Tuesday 24 January 2017

सफाई मोहिमेत लाच; नावेत पाणी शिरले आहे



केंद्र सरकारच्या स्वच्छता (सफाई) अभियानानुसार औरंगाबाद शहरात महापालिका काम करते की नाही, याचा आढावा घेऊन त्यावर गुण देण्यासाठी आलेली समिती लाचेच्या सापळ्यात अडकली. समितीचा प्रमुख शैलेश बंजानिया पोलिस कोठडीत आहे, तर त्याच्या दोन सहकाऱ्यांचा जाब-जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. इतर वेळी महापालिकेचे कर्मचारी लाच घेताना पकडले जातात. आता महापालिकेकडूनच लाच घेण्याचा प्रकार उघडकीस आला. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी लाचखोरांना जाळ्यात पकडण्याचा निर्णय घेतला आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या समन्वयक डॉ. जयश्री कुलकर्णी आणि याच विभागातील सहायक प्रमोद खोब्रागडे यांनी निर्णयाची अंमलबजावणी करण्यात जी कुशलता दाखवली त्याबद्दल ते अभिनंदन आणि कौतुकास पात्र आहेत. कारण मनपाचे बहुतांश कर्मचारी दररोज काही तरी कमाई केलीच पाहिजे, हाच मुख्य हेतू ठेवून काम करत असतात. अगदी शंभर रुपयांपासून ते काही हजारांपर्यंतची रक्कम घरी घेऊन जाणारी मंडळीही येथे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे काढणे सहज सोपे आहे, असे कदाचित बंजानिया आणि त्यांच्यासोबत विजय जोशी, गोविंद गिरामे यांना वाटले असावे. परंतु, भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या महापालिकेत काही अधिकारी लाचखोरीच्या विरोधात असावेत, याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे ते अडकले. या घटनेमुळे काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे केंद्र सरकारचे स्वच्छता अभियान नेमका कोणता हेतू ठेवून आखण्यात आले आहे, याची सुस्पष्ट कल्पना सरकारी यंत्रणेला देण्यात आलेली नाही. तसे असते तर क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेने देशभरातील शहरांमध्ये चालणाऱ्या स्वच्छता कामाची पाहणी करण्यासाठी खासगी कंपनीला ठेका दिलाच नसता. किंवा या कंपनीचे अधिकारी पाहणीच्या नावाखाली कमाई करणार नाही, यासाठी कठोर नियमावली तयार केली असती. दुसरे म्हणजे केंद्र सरकारने स्वच्छता अभियानाचा स्मार्ट सिटीशी संबंध जोडला आहे. त्यामुळेही भ्रष्टाचार करणाऱ्यांना आयते कुरण सापडले आहे. महापालिकांना निधी हवा आहे. तो मिळवण्यासाठी ते आपल्याला चार पैसे देतील, असा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा समज झाला आहे. औरंगाबादेतील जो प्रकार झाला तसाच इतर शहरांमध्येही झाला असणारच. म्हणून केंद्राने तातडीने हालचाली करून स्वच्छता अभियान आणि स्मार्ट सिटीचा निधी याचा संबंध पारदर्शक पद्धतीने जोडला पाहिजे. कारण बकोरिया यांनी सांगितल्याप्रमाणे यापुढील काळातही अनेक समित्या येणार आहेत. त्यांच्याकडून कठोर आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन झाले पाहिजे, याची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे. अन्यथा या समित्या म्हणजे केवळ पैसा कमावणारी आणखी एक यंत्रणा असेच होईल आणि त्याचा फटका स्मार्ट सिटी योजनेला बसेल. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्याचे उत्तर औरंगाबादकरांना या घटनेने दिले असावे. नोटाबंदी आणि काळा पैसा कमावण्याचा धंदा करणाऱ्यांचा काहीही संबंध नाही. लोकांनी कष्टाच्या कमाईतून विश्वासाने दिलेला पैसा आपल्यासाठीच आहे, अशी मनोवृत्ती सरकारी, निमसरकारी आणि खासगी क्षेत्रातही बोकाळली आहे. गेल्या ६०-७० वर्षांत ती फोफावली, जोपासली गेली आहे. तिची पाळेमुळे खूप खोलवर गेली आहेत. त्यामुळे केवळ नोटाबंदीने फार काही साध्य होणार नाही, असे बंजानिया सांगत आहे.
गेल्या आठवड्यात आणखी एक प्रकार घडला. तो म्हणजे आरोग्य विभागात काम करणाऱ्या अजंता पेस्ट कंट्रोल कंपनीचा ठेकेदार रामदास ठोंबरे याने बनावट सह्या करून सुमारे १६ लाख रुपये खिशात घातले. जनतेच्या पैशाची ही लूट ठेकेदाराने एकट्याच्या बळावर केली, हे कोणालाही पटणार नाही. ठोंबरेला मदत करणारी आणि त्या मदतीतून वाटा उचलणारी साखळीच महापालिकेत कार्यरत आहे, याविषयी शंका असण्याचे कारणच नाही. बकोरियांनाही ते ठाऊक असल्याने त्यांनी चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने कामकाजास सुरुवात केली तेव्हा बनावट सह्यांची मूळ फाइलच गायब झाल्याचे समोर आले. हा तसे म्हटले तर महापालिकेच्या कारभाराचा एक भागच आहे. फायली गायब करणारीही टोळी तेथे आहे. त्यामुळे बकोरियांसमोर बनावट सह्यांची टोळी जेरबंद करणे आणि फायली गायब करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करणे, असे दुहेरी आव्हान आहे. आयुक्त महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात सर्वोच्च स्थानी असले आणि त्यांच्याकडे प्रचंड अधिकार असले तरी अशा टोळ्यांवर कारवाई करणे त्यांना कठीण जाणार आहे. कारण या टोळ्या एकमेकांच्या हातात हात घालून चालत आहेत. त्यांचे धागेदोरे राजकीय वर्तुळाशी बांधले गेले आहेत. एकाला पकडले तर त्याला सोडवण्यासाठी किमान दहा जण उभे ठाकतात. शिवाय भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येऊ लागताच त्याला जात, धर्माचा रंग देऊन अायुक्त आणि चौकशी अधिकाऱ्यांनाच जेरबंद करण्याची अफलातून कला या भ्रष्ट मंडळींना अवगत आहे. त्यामुळे चौकशीची धार हळूहळू कमी होत जाते. वीस वर्षांपूर्वी शहरातील काही बड्या मंडळींच्या अतिरिक्त बांधकामाच्या २७ फायली पुणे येथील नगररचना उपसंचालक कार्यालयात पाठवण्यात आल्या होत्या. त्या अजूनही तेथेच मुक्कामी आहेत. ज्या बड्यांची नावे समोर आली होती त्यांच्यापैकी एकावरही कारवाई झालेली नाही. बांधकामे अजूनही जैसे थे अवस्थेत आहेत. या साऱ्यामागे असणारा एक जण महापालिकेच्या निवडणुकीत उभा राहिला, विजयी झाला आणि पदाधिकारी म्हणून काम करत महापालिकेबाहेरही पडला. एकूणात बंजानिया पकडला गेला, ठोंबरेवर गुन्हा दाखल झाल्याने फार काही फरक पडेल, असे नाही; पण राजरोस पैसा खाणाऱ्यांना थोडासा वचक बसेल, अशी अपेक्षा आहे. जोपर्यंत पाणी शिरत नाही तोपर्यंत नदीतील नाव सर्वात सुरक्षित असते. पण एकदा पाणी शिरू लागले तर तीच नाव सर्वाधिक धोकादायक होते. औरंगाबाद महापालिकाच नव्हे, तर सर्वच सरकारी, निमसरकारी कार्यालयांच्या नावांमध्ये पाणी शिरू लागले आहे. ते उपसून टाकावे लागेल. जेथून पाणी आत शिरत आहे ती छिद्रे बुजवली पाहिजेत. त्यासाठी कोण किती मनापासून प्रयत्न करतो, यावर नावेचे, नावाड्याचे आणि नावेत बसलेल्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Monday 23 January 2017

बांगलादेशच्या रक्तरंजित स्वातंत्र्यासोबत बरेच काही




मानवी दुःखाबाबत भारताच्या भूमिकेबद्दल माझी स्वतःची काही धारणा आहे. माझ्या मते, भारतीय लोक एखाद्या गोष्टीबद्दलच्या भावनेची तीव्रता सतत वाढवत नेऊन बेभान होता. आणि मग त्यातून सुटका कशी करून घ्यायची, हे त्यांना कळत नाही. (पान क्र. २९२) निक्सन म्हणत, पाकिस्तानी लोकांमध्ये भारतीयांपेक्षा कमी अहंगंड आहे. ते स्वतःचं म्हणणं परिणामांची पर्वा करता स्पष्टपणाने मांडतात. (पान क्र. २१). हिंदू प्राध्यापकांना वेचून काढल्याचा पुरावा उपलब्ध आहे...तसंच हिंदू वस्त्या, जुन्या ढाक्याच्या सीमेवर असलेले परिसर आणि जुन्या ढाक्याच्या सीमेवर असलेले परिसर आणि एका मंदिराभोवती उभं राहिलेलं खेडं यांनाही आगी लावण्यात आल्या. त्याचप्रमाणे २६ मार्चच्या रात्री ढाका विद्यापीठातल्या हिंदू वसतिगृहावर झालेल्या हल्ल्यात किमान २५ जण मारले गेले. (पान क्र. ११२) शब्द वाचूनच कानशिलं गरम होतील. भावना भडकतील आणि चीन, पाकिस्तान, अमेरिकेबद्दल खूप संताप व्यक्त होईल, अशा अनेक वाक्यांनी भरलेल्या `ब्लड टेलिग्राम` या पुस्तकातील ही काही उदाहरणे. पण यात केवळ पाकिस्तान किंवा अमेरिकाविरोध नाही. बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध एवढ्यापुरते हे पुस्तक मर्यादित नाही. किंवा तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन कसा होता, हे सांगण्यापुरते सीमित नाही. तर ‘ब्लड टेलिग्राम’ १९७० च्या दशकात जागतिक पातळीवर कशा घडामोडी घडत होत्या, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अत्यंत बिकट प्रसंगातून कसा मार्ग काढत बांगलादेशाला स्वतंत्र केले, सोव्हिएत रशियाने त्यासाठी किती मोलाची मदत केली, चीनला भारताच्या अंगावर सोडण्याचे निक्सन, किसिंजर यांचे डावपेच कसे हाणून पाडले, याची अतिशय सखोल माहिती या पुस्तकात आहे. मैदानावर लढल्या जाणाऱ्या युद्धासोबत कूटनीतीला प्रचंड महत्त्व असते. किमान एकीकडे चीन आणि दुसरीकडे पाकिस्तान, तिसऱ्या बाजूला नेपाळ, चौथ्या बाजूला अफगणिस्तान अशांनी घेरलेल्या भारताला तरी कोणतेही युद्ध सोपे नाही. एक तरी महासत्ता आपल्या बाजूने असली तरच पाकिस्तानसारखा परंपरागत शत्रू अंगावर घेता येतो, हे त्याच वेळी इंदिराजींच्या लक्षात आले होते. त्या दृष्टीनेच त्यांनी एकेक पाऊल उचलले. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धासाठी पूर्णपणे छुपी मदत केली. कट्टर धर्माच्या आधारावर कोणतेही राष्ट्र टिकू शकत नाही, असा संदेश देण्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे तुकडे केले. पाकिस्तानी सैनिकांकडून बांगलादेशातील हिंदूंचे शिरकाण होत असल्याचे स्पष्ट झाल्यावर इंदिराजी आणि तत्कालीन काँग्रेस सरकारची अस्वस्थता वाढली होती. मग भारतातील हिंदू-मुस्लिम एकता कायम ठेवत त्यांनी पाकिस्तानची जी अभूतपूर्व कोंडी केली ती काँग्रेसच्या चाणाक्ष धोरणांची साक्ष देणारीच आहे, असे हे पुस्तक सांगते. बांगलादेश स्वतंत्र होऊन अर्धशतक होण्यास काही वर्षे बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणाचे संदर्भ तेच राहिले का? अमेरिका हा खरेच भारताचा विश्वासार्ह मित्र होऊ शकतो का? अमेरिकेची परराष्ट्र व्यवहार धोरणे काय आहेत? नवे राष्ट्रपती ट्रम्प पाकविरोधी भूमिका घेतील का? पुतीन यांच्या नेतृत्वात दिवसेंदिवस बलशाली होत चाललेला रशिया भारताच्या मदतीला धावून येईल की पाकिस्तानच्या पारड्यात झुकते माप टाकेल. महासत्ता चीन पाकचा कायमस्वरूपी मित्र आहे का? उद्या खरेच काश्मीरवरून भारत-पाकचे युद्ध भडकले तर चीन, रशिया, पाकिस्तान या महासत्ता कोणाच्या बाजूने असतील? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ब्लड टेलिग्राम हे गॅरी बास यांनी हजारो दस्तऐवजांचा अभ्यास करून लिहिलेले, दिलीप चावरे यांनी अनुवादित केलेले आणि डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले पुस्तक मदत करते. १९७१ म्हणजे रशिया आणि अमेरिकेमधील शीतयुद्ध शिगेला पोहोचलेला काळ. रिचर्ड निक्सन आणि किसिंजर यांनी केवळ इंदिरा गांधी आणि भारतीयांविषयी असलेल्या वैयक्तिक आकसापोटी पाकिस्तानला किती टोकाचे झुकते माप दिले. एवढेच नव्हे, तर भारताविरुद्ध युद्धात उतरण्यासाठी चीनची मनधरणीही केली होती. इंदिराजींची कूटनीती आणि भारतीय लष्कराचा पराक्रम यामुळे भारत ते युद्ध जिंकण्यात कसा यशस्वी ठरला होता, हे ब्लड टेलिग्राम वाचल्यावर स्पष्ट होते. आणि युद्ध नको, युद्ध नको, असा भारतीयांचा आग्रह असल्याचे चित्र प्रसारमाध्यमे आणि काही राजकीय पक्ष, धार्मिक संघटना सांगत असल्याचे तरी पाकिस्तानची निर्मिती भारतीयांना कधीच पसंत पडलेली नाही. एका युद्धाने ही निर्मिती पुन्हा संपवावी, अशी बहुतांश भारतीयांची (काँग्रेस समर्थकही) १९४७ पासूनची तीव्र इच्छा असल्याचेही या पुस्तकातून लक्षात येते. मानवाचा इतिहासच युद्धाने भरला आहे. प्रत्येक शंभर वर्षांत पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात कुठेना कुठे युद्ध झालेच आहे. कारण रक्त सांडणे, हिंसा करणे हा माणसाचा मूळ स्वभावच आहे. त्यापासून त्याची कोणताच धर्म सुटका करू शकला नाही. उलट धर्मानेच रक्त सांडण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांचे राज्यकर्ते कायम युद्धाच्या तयारीत असतात किंवा स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रे जमवून ठेवत असतात. त्याला भारतही अपवाद नाही. हे ब्लड टेलिग्राम वाचताना लक्षात येते. शिवाय बांगलादेशाच्या स्वातंत्र्याने नेमके काय सिद्ध झाले? भारताच्या पदरात काही पडले का? धार्मिक तेढीचे राजकारण करणारे काही धडा शिकले आहेत की नाही? काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान करत असलेले प्रयत्न म्हणजे भारताने १९७१ मध्ये केलेल्या पाकिस्तानच्या तुकड्यांचा परिणामच आहे हे स्पष्ट होते. आणि आता काश्मीरमध्ये पाकला रोखण्याचे आणि पाकचे आणखी तुकडे करण्याचे कोणते मार्ग आहेत, याचेही चिंतन करण्यास हे पुस्तक भाग पाडते. आणि अशा अनेक संदर्भ आणि चिंतनात्मक विषयांची एकत्रित मांडणी असल्याने ब्लड टेलिग्राम वाचकांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरते. भारताच्या वर्तमान आणि भविष्याची काळजी, आस्था असलेल्या प्रत्येक अभ्यासकाने ते आवर्जून वाचावे, एवढे त्याचे मूल्य निश्चितच आहे.

Tuesday 10 January 2017

दगडात खिळा ठोकल्यासारखे होईल

आजकालच्या सत्ताधारी राजकारण्यांना काय झाले आहे कोणास ठाऊक. औरंगाबाद महापालिकेच्या पदरात काही टाकायचे म्हटले की, काही ना काही अटी टाकतातच. सात वर्षांपूर्वी समांतर जलवाहिनीची योजना मंजूर केली. १४४ कोटी रुपये दिले आणि २५० कोटी महापालिकेने उभे करावेत, असे सांगितले. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना एक ६५० कोटींचा प्रस्ताव पाठवला तर २०० कोटी मनपाने टाकावेत, असे उत्तर मिळाले. दोन वर्षांपूर्वी रस्त्यांसाठी ५० कोटी मागितले तर ३० कोटी जाहीर केले. प्रत्यक्षात २४ कोटी पाठवले. त्यातही कामावर देखरेख विभागीय आयुक्तांनी करावी, अशी अट टाकली गेली. अगदी ताजे उदाहरण पाहा ना. गेल्या आठवड्यात महाएक्स्पो प्रदर्शनाच्या उद््घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. भाजपचे भगवान घडामोडे महापौर झाल्यावर त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री शहरात आल्याने कोणत्याही अटी, शर्तीविना औरंगाबादसाठी काही तरी ठोस घोषणा करतील, अशी अपेक्षा होतीच. पण त्यांनी उलटेच केले. डीपी प्लॅननुसार म्हणजे विकास आराखड्याप्रमाणे रस्ते करणार असाल तर वाटेल तेवढा पैसा देतो, अशी पहिली अट घातली. तिथपर्यंत ठीक होते. कारण मुख्यमंत्र्यांना कायद्यानुसार काम करण्याची भूमिका घेणे आवश्यकच असते. पण ते त्यापुढे पोहोचले. नगरसेवकांनी कामासाठी उड्या मारू नयेत, अशी महाभयंकर अट त्यांनी घातली. दगड शाबूत ठेवून दगडामध्ये कधी खिळा ठोकला जातो का? म्हणजे एक तर मुख्यमंत्र्यांना औरंगाबाद मनपाचा कारभार फार खोलात माहिती नसावा किंवा त्यांना रस्त्यांसाठी पैसाच द्यायचा नसेल, असे वाटून गेले. कारण एक वेळ डीपीनुसार काही रस्ते होतीलही; पण नगरसेवकांनी उड्या मारायच्या नाहीत म्हणजे काय? इथे एक वेळ रस्ता झाला नाही तरी चालेल, पण विश्वासात घेतले नाही, (टक्केवारी दिली नाही) असे म्हणत जोरजोरात उड्या माराव्याच लागतात, असा पहिला आणि शेवटचा नियमच आहे. खरे तर अधिकारी-ठेकेदार, नगरसेवकांची भ्रष्ट युती प्रत्येक महापालिका, नगरपालिकांत आहेच. भारत स्वतंत्र झाल्यापासून सगळे डांबरांमध्ये मनसोक्त अंघोळी करत आहेत. आता सिमेंटचे रस्ते होत असल्याने सर्वांगाला भस्मासारखे सिमेंट फासून घेत आहेत. लहान मुलांना जसा शाळेत खाऊ दिला जातो. तशी आमदार, खासदार, नगरसेवक, अधिकारी, ठेकेदार, पदाधिकाऱ्यांसाठी खाऊची व्यवस्था करून ठेवण्याची वेळ आली आहे. नव्हे, अशी व्यवस्था ही तमाम मंडळी राजरोसपणे करून घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपूरमध्ये, उद्धव ठाकरेंच्या कब्जात असलेल्या मुंबईत, अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये, काही वर्षांपूर्वी एमआयएमकडे असलेल्या हैदराबाद शहरातही हेच सुरू आहे. पण औरंगाबादची गोष्ट न्यारीच असल्याचे सांगितले जाते. नागपूरमध्ये ७० टक्क्यांमध्ये काम आणि ३० टक्क्यांत वाटाघाटी असतील तर इथे उलटे आहे. ३० टक्क्यांत काम आणि ७० टक्क्यांत वाटाघाटी होतात. त्यामुळे लोकांनी घाम गाळून मनपाच्या तिजोरीत दर्जेदार कामांसाठी केलेल्या १०० रुपयांपैकी ७० रुपये अजिबात घाम गाळता अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, ठेकेदार आणि इतर राजकारण्यांच्या खिशात जातात. ज्या रस्त्यांसाठी वाटाघाटी होत नाहीत, तेच बऱ्यापैकी दर्जाचे होतात. औरंगाबादेत असे सर्वोत्तम आणि सर्वांनी थक्क व्हावे, असे किती रस्ते आहेत, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर एकही नाही, असाच आहे. खराब रस्त्यांची हजारो उदाहरणे आहेत. मुख्यमंत्री निधीतून मिळालेल्या २४ कोटी रुपयांचीही अशीच वाट लावून टाकली आहे. भूमिगत गटारीच्या खोदकामांचा अंदाज घेताच काही रस्त्यांवर सिमेंट ओतण्यात आले. आणि नंतर ते पुन्हा उखडून टाकले. २७ कोटी खर्चलेला क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्ता जागोजागी हेलकावे खातो. महानुभाव आश्रम ते पुढे पैठण रोड म्हणजे अक्षरशः खंदक बरा म्हणण्याची स्थिती आली आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीच तयार केलेला पैठण वाळूज लिंक रोड नुसताच आकाशातून दिसायला चांगला आहे. हे दोन्ही रस्ते आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात येतात. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यांच्या कामावर त्यांचे लक्ष नाही, असे कसे म्हणता येईल. की त्यांनी दोन्ही रस्त्यांना ‘लक्ष्य’ केल्यामुळेच ही अवस्था झाली आहे? औरंगाबादला जळगाव, नाशिक, धुळ्याला जोडणारे रस्ते रडकुंडीला आणतात. खासदार चंद्रकांत खैरे २५ वर्षांपासून सत्तेची फळे चाखत आहेत. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर त्यांचे लक्ष असते. मग या रस्त्यांसाठी त्यांनी ‘लक्ष्य’ गाठल्याने मौन बाळगले आहे काय? असा औरंगाबादकरांचा सवाल आहे. आघाडी सरकारने शहरातील रस्त्यांसाठी २० कोटी घोषित केले. त्यातील जेमतेम दीड-दोन कोटी मिळाले. ते युती, राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी गल्लीबोळात जिरवून टाकले. यावरून एकूण महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचा अंदाज येतो. गेल्या ३० वर्षांपासून औरंगाबादकर चांगल्या रस्त्यांसाठी आक्रोश करत आहेत. आम्ही दिलेल्या पैशातून आम्हाला चांगले रस्ते द्या हो, अशी याचना करत आहेत. पण दयाळू म्हणवून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना किंचितही कणव येत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबाद महापालिकेचा कारभार नेमका कसा चालतो, याचा पूर्ण अंदाज आला नसावा, असे वाटते. कारण तसे असते तर त्यांनी नगरसेवकांनी (टक्केवारीच्या) उड्या थांबवाव्यात, असे म्हटले नसते. अर्थात त्यात एक आशेचा किरण असा आहे की, महापौर भाजपचा असल्याने फडणवीस उड्या मारणाऱ्यांचा विचार करून वाढीव निधी देतील. आणि यापूर्वी दिलेल्या २४ कोटींची विल्हेवाट लक्षात घेऊन रस्त्याची नवी कामे दर्जेदार होतील, अशी काळजी घेतील. जबाबदार संस्थेची नेमणूक करतील. कारण त्यांनी निधीची घोषणा एखाद्या राजकीय मेळाव्यात नव्हे, तर शहरातील तमाम उद्योजकांसमोर केली आहे. आपण यापूर्वी औरंगाबादला दिलेले नागपूरकडे पळवून नेले आहे. त्यामुळे किमान उद्योजकांसमोर दिलेले रस्ताकामाचे आश्वासन प्रत्यक्षात आणावेच लागेल, एवढी हुशारी मुख्यमंत्र्यांकडे असावी, असे वाटते. अन्यथा त्यांनी पैसे द्यायचे नाही म्हणून अटी घातल्या, असाच अर्थ निघेल आणि महाएक्स्पोतील भाषण म्हणजे दगडात खिळा ठोकण्याचा प्रकार होईल.

Wednesday 4 January 2017

रस्त्यावर काटेरी कुंपणे पेरत चालणार

दीड महिन्यापूर्वी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राजाबाजार ते जिन्सी रस्ता रुंदीकरणाची घोषणा केली. विकास आराखड्यात नमूद केल्याप्रमाणे काम होईल, असे ते म्हणाले. पाठोपाठ घरांवर मार्किंगही झाले. रस्त्याच्या दुतर्फा ज्यांची घरे होती त्यांनीही मोहिमेला प्रतिसाद देत बांधकामे स्वत:हून पाडून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही दिवसांतच काम पूर्णपणे फत्ते होईल. रस्त्यावर पडलेला बांधकामाचा मलबा हटवून तेथे डांबरीकरण होईल. जुन्या औरंगाबादेतून सिडको-हडकोकडे जाणाऱ्या आणि तेथून शहरात येणाऱ्या किमान ८० हजार वाहनचालकांचा दररोजचा वेळ वाचेल. वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा सारे जण करत होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मोहीम वेगवान झालीदेखील; पण आतापर्यंत औरंगाबादेत बहुतांश वेळा रस्ता रुंदीकरणात जे होत आले तेच राजाबाजार- जिन्सीतही झाले. सिद्धेश्वर मंदिराचा जवळपास १६ फूट भाग रुंदीकरणात असल्याने पाडावा लागणार, असे समोर आले. मंदिराचे विश्वस्त त्यासाठी तयारही झाले. त्यांना एका नगरसेवकाने पर्यायी जागा देऊ केली. दुसऱ्या नगरसेविकेने पुनर्बांधणीची रक्कम जाहीर केली; पण त्याला खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार आक्षेप घेतला. केवळ हिंदू धर्मीयांची श्रद्धास्थळे का पाडता? असा त्यांचा सवाल होता. दीड वर्षापूर्वी वाळूज, पंढरपूर येथे हटाव मोहीम सुरू असतानाही त्यांचा हाच सवाल होता. त्या वेळी ते अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले होते. जिन्सीत त्यांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक करा. त्यांना कोंडून ठेवा, असा सल्ला मंदिराच्या विश्वस्तांना दिला. आयुक्त बकोरिया यांच्यावरही संताप व्यक्त केला. दुसरीकडे याच रस्त्यावर असलेल्या दोन मशिदींचाही मुद्दा उपस्थित झाला. खैरे यांचे वक्तव्य ऐकल्यावर त्यांनीही अन्य पर्याय शोधण्यास सुरुवात केली. काही नागरिकांनी, तर मशिदीचा काही भाग वाचवण्यासाठी स्वत:चे घर थोडे जास्तीचे पाडून घेतले. हा सगळा प्रकार झाल्याने मोहीम थंडावल्यासारखी झाली; पण नगररचना कायद्याने मनपा आयुक्तांना दिलेला अधिकार वापरून रस्त्याचे वळण बदलण्याच्या हालचाली होऊ लागल्या. नागरिकांनी प्रस्ताव आणल्यास असा बदल होऊ शकतो, असे मनपाचे अधिकारी सांगत आहेत. त्यावरून आधीच सुरू झालेले राजकारण अधिक भडकू शकते. याचा अंतिम परिणाम रस्ता रुंदीकरणाची मोहीम पूर्णपणे थांबण्यात होऊ शकतो. वरवर पाहता खासदार खैरे यांच्या विरोधामुळे या महत्त्वाच्या कामात अडथळे आले, असे कोणालाही वाटेल. त्यात काहीसा सत्यांश असला तरी ते पूर्णपणे सत्य नाही. केवळ खैरे नव्हे, तर महापालिकेची कार्यपद्धतीही त्याला तेवढीच जबाबदार आहे. थोडेसे मागे वळून पाहिले आणि शहरात फेरफटका मारला तर ही बाब अगदी स्पष्ट होते. उदाहरणेच द्यायची झाली तर औरंगपुरा भाजी मंडईची जागा पाहा. सहा वर्षांपूर्वी ती मंडई जमीनदोस्त करून तेथे तीन मजली मंडई बांधण्याचे जाहीर झाले. आज तेथे पाण्याचे भले मोठे डबके तयार झाले आहे. सिद्धार्थ उद्यानातील पार्किंग अर्धवट अवस्थेत पडले आहे. आता विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी २०११ मध्ये रुंदीकरणाची धडाकेबाज मोहीम राबवली. ज्या सिल्लेखान्यात महापालिकेचे पथक कधी पाऊलही ठेवत नव्हते तेथील रस्ता प्रशस्त केला. पैठण गेट ते गुलमंडी रुंद झाली; पण कैलासनगरचा रस्ता अर्धवट राहिला. किराडपुऱ्यातही अशीच स्थिती झाली. अशी अनेक कामे गेल्या दहा - बारा वर्षांत मध्येच बारगळली आहेत. त्यामुळे ना लोकांना त्याचे समाधान का महापालिकेला श्रेय, अशी अवस्था आहे. त्यामागे प्रमुख कारण म्हणजे कोणत्याही मोहिमेसाठीची रीतसर आखणी करण्याची प्रथाच नाही. मोहीम फत्ते करायची असेल तर त्यात नेमके कोणते अडथळे येऊ शकतात आणि ते दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काय करावे लागेल, याचा कोणताही विचार महापालिकेचे अधिकारी करत नाहीत आणि पदाधिकारी त्यांना विचारत नाहीत. सेव्हन हिल ते एकता चौक, गजानन महाराज मंदिर ते जयभवानी चौक रस्त्यांची कामे हेच सांगतात. निम्मे काँक्रिटीकरण झाल्यावर रस्त्याखाली ड्रेनेज लाइन आहे आणि ती स्थलांतरित किंवा दुरुस्त केल्याशिवाय पुढे काम करता येणार नाही, असे अधिकारी सांगतात. मग त्याची जबाबदारी एका ठेकेदाराकडून दुसऱ्यावर ढकलली जाते. काम रेंगाळत जाते. धुळीचे लोट उठत राहतात. खड्ड्यांतून लोक मार्ग काढत राहतात. त्याच रस्त्याने ये-जा करणारे महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी शांतपणे पाहत राहतात. काम सुरू करण्याचे नवनवे मुहूर्त जाहीर करतात. खरे तर मोहीम हाती घेण्याआधीच या साऱ्या अडचणी, अडथळ्यांचा विचार केला असता तर औरंगाबादकरांचे हाल झाले नसते. परंतु, केवळ घोषणा करणाऱ्यांची गर्दी झाली की असेच होणार. जिन्सी - राजाबाजार रस्त्यावर धार्मिक स्थळे आहेत. शिवाय काही नागरिकांचा टीडीआर, एफएसआय घेण्यास विरोध असू शकतो, याचा अंदाज मनपाच्या अधिकाऱ्यांना होता. त्यातून कसा मार्ग काढायचा, त्यासाठी कोणी पुढाकार घ्यायचा, धार्मिक स्थळांबाबत नेमके काय करायचे, हेही त्यांनी मोहीम सुरू करण्यापूर्वीच ठरवणे अपेक्षित होते. नव्हे, ती त्यांची प्रमुख जबाबदारी होती. बकोरियांनी ती तयारी करून घ्यायला हवी होती. औरंगाबाद शहराच्या मानसिकतेबद्दल बकोरियांना खोलात माहिती असणे कठीण आहे. ती वर्षानुवर्षे येथेच राहिलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना द्यायला हवी होती किंवा बकोरियांनी जाणून घेणे गरजेचे होते. पण यापूर्वीच्या अनेक कामांमध्ये, मोहिमांत जे झाले तेच येथेही झाले. रस्त्यांवर काटे असू नयेत, हे महापालिकेचे काम आहे. प्रत्यक्षात रस्त्यांवर काटेरी कुंपणे उभारणे सुरू आहे. आता ही कुंपणे काढण्यासाठी सर्वपक्षीय राजकारणी, आमदार तसेच बकोरिया आणि महापौर भगवान घडामोडे हातात हात घेतील आणि पुढील मोहिमा खऱ्या अर्थाने पूर्ण करतील, अशी अपेक्षा करण्यास काही हरकत आहे का?