Thursday 13 August 2015

एनजीओंची झाडाझडती

एनजीओंची झाडाझडती
पाण्याची समस्या सोडवण्याच्या नावाखाली बहुतांश एनजीओ म्हणजे स्वयंसेवी संस्था बंद दाराआड ठेकेदारी करतात, असा आरोप ज्येष्ठ जलतज्ज्ञ दि. मा. मोरे यांनी केला. जागतिक पातळीवर जलतज्ज्ञ म्हणून गणले जाणारे माधवराव चितळे यांनीही स्वयंसेवी संस्थांच्या कारभारावर टीकेचा आसूड ओढला. या संस्था आणि सरकारी विभागांमध्ये ताळमेळ नसल्याने पाणी प्रश्न सुटल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. जलपथिक परिषदेच्या निमित्ताने औरंगाबादेत एरिया वॉटर पार्टनरशिप या विषयावर झालेल्या परिसंवादात त्यांनी ही जोरदार कानउघाडणी केली. त्यावेळी काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. एकीकडे मराठवाड्याचा पदरी नेहमी येणारा दुष्काळ आणि दुसरीकडे सरकारकडून जलयुक्त शिवार योजनेचा सुरू झालेला गवगवा. त्या योजनेत स्वयंसेवी संस्थांची होत असलेली भागिदारी या साऱ्या पार्श्वभूमीवर या दोन्ही तज्ज्ञांचे परखड बोल महत्वाचे आहेत. त्यांच्या टीकेमागील वेदना, तथ्य आणि पुढील काळात येणारी आव्हाने यावर सरकारला आताच विचार करावा लागणार आहे. अगदी एक लाखापासून ते कोट्यवधींची कामे करणाऱ्या संस्थांना कामकाजाची पद्धत सुधारावी लागणार आहे.
मोरे आणि चितळे यांचे जल विषयातील योगदान प्रचंड आहे. त्यांनी केवळ कागदावर योजना आखलेल्या नाहीत तर त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांंना सोबत घेऊन काम केले आहे. त्यांना वेळोवेळी आलेल्या अनुभवातून त्यांनी त्यांची परखड मते मांडली आहेत, याविषयी कोणताही संशय नाही. त्यामुळेच त्यांच्या टीकेतून शहाणपणाची दोन पावले टाकली तर साऱ्यांचे म्हणजे समाजाचे हित साध्य होणार आहे.
अर्थात त्याकरिता एनजीओंच्या मुळाशी जावे लागेल. त्यांच्या कार्यपद्धती आणि त्यांच्यासमोर असलेल्या अडचणींचाही विचार करणे अत्यावश्यक आहे. एकाच बाजूने टाळी वाजत नाही, हा नियम त्यांच्यासाठीही लागू आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला. खेड्यांचा विकास करा, असे आवर्जून, निक्षून सांगितले होते. गांधीजींच्या नावाने कारभार करणाऱ्या सरकारांना त्याचा विसर पडला. खेडी बाजूला ठेवून शहरीकरणाचा वेग वाढवण्यात आला. सरकारी यंत्रणा खेड्यांऐवजी शहरातील कामे करण्याकडे वळवण्यात आली. ग्रामीण भागात रोजगाराची संधी नसल्याने तेथील लोक शहराकडे धाव घेऊ लागले. मग गावातील विकासाची कामे कोण करणार. सिंचनाचा पाया असलेले बंधारे कोण बांधणार. नदी-नाले, ओढ्यांचे पाणी कोण अडवणार. टेकडीवरून वाहून जाणारे पाणी कसे रोखणार. तलावाची खोली कोण वाढवणार, त्यातील गाळ कधी काढला जाणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. सरकारी यंत्रणेतील बड्या, छोट्या अधिकाऱ्यांची अशी कामे करण्याची तयारी नव्हती. तेवढे मनुष्यबळही नव्हते. आणि पैसाही नव्हता. त्यामुळे १९७० च्या दशकात एनजीओंचे आगमन झाले. स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड आदी युरोपीय श्रीमंत राष्ट्रातून निधी आणायचा आणि त्यातून महात्मा गांधींच्या स्वप्नातील विकास करायचा, अशी योजना अाखली गेली. ग्रामीण भागाचा कायापालट करण्याच्या स्वप्नाने भारावलेल्या अनेक मंडळींनी त्यात उडी घेतली. कामांसाठी लोकांना सहभागी करून घेणे, हे खरेतर प्रचंड जिकीरीचे आणि चिकाटीचे काम. ते त्यांनी केले. काही गावे समृद्ध झाली. पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, अण्णा हजारेंचे राळेगण सिद्धी ही त्याची उदाहरणे. त्यांना ठळक प्रसिद्धीही मिळाली. यातून प्रेरणा घेऊन अनेक एनजीओ मैदानात उतरल्या. पाणी अडवा, पाणी जिरवा ही अत्यंत मौल्यवान योजना राबवण्याचे सरकारने ठरवले. त्यासाठी एनजीओंची मदत घेण्यात आली. विकासाचा मंत्र जपत त्या ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करतील. किमानपक्षी सिंचनाचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात १९९० नंतर आलेल्या जागतिकीकरणाने वेगळेच घडले. परदेशातून मिळणारा पैसा हळूहळू एनजीओंच्या बड्या अधिकाऱ्यांच्या खिशात खुळखुळू लागला. सायकल, दुचाकीवरून गावात ये-जा करणारे हे अधिकारी चारचाकीची धूळ उडवू लागले. काम कमी आणि खर्च जास्त असा प्रकार सर्रास होऊ लागला. महत्वाचे म्हणजे कामांवर नजर ठेवण्यासाठी सरकारी अधिकारीही सिंचनाच्या कामात डुंबू लागले. या साऱ्याचा परिणाम म्हणजे खेडी होती तशीच राहिली फक्त एनजीओ गब्बर होत गेल्या. या संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे सरकारलाही अशक्य होऊन गेले. वस्तुत: देश स्वतंत्र झाल्यावर सरकारनेच खेड्यांच्या विकासासाठी सरकारी यंत्रणा कामाला लावण्याचे धोरण ठेवले असते तर दि. मोरे. माधवराव चितळे यांच्यावर परखड मते नोंदवायची वेळच आली नसती, हे सत्य आहे.
मात्र, सत्याकडे कानाडोळा करण्याचा सरकारी खाक्या असतोच. कारण ग्रामीण भागातील विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळण होते. त्यातील काही वाटा सरकारी बाबूंच्या, अगदी मंत्ऱ्यांच्या खिशात जातो, असे म्हणतात. एकमेकांचा हात धरून वाहत्या पाण्यात हात धुणे सुरू आहे.
दुसरीकडे एनजीओंमधील ढासळत चाललेली नैतिकता ही देखील चिंतेची बाब असल्याचे मोरे, चितळे यांनी अधोरेखित केले आहे. अलिकडेच युती सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त आणि पू्र्वीच्या सरकारच्या पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेची कामे एनजीओंच्या नावाखाली राजकीय मंडळीच घेत आहेत. किंबहुना चार-पाच वर्षे एनजीओ चालवलेली मंडळी राजकारणात उतरत आहेत, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. गावातील पाणी प्रश्न सोडवण्याऐवजी तो प्रस्न रखडवत ठेवून त्या आड राजकारण केले जात आहे. म्हणजे खालपासून वरपर्यंत साऱ्यांचीच मिलिभगत झाली आहे. म्हणूनच कोट्यवधी रुपये ओतूनही गावांची सुधारणा होत नाही. राजकारणी, सरकारी अधिकारी आणि एनजीओचे संचालक मंडळ बंद खोलीत बसून तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतात. गाळ तर काही उपसला जात नाही. पैसा मात्र या खिशातून त्या खिशात जात राहतो. सर्वात महत्वाचे म्हणजे एनजीओसाठी थेट तळाला काम करणाऱ्याच्या आर्थिक बाबींचा विचारच केला जात नाही. त्याला अतिशय तुटपुंज्या वेतनावर गावामध्ये पाठवले जाते. त्याचे कष्ट आणि वेतन यांचा ताळमेळ नसल्याने तो देखील कामचलाऊ काम करण्यावरच भर देतो. सर्वाधिक जबाबदारी असलेला कर्मचारी असे करत असेल तर कामाचा बँड वाजणे साहजिकच आहे. यात दुसरी बाजू अशीही समोर येते की, काही एनजीओ प्रामाणिकपणे काम करू इच्छितात. त्यांची सरकारी यंत्रणेकडून अडवणूक केली जाते. त्यांच्या कामांच्या मूल्यमापनासाठी खास निकष वापरले जातात. कामे उधळून लावण्यापर्यंतही हालचाली होतात.
हे चित्र बदलण्यासाठी चितळे यांनी पारदर्शक त्रयस्थ यंत्रणेची गरज असल्याचे म्हटले आहे. सरकारी विभाग आणि एनजीओंना एका सूत्रात बांधून त्यांच्याकडून काम करून घेणारी व्यवस्था निर्माण व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्याची सरकारी पातळीवर दखल घेतली जाईल, असे वाटते. मात्र, त्यासोबतच महाविद्यालयीन तरुणांना ग्रामीण भागातील कामे एक वर्षभर करण्याची सक्ती करण्याचे धोरण सरकारने आखले पाहिजे. तशी व्यवस्था राष्ट्रीय सेवा योजनेत असली तरी ती सक्तीची नव्हे तर मर्जीची आहे. त्यातही बहुतांश ठिकाणी रासेयोची कामे म्हणजे वर्तमानपत्रात फोटो यापलिकडे फारसे असत नाही. हा देश माझा आहे. तो मला घडवण्याची माझी जबाबदारी आहे. ग्रामीण भागाचे रुप पालटले तरच शहरी लोकांचे जीवन सुखकारक होऊ शकते, याची जाणिव तरुणांना करून देणे. तरुणाईतील शक्तीचा देशहितासाठीच वापर करणे, ही काळाचीच गरज आहे. असे धोरण अाखून त्याची कडक अंमलबजावणी झाली तर खेड्यांच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेली एनजीओ आणि राजकारण्यांची ठेकेदारी कायमची बंद होईल.

Wednesday 12 August 2015

उशिर झाला असला तरी पेरते व्हा

उशिर झाला असला तरी पेरते व्हा

--

बरं सगळं जाऊ द्या. भलेमोठे खड्डे, फुटक्या जलवाहिन्या, मालमत्ता कराच्या आकारणीतील गोंधळ, प्रत्येक फायलीमागे चालणारा भ्रष्टाचार हे सगळं सोडून द्या. आणि महापालिकेने केलेले एक बऱ्यापैकी काम सांगा. स्मरणशक्तीला खूप ताण देऊनही सांगता येणार नाही. कारण? कारण असे कोणतेही ठोस काम केलेलेच नाही. घोषित केलेल्या कोणत्या चांगल्या योजनांचे तीनतेरा वाजवले, असे विचारले तर पटापट यादी प्रत्येकजण सांगू लागेल. कारण? कारण तीनतेरा वाजवण्यात महापालिका अग्रेसर आहेच. असे होण्यास कोण कारणीभूत आहे, असे विचारले तर प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे बोट दाखवू लागेल. एवढेच नव्हे तर काम कसे बिघडवले याचे पुरावेही देऊ लागेल. कारण हाच खेळ जबाबदारीतून सुटका करणारा आहे. लोकांच्या खिशातील पैसा स्वत:च्या खिशात राजरोसपणे टाकायचा आणि त्याचा आळही स्वत:वर येऊ द्यायचा नसेल हाच राजमार्ग आहे, हे नगरसेवकांना पुरते कळाले आहे. अधिकाऱ्यांनीच त्यांना हे धडे शिकवले आहेत.

पण केवळ नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दोष देता येणार नाही. राज्यातील बड्या राजकारण्यांनीही हेच केले आहे. औरंगाबादेतील सामाजिक समीकरणांचा फायदा घेत कायम औरंगाबादकरांना विकासाच्या ताटावरून उठवून दिले आहे.

पंधरा वर्षापू्र्वी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-आघाडीची प्रचारसभा होती. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आमखास मैदानावर झालेल्या त्या सभेत औरंगाबाद शहर देशातील टॉप टेनमध्ये आणण्याची घोषणा केली होती. त्यावर बराच काळ टाळ्या वाजल्यावर त्यांनी ‘जर आमच्या हातात सत्ता दिली तर’ अशीही पुस्ती जोडली. विलासराव नेहमी विकासात राजकारण नको, असे म्हणत. प्रत्यक्षात त्यांनी किमान औरंगाबादेत तरी फार कमी काळ राजकारण आणि विकासात अंतर ठेवले. त्यामुळे आमखास मैदानावरील त्यांची घोषणा टाळ्याखाऊ असली तरी त्याचे मतांमध्ये रुपांतर होणार नाही, याची खात्री काँग्रेस-आघाडीच्या कार्यकर्त्यांनाही होती. झालेही तसेच. लोकांनी त्रिशंकू अवस्थेतील सत्ता युतीच्या ताब्यात दिली आणि विकासाची संधी घालवली. विलासरावांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने मग पुढील काळात मदतीचा ओघ कमीतकमी राहिल, याची काळजी घेतली. मदत दिलीच नाही, असे केले नाही पण दिलेली मदत पुरेशी राहणार नाही, यावरही लक्ष दिले. मदतीचा योग्य उपयोग होईल. कामे दर्जेदार होतील, याकडे दुर्लक्षच केले. त्याचा फायदा युतीच्या पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी आणि अर्थातच अधिकाऱ्यांनी उचलला. २००६ मध्ये औरंगाबाद शहर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जेएनएनयुआरएममध्ये समाविष्ट होण्याची नामी संधी होती. ती फलद्रुप कशी होणार नाही, याची पुरेपुर काळजी राज्य सरकारने घेतली होती. विलासरावानंतर राज्याचा कारभार अशोकराव चव्हाणांकडे आला. त्यांनी २०१०च्या निवडणुकीत एमजीएमच्या मैदानावर सभा घेतली. त्यात नागरी पुननिर्माण अभियानात औरंगाबादचा समावेश करू, असे जाहीर केले. त्यांनीही  सत्ता आली तर अशी पुस्ती जोडली. पुन्हा लोकांनी काँग्रेस-आघाडीला नाकारले. मग ६७३ कोटींचा नागरी पुननिर्माण अभियानाचा प्रस्ताव तत्कालिन उपअभियंता अफसर सिद्दीकी यांच्या टेबलावर अडकला. तो पुढे सरकलाच नाही.

पण आता हे सगळं सोडून द्या. बाजूला ठेवा. झाले गेले विसरण्याची वेळ आली आहे. कारण केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबादचा (दुसरी स्मार्ट सिटी  डीएमआयसीमध्ये होणार आहे.) समावेश करण्यात आला आहे. पाच वर्षात सुमारे ७५० कोटी रुपये सरकारकडूनच मिळणार आहेत. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही युतीची सत्ता आहे. सत्तेचे काही थेट फायदे असतात. त्यातील एक म्हणजे काहीही कर्तृत्व नसताना, लोकोपयोगी ठोस कामे केलेली नसतानाही औरंगाबाद मनपाला स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत टाकण्यात आले आहे. वशिल्याने म्हणा किंवा अन्य कुठल्याही कारणाने म्हणा स्मार्ट सिटी होण्याकडे आपल्या शहराने पाऊल टाकले आहे. अर्थात पहिली यादी तर राजकारण डोळ्यासमोर ठेवून केली असावी, असे दिसते. मात्र, दुसऱ्या यादीत स्थान मिळवायचे असेल तर मनपाच्या कारभाऱ्यांना अचूक नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. स्वत:चे अंधाधुंद मूल्यमापन  करून दिलेले गुण यापुढे चालणार नाहीत. कर वसुली, विकास आराखडा, स्वच्छता मोहीम, रस्ता रुंदीकरण यावर भर द्यावा लागणार आहे. महत्वाचे म्हणजे एक एक रुपयाचा हिशोब जनतेसाठी खुला करावा लागणार आहे. महापौर त्ऱ्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, विरोधी पक्षनेते जहांगीर खान आदींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून स्मार्ट सिटीची पुढील वाटचाल करण्याचे ठरवले आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागवण्याचेही त्यांनी ठरवले आहे. वरिष्ठ अधिकारीही स्मार्ट सिटी म्हणजे विकासाची चांगली संधी असे मानत आहेत. शहराचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या ही योजना आता पदरात पाडून घेतली नाही तर पुढील दहा वर्षे विकास ठप्प होणार हे त्यांना कळू लागले, ही औरंगाबादकरांसाठी भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. मात्र, केवळ अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या भरवशावर ही योजना आपल्याला मिळेल, असे वाटून घेण्याचे मुळीच कारण नाही. ते करतील आपण बघत राहू, असे वाटून घ्याल तर फसाल. कारण यापूर्वी स्पेक, रॅम्के, एएमटी आणि आता समांतर, भूमिगत गटारसारख्या अनेक चांगल्या योजनांचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांनीच मंडळींनी वाटोळे केले आहे. लोकांनीही त्यांना त्याचा कधी जाब विचारला नाही. विचारला तरी त्याचे सत्ता बदलात रुपांतर केले नाही. म्हणूनच जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून भ्रष्टाचार करायचा आणि त्याबद्दल कारवाई होण्याची शक्यता दिसू लागताच जात, धर्म, पंथाच्या आड लपायचे, असे उद्योग त्यांनी गेले २५ वर्षे केले आहेत. वाटोळे करणाऱ्यांमध्ये महापालिकेबाहेरील पण महापालिकेतच स्वारस्य असलेली स्थानिक राजकीय मंडळी आहे. या वाटोळे करणाऱ्यांच्या टोळीला रोखण्याचे कामही महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्यासह जनतेला करावे लागणार आहे. प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवावी लागणार आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार औरंगााबद महापािलकेचा नावलौकिक आणि आतापर्यंत लावलेली कामाची वाट लक्षात घेता स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या यादीत स्थान टिकवण्याची वाट बिकटच आहे. त्यामुळे यावर्षी संधी मिळणे कठीण आहे. तरीही आतापासूनच तयारी केली तर पुढील वर्षीच्या यादीत नक्कीच औरंगाबाद असेल. त्यामुळे उशिर झाला असला तरी चांगल्या कामांची आणि नियोजनाची पेरणी करायला हवी. अन्यथा काही वर्षांनी जुने औरंगाबाद शहर बकाल आणि डीएमआयसीतील औरंगाबाद जागतिक स्तरावरचे होईल. मग आपण आपल्याच चुकांवर पांघरूण टाकण्यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवत राहू.




Thursday 6 August 2015

यात तरी हात धुऊ नका

यात तरी हात धुऊ नका

रस्ते, शिक्षण असो की सिंचन. सरकारी  मेहरबानीच्या रांगेत कायमच  मागे असलेल्या मराठवाड्यात  सरकारने कृत्रिम पाऊसही उशिराच पाडला. सुमारे दहा हेक्टर जमिनीवरील  पिकांच्या माना मुरगळल्या गेल्यावर सरकार जागे झाले. वस्तुत:  पिकांची स्थिती चिंताजनक आहे. आकाशात पावसाचे ढग आहेत. परंतु, वाऱ्यामुळे ते वर्षाव न करताच निघून जात आहेत, असे अहवाल जुलैच्या मध्यातच सरकारी बाबूंनी त्यांच्या साहेबांकडे आणि साहेबांनी मंत्रीमहोदयांकडे पाठवले होते. त्यावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार, असे जाहीर करण्यात आले.  प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी तब्बल  दोन आठवड्यानंतर झाली. त्यातील दोन दिवस तर हवाई फवारणीच्या रासायनिक नळकांड्या मुंबईत कस्टम्सने अडवून धरल्यामुळे कृत्रिम पाऊस लांबणीवर पडला होता. एकीकडे मुख्यमंत्र्यांसह सारे मंत्री मराठवाडा आता मागास राहू देणार नाही, अशी भीमदेवी थाटातील घोषणा करतात. दुसरीकडे रासायनिक नळकांड्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार औरंगाबादच्या विमानतळावर पोहोचतील, याची काळजीही घेत नाही. हे खरे तर त्या घोषणेतील पोकळपणा सिद्ध करते. हाच प्रकार पश्चिम महाराष्ट्रात झाला असता तर तेथील लोकप्रतिनिधी आणि जनतेेने सरकारला धारेवर धरले असते. पण मराठवाड्यातील जनता, लोकप्रतिनिधी इतके सोशिक आहेत की त्यांना उशिरा का होईना पाडला ना पाऊस, असेच वाटत आहे.  गेले दोन दिवस झालेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे औरंगाबादेत आले. लातूरला विमानातून फेरफटकाही मारला. पुढील दहा वर्षे मराठवाड्यावर वरुणराजाची अवकृपा राहणार असे भाकित वर्तवले जात असल्याने औरंगाबादेत कृत्रिम पावसाचे कायमस्वरूपी केंद्र राहिल, असे त्यांनी जाहीर केले आहे. काही वर्षापूर्वी असेच दुष्काळी वातावरण असताना कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला. तो साफ फसला होता. मात्र, त्यातही अधिकाऱ्यांनी हात धुऊन घेतले. कोणतीही सरकारी योजना म्हटली की त्यात गैरव्यवहार आलाच. त्याबद्दल आता कुणाची तक्रार राहिलेली नाही. मात्र, निसर्गाची सर्वोच्च देणगी असलेल्या पावसात तरी या मंडळींनी हात धुऊन घेऊ नयेत, अशी मराठवाड्यातील जनतेची भाबडी आशा आहे.





Wednesday 5 August 2015

दिशा बदलणारा नाटककार

दिशा बदलणारा नाटककार

‘‘मिलिंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९५० ते १९५५ पर्यंतच्या काळात असायचे. प्राचार्य चिटणीसांशी समस्त कॉलेजच्या प्रगतीसंबंधी चर्चा होत असे. प्राध्यापकांच्या वाचनापासून ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर लोकशाहीपर्यंत चर्चा झडत. त्यावेळी स्नेहसंमेलनात सादर होणाऱ्या नाट्य प्रयोगांना पाहून आपल्या विषयावर मुलांना लिहायला सांग व ते सादर करा, अशी अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केली. चिटणीससरांनी त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनावर, समस्यांवर नाटक लिहावे अशी नोटीस काढली. १९५४चा काळ. नाटक आले नाही. चिटणीससरांनी तसा रिपोर्ट बाबासाहेबांना दिल्यावर ‘मग तूच लिही’ म्हणून फर्मान सोडले. मी नाटककार नाही हे सांगूनही बाबासाहेब बधले नाहीत. चिटणीससरांना मग नाटककार व्हावे लागले आणि युगयात्रा या नाटकाचा जन्म झाला. जाणिवपूर्वक युगायुगाची कहाणी, आंबेडकर दृष्टीतून व्यक्त झालेला हा प्रवास माईसाहेबांसह तो बोधी मंडळाने, िवद्यार्थी, प्राध्यापकांनी केलेला प्रयोग त्यांनी पाहिला. पावती दिली. १४ एप्रिल १९५५ रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसाची भेट दलित नाटकाच्या चळवळीचा प्रारंभ बिंदू ठरला.” दलित नाट्य चळवळ व रंगभूमीशी जोडलेले अभ्यासू रंगकर्मी प्रा. अविनाश डोळस यांनी सांगितलेली ही आठवण दलित रंगभूमी आणि नाटककार प्रकाश त्रिभुवन या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकात प्रा. यादव गायकवाड यांनी नोंदवली आहे.

ती वाचताना आपण हळूहळू पाने उलटत जातो आणि एका सशक्त दलित नाट्य चळवळीचा इतिहास जिवंत होतो.  प्रा. गायकवाड यांनी अनेक संदर्भ आणि भाष्यांसह अधोरेखित केलेला हा प्रवास खरेतर गेल्या ६० वर्षांचा साक्षीदारच म्हणावा लागेल. या इतिहासात त्यांनी नाट्य लेखकांनी मांडलेले विषय. त्या मांडणीमागील भूमिका तसेच त्यातील आशयघनता आदींवरही सखोल विवेचन केले आहे. दलित रंगभूमीवर प्रभाव टाकणारे अनेक नाट्य लेखक आहेत. त्यात प्रामुख्याने नाट्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, भि. शि. शिंदे, टेक्सास गायकवाड, संजय पवार यांचा समावेश आहेच. मात्र, त्यांनी मुख्य भर दिला आहे तो औरंगाबादचे रहिवासी असलेले प्रकाश त्रिभुवन यांच्यावर. समीक्षकांकडून काहीसे दुर्लक्षिले गेलेले त्रिभुवन हे दलित रंगभूमीवरील महान नाटककार आहे, असे त्यांनी अनेक मुद्यांसह स्पष्ट केले आहे. त्यात कमालीची सत्यता आहे. केवळ मुंबई-पुण्यात वावर नसल्याने आपल्यातील अनेक मंडळी प्रतिभा असूनही लपली जातात. त्यात त्रिभुवन यांचा समावेश करावा लागेल. अत्यंत शांत, संयमी व्यक्तिमत्व असलेल्या परंतु अंर्तमनात ज्वालाग्राही, स्फोटक विचारांची मांडणी करण्याची त्रिभुवन यांची क्षमता आहे. ती त्यांनी त्यांच्या नाट्य लेखनातून सिद्ध केली आहे. 

युगयात्रानंतर केवळ दलितच नव्हे तर मराठी रंगभूमीवर नवा प्रवाह आणणारे थांबा  रामराज्य येतंय हे त्रिभुवन यांचे नाटक. १६ डिसेंबर १९८० रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. कामगार राज्य नाट्य स्पर्धेत उस्मानपुरा येथील ललित कला भवनात झालेला एक प्रयोग पाहिला. तो अजूनही कित्येकांच्या स्मरणात आहे. केवळ स्मरणातच नाही तर त्यातील प्रसंग, संवाद आणि कॉम्पोझिशन्सही मनावर कोरले गेले आहेत. एवढ्या सामर्थ्यवान संहितेचा लेखक दुर्लक्षित राहणे हे तमाम रंगकर्मींचे दुर्दैवच म्हणावे लागेल. एकीकडे थांबा रामराज्यचे प्रयोग प्रचंड गाजत असताना त्याची तत्कालिन तथाकथित समीक्षकांनी अपेक्षित दखल घेतली. कधी नाट्य लेखक म्हणून प्रा. दत्ता भगत तर कधी या नाटकाचे दिग्दर्शक प्रा. अविनाश डोळस यांनाच लेखक संबोधण्यात आले. मात्र, त्रिभुवन यांनी त्यावर कधीही त्रागा केला नाही. ते त्यांच्या वाटेवर शांतपणे चालत राहिले. हे त्यांच्यातील मोठेपण आणि वेगळेपणही आहे.

थांबा रामराज्य येतंय या नाटकाने लोकप्रियतेचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. अनेक कलावंतांना ओळख मिळवून दिली. परंपरावादी, दिवाणखान्याच्या चौकटीत अडकून पडलेल्या मराठी रंगभूमीच्या कक्षा त्यांनी रुंदावल्या. विषय मांडण्याची  दिशाच बदलून टाकली. दलितांचे नेमके दु:ख काय. त्यांना गावात नेमकी कशी वागणूक मिळते. रोजचा श्वास घेण्यासाठी त्यांना कोणत्या टिपेचा संघर्ष करावा लागतो, हे त्यांनी त्यांच्या लेखणीतून अतिशय प्रभावीपणे मांडले. त्यातील अाशयसंपन्नता आजही थक्क करून टाकणारी आहे. स्वत:च्या जीवनात जे भोगले, पाहिले, पचवले ते त्यांनी एवढ्या ताकदीने नाट्य रुपात सादर केले आहे की बऱ्याच वेळा थांबा रामराज्य येतंय मधील प्रसंग रंगमंचीय अवकाश फोडून टाकत बाहेर येऊन उभे राहतात. नाट्य प्रवाही आणि वेगळेपण सांगणारे हवे यासाठी त्यांनी मिथके, पौराणिक प्रसंगांची जी रचना केली आहे ती त्यांच्यातील नाविन्यतेची साक्ष देणारीच आहेत. दलित रंगभूमी म्हणजे केवळ दु:ख, वेदना मांडणे नाही.े तर शोषित, पिडीत वर्गाला अत्याचारांच्या विरोधात समर्थपणे उभे राहण्याची, स्वत्वातील अंगार चेतवण्याची ताकदही आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे. म्हणूनच त्रिभुवन मराठी रंगभूमीवरचे महत्वाचे नाटककार आहेत.

थांबा, रामराज्यमुळे रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवल्यावर त्रिभुवन स्वस्थ बसले नाही. त्यांनी एक होता राजा, गणनायिका आम्रपाली ही नाटके लिहिली. ती दोन्ही रामराज्य एवढीच वेगळ्या वळणाची आणि आशयघन आहेत. धन नको, वन हवे या बालनाट्यातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देताना बौद्ध संस्कृतीशी सुरेख सांगड घातली आहे. त्यांनी लिहिलेल्या दिग्विजय आणि इतर एकांकिका, सत्तेमेव जयते या छोटेखानी एकांकिका पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. या एकांकिका नव्या पिढीतील कलावंत, दिग्दर्शकांसाठी अत्यंत मोलाच्या ठरणाऱ्या आहेत. त्यात त्रिभुवन यांनी मांडलेली सूत्रे रसिकांनाही भावणारी आहेत. शिवाय ही सूत्रे सामाजिकदृष्ट्याही संदेश देणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांचे दिशा बदलून टाकणारे लेखन अमूल्य आणि एेतिहासिक दस्तावेज म्हणूनच नोंदले जाईल, याविषयी कोणतीही शंका नाही.