Thursday 4 April 2019

ओता कानात उकळता रस

शिवसेनेचे नवे युवराज आदित्य ठाकरे काल औरंगाबादेत होते. चारवेळा खासदार राहिलेल्या आणि आता पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रकांत खैरे यांच्यासाठी त्यांचा ठरवून, गिरवून टॉक शो झाला. निमित्त खैरेंच्या प्रचाराचे असले तरी त्यात युवराजांच्या लाँचिंगचा मोठा भाग होता, हे स्पष्ट होत गेले. बऱ्याच प्रश्नांची पूर्वकल्पना आदित्य यांना २४ तास आधीच दिली गेली होती. स्वतःच्या कारभारावर फार मोठे बाँब गोळे पडणार नाही, याची खबरदारी खैरे आणि त्यांच्या एकनिष्ठ सहकाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे सारे काही बऱ्यापैकी सुरळित झाले. युवराजांना नागरी प्रश्नांची जाणिव आहे. ते विशिष्ट वातावरणात तरुणाईला सामोरे जाऊ इच्छितात, असे चित्र निर्माण झाले. अर्थात माझा मुद्दा त्या टॉक शोच्या यशापशाबद्दलचा नाहीये. तर त्यातील स्मार्ट सिटीच्या उल्लेखाविषयीचा आहे. चंद्रकांत खैरे यांना तब्बल २० वर्षे जिल्ह्यातील सर्वोच्च पद देऊनही त्यांनी विकासासाठी काहीही केले नाही. औरंगाबादला स्मार्ट सिटी करण्याच्या योजनेला तसूभरही का पुढे सरकू दिले नाही, अशा आशयाचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नकर्त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण जाती, धर्म, पंथाच्या नावाखाली लढवल्या जाणाऱ्या सर्वच निवडणुकांत खरा विकास सर्वच राजकीय पक्षांकडून खड्ड्‌यात पुरला जातो. आणि त्याच खड्ड्‌यांवर राजकारणी बेधुंद होऊन नृत्य करत असतात. औरंगाबादमध्ये तर या भयकंर पद्धतीने कळस गाठला आहे. म्हणूनच तीन वर्षे होत आले तरी स्मार्ट सिटीचे गाडे रुतून पडले आहे. प्रसारमाध्यमांनी खूप आरडाओरड केली. थेट उद्धव ठाकरेंपर्यंत ती ओरड पोहोचली. कचऱ्याचा प्रश्न असा सुटणारच नाही. १०० कोटींच्या रस्त्यांसाठी मनासारखा ठेकेदार शोधायला वेळ लागेल, असेही महापौर नंदकुमार घोडेले यांच्या लक्षात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काहीतरी करावेच लागेल, असेही त्यांना वाटू लागले. म्हणून त्यांनी सिटी बस सेवा सुरू केली. आता शहराच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज जाता येईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नाही. पूर्ण संख्येने म्हणजे १५० बस अद्याप आलेल्याच नाहीत. ज्या आहेत, त्यांचेही वेळापत्रक प्रवाशांच्या हिताचे नसल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जर मोठ्या संख्येने बस आल्या नाहीत. त्यांचे वेळापत्रक सुधारले नाही. छोट्या वसाहतींमध्येही बस पोहोचल्या नाही तर ही सेवा केवळ पदाधिकाऱ्यांच्या फायद्यापुरती राहिल, हे खासदार खैरे यांच्या खास वर्तुळात असलेल्या आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या महापौर नंदकुमार घोडेले यांनी लक्षात घ्यावे. त्यासोबतच त्यांना नव्याने मिळणाऱ्या १०० कोटींच्या रस्ता कामांना वेगात सुरू करावी लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे समांतर जलवाहिनीचा तिढा सोडवून पाइपलाईन टाकली जात असल्याचे जनतेला दाखवून द्यावे लागेल. आणि हे सारे करवून घेण्यासाठी एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइंच्या सर्वच स्थानिक राजकारण्यांना राजकारणाचे बुरखे बाजूला सारावे लागतील. कालच्या टॉक शोमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, नागरी समस्या ही काही खासदारांची जबाबदारी नाही. दिल्लीत देशाविषयीचे धोरण ठरवणे. महत्वाच्या योजनांना मार्गी लावणे, काही लोकहिताचे कायदे करणे ही खासदारांची जबाबदारी असते. धाकले ठाकरे म्हणाले त्यात काहीच चुकीचे नाही. खासदारांनी दिल्ली पाहावी, आमदारांनी मुंबई पहावी आणि महापौरांनी गल्ली पाहावी, अशीच रचना आहे. पण खैरे यांच्या ते कधीच पचनी पडलेले नाही. लोकांच्या खरेच उपयोगाला पडेल असे दर्जेदार, स्मार्ट काम त्यांच्या शब्दकोशात कधीच नव्हते. महापालिकेच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप हेच त्यांचे धोरण राहिले. बरं, हस्तक्षेप चांगल्यासाठी केला तर त्याचेही स्वागत होईल. पण तेही त्यांना कधी जमले नाही. एकही योजना त्यांना मार्गी लावता आलेली नाही. ठेकेदार, नगरसेवकांचे एक विशिष्ट कोंडाळे त्यांनी स्वतःभोवती रचून घेतले. विशिष्ट कामे अमूक टक्के झालीच पाहिजेत, असा धोशा ठेकेदारांकडे लावला. त्यांच्या या कार्यपद्धतीचा काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना अमाप फायदा झाला. एकेकाळी दुचाकीवरून फिरणारे काहीजण आज चारचार चारचाकी राखून आहेत. त्यात केवळ शिवसेनाच नव्हे तर इतर पक्षीयही लाभार्थी आहेत. असं आणखी बरंच काही सांगण्यासारखं आहे. पण इथं त्याचे औचित्य नाही. मूळ मुद्दा एवढाच आहे की, विशिष्ट टक्के कामासाठी हस्तक्षेपाची पद्धत बंद करण्याचा भट्टीमध्ये उकळलेला सल्ला आदित्य यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह इतर कारभाऱ्यांच्याही कानात ओतावा. त्याचा खैरेंना नसला तरी कदाचित सेनेच्या दुसऱ्या पिढीतील नेतृत्वाला फायदा होईल. आणि कोणाचा फायदा होवो न होवो, औरंगाबादकरांची दुष्टचक्रातून काही वर्षांसाठी सुटका तर होईल नाॽ

सांध्यावरच्या मर्मभेदी नोंदी

बालाजी सुतार हे मराठवाड्याच्या नव्या पिढीतील अत्यंत सशक्त, सखोल आणि अचूक विचार मांडणारे साहित्यिक. त्यांच्यातील या गुण- वैशिष्ट्य, बलस्थानाचा परिचय होतो त्यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहातून. जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाल्यावर खेडेगावांमध्ये नेमकी काय स्थित्यंतरे घडली. तिथले जीवनमान कसे बदलत गेले, हे तर सुतार यांची लेखणी अतिशय मर्मभेदी पद्धतीने सांगतेच. त्यात ते कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. जाती-पातींच्या आड माणूस म्हणून दडलेले राक्षसी चेहरे ते उघड करतात. कोण कुठं चुकतंय. जास्तीचं माप पदरात ओढून घेतंय, हे पण थेट हल्ला करत सांगतात. शिवाय गावांचा व्यवहार कसा. तिथली जातीव्यवस्था कुठल्या वळणावर येऊन ठेपली आहे. शतकानुशतके काबाडकष्टातच जगणारी महिला नामक व्यवस्था आज कोणत्या अवस्थेत आहे. तरुणाईची स्वप्ने कोणती आहेत. ती कशाने भंगत आहेत. गावांमध्ये धार्मिक तेढ म्हणजे नेमके काय असते, अशा एकना अनेक धागादोऱ्यांची अतिशय बळकट वीण ते आपल्याभोवती विणून टाकतात. ती देखील अतिशय सहजगत्या. म्हणजे हे सारे विषय आपल्या अवतीभोवती कधी गिरक्या घेऊ लागतात. गिरक्या घेत घेत वावटळीचे रुप धारण करतात आणि काही वेळानंतर कधी आपल्यालाच स्वःतमध्ये सामावून घेऊन भिरकावून देतात, हेच लक्षात येत नाही. कथा संपते तेव्हा आपण भानावर येतो आणि आणखी काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा मागची काही पाने चाळतो. सुतार यांनी मांडलेल्या विचारांच्या चक्रात अडकतो.  काही तपशील थोडासा सविस्तर असला तरी तो अतिशय मनापासून आलेला आहे. एकप्रकारचा तो मुक्त संवादच आहे. राजन गवस यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्यानुसार लघुकथेच्या बंदिस्त परिघातून मराठी कथेला स्वतःचा मोकळा अवकाश करून देणाऱ्या आजच्या कथाकारांमध्ये बालाजी सुतार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘दोन शतकांच्या...’मध्ये ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’, ‘डहूळ डोहातले भोवरे’, ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’, ‘दोन जगातला कवी’, ‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’, ‘अमानवाच्या जात्याचा पाळू’, ‘संधिकाळातले जहरी प्रहर’ आणि ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ अशा एकूण सात कथा १५९ पानांमध्ये व्यापलेल्या आहेत. त्यातील पहिली ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’ ही कथा म्हणजे राघव नावाच्या एका तरुणाची विलक्षण शब्दांत टिपलेली भावस्पंदने आहे. दोन प्रसंगांमध्ये सुतार जी भाष्ये पेरतात ती थक्क करून टाकतात. उदा. सतत येणाऱ्या बधीर कंटाळ्याचे काय करावे, हे त्याला उमगत नाही हीच त्याची गोची आहे. हे वाक्य पूर्ण झाल्यावर सुतार लिहितात, ‘कल्पितांना कथा समजून वाचण्यात फार दिवस व्यर्थ गेले.  जिवंत गाथा वाचायच्याच राहून गेल्या. सव्यापसव्यं यांत्रिक असतात आणि डोहातली उसळीच फक्त जिती असते, हे, भडव्या कधी उमजणार तुलाॽ पारा उडून आणि गंध विरून गेल्यावरॽ’. त्यांचा हा सवाल प्रत्येक शब्दांवर अनेक अंतरंगे उलगडतो. पुढे ते आणखी एका संदर्भात म्हणतात, ‘तांडेच्या तांडे फिरताहेत अकाली मेल्या स्वप्नांच्या तिरड्या खांद्यावर घेऊन. हे शहर आहे की स्मशानॽ’, ‘मायेचा पाऊस असला तर माणसाच्या शिवारात ओल राहते. पाऊस नाही, धान मरून जातं. पाऊस नाही, मन जळून जातं. पाऊस नाही, तहानेनं वाळून जा. पाऊस ओढ देतो, चातक होऊन बस. पाऊस झड लावतो, अगस्ती होऊन उपस. पावसात रोमँटिक कविता लिहिणं ठीक आहे. पावसात खमंग भजी तळून खाणंही ठीकच. पावसाअभावी काही पिकं, काही शेतं, काही घरं, काही गावं आणि कितीएक शंकर मरून जातात हे लक्षात असू दे.’ असे सुतार म्हणतात. तेव्हा काळजाचा थरकाप उडतो. पुढील प्रत्येक कथांमध्येही त्यांची संवेदनशील माणूस म्हणून भूमिका समोर येत जाते. एकूणच जागतिकीकरणाने, जगण्यासाठी लढण्याच्या स्पर्धेने गावांचे, शहरांचे बदललेले रूप एवढ्या आतड्यापासून अलिकडील काळात कोणी मांडले असावे, असे वाटत नाही. सुतार यांची एकूण विषय स्वतःमध्ये भिनवून घेण्याची आणि त्यानंतर तो वाचकांपर्यंत पोहोचवण्याची शैली महान उर्दू कथाकार सआदत मंटो हुसेन यांच्यासारखी भासते. त्यामुळे त्यांचा हा कथासंग्रह अतिशय मौल्यवान आहे. केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषांतही या कथांचे भाषांतर नक्कीच होईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही. आता सिनेमा, नाटकाच्या दृष्टीने एक मुद्दा. सुतार यांच्या एकूणच साहित्य विश्वातील काही निवडक गोष्टी घेत गावकथा नावाचे एक दीर्घनाट्य काही महिन्यांपूर्वी रंगमंचावर आले आहे. त्यातील दिग्दर्शक, कलावंतांनी ते अतिशय गांभीर्याने आणि पूर्ण मेहनतीने सादर केले आहेच. ‘दोन शतकांच्या...’ वाचताना असे वाटते की साऱ्याच कथांवर एक स्वतंत्र दीर्घांक होऊ शकतो. आणि लघुपट होण्याचीही शक्ती या कथांमध्ये नक्कीच दडलेली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची बीजे मराठवाड्यात रोवणारे निलेश राऊत, सुबोध जाधव यांनी गावकथाचे प्रयोग अविष्कृत होण्यासाठी पुढाकार घेतला आहेच. त्यांनी ठरवले तर काही अप्रतिम लघुपट तयार होऊ शकतील. यु ट्यूब किंवा अन्य जागतिक पातळीवरच्या माध्यमांमध्ये हे लघुपट पोहोचले तर खऱ्या अर्थाने मराठी माणसाचे नाव आणि मराठी गाव, गावातील माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. 

तो असा इतिहासही रचून गेला

जालना जिल्ह्याचे क्रीडाधिकारी हे त्याचे समाजातील मानाचे पद. पण त्याला आवडायचं ते रंगकर्मी असं बिरुद. तो हे बिरुद अभिमानानं सांगायचा. तेव्हा समोरच्याचे डोळे आपल्यावर पूर्णपणे रोखले जातील, याची काळजी तो घ्यायचा. पण या रोखलेल्या डोळ्यांना चुकवून तो हे जगच सोडून जाईल, असे कोणाला कधी वाटलेच नव्हते. अन्यथा साऱ्यांनीच नजरांची तटबंदी करून त्याला रोखून धरलं असतं. होय, मी तरुण रंगकर्मी संजय वनवेबद्दल सांगतोय. तो या जगात असताना एखाद्या अवखळ, निरागस मुलासारखा होता. मात्र, अकाली कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे जग सोडून जाताना सर्वांना गंभीर करून गेला. नवनव्या कलाकृती सादर करत रंगभूमीवर स्वतःला सिद्ध करणे हे तर आपल्या रक्तातच आहे. पण हे करताना सावध रहा. काळजी घ्या. एकमेकांना मदत करा. आपल्यानंतर आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा गोतावळा असू द्या, असा संदेशही त्यानं दिला. आणि संजयची महती अशी की, त्याचा संदेश मराठवाड्यातील तमाम तरुण रंगकर्मींनी मनावर घेतला. त्याच्या कुटुंबाला आपापल्या शक्तीनुसार मदत तर केलीच. शिवाय असा दुर्दैवी प्रसंग कोणावर ओढावलाच तर त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणारी यंत्रणा निर्माण करण्याची शक्तीही देऊन गेला. कोणत्याही कुटुंबात, समाजात, कार्यालयात अगदी राजकीय पक्षात अशी काही माणसे असतात. ज्यांचे तसे म्हटले तर रोजच्या धबडग्यात फारसे योगदान नसते. महत्वही नसते. पण तरीही ती अनेकांना हवीहवीशी वाटत असतात. थोर व्यक्तिमत्व नसले तरी त्यांचा वावर अत्यावश्यक असतो. अशा निरलस माणसांना कोणाकडून फारशा अपेक्षाही नसतात. आपण वावरतोय, फिरतोय. सगळ्यांशी बोलतोय. आपल्या क्षमतेनुसार हातभार लावतोय, याच आनंदात ते असतात. थोडेसे पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील नारायणसारखे. एका अर्थाने ते निरुपद्रवी असल्याने आणि कोणताही प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यात नसल्याने त्यांचे खरंच महत्व आहे का, असाही फालतू प्रश्न काही मंडळी बऱ्याचवेळा विचारत असतात. हा माणूस काही कामाचाच नाही, असे म्हणत अशा नारायणांना हुसकावून लावण्याचाही प्रयत्न सुरू असतो. या प्रश्न विचारणाऱ्यांना काळ उत्तर देतोच. परंतु, निरलसपणे काम करणाऱ्यांचे महत्वही सर्वांसमोर काळच आणून देतो. यातील काहीजण काळाच्या पडद्याआड झाल्यावरही इतिहासात नोंद होईल, अशी कामगिरी करतात. मराठवाड्याच्या रंगभूमीवरून अचानकपणे लुप्त झालेला संजय वनवे त्यापैकीच एक. त्याच्या जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला. त्याच्या निधनाची वार्ता कळताच त्याची आईही हे जग सोडून गेली. 
खरेतर संजय काही पट्टीचा अभिनेता नव्हता. नाट्य दिग्दर्शन, लेखन त्याचा प्रांत नव्हता. पण रंगभूमीवर कायम वावरत राहणे. जो कोणी नाटक करतोय. त्याच्या अडीअडचणीला कोणत्याही अपेक्षेशिवाय धावून जात होता. अगदी पडेल ते काम तो करायचा. अगदी पडदा उघडायचा किंवा पाडायचा असेल तरी संजय जबाबदारी स्वीकारायचा. आपण मोठ्या पदावरील शासकीय अधिकारी आहोत, याचा किंचितही अभिनिवेश त्याच्यात नव्हता. असा हा दुर्मिळ रंगकर्मी प्रख्यात लेखक अरविंद जगताप, प्रेषित रुद्रवार, रमाकांत भालेराव, शीतल देशपांडे, सतीश परब यांचा खास मित्र आणि त्यांच्यासारख्या शेकडो कलावंतांच्या गळ्यातील ताईत. घरची परिस्थिती ठीकठाक. त्यामुळे त्याच्या जाण्याने सारे हादरले असले तरी त्याच्या कुटुंबाला मदतीचा विचार पहिल्यांदा कोणाच्या मनात आला नाही. पण म्हणतात ना दुरून दिसते ते सारेच खरे असत नाही. तशीच स्थिती होती. संजयच्या कुटुंबाला सरकारी आर्थिक मदत मिळण्यास किमान एक वर्ष लागणार, असे काही दिवसांतच प्रेषित, शीतल यांच्या लक्षात आले. आणि अरविंद, सतीश, रमाकांत आदींशी चर्चा करून मदतीची योजना आखण्यात आली. संजयच्या नावाने व्हॉटस्‌अप ग्रुप स्थापन करून ज्याला शक्य असेल त्याने यशाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. मराठवाड्यातील रंगकर्मी नाट्य प्रयोगासाठी एकमेकांना मदत करतील. पण अशा स्थितीत खरेच कोण धावून येईल, अशी शंका होती. इतिहासात घडून गेलेल्या काही घटनाही त्यांना आठवत होत्या. पण संजयचे व्यक्तिमत्व म्हणा किंवा रंगकर्मींना काळाने मिळवून दिलेले भान म्हणा. सारेच एकवटले. प्रख्यात अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री गीता अग्रवाल, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यापासून ते अगदी रंगभूमीवर स्थिरावू पाहत असलेल्या अनेकांनी रक्कम दिली. पाहता पाहता दोन लाखांचा निधी तयार झाला. चार मार्चला तो त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. इथपर्यंत तर कौतुकास्पद होतेच. पण डॉ. सुधीर निकम यांच्या पुढाकाराने आणखी एक पाऊल टाकण्यात आले. मराठवाड्यातील कोणत्याही रंगकर्मीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला तर अडीच लाखापर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची संजय कलाधार योजना आखण्यात आली आहे. ती पुढील सहा महिने-वर्षभरात कार्यान्वित होणार आहे. एक आदर्श निर्माण करण्यासाठी सारी कलावंत मंडळी पावले टाकू लागली आहेत. त्यांच्या पावलांना चित्त्याची गती, हत्तीचे बळ मिळो आणि हा निधी देण्याची वेळ कोणावरच न येवो, हीच या निमित्ताने संजय वनवेची अपेक्षा असेल नाही काॽ 

रंग, रेषांच्या दुनियेचे दर्शन

नाटक कोणत्याही ठिकाणी सुरू करता येऊ शकते आणि एकदा ते सुरू झालं की त्याला किमान भारतात प्रेक्षक मिळतातच. ते कोणत्या ठिकाणी सादर होतंय यावर त्याची लोकप्रियता अवलंबून राहत नाही. फक्त त्यात नेमकं काय सांगितलंय हेच रसिकांसाठी महत्वाचं असतं. मात्र ज्यांच्यासाठी ते नाटक तयार केलेलं असतं त्याच मंडळींसमोर ते झाले तर अधिक परिणाम साधतं. तसं चित्रकलेबद्दलही आहे. एखादी चित्रकृती रेखाटल्यावर ती विशिष्ट ठिकाणी प्रदर्शित करण्यास एक वेगळंच महत्व आहे. या प्रदर्शनाचेही एक टायमिंग असावे लागते. आणि त्यातील मांडणीची कलाही अवगत असली तर मग रेखाटनाला दर्दींची गर्दी होते. हे सारं काही माहिती असलेले, हरहुन्नरी छायाचित्रकार किशोर निकम यांच्या पुढाकाराने नुकत्याच झालेल्या पॅच नामक चित्रप्रदर्शनातून त्यावर शिक्कामोर्तब होते. औरंगाबाद शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चित्रकलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या असंख्य रसिकांनी या प्रदर्शनाचा मनसोक्त आस्वाद घेतला. अनेक प्रतिभावान चित्रकार केवळ प्रदर्शनाचे तंत्र आत्मसात नसल्याने किंवा त्यापासून फटकून राहत असल्याने दुर्लक्षित राहतात. अशांना एकत्र आणून त्यांची अप्रतिम रेखाटने रसिकांसमोर आणण्याचे काम कोणालातरी करावे लागणारच आहे. ही जबाबदारी किशोर यांनी मनापासून स्वीकारली. आज मराठवाड्याच्या तरुण पिढीतील आघाडीचे फ्री लान्स छायाचित्रकार म्हणून किशोर यांचे नाव घेतले जाते. कारण त्यांनी मिडिआतील मंडळींशी सलगी असूनही कायम चौकटीबाहेर स्वतःचा वावर ठेवला.२५-३० वर्षांपूर्वी उत्तम छायाचित्रांची जाण असलेली तरुणाई पोटा-पाण्यासाठी वर्तमानपत्रांच्या जगात शिरली. त्यातील बहुतांशजणांना मिडिआच्या पॉवर, ग्लॅमरचेही आकर्षण होते. त्यामुळे ते एका कृष्णविवरात ओढले गेले. मिडिआमधील जीवघेण्या स्पर्धेत, जातीवादात आणि बातमीसाठी रोजचे फोटो एवढ्याच चक्रात अडकून पडले. निकम दोनदा अपघाताने त्या विवरात शिरले आणि चलाखीने बाहेर पडले. आता त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. शास्त्रीय, पारंपारिक नृत्यांमधील काही हालचाली कॅमेऱ्यात टिपताना विशिष्ट तंत्राचा वापर केला की ती हालचाल एखाद्या पेटिंगसारखी उतरते. या तंत्रात निकम यांनी मातब्बरी प्राप्त केली. आणि अशा प्रकारच्या चित्रांची प्रदर्शने मुंबई, पुण्यात भरवली. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचे समाधान त्यांना मिळाले. पण आपण ज्या गावात राहतो तेथील रसिकांनीही या कलाकृती पाहिल्या पाहिजेत, असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी विचार करत असताना त्यांच्या असेही लक्षात आले की आपल्यासोबत १९९८मध्ये शासकीय कला महाविद्यालयात शिक्षण घेणारे वैशाली टाकळकर, स्वाती नरेंद्रसिंग, सावी निकम, डी. विद्यासागर, डॉ. ए. डी. काटे, डॉ. सर्वेश नांद्रेकर आदी मंडळीही आज दिग्गज कलावंत म्हणून परिचित झाली आहेत. प्रत्येकजण एका विशिष्ट रंगशैलीत पारंगत झाला आहे. त्यांनाही सोबत घेऊन चित्रप्रदर्शन आयोजित केले तर ते अधिक वैविध्यपूर्ण होईल. एकाच छताखाली अनेक कलावंतांच्या सृजनशीलतेचा आनंद घेण्याची संधी रसिकांना मिळेल. शिवाय सभागृहाचे भाडे आणि इतर खर्चाचा भार कोणा एकावर पडणार नाही, असा व्यावहारिक विचारही निकम यांनी केला.  त्यातून १५ ते १७ फेब्रुवारी कालावधीत एमजीएमच्या दीर्घा आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन झाले. मांडणी, आशय, विषयाच्या निकषात ते वजनदार होते. सर्वच चित्रकार, शिल्पकार दीर्घ अनुभवी आणि रंगरेषांचे उत्तम जाणकार. त्यांच्या विचारांचीही एक बैठक निश्चित झालेली. त्यामुळेही एकेक कलाकृती कसबी झाली होती. डॉ. नांद्रेकर यांनी रेखाटलेले छत्रपती शिवरायांच्या दरबाराचे चित्र कमालीचे लक्षवेधी. त्यात त्यांनी शिवकालीन तपशील ज्या बारकाईने आणि ठाशीवपणे रेखाटला तो पाहून नजर खिळते. सावी किशोर निकम, डॉ. ए.डी. काटे यांच्या पेंटिंग्ज सर्वस्तरातील रसिकांना कमालीची भावली. कारण त्यात त्यांनी जीव ओतल्याचे जाणवत होते. वारली हा तर महिला वर्गाचा आवडता प्रांत. त्यामुळे प्रदर्शनातून सावी यांच्या काही चित्रकृतींची विक्रीही झाली. डॉ. काटे यांच्या कुंचल्यात एक विशिष्ट प्रकारचा दमदारपणा, खोलाकार असल्याची नोंद अनेकांनी घेतली. स्वाती नरेंद्रसिंग यांच्या शिल्पकलेत दीर्घकाळ नजर गुंतवण्यास भाग पाडणारे सामर्थ्य आहे. त्या केवळ कलाकुसर पुरता मर्यादित विचार करत नाहीत तर शिल्पकला पाहणाऱ्यास एक थॉटही देतात. डी. विद्यासागर, 
वैशाली टाकळकर यांच्या कलाकृतींबद्दलही हेच म्हणता येईल. त्यांच्या रेखाटनातील स्ट्रोक्समध्ये छानशी लय आहे. शिवाय त्या चित्राच्या आसपासचा अवकाशही अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने भरतात. त्यामुळे त्यांच्या निर्मितीचे मूल्य अधिक. एकूणात सर्व प्रदर्शन विविध अभिरुचीच्या रसिकांच्या मनात रेंगाळत राहिल,एवढे नक्की. निकम आणि  त्यांच्या सहकाऱ्यांनी अशीच प्रदर्शने वर्षातून दोनदा आयोजित करायची आणि त्यात चित्रकार, शिल्पकारांची संख्याही वाढवायची, असे ठरवले आहे. त्यांचे ठरवणे प्रत्यक्षात येवो आणि या कलावंतांच्या प्रयत्नांना अधिक दाद मिळावी म्हणून एक भव्य आर्ट गॅलरी उभी करण्याची सुबुद्धी सरकारला सुचो, एवढीच अपेक्षा.

कलावंत घडवणारा जवाहिर

ते तुमच्यासमोर आले आणि तुम्ही त्यांच्या नजरेला नजर भिडवलीच तर काळजात थर्र होते. एवढी तीक्ष्ण, भेदक नजर. त्यात पुन्हा बोलणे म्हणजे जाब विचारल्यासारखे. इकडून तिकडे आरपार करणारे. पण हे सारे पहिल्या काही मिनिटांपुरतेच. नंतर हा माणूस म्हणजे स्वतःच्या क्रिएटिव्हीटी, विचार प्रवाहात इतरांनाही अलगदपणे सहभागी करून घेणारा दयाळू, कनवाळू अवलिया असल्याचे कळते. आणि त्याच्यासोबत बांधलेला धागा सुटणे शक्य नाही, असेही लक्षात येते. पुढील प्रवासात हा माणूस अक्षरशः झपाटून टाकतो. आपलं जीवन घडतंय. त्यात नवनिर्मितीचा रस ओतला जातोय. आपल्या आतील आवाज बुलंद करण्याची शक्ती मिळतीय. पण ही शक्ती अतिशय विवेकाने वापरायची असते, याचीही जबाबदारी आपल्यावरच असल्याचे समजत जाते. इतक्या साऱ्या गुणवैशिष्ट्याचा संगम झालेला, ठाण मांडत नाट्य, चित्रपटांचे अनेक कलावंत घडवणारा जवाहिर म्हणजे प्रा. दिलीप महालिंगे. १५ फेब्रुवारी रोजी वयाची ५४ वर्षे पूर्ण करणाऱ्या या जवाहिर गुरुंचा सत्कार त्यांच्या शिष्योत्तमांनी १७ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. प्रा. महालिंगेंना नाट्यक्षेत्रात येण्यास कारणीभूत ठरलेले त्यांचे गुरु म्हणजे मास्तर डॉ. रविंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कृतज्ञता सोहळा होत आहे.
ज्यांना आपण घडवलं. ज्यांच्या आयुष्यात आपण काही रंग भरले. त्यांनी त्याची आठवण ठेवावी. रस्त्यावर कधी चुकून भेट झाल्यावर त्यांच्या नजरेत ते दिसावे. माघारी कधीतरी आपल्याबद्दल दोन शब्द सांगावेत, एवढी कोणत्याही गुरुची रास्त अपेक्षा असते. पण प्रा. महालिंगे त्याच्या पलिकडे पोहोचले आहेत. फक्त परफॉर्मन्स चांगला कर. आणि माणूस म्हणून स्वतःतील माणूसपण जिवंत ठेव. बाकी काही नाही, असा संस्कार ते विद्यार्थ्यांवर करतात. त्यामुळेच की काय त्यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे मोल अवर्णनीय आहे. 
प्रा. महालिंगेंचा नाट्य चळवळीतील प्रवास नाट्यमय आहे. घरी अगदी जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेले सर उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी. तेथे नाटकासाठी ऑडिशन्स होत्या. काय सुरू आहे, असे कुतुहलापोटी पाहण्यासाठी ते गेले. तेथे रविंद्र ठाकूरसर होते. त्यांनी ऑडिशनसाठी बोलावले. तर प्रा. महालिंगे मागे सरले. ठाकूर म्हणाले, भितोस की कायॽ झाले. तेवढ्या एका शब्दाने चमत्कार झाला. तिथून महालिगेंनी वळून पाहिले नाही. अनेक स्पर्धा गाजवल्या. बक्षिसे मिळवली. १९८८मध्ये विवेकानंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाल्यावर तर कर्तृत्वाला जणू धुमारेच फुटले. मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव अशा अनेक मित्रांसोबत त्यांचे विश्व विस्तारत गेले. १९९२ नंतर युवक महोत्सवात सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचा दबदबा काहीसा कमी होत चालला होता. त्याची जागा विवेकानंद महाविद्यालयाने पटकावली. ती देखील प्रचंड मेहनत आणि नाविन्यपूर्ण कल्पना साकारत. एक दोन नव्हे तर १६ वर्षे विवेकानंद युवक महोत्सवाची जनरल चँपिअनशिप पटकावत आहे. यावरून प्रा. महालिंगे या माणसात कलावंत घडवण्याची किती शक्ती असावी, याचा अंदाज येऊ शकतो. सर फक्त तालमीपुरते सर नसतात. तर ते विद्यार्थ्यांचे पूर्ण विश्व व्यापून टाकतात. कलावंत आणि माणूस म्हणून मुलगा-मुलगी पूर्णपणे तयार झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. आणि मग ते एका विलक्षण जिद्दीने पेटून जात एकेका पैलूवर काम करतात. एकांकिका, प्रहसन, मूकाभिनयाची तालीम म्हणजे एक परीक्षाच. त्यात परफेक्शन असेलच पाहिजे, असा प्रा. महालिंगेचा हट्ट असतो. काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी अनेक एकांकिकांचे लेखन केले. त्यात मांडलेले विषय पाहिले तर लक्षात येते की प्रा. महालिंगे केवळ बक्षिसे किंवा टाळ्या मिळवण्यासाठी कलाकृती निर्माण करत नाही. तर त्यामागे त्यांचा सामाजिक बांधिलकीचा विचार आहे. आपल्या आजूबाजूला जे काही घडते आहे ते हजारो रसिकांसमोर नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तेही धारदारपणे. टोकदारपणे. पण हे करत असताना संतुलन बिघडणार नाही, यावरही त्यांचा कायम कटाक्ष राहिला आहे. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांसाठी त्यांनी नाट्य प्रयोगांतून त्या काळात एक लाख रुपयांचा निधी उभा केला होता. एकदा ते असेच भटकत अजिंठ्याजवळच्या लेणीपूर गावात गेले असता तेथे आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नसल्याचे कळाले. मग औरंगाबादला परतताच त्यांनी काही सुहृद मित्रांच्या मदतीने त्या गावात आरोग्य शिबिर घेतले. आजारींवर उपचार केले. एवढी संवेदनशीलता प्रा. महालिंगे यांनी स्वतः जपली आहे. या वाटचालीत त्यांना पत्नीची पूर्ण साथ मिळाली. रात्री – बेरात्री तालिम संपल्यावर भुकेजल्या ५०-५० विद्यार्थी कलावंतांना गरमागरम पोटभर जेवण करून वाढणे त्यांनी कधी सोडले नाही. त्यामुळे सरांच्या यशात निम्मा वाटा त्यांच्या पत्नीचा आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रा. महालिंगेना प्रसिद्धीचा अजिबातच सोस नाही. कशाचेही भांडवल न करता आपण आपले काम करत राहायचे. पडद्यामागेच राहायचे, असा त्यांचा दुर्मिळ स्वभाव. म्हणूनच ते रंगभूमीवर स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरुण कलावंताचे दिशादर्शक यंत्र झाले आहेत. या दिशादर्शकाची उंची उत्तरोत्तर वाढत जाईल. त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालत शेकडो तळमळीचे, संवेदनशील, नवनिर्मितीची आस असलेले कलावंत घडतील याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

सवाईचा टिळा

एका वर्षीच्या नोव्हेंबरपासून सुरू होणारा सांस्कृतिक सोहळे, स्पर्धांचा मोसम दुसऱ्या वर्षाच्या फेब्रुवारीअखेरीस मावळतीला येऊ लागतो. या चार-पाच महिन्यात तमाम कलावंत मंडळी नाविन्याच्या शोधात स्वतःला झोकून देत असतात. रंगभूमीवर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहतात. त्यातील कित्येकजण यशस्वीही होतात. अशा यशस्वीतांचे प्रमाण औरंगाबादेत, मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढत चालले आहे, हे पाहून मनात एक सुखद अभिमानाची भावना निर्माण होते. वर्षानुवर्षे एकांकिका, राज्य नाट्य, कामगार असो की शॉर्ट फिल्मची स्पर्धा अनेक ठिकाणी आपले कलावंत सर्वांना चकित करत आहेत. वर्षानुवर्षे अशा स्पर्धांवर राज्य गाजवणाऱ्या मुंबई-पुणेकरांना मागे टाकत आहेत, हे केवळ कला प्रांतातीलच नव्हे तर मराठवाड्याच्या सर्वच क्षेत्रातील लोकांना आनंद देणारेच आहे. त्यापैकी तीन घटना अलिकडील म्हणून त्याविषयी. 
एककाळ असा होता की सवाई एकांकिका स्पर्धेत सहभागी व्हायचे एवढेच औरंगाबादमधील नाट्यकर्मींचे स्वप्न असायचे. बक्षिसाचा कशाला विचार करायचा. एकदा सवाईचा टिळा लावून घेऊ. स्पर्धा कशी असते ते बघू. अनुभव घेऊ, अशी चर्चा व्हायची. कारण सवाईचा दर्जा आपल्या विचारक्षमतेबाहेर आहे. तिथल्या परीक्षकांना आवडेल असा विषय आपल्याकडे असूच शकत नाही, असा सूर असायचा. अशा त्या सवाईच्या स्पर्धेत औरंगाबादच्या मॅट्रीक या एकांकिकेने सर्वोत्कृष्टचा बहुमान पटकावला. शेखर ढवळीकर, चिन्मय मांडलेकर, निपुण धर्माधिकारी या दिग्गज परीक्षकांनी ही निवड केली. प्रवीण पाटेकर लिखित, दिग्दर्शित ही एकांकिका केवळ बक्षिसपात्र ठरली नाही तर तिने राज्यभरातील नाट्य अभ्यासकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. प्रवीण पाटेकर कायम नवीन काहीतरी सांगू पाहणाऱ्या, ग्रामीण भागातील वास्तव टिपणाऱ्या संवेदनशील रंगकर्मींपैकी एक. त्याच्या मांडणीतही एक प्रकारची धार असते. त्यामुळे येत्या काही वर्षांत तो एकूण नाट्य, चित्रपट क्षेत्रातील आघाडीचा लेखक, दिग्दर्शक झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना त्याची पावले आता त्या दिशेने पडावीत, अशी अपेक्षा आहे. मॅट्रीकमधील भूमिकेसाठी संतोष पैठणेलाही पुरस्कार मिळाला आहे. त्याचेही विशेष कौतुक. आता थोडेसे मागील काळाविषयी. मुंबई-पुण्याच्या स्पर्धांमध्ये धडक मारण्याची परंपरा प्रा. कुमार देशमुख यांनी १९८० च्या दशकात सुरू केली. त्यांच्या स्मारक नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत इतिहास रचला. पद्‌मनाभ पाठक दिग्दर्शित अचानकने तब्बल २५ वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती केली. मधल्या काळात चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी यांनी स्पर्धांऐवजी दुसरा मार्ग जवळ करत व्यावसायिक रंगभूमी काबीज केली. स्पर्धांच्या निमित्ताने औरंगाबादकरांची खरी आक्रमणे सुरू झाली ती १९९३-९४मध्ये. प्रा.दासू वैद्य यांनी लिहिलेल्या ‘देता आधार का करू अंधार’ एकांकिकेने नाट्य दर्पण स्पर्धा गाजली. मराठी चित्रपटांचा सुपरस्टार मकरंद अनासपुरे, दमदार अभिनेता मंगेश देसाई याच स्पर्धेतून गाजले. किरण पोत्रेकर, सचिन गोस्वामी, प्रा. कमलेश महाजन, संजय सुगावकर यांच्यासह अनेकांनी  अशाच काही स्पर्धांतून स्वतःला सिद्ध केले. ती परंपरा प्रवीण पाटेकर, राबवा गजमल आणि त्यांचे तमाम सहकारी कलावंत पुढे नेत आहेत, उंचावत आहेत.
एकीकडे मॅट्रीक सवाईमध्ये गाजत असताना दुसरीकडे प्रा. अनिलकुमार साळवे यांनी दिग्दर्शित केलेल्या 15 ऑगस्ट लघुपटाने आणखी एक पुरस्कार पटकावला. माय ठाणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात तो सर्वोत्तम ठरला आहे. प्रा. साळवे म्हणजे नव्या पिढीतील अनुभवी, संवेदनशील आणि सामाजिक वेदना मांडणारे लेखक-दिग्दर्शक आहेत. देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असताना ते नवी पिढीही घडवत आहेत. विविध स्पर्धांमध्ये त्यांचे विद्यार्थी चमकत आहेत. पण हे करत असताना स्वतःतील कलावंतही जिवंत ठेवत आहेत. 
औरंगाबाद-मराठवाड्याच्या सांस्कृतिक जगताचे ते अतिशय नम्रपणे प्रतिनिधीत्व करताना दिसतात असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
स्पर्धा आणि नाटकाच्या पलिकडे जे झाले ते म्हणजे एमजीएमच्या महागामीचा शारंगदेव महोत्सव. कमलकिशोर कदम, अंकुशराव कदम यांनी एमजीएमच्या रुपाने एक शैक्षणिक साम्राज्य उभे केले आहे. त्यातील काही अभ्यासक्रम खरेच समाजमन घडवणारे आहेत. महागामी त्यापैकी एक. त्याचे खरे श्रेय पार्वती दत्ता यांनाच द्यावे लागेल. जवळपास दोन तपांपासून त्या शास्त्रीय नृत्य परंपरा कायम ठेवून आहेत. एका विशिष्ट समाज, वर्तुळापुरतीच मानली जाणारी शास्त्रीय नृत्य कला सर्वस्तरांपर्यंत नेण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न त्या करतात. शारंगदेव महोत्सव त्याचाच एक भाग होता. यंदा त्यांनी शास्त्रीय नृत्यासोबत लोककला, सुफी कव्वालीलाही स्थान दिले. सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ परफॉर्मन्स एवढाच दत्ता यांचा फोकस नसतो. तर कलावंतांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देतात. यातून कलेच्या विविध पैलूंची ओळख होते. ती रसिकांसाठीही पर्वणी असते. यापुढील काळातही हा प्रवाह आणखी रुंद आणि वैविध्यपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.  

आयुक्त हरवले आहेत...!

डॉ. निपुणजी रुसू नका, चंदीगडचे काम संपताच तत्काळ परत या...

नाव डॉ. विनायक निपुण. उंची अंदाजे ५ फूट ८ इंच. बांधा दणकट. चेहरा निमुळता. चेहऱ्यावर कायम गंभीर भाव, असे वर्णन असलेले औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त चंदीगड येथे शासकीय कामानिमित्त गेल्याचे सांगण्यात येते. १७ मार्चपर्यंत ते तेथेच राहणार, अशी माहिती महापालिकेच्या परिवारातून दिली जात आहे. मात्र, ते औरंगाबादकरांवर रुसून गेले आहेत आणि तेथून दुसऱ्या शहरात बदली होऊन जाण्याच्या प्रयत्नात आहेत, अशीही चर्चा ऐकिवात येते. पण, १५ लाख औरंगाबादकरांना असे वाऱ्यावर सोडून कसे जाता येईल तुम्हाला?
प्रिय, डॉ. निपुण, तुम्ही कशामुळे रुसलात, हे औरंगाबादकरांना ठावूक झाले आहे. २९ फेब्रुवारीच्या महापालिकेच्या सभेत तुम्ही तुमचा वैताग, त्रागा व्यक्त केला. कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही. पाणीटंचाई वाढत चालली आहे. त्यावर उपाययोजना होत नाही. काही अधिकाऱ्यांच्या तुम्ही वारंवार बदल्या केल्या. म्हणून स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी तुम्हाला १३ मुद्यांचे पत्र दिले. ते वाचून तुम्ही विमनस्क झाला. हेची फळ काय मम तपाला, अशी भावना तुम्ही वहिनीसाहेबांकडेही बोलून दाखवली. आणि मग मनातले सारे काही भडभड बोलून टाकावे, असा विचार करत दोन तास बोललात. औरंगाबाद महापालिकेच्या कारभाराची कीर्ती जगभर पसरल्याने येथे कोणी येत नव्हते. तरीही मी आलो. पालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर येथील कचरा पाहून रात्र रात्र झोप येत नव्हती, असे तुम्ही म्हणालात. आणि मग हा प्रश्न सोडवण्यासाठी नऊ महिन्यांच्या कारकीर्दीत काय केले, त्याचा तपशील सभेला ऐकवला. ते सारे ऐकून महापौरांसह सारे पदाधिकारी, नगरसेवक गहिवरून जातील. तुमची तळमळ समजून घेत तुम्हाला खरंच मनापासून सहकार्य करू लागतील, अशी तुमची अपेक्षा होती. पण यापूर्वीच्या सर्वच आयुक्तांशी ही मंडळी जशी वागली, तशीच तुमच्याशीही वागली. ‘हो...हो...सहकार्य करू ना.’ असे म्हणाली. प्रत्यक्षात काही केले नाही. मुख्य म्हणजे ज्या वैद्यांच्या पत्रावरून तुम्ही एवढे बोलतात तेच त्या दिवशी सभेत नव्हते. उलट त्यांनी आणखी एक पत्र देण्याची तयारी सुरू केली. त्यातच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांनी तुमच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. म्हणून तुमचा वैताग अधिकच वाढला. आणि मग रागाच्या म्हणा किंवा संतापाच्या भरात म्हणा, तुम्ही तातडीने चंदीगडचा रस्ता धरला.
पण साहेब, घरातील एक माणूस असं काही बोलला किंवा त्यानं पत्र लिहिलं तर कोणी असं नाराज होऊन घर सोडून जातं का? घर म्हटलं की चार प्रकारचे लोक असणार. महापालिकेत तर सगळ्याच पत्रांमागे एक ‘अर्थ’ असतो. तो समजून घेतला की कामाचा आनंद अनेक टक्क्यांनी वाढतो. बरं, जी मंडळी तुम्हाला त्रास देतात. त्यांना धडा शिकवण्याचे अनेक मार्ग तुमच्याकडे आहेत. ते तु्म्ही वापरत नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत. कठोर निर्णय घ्या. टक्केवारीत बुडालेल्यांना उचलून बाहेर फेका असं ‘दिव्य मराठी’ने १५ लाख औरंगाबादकरांच्या वतीने तुम्हाला वारंवार सांगितले. पण तुम्ही आम्हालाही विश्वासात न घेता बॅग भरली आणि अचानक निघून गेलात. खरं तर मुख्यमंत्ऱ्यांनी भरघोस निधी देऊन तुमच्यावर किती विश्वासाने आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली. रस्त्यांसाठीही पैसा दिला. समांतर जलवाहिनीचा पेच सोडवण्यासाठी दोन पावलेही उचलली. आता औरंगाबादकर तुमच्याकडे आशेने बघत आहेत, याचा कळकळीने विचार करा.
तुम्हाला कोणीही, काहीही बोलणार नाही. रागावणार नाही. पत्र देणाऱ्यांनाही आम्ही रोखून धरू. सुनिल केंद्रेकर यांच्याशी चर्चा करून तुम्हाला कार्यपद्धतीत काही सुधारणाही करता आल्या तर नक्की करा. या शहराला निपुण अधिकाऱ्यांची गरज आहे. म्हणून रुसवा सोडा आणि चंदीगडचे काम संपताच औरंगाबादेत दाखल व्हा.