Wednesday 28 September 2016

नसीरुद्दीन नावाच्या उत्तुंग नटाचा प्रामाणिक प्रवास


--

लौकिक जगात यशस्वी झालेल्यांचा जीवन प्रवास पुस्तक रुपात वाचण्यास मिळावा, अशी अनेकांची इच्छा असते. कारण त्यांच्या प्रवासाचा मार्ग प्रेरणादायी असतो. त्यात जर ही यशस्वी झालेली व्यक्ती चित्रपट अभिनेता, अभिनेत्री असेल तर मग विचारायलाच नको. त्यांचे व्यक्तिगत जीवन जाणून घेणे लोकांसाठी मनोरंजकही असते. म्हणूनच बुलंद अभिनयाचे देणे लाभलेले नसीरुद्दीन शाह यांचे `मग एक दिवस` हे पुस्तक त्यांच्या अभिनयशैलीइतकेच आगळेवेगळे आहे, असे म्हणावे लागेल.

सुभाष घईंचा कर्मा चित्रपट दोन दशकांपूर्वी प्रचंड गाजला. त्यातील देशभक्तीपर गीते अजूनही १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला हमखास वाजवली जातात. त्यातील दिलीपकुमार आणि डॉ. डँग म्हणजे अनुपम खेरची जुगलबंदी आजही अनेकांच्या स्मरणात आहेच. कर्मा आणखी एका कारणाने गाजला ते म्हणजे त्याकाळी समांतर चित्रपटांचा पडदा व्यापून टाकत विलक्षण अभिनयाची अनुभूती देणारा नसीरुद्दीन शाह व्यावसायिक पडद्यावर आला होता. रंगमंचावर काम करणाऱ्या अभिनेते, अभिनेत्रींना चित्रपटात वास्तववादी घटनांशी जवळिक साधणाऱ्या भूमिका करणे सोपे जाते. पण मसाला किंवा तद्दन व्यावसायिक चित्रपटांमध्ये वास्तवात जे घडूच शकत नाही, असे वास्तवात आणले जाते. त्यातील व्यक्तिरेखाही तशाच असतात. त्यामुळे नसीरुद्दीन फसणार. लोकांच्या पसंतीला उतरणार नाही, असे म्हटले जात होते. शिवाय त्याच्यासोबत व्यावसायिक चित्रपटांत नाव कमावलेली दिलीपकुमार, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूरसारखी प्रचंड लोकप्रिय मंडळी होती. मात्र, प्रत्यक्षात नसीरुद्दीनचा खैरू लोकांनी डोक्यावर घेतला. त्याच्या वाट्याला आलेले सर्व प्रसंग त्याने जिवंत केले. चित्रपटाच्या अखेरीस प्राण सोडताना लोकांच्या डोळ्यात पाणी आणण्याची ताकद फक्त अमिताभ बच्चनमध्येच, असे मानले जात होते. (आणि ते खरेही आहे.) त्यात नसीरने स्वतःचे नावही नोंदवले आहे. अतिरेक्यांच्या गोळ्यांनी जखमी झालेले दिलीपकुमार आता वाचतील की नाही, याबाबत सांगू शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर नसीरने जो काही हलकल्लोळ केला आहे, तो अंगावर रोमांच उभे करतो. त्याची अभिनयातील ताकद आणि व्यावसायिक पडद्यावरही छाप उमटवण्याची क्षमता दाखवून देतो. हिंदी चित्रपटसृष्टीत जे विलक्षण प्रतिभावान आणि उत्तुंग अभिनेते होऊन गेले आणि सध्या आहेत. त्यांच्या यादीत नसीरचा क्रमांक खूपच वरचा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. हिंदी चित्रपटात नटाला आवश्यक असणारा चेहरा, रुप नसतानाही त्याने केवळ अभिनय, पल्लेदार आवाजाच्या जोरावर हे स्थान प्राप्त केले आहे. अर्थात त्याची ही वाटचाल सुखाची नाहीच. एका उच्च मध्यमवर्गीय घरात जन्म घेऊनही त्याचा अभिनेता होण्याचा मार्ग खडतर राहिला. अनेक वळणे घेत, आयुष्यातील खड्डयांतून जात तो चालत राहिला. कोणत्याही क्षणी त्याने अभिनेता होण्याचे स्वप्न धूसर होऊ दिले नाही. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याने चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठीच खर्च केला. रंगभूमीवरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. त्यामुळे या उत्तुंग अभिनेत्याचा जीवन प्रवास म्हणजे प्रत्येक रंगकर्मीसाठी अभ्यासाचाच विषय आहे. खुद्द नसीरनेच त्याचा सारा प्रवास अतिशय प्रामाणिकपणे `मग एक दिवस` या पुस्तकात मांडला आहे. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांनी त्याचा मराठीत केलेला अनुवाद पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. आत्मकथन म्हणजे आपण आयुष्यभर केलेल्या कामगिरीचे पुनरावलोकन. आयुष्यभर घेतलेल्या निर्णयांचा किंचित मागे वळून पाहत घेतलेला धांडोळा. तो घेत असताना बहुतांश मंडळी त्यात इतरांवर आगपाखड करतात किंवा स्वतः केलेल्या घोडचुका सांगणे टाळतात. ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा आवर्जून उल्लेख करतात आणि ज्यांना आपल्यामुळे पश्चाताप झाला अशांबद्दल सांगणे टाळतात. नसीरने मात्, सारेकाही प्रामाणिकपणे सांगितले आहे. गांजाचे व्यसन, आई-वडिलांसोबतची बेदरकार, बेजबाबदार वागणूक, फॉकलंड रोडवर वेश्यांची संगत, मित्रांसोबतची भांडणे असे त्याने कोणताही आडपडदा न ठेवता सांगितले आहे.  आणि चुकांची कबूलीही दिली आहे. त्यामुळे अभिनेता होत असताना एक बाप, पती, मुलगा म्हणून तो कसा अयशस्वी होत गेला. आणि चुकांचे परिमार्जन करण्यासाठी त्याने खरेच काय केले, हेही वाचकांसमोर येते. सई परांजपे यांनी नसीरचे अंतरंग मराठीत आणताना त्यातील सत्व कायम राहिलच शिवाय त्यातील मराठीपण रुचेल, पचेल अशी काळजी घेतली आहे. त्यामुळे सर्वच प्रकरणे अतिशय वाचनीय, सखोल झाली आहेत. नसीरचे नट, अभिनेता म्हणून घडत जाणे कसे थरारक आणि एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसे होते, याचे दर्शन सुरेखपणे घडत जाते. विशेषतः नसीरने चित्रपटात काम करण्यासाठी पहिल्यांदा मुंबापुरी काढल्यावर जे दिवस काढले त्याचे वर्णन नव्या पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे.

असे म्हणतात की नट तयार होत नाही. तो जन्मालाच यावा लागतो. नसीरच्या बाबतीत हे म्हणणे तंतोतंत खरे ठरते. त्याचे आत्मवृत्त वाचल्यावर तर ते अधिक ठळकपणे लक्षात येते. अगदी लहान वयातच त्याला आपण उत्तम नट होऊ शकतो, असे वाटू लागले आणि मग हे वाटणे प्रत्यक्षात आणण्यसाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. मुंबईत अक्षरशः रस्त्यावर मुक्काम ठोकत मायानगरीतील ठोकरा खाल्ल्या. आता भारतीयच नव्हे तर परदेशातील रंगभूमी, चित्रपट क्षेत्रात उंचीवर पोहोचल्यावरही त्याचा नट म्हणून स्वतःचा शोध जारी आहे. अनेक रंगकर्मी किरकोळ यश मिळताच थांबून जातात. किंवा त्याच भूमिकांच्या चौकटीत अडकून जातात. स्वतः करत असलेलेच काम सर्वश्रेष्ठ असे मानणारी मंडळी तर राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, कला प्रांतात ढीगभर आहेत. पण असे मानणे म्हणजे थांबणे होय आणि जो थांबला तो संपला, असा जगाचा नियम आहे. हेच नसीरने त्याच्या कथनात मनापासून मांडले आहे. ते तेवढ्याच मनापासून वाचले तर खरा आनंद मिळेल.

Tuesday 20 September 2016

कदमांनी आता पालकमंत्री होण्यासोबत चालकमंत्रीही व्हावे



कुणी काहीही म्हटले. इतिहासाचे अगणित दाखले दिले. एकेकाळी इथे सोन्याचा धूर निघत होता, असे सांगितले. आणि काही वर्षांपूर्वी या शहरात देशातील सर्वोत्तम पाणी वितरण व्यवस्था होती, असे दाखवून दिले. तरीही औरंगाबाद म्हणजे मराठवाड्याची राजधानी असे केवळ कागदावरच आहे, अशी वस्तुस्थिती आहे. त्याची अनेक अनेक उदाहरणे दिली जाऊ शकतात. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे औरंगाबाद एका बकाल वसाहतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. चार वर्षांपूर्वी रुंदीकरण होऊनही रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. रुंद झालेला रस्ता पुन्हा फेरीवाले, पार्किंगने अडवला आहे. रस्त्यातील खड्डे हा तर औरंगाबादकरांच्या पाचवीला पुजलेला विषय आहे. २००५ मध्ये जाहीर झालेली समांतर जलवाहिनीची योजना अजूनही कार्यरत झालेली नाही. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. लाखो लोकांना ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. एवढे सगळे नसूनही घरांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा नसल्याने लोकांना खासगी रुग्णालयात जाऊन स्वत:चा खिसा कापून घेण्याशिवाय अन्य पर्याय नाही. ऐतिहासिक वारसा सांगणारी अनेक स्थळे अतिक्रमणांनी वेढली आहेत. आणि दुसरीकडे या शहराचा कारभार पाहणारी महापालिका भ्रष्टाचार, गैरकारभार आणि पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या सुंदोपसुंदीत सापडली आहे. जात, धर्म आणि समाजाच्या सामाजिक समीकरणाचा फायदा घेत अनेकजण वारंवार निवडून येत आहेत. त्यांना विकासाचे अजिबात देणेघेणे नाही, असे म्हणता येणार नाही. पण त्यांची कार्यपद्धती आधी स्वत:चा मग वॉर्डाचा विकास अशीच आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात कमी अधिक फरकाने हेच सुरू असले तरी तेथे िवकासाचे, जनतेच्या हिताचे काम म्हटल्यावर सर्वजण पक्षीय मतभेद बाजूला ठेवतात. कोणत्याही पक्षाचा एक नेता जे सांगेल त्यानुसार कामांची दिशा ठरवली जाते. दुर्दैवाने औरंगाबादेत तसे घडताना दिसत नाही. किमान गेल्या २५ वर्षात त्याचा अनुभव आलेला नाही. तो आता स्मार्ट सिटी होण्याकडे निघालेल्या औरंगाबादला यावा, अशी लोकांची अपेक्षा आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी अतिशय गांभीर्य आणि आस्थेवाईकपणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला दिशा द्यावी, असा सूर व्यक्त होताना दिसतो. शिवसेनेच्या स्टाईलने काम करताना कदम यांनी अनेक घोषणा करून टाकल्या आहेत. त्या पुढील तीन वर्षांत पूर्णपणे मार्गी लागतील, यासाठी त्यांना शक्ती पणाला लावावी लागणार आहे. गेल्या आठवड्यात कदमांनी आढावा बैठक घेतली. त्यात ते मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याचे दिसून आले. हर्सूल गाळ प्रकरणात शहर अभियंता सखाराम पानझडे यांचे निलंबन योग्यच असल्याचे कदम सर्वांसमक्ष म्हणाले. त्यातून त्यांनी बकोरियांच्या विरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांना स्पष्ट संदेश दिलाच. शिवाय खासदार चंद्रकांत खैरे यांनाही मीच जिल्ह्याचा नेता असल्याचे सांगून टाकले. शहरातील लोक खड्ड्यांमुळे भयंकर त्रासले आहेत. त्यातून त्यांची ठेकेदारांनी सुटका करावी. हे शहर तुमचेही आहे. त्यामुळे आठ दिवसांत खड्डे बुजवा, असे आदेश दिले. गेल्या चार-पाच वर्षात कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्ते खड्ड्यात का गेले याची पवईतील आयआयटीमार्फत चौकशी करा, असेही सांगितले. कटकटगेटलगत वळण रस्ता, पथदिवे खांबांच्या स्थलांतरासाठी निधीची घोषणा केली. शिवाय गेल्या आठवड्यात अचानक उभाळलेला शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे विरुद्ध आमदार संजय शिरसाट यांच्यातील वादही काही प्रमाणात निस्तरला. राजकारण आणि समाजकारणात केवळ घोषणा देऊन काहीही होत नाही. आणि विकास कामांची अशी स्थिती आहे की, ती दर्जेदारपणे पूर्ण झाली तरच लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. यासाठी कठोर पाठपुराव्याची गरज आहे. सर्वोच्च अधिकारपदावर असलेल्यांनी तो केला तरच अधिकारी मंडळी त्याला दाद देतात. आणि नगरसेवक, आमदार मंडळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कामांकडे वळतात. सद्यस्थितीत अशा पाठपुराव्याची क्षमता पालकमंत्र्यांमध्ये आहे. औरंगाबाद शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांना केवळ पालक होऊन चालणार नाही तर चालकही व्हावे लागणार आहे. त्यांनी ते केले तर औरंगाबादकर त्यांना निश्चितच दुवा देतील. आणि राजकारणात लोकांचा भक्कम पाठिंबाच महत्वाचा असतो. हे कदम यांनाही पक्के ठाऊक असणारच. नाही का?



Wednesday 7 September 2016

उद्योगी पिढी घडण्यासाठी





प्रत्येक गोष्ट जात-पात आणि धर्माच्याच पारड्यात टाकून ती स्वतःला फायदेशीर अशीच तोलून घेण्याचा उद्योग महाराष्ट्रातील माणूस मोठ्या इमानेइतबारे, अगदी मनापासून करत आहे. मात्र, स्वतःसोबत इतरांनाही जगवणाऱया उद्योगाकडे तो ढुंकूनही बघत नाही. जी मोजकी मंडळी उद्योग, व्यवसाय उभा करत असतील. त्यांना नावे ठेवणे, त्यांच्यावर जाती-धर्माची लेबले चिटकवून टाकणे. त्यांना पूर्ण ताकदीने खाली खेचणे. चारही बाजूंनी घेरून त्याचा उद्योग संपुष्टात आणणे ही जणू काही आपली सर्वात महत्वाची जबाबदारी आहे, असे मानणारे अनेकजण आहेत. त्यामुळेच की काय मराठी मुलुखात इतर प्रांतांच्या तुलनेत उद्योगाची परंपरा फारशी विकसित झाली नाही. स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे तर उद्योजक होणे म्हणजे पापच असे महाराष्ट्रात मानले गेले. शालेय स्तरावर उद्योजकांच्या यशोगाथा फुटकळ रुपात सांगितल्या गेल्या. महाविद्यालयात तर उद्योजकतेचा दुरान्वयाने संबंध नाही. इंजिनिअर कशासाठी व्हायचे तर कुठल्यातरी कंपनीत नोकरीसाठी, असा प्रवाह १९८०-९० च्या दशकात होता. आई-वडिलही मुलांना स्वतःचा उद्योग सुरू करून काय आम्हाला भिकारी करायचे का, असा सवाल करत त्याला नोकरीला जुंपून टाकत. अशावेळी साहित्यकार, लेखकांनीही उद्योजकतेची दुसरी बाजू मांडली नाही. उद्योग सुरू करूनही समाधान, आनंद मिळू शकते. चार जणांची पोटे चालवणे ही देखील मानवतेची सेवाच आहे, असा संदेश दिला नाही. उलट कारखानदार म्हणजे गरिबांचे रक्त शोषण करणारा. त्यांच्या जागा बळकावणारा. अत्याचार करणाराच असे चित्र कादंबऱ्या, कथा आणि नाटक-चित्रपटांमधून, प्रसारमाध्यमांतून रंगवले गेले. त्यात मुळीच तथ्य नव्हते असे म्हणता येणार नाही. पण तमाम उद्योग जगाचा चेहरा काळा करण्यात आला, ते पूर्ण सत्य नव्हते. उद्योजक म्हणजे खलनायक असेच बहुतांश ठिकाणी चित्रीकरण झाले. तेव्हा ते सारे वास्तववादी मानले गेले. पण त्याने झालेले नुकसान अलिकडील काळात समोर येत आहे. इतर प्रांतातील मंडळींनी उद्योगधंद्यात पाय रोवले आहेत. सरकारी नोकरीच्या संधी कमी होत आहेत. तेव्हा कुठे मराठी मुला-मुलींनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा. केवळ सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांच्या मागे धावाधाव न करता रोजगार देणारा बनावे, असे आवाहन सर्व पातळ्यांवर सुरू झाले आहे. उद्योग सुरू करण्यासाठी सरकार विविध योजना जाहीर करत आहे. त्याचा काही प्रमाणात फायदाही होताना दिसत आहे. उद्योग जगताशी जवळकीचे नाते असणारी काही लेखक मंडळी यशस्वी उद्योजकांच्या कहाण्या सांगत आहेत. या कहाण्या तरुणांना प्रेरणा देणाऱया, आकाशात झेप घेण्याची शक्ती देणाऱ्या आहेत. अशा लेखकांपैकी एक आहेत सुधीर सेवेकर, व्यंकटेश उपाध्ये. यातील सेवेकर म्हणजे औरंगाबादेतील चतुरस्त्र व्यक्तिमत्व. नाट्य,संगीत, चित्रपट, चित्रकला अशा विविध कलाप्रांतात त्यांचा वावर आहेच. शिवाय ते अनेक वर्षे उद्योग क्षेत्रातही कार्यरत राहिले. नाविन्यपूर्णतेचा वसा घेतलेल्या सेवेकरांकडे सोप्या पद्धतीने माहिती मांडण्याचे कौशल्य आहे. त्यांचे जगप्रसिद्ध कंपन्यांच्या यशोगाथा हे पुस्तक साकेत प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.  यात ते कौशल्य ठळकपणे जाणवते. ३३६ पानांच्या या पुस्तकात त्यांनी जगप्रसिद्ध ३२ कंपन्यांचा (यात बजाजसह काही महत्वाच्या भारतीय कंपन्या नाहीत, हे थोडे खटकते.) धांडोळा घेतला आहे. गुगल, फेसबुक, इन्फोसिस यांच्याविषयी अलिकडील काळात खूप काही लिहून आले आहे. या कंपन्यांची उत्पादने, शक्तीस्थाने कोणती हे तरुण पिढीला माहिती असेल. पण एच.जे. हेंझ, बेन अँड जेरीज, फेडरल एक्सप्रेस, सिंगर, एव्हॉन आदी कंपन्यांमधील सामान्य मराठी माणसाला फारशी कल्पना नाही. प्रत्येक जण इंटरनेटचा वापर करून गुगलवरून ही माहिती वाचू शकत नाही. त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे महत्वाचा ठेवा आहे. सेवेकर, उपाध्ये यांनी जगप्रसिद्ध कंपन्यांविषयी सांगताना त्यात पाल्हाळिकपणा येणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेतली आहे. उद्योजकीय प्रेरणा निर्माण करणे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून पुस्तक लिहिले गेले असले तरी त्यात यांत्रिकता नाही. उलट काही कंपन्यांविषयी त्यांनी दिलेली माहिती उद्योग जगताशी फारसा संबंध नसणाऱ्यांच्या ज्ञानात भर पाडणारीच आहे. उदाहरणार्थ टोयोटा कंपनीचे संस्थापक टोयोडा कुटुंब असले तरी आरंभीच्या काही वर्षानंतर त्यांनी कंपनीचे मूळचे टोयोडा मोटर्स नाव बदलून टोयोटा केले. जपानी भाषेत टोयोडाचा अर्थ फुललेले हिरवेगात भातशेत असा होतो. म्हणजे त्याचा अर्थ शेतीशी निगडीत आहे, परंतु, धंदा तर मोटारगाड्यांचा आहे म्हणून टोयोडा नाव योग्य वाटत नाही, असे वाटल्याने १९३६ साली कंपनीने नाव सुचवा अशी स्पर्धा घेतली. यात आलेल्या २७ हजार नावातून टोयोटा नाव निवडण्यात आले. जपानी भाषेत टोयोटाचा अर्थ समृद्धी आणि सुदैव असा होतो. जो मोटारधंद्याला साजेसा ठरू शकतो. शिवाय जपानी लिपित टोयोटा हा शब्द लिहिण्यासाठी ब्रशचे आठ फटकारे मारावे लागतात. अशा आठ फटकाऱ्यातून तयार होणारे शब्द खूप भाग्य घेऊन येतात, अशी जपानी माणसाची श्रद्धा आहे. म्हणूनही टोयोटा शब्द निवडला गेला, असे सेवेकरांनी सांगितले आहे. अशा प्रकारचे अनेक किस्से वाचण्यास मिळतात. बोईंग, फेडरल एक्स्प्रेसविषयी त्यांनी दिलेली माहितीही अशीच मनोरंजक  आणि ज्ञानवर्धक आहे. सर्वच प्रकरणात त्यांनी एक मुद्दा ठळकपणे मांडला आहे. तो म्हणजे सर्व उद्योगांच्या संस्थापकांनी धाडस केले. अपार कष्ट घेतले आहेत. आणि आज या कंपन्या कोट्यवधी लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार देत आहेत. त्यांची कुटुंबे चालवत आहेत. उद्योग म्हणजे घातच आणि तमाम उद्योजक म्हणजे रक्तपिपासू ही काही साहित्यिक, लेखक, चित्रपट आणि राजकीय पक्षांनी रंगवलेली प्रतिमा मुळीच खरी नाही. आज यशस्वी झालेल्या सर्व कंपन्यांनी अनेक संकटे झेलून यशाचे दार उघडले आहे, असेही सेवेकर, उपाध्ये आवर्जून नमूद करतात. त्यातून प्रेरणा घेऊन मराठी तरुणांनी स्वतःचा उद्योग उभा केला तर ती खरी मानवतेची सेवा होईल. आणि इतरांना मारण्यापेक्षा त्यांना जगवण्यासाठी लढणे किती बहुमोल असते हेही कळेल. नाही का?