Tuesday 27 April 2021

मनो‘भावे’विश्व

सिनेमाच्या दुनियेत थोडंसं स्थिरसावर होऊ लागलं की कलावंतांसमोर एक पेच उभा असतो. तो म्हणजे लोकांना आवडेल असं आपण घडायचं की आपल्याला जे मनापासून आवडतं तेच करत राहायचं. बहुतांश कलावंत लोकांसोबत जाण्याचं ठरवतात. कारण त्यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. खूप मोठ्या वर्गासोबत तुम्ही जोडले जातात. मात्र, काहीजण विशिष्ट वर्तुळात राहणं पसंत करतात. स्वत:ला मनापासून भावणाऱी कला निर्मिती करत राहतात. सातत्याने त्याच वर्तुळात राहिल्याने त्यांना काही तोटे सहन करावे लागतात. पण टिकून राहिल्यावर कालांतराने फायदेही मिळतात. तळागाळातील अस्सल रसिकांपासून हे कलावंत शेकडो मैल दूर असले तरी मिडिआ, अभिजन वर्गावर त्यांची मजबूत पकड कायम असते. ही पकड असण्यामागे अनेक कारणे असली तरी एक महत्वाचे म्हणजे त्यांना विषयाचे उत्तम भान असते. कोणता विषय चर्चेत येऊ शकतो किंवा कोणत्या विषयावर उच्च वर्गात, मिडिआत अधिक चर्चा घडून येऊ शकते, याचा अंदाज त्यांना असतो. त्यामुळे ही कलावंत मंडळी सातत्याने उजळत राहतात. प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक, लेखिका, पटकथाकार सुमित्रा भावे, अशाच उजळलेल्या होत्या. त्यांनी अतिशय मनापासून सिनेमाचे माध्यम हाताळले. कोणी सहसा वाटेला जाणार नाही, अशा विषयांना हात घालत स्वत:चे भाव विश्व सर्वांसाठी खुलं केलं होतं. त्यामुळं त्यांचं जाणं क्लेशदायी आहे. पडद्यावर मांडण्यासाठी सशक्त गोष्ट समाजात घडणाऱ्या, दिसणाऱ्या घडामोडींतूनच उचलण्याची एक अजब शक्ती त्यांच्यात होती. कासव सिनेमातून त्यांनी ते सिद्ध केले. त्यावर राष्ट्रीय पारितोषिकाची मोहरही उमटली. पण त्यापलिकडे ‘हा भारत माझा’ या सिनेमाचं उदाहरण आहे. २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी जनलोकपाल विधेयकासाठी दिल्लीत आंदोलन सुरू केलं होतं. बघताबघता अख्खा देश या आंदोलनात सहभागी झाला. देशभर एकच धुरळा उडाला. चॅनेलवाले, मिडिआवाले हात धुऊन घेत होते. पण या प्रश्नाचं मूळ काय होतं. अण्णांच्या आंदोलनाचा गाभा काय होता. त्याचा आणि सामान्य भारतीय तरुणाचा काय संबंध होता, याची अतिशय मर्मभेदी मांडणी सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी ‘हा भारत माझा’मध्ये केली होती. त्याचं कथानक असं होतं की, इंजिनिअर होण्याची इच्छा असलेल्या इंद्र सुखात्मे नावाच्या एका मुलाला बारावीत ९० टक्के मिळालेत. आणि प्रवेश ९१ टक्क्यांवर थांबलाय. वडिलांना वाटतंय त्यानं खासगी कॉलेजात पैसे देऊन प्रवेश घेण्यापेक्षा थोडी स्वस्तातली, वेगळी वाट शोधावी. आहे त्यात समाधान मानावं. पण आई म्हणते की, मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे. सरळ मार्गानं जाऊन यशस्वी कसं व्हायचं? भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भारतात असं यश मिळवता येतं का, असा प्रश्न सुमित्रा भावे यांनी उपस्थित केला होता. त्या सिनेमाला दहा वर्ष होत आली. अजूनही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. सिनेमाचा विषय आजही तेवढाच ताजा आहे. एवढी दूरदृष्टी आणि समाजमनाचे आकलन त्यांच्याकडे होते. सिनेमा पाहून बाहेर पडणारा प्रेक्षक सिनेमाच्या विषयात दीर्घकाळ गुंतून राहिल, अशी क्षमता त्यांच्यात होती, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण त्यातही एक वेगळेपण असे होते की, त्यांची मांडणी सामाजिक प्रश्नांना, विषयाला धरून असली तरीही कुठे त्यात उपदेशाचा सूर त्यांनी लावला नाही. मांडणीचे अवडंबर, अतिशयोक्ती नाही. भपका तर नाहीच नाही. तुमच्या आजूबाजूला जे घडतंय तेच मी तुम्हाला सांगत आहे. असं बीज पेरून त्या कथावस्तूविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडत. ‘संहिता' सिनेमाही असाच वेगळ्या वळणाचा. म्हणजे असा की, चार महिला. त्यातील एक सिनेमा दिग्दर्शिका, दुसरी निर्माती, तिसरी लेखिका आणि चौथी अभिनेत्री. यातल्या दिग्दर्शिकेला मनासारखा शेवट असलेली कथा लिहायची आहे. पण असं शक्य आहे का? चौघींना आपल्या कथेचा शेवट सुखात करता येईल का, या प्रश्नाभोवती सुमित्रा भावेंनी अख्खा सिनेमा फिरवला आहे. त्या सांगत की, माझा स्वतःचा दिग्दर्शक म्हणून प्रवास निराळा असतो. माझ्या सिनेमांची कथा मला इतर कुणी देत नाही. मलाही नुसती स्वतंत्र कथा म्हणून सुचत नाही. तर सगळा सिनेमा डोळ्यांसमोर उलगडल्याप्रमाणे दिसू लागतो आणि मग मी तो कागदावर उतरवते. कथा-पटकथा-संवाद, कला-वेशभूषा इतकंच काय पण कॅमेरा-साऊंड यांच्या सूचनांसह अशी संपूर्ण स्क्रिप्ट लिहिते. आधी लिहिले मग अंमलात आणले, असे त्यांचे तंत्र होते. म्हणूनच तर त्या अभिजन वर्गासाठी अनेक दमदार सिनेमे देऊ शकल्या. नव्या पिढीतील लेखक, दिग्दर्शकांसाठी हे तंत्र दिशादर्शक नक्कीच आहे.

Tuesday 13 April 2021

चांदणी शिशिराची

जगात सदा सर्वकाळ सगळंच काही वाईट घडत नसतं. कुठेतरी आशेची किरणं उगवत असतात. एखादी का होईना पणती कोणीतरी धाडसाने पेटवतं. काळ्याकुट्ट काळोख्या अवकाशात एक चांदणी प्रकाशमान होतेच. ही निसर्गाची अद्भुत लीला आहे. मानवी जीवनातही असेच घडत असते. त्याचा अनुभव यंदा जागतिक महिला दिनी बांगलादेशाने घेतला. माणूस म्हणून अस्तित्वच नाकारलेल्या, ना मर्द ना औरत असे म्हणून कायम हिणावल्या गेलेल्या तृतीयपंथीयांच्या जमातीतील तश्नुवा अनान शिशिरने प्रख्यात बौशाखी या न्यूज चॅनेलवर अँकर म्हणून काम सुरू केले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणून तेथील मध्यमवर्गीयांनी या घटनेचे क्रांतीकारी असे वर्णन करत स्वागत केले आहे. १९४७मध्ये भारत आणि १९७१मध्ये पाकिस्तानातून वेगळ्या झालेल्या बांगलादेशात कट्टरपंथीयांचा धुमाकूळ कायम सुरू असतो. १६ कोटी लोकसंख्येच्या या देशात अल्पसंख्यांकांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना नेहमीच घडतात. धर्मविरोधी लिखाण केल्याचा ठपका ठेवून तस्लिमा नसरीन या प्रख्यात लेखिकेला परागंदा होण्यास भाग पाडणारा देश अशीही एक ओळख आहेच. तेथे २९ वर्षीय तनुश्वामधील उपजत गुणाला, कौशल्याला वाव मिळाला. तिला एक सन्मानाचे काम देण्यात आले, हे महत्वाचे आहे. घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ फांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ कानावर आली अनंतातुनी हाक विसरूनि पंख पाखरु उडाले एक या प्रख्यात रॉय किणीकर यांच्या ओळींची ‘विसरुनि समाजाचे डंख, पाखरु उडाले एक’ अशी रचना करत तनुश्वाने झेप घेतली आहे. अर्थात हे झेपावणे महाकठीण होते. तिच्या लढाईची सुरूवात घरापासूनच झाली. आपल्या घरात मुलाच्या रुपात मुलगी जन्माला आली आहे, असे कळताच तिच्या माता-पित्यांनी तिला तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना अक्षरश: लाथाडून हाकलले. वडिलांनी बोलणेच बंद केले. शेजारी टोमणे मारू लागले. मग तिने ढाका शहरातील एका वस्तीत राहण्यास सुरुवात केली. तेथे पदोपदी होणारा अपमान गिळत लढाईला प्रारंभ केला. अंगी उपजत हुशारी होतीच. त्या बळावर तिने शिक्षण पूर्ण केले. हॉर्मोन बदलाची शस्त्रक्रिया करून तिचे मूळ स्त्री रुप मिळवले. इतर तृतीयपंथीयांसारखे रस्त्यावर भीक मागत जगायचे नाही हे तर तिने ठरवलेच होते. म्हणून तिने स्वत:ला सांस्कृतिक जगात झोकून दिले. नटुआ, बोटोआ नावाच्या दोन कलापथकांमध्ये काम केले. उत्तम नर्तक आणि आवाजावर प्रभुत्वाची देणगी आपल्याला मिळाली आहे, याची जाणिव तिला याच काळात झाली. कला प्रांतातील अनुभव घेतल्यावर तिने सामाजिक क्षेत्राकडे लक्ष वळवले. तरुण, महिलांसाठीच्या संस्थांमध्ये काम करू लागली. बंधू समाजकल्याण संस्था, बांगलादेश मानवाधिकार संघटनेत तिने कर्तृत्वाचा ठसा उमटवला. बांगलादेशात १० हजार तृतीयपंथीय आहेत. पंतप्रधान हसिना शेख यांनी २०१३मध्ये त्यांची स्वतंत्र नोंद करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये मतदानाचा अधिकार दिला. देशाच्या सर्वोच्च नेत्याने दिलेल्या बळामुळे तश्नुवाला आणि तिच्यासारख्यांच्या पाठिशी उभे राहू इच्छिणाऱ्यांना धीर मिळाला. तनुश्वाच्या नेमणुकीसाठी पुढाकार घेणारे बौशाखी चॅनेलचे उपकार्यकारी संचालक टिपू अलोम म्हणाले की, आपल्या पंतप्रधान धाडसी निर्णय घेत असतील तर आपणही काही केले पाहिजे, असे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही तनुश्वासोबत आणखी एका तृतीयपंथीयाला नाट्य विभागात नियुक्त केले आहे. बंधू समाजकल्याण संस्थेत दीर्घकाळापासून काम करणारे तनवीर इस्लाम तनुश्वाला पडद्यावर अत्यंत विश्वासाने बातम्या देताना पाहून कमालीचे सुखावले. धर्माच्या पोलादी भिंतीत बंदिस्त बांगलादेशासारख्या देशात असे काही घडणे ही चांगल्या बदलांची सुरुवात आहे, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि ते म्हणाले ते सत्यच असावे. कारण तनुश्वाला नुकतेच दोन सिनेमांसाठी साईन करण्यात आले. त्यातील एका सिनेमात ती फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तृतीयपंथीयांमधील उत्तम नर्तक, अभिनेत्री आणि प्रसारमाध्यमांच्या अभ्यासकांना एक चांगला मंच मिळवून देण्यासाठी ती कार्यरत राहणार आहे. त्यामुळे शिशिराची चांदणी दिवसेंदिवस प्रकाशमान होत राहिल. तिच्यासोबत इतर तारकाही चमकू लागतील. त्यांच्या नशिबात तनुश्वासारखा खडतर प्रवास येऊ नये, एवढीच पुरुष आणि स्त्री म्हणून जन्मण्याचे भाग्य लाभलेल्यांकडून अपेक्षा आहे. अखेर थोडेसे भारत आणि पाकिस्तानबद्दल. भारतात २०१४ मध्ये तमिळनाडूतील लोटस् नामक न्यूज चॅनेलवर पद्मिनी प्रकाश या तृतीयपंथीयाला अँकर म्हणून संधी मिळाली. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे २०१८मध्ये मर्विया मलिक कोहीनूर या पाकिस्तानी चॅनेलवर झळकली. जगात सदा सर्वकाळ सगळंच काही वाईट घडत नसतं. कुठेतरी आशेची किरणं उगवत असतात, असेच तर तनुश्वा शिशिर, पद्मिनी प्रकाश, मर्विया मलिक सांगत आहेत.

बुशरा : परिपूर्ण ... तरीही

आधी हिंदू-मुस्लिम एकतेचे मोठे समर्थक असलेले बॅ. मोहंमद अली जीना हळूहळू बदलत गेले. २० मार्च १९४० रोजी लाहोरमध्ये झालेल्या मुस्लिम लीगच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत. ते एकत्र, एकाच छताखाली कधीच नांदू शकत नाहीत, असे सांगितले. २३ मार्च १९४० रोजी पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला. पुढे काय झाले हे सर्वांना माहिती आहेच. भारतीय उपखंडाचे दोन तुकडे झाले. कोट्यवधी लोकांना, प्रचंड हिंसाचारात मायभूमी सोडावी लागली. दोन्ही देशांच्या आरपार घुसलेला फाळणीचा भाला अजूनही कायम आहे. कधीच भरून निघणार नाही, एवढे नुकसान झाले. क्रिकेट आणि कलेच्या प्रांतात तर ते खूपच हुरहुर लावणारे, खुपणारे आहे. भारत एकच देश असता तर आपला क्रिकेटचा संघ किती बलाढ्य असता, अशी चर्चा चार दशकांपूर्वी असायची. आपल्या दिलीपकुमार, माधुरी दीक्षित, हेमामालिनी, अमिताभ बच्चनवर फिदा झालेले कोट्यवधी पाकिस्तानी रसिक आहेत. तसेच तिकडेही अनेक अत्यंत प्रतिभावान कलावंत आहेत. सिनेमा, नाटक, टीव्ही मालिकांमध्ये झळकणाऱ्या, गायिका-लेखिकाही असलेल्या बुशरा अन्सारी त्यापैकीच एक आहेत. आपल्या वहिदा रहेमान, आशा पारेख यांच्या अभिनयशैलीचे एक अप्रतिम मिश्रण त्यांच्यात आहे. शिवाय त्यांच्यात खळाळता विनोद निर्माण करण्याची क्षमता आहे. पुढील महिन्यात १५ मे रोजी ६६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बुशरा जेव्हा पडद्यावर अवतरतात. तेव्हा पडदा पूर्णपणे व्यापून टाकतात. चाळीसपेक्षा अधिक सिनेमा, सहा टीव्ही मालिका, दहा नाटकांमधून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र रसिकवर्ग निर्माण केला आहे. पण त्या केवळ कलावंतच आहेत, असे नाही तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत जागृत आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथीयांना खडे बोल सुनावण्यास मागेपुढे पाहत नाहीत. इतिहासात जे घडले ते घडले. कुटुंबे वेगळी झाली म्हणून मुलांमध्ये कटूता कशासाठीॽ असा त्यांचा सवाल आहे. दोन वर्षांपूर्वी भारत – पाकिस्तानात तणाव वाढला. अणुयुद्ध होणार का, असे वातावरण मिडिआवाले तयार करू लागले. तेव्हा बुशरा यांनी ‘हमसाये माँ जायी’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली. मिडिआवाले, राजकारण्यांना बाजूला सारत आता भारत पाकिस्तानातील गृहिणींनाच दोन्ही देशांची काळजी घ्यावी लागणार आहे. युद्धाचे वातावरण थांबवून मुलांमध्ये प्रेम भावनेची पेरणी करावी लागेल, असा संदेश देणारे हे गीत बुशरा यांची एक बहीण नीलम अहमद बाशेर यांनी लिहिले. त्यात बुशरांनी हिंदू तर त्यांची दुसरी बहिण अस्मा अब्बास यांनी पाकिस्तानी मुस्लिम गृहिणीची भूमिका केली आहे. अगदी शंभर चौरस फुटाच्या सेटवर चित्रीत झालेल्या या गाण्याने लाखो पाकिस्तानी रसिकांनाही अंर्तमुख केले. गाण्याचा भावार्थ समजून तसे वागले पाहिजे, अशा प्रतिक्रियाही सोशल मिडिआवर लोकांनी दिल्या. त्यामुळे बुशरांचे बळ वाढले. पण केवळ व्हिडिओ करून त्या थांबल्या नाहीत तर प्रत्येक मंचावर हा विचारही ठणकावून मांडला. ‘बुशरा’ नावाचा अर्थ अचूकता. परिपूर्णता, अचूकतेचा ध्यास असलेली व्यक्ती असा आहे. हा अर्थ त्यांनी सार्थ केला आहे. अर्थात कलावंत होण्याचे, व्यक्तीस्वातंत्र्याच्या कट्टर समर्थक असण्याचे बीज त्यांच्यात वडिलांकडून पेरले गेले. त्यांचे वडिल अहमद बाशी प्रख्यात व्यावसायिक लेखक होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्या बाल कलावंत म्हणून काम करू लागल्या. पण त्यांना खरी ओळख मिळाली १९७८ मध्ये पीटीव्हीवर आलेल्या फिफ्टी-फिफ्टी या विनोदी मालिकेतून. १९८३मध्ये त्यांच्या ‘आंगन तेडा’ मालिकेने एकच खळबळ उडवून दिली. कारण त्यात त्यांनी पाकिस्तानची कायम मुस्कटदाबी करणाऱ्या लष्करी राजवटीवर टीका केली होती. त्यामुळे त्या काही काळ अडचणीतही आल्या होत्या. पण त्यांनी माघार घेतली नाही. अन्वर मकसूद हे पाकिस्तानच्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ लेखक, विचारवंत. त्यांची ‘लूज टॉक’ मालिका प्रचंड लोकप्रिय होती. त्यात ते आणि ताकदीचे अभिनेते मोईन अख्तर समाजातील दांभिक लोकांच्या चिंधड्या उडवत. या मालिकेतील काही भागांमध्ये बुशराही होत्या. त्यात भूमिका साकारताना बुशरा यांनी जी वेगवेगळी रुपे धारण केली आहेत ती त्यांच्यातील समर्थ, बहुगुणी अभिनेत्रीची साक्ष देतात. पण, तरीही असे वाटते की, त्यांच्यातील प्रतिभेला तेवढा वाव मिळाला नाही. त्यांचा चाहता वर्ग, भुमिकांमधील वैविध्य पाकपुरतेच मर्यादित राहिले. फाळणीच झाली नसती तर त्यांच्यातील अभिनयाचा आणखी कस लागला असता. त्यांना विविधांगी भूमिका मिळाल्या असत्या. अन् भारतात आणखी एका रुपवान, परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या अभिनेत्रीची भर पडली असती.