Monday 28 December 2020

प्रकाश वाटेच्या मानकरी

परिवर्तनवादी विचारांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एक इतिहास रचला गेला. ‘दिव्य मराठी’च्या रातरागिणी उपक्रमात किमान १५ हजार महिला अंधारावर मात करण्यासाठी अंधारावर चालून गेल्या. औरंगपुरा येथील महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळ त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष केला. इतिहासात नोंद झालेल्या या ऐतिहासिक घटनेचा पाया कसा रचला गेला. रातरागिणी उपक्रमाचा एकूण प्रवास कसा होता, हे वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त सांगणे महत्वाचे आहे. तर झाले असे की, गेल्या वर्षी डिसेंबरच्या प्रारंभी सोयगाव तालुक्यात एका शिक्षकाने मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. आणि ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटेसरांनी ठोस भूमिका घेतली. दिव्य मराठीची टीम सोयगावात पोहोचली. शोषणामुळे प्रचंड घाबरलेल्या मुलींना धीर दिला. संवाद साधत बोलते केले. तेथे 'मौन सोडू चला बोलू' अभियानाचा प्रारंभ झाला. यानंतर ‘दिव्य मराठी’ महिलांवरील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेवर अतिशय संवेदनशील आणि आक्रमक मांडणी केली. आरोपींवर कठोर प्रहार केले. गर्भातच मुलींचे जीवन उद्धवस्त करणारी एक टोळी ‘दिव्य मराठी’ने गजाआड केली.

पण केवळ वार्तांकन करून थांबता येणार नाही. तर महिलांवर होणारे अत्याचार पाहतात्यांच्या एकूण जीवनात बदल झाला पाहिजे. आणि या बदलांचे बीज आपणच रोवले पाहिजे, असा विचार ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे व्यक्त केला. आणि तातडीने अंधारावर चालून जातील रातरागिणी ही संकल्पना मांडली. तो दिवस होता १२ डिसेंबर २०१९. वर्षातील सर्वात मोठी रात्र अर्थात २२ डिसेंबर रोजी क्रांती चौकातून औरंगपुरा येथील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यापर्यंत अंधारावर चालून जायचे ठरले. आणि त्यापुढील दहा दिवसांत आवटेसरांच्या मार्गदर्शनाखाली दिव्य मराठीचे डेप्युटी चीफ रिपोर्टर शेखर मगर, रिपोर्टर रोशनी शिंपी यांच्या पुढाकारात संपादकीय सहकाऱ्यांची एक टीम रातरागिणी आयोजनासाठी झपाटून मैदानात उतरली. त्यावेळचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी स्थानिक पातळीवर नियोजन केले. या उपक्रमात अर्थातच समाजातील प्रत्येक घटकाचा, महिला, युवतींचा सहभाग आवश्यक होता. त्याकरिता विविध जातीधर्मसंस्थासंघटनाविचारधारेच्या महिलांना ‘दिव्य मराठी’ कार्यालयात निमंत्रित करण्यात आले. एका आवाजाला प्रतिसाद देत शेकडो प्रतिनिधी बैठकीला आल्या. संकल्पना ऐकल्यावर त्यांनी हा आमचा कार्यक्रम आहेआम्ही तो यशस्वी करू असा निर्धार व्यक्त केला. महाविद्यालयीन तरुण, तरुणी देखील हिरीरीने सहभागी झाल्या. अगदी पाच वर्षांची चिमुकली ते ८० वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने पाठबळ दिले. काहीजणींनी नियोजनासाठी मौलिक सूचनाही केल्या. औरंगाबाद शहरात रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरणार होत्या. त्यामुळे त्यांच्या वाहनांचे पार्किंग, शिस्तबद्ध मार्गक्रमण आणि घरी परतण्यासाठी बसची व्यवस्था अशी अनेक आव्हाने होती. पण तत्कालिन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेकजणांनी मदत केली.

औरंगाबाद शहरच नव्हे तर उपनगरातील महिलाही मोठ्या संख्येने क्रांती चौकात जमल्या. अपेक्षेपेक्षा दहापट अधिक संख्येने सहभागी होत त्यांनी रातरागिणीची कमान हातात घेतली. डॉक्टरइंजिनियरसीएउद्योजकपरिचारिकाड्रायव्हरसामाजिक कार्यकर्ताप्राध्यापकशिक्षिकाकलावंतगृहिणी अशा एक ना अनेक सहभागी झाल्या. मार्गात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत होते. लोक कुतूहलाने ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होत होते. क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठणगेट येथे मलखांबाच्या कवायती, पोवाडे, स्फूर्तीगीतांचे गायन असा माहोल होता. औरंगपुऱ्यात महात्मा फुले पुतळ्याजवळ एवढ्या मोठया संख्येने महिला आल्या होत्या की, रात्री बाराच्या सुमारास ‘अंधारावर मात करणारी पहाट झाली’ अशी नोंद जगाने घेतली. महिलांनी रात्री सातच्या आत घरात असलेच पाहिजे, या पुरुषांनी पेरलेल्या भितीयुक्त अंधारावर मात करून प्रकाश वाटेने त्या चालत गेल्या. त्या साऱ्या रातरागिणींना औरंगाबादकरांच्यावतीने लाख लाख धन्यवाद !


Saturday 19 December 2020

परिवर्तनाचा हुंकार

वर्षानुवर्षे एका साचेबद्ध पद्धतीने जगणाऱ्या, घुसमट हेच आपले प्राक्तन असे मानणाऱ्या समाजात परिवर्तन झाले पाहिजे. अन्याय करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, यासाठी खडतर वाटचाल करणारे काहीजण साहित्य विश्वात आहेत. महेश खरात हे त्यापैकीच एक. ते सातत्याने परिवर्तनाची लढाई लढत आहेत. शिवाय एक साक्षेपी, परखड समीक्षक अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे परिवर्तनवादी विचारवंत, समीक्षक अशी दुहेरी ओळख असलेले खरात स्वतःचे अनुभवविश्व, विचारांमागील भूमिका ‘ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची’ या पहिल्या कविता संग्रहात विविध रचनांच्या रुपात मांडतात. तेव्हा त्याला एक विशिष्ट उंची आणि एक खोलीही प्राप्त होते. एकेक ओळ, त्यातील भावार्थ कसदार असल्याची जाणिव होते. लोकवाङ्मयगृहाने ४० रचनांचा हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. प्रख्यात पुरोगामी विचारवंत, कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांचे भाष्य आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची बारा पानांची दीर्घ प्रस्तावना या ‘ओळ तुझ्या-माझ्या...’ संग्रहाला लाभली आहे. यावरून तिचे साहित्य व्यवहारातील महत्व अधोरेखित होऊ शकते. साहित्य वर्तुळात प्रदीर्घ काळापासून वावर असलेल्या खरात यांच्या विचारात, लेखणीत धारदारपणा आहे. तो त्यांच्या साहित्य कृती समीक्षणात दिसून येतो. समीक्षक म्हणून त्यांनी त्यांना जे योग्य वाटले ते मांडण्यात मुळीच हयगय केली नाही. अनेक वर्षे इतरांच्या लेखनाविषयी भाष्य करत असताना खरात यांच्या मनामध्येही अनेक प्रकारचे विचार उसळी घेत होते. आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या घटना, समाजाचे साचलेपण, काही घटकांचे एकारलेपण अनुभवत होते. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत गेली. असे म्हणतात की, कवितांच्या ओळी अस्वस्थतेच्या गर्भातूनच जन्माला येत असतात. तसेच काहीसे ‘ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची’ कविता संग्रहात झाले असावे. खरात यांचा मूळ पिंड समीक्षकाचा. त्यात कवीमनही जोडले गेले. सभोवताली जे काही घडते आहे. ते पाहून निर्माण होणारी संतप्तता ते मांडतात. त्यात कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. थोडासा धागा मांडायचा आणि त्याचा विस्तार करणे सोडूनच द्यायचे. किंवा त्यातून अंग काढून घ्यायचे, असा काही कवींचा पवित्रा असतो. त्याला खरात यांनी पहिल्याच कविता संग्रहात छेद दिला आहे. म्हणूनच त्यांची कविता वास्तवाला भिडणारी आणि परिवर्तनाचा विचार अधिक टोकदार, आक्रमक, व्यापकपणे मांडणारी झाली आहे.'ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची''मधील सर्वच कवितांचा केंद्रबिंदू माणूस आहे.‘चक्र परिवर्तनाचे'', ''सुरकुतलेल्या चेहऱ्याआड'' आणि ‘पासवर्ड आनंदाचा'' अशा तीन विभागात प्रा. खरात यांनी कवितेची विभागणी केली आहे. सामान्य माणसाला कोणकोणत्या पातळ्यांवर लढावे लागते, याची अतिशय प्रभावी मांडणी खरातांच्या कवितेत आहे. विशेष म्हणजे ते एक प्रकारचा आशावादही निर्माण करतात. एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या गोष्टी बोलल्या जातात. दुसरीकडे भेदभाव, द्वेष्, अहंकार वाढत चालला आहे. एक वर्ग झपाट्याने प्रगती करतोय तर दुसरा झपाट्याने तळाला जातोय. यात बदल झाला पाहिजे. अशा अन्यायकारक वागण्याला जबाबदार असणाऱ्यांना कडक शब्दांत प्रश्न विचारले पाहिजेत, असे खरात सूचित करतात. त्यामुळे एकूणात हा कवितासंग्रह परिवर्तनाचा हुंकार देणारा ठरला आहे.

खुरपं

गेल्या १००-१२५ वर्षांत अनेक मराठी साहित्यिकांनी महिलांचे भावविश्व यथार्थपणे मांडले. त्यांच्या जगण्यातील दु:खवेदनांना आवाज मिळवून दिला. पण त्यातील बहुतांश कथानके, व्यक्तिरेखा शहरी तोंडवळ्याच्या आहेत. कारण मूळ ग्रामीण भागातील असले तरी ही लेखक मंडळी शहराशी नाळ जोडलेली होती. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार आदींनी ग्रामीण महिलांच्या व्यक्तिरेखा चित्रित केल्या. पण त्या बहुतांश विनोदी अंगाने होत्या. त्यामुळे शेतात अपार कष्ट करणाऱ्या, विहीरीवर पाणी शेंदून हाताला घट्टे पडलेल्या आणि कायम ग्रामीण समाजरचनेच्या तळाला राहणाऱ्या महिलांचे चित्रण तेवढ्या ताकदीने, विविध अंगाने, खोलवरपणे फारसे आलेच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे खेड्यापाड्यातील संस्कृतीत जगलेल्या महिलांकडून कसदार, विपुल लिखाण दिसत नाही. त्यामुळे एकूणात मराठी साहित्य विश्व त्या दृष्टीने अपुरे होते.

मात्र, संवेदनशील, आश्वासक कथालेखिका सुचित्रा घोरपडे यांनी ‘खुरपं’ या त्यांच्या कथासंग्रहातून हे अपुरेपण बऱ्याचअंशी भरून काढले आहे. पुण्यातील आर्ष पब्लिकेशन्सने हा कथासंग्रह प्रकाशित करून मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
घोरपडे यांच्या या कथासंग्रहात दहा कथा आहेत. प्रत्येक कथा कसदार, आशयघन तर आहेच. शिवाय त्यातील मांडणीचा प्रवाहही चकित करणारा आहे. खेड्यांमधील बोलीभाषा कथेत अचूकपणे वापरणे म्हणजे पुरुषांचा प्रांत हा अनेक वर्षांचा समजही घोरपडे यांनी मोडीत काढला आहे. ग्राम्य बोलीभाषेतील अनेक शब्द त्यांनी अतिशय चपखलपणे आणि भावार्थासह जागोजागी पेरले आहेत. अवदस, माचुळी, येडताक, चईत, डबरणी, किनव्या ही त्यांच्या काही कथांची नावे आहेत. यावरून कथांमधील शब्दांची ताकद आणि परिघ लक्षात येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे लेखिकेने एकाही कथेची मांडणी, व्याप्ती पसरट केलेली नाही. अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. व्यक्तिरेखा आपण कधीतरी पाहिल्या आहेत, असे वाटत राहते किंवा अशी व्यक्तिरेखेशी आपले जवळकीचे नाते असावे, असे जाणवत राहते. जणूकाही आपण एखाद्या खेडेगावात राहण्यासच गेलो आहोत, असे वातावरण घोरपडे यांची लेखणी तयार करते. म्हणूनच ‘खुरपं’मधील प्रत्येक कथा हृदयात रुतून राहते.
‘खुरपं''मध्ये गावगाड्यातील महिलांच्या जीवनाचे स्पंदन आहे. ग्रामीण संस्कृती, मोडक्या -तोडक्या घरांत आणि वाड्यामध्ये निर्माण झालेले आचपेच, भाऊबंदकीतील तणाव, नातेसंबंधातील घुसमट, डोळ्यातच निष्प्राण झालेले अश्रू अशा अनेक पैलूंना वाचा फोडणाऱ्या कथा यात आहेत. घोरपडे यांनी गेल्या काही वर्षांत शब्दालय, युगांतर, पर्ण, शब्दशिवार, विवेक, अक्षरदान, चौफेर समाचार यासारख्या दिवाळी अंकातून लेखन केले आहे. शिवाय स्टोरीटेलसाठी ऑडिओ कथालेखन, डेलीहंटच्या माध्यमातून ब्लॉग लेखन, वृत्तपत्रांमध्ये कथा, लेख आणि सदर लेखन केलेले आहे. आता ‘खुरपं’मुळे त्यांच्या रुपाने एक सशक्त कथालेखिका साहित्य विश्वाला मिळाली आहे, असे वाटते.

Monday 14 December 2020

पदवीधरच्या निकालाचा धडा

कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागला की, त्याच्या आड दडलेल्या काही गोष्टी सर्वांसमोर येणे आवश्यक असते. कारण या गोष्टी विजेत्याची शक्तीस्थाने सांगतात. पराभूत उमेदवाराच्या मोठ्या किंवा त्याला किरकोळ वाटत असलेल्या चुका समोर आणतात. या चुकांची पुनरावृत्ती टाळली तर पराभूत उमेदवार किंवा त्याचा एखादा अनुयायी पुढील काळात विजयी होऊ शकतो. पराभूत पक्षाचे प्रमुख नेतेही यातून काही धडा घेऊ शकतात. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत गेल्यावेळपेक्षा सुमारे २७ टक्के अधिक मतदान झाल्याने प्रस्थापिताच्या विरोधात कौल असे पारंपारिक गृहीतक मांडले गेले. ते सतीश चव्हाण यांच्या विजयाने चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात हे पदवीधर मतदारसंघात होऊ शकते, हेही तेवढेच खरे आहे. आता विजय-पराभवाच्या काही मूळ कारणांकडे वळूयात. १) आपल्याला मतदान करण्याची हमी असलेल्या अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करून घेणे. भलेही त्यांच्या सर्व समस्या सोडवणे शक्य नसले तरी त्यांच्याशी अतिशय नम्रपणे, कायम संपर्कात राहणे. मतदानाच्या दिवशी स्वतंत्र, अत्यंत भरवशाची यंत्रणा लावून त्यांचे मतदान करून घेणे. ही यशाची पहिली पायरी आहे. च‌‌‌‌‌व्हाण यांना दोन निवडणुकांचा तगडा अनुभव असल्याने त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली पायरी ओलांडली होती. २) पक्षाची यंत्रणा, पक्षाची ध्येयधोरणे, राष्ट्रीय किंवा राज्य, देशाच्या बड्या नेत्याचे वलय याचा प्रचारात फायदा होतो. पण अशा गोष्टी निकाल शंभर टक्के बदलू शकत नाही. विरोधकाला कमी लेखणे तर सर्वाधिक धोकादायक असते. बोराळकर बड्या नेत्यांचे वलय, पक्ष यंत्रणेच्या पूर्णपणे भरवशावर राहिले. तर चव्हाण शिवसेनेच्या यंत्रणेची मदत घेताना व्यक्तिगत हितसंबंधाचे धागेदोरे बळकट करत गेले. बोराळकर तुल्यबळ आहेत, असे मानत प्रचार केला. ३) कोणतीही लढाई लढायची असेल तर आधी आपल्याला पक्षाचा खरेच किती पाठिंबा आहे, याची माहिती हवी. नेत्यांचा पाठिंबा हवाच पण कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी केवळ आपल्यासाठी लढण्यास तयार आहे का, हे उमेदवाराने शांतपणे तपासून पाहिले पाहिजे. चव्हाण यांच्या उमेदवारीला प्रतिस्पर्धी नव्हता. आपल्यासाठी संपूर्ण ताकदीने लढू इच्छिणाऱ्यांची मोठी फळी त्यांनी बांधून ठेवली होती. त्या उलट नेत्यांपासून कार्यकर्ते बोराळकरांच्या विरोधात होते. ४) कोणी काहीही म्हणत असले तरी जातीपातीची गणिते हा तर भारतीय राजकारणाचा पाया आहे. मोठा वर्ग त्याच निकषावर मतदान करतो. त्यामुळे त्यानुसार मतदार नोंदणी करून घेणे आणि ती खरेच झाली आहे की नाही, याचा खरा अभ्यास, पडताळणी करावी लागते. चव्हाण यांनी यात शंभर टक्के गुण मिळवले. तर बोराळकर अभ्यास झाला आहे, या भ्रमात राहिले, असे निकाल सांगतो. ५) तसे तर आपण कोणाच्या मदतीला धावून गेलो तरच लोक आपल्याला मदतीला येतात. हा साधा नियम आहे. राजकारणात तर कमीतकमी त्रास देणारा, अडीअडचणीला किमान संपर्कात असणारा उमेदवार हवा अशी मतदार, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा चव्हाण यांनी अंमलात आणली असे दिसते. ६) कोणत्याही प्रस्थापिताला पराभूत करायचे असेल तर समोर समर्थ पर्याय आहे का? ज्याला निवडून द्यायचे तो आपल्या काही समस्या सोडवू शकतो का. किमान शांतपणे ऐकून घेऊ शकतो का. वेळोवेळी उपलब्ध होईल का? याचाही विचार मतदार काही प्रमाणात करतात. त्यामुळे प्रस्थापिताविरुद्ध प्रचंड असंतोष धुमसता हवा. तरच त्याला हवा देता येते. प्रस्थापिताचे पक्षांतर्गत विरोधक खरेच किती ताकदीचे आहेत, याचीही खरी, खोलात जाऊन तपासणी करावी लागते. चव्हाण महाविकास आघाडीचे सरकारचे उमेदवार असल्याने बोराळकर समर्थ पर्याय आहेत, असे मतदारांनी वाटले नाही. शिवाय चव्हाण यांच्याविरुद्ध धुमसता असंतोष असल्याचे वातावरण शेवटपर्यंत नव्हते. चव्हाण यांचे पक्षांतर्गत विरोधक फारसे शक्तीमान नाहीत. काहीजणांनी फसवी आश्वासने दिली होती, हे आतातरी बोराळकरांच्या लक्षात आले असावे, अशी अपेक्षा आहे.

गणित चुकलेला विद्यार्थी

गणित चुकलेल्या विद्यार्थ्याने छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा तसा मी उभा आहे या प्रख्यात कवी दासू वैद्य यांच्या कवितेतील ओळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पराभूत झालेले भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर आणि भाजप नेतृत्वाला लागू होण्यासारख्या आहेत २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही चव्हाण यांनी बोराळकरांवर सहज मात केली होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. तेव्हा प्रचाराला वेळ मिळाला नाही. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात बूथनिहाय यंत्रणा उभी राहिली नाही, असा बोराळकरांचे म्हणणे होते. तेच सत्य मानून यंदाही त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. तेथेच देवेंद्र फडणवीस यांचा पहिला डाव चुकला. कारण २०१४ ते २०२० या सहा वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासारखी बलाढ्य शिक्षण संस्था ताब्यात आलेल्या चव्हाण यांचे बस्तान आणखी पक्के झाले होते. पदवीधरमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या मतदार नोंदणीत त्यांनी वैयक्तिक लक्ष घालत हक्काचे सुमारे दीड लाख मतदान नोंदवून घेतले. पक्षात उमेदवारीसाठी एकही विरोधक शिल्लक राहणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. विजयाच्या इमारतीचा पाया मजूबत करत एक-एक वीट नीटपणे रचत नेली. तर बोराळकरांनी केलेली नोंदणी चव्हाणांच्या पासंगालाही पुरणारी नव्हती. दुसरीकडे सहा वर्षांत प्रवीण घुगेंनी केलेल्या तयारीकडे फडणवीसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे घुगे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असलेल्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे कमालीच्या दुखावल्या. तीन दशकांपासून संघ सेवेत असलेले घुगे आपल्याला उमेदवारी मिळणार असे गृहित धरून तयारीला लागले होते. त्यांनी स्वत:ची नोंदणी, स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभी केली. अगदी बंडखोरीपर्यंत ते पोहोचले. पंकजा यांनी समजूत घातल्यावर माघार घेत ते प्रचारात सहभागी झाले. पण या साऱ्यातून मुंडे समर्थकांना जो संदेश जायचा तो गेलाच. भाजपला डॅमेज कंट्रोल जमले नाही. आणि ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले..! अशी प्रख्यात कवी सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे भाजप, बोराळकरांची अवस्था झाली.