Saturday 30 October 2021

शालिन तलवार

भारतातील सर्वात मोठे राज्य, सर्वाधिक मतदार असलेल्या उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याच्या प्रचाराचा ढोल-ताशे आतापासूनच वाजण्यास सुरूवात झाली आहे. जात-धर्म हा भारतीय समाजाचा राजकीय पाया आहेच. तो उत्तर प्रदेशात अत्यंत मजबूत आणि गुंतागुंतीचाही आहे. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी काँग्रेस, समाजवादी आणि इतर काही पक्षांची धडपड सुरू आहे. त्याचा आधार घेत भाजप हिंदू मतांची मोट बांधत आहे. जसजसे निवडणुकीचे वातावरण तापत जाईल तसतसे धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रकार वाढीस लागणार आहेत. त्यासाठी नवनवीन फंडे वापरले जातील. काही दशकांपूर्वी उत्तर प्रदेशात राजकारण्यांच्या तेढीला साहित्य जगतातून ठोस उत्तर दिले जात असे. ते ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्या समाजातील काही मंडळी चूक करत असतील. प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील. साहित्यिक मंडळी समाजाचा एकोपा कायम राखण्यासाठी धडपडत. त्यांच्या कलाकृतींमधून प्रागतिक विचारांचा संदेश दिला जात असे. पण हळूहळू असे तडाखेबंद, निस्पृह आणि प्रगतीशील साहित्यिक झुंडशाहीमुळे लोप पावत आहेत. जे काही शिल्लक आहेत त्यांचा आवाज क्षीण होत आहे. राजकारण तर बाजूला राहू द्या दुटप्पी समाजावर प्रहार करण्याचाही त्यांना विसर पडला आहे. हे सगळे पाहून इस्मत जुगताई यांची प्रकर्षाने आठवण येते. ३० वर्षांपूर्वी म्हणजे २४ ऑक्टोबर १९९१ रोजी या जगाचा निरोप घेणाऱ्या इस्मत यांचे जीवनचरित्र, लेखन अतिशय हृदयस्पर्शी, बोलके होते. वैयक्तिक जीवन एका रंगाचे आणि लेखन अनेकरंगी असा दुहेरी चेहरा त्यांनी ठेवला नाही. वेळप्रसंगी समाजाशी संघर्ष करण्याची, चुकीच्या प्रथांवर बोट ठेवण्याची हिंमत त्यांच्यात होती. त्या उर्दूतील नवसाहित्याच्या आधारस्तंभ होत्या. इस्मतचा अरेबिकमध्ये अर्थ पवित्र तसेच शालिन, नम्र असा होतो. साहित्यिक भाषेतच बोलायचे झाले तर त्या पवित्र तर होत्याच. शिवाय शालिन तरीही धारदार तलवार होत्या. मुक्तपणे आणि अत्यंत निर्भयतेने त्यांनी लिखाण केले. तत्कालिन समाजव्यवस्थेवर टीका केली. बिनधास्त मांडणी करत समाजमन ढवळून काढले. असे असले तरी त्यांच्या सर्व लिखाणात मानवी समूहाविषयी कमालीची करूणा दिसून येते. उत्तर प्रदेशातील बदायू शहरात २१ ऑगस्ट १९१५ रोजी नुसरत आणि कासीम बेग चुगताई दांपत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. चुगताई कुटुंबातील दहा मुलांमध्ये त्यांचा क्रमांक नववा होता. वडिल न्यायाधीश होते. त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे इस्मत यांचे बालपण अलिगढ, आगरा, जोधपूरसह अनेक शहरात गेले. त्या वेळी त्यांनी जी भारतीय संस्कृती पाहिली, अनुभवली त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात त्यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या बहिणी वयाने त्यांच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. विवाह होऊन त्या सासरी गेल्याने इस्मत यांचे बालपण भावांसोबत गेेले. म्हणून मुलांमध्ये असलेला एक प्रकारचा बंडखोरपणा त्यांच्यात आला. घरात साहित्यिक वातावरण होतेच. विविध प्रकारचे भरपूर साहित्य त्यांनी वाचले. वाचनाचा दिनक्रम सुरू असताना लोकांना जे आवडते ते लिहिणार नाही. मला जे वाटते तेच लिहिन असा निश्चय त्यांनी केला होता. हा निश्चय त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत अंमलात आणला. स्वातंत्र्यपूर्व काळात लिहाफ ही त्यांची पहिलीच कथा प्रचंड वादग्रस्त ठरली होती. त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल झाला. तेव्हा त्यांच्या सासरेबुवांनी इस्मत यांच्या पतीला म्हणजे शाहीद यांना एक पत्र लिहिले. त्यात म्हटले होते की, ‘लिखाणासाठी खटला दाखल होणे ही काही फार चांगली गोष्ट नाही. त्यामुळे इस्मतने रोज अल्लाह आणि प्रेषितांचे नामस्मरण करावे. आम्हाला तिची काळजी वाटते.’ अशा प्रकारचा काळजीवजा पाठिंबा सासरच्या मंडळींकडून त्यांना मिळाला. या बाबत त्या नशिबवानच होत्या. त्यामुळे घराबाहेरील लढाई त्यांना खंबीरपणे लढता आली. भारतीय साहित्यातील वास्तववादी, परखड लेखक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. आता ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनेक साहित्यिक मंडळी मनासारखा वापर करतात. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वांना अधिकार आहे, असे त्या मानत. त्यानुसार त्या जगल्या. प्रत्येक साहित्यकृतीतून स्त्री-पुरुष समानतेचा घोष केला. त्यांनी कायम निम्नमध्यमवर्गीय मुस्लिम समाजातील शोषित, पिडित महिलांच्या जीवनाचे चित्रण केले. कथा लेखन हा त्यांचा आवडीचा प्रांत होता. शिवाय गरम हवा, जुगनू, छेडछाड आदी तेरा सिनेमांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. अशा या चतुरस्त्र लेखिकेची उणिव दिवसेंदिवस वाढत आहे, हीच त्यांच्या व्यक्तिमत्व आणि लेखनाची ताकद आहे. होय ना?

Tuesday 19 October 2021

कितीजण विहीर उपसतील?

केवळ औरंगाबाद, मराठवाडाच नव्हे तर पूर्ण राज्यभरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वर्तुळात प्रचंड वावर असलेले प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा भयानक पद्धतीने खून झाला. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजेपासून सोशल मिडिआवर ही बातमी व्हायरल होताच खळबळ उडाली. उच्चवर्गीय वसाहतीत, आलिशान बंगल्यात राहणाऱ्या प्राध्यापकाचा खून म्हणजे चोरी किंवा दरोड्याचा प्रकार असावा, असेच वाटले. पण घरातून एकही वस्तू चोरीस गेली नाही. कुटुंबातील इतर सदस्यांना धक्काही लागला नाही. शिंदेंना चाकूने भोसकले नाही तर त्यांचा गळा चिरला, दोन्ही हातांच्या नस कापण्यात आल्या. हे कळाल्यावर काहीतरी वेगळाच प्रकार आहे, या दिशेने चर्चा सुरु झाली. प्रा. शिंदे देखणे, उमदे, लोकप्रिय हायप्रोफाईल व्यक्तिमत्व. त्यांच्या पत्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद केंद्रात प्राध्यापक. त्यामुळे घटनेचं महत्व लक्षात घेऊन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा फार झालं तर सायंकाळी मारेकरी जेरबंद होणार अशीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी ठोस पुरावेच नव्हते. मोठ्या शिताफीने कट रचून प्रा. शिंदेंना मारण्यात आलं होतं. कुठेही मारेकऱ्याच्या हाताचे, पावलांचे ठसे नव्हेत. शिंदेशी झटापट झाल्याच्या खाणाखुणा नव्हत्या. रात्री बारानंतर घरात कोणी आलं आणि बाहेर पडलं, असंही दिसत नव्हतं. मनीषा शिंदे आणि त्यांची मुले एकच घटनाक्रम सातत्याने सांगत होती. त्यात विसंगती सापडत नव्हती. त्यामुळे मारेकरी समोर दिसत होता. त्याचा वावर, त्याचे बोलणे, खून होण्यापूर्वी त्याने वापरलेला मोबाईल डेटा हे सारे त्याच्या दिशेने जात असले तरी त्याच्याभोवती घेराबंदी करणे पोलिसांना मुश्किल होत गेले. मग त्याला बोलते करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. एसआयटी स्थापन झाली. काही महिला अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली. चारही बाजूंनी हलकल्लोळ केल्यावर मारेकऱ्यानं हत्यारे शिंदेंच्या बंगल्याजवळील विहीरीत टाकल्याची कबूली दिली. आणि वडिलांना का मारले, याचेही एक कारण सांगितले. अनेक तास विहीरीतील पाणी, कचरा उपसून हत्यारे काढण्यात आली. मग ही घटना कशी आणि का घडली. याचा उलगडा १८ ऑक्टोबरला सायंकाळी पोलिसांनी केला. तरीही पूर्ण उलगडा झालाच नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. कारण प्रा. शिंदेंवर हल्ला होताना त्यांच्या पत्नी, मुलगी, आई-वडिलांना कसे कळाले नाही. कळाले तर त्यांनी त्याला रोखले का नाही. वडिल रक्ताच्या थारोळ्यात असताना गाढ झोपेतील आईला न उ‌ठवता मुले रुग्णवाहिका आणण्यासाठी घराबाहेर कशी पडू शकतात. प्रा. शिंदे यांच्या आई-वडिलांनी या बद्दल नेमकी काय माहिती दिली. मुलीविषयी शिंदेची विचित्र वागणूक होती काय? एकूणातच शिंदे कुटुंबातील परस्परांशी नाते कसे होते, याविषयी उलटसुलट माहिती येत आहे. त्याची ठोस उत्तरे उलगड्यातून मिळत नाहीत. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू होताच जोडीदाराचा नवा चेहरा दिसल्याचे शेकडो पती-पत्नीला वाटू लागले. त्यातूनही काही दुरावलेले संबंध जुळून आले. धाडस दाखवून अनेकांनी स्वत:च्या खासगी आयुष्याची गाळाने भरलेली विहीर उपसली. कुटुंब हीच खरी संपत्ती. प्रामाणिकपणे नाती जपली तरच जीवन आनंदी ठरते, याचा शोध त्यांना लागला. अशी विहीर उपसण्याची आणखी किती जणांची तयारी आहे, हा प्रा. शिंदे प्रकरणाने समाजासमोर उभा केलेला खरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.

Wednesday 13 October 2021

भानुमतीची माया

कोणत्याही समस्येवर राजकारणी मंडळींची आश्वासने म्हणजे तथ्य कमी आणि बडेजाव, पोकळपणा जास्त असतो. यात मरण सामान्य माणसाचं, गरिबांचं होतं. त्याचं एक उदाहरण गेल्या महिन्यात अनुभवास आलं. झालं असं की, एका पक्षाच्या लोककलावंत आघाडीतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गरिबांचा मसिहा अशी प्रतिमा असलेले मंत्री महोदय खास पाहुणे होते. त्यात या महोदयांनी विरोधी सरकारवर जबर टीकास्त्र सोडले. गरिबांच्या मदतीसाठी केलेल्या घोषणा ते सरकार कसे विसरले, याची उजळणी केली. त्यावर कलावंतांनी एका स्थानिक नेताजींमार्फत मंत्रीसाहेबांना आठवण करून दिली की, साहेब, तुमच्या सरकारनं आम्हाला ठोस मदतीचं आश्वासन दिलं होतं. कित्येक महिने उलटून गेले. मदत बेपत्ता, फरार झालीय. त्यावर कसलेल्या त्या मंत्र्यानं ‘लवकरच होईल. थोडं थांबा’ एवढंच म्हणत पुन्हा विरोधी सरकारकडे तोफेचे तोंड वळवले. ते पाहून लोककलावंत कमालीचे निराश झाले. आपलं आपल्यालाच लढावं लागणार. राजाश्रयाच्या भाकड गप्पा ऐकण्यापेक्षा लोकाश्रयाकडं वळालं पाहिजे, असं त्यांच्यातील काहीजणांना वाटलं असावं. त्यांच्यासाठी, खऱ्याखुऱ्या दानशूर रसिकांसाठी केरळच्या ए. भानुमती यांची ही खरीखुरी कहाणी. केरळ म्हणजे शास्त्रीय, परंपरागत नृत्य कलांचे आगार. महाराष्ट्राएवढी नसली तरी नाट्यकला तेथे स्थिरावली आहे. पर्यटकांसमोर कथ्थकली आणि अन्य नृत्यांचे सादरीकरण झाल्यावर एखादे छोटेसे नाटक सादर करणारे ग्रुप तेथे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. केरळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक येतात. ते बऱ्यापैकी पैसे बाळगत असल्याने नाट्य कलावंतांना कुटुंब चालवण्यापेक्षा थोडी जास्तही कमाई होत होती. त्रिसूर येथील ए. भानुमती अशा कलावंतापैकी एक होत्या. वयाच्या पंचवीशीत असताना त्यांनी नाट्यकलेतून पोट भरण्याचा मार्ग निवडला. छोट्या, किरकोळ भूमिका त्या पार पाडत. शिवाय ग्रुपच्या प्रमुखांनी सांगितली ती कामंही करत. त्यातून सुखाचे चार घास मिळत होते. पण पन्नाशी ओलांडली असताना कोरोनाचं संकट कोसळलं. अतिथी हाच देव असलेल्या केरळची अक्षरश: नाकेबंदी झाली. पर्यटकच नाही म्हटल्यावर अर्थकारण ठप्प झालं. अशा स्थितीत सरकारकडून आश्वासनाच्या पलिकडं काहीही मिळणार नाही, हेही भानुमतींच्या लक्षात आलं. त्यांनी बरीच शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना मराठी कलावंतांच्या एकपात्री प्रयोगाची आठवण झाली असावी. वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे वऱ्हाड निघालंय लंडनला हे एकपात्री नाटक गिनीज बुकात नोंदवले गेले. त्या काळात, तत्पूर्वी आणि नंतरही अनेकांनी एकपात्रीत यश मिळवले. वऱ्हाडचे सादरीकरण सुरुवातीच्या काळात एखाद्या घराच्या गच्चीवर अगदी चार-पाच प्रेक्षकांपुढे होत असे. त्याच धर्तीवर भानुमतींना सुचलेला प्रयोग प्रत्यक्षात आणण्यासाठी रंगचेतना नावाचा नाट्यग्रुप मदतीला धावून आला. नवरात्रोत्सवाची चाहूल लागली तेव्हा त्यांनी या प्रयोगांना प्रारंभ केला. त्यासाठी त्या राहत असलेल्या एका खोलीच्या भाड्याच्या घरात नेपथ्य रचना केली. कोरोनापूर्वी ज्यांच्या रिक्षातून त्या नेहमी प्रवास करत ते रिक्षाचालक एकमेव श्रोते बनले. त्यांच्यासमोर त्यांनी स्वत: लिहिलेला एकपात्री प्रयोग सादर केला. त्याची संहिता म्हणजे कोरोनामुळे कलावंतांचे काय हाल होत आहेत, याचीच कहाणी होती. त्याचे थेट प्रक्षेपण रंगचेतनाच्या सोशल मिडिआ पेजवर करण्यात आले. भानुमतींची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रसिक मायबापांनी इच्छेनुसार मदत करावी, अशी ओळ प्रक्षेपणाच्या खाली ठळकपणे सांगण्यात आली. आणि राजाश्रयापेक्षा लोकाश्रय किती मोलाचा, भरवशाचा असतो,याचा अनुभव भानुमतींना आला. तासाभरात त्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा झाले होते. रंगचेतना ग्रुपच्या चौघांचाही रसिक दात्यांमध्ये समावेश होता. पण एका महिला कलावंताने स्वत:च्या अस्तित्वासाठी केलेला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि त्याला नाट्यसंघाने केलेली मदत इथं ही गोष्ट संपत नाही. तर सुरू होते. ठरवलं असतं तर त्या स्व केंद्रित सहज राहू शकल्या असत्या. पण त्यांनी मदतीचं जग आपल्याभोवती ठेवले नाही. उलट त्याचा विस्तार केला. असं म्हणतात की, नवरात्र म्हणजे देवीच्या विविध रुपांची आठवण करून देणारा उत्सव. देवीचं एक रुप शैलपुत्री म्हणजे कणखर, खंबीर, निडर. दुसरं रुप कात्यायनी म्हणजे संगोपन, सांभाळ करणारी आणि तिसरं स्कंदमाता म्हणजे करुणामयी. चौथं सिद्धीयात्री म्हणजे प्राविण्य कमावलेली. तर भानुमतीचा अर्थ जादू करणारी, माया रचणारी असा आहे. त्रिसूरच्या भानुमतींमध्ये देवीच्या चारही रुपांचा संगम झाला आहे. त्या कणखर, खंबीर, निडर आहेत. आपल्यासोबतच्या लोकांचं संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे, अशी त्यांची भावना आहे. स्वत:हून मदतीला धावून जाणे, यात त्यांची करुणा दिसते. सर्वात म्हणजे त्यांच्यातील कलागुणामध्ये त्यांनी निपुणता, प्राविण्य मिळवले आहे. कोरोनापूर्वी कदाचित त्यांच्या अभिनयगुणाला एवढा प्रतिसाद मिळाला नसता. तो त्यांच्यातील नाविन्यतेमुळे मिळाला. त्यांनी स्वत:च्या नावाप्रमाणे रसिकांवर अक्षरश: जादू केली. रंगचेतनाच्या मदतीने त्यांनी प्रयोगांचा धडाका लावला. आणि पाहता पाहता १५ कलावंतांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत मिळवून दिली. ती देखील सन्मानाने. सरकारी यंत्रणेपुढे हात न पसरता. रंगचेतनाचे अध्यक्ष ई. टी. वर्गिस सांगतात की, भानुमती यांनी जे केले ते अफलातून होते. त्यांनी जे काही भोगले तेच त्यांनी मांडल्याने त्यातील अस्सलता रसिकांच्या हृदयाच्या आरपार गेली, यात शंकाच नाही. ही मालिका आता थांबणार नाही. कारण हरीश पेराडीसारखे नामवंत कलावंत यात सादरीकरण करून इतरांना स्वत:च्या खिशातून मदत करत आहेत. त्या मागे अर्थातच भानुमती यांच्या प्रयोगाची प्रेरणा आहे. एक सामान्य अभिनेत्री जर हे करू शकते तर आपण मागे का, असा विचार केरळमधील अनेक स्थिरावलेले कलावंत करू लागले आहेत. नवरात्रोत्सव आणि पुढील सणांच्या काळात मालिका अधिक व्यापक होणार आहे. किमान १०० गरजू रंगकर्मींना मदतीचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. मराठी कलावंतापासून प्रेरणा घेऊन भानुमतींनी शोधलेल्या या मार्गावरून मराठी लोककलावंत चालले तर त्यांनाही सरकारच्या भरवशावर राहून कपाळमोक्ष करून घेण्याची गरज भासणार नाही. होय नाॽ