण्याच्या नादात त्यांच्या चरित्र्याची घसरण सुरू होते. त्यांना, स्वतःला, गावाला आणि समाजाला सावरता सावरता रविंद्र कोलमडून पडतो, अशी ८७६ पानांमध्ये भैरप्पांनी मांडणी केली आहे. तिचे धागेदोरे, तंतू वाचता वाचता चकित, संभ्रमित करतात. विचारांना आणखी खोलवर नेतात. मूळ कानडी भाषेतील ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊससाठी डा. उमा कुलकर्णी यांनी सुरेख, प्रवाही मराठीत अनुवादित केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

Wednesday 13 April 2016

साकेत बुकवर्ल्ड अन् नेमाडेंच्या आठवणी

--
‘पूर्वी मी औरंगाबादेत असताना पुस्तकांची फारशी दुकानं नव्हती. बोर्डे नावाचे एक चांगले विक्रेते होते. त्यांच्याकडे उत्तमोत्तम पुस्तके मिळत. पण त्यांच्या दुकानात ते उभे राहू शकतील, एवढीच जागा होती. दुसरे एक साहित्य सहकार नावाचे दुकान होते पोलिस चौकीज‌वळ. त्यांच्याकडे काही पुस्तके मिळत. पण ते नेमके काय करत ते मला काही कळाले नाही. जोशींच्या पुस्तक दुकानात दुकानाच्या आकाराच्या तुलनेत फारशी पुस्तके नसायची.’ असे प्रख्यात साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी सांगितले. साकेत बुकवर्ल्ड या आधुनिक स्वरूपातील रचना असलेल्या पुस्तक दालनाचे उद्घाटन आठ एप्रिलला नेमाडेंच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी वाचक, रसिकांशी संवाद साधताना त्यांच्या औरंगाबादेतील पुस्तक दालनाविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ज्या खास शैलीत नेमाडेंनी त्या काळच्या पुस्तक विक्री व्यवहाराची आठवण करून दिली ती हशा उडवून गेली. पण खरेतर नेमाडेंनी औरंगाबादकरांच्या सांस्कृतिक, साहित्यिक मागासलेपणावर केवळ अचूक बोटच ठेवले नाही तर हे मागासलेपण नेमके कशातून आले आहे, हेही दाखवून दिले. तिरकस बोलण्यासाठीच प्रख्यात असलेल्या नेमाडे यांचे ६०-७०च्या दशकात औरंगाबादमध्येच वास्तव्य होते. त्या काळात औरंगाबाद जडणघडणीच्या दिशेने निघाले असे सर्वांना वाटत होते. मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरात ऐतिहासिक वास्तूंची कमतरता नव्हती. देश-विदेशातील पर्यटक सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून येथे येत होते. भौतिक सुविधा नसल्यातरी शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीची लक्षणे दिसू लागली होती. उच्च आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था उभ्या राहतील. त्यात शिक्षण घेणाऱ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणारे, त्यांना प्रगल्भ बनवाणारे सांस्कृतिक सोहळे जागोजागी होऊ लागतील, असे चित्र होते. सर्वात महत्वाचे म्हणजे विचारपूर्वक जीवनाची घडी बसवण्यासाठी मदत करणारी किंबहुना त्यात सिंहाचा वाटा असणारी ग्रंथ दालने निर्माण होतील. प्रत्येक महत्वाच्या वसाहतीत ग्रंथालये, पुस्तक विक्रीची दुकाने सुरू होतील, अशी अपेक्षा होती. ते सारेच फोल ठरल्याचे वळून पाहिल्यावर लक्षात येते. म्हणजे उच्च व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या. पण त्यात मुलांना घडवण्याचे काम फार थोडे झाले. संवेदनशील, समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी शक्ती देण्याऐवजी मुलांना राजकीय वळणावर नेऊन उभे करण्यात आले. सांस्कृतिक चळवळ मुंबई, पुण्यावरच अवलंबून राहिली. तेथून आले तेच चांगले. आपले एखादे नाटक खूपच चांगले असले तर त्यावर आधी मुंबईतून शिक्का  मारून आणायचा. लेखकाच्या प्रतिभासंपन्नतेवर पुण्याची मोहर लावून आणायची, असा प्रकार सुरू झाला. ग्रंथालयांतील पुस्तके नेली तर ती परत करायची नाही, अशी परंपरा मान्यवर मंडळींनीच सुरू केली. पुस्तकांच्या दुकानांविषयी तर नेमाडेंनी सांगितले तशीच अवस्था होती.  कोणत्याही शहराच्या वाटचालीत, प्रगतीत, संपन्नतेत अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात. त्याची काही मानके सांगितली जातात. रस्ते, पाणी, वीज, गटारी, रोजगार या भौतिक मानकांचे महत्व आहेच. पण त्यासोबत त्या गावातील प्रत्येकाचे मन घडवण्याचे, त्याला सुसंस्कृत, विचारी बनवण्याचे काम पुस्तके करत असतात. पुस्तक वाचनाची संस्कृती असलेली शहरेच खऱ्या अर्थाने प्रगत मानली जातात. दुर्दैवाने राजकीय नेतृत्व प्रगल्भ नसल्याने आणि धार्मिक, जातीय राजकारणातच अडकून पडल्याने भौतिक मानकात औरंगाबाद मागे पडलेच. पुस्तक वाचन संस्कृतीतही त्याची फारशी प्रगती झालेली नाही. जी काही झाली ती देखील वाचकांच्या रेट्यामुळेच झाली. त्यात पुस्तक विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनी अपेक्षित वाटा उचलला नसल्याचे नेमाडेंनी तिरकस शब्दात सांगून टाकले. त्यांचे बोलणे एकीकडे जिव्हारी लागत असताना दुसरीकडे प्रख्यात साहित्यिक, प्रकाशक बाबा भांड यांचे चिरंजीव साकेत भांड यांच्या साकेतवर्ल्ड पुस्तक दालनाचे उद्घाटन होत असल्याचा आनंदही होता. नेमाडे भाषणात म्हणाले की, आता मी लेखनासाठी प्रदीर्घ काळ बुडी मारणार आहे. बुडीतून बाहेर आल्यावर त्यांना साकेत बुकवर्ल्डसारखी किमान तीन दालने सुरू झाल्याची दिसली तरी औरंगाबादची सुसंस्कृत होण्याकडे वाटचाल सुरू झाली असे म्हणता येईल.

औरंगाबादेत पुस्तक विक्रीची दालने सुरू न होण्यामागे काही महत्वाची कारणेही आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे पुस्तक खरेदीची क्षमता असलेल्यांची संख्या कमी आहे. चित्रपट पाहणार नाही. हॉटेलात जेवण टाळेन पण महिन्याला एक पुस्तक खरेदी करेनच, असा पुस्तकवेडा वर्ग अत्यल्प आहे. पुस्तक खरेदीचा संस्कार शालेयस्तरावर पुरेसा होत नाही. महाविद्यालयीन जीवनात तर त्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ज्यांना पुस्तक विकत घ्यायचेच आहे, अशांसाठी राजहंस प्रकाशनाचे शाम देशपांडे, जनशक्तीचे श्रीकांत उमरीकर, मसापचे के. एस. अतकरे, विद्या बुक्सचा आधार पुरेसा ठरला. मात्र, गेल्या काही वर्षात औरंगाबादेत वाचकांचे आणि पुस्तक खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दरमहा बलवंत वाचनालयाच्या इमारतीत भरणाऱ्या प्रदर्शनांना मिळणारा प्रतिसाद त्याचेच प्रतीक आहे. पुढील काळात औरंगाबादच्या तरुण पिढीला, विविधस्तरातील वाचकांना प्रदर्शनापुरते मर्यादित राहण्याची इच्छा नाही. जगातील सर्वोत्तम पुस्तके त्यांना तत्काळ हवी आहेत. त्यासाठी प्रदर्शनाची वाट पहावी लागू नये, असे त्यांना प्रकर्षाने जाणवत आहे. शिवाय एका अत्याधुनिक पद्धतीने पुस्तकांची मांडणी असावी. प्रत्येक पुस्तक हाताळण्याचा निवांतपणा असावा, असेही वाटू लागले होते. नेमकी  हीच बाब साकेत यांनी टिपत नवे दालन सुरु केले. तरुण पिढीचे प्रतिनिधी असलेल्या साकेत यांनी पुढील काळात व्यावसायिकता जपताना औरंगाबादेत वाचन संस्कृती फुलवण्याचा मूळ उद्देश अडगळीत टाकू नये. वाचक हाच केंद्रबिंदू ठेवून वाटचाल केली तर त्यांचे बुकवर्ल्ड खऱ्या अर्थाने औरंगाबादचा अलंकार ठरेल. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरही तरुण मंडळी या व्यवसायात आली तर तो सर्वोच्च  अलंकार होईल, याविषयी शंका  नाही.