Tuesday 28 September 2021

धरतीमातेच्या डॉ. धिर्ती

प्रा. डॉ. इश्तियाक अहमद प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि राजकीय घडामोडींचे परखड अभ्यासक. ते मूळ पाकिस्तानी. पण स्वीडनच्या विद्यापीठात विभागप्रमुखपदी दीर्घकाळ काम केले. तेथेच स्थायिक झाले. त्यांनी भारतीय उपखंडाचा इतिहास मुस्लिम, इस्लाम या अंगाने अत्यंत बारकाईने अभ्यासला आहे. त्यांची अनेक पुस्तके कमालीची वाचकप्रिय आहेत. मोहंमदअली जिना यांच्याविषयी त्यांनी अलिकडील काळात काही नवीन विधाने केली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळाचे ते साक्षीदार असल्याने त्यांच्या लेखनात, व्याख्यानांमध्ये अनेकवेळा भारताची जडणघडण, हिंदू समाज, हिंदुत्ववादी विचारसरणीचा उल्लेख येतो. अशाच एका व्याखान मालिकेत हिंदूधर्मियांतील सामाजिक सुधारणा या विषयावर बोलताना त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, रॉय यांनी त्या काळात म्हणजे १८२०च्या दशकात हिंदू समाजातील वाईट गोष्टी, रुढी मोडीत काढण्याचा चंगच बांधला होता. महिलांना त्यांचे जीवन त्यांच्या इच्छेनुसार जगता आले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच सतीच्या प्रथेविरुद्ध त्यांनी अक्षरश: रान पेटवले होते. इंग्रजांकडे पाठपुरावा करून त्यांनी ती प्रथा कायद्याने बंद केली. दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. अन्यथा हिंदू धर्मातील इतर अनेक अनिष्ट गोष्टी त्यांनी त्या काळातच संपवल्या असत्या. किंवा त्या दिशेने हिंदूना वाटचाल करण्यास भाग पाडले असते, एवढी त्यांची त्या काळात ताकद होती. असे सांगून डॉ. इश्तियाक अहमद किंचित थबकले आणि म्हणाले, अर्थात कोणताही समाज नवे बदल सहजासहजी स्वीकारत नाहीच. काही वेळा तर छोट्या बदलांसाठीही त्यासाठी खूप वर्षे वाट पाहावी लागते. जिद्दीने पाठपुरावा करावा लागतो. तशी खंबीर, कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे जन्माला यावी लागतात. डॉ. इश्तियाक यांचे हे म्हणणे किती सत्य आहे, असे सांगणारी घटना गेल्या महिन्यात घडली. १०५ वर्षे जुन्या झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेच्या संचालकपदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती झाली. त्यांचे नाव आहे डॉ. धिर्ती बॅनर्जी. विशेष म्हणजे त्याही राजा राममोहन रॉय यांच्या पश्चिम बंगालमधील आहेत. निसर्ग, धरतीमातेवर निरातिशय प्रेम असलेल्या डॉ. धिर्ती यांचा प्राण्यांचा अधिवास, वर्गीकरण, आकारमान या विषयात गाढा अभ्यास आहे. जंगलातील विविध प्राण्यांचे राहण्याचे क्षेत्र ठरलेले असते. ते क्वचितच क्षेत्र ओलांडतात. त्या मागे नेमकी काय कारणे असू शकतात. हे प्राणी पुढे कुठल्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात, याची सखोल माहिती त्यांच्याकडे आहे. झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही अर्थातच इंग्रजांनी भारताला दिलेली एक देणगी आहे, असे म्हणावे लागेल. विपुल निसर्गसंपत्ती आणि हजारो प्रकारच्या प्राणी, श्वापदांचा अभ्यास करणे. त्यांची नोंद ठेवणे यासाठी ही संस्था १९१६ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. संस्थेची १६ विभागीय केंद्रे असून पर्यावरण, वन आणि पर्यावरण बदल मंत्रालयांतर्गत ही संस्था काम करते. येथे सुमारे ३०० संशोधक आहेत. डॉ. धित्री या पहिल्या महिला संचालक असल्या तरी या संस्थेत काम करणाऱ्या पहिल्या महिलेचा मान १९४९ मध्ये मीरा मनसुखानी यांच्या नावावर आहे. डॉ. धिर्ती बॅनर्जी १९९०मध्ये झुऑलॉजिकल सर्वेमध्ये दाखल झाल्या. त्यावेळी महिला संशोधकांचे प्रमाण २४ टक्के होते. आता ते ४० टक्क्यांपर्यंत गेले आहे. डॉ. धिर्तींनी भारतातील सर्व जंगले पादाक्रांत केली आहेत. व्याघ्रारण्यांमध्ये भटकंती केली आहे. आणखी एक वेगळी गोष्ट त्यांच्यात आहे. ती म्हणजे किटक, माशांविषयी त्यांचा अभ्यास आहे. कोणताही प्राणी मरण पावला की, त्यावर विशिष्ट प्रकारच्या माशा घोंघावू लागतात. अशा माशा पाहून तो प्राणी किती वेळापूर्वी मृत पावला याचा अचूक अंदाज त्या व्यक्त करतात. प्राण्यांकडून मानवाकडे काही जीवघेणे रोग संक्रमित होत असतात. डॉ. धिर्ती यांनी त्याविषयीही संशोधन केले आहे. ते पुढील काळात मानवजातीला उपयुक्त ठरू शकते. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले ते महत्वाचे. त्या म्हणाल्या की, नोकरी आणि कुटुंब यांचा सुरेख समन्वय साधत काम करण्याची नैसर्गिक शक्ती महिलांमध्ये असतेच. पण मला पती, मुले आणि कुटुंबीय, गुरुजनांकडून मोठे पाठबळ मिळाल्याने आवडत्या कामात अधिकाधिक लक्ष घालणे शक्य झाले, असे भाग्य अधिकाधिक महिलांना मिळाले तर भारतीय समाज निश्चित खऱ्या अर्थाने प्रगत होईल.

Friday 24 September 2021

दळणासाठी जाते बदलून काय होईल?

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत मुंबई वगळता प्रभाग म्हणजे बहुसदस्यीय पद्धतीने लोकांना मतदान करायला लावायचे, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांचे निराकरण करणे आणि कामांची एकत्रित जबाबदारी घेणे, हे एका प्रभागात तीन नगरसेवक निवडणूक पद्धतीमुळे सोपे जाते, असे सरकारी कारण पुढे करण्यात आले आहे. पण ते तद्दन गुळगुळीत आहे. खरे म्हणजे बहुसदस्य निवडीमध्ये एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात अनुकूल एकगठ्ठा मतदान करून घेणे शक्य असते. त्यात अपक्षांची कोंडी होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही पक्षाच्या खुल्या प्रवर्गातील कोणत्याही स्थानिक नेत्याला मैदानात उतरण्याची अधिकाधिक संधी मिळते. असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा युक्तीवाद आहे. तो त्यांनी रेटत नेला. आणि इतक्या ताकदीने रेटला की चार वर्षांपूर्वी एक वॉर्ड एक नगरसेवक अशा घोशा लावणाऱ्या शिवसेनेलाही कोलांटउडी घ्यावी लागली. तर राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने काही ठिकाणी बहुसदस्य पद्धतीला विरोध सुरू केला आहे. त्यामुळे या निर्णयाचा अध्यादेश निघून तो कितपत टिकेल, याविषयी शंका आहे. जरी तो टिकला तरी पुन्हा वॉर्डांचे आरक्षण, चतु:सीमा म्हणजे हद्दी ठरवणे यासाठी सारी यंत्रणा जुंपावी लागणार आहे. त्यावर पुन्हा कोर्ट कचेऱ्यांचा फेरा पडणार आहेच. बरे, एवढे सगळे करून महाविकास आघाडी सरकारला जे ध्येय गाठायचे आहे, ते प्रत्येक शहरात शक्य होईलच, याची कोणतीही हमी नाही. कारण प्रभाग असो की एक वॉर्ड एक नगरसेवक पद्धत. त्यात आपल्या कामाचा कोण, हे जनता बऱ्यापैकी ओळखते. त्यामुळे बहुसदस्यीय निवडणुकीचा निर्णय म्हणजे मनासारखे दळण पाहिजे म्हणून ज्वारीऐवजी जाते बदलण्यासारखे वाटते आहे.

Wednesday 15 September 2021

मतदारांचीही लिटमस टेस्ट

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधातील भाजपने खूप ढकलाढकली करून पाहिली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुका शक्य तितक्या दिवस लांबणीवर टाकण्याचा खेळ सुरु झाला होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापुढे त्यांना झुकावेच लागले. निवडणुकांचे वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार सरकारचा नव्हे तर निवडणूक आयोगाचा आहे, अशा शब्दांत न्यायालयाने मार्गदर्शक कानउघाडणी केली. त्यामुळे आपणच ओबीसींचे तारणहर्ते असा आव आणणारे सर्वच राजकीय पक्ष कोंडीत सापडले आहेत. पण ही कोंडी फोडता येणे शक्य नसल्याने त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. कोणतीही निवडणूक म्हटली की, सत्ताधारी आणि विरोधकांच्या आपापली शक्ती जोखून पाहण्याचा एक मार्ग असतो. पण आता ओबीसी आरक्षणाच्या सावटाखाली होणारी ही निवडणूक केवळ शक्ती जोखण्यासोबत सामाजिक समीकरणांची कडवट परीक्षा असेल. राज्यातील मोजक्याच म्हणजे सहा जिल्ह्यांमध्ये मतदान असले तरी पुढील काळात महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण कोणत्या वळणावर जाणार, याची या निवडणुकीत लिटमस टेस्ट होणार आहे. कारण यामध्ये मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जागरूक असणारा मोठा वर्ग सहभागी होत आहे. त्याला ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा एक धारदार कंगोरा आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही या कंगोऱ्याचा आपल्या मतलबासाठी कसा वापर करता येईल, अशा प्रयत्नात आधीपासून आहेत. आता प्रचाराच्या रणधुमाळीत हा वापर अधिक विखारी, विषारी होऊ शकतो. पक्षाचा अधिकृत उमेदवार एक, पडद्याआडचा वेगळा असाही प्रकार होऊ शकतो. जाती - धर्माच्या नावाखाली मतदान ही बाब भारतात अजिबात नवीन नसली तरी तिची व्याप्ती, खोली अशा पद्धतीने वाढणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ही लिटमस टेस्ट फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्यांवर, लोकशाही मार्गानेच होईल, याची जबाबदारी महाराष्ट्रातील सुजाण जनतेलाच घ्यावी लागेल.

Tuesday 14 September 2021

प्रिया ती रजनी

सरकारी यंत्रणा भ्रष्टाचारात नाकापर्यंत बुडालीय. पोलिसांची लाचबाजी, हप्ताखोरी एव्हरेस्ट शिखरापेक्षा उंचीवर पोहोचलीय. प्रत्येक गोष्ट जात, धर्माच्या जात्यात भरडली जातेय. महिलेला कोंडीत पकडून चिणलं जातंय. रुग्णालये लुटीची केंद्रे झालीत. भ्रष्टाचार दुथडी भरून वाहतोय. पण भ्रष्टाचार, भंपकबाजी अचानक अवतरलेली नाहीये. ती अनेक वर्षांपासून अखंडपणे वाहतेय. समाज, संस्कृतीचाच भाग होतेय. कलावंतांच्या नजरेनं पाहिलं तर पूर्वी लेखक मंडळी लोकांचं दु:ख, वेदना मांडण्यासाठी कळकळीनं लेखण्या सरसावत. दिग्दर्शक संहितेला धारदार बनवत. कलावंत भूमिकेत प्राण ओतत. शंभर टक्के धंदेवाईकपणा, दुकानदारी नसल्याने कलाकृतीत सत्व दिसे. त्याचा थोडाफार परिणाम यंत्रणेवर होत होता. १९८५मध्ये दूरदर्शनवर झळकलेली ‘रजनी’ ही मालिका त्याचेच उत्तम उदाहरण. कुठेही अन्याय दिसला तर लोक सरकारी खाबूदारांना रजनीचा धाक दाखवत. अगदी घरा-घरात तिचा बोलबाला होता. कारण ती भूमिका १९८० च्या दशकातील मराठी अभिनेत्री प्रिया तेंडूलकर यांनी अतिशय आसोशीने साकारली होती. त्यांच्या डोळ्यातून जणूकाही ठिणग्या पडत. प्रत्येक संवादातून त्या आपलंच दु:ख, वेदना मांडतायत, असं लोकांना वाटे. छोट्या पडद्यावरील अँग्री यंग वुमन अशी त्यांची ओळख झाली होती. त्यांच्यातील इतर अभिनय पैलूंच्या आविष्काराची शक्यता असताना वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी १९ सप्टेंबर २००२रोजी त्यांनी हे जग सोडले. आता त्यांच्याविषयी सांगण्याचे कारण म्हणजे ओटीटी, बेव सिरीजमधून उदयास येणाऱ्या कलावंतांच्या नव्या पिढीला मागील वारसा सांगितला तर त्यातून ते काही शिकू शकतील. समाजाच्या दायित्वाची जाणिव ठेवतील. कलेतील धंदेवाईकपणा बाजूला ठेवून स्वत:त सत्व निर्माण करण्यासाठी धडपडतील. संघर्षाशिवाय पदरात पडलेलं टिकत नाही, हेही रजनीचे एपिसोड पाहून त्यांच्या लक्षात येईल. भारतीय रंगभूमीला महत्वाचे वळण देणारे विजय तेंडूलकर यांची मुलगी असल्यातरी प्रियांना रजनीची भूमिका सहज मिळाली नाही. लेखक-दिग्दर्शक बासू चटर्जींनी आधी शर्मिला टागोर, मौसमी चटर्जीचा पाठपुरावा केला. दोघींनी नकार दिल्यावर पद्मिनी कोल्हापूरेंची संमती मिळवली. रजनीच्या भूमिकेतील पद्मिनींचे तीन-चार भागही चित्रित झाले. पण त्यापुढे भट्टी बिघडली. कोणीतरी बासुदांना प्रियांचे नाव सुचवले. पण त्यावेळच्या प्रथितयश फोटोग्राफर्सनी तिचा चेहरा चौकोनी आहे. त्यात आकर्षण बिंदूच नाहीत, अशी टिप्पणी केली होती. मात्र, बासुदांनी हो-ना करत, आढेवेढे घेत प्रियांची निवड केली. आणि प्रियांनी इतिहास घडवला. त्यांना चौकोनी चेहऱ्याची म्हणून हिणवणारे फोटोग्राफर त्यांना एका क्लिकसाठी विनवू लागले. जगभरातील मिडिआ मुलाखतीसाठी रांगा लावू लागला. अभिनयाची क्षमता तर लाखोंमध्ये असते. पण त्यातील मोजक्याच लोकांचा अभिनय रसिकांना आवडत असतो. त्यातील एखाद-दुसऱ्यालाच ते डोक्यावर घेतात. यालाच कलावंतांच्या दुनियेत नशिब म्हणतात. नशिब टिकवून ठेवण्याची वाट खडतर असते. रजनीच्या यशापूर्वी प्रियांनी किमान सात-आठ सिनेमे, दहा नाट्यप्रयोगात महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. तरीही त्यांनी एखाद्या शिकाऊ अभिनेत्रीप्रमाणे बासुदांच्या दिग्दर्शनात काम केले. बंडखोर व्यक्तिरेखा साकारत असल्या तरी त्या समंजस व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. बालपणापासून त्यांच्यावर अभिनयाचा संस्कार होत होता. बालवयातच त्यांनी हयवदन नाटकात पहिली भूमिका केली. तेव्हा त्या अभिनेत्री होतील, असा त्यांच्या वडिलांसह अनेकांचा कयास होता. पण कयास चुकवण्याचा आनंद घेणे हा प्रियांचा स्वभाव होता. एखादी गोष्ट शिकायची त्यांना प्रचंड हौस, आवड होती. पण एकदा की ते शिकून झाले. आत्मसात केले की त्यात रमणे, गहिऱ्या पाण्यात उतरणे, त्यातील इतर पैलू शोधणे त्या टाळत. एका ठिकाणी स्थिर राहणे, त्यांना आवडत नव्हते. त्यामुळे आंतरिक उर्मी असूनही त्या चित्रकला शिक्षिका झाल्या नाहीत. पंचतारांकित हॉटेलात नोकरी करताना तेथील महिलांना रात्री-अपरात्री घरी जाताना सुरक्षा रक्षक मिळावा, यासाठी यशस्वी आंदोलन केले. वडिलांसोबत नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी होऊन ‘नर्मदा सरोवर क्या करेगा, सबका सत्यानाश करेगा’, अशा घोषणा दिल्या. काही दिवस हवाई सुंदरी, अर्धवेळ मॉडेलिंग, वृत्त निवेदिकेचे काम केले. त्या नाविन्याचा शोध घेणाऱ्या, कल्पक लेखिकाही होत्या. त्यांची पाच-सहा पुस्तके वाचकप्रिय झाली. या चतुरस्त्र अभिनेत्रीच्या वाटचालीतून नव्या पिढीने काही शिकले. अन्याय, अत्याचाराविरुद्ध खऱ्या तळमळीने आवाज उठवला तरच कलावंत आणि रसिकांमधील नाते अधिक बळकट होईल. होय ना?