Tuesday 25 October 2016

रसिकांच्या कडेलोटाचा महोत्सव



--

औरंगाबाद म्हणजे पर्यटकांची वर्दळ असलेले शहर. त्यांच्यासाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी उच्च दर्जाच्या सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने होणारच, असा कुणाचा समज होऊ शकतो. पण तो समजापुरताच मर्यादित राहावा, अशी स्थिती पूर्वीही होती आणि आजही आहेच. अर्थात येथे सांस्कृतिक जगतात काहीच घडत नाही, असे नाही. नाटक, नृत्य, शिल्प, चित्र अशा प्रांतात काहीना काही घडत असतेच. पण ते कलावंतांच्या पुढाकाराने होते. येथून मराठी, हिंदी चित्रपट-नाट्य सृष्टीला अनेक लेखक, दिग्दर्शक, कलावंत मिळाले. येथील नर्तकांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन वाहवा मिळवली. सुनिल देवरेंची शिल्पकला अमेरिकेसह युरोपातील अनेक शहरांत गाजली. सध्या टीव्ही मालिकांमध्ये औरंगाबादचे कलावंत लोकप्रियता मिळवत आहेत. निरंजन भाकरे, मीरा उमप यांची लोकलला लोकांनी डोक्यावर घेतली. बशर नवाज यांची शायरी देशाच्या हद्दी ओलांडून गेली. हे सगळे कलावंतांनी त्यांच्या बळावर मिळवलेले यश आहे. असे म्हणतात की, कलेला राजाश्रय असला की ती अधिक खुलते. सर्वस्तरातील लोकांमध्ये पोहोचते. आणि त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम सुसंस्कृत समाज घडवण्यात होत असतो. राजाश्रय देण्याचा एक मार्ग म्हणजे किमान मोठ्या शहरांमध्ये दर्जेदार महोत्सवांचे आयोजन करणे. त्यात जागतिक पातळीवरील कलावंतांना आमंत्रित करून त्यांच्यातील ताकदीचा अनुभव रसिकांना करून देणे. आणि अशा महोत्सवांमध्ये स्थानिक प्रतिभावान कलावंतांनाही संधी देणे. महाराष्ट्रातील इतर प्रांतात सरकार कलावंतांना मदत करताना दिसते. त्यांच्यासाठी महोत्सवांचे आयोजन केले जाते. मात्र, पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत असे सातत्यपूर्ण महोत्सव होत नाहीत. त्यामुळे १९८० च्या दशकात सुरू झालेला वेरुळ महोत्सव म्हणजे कलावंत, रसिकांसाठी एक पर्वणीच होती. कडाक्याच्या थंडीत मकबरा, वेरुळ येथे अत्युच्च दर्जाच्या कलावंतांचे सादरीकरण ऐकण्या-पाहण्यासाठी औरंगाबादकरच नव्हे तर मराठवाड्यातील रसिकही गर्दी करत होते. मात्र, कधी दुष्काळाचे सावट कधी सामाजिक ताणतणावांमुळे गेल्या काही वर्षात महोत्सवाच्या आयोजनात सातत्य राहिले नव्हते. गेली तीन वर्षे दुष्काळ असल्याने सरकारी यंत्रणेने महोत्सवातून अंग काढून घेतले होते. यंदा चांगला पाऊस होताच रसिकांनी वेरुळ महोत्सव झालाच पाहिजे, असा आग्रह धरला. तो विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मान्य केल्यावर तर जणू उत्साहाला उधाण आले होते. नव्या सरकारने हे फार चांगले केले, असे रसिक म्हणू लागले होते. प्रत्यक्षात महोत्सवाच्या आयोजनाचा तपशील जसजसा समोर येऊ लागला तसतसा रसिकांचा अपेक्षाभंग होऊ लागला. आणि महोत्सवातील सादरीकरणाने तर त्याचा कडलोटच झाला. महोत्सव म्हणजे सर्वांसाठी खुला असेल असे वाटत होते. मात्र, सरकारी यंत्रणेने संपूर्ण महोत्सवातील रसिकांचे कंत्राट कलासागर संस्थेला देऊन टाकले होते. पैसे मोजून आपल्यापुरते कला प्रदर्शन अशी मानसिकता असलेल्या कलासागरला सरकारी महोत्सवात अतिशय छुप्या पद्धतीने प्रवेश देण्यात आला. तिकीटाचे दरही हजार, दीड हजार रुपये ठेवण्यात आले. त्यामुळे सामान्य रसिकांसाठीचे दरवाजे आपोआप बंद झाले. महोत्सव सरकारीऐवजी खासगी संस्थेचा झाला. स्थानिक कलावंतांना सादरीकरणासाठी महोत्सवाच्या पूर्वरंगमध्ये संधी देण्यात आली. खरेतर त्यांना संत तुकाराम, तापडिया अशा शहराच्या मध्यभागी किंवा रसिकांना सोयीस्कर अशा ठिकाणी सादरीकरण करता आले असते तर ते त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले असते. पण ज्या कलाग्राममध्ये कधीही कुणी फिरकत नाही, अशा ठिकाणी या कलावंतांना जागा देण्यात आली. त्यामुळे त्यांची कला रसिकांपर्यंत प्रसारमाध्यमांद्वारेच पोहोचली. प्रत्यक्ष जेव्हा कलावंत गात होते. नृत्य करत होते. तेथे त्यांच्यासमोर दाद देण्यासाठी बोटावर मोजण्याइतकेही प्रेक्षक नव्हते. सरकारने स्थानिक कलावंतांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिले पाहिजे, असे म्हणणारेही या कलावंतांच्या कौतुकाकडे पाठ फिरवून बसले होते. मूळ महोत्सवात प्रख्यात अभिनेत्री ग्रेसी सिंग यांचे वेरुळ लेणीच्या पायथ्याशी झालेले नृत्य उत्कृष्टतेचा नमुना होते. (एमजीएम महागामीच्या पार्वती दत्ता प्रत्येक सरकारी, निमसरकारी महोत्सवात असतातच.) त्यामुळे महोत्सवाचा प्रारंभ चांगला झाला असे वाटले. मात्र, दुसऱ्या दिवशी सोनेरी महालात झालेल्या अजय-अतुल यांच्या मैफलीने जबर धक्का दिला. मराठी चित्रपट संगीताला देशभरात पुन्हा एकदा सुवर्ण वैभव मिळवून देणाऱ्या या जोडगोळीकडून फार अपेक्षा होत्या. त्यांचे लाईव्ह गाणे ऐकण्यासाठी आलेल्या (कलासागर वगळता) रसिकांना त्यांनी साऊंड ट्रॅकवरील गाणे ऐकवले. रसिक, आयोजकांची कलावंतांशी एक अप्रत्यक्ष बांधिलकी असतेच. पण इथे अजय-अतुल यांच्या लेखी आयोजक अन् रसिक यांचे मूल्य शून्य असल्याचे लक्षात आले. तिसऱ्या दिवशी अदनान सामी यांची मैफल असाच अनुभव देऊन गेली. समोर कोणत्या प्रकारचा रसिक आहे, याचा अंदाज न घेताच सामींनी गायन केले. त्यामुळे महोत्सवाचा समारोप अपेक्षेनुसार झाला नाही. औरंगाबादकरांच्या मागणीनुसार वेरुळ महोत्सव घेण्याचा डॉ. दांगट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न म्हणून चांगला असला तरी त्यात त्यांनी ज्या काही अनिष्ट गोष्टी पेरून ठेवल्या. त्या निश्चितच सांस्कृतिक जगताला धक्का देणाऱ्या आहेत. पुढील वेळी त्या उपटून टाकाव्या लागतील. तरच तो खऱ्या अर्थाने रसिकांपर्यंत पोहोचेल.

Wednesday 12 October 2016

निष्कलंक : डॉक्टरांचा संदेश





अलिकडे सगळ्याच क्षेत्रात नितीमूल्यांची, नैतिकता आणि चांगुलपणाची जोरदार घसरण सुरू झाली आहे. राजकारण तर व्यवसाय होऊ घातला आहे, असे म्हणणे पलिकडे गेले आहे. शिक्षण क्षेत्रात संस्थाचालक शिक्षकांची गळचेपी करत आहेत. अनेक शिक्षक त्यांचे मूळ काम विसरत आहेत. कलावंत मंडळी मनोरंजनातून मिळवलेली लोकप्रियता राजकारण, प्रॉपर्टी डिलिंगसाठी वापरत आहेत. पोलिस, सरकारी नोकर वरकमाईसाठीच काम करत आहेत. व्यापारी मंडळी टोकाच्या फायद्याचा विचार करत आहेत. पत्रकार, उद्योजक सत्ताधाऱ्यांना ताब्यात ठेवण्यासाठी शक्ती वापरत आहेत. आणि एकेकाळी देवाच्या जागी मानले जाणारी अनेक डॉक्टर मंडळी रुग्णाला वेठीस धरून धनिक होण्यासाठी धडपडत आहेत. (प्रा. अजित दळवी यांच्या डॉक्टर तुम्ही सुद्धा या प्रचंड गाजलेल्या नाटकात वैद्यकीय जगाची काळी बाजू खूप टोकदारपणे आली आहे.) ही सगळी वस्तुस्थिती असली तरी प्रत्येक क्षेत्रात बरीच सुजाण, संवेदनशील लोकही आहेत. त्यांचे सामाजिक भान अत्युच्च आहेच. पण केवळ भान राखण्यापुरतेच ते स्वतःला थांबवत नाहीत. तर पिडीत, शोषितांच्या मदतीलाही धावून जात आहेत. त्यात डॉक्टरांचाही समावेश आहे. औरंगाबादेत असे काही डॉक्टर सातत्याने सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार घेताना दिसतात. त्यांची आयएमए ही संघटना नवनवे कार्यक्रम हाती घेत असते. रविवारी आयएमएच्या रंगकर्मी ग्रुपतर्फे सादर झालेली `निष्कलंक` एकांकिका सामाजिक दायित्व निभावण्याचाच एक भाग होता, असे म्हणावे लागेल. कारण हे सादरीकरण केवळ डॉक्टरांना रंगमंचावर येण्याची हौस होती म्हणून झाले नाही तर त्यातून एक चांगला संदेश समाजाला देण्यात आला. काही वर्षांपूर्वी घडून गेलेली आणि पडद्याआड लपलेली एक सत्य घटना पडद्यासमोर आणण्यात आली. निष्कलंकमध्ये मांडण्यात आलेला प्रश्न अजूनही कायम असल्याने विषयाचे समकालीन मूल्य आणखी तीव्रतेने जाणवते. आणखी थोडीशी तयारी करून या एकांकिकेचे किमान मराठवाड्यातील आठ-दहा प्रमुख शहरांमध्ये प्रयोग झाले तर महिलांविषयी अजूनही कलुषित, पारंपारिक विचार करणारी काही मने बदलू शकतील.

अशी मने बदलण्याची सुरुवात डॉ. भवान महाजन यांनी निष्कलंकच्या निमित्ताने सुरू केली, असे म्हणता येईल. इंग्लंडमध्ये डॉक्टरी व्यवसायात स्थिरावलेले असतानाही डॉ. महाजन मराठी ग्रामीण रुग्णांची सेवा करण्यासाठी परतले. येथे त्यांना अनेक प्रकारची माणसे भेटली. त्यांचे दुःख, वेदना त्यांनी जाणून घेतल्या. अनेकांना सढळपणे मदतही केली. हे सारे करत असताना आलेले अनुभव त्यांनी मैत्र जिवाचे या पुस्तकात नोंदवले. खरे म्हणजे ग्रामीण आरोग्य आणि डॉक्टरी पेशाचा तो एक दस्तावेजच आहे. त्यातील एका सत्य घटनेवर आधारित कहाणीचे नाट्य रुपांतर डॉ. अनंत कडेठाणकर यांनी केले. आणि डॉक्टरी व्यवसायात कमालीच्या व्यस्त असलेल्या डॉ. अमोल देशमुख, डॉ. स्वप्ना बोंडेकर, डॉ. प्रगती फुलगीरकर, डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. वर्षा वैद्य यांना सोबत घेऊन त्याचा प्रयोगही सादर केला. नाट्यशास्त्राचे विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन रंगकर्मींच्या सादरीकरणात लावले जाणारे निकष निष्कलंकला लावता येणार नाहीत. कारण यातील एकही जण मूळचा रंगकर्मी नाही. हौशी रंगभूमीवर काम केल्याचाही मोठा अनुभव त्यांच्याकडे नाही. तरीही त्यांनी एका महत्वाच्या प्रश्नाकडे सुजाण समाजाचे लक्ष वेधणाऱ्या एकांकिकेचे सादरीकरण केले. हे अत्यंत महत्वाचे आहे. प्रयोगाच्या उद्‌घाटनास आलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. अनुया दळवी यांनीही हाच मुद्दा मांडला आणि तो अतिशय योग्य आहे. डॉ. महाजन यांची कथा अतिशय भेदक आणि अस्वस्थ करणारी. तिचे नाट्य रुपांतर डॉ. कडेठाणकर यांनी संवेदनशीलतेने केले. वांझपणाचे दुःख भोगत जगणारी आणि ऑपरेशननंतर आपण वांझ नाही, असे कळाल्यावर आनंदाने फुललेली तान्हाबाई प्रगती फुलगीरकरांनी खूपच सहजपणे साकारली. डॉ. अमेय देशमुख यांनी तान्हाबाईच्या पोटात गर्भ होता हे कळाल्यावर उडालेली खळबळ छान व्यक्त केली. शिवाय स्वगतात त्यांचा प्रामाणिकपणाही अपेक्षेनुसार जाणवला. पुढील प्रयोगात डॉ. स्वप्ना बोंडेकरांच्या संवाद शैलीवर दिग्दर्शकाने थोडे लक्ष दिले तर डॉक्टर पती-पत्नीतील संभाषणे अधिक गंभीर होऊ शकतील. विषयाला अधिक सखोल करू शकतील. डॉ. कडेठाणकर यांचा बंडेराव, अनंत कुलकर्णींचा बारकू, वर्षा वैद्य यांची सासूबाईही भूमिकेला साजेशी. रवी कुलकर्णी यांचे नेपथ्य अत्यंत लक्षवेधी. आयएमएच्या अत्यंत छोट्या आकाराच्या रंगमंचावर कुलकर्णी यांनी डॉक्टरचे घर, दवाखाना, तान्हाबाईचे घर उभे केले होते. आणि हे करताना प्रत्येक कलावंताला रंगमंचावर वावरण्यासाठी पुरेशी जागा राहिल, याचीही काळजी घेतली होती. अमेय बोंडेकर यांची ध्वनी, प्रकाशव्यवस्था व्यावसायिक कसोटीवर उतरणारी होती. असे म्हणतात की, आपण ज्या व्यवसायात, क्षेत्रात, समाजात काम करतो. त्यातील अपप्रवृत्तींवर आपणच प्रहार केले पाहिजेत. सुधारणेसाठी पावले टाकली पाहिजेत. डॉ. भवान महाजन, डॉ. अनंत कडेठाणकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तसा प्रयत्न नक्कीच केला आहे. इतर क्षेत्रात नाव कमावलेल्यांमध्ये असा प्रयत्न करण्याचे धाडस आहे काय

Wednesday 5 October 2016

एवढे सोबत राहिलात तरी पुरेसे


एवढे सोबत राहिलात तरी पुरेसे
--
आमदार इम्तियाज जलील यांनी आठवडाभरापूर्वी कटकटगेटला रस्ता, पुलाच्या कामासाठी पालकमंत्री रामदास कदम यांना निमंत्रण देण्याचा विषय काढला. तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांसह तेथील नागरिकांनी हलकल्लोळ केला. कदमांसोबत खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे  यांनाही बोलावले पाहिजे, असे इम्तियाज म्हणताच विरोध टिपेला पोहोचला.  आमच्या इलाक्यात त्यांचे काय काम? त्यांना कशासाठी बोलावता. ज्यांच्याशी आपले टोकाचे वैर आहे. ज्यांच्याविरोधात आपण निवडणूक लढवली. त्यांच्यावर टीकेचे वार केले. सध्याही करत आहोत आणि यापुढेही तेच करणार आहोत. त्यांना बोलावून काय साध्य होणार. त्याने फायदा तर काहीच होणार नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीला आपल्या विरोधात एक चांगला मुद्दा मिळेल. कट्टरपंथी मुस्लिम दुखावतील. आपल्यापासून दूर जातील. तुम्ही तर आपल्या व्होट बँकेलाच धक्का देताय, असे त्यांचे म्हणणे होते. कटकटगेट हा अत्यंत संवेदनशील भाग. येथे मुस्लिमांचे प्रचंड प्राबल्य आहे. इथे कधीच शिवसेनेचा प्रवेश झाला नव्हता. तो तुम्ही का करून देता, असाही सवाल होता. मात्र, इम्तियाज स्वत:च्या मुद्यावर ठाम राहिले. जे काही राजकारण करायचे ते निवडणुकीत केलेच पाहिजे. पण विकास कामात जात, धर्म, पंथ, पक्ष येताच कामा नये. कटकटगेटच्या रस्ता, पुलाचा विकास गेल्या २० वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे दररोज हजारो नागरिकांची दैना होत आहे. त्यात प्रामुख्याने मुस्लिमांचाच समावेश आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री कदमांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी दिला असेल. तर त्यांच्याच हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. शिवाय कायम मुस्लिमविरोधी भूमिका घेऊनच पाय रोवलेल्या खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाहुणे म्हणून बोलावून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. एमआयएम म्हणजे हिंदुंच्या मुळावर उठलेला पक्ष. एमआयएमला दंगली घडवण्यात स्वारस्य आहे. कट्टरपंथी मुस्लिमांना विकास कामांशी काही देणे घेणे नाही, हा इतर समाजांमध्ये रुजलेला समज दूर करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे, असे त्यांनी पटवून दिले. आणि एकेकाळी दंगलप्रवण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कटकटगेट भागात कपाळावर भगवे टिळे, गळ्यात भगवे रुमाल घातलेल्या सेना नेते, पदाधिकाऱ्यांचे भलेमोठे बॅनर झळकले. कदमांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली. औरंगाबादच्या इतिहासातील ऐतिहासिक प्रसंग म्हणून त्याची नोंद झाली आहे. कदम यांच्या नेतृत्वगुणाचेही करावे तेवढे कौतुक कमीच आहे. शिवसेना मुस्लिमविरोधक नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण करत असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. यातून अनेक प्रकारचे संदेश दिले गेले. विशेषत: राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. वर्षानुवर्षे काँग्रेसची व्होट बँक म्हणून राहिलेल्या मुस्लिम समाजाने त्यावर साधकबाधक चर्चा केली. विशेषत: तरुणांमध्ये इम्तियाज जलील यांच्या भूमिकेचे नाईलाज म्हणून स्वागत करण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे. येथे हिंदु-मुस्लिमांमधून आडवा विस्तूही जात नाही. एमआयएमच्या आगमनामुळे तणाव आणखीनच वाढणार आहे, हा समज काहीअंशी का होईना दूर होईल, असे वातावरण कटकटगेटच्या कार्यक्रमात दिसून आले. माजी महापौर रशीद मामू नेहमी असे म्हणतात की, जेव्हा जेव्हा हिंदु-मुस्लिम एक येण्याच्या प्रयत्नात असतात. काही नेते मंडळी त्यांना एकत्र आणण्यासाठी धडपडत असतात. तेव्हा एखादी क्षुल्लक घटना अशी काही घडते की तिचा भडका उडून पुन्हा दोन्ही समाज एकमेकांपासून दूर जातात. आणि त्यांच्या दुराव्यातून तयार होणाऱ्या आगीवर अनेक मंडळी स्वत:ची पोळी भाजून घेत असतात. आताही कटकटगेटच्या सोहळ्यानंतर ही मंडळी कार्यरत झालीच असणार. त्यांना वेळीच पायबंद घालण्याची जबाबदारी आमदार इम्तियाज यांनाच घ्यावी लागणार आहे. कारण त्यांनी औरंगाबादेतील मुस्लिम समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पावले टाकणे सुरू केले आहे. एमआयएमचा मूळ पाया कट्टरपंथी मुस्लिमांचा असला तरी बदलत्या काळानुसार विकास कामे ही बहुसंख्य मुस्लिमांची मानसिकता आहे. धर्माचे टोकाचे पालन करत असताना आपल्या भागात चांगले रस्ते, दर्जेदार दवाखाने, उत्तम शिक्षण देणाऱ्या शाळा असाव्यात. कचरा नियमितपणे उचलला जावा, असे त्यांनाही वाटत असते. त्याकडेही एमआयएमला अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आणि आपल्या भागाचा विकास करून घेण्यासाठी कट्टर राजकीय विरोधक असलेल्यांचीही मदत घेण्यात, त्यांचा पाहुणचार करण्यात काहीच गैर नाही. महापालिकेचा ताबा, राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेकडून कामे करून घेऊयात. आणि निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर तुटून पडूयात, असा विचार ते रुजवत आहेत. त्यामुळे एकीकडे शिवसेना आणि दुसरीकडे एमआयएम असा दुहेरी समतोल त्यांना साधावा लागणार आहे. आणि हे करताना मुस्लिमांच्या मतावर डोळा ठेवून बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीलाही घुसखोरीपासून रोखायचे आहे. राजकारण, समाजकारणात अलिकडील काळात प्रत्येक गोष्ट जात, धर्माच्या आधारावरच केली जात अाहे. दोन समाज एकमेकांजवळ येताच कामा नये, यासाठी भिंती उभारल्या जात असताना या भिंतींचा पाया खणण्याचे काम इम्तियाज यांनी सुरू केले आहे. त्याला मुस्लिम समाजातून कितपत प्रतिसाद मिळतो, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.