Thursday 30 August 2018

हितोपदेश

तहानलेल्या औरंगाबादकरांसाठी २००५ मध्ये घोषित झालेली समांतर जलवाहिनी योजना १३ वर्षांत तसूभरही पुढे सरकलेली नाही. योजनेचे वाटोळे शिवसेनेने केले असे सूचक शब्दांत सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेकेदाराला वाढीव २८९ कोटी रुपये शासन देईल. तुम्ही फक्त कोर्टाबाहेर तडजोडीचा प्रस्ताव मंजूर करून घ्या, असे सांगितले. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी मान डोलावली. पण परवाच्या सभेत उलटेच केले. कारण खासदार चंद्रकांत खैरे यांनी मातोश्रीवरून आणलेली किल्ली फिरवून कुलूप लावले, असे म्हटले जाते. दुसरीकडे एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादीने पाइपलाईन टाकण्याचे काम जीवन प्राधिकरणाने करावे, अशी भूमिका घेतली आहे. माजी मनपा आयुक्त कृष्णा भोगे यांचेही तसेच मत आहे. लोकांनी उठाव केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आता या साऱ्या गदारोळात योजना पुन्हा लांबणीवर पडू शकते. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, महापौर, मनपाचे इतर कारभारी-अधिकारी आणि लोकांसाठी हितोपदेशाच्या काही गोष्टी.
---00---

१. नाग, ससे आणि बोका

एका बिळात पाच ससे राहत होते. एकदा एक बोका त्यांच्या बिळाजवळ घुटमळताना पाहून ते घाबरले. आता हा बोका आपला चट्टामट्टा करणार अशी भिती त्यांना वाटू लागले. तेवढ्यात त्यांना बिळाबाहेर एक भलामोठा नाग बोक्यावर हल्ला चढवत असलेला दिसला. थोड्यावेळात बोका घाबरून झाडावर जाऊन बसला. मग सशांनी नागाशी संपर्क साधत, ‘तु आमचे रक्षण करशील काॽ’ अशी विचारणा केली. बराच विचार करून नाग म्हणाला, ‘पण मला राहण्यासाठी चांगली जागा नाही.’ सशे म्हणाले, ‘आमचे बिळ आहे ना. निवांत रहा.’ डोळे चमकवत नाग आत शिरला आणि काही दिवसांतच त्याने  चारही सशांचा फडशा पाडला.
तात्पर्य : कोणापासून संरक्षण घेण्यासाठी कोणाला निमंत्रण द्यावे, याचे तारतम्य असलेच पाहिजे.
(आता यात ससा, नाग आणि बोका कोण हे सांगायची गरज पडू नये.)
---00---

२. मेंढपाळ आणि लांडगा

एक मेंढपाळ नेहमी मेंढरांना वनात चरायला नेत असे. तेव्हा एक लांडगा कळपापासून थोड्या अंतरावर शांतपणे बसून असे. मेंढ्याकडे तर तो ढुंकूनही पाहत नसे. काही दिवसानंतर हा लांडगा तर अहिंसक असल्याचे मेंढपाळाला वाटू लागले. म्हणून तो लांडग्याला सोबत मेंढवाड्यात घेऊन आला. लांडगा काहीच करत नसल्याचे पाहून मेंढ्या निर्धास्त झाल्या. एक दिवस मेंढपाळ मेंढराची जबाबदारी लांडग्यावर सोपवून कामानिमित्त बाहेरगावी गेला. आठ दिवसांनी तो परतला. तेव्हा त्याने पाहिले की, दहा-बारा मेंढ्यांचा फन्ना उडवून लांडगा पसार झाला होता.
तात्पर्य : चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवाल तर तुमचे नुकसान ठरलेलेच आहे.
(औरंगाबादकर गेल्या अनेक वर्षांपासून हेच इमाने इतबारे करत आले आहेत.)
---00---

३. लबाड कोल्हा, भोळा हत्ती

एका जंगलात महाकाय पण भोळसर हत्ती राहत होता. त्याला पाहून लबाड कोल्ह्यांच्या मनात विचार आला की, याला मारले तर अनेक दिवसांची ददात मिटेल. पण त्याला एकट्याला गाठून पाणवठ्याजवळ आणायचे कसे, असा प्रश्न होता. मग एक लबाड कोल्हा हत्तीकडे गेला अन्‌ म्हणाला, महाराज पाणवठ्यावर सर्व प्राण्यांची सभा भरली आहे. तुम्हाला जंगलाचा राजा म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू झाली आहे. फक्त तुमची परवानगी हवी आहे. तातडीने तुम्ही एकटे चला बरे. भोळा हत्ती भूलथापांना भुलला. पाणवठ्याजवळ येताच कोल्ह्यांची टोळी त्याच्यावर तुटून पडली.
तात्पर्य : भूलथापा ओळखता आल्या नाही तर तुमचे जगणे संपलेच म्हणून समजा.
(भूलथापा ऐकून पाणवठ्यावर जाणे आणि स्वतःला संपवून घेणे औरंगाबादकरांच्या अंगवळणी पडले आहे.)
---00---

हावरट तरस आणि काकडीचे शेत

एका शेतकऱ्याच्या काकडीच्या शेतात एका हावरट तरसाने खूपच धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्याने त्याला तरसोबा, तुमच्या पोटात जागा असेल तेवढ्याच काकड्या खा. उगाच नको तेवढे पोटात का भरता, असे म्हणून पाहिले. पण उपयोग झाला नाही. मग शेतकऱ्याच्या बायकोने एक शक्कल लढवली. तिने झाडाचा चीक काढून एक छानसा बाहुला बनवून शेतात ठेवला. रात्री तरसाने बाहुल्याला पाहिले. त्याला वाटले की आपण तो मटकावलाच पाहिजे. म्हणून त्याने त्याला हात लावला तर तो चिटकला. खरं तर त्याला धोका कळायला हवा होता. पण हावरटपणा नडला. त्याने बाहुल्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. तसे चिकाने त्याचे तोंडच चिटकून गेले. त्याला हलताच येईना. ते पाहून शेतकरी आणि त्याची बायको जळकी लाकडे घेऊन आली आणि त्यांनी त्या हावरट तरसाला बेदम झोडपून काढले.
तात्पर्य : खायला मिळते म्हणून खातच सुटले की घात होतो.
(सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी आता अतीच अर्थकारण झाल्याचे म्हटले आहेच. आता हावरटांना मार कधी बसणारॽ)
 ---00---

कावळा, बगळा आणि साधू

एकदा एका कावळ्याला यक्षाने सांगितले की, त्या जंगलातील तलावात सोनेरी मासा आहे. तो खाल्ला की तु कायमचा सुखी होशील. कावळ्याने तलाव शोधून मासा पकडला आणि तो खाण्यासाठी निघणार तोच एक बगळा आला आणि  म्हणाला, हे तळे माझ्या मालकीचे आहे. त्यातल्या माशावर तुझा अधिकारच नाही. दोघांमध्ये वाद वाढला. तेव्हा ते तळ्याजवळच बसलेल्या साधूकडे गेले. साधू म्हणाला, हा मासा खाण्याची तुम्हा दोघांचीही योग्यता नाही. ती मिळवण्यासाठी कावळ्याला आधी अंतर्मनापासून पांढरे स्वच्छ व्हावे लागेल. आणि बगळ्याला दोन्ही पायांवर उभे राहून, डोळे उघडून गोड आवाजात भजने म्हणावी लागतील. कित्येक वर्षे उलटून गेली कावळ्याला अंतर्मनापासून पांढरे स्वच्छ होता आले नाही. बगळ्याला गोड आवाजात भजन म्हणता आलेले नाही.
तात्पर्य : काही चांगले पदरात पाडण्यासाठी मनापासून कष्ट करावे लागतात. स्वतःत बदल करावा लागतो.
(फक्त जाती-धर्माच्या नावावर कारभारी निवडणाऱ्या औरंगाबादकरांना याबद्दल काय उलगडून सांगावे.)

Friday 24 August 2018

देवळी : फ्रेमपलिकडील जगाचा शोध


एक फोटो म्हणजे छायाचित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते, असे म्हणणे आणि त्यावरून वाद निर्माण करणे चुकीचे आहे. कारण दोन्ही माध्यमांची तशी तुलना होऊ शकत नाही. ज्या गोष्टी शब्दांनी आरपार होतात, तेथे फोटो कामाचा नाही. आणि जेथे फोटो बोलू लागतो तेथे शब्दांची गरज पडत नाही. फोटो या माध्यमाची एक स्वतंत्र शक्ती, अस्तित्व आहे. आभासी आणि वास्तव अशा दोन्ही जगात फोटो लख्ख प्रकाश टाकत असतो. काळाच्या सीमा ओलांडून फोटो आपल्या काहीतरी सांगतो. काही फोटोंच्या फ्रेम्स - चौकटी अशा असतात की त्यात त्याचा विषय पूर्णपणे सामावलेला असतो. विषयाचे तपशील त्या चौकटीतच शोधायचे असतात. किंवा ते तेथेच पसरलेले, विखुरलेले असतात. आणि काही फोटो असे असतात की जेथे त्याच्या चौकटी संपतात त्यापलिकडेही एक जग उभे असल्याची जाणिव करून देतात. केवळ जाणिव करून देत नाहीत तर ते जग शोधण्यासाठी तुमचे मन तो फोटो ताब्यात घेतो. मनाला जगाच्या कानाकोपऱ्याची सफर घडवून आणतो. अनुभवविश्वात फेरी मारण्यास भाग पाडतो. भूतकाळाच्या आठवणी जागवतो. अशा प्रकारचे फोटो काढणे प्रत्येक छायाचित्रकाराला शक्य नाही. कारण त्यासाठी दृष्टी, मन वेगळ्याच जगात नेऊन ठेवावी लागते. कमालीची भटकंती करत नवनवे विषय शोधावे लागतात. त्यावर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. प्रख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या छायाकृतींचे `देवळी – कोनाडा` प्रदर्शन पाहताना हे प्रकर्षाने जाणवले. भंडारे यांच्या विचारशक्तीतील वेगळेपण मनात ठसते. जुन्या आठवणी, बालपणाच्या गोष्टीत रमणे अनेकांना आवडत असते. विशेषतः वयाला चाळिशीचे वेध लागले की आपला मूळ उगम, उदय जेथे झाला तो परिसर खुणावू लागतो. त्यातील तपशील डोळ्यांसमोरून भिरभिरू लागतात. भंडारे यांनी देवळी प्रदर्शनात नेमका हाच वेध वेधला आहे. ५० वर्षांपूर्वी गावांमधून शहरात वस्तीस आलेल्या लोकांचे बालपण वाडा संस्कृतीत गेले आहे. काळाच्या ओघात गावकरी वाडे सोडून गेले. हळूहळू वाड्यांना घरघर लागली. त्यातील स्थापत्य वैशिष्ट्यांच्या खुणा, सांस्कृतिक वेगळेपण लयाला जाऊ लागले. आता तर वाडे नामशेषच झाले आहेत. एक प्रकारे आपली एक समृद्ध परंपरा आपण मोडीत काढली आहे. त्याचे प्रतीक म्हणून भंडारे यांनी शेकडो जुन्या वाड्यांतील देवळी म्हणजे कोनाड्याची विविध रुपे टिपली. त्याचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्रातर्फे एमजीएमच्या कलादीर्घ दालनात भरवले. प्रत्येक फ्रेम पाहताना त्यातील भावार्थ अधिक व्यापक असल्याचे जाणवते. त्या काळी वाड्याची देवळी म्हणजे एक जिवंत व्यक्तिमत्वच होते किंवा एक हक्काचा माणूसच समजा. कोणीही येता जाता देवळीत काहीही ठेवून जावे आणि तिने ते जीवाभावाने सांभाळावे, अशी स्थिती होती. त्यामुळे वाड्यांमध्ये देवळी तयार करताना तिच्यावर छानपैकी संस्कार केले जात. तिला विविध आकार दिले जात. कलाकुसरही केली जात असे. काही देवळ्या मोठ्या आकाराच्या, विशाल हृदयाच्या. तर काही देवळ्या छोटेखानी पण मनात अपार माया भरलेल्या, असे सारे चित्रण भंडारे यांच्या या प्रदर्शनात पाहण्यास मिळाले. छायाचित्रातील प्रत्येक देवळी नकळत आपल्याशी बोलू लागते. मी  अमूक एका वाड्यातील. माझे मालक असे होते बरं...त्यांना इतकी मुलं-बाळं होती. त्यांच्या संसारात मी पण होते. पण एक दिवस सारे विस्कटून गेलं...अशी कहाणी ती सांगू लागते. विस्कटणेपणाचे साम्य असले तरी त्यातही विविध रंग भंडारे यांनी भरले आहेत. ते रंग फ्रेम बारकाईने पाहताना डोळ्याच्या कडा पाणावून टाकतात. अशा या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल प्रतिष्ठानचे निलेश राऊत, सुबोध जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. हे प्रतिष्ठान सातत्याने कोणताही दुजाभाव न करता कलावंतांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत आहे. त्यासाठी झळही सोसत आहे, हे महत्वाचे.
टोकाचा जातीवाद, धर्मवाद पोसणाऱ्या औरंगाबाद शहराची दुसरी ओळख आता कचरा, खड्ड्यांचे, पाणीटंचाईशी झुंजणारे गाव अशी होऊ लागली आहे. येथे अनेक कलावंत मुंबईची चित्रपट-नाट्य दुनिया गाजवत असली तरी त्यांना येथे अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. किंवा मिळाला तरी ते येथे थांबत नाहीत. फोटोग्राफीच्या दुनियेबद्दल बोलायचे झाले तर येथे नाट्य, संगीताप्रमाणेच ही कलाही फारशी बहरली नाही. मोहंमदभाई, कुमार खेकाळे, नरेंद्र लोंढे, पाठक गुरुजी, दीक्षित गुरुजी यांच्यासह काहीजणांनी १९४० ते १९९०च्या काळात औरंगाबाद परिसरातील घटना घडामोडी टिपल्या. १९९६-९७ मध्ये पंढरीनाथ गोंडे पाटील यांच्या पुढाकाराने वर्तमानपत्रातील छायाचित्रकारांनी एकत्र येऊन एक प्रदर्शन आयोजित केले होते. पण ते फक्त शिवसेना वर्तुळापुरते होते. खरेतर प्रसारमाध्यमांतील छायाचित्रकार हे शक्तीशाली, प्रभावी आणि सर्व ठिकाणी वावर असणारे असतात. त्यांच्यासमोरून हजारो बोलके क्षण, प्रसंग जात असतात. त्यापैकी काही त्यांनी छंद, आवड म्हणून टिपले किंवा जे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यालाच एका विचारसूत्रांत बांधत विशिष्ट चाळणी लावून त्याचे प्रदर्शन दर महिन्यातून एकदा भरवले तर औरंगाबादकर नक्कीच त्याचा आनंद घेऊन शकतील. काहीतरी वेगळे केल्याचा अनुभव छायाचित्रकारांनाही येऊ शकेल. भंडारे यांच्यापासून अशी प्रेरणा घेतली तर नयनरसिकांना ते हवेच आहे.

Thursday 9 August 2018

केवळ स्वतःच्या आनंदासाठी

१९७० नंतर मराठी रंगभूमी एका वेगळ्या वळणावर आणि उंचीवर पोहोचली. दिवाणखान्यात, कौटुंबिक पेचात किंवा हास्यविनोदात अडकलेले मराठी नाटक जागतिकस्तरावर वेगात निघाले. त्याचे श्रेय अर्थातच विलक्षण ताकदीचा विचार मांडणारे विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, दिलीप जगताप, रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी आणि इतर मंडळींना आहे. त्यांनी नाटक म्हणजे केवळ मनोरंजन किंवा हृदय पिळवटून काढणे नव्हे. तर ते समाजमन घडवण्याचे एक प्रखर, सशक्त माध्यम असल्याचे सांगितले. दिवाणखान्याची चौकट मोडून टाकली. हलकाफुलका विनोद विनोदापुरताच जीवनात आहे. फार तर तो तुमच्या जगण्यातील ताण काही काळासाठी कमी करू शकतो. संपवू  शकत नाही. आजूबाजूला राजकीय, सामाजिक वावटळी उठल्या असताना तुम्हाला झुडूपाच्या आड लपून चालणार नाही. त्या वावटळीला अंगावर घ्यावे लागेल. समाजातील नवे बदल समजून घेत स्वतःच्या, येणाऱ्या पिढीची जडणघडण करणे गरजेचे आहे, असा त्या काळातील नाटकांचा सांगावा होता. काळाचे भान त्या काळातील नाटककारांनी रंगभूमीच्या माध्यमातून समाजाला दिले.  अर्थात ही सारे नाटके त्यावेळी व्यावसायिक रंगभूमीवरून प्रवेशकर्ती झाली नाही. कारण एवढे मोठे वळण घेण्याएवढे धाडस तत्कालिन सर्वच संस्थांमध्ये नव्हती. अशा अवजड, वेगळ्या वाटेवरच्या नाटकांना प्रेक्षक मिळणार नाहीत, असे त्यांचे व्यावसायिक गणित  होते. आणि प्रारंभी या लेखकांनी लिहिलेल्या नाटकांचे प्रयोग जेव्हा सादर झाले. तेव्हा तर ते गणित योग्यच असल्याचे वाटत होते. पण म्हणतात ना की जे चांगले किंवा समाजासाठी अत्यावश्यक आहे. जी काळाची गरज आहे. ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुढे येतेच. तसेच झाले. नवीन काही सांगू पाहणारी नाटके सादर होण्यासाठी समांतर, प्रायोगिक रंगभूमी अस्तित्वात यावी लागली. त्यासोबत राज्य नाट्य स्पर्धेनेही या नाटकांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे दार उघडे करून दिले. मराठी रंगभूमीचा इतिहास जेव्हा कधी मूळापासून आणि विविध अंगांनी लिहिला  जाईल. तेव्हा राज्य नाट्य, कामगार नाट्य स्पर्धेचे पान सुवर्णाक्षरांनी लिहावे लागणार आहे. सांस्कृतिक संचलनालयाच्या सरकारी खाक्यात असूनही ही स्पर्धा ५८ वर्षे सातत्याने रसिक, रंगकर्मींना चिंतनशील प्रयोग देत आहे. किमान १०० उच्च दर्जाचे लेखक, तेवढेच दिग्दर्शक आणि दुपटीने तंत्रज्ञ, चौपटीने कलावंत केवळ या स्पर्धांनी चित्रपट, नाट्यसृष्टीला दिले आहेत. त्यातून विचारी, संयमी, चिंतनशील समाज किती घडला याची मोजदाद सध्या करता येणार नाही. पण या स्पर्धेने त्यासाठी आटोकाट प्रयत्न केला एवढा नक्की. आणि मधला काहीसा उदासवाणा काळ मागे पडून पुन्हा ही स्पर्धा नाविन्याच्या शोधात निघाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्वी केवळ मुंबई, पुणे, नागपूर याच मोठ्या शहरांपुरती असलेली मर्यादा या स्पर्धेने मोडीत काढली आहे. अगदी ग्रामीण भागातील छोट्याशा गावातील कलावंतही रंगमंचावर स्वतःची चमक दाखवू शकतील, अशी यंत्रणा राबवली जात आहे. बाल नाट्यातून छोटे कलावंत आणि छोट्यांसाठी खास लिहिणारे, दिग्दर्शन करणारे तयार होऊ लागले आहेत. शेकडो नव्या संहिता येत आहेत.
हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे परवाच्या दिवशी तापडिया नाट्यमंदिरात झालेला या स्पर्धेचा विभागीय पारितोषिक वितरण सोहळा. प्रख्यात अभिनेते प्रा. डॉ. दिलीप घारे, दिग्दर्शक प्रा. दिलीप महालिंगे, प्रा. डॉ. राजू सोनवणे, रमाकांत मुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, प्रख्यात कवी प्रा. दासू वैद्य, सभु नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. किशोर शिरसाट, पद्मनाभ पाठक, गायिका आरती पाटणकर, शीतल रुद्रवार – देशपांडे आदी रंगभूमीशी दीर्घकाळापासून नाते जोडलेल्या मंडळींच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. स्टैच्यू ऑफ लिबर्टी या प्रचंड गाजत असलेल्या नाटकातील प्रतिभावान अभिनेते रमाकांत भालेराव यांनी या साऱ्यांना एकत्र आणण्याचा योग जुळवून आणला होता. आणि त्याचवेळी यंदा होणाऱ्या स्पर्धेसाठी कोणकोणत्या संहिता तयार होत आहेत. दुसरी फेरी गाठण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचे भान पाळावे लागेल. संहितेतील त्रुटी दूर करण्यासाठी दिग्दर्शकाने काय मेहनत घेतली पाहिजे, यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे चार दशकांपूर्वी विद्यार्थी असलेले आणि अंबाजोगाईतील रंगभूमीचे विद्यापीठ अशी ओळख असलेले प्रा. केशव देशपांडे यांनी जे सांगितले ते नव्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचे. ते म्हणाले की, प्रतिभेत कमीजास्त असा विषय नसला तरी नाट्यसंघातील काही कलावंत अत्यंत चमकदार कामगिरी करतात. प्रेक्षकांना भावतात. पुढे निघून जातात. लोकप्रिय होतात. पण काहीजण मागे पडतात. यश मिळाले तरी ते टिकत नाही. त्यामागे मुख्य कारण म्हणजे तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर आणि तरच तुमच्यात नवीनतेची उर्जा सातत्याने निर्माण होत राहते. ती रसिकांना आवडत जाते. म्हणून आपण माणूस म्हणून किती चांगले आहोत, हे कलावंताने सातत्याने तपासत राहिले पाहिजे. थोडी कमतरता पडली असे वाटले तर ती शोधून दूर केली पाहिजे. आता माणूस म्हणून चांगले असणे म्हणजे काय याचेही उत्तर देशपांडे यांनी दिले. ते म्हणाले, सर्वप्रथम अहंकारशून्यता हवीच. समोरचा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही. अपमानित होणार नाही. याची काळजी घेणे. झालेल्या चुकांची मनमोकळी कबूली देणे, चुकांबद्दल माफी मागणे आणि दुसऱ्यांना माफ करण्यात अगदी पुढे असणे म्हणजे चांगला माणूस होय. हे सगळे आदर्श असले तरी ते कलावंतात अपेक्षित आहे. कारण कलावंत समूहाचे नेतृत्व करताना स्वतःचे जीवनही घडत असतो. जेवढे नितळ, पारदर्शी मन तेवढे ते अधिक क्रियाशील, निर्मितीक्षम असते. त्यातून तुमचे व्यक्तिमत्वही अधिक उंचीवर पोहोचत असते. त्यामुळे इतरांपेक्षा स्वतःच्या प्रगतीसाठी नितळ, पारदर्शी व्हा. स्पर्धेत उतरणाऱ्यांनाही त्यांनी एक सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, दुसऱ्यांना आनंद मिळवून देण्यासाठी, विचारांत गुंतवण्यासाठी किंवा समाज घडवायचा आहे, असा विचार करून नाटक करूच नका. मला नाटक करण्यात आनंद मिळतो म्हणून मी नाटक करतोय, एवढेच ध्येय ठेवा. स्पर्धेत यश मिळेल अथवा न मिळेल. तुमच्या रंगभूमीवरील प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. प्रा. देशपांडे यांनी दीर्घ अनुभवातून दिलेला हा सल्ला नाट्य स्पर्धेच्या केवळ रंगकर्मी नव्हे तर सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे. कोणी ते अंमलात आणावे आणि कोणी सोडून द्यावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Thursday 2 August 2018

सगळी काट्यांचीच मोळी


महापालिकेचा कारभार हाती घेताच प्रत्येक आयुक्त कर्मचाऱ्यांची बैठक घेतात. कार्यपद्धती आणि अडचणी जाणून घेणे हा त्या मागील उद्देश असतो. तशी व्यापक बैठक नवे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी घेतली. आणि त्यात कर्मचाऱ्यांनी नगरसेवकच भ्रष्टाचाराचे उगमस्थान आहे, असा हल्ला चढवला. नगरसेवक आधी रस्ता बनववतात. मग ड्रेनेजलाईन, गट्टूसाठी खोदतात. पुन्हा तोच तोच रस्ता तयार करतात. अतिक्रमण हटाव मोहीम हाणून पाडण्यात नगरसेवकच अग्रेसर असतात, असे त्यांनी सांगितले. त्याचे दुसऱ्या दिवशी कारभाऱ्यांमध्ये पडसाद उमटले. महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, सभागृहनेता विकास जैन यांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे चुकीचे आहे, असे म्हटले. स्थायी समितीत राखी देसरडा यांनी अशा भ्रष्ट नगरसेवकांची नावे जाहीर करा, अशी मागणी केली. सभापती राजू वैद्य यांनी प्रशासनाने खुलासा करावा, असे आदेश दिले. आता यावरून सर्वसाधारण सभेतही चर्चा झडेल. अधिकारी, कर्मचारीच गैरव्यवहारात आकंठ बुडाले असल्याचे नगरसेवकही म्हणतील. काही उदाहरणेही देतील. मग आयुक्त भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांच्या याद्या जाहीर करून चौकशी लावतील. त्यात काहीजण दोषी सापडतील. त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे औरंगाबादकरांना वाटत असेल तर ते केवळ एक स्वप्नरंजन आहे. कारण या महापालिकेत सगळी काट्यांची मोळी आहे. काही गवताची पाती सापडली तर ते नशिब समजावे, अशी अवस्था आहे. आणि हे केवळ औरंगाबाद महापालिकेचे काळेकुट्ट चित्र आहे, असे नाही. सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी, निमसरकारी कार्यालयात, पोलिस दलात भ्रष्टाचार ओसंडत आहेच. फक्त औरंगाबाद महापालिकेत तो अनेक वर्षांपासून दुथडी भरून वाहत आहे. सगळी मोळी भ्रष्ट मनोवृत्तीच्या काट्यांची आहे. काटे काढून टाकायचे ठरवले तर मोळीच शिल्लक राहणार नाही. आणि गवताची नवीन मोळी तयार केली तरी तिला काही दिवसांतच काटे फोडणारी यंत्रणा तयार झाली आहे. अमूक काम का झाले नाही. त्यात चूक, दिरंगाई का झाली असा जाब विचारला की दुसऱ्या कोणावर तरी खापर मोडून मोकळे व्हायचे. आपल्यात चांगल्या, दर्जेदार कामाची क्षमता नाही हे कबूल करून स्वत:त सुधारणेऐवजी दुसरा कसा चुकीचा, भ्रष्ट हेच दाखवण्याची सगळीकडे मानसिकता आहे. सोमवारी डॉ. निपुण यांनी घेतलेल्या बैठकीत अनेक कर्मचारी अशाच पवित्र्यात होते. महापालिका म्हणजे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आणि प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी चालवायचा रथ आहे, असे वारंवार म्हटले जाते. हा रथ लोकांच्या हितासाठी चालवण्याची जबाबदारी कायद्याने, लोकशाहीने त्यांच्यावर टाकली आहे. शिवाय रथ कसा चालवायचा, याची नियमावलीही तयार केली आहे. पण त्याला हुलकावणी देत, कायद्याच्या कचाट्यातून वाट काढत लोकांऐवजी स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी रथ शहरभर फिरवला जात आहे. काही नगरसेवक आणि काही अधिकारी आलटून पालटून रथ हाकतात. बाकीचे मागे बसून मिळेल तेवढी मौज लुटतात. ज्यांना हे सहन होत नाही. त्यांना रथाच्या खाली लोटून दिले जाते. बहुतांश औरंगाबादकर हा खेळ मूकपणे पाहत असतात. काही राजकीय संघटना आवाज उठवतात. पण तो अतिशय क्षीण असतो. कारण गरिबांमध्ये भ्रष्टाचाराचा रथ उलथवून टाकण्याची शक्ती नाही. मध्यमवर्गाची तेवढी ताकद लावण्याची मानसिकता नाही आणि श्रीमंत त्या रथाकडे, त्यातील कारभाऱ्यांकडे ढुंकूनही बघत नाहीत. त्यांच्यासाठी काही असले काय किंवा नसले काय काहीही फरक पडत नाही. पण मूळ मुद्दा असा आहे की, सोमवारी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांविरुद्ध ज्या तक्रारी केल्या. त्यात तथ्य आहेच. आधी रस्ता बनवून ड्रेनेजलाईनसाठी खोदायचा. मग पुन्हा रस्ता करायचा. सुरू असलेले पथदिवे कमी प्रकाश देतात असे म्हणत जुनेच दिवे नवे म्हणून लावायचे. लोकांची गरज म्हणत लाखो रुपये अवाढव्य सभागृहे, व्यायामशाळा बांधून काढायच्या. सेवांचे खासगीकरण करून त्यात आपले नातेवाईक, ठेकेदार घुसवायचे असे उद्योग सुरूच आहेत. त्यात काही अधिकाऱ्यांची त्यांना साथ आहे. केवळ साथच आहे असे नाही तर भागिदारीही असते. यातून पैसे कमावता येतात, असा मार्ग अधिकारीच नगरसेवकाला दाखवतात. आणि एकदा तो दिसला की नगरसेवक तो मार्ग कधीच सोडत नाहीत. मग त्यात कर्मचारीही सामिल होतात. आज कमीतकमी काम करून जास्तीत जास्त वरकमाई कशी करता येईल, असा विचार करूनच अनेक कर्मचारी कार्यालयात येतात. एखाद्या दिवशी अपेक्षित कमाई झाली नाही तर दुसऱ्या दिवशी दुपटीचा निर्धार केला जातो. पूर्वी काही सर्वसाधारण सभांमध्ये अधिकाऱ्यांच्या मालमत्तेविषयी चर्चा झाली. तेव्हा एक-दोन नगरसेवकांनी सीबीआय, सीआयडीमार्फत चौकशीची मागणी केली. पण ती लावून धरली नाही. काही दिवसानंतर हेच अधिकारी आणि नगरसेवक गळ्यात गळा घालून सहलींना गेले. दहा-पंधरा वर्षांपूर्वी दुचाकीवर फिरणारे काही लोकप्रतिनिधी आज आलिशान गाड्यातून फिरतात. उंची बंगल्यात राहतात. त्यांची ही ‘अफलातून’ प्रगती सर्वजण पाहत आहेत. पीठात मीठ घालावेच लागते. थोडाफार भ्रष्टाचार केलाच पाहिजे. वरकमाई करण्याचा अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांना हक्कच आहे, असे भारतीय समाजाला मान्य झाले आहे. पण चिमूटभर पीठात भांडे भरून मीठ टाकणे सुरू आहे. काही दिवसांनी मीठाचीच पोळी तयार करून लोकांच्या ताटात वाढली जाणार आहे. हे सारे समूळ नष्ट करण्यासाठी शेकडो वर्षे लागतील. वारंवार काट्याच्या मोळ्या मोडाव्या लागतील. कायद्याच्या कचाट्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी सामान्य नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. जात, धर्म, पंथाच्या पलिकडे जाऊन कमीतकमी कमाईत जास्तीत जास्त चांगली कामे करणाऱ्या नगरसेवकांनाच निवडून देण्याचे धाडस दाखवावे लागेल. कारण हे शहर शेवटी आपल्या सर्वांचे आहे. त्याचे भले करण्याचे कामही तरुण पिढीला करावे लागणार आहे. होय ना?