Thursday 29 November 2018

निखळ आनंदासह टोचणारा इतिहास

पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृती म्हणजे महाराष्ट्राचे भूषण मानले जाते. तब्बल पाच दशके पुलंचे लेखन, कथाकथन मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करत आले. आणि अजूनही त्याचा प्रभाव कायम आहे. त्यांच्या शब्दांत दडलेला निखळ विनोद आजही खळखळून हसवतो. पण तो केवळ हसवण्यापुरताच राहत नाही तर आणि हसवता हसवता गंभीरही करून टाकतो. आपण मराठी माणसं खरंच एवढी मोठ्या मनाची, महान परंपरेचा वारसा सांगण्याच्या लायकीची आहोत का? परस्परांच्या सुखात आपल्याला खरेच सुख वाटते का? दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले पाहिजे, असे आपल्याला फक्त वाटते. पण आपण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीच करत नाही. एवढेच नव्हे तर महान संत, राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा वारसाही आपल्याला पुरेसा माहिती नाही. मग तो आचरणात आणणे तर केव्हाच मागे पडले आहे, असं बरंच काही ‘पुल’ नकळत उपस्थित करतात. तेव्हा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याचे लक्षात येते. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे मुकेश माचकर यांनी नाट्य रुपांतरित आणि मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेला ‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ हा दीर्घांक. दिव्य मराठी आयोजित दिव्य मराठी लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये या दीर्घांकाचा प्रयोग झाला. त्याचे साक्षीदार असलेले सारेच प्रेक्षक तासभर मनमुराद हसले. शब्दांच्या कोट्यांतील ताकद त्यांनी अनुभवली आणि अखेरच्या क्षणाला प्रत्येकजण अनेक प्रश्नांनी अंर्तमुख झाला. निखळ विनोद इतकी गंभीर टोचणीही देऊ शकतो, याचा अनुभव आला.

मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या पुस्तकात पुल देशपांडेंनी जे अधोरेखित केले ते नाटकाच्या रुपात मंचावर आणणे तसे कठीणच. आणि अलिकडच्या अति संवेदनशील काळात तर अधिकच. कलावंतांच्या प्रत्येक शब्दाला, वाक्याला जाती-धर्माचे संदर्भ देऊन त्यावर हल्ला करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मराठी माणसाच्या चेहऱ्यावरील बुरखे महान संतांचा संदर्भ देऊन फाडणे म्हणजे नव्या वादाला तोंड फोडणे आणि प्रयोगावर बंदी लादून घेण्यासारखेच आहे. पण माचकरांनी हे आव्हान खूपच शिताफीने पेलले आहे. पुलंना अपेक्षित असलेला संदेश त्यातील पंच अजिबात क्षीण होऊ न देता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. मराठी वाङ्मयाविषयी ओ की ढो माहिती नसलेली शाळकरी मुले आणि त्यांना महान मराठी संतांचे कार्य कळावे, यासाठी धडपडणारे त्यांचे शिक्षक अशी मांडणी त्यांनी केली आहे. प्रत्येक पात्र ठाशीव, आखीव, रेखीव आणि परिणामकारक केले आहे. त्यामुळे एकच धमाल उडते. दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनीही संहितेला पूर्ण न्याय दिला आहे. पुलंच्या कसदार लेखणीतून आलेला प्रहसनात्मक सूर त्यांनी अचूक पकडला आणि तो कलावंतांकडून आविष्कृत करून घेतला आहे. तासभर चालणारा हा दीर्घांक कुठेही एकसूरी होणार नाही. रंगमंच हलता, खळाळता राहिल. सर्व कलावंतांचे संवाद प्रवाही राहतील. त्यांच्यातील कुरघोडींचा अतिरेक होणार नाही, यासाठी पूर्ण मेहनत घेतल्याचे क्षणोक्षणी जाणवत राहते. अक्षय शिंपी, किरण राजपूत, दिपिंती भोबसकर, अक्षय पाटील, शिरीष बागवे, प्रियपाल गायकवाड यांनीही भूमिकांत जीव ओतला आहे. आपण एका महान लेखकाची कलाकृती सादर करत आहोत. त्यात कोणतीही कसर राहता कामा नये आणि अभिनयाच्या नादात त्यातील अर्थाचा अनर्थ होऊ नये, याचे भान साऱ्यांनीच पाळले. सिद्धार्थ साळवींचे नेपथ्य, महेश गुरव यांचे संगीत संयोजन, सागर नाईक यांची प्रकाशयोजना सारेच परिणामकारक असल्याने गाळीव इतिहास दीर्घकाळ स्मरणात राहिल असा झाला.

आता थोडेसे स्थानिक संदर्भात. पुल देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने मुकेश माचकर यांनी हे नाट्य रुपांतर केले आणि मंगेश सातपुतेंच्या दिग्दर्शनात त्याचे प्रयोगही सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग आहे. सरस्वती भुवन, देवगिरी महाविद्यालयातही नाट्यशास्त्र आहे. तेथील तरुण लेखक - दिग्दर्शक पुलंच्या साहित्यकृतीवर एखादा दीर्घांक नक्कीच करू शकतात. ते करणे शक्य नसेल तर साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यात, नारायण सुर्वेंच्या कवितांत, प्रा. रुस्तुम अचलखांब यांच्या आत्मकथनात उत्तम नाटकाची बीजे आहेत. त्यातील एखादे फुलले तर मराठवाड्यातील कलावंतांचा प्रयोग राज्यभरात गाजेल. त्याचा आनंद काही औरच असेल.