Tuesday 22 June 2021

चक्रीवादळी नीना

‘आँ ... काय सांगताय’, ‘खरंच की काय’, ‘अरे बापरे ... भयंकरच आहे हे’, ‘कठीण आहे, यावर विश्वास ठेवणं’, ‘खूपच धाडसी आहे ती. तिला हवं ते मिळवलंय तिनं’ असे उद्गार १९८९ मध्ये पहिल्यांदा ही बातमी कानावर पडली तेव्हा लोक बोलत होते. समांतर सिनेमा जगात रमलेली आणि क्रिकेटवाली मंडळी त्यात आघाडीवर होती. पेप्रांचे कॉलमच्या कॉलम तिच्या त्या बातमीनं भरून गेले होते. त्या घटनेला ३२ वर्षे उलटून गेली तरी ती अजूनही प्रसारमाध्यमांची आवडती आहे. तिच्यासोबतच्या, तिच्यापेक्षाही अधिक चमकणाऱ्या अनेक तारका मागे पडल्या, लपल्या. काही संपूनही गेल्या. पण तिच्या नावावरील बातम्या विकल्या, वाचल्या, पाहिल्या जात आहेत. कोणालाही हेवा वाटावा अशा प्रसिद्धीच्या लाटेवर ती कायम आहे. तरीही ... तरीही ती काहीशी आंतरिक दुखावलेली, स्वतःपासूनच दुरावलेली आहे. आपल्याला जे हवं ते आपण हट्टानं, धाडसानं मिळवलं. पण ते आपल्याजवळ आपल्याला हवं तसं का राहिलं नाहीॽ आपलं काय चुकलंॽ असे प्रश्न तिला पडले आहेत. पडद्यावर सहनायिकेच्या भूमिकेत राहूनही बंडखोर नायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या आहेत नीना गुप्ता. ६२ वर्षांच्या जीवनात जे काही अनुभवलं, पाहिलं, जाणून-समजून घेतलं ते त्यांनी ‘सच कहूँ तो’ पुस्तकात मांडलंय. १४ जून रोजी या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झालंय. त्यामुळं त्यांच्यावरील प्रसिद्धीचा झोत आणखी प्रखर झालाय. १९८०च्या दशकातील क्रिकेट जगताचे अनभिषिक्त सम्राट सर व्हिव्हियन रिचर्डससोबत नीनांनी संबंध प्रस्थापित केले. त्या संबंधातून १९८९ मुलीला म्हणजे मसाबाला जन्म दिला. ‘होय, मी लग्नाविना मूल मिळवलं’ असं धाडसानं जगाला सांगितलं. लिव्ह इन रिलेशनशिप, एकल महिलांना समजून घेणं. त्यांच्याविषयी किंचित का होईना सन्मानाची भावना ठेवणं हळूहळू सुरू होतंय. तरीही ती घटना भारतीय समाजातील प्रचंड मोठ्या वर्गाला धक्कादायक वाटते. त्या काळी तर भूकंपच झाला. काही व्यक्ती वादळी तर काही चक्रीवादळासारख्या असतात. त्या स्वतःभोवतीच धुळ उडवत फिरत राहतात. त्यातून त्यांना किनाऱ्यावर आदळल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. नीना अशाच चक्रीवादळी. ४ जुलै १९५९ रोजी दिल्लीत जन्मलेल्या, संस्कृत भाषेत मास्टर्स, एम.फिल. केलेल्या नीनांनी या आत्मचरित्रात्मक पुस्तकात भूकंपाचे अनेक हादरे दिले आहेत. काही रहस्येही सांगितली आहेत. त्यातील काही चक्रावून टाकणारी आहेत. त्यांनी सांगितलंय की, रिचर्डसकडून होणाऱ्या बालकाला बाप म्हणून कोणाचं नाव लावावं, असा प्रश्न उभा ठाकला. तेव्हा प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक, सतीश कौशिक यांनी त्यांच्याशी विवाहाची तयारी दाखवली होती. बाळ कृष्णवर्णीय जन्माला आलं तर ते सतीश कौशिककडून झालंय, असं तु जगाला सांगू शकतील, असा कौशिकांचं म्हणणं होतं. पण रिचर्डसशिवाय कोणालाही आयुष्यात प्रवेश द्यायचाच नाही, असं त्यावेळी ठरवलं होतं. त्यामुळं त्यांनी कौशिकांचा प्रस्ताव धुडकावून लावला. पुढं मसाबाचा जन्म झाल्यावर लग्नाविना मूल जन्माला घालणारी महिला असं म्हणून त्यांना सिनेमात निगेटीव्ह भूमिकाच ऑफर होऊ लागल्या. आणि सिनेमातील पुरोगामींचा एक वेगळा चेहरा त्यांच्यासमोर आला. एकट्याने राहणे शक्यच नाही, असे लक्षात आल्यावर नीनांनी विवेक मेहरांशी वयाच्या पन्नाशीत लग्नही केलं. अर्थात मसाबाला विश्वासात घेऊन. तिनं होकार दिल्यावरच. पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी प्रख्यात अभिनेत्री करीना खान कपूर यांना दिलेल्या मुलाखतीत नीना सांगतात की, तसं तर मी गेल्या २० वर्षांपासून पुस्तक लिहण्याची तयारी करत होते. पण कोरोनाचं संकट आल्यावर उत्तराखंडातील एका गावात राहण्यास गेल्यावर बरंच लिखाण केलं. त्या वेळी मला जाणिव झाली की, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळात माझा कोणी प्रियकर नव्हता. मी पतीविना होते. काही प्रेमप्रकरणं झाली. पण त्यातील एकही पूर्णत्वाला गेलं नाही. एक लग्न आई-वडिलांनी ठरवलं. पण शेवटच्या क्षणी मुलानं नकार दिला. लग्न मोडलं. एकूणात मी पूर्णपणे एकटीच राहिले. या पुस्तकात नीनांनी त्यांचं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील शिक्षण, मुंबईच्या सिनेजगतातील संघर्ष, यश, राजकारण, काम मिळवून देण्यासाठी लैंगिक शोषण अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या वाचकांना निश्चितच सिनेमावाल्यांचा आणखी एक चेहरा दाखवतील. चेहऱ्यावरील एक बुरखा हटवतील. या निमित्ताने एकाकी चक्रीवादळाचं विचार, अनुभवविश्वही समजेल.

Wednesday 9 June 2021

द फर्स्ट गर्ल

काही आत्मकथनाची पुस्तकं अशी असतात की, ती हातात पडल्यावर आपण लगेच वाचायला सुरूवात करतो. विषय स्फोटक असतो. मांडणी धारदार असते. जागतिक प्रश्नांचा वेध घेतलेला असतो. त्यामुळे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचला जातो. पानामागून पाने उलटली जातात. पूर्ण वाचून झाल्यावर आपण चिंताक्रांत होऊन जातो. काय होणार आपलंॽ आपल्या देशाचं, जगाचं कसं होईलॽ असा विचार चक्रीवादळासारखा फिरू लागतो. दिवस उलटतात. त्या पुस्तकात मांडलेला विषय मागे पडतो. ते कपाटात जाते किंवा त्यावर जणू धूळ साचते. अन् अचानक अशा घटना घडतात की, ते पुस्तक पुन्हा कपाटातून बाहेर येते. आधीपेक्षा अधिक बारकाईने पानन् पान वाचले जाते. शब्दा-शब्दांत नेमके काय म्हटले आहे. दोन शब्दांमध्ये काय दडलं आहे, हे जाणून घेण्यासाठी विचार धावू लागतात. लेखकानं मांडलेला विषय किती जळजळीत, जिवंत आहे. मानवी मूल्यांविषयी त्यात किती तिखट, मूळ प्रश्न उपस्थित केला आहे, याची जाणिव होऊ लागते. आणि हे पुस्तक केवळ एक आत्मकथन नसून त्यात काही सूचना, संकेत दिले आहेत. वैश्विक संदेश, ऐतिहासिक दस्तावेज दडलेला आहे. असंही उलगडू लागतं. आणि हेच त्या आत्मकथनाचं बलस्थान असतं. ‘द लास्ट गर्ल’ या पुस्तकात हे सारं आपणास अनुभवास येतं. १९८०-९०च्या काळात भारतात काहीही घडले तरी त्या मागे परकीय शक्तीचा हात आहे, असं म्हटलं जायचं. अगदी पाऊस कमी, जास्त झाला तरी परकीय, तिसरी शक्ती अशी नावं घेतली जायची. आता त्याचं रुप जागतिक पातळीवर बदललंय. अमेरिका, इस्त्राइल मिळून सगळं काही घडवून आणतंय, असं सांगणारा एक मोठा वर्ग आहे. नऊ-दहा वर्षांपूर्वी सिरीया, इराकमध्ये भयंकर हत्याकांड करणाऱ्या आयसिस या मुस्लिम दहशतवादी संघटनेच्या पाठिशीही अमेरिकाच असल्याचं म्हटलं जातं. त्यात किती तथ्य आहे, याचं खरं उत्तर काळच देईल. पण एकमात्र खरं की आयसिसनं याजिदी धर्माच्या हजारो निरपराधांना संपवलं. संपवण्यापूर्वी भयंकर अत्याचार केले. तरुणी, महिलांवर बलात्कार केले. माणुसकीची मान शरमेनं खाली जाईल, असा हाहा:कार उडवला. काही प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडं आयसिसवाल्यांनीच पाठवलेल्या फुटेजवरून बातम्या दिल्या. पण, त्या क्रूर संघटनेच्या विचारांची जडणघडण, कार्यपद्धती हे सारं जगासमोर अत्यंत धाडसाने आणलं एका तरुण महिलेनं. त्यांचं नाव नादिया मुराद. २०१४मध्ये आयसिसनं इराकमधील नादियांच्या गावावर हल्ला केला. त्यांना १२ हजार रुपयांत खरेदी केलं. त्यांच्या आई, सहा भावांना त्यांच्या डोळ्यादेखत गोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्या आईसह ऐंशी वयस्क महिलांना एकाच कबरीत पुरून टाकण्यात आलं. नादियांना एका दहशतवाद्याकडून दुसऱ्याकडं विकण्यात आलं. विकृतांच्या टोळीनं त्यांच्या देहाचे अनेक लचके तोडले. एकवेळ तर नादियांना असं वाटलं की आपलं आयुष्य संपलं. पण त्याचक्षणाला कोठून कोणास ठावूक तिच्यात एका शक्तीचा संचार झाला. आपण जगलं पाहिजे. जगण्यासाठी लढलंच पाहिजे, हा विचार प्रबळ झाला. या विचारानं झपाटलेल्या नादियांसाठी मग कोठडीची दारे हळूहळू किलकिली होत गेली. अनेक युक्त्या-प्रयुक्त्या करत, धडपडत, काहीवेळा माघार घेऊन पुढे जात, वेशांतर करत, स्वतःची ओळख लपवत त्या आयसिसच्या मुलुखातून बाहेर पडल्या. कुर्दिस्तानमार्गे जर्मनीत आणि तेथून जगभरात पोहोचल्या. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. आयसिसच्या हल्ल्यानंतर वर्ष-दोन वर्षांत त्यांनी जे काही भोगलं ते ‘द लास्ट गर्ल‘ या पुस्तकात सांगितलं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊससाठी सुप्रिया वकिल यांनी ते मराठीत आणलं आहे. ३०७ पानांच्या या पुस्तकात प्रारंभीचा काही भाग सोडला तर प्रत्येक पानावर थरार आहे. याजिदी नावाचा धर्मच पृथ्वीतलावरून समूळ संपवून टाकायचा असं म्हणत आयसिसनं नेमकं काय केलं. शेकडो वर्षांपासून मुस्लिमांसोबत शांततेनं राहणाऱ्या याजिदींना कसं बेचिराख केलं. पळून जाण्यासाठी कसं भाग पाडलं. हे सांगणारी वर्णनं अंगावर शहारा आणतात. आणि अंर्तमनाला सावधानतेचा सुप्त इशाराही देतात. त्यामुळं हे पुस्तक आवर्जून वाचावं, असं आहे. त्याचं नाव नादियांनी ‘द लास्ट गर्ल’ म्हणजे आयसिसच्या तावडीतून सुटलेली शेवटची मुलगी अशा अर्थानं दिलं असावं. खरं तर ते आयसिसविरुद्ध लढणारी ‘फर्स्ट गर्ल’ असं हवं होतं, अशी भावना पुस्तक वाचून झाल्यावर निर्माण होते.

Thursday 3 June 2021

नव्या पिढीची ख्रिस्तिना

ख्रिस्तिना मारिया हेडिच अमनपोर असे त्यांचे लांबलच्चक नाव. १९९० च्या दशकात जगातील सर्वाधिक दहा लोकप्रियांच्या यादीत त्या होत्या. लांबलच्चक नावासारखे भारदस्त व्यक्तिमत्व आणि तेवढाच दराराही. त्या काळच्या त्या योद्ध्याच. फ्रंट वॉरियर. पण प्रत्यक्ष युद्धात भाग न घेताही शौर्य, धाडसाचे दर्शन घडवणाऱ्या ख्रिस्तिनांनी नेमकं काय केलं होतं. हे जाणून घेण्यासाठी तीस वर्षे मागे जावे लागेल. २ ऑगस्ट १९९०. इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेनने कुवैत देशात सैन्य घुसवले. मग अर्थातच जगाचा दादा असं म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वात काही युरोपीय राष्ट्रे एकत्र आली. आणि १७ जानेवारी १९९१ रोजी आखाती युद्धाला प्रारंभ झाला. महाबलाढ्य अमेरिकेसमोर सद्दामचा टिकाव टिकणे कठीण होते. तसेच झाले. २८ फेब्रुवारी १९९१ रोजी इराकच्या पराभवाने युद्ध संपले. पण तो महिनाभर सारे जग ते युद्ध एखादी क्रिकेट, फुटबॉलची मॅच पाहावे तसे डोळे भरून टीव्हीवर लाईव्ह पाहत होते. भारतीय लोक तर ते पाहून अवाक झाले होते. ते युद्ध एका कारणासाठी भारतीयांना आपल्या जवळचे वाटत होते. ते म्हणजे एकीकडून सद्दामची सेना स्कड मिसाईल डागायची. दुसरीकडून अमेरिकेचे पेट्रियाट मिसाईल त्याला हवेतच उडवून लावायचे. आपल्या रामायण, महाभारतातील अस्त्राचे म्हणजे आपलेच तंत्र अमेरिका – सद्दामने चोरले असेही लोक म्हणायचे. पण हे युद्ध टीव्हीच्या छोट्या पडद्यावर सीएनएन या त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावरील न्यूज चॅनेलमुळे पाहता आले. तेथे जगाने पहिल्यांदा ख्रिस्तिनांना पाहिले. त्या अतिशय बिनधास्तपणे रिपोर्टिंग करत होत्या. युद्धाचे अनेक बारकावे उलगडून दाखवत होत्या. लोकांचे दु:ख, वेदना मांडत होत्या. एकीकडे अमेरिकन सैन्य विजयाचा मार्ग प्रशस्त करत होते. दुसरीकडे ख्रिस्तिना जगभरातील महिला पत्रकारांना युद्धभूमीवरही कौशल्य, जिद्द, आत्मविश्वास दाखवण्याची वाट दाखवत होत्या. त्यावर पुढे अनेकींनी वाटचाल केली. त्यातील काहीजणी ख्रिस्तिनांना अभिमान वाटेल, धाडसात त्यांच्या दोन पावले पुढे टाकलेली कामगिरी करत आहेत. व्हाईज न्यूज, एचबीओ या अमेरिकन चॅनेलच्या इसोबेल येऊंग त्यापैकी एक आहेत. जेमतेम ३४ वर्ष ६ महिने वय असलेल्या इसोबेल यांची कामगिरी थक्क करून टाकते. काही वर्षांपूर्वी आयसिस या मुस्लिम दहशतवादी संघटनेने सिरीया, इराकमध्ये धुमाकूळ घातला होता. यझदी जमातीचे शिरकाण सुरू केले. तेव्हा त्या तेथे पोहोचल्या. बाँबहल्ल्यांच्या वर्षावात जीवावर उदार होऊन वार्तांकन केले. गृहयुद्धात बेचिराख होणाऱ्या येमेन, सिरिया, लिबियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून तेथील लोकांचे म्हणणे जगापुढे मांडले. दहशतवादी हल्ले, युद्ध, धर्माच्या नावाखाली कट्टरता हे त्यांचे आवडते विषय आहेत. त्यातही फोकस युद्धामुळे होणारे महिला, मुलांचे हाल. त्यांची परवड यावर असतो. अफगणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना त्यांनी वाचा फोडली. उग्येर प्रांतातील मुस्लिमांवर चीनी राजवट कसा वरवंटा चालवत आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन तिला जागतिक सन्मानाचा ऍमी पुरस्कार दोनदा आणि ग्रेसी पुरस्कार एकदा मिळाला आहे. त्यांचे वडिल चिनी. चांगल्या आयुष्याच्या शोधात ते १९८० साली हाँगकाँगमधून इंग्लडला आले. रेस्टॉरंट व्यवसायात स्थिर होताना एका इंग्लिश तरुणीशी विवाह केला. तर इंग्लिश माता आणि चिनी पित्याचे अपत्य असलेल्या इसोबेल यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून २००९ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आणि पाच वर्ष शांघाय आणि चीन सेंट्रल टेलिव्हिजनसाठी काम केले. २०१४ मध्ये अमेरिकेतील व्हाईज न्यूजने त्यांना निमंत्रित केले. युद्धखोर अमेरिकेच्या कुठे ना कुठे लष्करी कारवाया सुरूच असतात. त्यामुळे इसोबेल यांना आवडीचे काम मिळत गेले. युद्धभूमीवरून सवड काढून त्या टायकून टॉक नावाचा शो चालवतात. द इंडिपेंडंट, द टेलिग्राफ, चायना मॉर्निंग पोस्ट या दैनिकातही लिखाण करतात. बेंजामिन झांड नावाच्या एका ब्रिटीश-इराणी वंशाच्या पत्रकारासोबत त्या लिव्ह इनमध्ये आहेत. इसोबेल सांगतात की, बेंजामिनसोबतचे नाते मला जगण्याची, लढण्याची ऊर्जा देते. पण आणखीही एक रहस्य आहे. काहीही असले तरी मला रात्री अतिशय गाढ झोप लागते. ही गाढ झोपच मला सकाळी ताजेतवाने करते. लोकांच्या उपयोगाचे, त्यांच्या जीवनात काहीतरी देऊ शकेल, असे शोधण्याची शक्ती, प्रेरणा देते. तरुण पिढीची ख्रिस्तिना असलेल्या इसोबेल यांनी असं अतिशय प्रामाणिकपणे स्वत:च्या उर्जा, प्रेरणास्त्रोताविषयी सांगणंही प्रेरणादायीच आहे ना?