Tuesday 27 December 2016

औरंगाबादकरांचे वऱ्हाड थेट परदेशात कधी जाणार?




प्रख्यात अभिनेते आणि गिनीज बुकात नाव नोंदवलेले ‘वऱ्हाड’कार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे नाटक पाहिलेले किंवा ऐकलेले नाही, असा जुन्या पिढीतील मराठी रसिक विरळाच. १९८०-२००० च्या दशकांत वऱ्हाडने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. बबन्या, जानराव, काशीनाथ, बप्पा अशा जवळपास ५२ व्यक्तिरेखा ते रंगमंचावर जिवंत करत होते. ही सारी मंडळी त्या काळी घराघरात पोहोचली होती. ‘वऱ्हाड’च्या लोकप्रियतेमागे प्रा. देशपांडे यांचा उत्तुंग अभिनय तर होताच, शिवाय त्याचे कथानकही मराठी रसिकाला विलक्षण भावले होते. कारण त्यातील बरेचसे प्रसंग त्यांच्या जीवनाशी मिळतेजुळते होते. आणि सर्वात मोठे आकर्षण होते विमान प्रवासाचे. त्या काळात विमानाची फेरी म्हणजे मुंबई, पुण्यातील उच्चवर्गीय वगळता अन्य सर्वांसाठी अत्यंत अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळे लग्नाचे वऱ्हाड विमानाने लंडनला ही कल्पनाच सर्वांना विलक्षण भावली. अनेक जण ‘वऱ्हाड’चा प्रयोग पाहिल्यावर चिकलठाणा विमानतळावर खरेच विमान कसे दिसते, कसे उडते हे पाहण्यासाठी येत होते. त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की, खेडेगावातील ही वऱ्हाडी मंडळी आधी गावातून बैलगाडीने छोट्या शहरात, तेथून रेल्वेने मुंबईला आणि मुंबईहून लंडनला रवाना होतात.
काळाच्या ओघात सामाजिक, आर्थिक क्षेत्रात बराच बदल झाला. जी मंडळी विमान पाहण्यासाठी येत होती त्यांची मुले परदेशात गेली. त्यांना भेटण्यासाठी विमानाने जाण्याची संधी अनेकांना मिळाली. एखाद्या जुनाट रेल्वेस्टेशनसारखे भासणारे चिकलठाणा विमानतळ महाकाय झाले. दररोज मुंबई, दिल्लीला विमाने उडू लागली आणि नजीकच्या काळात औरंगाबादचा प्रचंड विकास होणार, देश-विदेशातील पर्यटक थेट चिकलठाणा विमानतळावर उतरतील. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक मकबरा, पाणचक्की, सोनेरी महल, औरंगाबाद लेणी आणि अन्य वास्तू पाहतील. दौलताबादच्या किल्ल्याला भेट देतील. त्यातून मुबलक रोजगार उपलब्ध होईल. एवढेच नव्हे, तर चिकलठाण्यावरून थेट लंडन, न्यूयॉर्कला जाता येईल, अशी स्वप्ने बारा वर्षांपूर्वी दाखवण्यात आली. प्रत्यक्षात विमानतळाचा आकार वाढण्यापलीकडे काहीही घडले नाही. रेल्वेने मुंबईला जाण्याऐवजी चिकलठाणा विमानतळावरून विमानाने दिल्ली, मुंबईला जात येते, एवढाच काय तो फरक पडला आहे. वऱ्हाड निघालंय लंडनला नाट्यप्रयोगातील बुंग अजूनही उडालेले नाही आणि नजीकच्या काळात ते उडण्याचीही शक्यता दिसत नाही. परदेशातील पर्यटक आजही आधी मुंबई, दिल्ली आणि तेथून औरंगाबादला येत आहेत आणि औरंगाबाद किंवा मराठवाड्यातील कोणाला परदेशात जायचे असेल तर आधी मुंबई, दिल्लीलाच जावे लागत आहे. असे होण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. त्यातील प्रमुख म्हणजे पर्यटकांची अपेक्षित वर्दळ नाही आणि दुसरे म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच बडी राजकारणी मंडळी आठवड्यातून एक-दोन वेळा मुंबई, दिल्लीची विमान वारी करतात. वर्षातून एखादी चक्कर परदेशातही होते; पण त्यांना इतर नागरिकांविषयी फारशी कळकळ नाही. ज्यांना जायचेच असेल त्यांनी मुंबईहून विमान पकडावे, अशी त्यांची भूमिका दिसते. पर्यटकांचा ओघ वाढवणे म्हणजे कोंबडी आधी की अंडे अाधी, अशातला प्रकार आहे. कारण परदेशी पर्यटकांची विमाने जर थेट चिकलठाणा विमानतळावर उतरली पाहिजेत, अशी सरकारची इच्छा असेल तर त्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण गरजेचे आहे. पण सरकारी पातळीवर मात्र आधी पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे, असा धोशा लावला जात आहे. सरकारपुढे कोणाचे चालत नाही आणि राजकारण्यांना सरकारकडून काम करून घेण्याची इच्छा नाही. त्यामुळे सगळा तिढा निर्माण झाला आहे. म्हणूनच गेल्या पाच-सात वर्षांपासून चर्चेत असलेला विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव किमान तीन वर्षे लांबणीवर पडला आहे. आंतरराष्ट्रीय एअर ट्रॅफिक नाही म्हणजे पुरेशी हवाई वाहतूक नसल्याने धावपट्टी वाढवण्यासह इतर कामे लांबणीवर टाका, असे फर्मान निघाले आहे. डीएमआयसीसारख्या महत्त्वाकांक्षी औद्योगिक वसाहतीचे काम सुरू झाले आहे. त्यासोबतच चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावे, अशी मागणी उद्योजकांंच्या संघटनांनी गेल्या चार वर्षांपासून लावून धरली होती. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पाठपुरावा केला. त्याचा काहीसा परिणाम झाला. सरकारी यंत्रणा हलली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ७०० कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आला. तो त्याच अवस्थेत आहे. टुरिस्ट ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष जसवंतसिंह यांनी या दिरंगाईबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. किती परदेशी पर्यटक येतात, यावर विमानतळाचे आंतरराष्ट्रीयीकरण कसे अवलंबून असू शकते, असा त्यांचा सवाल आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेर जाणारे देशी पर्यटक जास्त असले तरीही आंतरराष्ट्रीय दर्जा मिळू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. चीन, जपान, कंबोडिया, व्हिएतनाम, कोरिया आदी बुद्धिस्ट राष्ट्रांतील पर्यटकांची संख्या लक्षात घेता चिकलठाणा विमानतळाला बुद्धिस्ट सर्किटशी जोडले तरीही पर्यटक वाढू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. उद्योजकांच्या मते धावपट्टीची लांबी वाढवली तरी पुरेसे आहे. मात्र, त्याकडेही सरकार गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. विमानतळ आंतरराष्ट्रीय हाेण्यासाठी आणखी किमान २०० एकर जागा अधिग्रहित करावी लागणार आहे. सध्या विमानतळ प्राधिकरणाकडे ५०० एकर जागा असून आठ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर १८२ एकर जागा संपादित करण्याला गती देण्यात आली होती. तरीही जैसे थे स्थिती आहे. उद्योजक, टूर ऑपरेटर यांनी अशीही माहिती दिली आहे की, मुंबई विमानतळावर इतकी गर्दी असते की, जागेअभावी काही विमाने अहमदाबाद येथे उतरवावी लागतात. अहमदाबादच्या तुलनेत औरंगाबाद मुंबईपासून जवळ आहे. तेथे विश्रांतीसाठी येणारी विमाने औरंगाबादेत उतरवली जाऊ शकतात. दुसरीकडे ज्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यांच्या डोक्यावरही टांगती तलवार आहे. त्यांची शेती बुडित खात्यात जमा होत आहे. एकीकडे शेती संपादित करणार, असे सांगायचे आणि दुसरीकडे विस्तारीकरण लांबणीवर टाकत राहायचे, हा खेळ आणखी किती वर्षे सुरू ठेवणार, असा प्रश्न राजकारणी मंडळी सरकारला विचारणार नाही. तीही जबाबदारी औरंगाबादकरांनाच उचलावी लागणार, अशी स्थिती आहे.

Thursday 22 December 2016

मध्यमवर्गाच्या विवाहबाह्य संबंधांचे समुद्र मंथन

मध्यमवर्गाच्या विवाहबाह्य संबंधांचे समुद्र मंथन


--
स्त्री पुरुषातील आकर्षण हाच जगातील नव्या जीवाच्या निर्मितीचा 
मूळ स्त्रोत आहे. त्यांच्यात आकर्षण नसेल
तर पृथ्वीतलावर जीवच निर्माण होणार नाही. मात्र, 
आकर्षणापोटी जोडीदार सोडल्यास किंवा 
जोडीदाराला अंधारात ठेवून नवा जोडीदार जोडला. 
त्याच्याशी भावनिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास
जगण्याचा मूळ आधार असलेले भावविश्व उद््ध्वस्त होते.
गुन्ह्यांचा जन्म होतो. म्हणून  कोणी, कोणावर, 
कशामुळे हक्क सांगायचा. एकपत्नी, एक पतीव्रत
कसे टिकेल येईल. कोणी कोणाला अधीन राहायचे
याच्या काही चौकटी समाज, कुटुंब व्यवस्था टिकवण्याची
आस असलेल्यांनी तयार केल्या. त्यांची पेरणी 
धार्मिक रुढी, परंपरांमध्ये केली. विवाह संस्थेची
बांधणी केली. त्यामुळे कौटुंबिकस्तरावरील जग
बऱ्यापैकी सुरळित जगत आहे. किमान भारतीय
कुटुंब व्यवस्थेत तरी त्याची अवस्था बिकट झालेली नाही. 
मात्र, गेल्या दहा-पंधरा वर्षात या मध्यमवर्गात
अनैतिक संबंधांचे वादळ येऊ घातले आहे, असे दिसते.
नाते-संबंध जपण्यासाठी आयुष्य पणाला लावूत.
पण जोडीदाराला धोका देणे. त्याला अंधारात ठेवून
संबंध ठेवणे शक्यच नाही, असे मध्यमवर्ग सांगत असे.
नैतिकतेच्या चौकटीत मध्यमवर्गाला बांधून ठेवणाऱ्या,
तसा संदेश देणाऱ्या अनेक साहित्यकृती 
आल्या आणि गाजल्या. त्यामुळे नैतिकता जपण्याची
जबाबदारी मध्यमवर्ग सांभाळत असल्याचे चित्र 
निर्माण झाले. ते तसे पाहण्यास गेले तर सत्यही आहे.
पण भारतात मोठ्या संख्येने मध्यम असलेला हा वर्ग
जागतिकीकरणामुळे उच्च किंवा उच्च 
मध्यमवर्गीयात समाविष्ट होऊ लागल्याने
अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. एकत्र कुटुंब
व्यवस्था मोडकळीस येत आहे. प्रचंड पैसा पण
मानसिक आधारासाठी कोणीच नाही, अशी
त्यांची अवस्था आहे. मग त्यातून मित्र, मैत्रिणी
शोधणे आणि त्यांच्यातच गुंतून शरीर
संबंधांपर्यंत जाणे अशी धावाधाव सुरू आहे.
एकीकडे नैतिक मूल्ये आणि दुसरीकडे मानसिक
विकलांगता, आकर्षण अशा कोंडीत हा नव उच्च
मध्यमवर्ग सापडत चालला आहे. अशीच घसरण
सुरू झाली तर पुढे काय, असा प्रश्न अनेकांना
पडला आहे. तसा तो मिलिंद बोकील यांनाही पडला.
त्यांनी समुद्र कादंबरीत त्याचे उत्तर शोधण्याचा 
प्रयत्न केला. तर चिन्मय मांडलेकर या प्रतिभावान
कलावंताने तो नाट्य रुपात रंगभूमीवर 
आणला आहे. त्याला स्पृहा जोशी या तेवढ्याच
ताकदीच्या अभिनेत्रीची साथ मिळाली आहे. 
अतिशय बोल्ड विषय तेवढ्याच बोल्डपणे तरीही
संयततेच्या चौकटीत त्यांनी मांडला आहे. उच्च मध्यम
आणि मध्यमवर्गाला पचेल, समजेल आणि अंमलात
आणणे शक्य आहे, अशाच पद्धतीने तो सादर
केला आहे. भूमिकांपासून तसूभरही बाजूला न हटता
त्यांनी व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत. 
पस्तीशीतील उद्योजक भास्कर (चिन्मय मांडलेकर) 
आणि साहित्य, कवितांच्या, सृजनशील अन् तरल जगात
रमणारी तिशीतील त्याची पत्नी नंदिनी (स्पृहा जोशी)
समुद्रालगतच्या एका रिसोर्टवर मन मोकळे
करण्यासाठी येतात. तेथे नंदिनीकडून तो तिच्या अनैतिक
संबंधांची कबूली घेतो. या संबंधांची तिला का गरज पडली,
याचा शोध काढतो. ती देखील त्याला मनमोकळेपणे
सर्वकाही सांगते. चूक मान्य करते. मग पुढे काय
असा प्रश्न भास्करपुढे पडतो. तेथे त्याला पुन्हा
कुटुंब व्यवस्थेची आठवण येते. जोडीदाराची सर्वात
मोठी चूक पोटात घालून जगण्याचा निर्णय घेऊन
तो तिला मिठीत घेतो. जसा समुद्र अनेक गोष्टी
पोटात घेतो तसाच. अनैतिक संबंध हा तसा अनेक
नाटकांमधून येऊन गेलेला विषय. पण त्याची
मांडणी आणि दाहकतेचे टोक कुटुंब व्यवस्थेवर
फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे नव्हते. 
‘समुद्र’ २०-२५ वर्षापूर्वी आले असते तर ते
कदाचित एवढे वादळी वाटले नसते किंवा त्यात
गांभीर्य, तथ्य नाही, असे रसिकांना वाटले असते. 
मात्र, नव उच्च मध्यमवर्गात अशा संबंधांचे
प्रमाण वाढत चालल्याचे ‘समुद्र’चा प्रतिसाद स्पष्ट
सांगत आहे.  अनैतिक संबंधांचा शेवट चांगला नसतोच,
हे सांगण्यासाठी कुणा समाजशास्त्रज्ञाची गरज नाही.
तरीही अनेक तरुण-तरुणी त्या दिशेने जात आहेत.
एवढेच नव्हे तर त्याचे आपापल्या पद्धतीने समर्थनही
करत आहेत.  नाटकातील भास्कर आणि नंदिनी 
लेखकाला जसे अपेक्षित, त्याने आखून दिलेल्या
चौकटीतच वागले. खरेखुरे सगळेच भास्कर, नंदिनी
एवढा संयम पाळणे कठीण आहे. मानसिक
आधाराची गरज या त्यांनी विचारलेल्या
प्रश्नाचे नेमके उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही.
आणि म्हणूनच ‘समु्द्र’ने समोर आणलेले वादळ
ही खरेच एकूण भारतीय समाज व्यवस्थेसाठी
धोक्यची घंटा आहे. नाही का?

आता सादरीकरणाविषयी 
चिन्मय मांडलेकरांनी कादंबरीचे रुपांतर
नाटकात करताना मोठी जोखीम घेतली आहे.
कारण कादंबरीचा पट विस्तीर्ण असतो. त्यातील
मोजक्याच घटना रंगमंचावर सादर करणे शक्य असते.
आणि ज्या घटनांची नाटककार सादरीकरणासाठी निवड
करत असतो. त्याविषयी मूळ लेखकाने मांडलेला तपशील
रंगमंचीय अवकाशात मांडण्याला मर्यादा पडल्याचे 
प्रेक्षकांना जाणवले तर नाटकाला अपेक्षित खोली
प्राप्त होत नसते. समुद्र मध्ये तर तसे म्हटल्यास
घटनाच नाही. केवळ पती-पत्नींमधील चर्चा,
खटके आणि एकमेकांवर शाब्दीक हल्ले, एवढेच आहे.
त्यामुळे मांडलेकर यांचे विशेष कौतुक करावे लागेल.
त्यांनी दोन अंकात आणि सहा प्रवेशांत कादंबरीतील
अर्क बसवला आहे. तो देखील अतिशय चपखलपणे.
पहिल्या अंकाचा शेवट करताना भास्कर, नंदिनीचा 
बोल्ड सीन अश्लिलतेकडे न झुकता सुन्न
 करून टाकतो. पुढे काय होणार, असे प्रत्येक
क्षणाला वाटत राहते. नाटक पाहिल्यावर समुद्र
कादंबरी खरेदी करून वाचून पहावी, असे प्रेक्षकांना वाटते, 
यावरून त्यांच्या नाट्य रुपांतराची ताकद लक्षात येऊ शकते. 

स्वत:च नाट्य लेखन केले असल्याने त्यांनी
त्यावर दिग्दर्शकीय संस्कारही अत्यंत उच्च
दर्जाचा केला आहे. पडदा उघडल्यापासून ते पडदा
पडेपर्यंतचा शब्द ना शब्द, त्यातील तीव्रता, 
तिखटपणा टप्प्या-टप्प्याने वाढत जाईल, याची
काळजी घेतली आहे. कॉम्पोझिशन्स, संवादातील तणाव,
दोन प्रसंग जोडण्यासाठी कवितांच्या ओळींचा वापर आणि
सर्वात महत्वाचे म्हणजे संहितेला दिलेली अचूक 
ट्रीटमेंट त्यांच्यातील टोकदार दिग्दर्शकाची साक्ष देतात.
प्रेक्षकांच्या उजव्या बाजूचा रंगमंच अधिकाधिक 
वापरताना काही काळ त्यांना काही काळ डाव्या
बाजूला घेऊन जाण्यासाठी चिन्मय यांनी भास्कर,
नंदिनीला तिकडेही नेले आहे. त्यामुळे रंगमंचीय
अवकाशात एकाकीपणा जाणवत नाही. अखेरच्या
प्रसंगात डोंगर उभा करण्याची क्लृप्तीही खासच.
त्यामुळे सादरीकरण डोंगराएवढ्या उंचीवर जाऊन पोहोचते.
चिन्मय उंचापुऱ्या व्यक्तिमत्वाचे आणि खणखणीत
आवाजाचे धनी आहेत. तो त्यांनी भास्करची व्यक्तिरेखा
उभी करताना विलक्षण पद्धतीने वापरला आहे. 
प्रचंड कष्ट करून स्वत:चा उद्योग व्यवसाय 
उभा करणारा, पत्नीवर जीवापाड प्रेम असलेला 
आणि पत्नीचे तिच्या मित्राशी अनैतिक संबंध 
असल्याचे कळाल्यावर आतून मोडून पडलेला, 
या संबंधांमागे नेमके काय कारण असावे, याचा शोध
काढण्यासाठी धडपडणारा, तिच्यावर आपला उद्रेक
कोसळवणारा आणि अखेरीस कुटुंब जपणे महत्वाचे
असे मानून तिच्या चुका पोटात घालण्यास तयार होणारा
भास्कर असे अनेक कंगोरे त्यांनी लिलया उलगडले. 
रंगमंचावरील सहज वावर आणि मुद्राभिनय सारेच 
अफलातून जमले आहे. स्पृहा जोशी तरुण वर्गात आणि कुटुंबातही प्रचंड लोकप्रिय. 
एक सोज्वळ, कौटुंबिक मुलग, गृहिणी अशी
त्यांची प्रतिमा आहे. ही प्रतिमा मोडण्याचे धाडस
त्यांनी समुद्रमध्ये केले आहे. कामकाजात गुंतल्याने,
पतीला वेळ नसल्याने मानसिकदृष्ट्या भुकेली
नंदिनी, भुकेजलेपणा मिटवण्यासाठी गणेश 
राजोपाध्येच्या मैत्रीत अडकलेली महिला, 
मैत्रीच्या पुढे जाऊन परपुरुषासोबत तीनदा
शय्यासोबत करणारी बाई, ज्याच्यासोबत शारीरिक
संबंध प्रस्थापित केले त्याने नवऱ्याबद्दल खालच्या
पातळीवर जाऊन बोलताच त्याला मुस्काटात
भडकवण्याचे धैर्य दाखवणारी नारी आणि गणेशसोबत
शय्यासोबत करतानाही नवऱ्याचीच आठवण
होत होती असे सांगणारी बायको. भास्करने चुका
पोटात घालून पुन्हा स्वीकारावे अशी आर्त
हाक देणारी कारुणी., मुलावर प्रचंड प्रेम करणारी
आई अशा अनेक अंगांनी वेगाने जाणारी व्यक्तिरेखा
त्यांनी खूपच सहजतेने उभी केली. पहिल्या
प्रवेशाच्या अखेरपासून त्यांनी लावलेला खास रडवेला,
अनुनासिक स्वर त्यांच्यातील व्यक्तिरेखेच्या 
एकरुपतेचे जे दर्शन घडवतो ते चकित करणारेच
आहे. खरेतर लेखकाच्या आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने
नंदिनीची व्यक्तिरेखा म्हणजे कुत्सिततेचा, टीकेचा विषय. 
पण स्पृहा यांनी अभिनय, संवादातील अर्थ प्रवाही
करत नंदिनीने असे का केले. तिचे नेमके काय चुकले
याचाही विचार झाला पाहिजे, असे म्हणण्यापर्यंत
प्रेक्षकांना आणून सोडले आहे. मयुरेश माडगावकरांनी
पार्श्वसंगीतात समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा आणि
त्यासोबत रोरावत येणाऱ्या वाऱ्याचा अचूक वापर
केला आहे. नंदिनी - भास्करमधील तणाव हे संगीत
आणखीनच वाढवत नेते. राजन भिसेंचे नेपथ्य 
आणि जयदीप आपटेंची प्रकाश योजनाही संहितेला
आणखी सखोलता प्राप्त करून देते.
--
हे खटकते, हा प्रश्न पडतो

मला साहित्य, कवितेतील काहीच कळत
नाही. मी तरल मनाचा नाही. मी संवेदनशील नाही.
सौंदर्यशास्त्राविषयी माझा अभ्यास नाही, असे म्हणणारा
भास्कर नाटकात अतिशय साहित्यिक संवाद म्हणतो.
नंदिनीला नाट्यमय रितीने प्रश्न विचारतो, हे किंचित खटकते.
गणेश राजोपाध्ये भास्करबद्दल खालच्या पातळीवर
पोहोचल्यावर नंदिनी त्याला मुस्काटात मारते. 
त्याच्याशी संबंध तोडते. पण गणेश तसा बोलला
नसता तर नंदिनीने त्याला मारले असते का, 
असा सवाल भास्कर तिला विचारतो. तेथून नाटकाला
वेगळे वळण लागते. हे वळण नसतेच तर 
समुद्रचा काय शेवट झाला असता असा प्रश्न पडतो. 


Wednesday 21 December 2016

तारेवरचा वारकरी






 

मा. भगवान घडामोडे ऊर्फ बापू,

महापौर, औरंगाबाद

यांना जय हरी विठ्ठल


सर्वच अर्थांनी ऐतिहासिक असलेल्या औरंगाबाद शहराचे महापौर झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. राजकारणातच जीवन घालवण्याचे ठरवलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याचे स्वप्न असलेले महापौरपद आपण मिळवले. ही विठूरायाचीच किमया. या पदाच्या दर्शनासाठी तुम्हाला तब्बल २० वर्षे प्रतीक्षा करावी लागली. सामान्य कुटुंबातून आलेल्या, राजकारणाचा कोणताही ठोस वारसा नसलेल्यांना मोक्याची पदे मिळण्याची संधी दिवसेंदिवस दुरापास्त होत चालली आहे. त्यामुळे तुम्हाला मिळालेले पद म्हणजे साध्या कार्यकर्त्याला राजकारणात अजूनही किंचित संधी असल्यासारखे दिसते. संधीची वाटचाल करताना तुम्हाला कमालीचा संघर्ष करावा लागला. दुर्गम भागातील वारकऱ्यासाठी पंढरीची वाट बिकट असल्याचे म्हटले जाते. त्याचा अनुभव तुम्ही घेतला. १९९५ मध्ये तुम्ही पहिल्यांदा भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आलात. मोठ्या मोबदल्याची अपेक्षा ठेवता लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा तुमचा स्वभाव त्या वेळी हरिभाऊ बागडेंना भावला होता. शिवाय त्या काळी भाजपला तुमच्यासारख्या धडाडीच्या, बहुजन समाजातील कार्यकर्त्याची गरज होतीच. राजकीय जीवनात पहिली संधी मिळताच तुम्ही वॉर्डातील समस्या सोडवण्याकडे लक्ष केंद्रित केले. त्या वेळी मनपात शिवसेनेची एकहाती सत्ता आणि डॉ. भागवत कराड यांच्यासारखे मातब्बर मुंडे समर्थक स्पर्धेत असताना उपमहापौरपद मिळणे शक्य नाही, हे तुम्ही जाणून होतात. म्हणून तुम्ही पदासाठी फिल्डिंग लावली; पण आक्रमक, आग्रही राहिला नाहीत. पाच वर्षांनंतर तुमचा वॉर्ड राखीव झाला. तुमच्यासाठी राजकारणाचे दरवाजे एका अर्थाने बंदच झाले होते. पण तुमची विठूरायावरील आणि पक्षावरील निष्ठा कामी आली. जाणता कार्यकर्ता म्हणून तुम्ही स्वीकृत नगरसेवकपद मिळवले. स्वीकृताला महापौर, उपमहापौर किंवा महापालिकेच्या खजिन्याची किल्ली हाती असलेले स्थायी समितीचे पद मिळू शकत नाही, हे माहीत असल्याने तुम्ही शांत राहिलात. पण सर्वसाधारण सभांमधून, प्रशासनाकडे पाठपुरावा करत तुम्ही लोकांचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवून घेणे सोडले नाही. म्हणूनच की काय तुम्हाला लोकांनी पुन्हा एकदा निवडून दिले. या वेळी भाजपची अन् तुमचीही ताकद वाढलेली होती. शहरातील राजकारणाची समीकरणे बरीच बदलली होती. त्यामुळे तुम्हाला उपमहापौरपदाची संधी मिळाली. आता भाजपचे शहराध्यक्ष असलेले किशनचंद तनवाणी त्या वेळी शिवसेनेकडून महापौर झाले होते. अत्यंत आक्रमक आणि एकहाती सत्ता राबवण्याच्या तंत्रावर विश्वास असलेल्या तनवाणींशी तुम्ही त्या वेळी जुळवून घेतले. एवढेच नव्हे, तर शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी नेमकी कशी राखावी आणि हे राखण करत असताना पक्षाचा, वॉर्डाचा आणि टप्प्याटप्प्याने स्वत:चा विकास कसा करून घ्यावा, याचेही धडे गिरवले. वॉर्ड राखीव झाल्यावर पत्नीला नगरसेवक करत आणि स्वत: भाजप शहराध्यक्ष होत सत्ता घरातच ठेवण्यात तु्म्हाला फारशा अडचणी आल्या नाहीत. गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्यातील गटबाजी टिपेला पोहोचल्यावर दोन्ही गटांपासून समान अंतर राखण्याची कला तुम्ही प्राप्त केली. केवळ नेतेच नव्हे, तर नेत्यांच्या जवळ राहणाऱ्या आणि कायम कान फुंकण्यात मग्न असलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तुम्ही जवळचे वाटाल, असेही तंत्र तुम्हाला जमले आहे. त्याचा उपयोग तुम्हाला महापौरपदाची उमेदवारी मिळवण्यात झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात उमेदवार ठरवण्यावरून ओढाताण सुरू झाली होती. बागडे यांनी त्यांचे मानसपुत्र मानले जाणारे राजू शिंदे यांच्या पारड्यात वजन टाकले होते. सर्व अर्थांनी बलिष्ठ असलेल्या शिंदेंना मागे टाकणे तसे कठीणच होते. कारण दानवेही तुम्हाला बागडेंच्या गटाचे मानत होते. पण तुम्हाला तुमची सरळमार्गी, अत्यल्प महत्त्वाकांक्षी आणि वरिष्ठांचे ऐकून घेणारा अशी प्रतिमा कामाला आली. काही वर्षांपूर्वी शिंदे यांनी पक्षाशी केलेली बंडखोरी दानवे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात तुमच्या समर्थकांना यश मिळाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार अतुल सावे यांनीही तुमच्या महापौरपदात महत्त्वाची भूमिका बजावली. औरंगाबादेत भाजपमधील सर्व निर्णय मीच घेतो, असे वारंवार सांगणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनीही तुमच्या उमेदवारीवर फारशी खळखळ केली नाही. एकूणात महापौरपदापर्यंतची तुमची वाटचाल खडतर असली तरी ती विठूरायाच्या कृपेने आणि तुमच्यातील स्वभावगुणामुळे यशस्वी झाली. मात्र, आतापर्यंत जे झाले ते तुमच्यासाठी लाभाचे होते. आता औरंगाबादेतील सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यावर औरंगाबादकरांनाही काही लाभ व्हावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे. आणि हे करण्याची वाटचाल म्हणजे पंढरीच्या वारकऱ्यासाठी तारेवरची कसरत आहे. कारण, मनपाच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडाट असल्याने विकासाची कामे ठप्प आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असले तरी त्याचे दृश्य परिणाम अजूनही औरंगाबादकरांना दिसलेले नाहीत. रस्त्यांची धूळधाण झाली आहे. ११ वर्षांपासून समांतर जलवाहिनीचा गुंता कायम आहे. लोकांची पाण्यासाठी दैना सुरू आहे. पाणीपट्टीचा बोजा माथ्यावर मारण्यात आला आहे. भूमिगत गटार योजनेत खोदलेले रस्ते तशाच अवस्थेत आहेत. रस्त्यातील पथदिव्यांचे खांब वाकुल्या दाखवत उभे आहेत. कामाचा फडशा पाडण्याऐवजी निधीचा फडशा पाडण्यात सारेच मश्गुल आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारे लक्ष नागपूर, विदर्भाकडे आहे. ते औरंगाबादकडे वळवत त्यांच्याकडून मुबलक निधी मिळवणे आणि तो नगरसेवक, ठेकेदारांच्या साखळीतून बाहेर काढून कमीत कमी टक्केवारीत दर्जेदार कामे करून घेणे. किरकोळ बिलांच्या फायलीमागे धावता लोकहिताच्या कामांना गती देणे. जुने लोकविरोधी निर्णय रद्द करून नवे अमलात आणणे. काही अतिमहत्त्वाकांक्षी पदाधिकारी, नगरसेवक अन् भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवून काम करून घेणे अत्यंत कठीण आहे. म्हणून अशी कठीण, लोकांच्या हिताचीच कामे सहज मार्गी लावण्याची शक्ती विठूराया तुम्हाला देवो. तुमच्या चांगल्या कामात अडथळे आणण्याची सद््बुद्धी विठूराया शिवसेना-भाजपच्या नेते मंडळींना देवो, हीच तमाम औरंगाबादकरांच्या वतीने सदिच्छा. 



आपला
एक औरंगाबादकर

Tuesday 13 December 2016

सय : कलात्मक आत्मकथनासोबत रंगकर्मींच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही






नाटक म्हणजे काय. त्याचा विषय कसा सुचतो. कागदावर कसा उतरतो. नाटक बसवताना काय काय विचार करावा लागतो. कलावंतांची जमवाजमव कशी केली जाते. चित्रपटाचा विषय प्रत्यक्षात कसा येतो. त्यासाठी दिग्दर्शक, निर्मात्याला कोणत्या खस्ता खाव्या लागतात. टीव्ही सिरियल्स, लघुपटाच्या कल्पना कशा सूचतात. असे अनेक प्रश्न तरुण रंगकर्मींसोबत रसिकांनाही पडत असतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी मग मान्यवरांना गाठावे लागते. त्यांना बोलते करावे लागते. किंवा त्यांनी एखाद्या समारंभात ही सारी रहस्ये स्वतःहून उलगडून सांगेपर्यंत वाट पाहावी लागते. पण आता बऱ्याच अंशी ही प्रतीक्षा महान लेखिका, दिग्दर्शक सई परांजपे यांनी संपवली आहे. त्यांचे `सय` पुस्तक म्हणजे कलात्मक आत्मकथनासोबत रंगकर्मींसाठी अदभुत खजिना असून त्यात अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप पेरली गेली आहेत. मराठी माणसाने भारतीय चित्रपट, नाट्य कला जगताला अनेक उत्तम कलावंत, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ दिले आहेत. त्यात दोन महिलांचे स्थान अढळ आहे. एक म्हणजे विजया मेहता आणि दुसऱ्या सई परांजपे. दोघीही प्रचंड प्रतिभावंत, कर्तृत्ववान. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात त्यांनी सर्वांना सोबत घेऊन निर्माण केलेल्या सर्वच कलाकृती प्रचंड गाजल्या. सादरीकरणाचे वेगवेगळे फॉर्म त्यांनी निवडले. प्रत्येक संहितेत काहीतरी वेगळेपण असेल. त्याची नाळ थेट लोकांशी जोडलेली असेल, असे प्रयोगही केले. त्यामुळे त्यांच्याविषयी रसिक, रंगकर्मींमध्ये कमालीचे औत्सुक्य. त्यांच्या कला प्रवासाविषयी जाणून घेणे सर्वांसाठीच महत्त्वाचे होते. काही वर्षांपूर्वी विजया मेहता यांनी झिम्मा या आत्मकथनपर पुस्तकात त्यांच्याविषयी बरेच काही सांगितले. त्याचवेळी सई परांजपे यांच्याविषयी कधी जाणून घेण्यास मिळेल, अशी चर्चा सुरू होती. त्यांच्या नाटक, चित्रपटांविषयी त्यांनी महत्त्वाचे काही सांगावे, अशी अपेक्षा होती. ती राजहंस प्रकाशनाने आणलेल्या `सय`च्या रूपाने बऱ्याच अंशी पूर्ण झाली आहे. आकाशवाणीपासून टीव्ही चॅनेल्सपर्यंत आणि बाल नाट्यापासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत सई यांनी ठसा उमटवला आहे. चष्मेबद्दूर, कथा, दिशा, स्पर्श, साज या त्यांच्या चित्रपटांनी रसिकांच्या जगात मोलाची भर घातली आहे. पुण्यातील जगद्विख्यात परांजपे कुटुंबात जन्मलेल्या सई परांजपेंनी देशातील महान दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवले. त्यामागे कौटुंबिक जडणघडण, आईने त्यांच्यावर बालवयात केलेले संस्कार हेच महत्त्वाचे ठरल्याचे त्या स्पष्टपणे सांगतात. पण त्यासोबत त्यांनी प्रत्येक कलाकृती प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेली धडपड अतिशय रंजक पद्धतीने सांगतात. नाटकाचा विषय सुचल्यावर रंगमंचावर आणण्यासाठी काय करावे लागते, याचा जो प्रवास त्यांनी मांडला आहे. तो नव्या रंगकर्मींसाठी विशेषत: लेखकांसाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही जर स्वत:ला कलावंत म्हणवून घेत असाल आणि संपूर्ण आयुष्य कलावंत म्हणूनच जगण्याचे ठरवले असेल तर तुम्हाला पूर्णपणे कला प्रांतात झोकून देता आले पाहिजे. नव्हे झोकून दिलेच पाहिजे. प्रत्येक क्षण लेखन, सादरीकरणाचा विचार करत राहा. त्यातच मग्न होऊन जा. म्हणजे काहीतरी नित्य सुचत राहील. आणि जे सुचेल त्याला थोडासा आकार येताच कागदावर उतरवून पाहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्जनशील, नावीन्यतेचा शोध घेणाऱ्यांना शोधा. त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्याभोवतीचे वर्तुळ तुमच्यासारखेच सकारात्मक ऊर्जेने भारलेले असेल याची काळजी घ्या, असा संदेश या आत्मकथनातून रंगकर्मींना मिळतोच. शिवाय चित्रपट, लघुपट, सिरियल्सचा पाया नाटकातूनच रचला जातो. नाटक हीच त्याची जननी असून रंगमंचावर भक्कमपणे पाय रोवले की पुढील वाटचाल ठामपणे करता येते, असेही त्या सांगतात.
मिश्किल, प्रेमळ आणि काहीशा थेटपणे मते व्यक्त करणाऱ्या सई नर्मविनोदी आणि स्वतःच्या मतांविषयी कमालीच्या आग्रही आहेत. एखादा निर्णय का घेतला हे त्या गूढ ठेवत नाहीत. त्यांची बाजू निर्मळपणे मांडून टाकतात. चित्रपटसृष्टीत नाव असलेले बासू भट्टाचार्य प्रत्यक्षात कसे होते. कुख्यात निर्माता अशी त्यांची प्रतिमा होती म्हणजे नेमके काय होते. नाना पाटेकरांनी त्यांना कसा त्रास दिला. आणि नंतर कसे जुळवून घेतले. साज चित्रपटातील गाणे लिहिण्यावरून जावेद अख्तर कसे भडकले होते आणि काही दिवसानंतर कशी माघार घेतली. याचीही कहाणी त्यांनी सांगितली आहे. पण हे सांगताना त्यात द्वेष उतरणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे आत्मकथन म्हणजे दुसऱ्या कोणालातरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे. त्याला फेलावर घेणे याकडे झुकत नाही. तर ते निखळपणे गप्पा मारत असल्यासारखे उलगडत जाते आणि हे उलगडवणूक होत असताना जास्वंदी, सख्खे शेजारी, आलबेल, पत्तेनगरी, जादूचा शंख, भटक्याचे भविष्य, धीक ताम, माझा खेळ मांडू दे, पपीहा, दिशा आदी चित्रपट, नाटक, बालनाट्यांचे विषय कसे सुचले यापासून ते रंगमंचावर, पडद्यावर आणण्यासाठी काय काय उपद्व्याप केले हे त्या सहजपणे सांगतात. काही नाटके आणि चित्रपटांच्या आठवणी सांगताना त्यांनी त्यातील व्यक्तिरेखांचे संवादही दिले आहेत. पडद्यावर दृश्य दाखवण्यासाठी काय विचार केला हे पण सांगितले आहे. त्यातील सहजता संवाद आणि पटकथा लेखकांसाठी निश्चितच उपयुक्त आहे. या आत्मकथनात सई यांनी स्वतःच्या काही चुका खुलेपणाने कबूल केल्या आहेत. विशेषतः जागतिक कीर्तीची निर्मिती करूनही व्यवहारज्ञानात शून्य राहिल्याने किती, कसे नुकसान झाले. हे त्या प्रांजळपणे सांगतात. तोही नव्या पिढीसाठी धडा आहे. सुभाष अवचट यांचे मुखपृष्ठ, शेखर गोडबोले, राजू देशपांडे यांची मांडणी पुस्तकाला उंचीवर घेऊन जाणारी. मोज्यक्या पानांवर मुद्रित शोधनाच्या किरकोळ त्रुटी दिसतात. त्या पुढच्या आवृत्तीत दुरुस्त झाल्या तर रंगकर्मींच्या ज्ञानात भर टाकणारा हा कलाप्रवास आणखी समृद्ध होईल.

Tuesday 6 December 2016

बालरंगभूमी समृद्ध करणारे दोन तरुण लेखक

मराठी, रंगभूमीलाआशयघन, सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या आणि समाजमन घडवणाऱ्या नाट्य चळवळीची मोठी परंपरा आहे. त्यातून मराठी रसिक समृद्ध झाले आहेत. अातापर्यंत अनेक पिढ्या नाटकप्रेमी झाल्या आहेत. नाट्य कलेचा उदय होण्यापूर्वी भारूडकार, कीर्तनकारांनी एक प्रकारे गावागावांमध्ये जाऊन प्रबोधन केले. मनोरंजनही केले. पौराणिक कथानके, मिथके त्यांनी शेकडो वर्षे पेरून ठेवली. तो ठेवा अजूनही कायम आहे. त्यातून शेकडो नाटककारांना नवनवे विषय मिळाले आहेत. मात्र, अलीकडील काळात हरहुन्नरी कलावंत प्रा. डॉ. राजू सोनवणे वगळता रसिक घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याची नोंद नाही. त्याचप्रमाणे बाल रसिकांना रंगभूमीशी कायमस्वरूपी जोडण्यासाठी ठोस प्रयत्न सातत्याने झाल्याचे दिसत नाही. म्हणजे त्या दिशेने वाटचाल झालीच नाही, असे म्हणता येणार नाही. पण एकूणात साऱ्या प्रयत्नात एकसंघता नव्हती. सई परांजपे, सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी आदींनी मुंबई, पुण्यामध्ये बाल रसिकांसाठी मोठे काम केले. तेदेखील त्यांच्या उमेदीच्या काळात आणि काही नावीन्यपूर्ण करण्याच्या ओढीने. त्यातून नवे कलावंत तयार झाले. अनेक दर्जेदार संहिता मिळाल्या. पण बालनाट्यासाठी जीव ओतून काम करणाऱ्यांची फौज निर्माण झाली नाही. खरे तर बालकांचे मनोरंजन करणे म्हणजे एक धमाल असते. बऱ्यापैकी सादरीकरणालाही तुफान प्रतिसाद मिळतो. शिवाय तिकीट विक्रीतून कलावंतांना आर्थिक मदतही होते. तरीही का कुणास ठाऊक, लहानांसाठी नाटक करणे म्हणजे कमीपणाचे, असा समज तयार झाला. तो खोडून काढण्याचा काही जणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र, त्यातही दोन मोठ्या नाटकांमधून वेळ मिळाला तर छोट्यांसाठी असा प्रकार झाला. औरंगाबादेत प्रा. कुमार देशमुख, प्रा. आलोक चौधरी, सूर्यकांत सराफ आदींच्या नेतृत्वात ऐंशीच्या दशकात तुफानी बालनाट्ये झाली. सोनेरी डोक्याचा मासा या बालनाट्याचा चित्रपट तयार झाला. तोही गाजला. सराफ यांनी तर त्या काळात बालनाट्याची चळवळ एकहाती तोलून धरली होती. त्यांनी त्यांची पूर्ण कारकीर्दच बाल रसिकांसाठी खर्च केली. नंतरच्या पिढीत रणजित देशमुख, सुनील अष्टेकर, नंदू काळे, राजू सोनवणे, संदीप राजहंस, आसिफ अन्सारी आदींनी बालनाट्याचे प्रयोग केले. आता यातील आसिफ अन्सारी रंगभूमीवर पाय रोवून आहेत. एकीकडे अशी बडी मंडळी बालनाट्यांकडे रिकाम्या वेळेपुरते पाहत असताना स्थिती असताना स्नेहांकित संस्थेने भरीव योगदान दिले आहे. रंगभूमीचे आपण काही देणे लागतो. आणि त्यासाठी तळमळीने काही केले पाहिजे, या जाणिवेतून एकत्र आलेल्या रमाकांत मुळे, धनंजय सरदेशपांडे, शरद कुलकर्णी, श्रीकांत देशपांडे यांनी ९० च्या दशकात स्नेहांकितची स्थापना केली. उद्दिष्ट एक आणि मार्ग वेगवेगळे असल्याने स्नेहांकितच्या या चार स्तंभांना कधी अहंकाराचा वारा लागला नाही. पाय जमिनीवर असल्यानेच त्यांनी विशिष्ट गतीने कायम पुढे पाऊल टाकले. धनंजय सरदेशपांडेंनी लेखन करायचे आणि मुळेंनी िदग्दर्शन. शरद कुलकर्णी, श्रीकांत देशपांडे इतरांनी अभिनय करायचा, असा स्नेहपूर्ण पॅटर्न तयार झाला. पुढे गंगाधर भागेंसारखा हरहुन्नरी तंत्रज्ञ, मोहन वाखारकरांसारखा धडपड्या साथीदार त्यांना मिळाला. या सर्वांनी मिळून उत्तमोत्तम नाट्य प्रयोग केलेच, शिवाय बालनाट्याची परंपरा कायम ठेवली. त्यात सिंहाचा वाटा होता धनंजय सरदेशपांडेंचा. परभणी जिल्ह्यातील सेलूसारख्या छोट्या गावातून आलेल्या सरदेशपांडेंचा पिंड प्रायोगिक, प्रबोधनात्मक नाटकांचा. त्यांनी लिहिलेल्या रोपण खड्डा ओपन या एकांकिकेने लोकप्रियतेचे विक्रम मोडले. आता मराठी चित्रपट क्षेत्रात नाव कमावणाऱ्या अनेकांनी त्यात त्या काळी काम केले होते. एकीकडे मोठ्यांसाठी नाट्यलेखन करत असताना लहान मुलांसाठीही काही केले पाहिजे, असे सरदेशपांडेंना सातत्याने वाटत होते. मुळे सरांसोबतच्या चर्चेत त्याला मूर्त रूप देण्याचे ठरले आणि मग सरदेशपांडेंनी एकापाठोपाठ एक अशा सरस बालनाट्यांची मालिकाच सुरू केली. पडसाद, सत्यम वचनम, जय गणेश साम्राज्य, क्लोन, गणपती बाप्पा हाजिर हो, सिद्राम सुडोकू, जाईच्या कळ्या, मदर्स डे, चमचम चमको, आदिंबाच्या बेटावर ही सर्वच गाजली. स्पर्धांमध्ये विजयी ठरली. शिवाय रसिक, बालकलावंतांना आनंद मिळवून देणारी ठरली. पाच वर्षांपूर्वी राज्य बालनाट्य स्पर्धेत सरदेशपांडेंची तब्बल सोळा बालनाट्ये वेगवेगळ्या संघांकडून सादर झाली. यावरून त्यांच्या लिखाणाचा आवाका लक्षात येतो.
सरदेशपांडेंप्रमाणेच आसिफ अन्सारी यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांनी बालरंगभूमीशी काही वर्षांपूर्वी जोडलेले नाते कायम ठेवले आहे. त्यांची ‘ओसामा, आम्ही नाटक करत आहोत, कस्तुरी, जय हो फँटसी, भेट’ आदी बालनाट्ये आशय आणि मांडणीत वेगळेपण जपणारी आहेत. या दोघांनीही ज्या तळमळीने, सातत्याने लेखन केले त्याला तोडच नाही. साधे, सोपे कथानक. प्रसंगांची सुरेख मांडणी. लहान मुलांना सहज बोलता येतील आणि बोलता बोलता त्यांच्या चेहऱ्यावर नकळतपणे भावही उमटतील, असे संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकात मनोरंजनासोबत एक खोलवर मांडलेला संदेश. हे त्यांच्या लेखनशैलीचा वैशिष्ट्य आणि बलस्थान आहे. त्यांच्या बळावर औरंगाबादेतील बालरंगभूमी तरली आहे. हे दोघेही छोट्या नाट्यरसिकांचे जीवन घडवणारे मोठे प्रतिभावंत लेखक आहेत, अशीच नाट्य इतिहासात नोंद होईल.