Wednesday 20 January 2016

यांचेच रुप, यांचेच सोंग



--

नगरसेवकांनी मिळून ठरवून दिलेले कर वसुलीचे उद्दिष्ट गाठले जाणार नाही. त्यामुळे अनेक नियोजित कामे रद्द करावी लागणार, असा महापौर त्र्यंबक तुपे, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांना अंदाज आला म्हणे. त्यामुळे त्यांनी तातडीने काय केले तर आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना एक पत्र लिहून टाकले. त्यात केेंद्रेकरांना टोचेल अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. आता पुढील काही दिवसांत नाराजीचा सूर प्रत्येक नगरसेवक आणि छोट्या-मोठ्या पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादकरांना ऐकण्यास मिळणार आहे. मार्च अखेरीस तो टिपेला जाऊन पोहोचेल आणि ७०-८० कोटींची कामे रद्द करावी लागली किंवा प्रलंबित ठेवावी लागली. आता ती पुढील वर्षात नक्कीच केली जातील, असे आश्वासन मिळेल. रुपही यांचेच आणि सोंगही यांचेच अशातील हा प्रकार आहे. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये विकास कामे एवढा एकच शब्द ऐकायला मिळतो किंवा ऐकवला जातो. औरंगाबाद महापालिकाही त्याला अपवाद नाही. सरकारी खाक्यानुसार ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपते. त्यामुळे जानेवारी ते मार्च हे तीन महिने कराची वसुली करणे आणि त्या आधारे तिजोरीत जमा होऊ शकणाऱ्या रकमेच्या आधारे कामे मार्गी लावण्याचे असतात. खरे तर वर्षभराच्या वसुली आणि कामाचे नियोजन व त्या आधारे अंमलबजावणी अर्थसंकल्प मंजूर होताच करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात तसे कधीच होत नाही. त्या मागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्वाचे आणि संपूर्ण शहराचा घात करणारे कारण म्हणजे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम नगरसेवक आणि अभियंत्यांनी परस्पर समन्वयातून तयार करायचे असते. त्यासाठी वॉर्डाचा आणि तिजोरीत येऊ शकणाऱ्या रकमेचा ताळमेळ साधायचा असतो. लोकांसाठी सर्वात महत्वाचे काम कोणते, याचा अंदाज बांधूनच ते अर्थसंकल्पात समाविष्ट करायचे असते, याचा नगरसेवकांना विसर पडला आहे अथवा त्यांना माहिती नाही. त्यामुळे ते त्यांना वाटेल ती कामे झालीच पाहिजे, असा आग्रह धरतात. अभियंत्यांनाही सर्व नगरसेवकांच्या डोक्याशी डोके लावणे शक्य नसते. म्हणून ते नगरसेवकाकडून आलेले प्रत्येक काम नोंदवून टाकतात. लेखा विभागाचे अधिकारी काही प्रमाणात त्यातील खरीच महत्वाची किंवा करण्याजोगी कामे कोणती, हे तपासण्याच्या फंदात पडत नाहीत. नगरसेवक आणि अभियंते म्हणतात तर आपल्याला काय करायचे, असे म्हणत अर्थसंकल्प तयार होतो. त्याचा ताण आयुक्तपदाच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याला होतो. रोष पत्करण्याची तयारी ठेवत तो काही कामांना कात्री लावतो आणि कर वसुलीचे उद्दिष्टही निश्चित करतो. जेवढा कर जमा होईल. त्याच प्रमाणात कामे होतील, अशी काळजी घेतली जाते. मात्र, हा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत येताच गोंधळाला, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात होते. स्थायीचे सदस्य एवढी कमी कामे कशी? आमच्या वॉर्डातील लोकांना आम्ही काय उत्तर देणार? असा प्रश्न उपस्थित करतात. कामे अर्थसंकल्पात टाकण्यासाठी कर वसुलीचे उद्दिष्ट वाढवण्याचा आग्रह धरतात. अनेक मालमत्तांना कर लागलेला नाही. अवैध नळजोडणी सुरूच आहे. एकाच आकाराच्या दोन घरांना वेगवेगळे कर लागले आहेत, त्याची चौकशी करावी. वादात अडकलेल्या मालमत्ता कर आकारणीसाठी लवाद स्थापन झालाच पाहिजे, अशी मागणी करतात. मग स्थायी समिती सभापती कर वसुलीचे उद्दिष्ट वाढवून विकास कामेही वाढवून टाकतात. असाच प्रकार सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प आल्यावरही होतो. तेथे फक्त सभापतींची जागा महापौरांनी घेतलेली असते. सत्ताधारी पक्षाच्या त्यातही महापौरांच्या आणि काही नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या मर्जीतील नगरसेवकांना खुश केले जाते. एकदा हे झाले की, जवळपास सहा महिने कुणीही कर वसुलीकडे ढुंकूनही पाहत नाही. थेट जानेवारीतच आरडाओरड सुरू होते. त्याचा फारसा उपयोग होत नाही. मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्याची सवय झाल्यामुळे महापौर, आयुक्तांनी कितीही बैठका घेतल्या. नोटिसा बजावल्या तरीही तिजोरीची परिस्थिती जैसे थे राहते.महत्वाचे म्हणजे जानेवारीनंतर जेव्हा कर गोळा करण्याच्या मोहीमा आखल्या जातात तेव्हा त्यात अडथळा आणण्याचे वेळप्रसंगी मोहीम रोखण्याचे काम नगरसेवक किंवा त्यांचे कार्यकर्ते करतात. आमच्याच भागात कशाला येता. दुसरीकडे जाता येत नाही का, असे म्हणत मोहीमेला जातीयवादी वळणही दिले जाते. त्याची अखेर कामे रद्द करण्यात होते. असे दुष्टचक्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. ते मोडण्यासाठी कोणतेही प्रामाणिक प्रयत्न झालेले नाहीत. कारण महापालिकेचा कारभार पाहणाऱ्यांना फक्त लोकप्रिय निर्णय घ्यायचे आहेत. अर्थात निर्णय घेण्यात काहीच गैर नाही. अडचण आहे ती निर्णयाच्या अंमलबजावणीची. फक्त घोषणा करायच्या आणि नंतर पैशाअभावी काम होत नाही, असे सांगून प्रशासनावर खापर फोडायचे, असा प्रकार केला जातो. कर वसुली वाढवण्यासाठी काहीतरी सुरू असल्याचे दाखवले जाते. मात्र, त्यातूनही कमाई करण्याचा हेतू ठेवला जातो. २००४ मध्ये कर आकारणी नसलेल्या मालमत्ता शोधण्यासाठी हैदराबाद येथील स्पेक संस्थेला ठेका देण्यात आला. यातून तिजोरीत ३० कोटी रुपये वाढतील, असे सांगण्यात आले. प्रारंभी स्पेकचे काम समाधानकारक वाटले. नंतर ते कमालीचे बिघडले. स्पेकच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेचे कर्मचारी करतात तशीच कर आकारणीतून वसुली सुरू केली. कर कमी लावायचा असेल तर पैसे मागण्याच्या घटना वाढू लागल्या. ज्यांनी स्पेकची नियुक्ती केली. त्यांनीच आरोपांच्या फैरी झाडल्या अन्् अखेर स्पेकचे काम बंद झाले. कर नसलेल्या मालमत्ता शोधून त्यातून ३० कोटी वाढणे तर दूरच राहिले. उलट महापालिकेच्या तिजोरीतील ६ कोटी रुपये स्पेकला दिले गेले. सांगण्याचे तात्पर्य हेच की जी मंडळी शहराचे रुप बदलण्याचे दावे करतात तेच अमुक एकामुळे रुप बदलणे शक्य नसल्याचे सोंगही अप्रतिमरित्या वठवतात. त्यांच्या सोंगाकडे किती गांभीर्याने पाहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.





Tuesday 12 January 2016

भक्षक : सुन्न करणारा अनुभव




 पडदा उघडल्यानंतर पहिल्याच सेकंदापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावेल. आणि पडदा पडल्यावर त्यातील अाशय, विषय आणि मांडणीच्या शैलीवर किमान दोन-तीन वेळा विचार करायला भाग पाडेल, अशा नाट्यकृती दुर्मिळच. एकांकिकांचा कालावधी कमी असल्याने  अशा गोळीबंद सादरीकरणाची शक्यता त्यात जास्त असते. तरी ती प्रत्येक संहितेत साधली जातेच असे नाही. अनेक एकांकिकांचा प्रारंभ आणि शेवट जोरकस असतो. पण मधले काही प्रसंग तणाव निवळून टाकणारे असतात. सध्या अनेक राज्य नाट्य स्पर्धांमध्ये क्रमांक पटकावणाऱ्या भक्षक एकांकिकेत विलक्षण तणाव आणि वेग आहे. प्रत्येक वाक्य, एकूणएक हालचाली विषयाला आणखी खोलवर घेऊन जाणाऱ्या अन्् सुन्न करत अर्थ प्राप्त करून देणाऱ्या आहेत.

दोन किंवा तीन अंकी नाटक, दीर्घांक आणि एकांकिका अशा तीन प्रकारात नाट्यानुभव घेता येतो. मराठी रंगभूमीचा इतिहास थोडासा चाळून पाहिला. तर त्यातील काळानुरूप प्रवाह अतिशय ठळकपणे लक्षात येतात. प्रारंभी पौराणिक, मग ऐतिहासिक, संगीत, कौटुंबिक, विनोदी अशा नाटकांचा बोलबाला होता. सामाजिक स्थित्यंतरे, उपेक्षित वर्गाचा आवाज नाटककारांच्या बोलण्यात नव्हता. मग तो संहितेत अवतरण्याची शक्यताच नव्हती. राज्य नाट्य, कामगार नाट्य स्पर्धांच्या निमित्ताने तो १९७० च्या दशकात येऊ लागला असला तरी त्यात टोकदारपणा नव्हता. विषयांचे वैविध्यही खूप अस्वस्थ होऊन जावे, असे नव्हते. असले तरी त्याचे वर्तुळ मुंबई, पुणे इतपतच होते. ते तोडले एकांकिका स्पर्धांनी.  दोन अंकी नाटक कौटुंबिक, विनोदात फिरत असताना एकांकिकांनी अक्षरश: जागतिक पातळीवरच्या मुद्यांना हात घातला. त्यांची कसदार मांडणीही केली. प्रश्नाला थेट भिडणारा, समाजमनाला भेडसावणारा, आक्रमक पद्धतीने मांडला जाणारा विषय ही स्पर्धात्मक एकांकिकेची वैशिष्ट्ये. अर्थात एकांकिका म्हणजे फक्त स्पर्धा असेच समीकरण असल्याने स्पर्धेेच्या पलिकडे त्यांचे सादरीकरण अपवादात्मक स्थितीतच होते. त्यावेळीही त्या एकांकिकेतील ताकद लक्षात आल्याशिवाय राहत नाही.  स्पर्धेच्या मंचापलिकडे अवतरित होणारी एकांकिका पकडून, जखडून ठेवणारी असते. विचार करण्यास भाग पाडणारीच असते. त्यात जर तरी स्पर्धांमध्ये यश मि‌ळवलेली असेल तर त्यातील अस्सलपणा अधिकच उजळदार असतो.  रविवारी प्रा. कुमार देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त तापडिया नाट्य मंदिरात झालेल्या ‘भक्षक’ या रावसाहेब गजमल लिखित, दिग्दर्शित एकांकिकेने असाच अनुभव रसिकांना मिळवून िदला.  

शहरीकरणामुळे जंगलांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बिबटे, वाघ शहरात येऊ लागले आहेत. आणि माणूस नावाचा क्रूर प्राणी शहरातही त्यांच्यावर हल्ले करत आहे. असे अनेक प्रसंग अलिकडच्या काळात वारंवार घडत आहेत. जिवाच्या भयाने नागरी वस्तीत घुसणाऱ्या प्राण्यांना भक्षक म्हटले जात आहे. पण वस्तुस्थिती काय आहे? याबद्दल गजमल यांनी ‘भक्षक’मध्ये सुसंस्कृत मनाच्या आरपार जाईल, असे टोकदार भाष्य ‘तुम्ही (शहरातील लोक) जंगल नष्ट करत चालतात. अन्् तिथले प्राणी आमच्या वस्त्यात येऊ लागलेत.’ असे दोनच वाक्यात स्पष्ट केले आहे. जंगल विरुद्ध माणूस आणि शहरी माणूस विरुद्ध ग्रामीण माणूस असा दुहेरी संघर्ष त्यांनी मांडला आहे. शहराजवळच्या एका वस्तीत बिबट्या शिरतो. त्यापासून बचाव करण्यासाठी गावकरी मंडळी त्याच्यावर हल्ला करण्याचे ठरवतात. मोठी शोध मोहीम राबवतात. पण बिबट्या त्यांच्या तावडीतून निसटून वस्तीत पोहोचतो. तिथे नजरचुकीने एक बाळ राहिलेले असते. बिबट्या त्याच्याजवळ पोहोचतो. पण बाळाला  काहीही करत नाही. त्याला शोधणारी माणसे मात्र त्याला चहुबाजूंनी वेढा घालतात अन्् त्याचा खात्मा करतात. एक संकट टळले असे वाटत असतानाच आणखी एका बिबट्याची गुरगुर कानावर पडू लागते. ती सुरू असतानाच रंगमंचावर पडदा पडू लागतो. मात्र, विचारांचे पडदे उघडले जातात.  आधीच म्हटल्याप्रमाणे एका ओळीचा विषय गजमल यांनी ज्या ताकदीने लेखणीत उतरवला त्यापेक्षाही जास्त परिणामकारकरित्या दिग्दर्शन केले आहे. कथानकाला वेग देताना त्यात शब्द कमी आणि हालचाली वेगवान असे तंत्र त्यांनी ठेवले. प्रत्येक व्यक्तिरेखा बोलकी केली. केवळ बोलकीच केली नाही तर त्याच्या चेहऱ्यावरील रेष न रेष सभागृहातील प्रत्येक प्रेक्षकाला लक्षात येईल, इतपत मेहनत करून घेतली आहे. संगीत, प्रकाश योजना भक्षकमध्ये एखाद्या भूमिकेसारख्या आहेत. त्यामागेही दिग्दर्शकाची कल्पकताच आहे. रावसाहेब यांचे आणखी एक कौतुक म्हणजे त्यांनी बिबट्याही साकारला. एकही संवाद नाही. केवळ चेहऱ्यावरील भाव, हालचालींमधून त्यांनी काळजाचा थरकाप करणारा अन्् अखेरच्या क्षणाला काळीज थरथरून टाकणारा बिबट्या जिवंत केला. फक्त रात्रीच्या वेळेस बिबट्याचा शोध घेत असणाऱ्या गावकऱ्यांच्या हातात विजेरी (टॉर्च) दिला पाहिजे. रावसाहेब यांना पुढील सादरीकरणात तेवढा बदल करता येईल. रत्नदीप वावले (अप्पा), अर्जुन टाकरस (बापू), बाळू बटुले (परभ्या), अभिजित वाघमारे (बाब्या), चंद्रकांत हिवाळे (गोप्या), प्रवीण गायकवाड (नाम्या), नारायण पवार (सख्या), भाग्यश्री हिरादेवे (वहिनी) हे सारे कलावंत खरेखुरे गावकरीच वाटत होते. एवढी त्यांची भूमिकेतील एकरुपता होती. रामेश्वर देवरेंचे नेपथ्य, कविता दिवेकरांची रंगभूषा, अस्लम शेखची वेशभूषा संहितेला उंचीवर नेणारी. चेतन ढवळे यांची प्रकाश योजना, अनिल बडेंचे संगीत अतिशय परिमाणकारक. गेल्या काही वर्षात मराठवाड्यात नवे लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत उदयास येत आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा वाढत आहेत. त्याचे ओझे न बाळगता त्यांनी वाटचाल सुरूच ठेवावी. त्यातूूनच मराठवाड्यातील रंगभूमीच्या यशाचा आलेख उंचावत जाणार आहे.


Wednesday 6 January 2016

लोकशक्तीचा साधुनी मोका पाडून टाका जुनी इमारत

लोकशक्तीचा साधुनी मोका

पाडून टाका जुनी इमारत

--

कुणी म्हणतात की, औरंगाबाद शहराला चांगले नेतृत्व नाही म्हणून येथे विकास होत नाही. कुणी म्हणतात की, नेतृत्व चांगले आहे. पण या नेतृत्वाला साथ मिळत नाही. असेही म्हटले जाते की, नेते मंडळींना विकासाची दृष्टीच नाही. कुणी म्हणतात की, जातीय समीकरणामुळे विकास होत नाही. कुणी म्हणतात की, आतापर्यंत केंद्रात, राज्यात वेगळे आणि महापालिकेत वेगळ्या पक्षाचे सरकार असल्याने विकासाचे गाडे अडकून पडले. कोणतेच महत्वाचे निर्णय होऊ शकले नाही. कुणी असेही म्हणतात की, लोकांनाच विकासापेक्षा जातीवाद महत्वाचा वाटतो. म्हणून राजकारणी मंडळी त्याचाच वापर करतात. या साऱ्यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच. त्यात फक्त आणखी एक मुद्दा समाविष्ट करावा लागेल. तो म्हणजे स्वत:ला  नेता म्हणवून घेणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि लोकांच्या हिताचा निर्णय नेमका कोणता आणि तो एकदा घेतल्यावर पूर्ण ताकदीने अंमलात आणण्याची त्यांच्यात क्षमताच नाही. सातारा-देवळाईकरांचे जे हाल सध्या सुरू आहेत. ते पाहता हा मुद्दा खूपच प्रकर्षाने लक्षात येतो. सातारकरांना राजकारण्यांनी नदीच्या पल्याड नेण्यासाठी बोटीत बसवले. त्यांच्याकडून पैसे वसूल केले. पण नाव नदीच्या पात्रात नेऊन सोडून दिली. लोकांनी आरडाओरड केल्यावर पुन्हा बोट अलिकडच्या तीरावर आणून ठेवली. अरेच्या असे कसे केले. तुम्ही तर आम्हाला पलिकडे नेऊन सोडणार होतात, असे म्हटल्यावर पुन्हा नावेत बसवले. पलिकडचा तीर दाखवला आणि पुन्हा बोट अलिकडे घेऊन आले. असे हेलकावे सध्या सातारा-देवळाईतील ७० हजार नागरिक घेत आहेत. १९९० नंतर औरंगाबादेत रिकाम्या भूखंड आणि घरांच्या किमती बेसुमार वाढू लागल्या. त्यामुळे मध्यमवर्गीयांनी शांत, निवांत अन्् निसर्गाच्या कुशीत दडलेल्या साताऱ्याकडे लक्ष वळवले. पाहता पाहता तेथे सिमेंट काँक्रिटचे जंगल झाले. ते पाहून बिल्डरही तिकडे गेले. अन्् भट्टी बिघडली. जमिनीच्या पोटातील पाण्याचा बेसुमार उपसा करताना पावसाचे पाणी जमिनीत पुन्हा मुरवण्याचा िवचारही तेथे राहणाऱ्या शहाण्या मंडळींनी केला नाही. अर्थात यामुळे बांधकामांचा वेग कमी झाला असला तरी थांबला नाही. टँकरच्या पाण्याने तहान भागवणे सुरू झाले. हे सारे होत असताना २००४ मध्ये महापालिकेच्या हद्दीत सातारा-देवळाई घेण्याचा विचार सुरू झाला. पण आधी सिडको मग बाकीचे असे म्हणत तो विचार थांबवला गेला. खरेतर मनपाकडे असलेल्या १८ खेड्यांनाही नीटपणे न्याय देऊ न शकणाऱ्या महापालिकेने साताऱ्याकडे पाहण्याची गरजच नव्हती. पण तेथे नियम पायदळी तुडवून सुरू असलेली टोलेजंग बांधकामे जमीनदोस्त करण्याचे २०१४ मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ठरवताच बिल्डर लॉबी आणि त्यांचे पालक नेते सक्रिय झाले. त्यांनी १४ फेब्रुवारी २०१४ रोजी नगरपरिषद करण्याची अधिसूचना काढली. २८ ऑगस्टला नगरपरिषद जाहीर झाली. १ जानेवारी २०१५ रोजी वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. अतिरिक्त बांधकाम विरोधी मोहीम थंडावली. आणि ३ फेब्रुवारी रोजी मनपा हद्दीत सातारा देवळाई घेण्याचा प्रस्ताव मनपा सभेत मंजूर करण्यात आला. त्याविरुद्ध काही नेते न्यायालयात धावले. आठ ऑक्टोबरला नगरपरिषद बरखास्तीची अधिसूचना निघाली. १ जानेवारी २०१६ रोजी मनपा आयुक्तांनी महसूल विभागाकडे सातारा-देवळाई सुपूर्द करून टाकली. महापालिकेत कोणताही भाग समाविष्ट  झाला तर त्याचा कासवगतीने का होईना लोकांना फायदा होतोच. पण ही बाब स्थानिक नेत्यांना मान्य नसावी. मुख्य म्हणजे त्यांना ती पूर्णपणे अमान्य आहे, असेही नाही.  पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, माजी महापौर डॉ. भागवत कराड, माजी उपमहापौर संजय जोशी, भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे, शिरीष बोराळकर, काँग्रेसचे फेरोज पटेल, राष्ट्रवादीचे काशीनाथ कोकाटे, भाजपचे विनायक हिवाळे या आणि यांच्यासह प्रत्येक नेत्याचे मत कधी नगरपरिषद तर कधी महापालिकेच्या बाजूने असल्याने प्रत्येकाने लोक बसलेली नाव त्यांना वाटेल त्या दिशेने हाकायला सुरुवात केली. त्यात बिल्डरांची अनधिकृत बांधकामे थांबण्यापलिकडे काहीही झाले नाही. रस्ते, पाणी, वीज, सफाई, ड्रेनेज सारख्या अत्यावश्यक सुविधांची वाट लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कदमांनी थांबवले. कदमांनी काही करायचे म्हटले तर भाजपने त्यात खोट काढली. अतुल सावे खरे तर खंबीर नेते म्हणून परिचित आहेत. त्यामुळे त्यांनी सातारा-देवळाईविषयी एकच ठाम भूमिका घेऊन ती अखेरपर्यंत लावून धरणे अपेक्षित होते. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही युतीचे सरकार असल्याने त्यांना ते घेतील तो निर्णय अमलात आणण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. हेच कदम, खैरे आणि शिरसाट यांच्याबद्दलही म्हणता येईल. मात्र, या साऱ्या नेते मंडळींनी आणि स्वत:ला नेते म्हणवून घेणाऱ्या इतरांनी नागरिकांच्या भावनांशी खेळ चालवला आहे. तो थांबवण्याची आणि नेत्यांना जाब ताकद फक्त सातारकरांमध्येच आहे. बोटीत बसवून फक्त फेऱ्या मारणाऱ्या नावाड्यांच्या हातातील वल्हे ते सहजपणे हिसकावून घेऊ शकतात. शाहीर अमर शेख त्यांच्या कवितेत म्हणतात,

जुनाट इमला झाला सारा

पाडून टाका देऊन धक्का

आज इमारत जुनाट झाली

जीव अकारण मरतील खाली

म्हणूनी आधी पाडुनी टाका

देऊनी धक्का

मारा हाका जमवा लोका

लोकशक्तीचा साधुनी मोका

पाडून टाका आणिक बांधा नवी इमारत.

अमर शेख यांच्या आवाहनानुसार नेत्यांच्या दिशेने अशी पावले उचलण्याची सातारकरांची इच्छा आहे काय? ती त्यांनी व्यक्त केली तरी नेते मंडळी नक्कीच ताळ्यावर येतील.