Tuesday 31 August 2021

सलिमा : रक्षणासह शांतता

तिकडं काबूल पडलं आणि इकडं जणूकाही नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तालिबान्यांचा झेंडा फडकला आहे. हातात मशिनगन्स घेऊन तालिबानी चांदनी चौकात फिरू लागले आहेत. संसद भवनात त्यांनी सभा भरवली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी तालिबानच्या मदतीने कश्मिर स्वतंत्र करून टाकला आहे. १३५-१४० कोटींचा भारत देश गुडघे टेकून शरणागती पत्करतो आहे, असं वाटण्याइतपत कोलाहल प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाला. युद्ध नको. त्यांच्याशी बोलाचाली सुरू करा. त्यांना समजून घ्या, असेही सल्ले देण्यात आले. दुसरीकडं पाकिस्तान, चीनलाच कसा धोका आहे, असंही पत्रपंडित भरभरून बोलू लागले. लिहू लागले. खरंतर कोणी कितीही म्हणत असलं तरी क्रौर्य, हिंसा, अतिरेक, द्वेष, अहंकार, गर्व माणसाच्या रक्ताच्या थेंबाथेंबात ठासून भरला आहे. त्यामुळे त्याच्यातील प्रेम, ओलावा, आपुलकी, माणुसकी असे तुलनेने कमी प्रभावी असलेले गुण क्वचित प्रगट होऊन दिसेनासे होतात. माणसाला शांतता हवी असते पण ती कोणाला तरी संपवूनच मिळू शकते, यावर मोठ्या समूहाचा ठाम विश्वास आहे. म्हणून कोणी कितीही म्हटलं तरी पृथ्वीच्या पाठिवर कुठेना कुठे युद्ध सुरू असतं किंवा युद्धासाठीचं वातावरण तयार होत असतं. माणसाला युद्धासाठी फक्त एक कारण हवं असतं. त्यात काहीजण जिवावर उदार होऊन लढतात. तळहातावर शिर घेऊन मैदानात उतरतात. कारण त्यांना त्यांच्या भूमीचं, अस्तित्वाचं, संस्कृतीचं रक्षण करायचं असतं. तर काहीजणांना या रक्षण करणाऱ्यांचं शिरकाण करायचं असतं. लढणाऱ्या आणि रक्षणकर्त्यांमध्ये मुख्यत्वे पुरुषांचा समावेश असला तरी काही महिलाही त्यात आघाडीवर असतात. काही महिलांनी थेट फौजांचे नेतृत्व केले आहे. रणांगणातून पळ काढणाऱ्या पुरुषांना त्यांनी लढण्यासाठी प्रेरणा दिली आहे. अशा काही लढवय्या, धाडसी महिलांमध्ये अफगणिस्तानातील सलिमा माझारी यांचा समावेश झाला आहे. महिनाभरापूर्वी त्या जागतिक प्रसिद्धीच्या पडद्यावर आल्या. एकीकडे महासत्तेने प्रशिक्षित केलेले अश्रफ घनी समर्थक सैन्य अक्षरश: एकही गोळी न झाडता शरणागती पत्करत होते. दुसरीकडे सलिमा तालिबान्यांच्या फौजेशी झुंज देत होत्या. लढता लढता त्यांना तालिबानने कैद केले. सलिमा या शब्दाचा अरेबिक भाषेमधील अर्थ संरक्षण, शांतता असा आहे. या दोन्ही शब्दांना परिपूर्ण अर्थ प्राप्त करून देणारे त्यांचे व्यक्तिमत्व. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल डिफेन्स अकॅडमीची द्वारे मुलींसाठी खुली करण्याचा ऐतिहासिक निर्णय गेल्याच आठवड्यात दिला. त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तर सलिमांचे लढवय्येपण अधिक अधोरेखित होते. त्या मूळ अफगाणी. हाजरा समूहाच्या प्रतिनिधी आणि शिया पंथीय. रशियाने अफगणिस्तानात घुसखोरी केली. तेव्हा त्यांचे कुटुंब निर्वासित म्हणून इराणमध्ये पोहोचले. तेथे १९८०मध्ये सलिमांचा जन्म झाला. तेहरान विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी स्थलांतरितांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत काम सुरू केले. अमेरिकेने तालिबानचा पाडाव करण्यासाठी घुसखोरी केल्यावर त्या अफगणिस्तानात त्यांच्या मूळ गावी चहारकित येथे पोहोचल्या. २०१८मध्ये त्यांच्या जिल्ह्यासाठी गर्व्हनरपद भरले जाणार असल्याचे कळाल्यावर त्यांनी अर्ज केला. त्यांची निवड झाली. अफगणिस्तानातील त्या पहिल्या महिला गर्व्हनर ठरल्या. या पदावरून लोकांची सेवा करणे त्यांनी सुरू केले. विशेषत: महिलांचे शिक्षण, त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळवून देणे, यासाठी त्यांनी काम केले. त्यांच्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी सुमारे १०० तालिबानी अतिरेक्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला. सलिमांच्या शब्दांनी तो चमत्कार घडवला होता. पुढे काही महिन्यातच अमेरिकन फौजा अफगणिस्तानमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली. आणि या फौजांची माघार सुरू होताच तालिबान देशाचा ताबा घेण्यासाठी हल्ले करतील. त्यांची राजवट म्हणजे महिलांना सर्वाधिक धोका हे सलिमांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्यांच्या बाल्ख प्रांतासाठी सैन्य बांधणी सुरू केली. त्यांच्या आवाहनावरून लोकांनी गाई, म्हशी, घरे विकून शस्त्रे खरेदी केली. सलिमांनी तरुणांच्या तुकड्या स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देणे, लढाईसाठी प्रेरणा देणे सुरू केले. त्यांच्या नेतृत्वातील छोटेखानी दलाने तीन दिवस कडवी लढत दिली. पण अखेर तालिबान्यांनी त्यांना पकडले. अजूनपर्यँत त्यांची खबरबात नाही. पण त्यांना मारण्यात आले असावे, असा त्यांच्या समर्थकांचा कयास आहे. तसे झाले असेल अफगणिस्तानने खरेच संरक्षण, शांतता गमावली असे म्हणावे लागेल. नाही का?

Friday 27 August 2021

सुवर्ण स्वप्नांचा साधक

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मोठे यश मिळवले. या यशाचा पाया चार दशकांपूर्वी रचणारे ओ. एम. नांबियार यांचे नुकतेच निधन झाले. भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा यांचे ते गुरु होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उषा यांची कारकीर्द बहरली. १९८२च्या एशियाडमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले. अशा या दिग्गज नांबियार यांच्या जाण्याने क्रीडा जगतात हळहळ व्यक्त होणे साहजिक आहेच. पण नांबियार यांनी केवळ पी. टी. उषा यांचे जीवन घडवले नाही. तर भारतीय खेळ जगात एक खळखळता प्रवाह निर्माण केला. देशातील तरुणाईला एक नवी दिशा दिली. भारत म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे भारत असे समीकरण असले तरी इतर खेळांकडेही मुलांनी वळले पाहिजे. विशेषत: वेगात, विशिष्ट दिशा पकडून धावणे हे देखील एक क्रीडा कौशल्य आहे, असे नांबियार मानत. त्याचा हिरीरीने प्रचार करत. टोकियोतील सुवर्णयशाचा पाया त्यांनीच रचला. महाविद्यालयीन जीवनात ते उत्तम धावपटू होते. हवाईदलात पंधरा वर्षे नोकरी करताना अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पदके मिळवली. जगातील उत्तम वेगवान धावपटू होण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, प्रशिक्षक झाल्यावर उषा यांच्या रुपात त्यांनी साकार करून घेतले. त्यावेळी त्यांनी स्वत: तिरुवअनंतपुरम येथील एका शिबिरात उषा यांची भारतीय संघात निवड केली. चार वर्षे कठोर परिश्रम घेतले. शिष्यातील अंगभूत कौशल्याला पैलू पाडणे. त्याला अचूक दिशा देणे हीच गुरुची शक्ती असते. नांबियार अशा शक्तीशाली गुरुंपैकी एक होते. यापुढे देशातील प्रत्येक गावात जागतिक दर्जाचे धावपटू तयार होणे. त्यासाठी सरकारी पातळीवर अनेक दिशांनी प्रयत्न करणे, हा नांबियारांची शक्ती, स्मृती जागृत ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे.

Thursday 19 August 2021

सरोज नावाची खाण

काळाचा प्रवाह मोठा गतिमान, सगळं काही सोबत वाहून नेणारा आहे. कालपर्यंत आपल्यासोबतचा माणूस अचानक निघून जातो. काही दिवस त्याची आठवण टोचत राहते. हळूहळू ती टोचणी बोथट होत जाते. एक दिवस टोचणीच गायब होऊन जाते. पण ती व्यक्ती कर्तृत्ववान असेल तर तिची आठवण येत राहते. रितेपणा, कमतरता जाणवते. भारतीय सिनेमासृष्टीवर जवळपास ४० वर्षे राज्य गाजवणाऱ्या नृत्य दिग्दर्शक सरोज खान अशा व्यक्तींपैकीच एक. वर्षभरापूर्वी ३ जुलैला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कोरोनाने या उर्जावान महिलेला आपल्यातून हिरावून नेले. त्या वेळी निर्बंध काटेकोर होते. मृत्यू वाढत असल्याने भारतीय जनमानस भयभीत होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याची, कर्तृत्वाची अपेक्षित नोंद झालीच नाही. एखाद्या राजा, सम्राटाचा सुवर्णकाळ असतो. तसा प्रत्येकाचा काही वर्षांचा काळ असतो. अगदी व्यवसाय, उद्योग, कलेचाही असतो. अगदी अलिकडील उदाहरण द्यायचे झाले तर स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, पंडित नेहरू, मोहंमद अली जिना आदी बॅरिस्टर होते. त्यांना पाहून अनेकजण वकिली व्यवसायात गेले. आता मुले डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी धावत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी सिनेमा-नाटकात काम करणे म्हणजे वेडेपणा, वाया जाणे समजले जात होते. आता काय स्थिती आहे, ते तुम्ही पाहतच आहात. तर मुद्दा असा आहे की, प्रत्येक क्षेत्राचा एक काळ येतो. त्यासाठी एखादी व्यक्ती कारणीभूत असते. प्रचंड मेहनत, असामान्य प्रतिभा, नाविन्याची ओढ आणि इतरांना उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता असलेले नेतृत्व अशा गुणांचा संगम या व्यक्तीत असतो. सरोज खान यांनी हिंदी सिनेमातील अत्यंत महत्वाच्या पण तरीही दुर्लक्षित अशा नृत्याला सुवर्णाची झळाळी मिळवून दिली. गाण्याचे शब्द, संगीताइतकाच पावलांचा ठेका, चेहऱ्यावरील हावभावालाही महत्व असते, हे त्यांनी सांगितले. कधीकधी तर शब्द, संगीताची कमतरता नृत्य भरून काढू शकते याची अनेक उदाहरणे सादर केली. सरोज नावाच्या या खाणीमुळे जगाला एकापेक्षा एक सरस नृत्य रत्ने पाहण्यास मिळाली. मूळ नाव निर्मला नागपाल असलेल्या सरोज खान यांचे व्यक्तिगत जीवन एखाद्या कथानकासारखेच. अवघे तेरा वर्ष वय असताना त्या ४१ वर्षांचे डान्स मास्टर सोहनलाल यांच्या प्रेमात पडल्या. ते आधीच विवाहित आहेत हे त्यांनी सरोज यांना सांगितले नाही. जेव्हा कळाले तोपर्यंत तीन मुले पदरात पडली होती. अल्प शिक्षणामुळे पोटापाण्यासाठी हातपाय हलवणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून समूह नृत्यात पाय थिरकवणे सुरू केले. पण म्हणतात ना, तुमच्यात उच्च दर्जाची प्रतिभा असेल तर तुम्ही ठरवले तरी लपून राहू शकत नाही. सरोज यांचे तसेच झाले. ‘गीता मेरा नाम’ सिनेमात त्यांना पहिल्यांदा नृत्य दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. आणि त्यानंतर त्यांना वळून पाहण्याची गरज पडली नाही. अगदी ठोकळा असलेल्या नट-नट्यांचे चेहरे त्यांनी बोलके केले. त्यांना थिरकणे शिकवले. आणि त्यांचे थिरकणे लोकांना आवडेल इथपर्यंत नेऊन ठेवले. महानायक अमिताभ बच्चन सरोज यांच्याविषयीच्या एका आठवणीत सांगतात की, सत्तरच्या दशकात मुमताज नृत्याची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्री होत्या. एका सिनेमात त्यांच्यामागे गर्दीत सरोज नाचत होत्या. त्यात एक क्षण असा आला की मुमताज यांच्याऐवजी सरोज लक्ष वेधत होत्या. बच्चन यांची ही आठवण या महान नृत्य दिग्दर्शिकेची ताकद सांगणारी आहे. एकेकाळच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनीही सरोज यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त सांगितलं की, त्यांचे जीवन नृत्यासाठी पूर्ण जीवन समर्पित होते. अचूकता हा त्यांचा प्राण होता. सहजसोप्या पदन्यास असताच कामा नये, असे त्यांचे ठाम मत होते. देवदास सिनेमातील ‘मार डाला’ गीतातील एका ठेक्यावर चेहऱ्यावरील भाव सहा प्रकारे दाखवला जावा, असा त्यांचा आग्रह होता. तो हळूहळू त्यांनी निग्रहात रुपांतरित केला. आणि एक अख्खी रात्र केवळ सहा भावमुद्रांचे चित्रीकरण करण्यात आले. अशी जिद्द, चिकाटी आणि नवे काही करण्याचा ध्यास असेल तरच कोणत्याही क्षेत्रात अत्युच्च स्थानावर जाता येते. प्रदीर्घ काळ टिकता येते. हाच सरोज नामक अमूल्य खाणीच्या जीवनाचा संदेश आहे.

लपून – छपून … जपून

गुंड, दरोडेखोर, उतल्या-मातल्यांवर कारवाईसाठी एकेकाळी राजा, महाराजांचे सैनिक असत. इंग्रजांनी राजा-महाराजांची संस्थाने खालसा केल्यावर सैनिकांच्या जागेवर पोलिस नावाची यंत्रणा उभी केली. भारतीय माणसाला दंडुका हाणत, शिवीगाळ करत नियंत्रणामध्ये ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली. पुढे इंग्रज गेले. पण त्यांनी केलेला पोलिसी कायदा आणि पोलिस दोघेही राहिले. आधीपेक्षाही जास्त दिमाखात झळकू लागले. थोडा फरक असा पडला की, हे पोलिस सरसकट दंडुका हाणत, दरडावत नाहीत. फक्त गोरगरिब, लाचार, सामान्य, मध्यममार्गी असला तरच त्याचा मनसोक्त छळ करतात. मारहाण तर करतातच. शिवाय तक्रार करणारा आणि ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, अशा दोघांकडूनही पैसे काढतात. सामान्य माणसाचा तसा रोज फक्त रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभ्या किंवा वाहतूक पोलिस हवालदाराशी संबंध येतो. यातील बहुतांशजण कमालीचे उद्धटपणे, एकेरी बोलतात. छळ करतात. पण उपद्रवी, गुंड मंडळी, राजकारण्यांपुढे ते निमूटपणे शरणागती पत्करतात. त्यामुळे एकूणच पोलिसांविषयी सामान्य भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष आहे. समूह किंवा व्यवस्थेचा भाग म्हणून पोलिस आवश्यक असले तरी संकटकाळी ते खरेच, निस्वार्थीपणे आपल्या मदतीला येतील, याची खात्री कोणीही देऊ शकणार नाही. तरीही … तरीही पोलिसांविषयी आपुलकी, अभिमान असणारा एक वर्ग आहेच. कारण सगळीच पोलिस मंडळी भ्रष्टाचाराच्या तलावात बुडालेली नाहीत. बोटावर मोजण्याइतके अपवाद आहेत. त्यांच्यामुळे एवढ्या बिकट स्थितीतही पोलिसांविषयी किंचित सन्मानाची भावना आहे. अशा सन्माननीय अधिकाऱ्यांत मीरां चढ्ढा – बोरवणकर आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख, पुणे पोलिस आयुक्त आणि सीबीआयच्या विविध विभागांत काम केलेल्या बोरवणकर महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या घटना-घडामोडींच्या साक्षीदार आहेत. शेकडो गुन्ह्यांची उकल त्यांनी केली आहे. पुरुषी मानसिकता ठासून भरलेल्या पोलिस दलात त्यांनी एक शिस्तशीर, कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. क्लिष्ट, तणावपूर्ण प्रसंग धीरोदात्तपणे हाताळण्याचा एक मानदंड त्यांनी तयार केला. त्यांच्याभोवती एक आदर, दराऱ्याचे वलय निर्माण झाले आहे. त्यांच्याप्रमाणे पोलिस सेवेत दाखल होण्याचे अनेक तरुण-तरुणींचे स्वप्न असते. हिंदी, दक्षिणी मसाला सिनेमात दिसणाऱ्या सिंघम, सिंबाच्या थ्रील, मस्तीचे आकर्षण तरुणाईला असते. अशा सर्वांसाठी मीरा बोरवणकर यांनी लिहिलेले ‘इन्सपेक्टर चौगुले’ हे पुस्तक वास्तववादी गाईडलाईन ठरते. कारण यात त्यांनी पोलिसांचे जीवन प्रत्यक्षात कसे असते. काही गुन्ह्यांची उकल कशी होते. त्यात कागदोपत्री पुरावे, मांडणी किती महत्वाची असते. एखादा गुन्ह्याची वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याची कशी दखल घेतात. काय विचार करत परिस्थिती हाताळतात. राजकारण्यांचा त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप कसा होतो, याचा थोडासा अंदाज या पुस्तकातून येतो. थोडासा यासाठी म्हणावे लागते कारण पुस्तकातील पंचवीसपैकी बहुतांश प्रकरणात मीरा बोरवणकर यांनी आरोपी, गुन्हेगारांची नावे सांगणे टाळले आहे. जे काही सांगायचे आहे ते लपून-छपून आणि जपून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कदाचित कायदेशीर कारवाईची कटकट किंवा वादविवाद नको म्हणून त्यांनी असे केले असावे. हे वगळता सर्व प्रकरणे बऱ्यापैकी रोचक माहिती देतात. बोरवणकर यांनी एकाही घटनेला मसाला किंवा रंजकतेचा लेप लावलेला नाही. आपल्या आयुष्यातील अनुभव सहजपणे सांगत आहे. त्यातून वाचकाने त्याला जे हवे ते टिपून घ्यावे, असा त्यांचा सरळसरळ दृष्टीकोन दिसतो. त्यासाठी त्यांनी दक्षता या एकेकाळी गाजलेल्या मासिकाला शोभेल अशी पोलिस निरीक्षक चौगुले नावाची व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. खरेतर पोलिस दलात दीर्घकाळ काम केलेल्या बोरवणकर यांच्यासारख्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पुस्तकातून काहीतरी खळबळजनक, वादग्रस्त सांगावे. कोणाचा तरी थेट बुरखा फाडावा, अशी अनेकांची अपेक्षा असेल. एक पुसटसा अपवाद वगळता ती यात पूर्ण होत नाही. त्या अपवादात्मक प्रकरणात म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्र्यावर त्याच्या भावाने गोळ्या झाडल्या. कारण त्याला आदराची वागणूक मिळत नव्हती. ‘अगदी त्यांची आईसुद्धा लहानपणापासून त्यांच्यामध्ये भेदभाव करायची.’ एवढे वाक्य वगळता अन्य कुठेही स्फोटक किंवा भुवया उंचाव्यात अशा माहितीला थारा नाही. म्हणून सायली पेंडसे यांनी मराठीत छानपणे अनुवादित केलेले विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे हे पुस्तक पोलिसी सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या तसेच पोलिस आपल्यापासून दूरच बरे असे वाटणाऱ्यांसाठीही वाचनीय आहे.