Thursday 31 January 2019

तिबेटी निर्वासितांची कहाणी

अबे, तो पहा नप्पा चाललाय. चिनी आहे तो. डोळे तर गायबचंयत त्याचे. नाही रे जपानी दिसतोय. ए जपानी...एखादा अपऱ्या नाकाचा, लुकलुक्या डोळ्यांचा तरुण पाहिला की आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा संवाद असतो. दुसऱ्याला हीन लेखणे हे तर त्यात असतेच. शिवाय तो भारतीय नाही, हे पण सांगायचे असते. मग तो तरुण असामी, सिक्कीम किंवा मिझोराम, अरुणाचल प्रदेशाचा असला तरी त्याला चिनी, जपानी ठरवले जाते. म्हणजे दुसऱ्या जात, धर्म, पंथांविषयी द्वेष बाळगणे. त्याची हेटाळणी करणे, टिंगल उडवणे यापलिकडे अनेकजण जात आहेत. आणि मग हा तरुण तिबेटी आहे, असे लक्षात आल्यावर तर तुच्छतेचीही भावना व्यक्त होते. कारण तिबेटी निर्वासित आहेत. आपल्या देशात अनेक वर्षांपासून आश्रयाला आले आहेत. त्यांच्याशी आपण कसेही वागलो, त्यांच्याविषयी काहीही विचार केला तरी काय फरक पडणार, असा पवित्रा असतो. त्यांना चक्क नेपाळी म्हटले जाते. माणूस म्हणून त्यांच्या काय वेदना आहेत. आपले हक्काच्या घरातून कोणीतरी हाकलून दिले. म्हणून शेजाऱ्यांकडे आसऱ्याला राहणारी ही तिबेटी मंडळी मनावर मणामणाचे ओझे ठेवून कसे राहत असतील, याचा विचार बोटावर मोजण्याइतके राजकारणी करत असतील. संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या कलावंत, लेखक, दिग्दर्शकांनीही तिबेटींकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. तिबेटी लोक कष्टाळू, भारतीयांना आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेत असल्याचा हा परिणाम असावा. पण या निर्वासितांचे दुःख, वेदना, त्यांच्यावर असलेला चीनचा दबाव कोणाला तरी मांडणे आवश्यक वाटले. औरंगाबादेत नुकत्याच झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेल्या ‘क्योयोंग नगारमों – द स्वीट रिक्विअम’मध्ये अतिशय साध्या कथानकात हे सारे खूपच तीव्रतेने आले आहे. दिग्दर्शक रितू सरीन आणि त्यांचे पती तेनझिंग सोनम यांनी सहजतेने चित्रपटाची मांडणी करताना त्यातील प्रसंग, संवाद, नाट्यमयता, संघर्ष, रहस्य अशी अनेकविध बांधणी हृदयापासून केली आहे. ती पाहताना आपणही तिबेटी होऊन जातो. त्यांच्यावरील अन्यायाने किती परिसीमा गाठली आहे. त्यांच्याकडे निर्वासितापेक्षा माणूस म्हणून पाहणे किती गरजेचे आहे, हे कळते. चीनचा भारतात असाही हस्तक्षेप आहे, असा प्रश्न उपस्थित होते. दुसरीकडे खरेच आपण आपल्या देशात राहतो. आपण स्वतंत्र आहोत, ही किती भाग्याची गोष्ट आहे, अशीही भावना उचंबळून येते. याचे सारे श्रेय अर्थातच सरीन-सोनम या दांपत्याला आहे. शिवाय तेनझिंग डोलकर, जंपा कलसंग, शावो दोरजी आणि भूमिका जगणाऱ्या कलावंतांना द्यावे लागेल.
‘क्योयोंग’ची कहाणी थोडक्यात अशी. २६ वर्षांची तेनझिंग डोलकर दीड तपापूर्वी निर्वासत म्हणून भारतात येते. दिल्लीतील तिबेटी नागरिकांच्या वसाहतीत ती लहानाची मोठी होते. ब्यूटी पार्लरमध्ये काम करू लागते. तिचा नुकताच एक ब्रेकअपही झालाय. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे तिबेटमधून भारतात येण्याचा तिचा प्रवास खूपच भयंकर झालाय. चिनी लष्कराच्या गोळ्या चुकवत वडिल आणि इतर काहीजणांसोबत भारताची वाट शोधत असताना त्यांची भेट गोंपो नावाच्या एका वाटाड्याशी होते. तो त्यांना दोन दिवस साथ देतो. पण तिसऱ्या दिवशी घरी मुलगी आजारी असल्याने तो त्यांना अर्धवट रस्त्यात सोडून देतो. गाढ झोपेत असलेल्यांना तसेच सोडून एक प्रकारे पळच काढतो. दिलेला शब्द पाळत नाही. जाताना तो त्याच्याकडील एक ताईत डोलकरला देऊन जातो. त्याला जात असताना फक्त डोलकरने पाहिलेले असते. नेमका मार्ग माहिती नसलेले हे सारेजण मग चिनी लष्कराच्या गोळीबारात सापडतात. डोलकर नशिबाने वाचते. इतकी वर्ष होऊन गेली तरी तिला गोंपोचा चेहरा लख्ख दिसत असतो. आणि एक दिवस गोंपो डोलकरच्या आयुष्यात येतो. ती त्याला ओळखते. तुम्ही आम्हाला त्या दिवशी वाऱ्यावर का सोडून गेलातॽ असा विश्वासघात का केलाॽ आमच्यासोबतचे जे लोक चिनी लष्कराच्या गोळीबाराला बळी पडले. त्याला तुम्ही जबाबदार नाहीत काॽ तुम्ही खरंच वाटाडे आहात काॽ असे प्रश्न तिला गोंपोला विचारायचे आहेत. पण तिचा मित्र तर गोंपो म्हणजे तिबेटी स्वातंत्र्यासाठी लढणारा नेता आहे, असे सांगतो. मात्र, डोलकर स्मरणशक्तीवर ठाम आहे. ती गोंपोचा पाठलाग सुरू करते. आणि अचानक दोन चिनी गुप्तहेरही गोंपोच्या मागावर आहेत. ते त्याला धमकावत असल्याचे तिच्या लक्षात येते. पुढे काय होते, याचा उलगडा चित्रपट पाहूनच करून घ्यावा, असा आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातील मानवी जीवनात जे काही सुरू आहे, त्याची मांडणी करणाऱ्या दर्जेदार कलाकृती, अशी अपेक्षा असते. ‘क्योयोंग‘ने ती पूर्ण केली आणि संवेदनशील भारतीयांना अंतर्मुख केले एवढे नक्की. 

लुटालूट

खासगीकरणातून कचरा संकलनाच्या ठेक्यात जे अडथळे आणले जात आहेत. ठरवून काही गोष्टी सुरू आहेत. ते पाहून या शहराचे भले चिंतणारा प्रत्येकजण निराश होत आहे. औरंगाबादच्या दुर्दैवाचे दशावतार कधी संपणार कोणास ठाऊकॽ असा प्रश्न त्याला पडू लागला आहे. इथल्या कामांवर लक्ष देण्यासाठी निवडून दिलेले कारभारीच स्वतःच्या जबाबदारीबद्दल पूर्ण प्रामाणिक नाहीत. लोकांचे भले करण्याची आश्वासने देऊन आपण निवडून आलो आहोत, याचा त्यांना केव्हाच विसर पडलाय, ही तर आता नव्याने सांगण्याची गोष्ट राहिलेलीच नाही. पण त्यात आता अशी भर पडली आहे की, गाव वसवण्याआधीच लुटालूट सुरू झाली आहे. म्हणजे बहुतांश लुटारू, ठग मंडळी आधी एखादे संपन्न आहे का, याची चौकशी करत. गावातील सुगीचा मोसम संपल्यावर हल्ला करत. अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, एखादा रस्ता असो की ड्रेनेज लाईन, इमारत बांधणी. थोडेसे काम सुरू झाल्यावर त्याचा दर्जा खराब करण्यासाठी ठेकेदाराशी संगनमत केले जायचे. त्यातून आर्थिक वाटाघाटी व्हायच्या. सरळ बोटाने पाहिजे तेवढे तुप निघत नाही, असे लक्षात आल्यावर सर्व पक्षांची कारभारी मंडळी सर्व मतभेद विसरून एकत्र येत. मिडिआला हाताशी धरून आरडाओरड करत. आणि मग काम बऱ्यापैकी दर्जा राखून पूर्ण होत असे. पण आता जे काही अगदी पायंडा म्हणून सुरू आहे. ते अस्वस्थ करणारे तर आहेच. शिवाय संपूर्ण शहराला एका खोल, काळ्या दरीत ढकलून टाकणारे आहे. सर्वच कारभारी यात सहभागी नाहीत. पण मूक पाठिंबा देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अधिकाऱ्यांबद्दल तर विचारायची सोयच नाही. वाटाघाटीसाठी सर्व काही विसरणाऱ्या या अधिकाऱ्यांकडे कोणी भ्रष्ट म्हणून बोट दाखवले तर लगेच ते जाती-धर्माचे अस्त्र बाहेर काढतात. अमूक काम करा, शिस्त पाळा, जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा, असे म्हटले की अधिकारी, कारभाऱ्यांचे आणि काही सेवाभावी संस्थांचे कोंडाळे शिस्त लावणाऱ्यालाच घेरते. खालच्या पातळीवर पोहोचत हल्ले करते. तेच पुन्हा समोर येत आहे. सहा महिन्यांपासून रेड्डीज कंपनीला कचरा संकलन ठेका देण्याची प्रक्रिया सुरू होती. दहा वर्षांपूर्वी रॅम्के नावाची अशीच संस्था आली होती. पाच-सहा महिने होताच रॅम्केचे काम चांगले नाही. कचराच उचलला जात नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी सुरू केली. दुसरीकडे मनपाच्या कर्मचाऱ्यांना रॅम्केने सामावून घ्यावी, असा धोशा सुरू झाला. आंदोलने, घोषणाबाजी, काम बंद असेही झाले. शेवटी ती संस्था पळून गेली. त्यातून कोणताही धडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही, असे आता दिसते. कारण रॅम्कीच्या वेळी जे झाले त्याच दिशेने रेड्डीज संस्थेची वाटचाल सुरू झालीय. ती देखील कामकाजाला सुरूवात होण्याच्याआधीच. दहा वर्षांपूर्वी जे झाले त्याच्या अनेक कहाण्या समोर येतात. त्यापैकी जी सर्वचजण वारंवार सांगतात ती अशी होती की, रॅम्कीच्या व्यवस्थापनाने आपली माणसे घ्यावीत, असा दबाब तत्कालिन नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी टाकला. त्यात आजी-माजी आमदार सहभागी झाले होते. त्यापेक्षाही पुढील हद्द काहीजणांनी गाठली होती. त्यांनी विशिष्ट वॉर्डातील कचरा उचलण्याचे सब कॉन्ट्रॅक्ट घशात घातले होते. पण काम करण्यास ते तयार नव्हते. रॅम्कीने माझ्याच रिक्षा कचरा उचलण्यासाठी लावल्या पाहिजेत, असा दबाब ते टाकत होते. आताही यापेक्षा काही वेगळे सुरू असेल असे वाटत नाही. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना कचरा विषयाचे तज्ज्ञ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आणले. पण विषयाचे तज्ज्ञ असणे आणि कचऱ्यातून कमाईवरच डोळा ठेवणाऱ्या टोळीशी लढणे, यात जमीनअस्मानाचा फरक आहे. तो डॉ. निपुण यांच्या लक्षात येऊ लागला आहे. म्हणूनच त्यांनी काही दिवसांपूर्वी भलामोठा दगड उचलणे सोपे पण मनपात काम करणे कठीण असे ट्विट केले होते. डॉ. निपुण यांच्या कार्यपद्धतीतील एक दोष म्हणजे ते संवेदनशील नागरिक, प्रसारमाध्यमांना टाळून टोळीशी लढू इच्छितात. त्यात त्यांना यश येणे कठीणच आहे. कारण टोळी खूपच मोठी आणि पसरलेली आहे. टोळीतील अनेकांनी चेहऱ्यावर चांगुलपणाचे बुरखे चढवले आहेत. त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत. अनेक  अधिकारी, ठेकेदारांशी त्यांचे सूत जुळलेले आहे. गाव वसण्याआधीच लूटालुट करायची असे ठरवून ते घोड्यांवर स्वार होत गावामध्ये दाखल झाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी किंवा त्यांच्याकडून कमीत कमी भ्रष्टाचारात किमान दर्जाचे काम करून घेण्याकरिता डॉ. निपुण यांना व्यवहारात आणखी निपुण व्हावे लागेल. शहरासाठी काही चांगले करू इच्छिणारे लोक तसेच प्रसारमाध्यमांची मदत घ्यावीच लागणार आहे. अन्यथा कचरा संकलनाची आखलेली योजना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडेल. यात निपुण यांचे फारसे काही बिघडणार नाही पण १५ लाख औरंगाबादकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान होईल. एवढे नक्की. 

Sunday 13 January 2019

एकपात्री अस्सल, इरसाल

मराठवाड्याचा अनेक क्षेत्रात बॅकलॉग आहे. तो आणखी किती वर्षे राहिल माहिती नाही. पण कलाप्रांतात तो राहिलेला नाही. उलट मुंबई-पुण्याच्या कलानगरीवर इथले कलावंत ठसा उमटवत आहेत. रसिकांच्या हृदयात स्थान मिळवत आहेत. दरवर्षागणिक त्यांची संख्या वाढतच आहे. एकपात्री प्रयोगाचा किल्ला लढवणारे, अस्सल व्यक्ती आणि इरसाल वल्ली असलेले प्रभाकर निलेगावकर त्यापैकी एक आहेत. अतिशय जिद्दीने त्यांनी रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नवीन शोधले पाहिजे. सादर केले पाहिजे. रसिकांचे मनोरंजन करण्याचे, त्यांना हसवण्याची जबाबदारी गांभीर्याने पार पाडली पाहिजे, अशा कमिटमेंटनी ते कार्यरत आहेत, हे सर्वात महत्वाचे आहे. टीव्ही मालिका असो की चित्रपट, नाटक, चित्रकला, शिल्पकला, तांत्रिक  कौशल्य साऱ्यात मराठवाड्याचे कलावंत अलिकडील काही वर्षांत क्लिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेतच. पण मला जे प्रमुख वाटते ते असे की अस्सलपणा, जिवंतपणा, जीवनाशी भिडण्याची, लढण्याची आणि त्यातून कला निर्मितीची शक्ती ग्रामीण भागाकडे वळाली आहे. आणि कृत्रिमतेत अडकून पडलेली सृजनता बाहेर येत आहे. मुंबई-पुणेकरांनाही तिचे महत्व कळाले आहे. आपली निर्मिती एका विशिष्ट चाकोरीतील आहे. दिवाणखाण्यातच ती फिरते. तिच्यात रसरशीतपणा, तजेलदारपणा नाही, असे त्यांच्या लक्षात आले आहे. म्हणून त्यांनी ग्रामीण भागातून, भारताच्या छोटेखानी शहरांतून येणाऱ्या कलावंतांना स्वीकारणे सुरू केले आहे. त्यामुळेच मूळ औरंगाबादकर आणि आता पुण्यात स्थायिक निलेगावकर यांच्या कलाकृतींना भरभरून दाद मिळत आहे. त्यांचा ‘पुलंच्या व्यक्ती – वल्ली आणि गणगोत’ हा एकपात्री प्रयोग सध्या चर्चेत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात काही वर्षांपूर्वी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम केलेले निलेगावकर निवृत्तीनंतर निवांतपणे जीवन व्यतित करू शकले असते. पण अंगातील अभिनेता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. वयाचे कारण पुढे करून आराम करणे हा संस्कार त्यांच्यावर कधीच नव्हता. म्हणून त्यांनी पुलंच्या व्यक्ती-वल्लीची स्वतः निर्मिती केली. त्याचे दिग्दर्शन जुन्या पिढीतील प्रख्यात अभिनेते श्रीकांत मोघे यांनी केले आहे. अनेक दशके विशिष्ट वर्गातील रसिकांना मनसोक्त हसवणारे पु. लं. देशपांडे यांनी अनेक व्यक्तिरेखा निर्माण केल्या. त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवले. कारण त्यामागे पुलंची सिद्धहस्त लेखणी तर होतीच शिवाय अतिशय सूक्ष्म असे निरीक्षणही होते. केवळ शब्दांच्या मांडणीतून त्यांनी साऱ्या व्यक्तिरेखा अशा काही चितारल्या की त्या साक्षात आपल्याशी बोलू लागतात. मनातले सारे काही सांगू लागतात. त्यांच्याबद्दल वाचताना आपण कधी त्यांच्यात गुंतून जातो, हेच लक्षात येत नाही. पण दुसरीकडे हेच सामर्थ्य अभिनेत्यांची परीक्षा घेणारे ठरते. म्हणजे व्यक्तिरेखेचा प्रचंड तपशील उपलब्ध. त्यातील नेमका कोणता उचलायचा कोणता वगळायचा, असा प्रश्न अभिनेता, दिग्दर्शकासमोर उभा राहतो. बरं, या व्यक्तिरेखा पुलंसह अनेक नामवंतांनी यापूर्वी साकारल्या आहेत. रसिकांच्या मनावर त्यांचे चित्रण झाले आहे. ते पुसून किंवा बाजूला ठेऊन नव्या रुपात, चेहऱ्याने सादर करणे म्हणजे तशी अग्निपरीक्षाच. ती प्रभाकर निलेगावकर यांनी दिली आहे. या धाडसाबद्दल त्यांचे मराठी रसिकांनी आणखी मनापासून कौतुक केले पाहिजे. त्यांनी बारकाव्यांनिशी टिपलेला हरीतात्या डोळ्यात पाणी आणतो. पेस्तनजी सादर करताना ते ज्या खुबीने अभंग म्हणतात. त्याला तोडच नाही. अंतुबर्वा हा पुलंच्या लिखाणातील उत्तुंग माणूस. अतिशय फाटक्या अंतु बर्व्याला पुलंनी जी शब्दांची श्रीमंती मिळवून दिली. तीच रंगमंचावर आणण्यात निलेगावकर बरेच यशस्वी झाले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दोन तास चालणाऱ्या या प्रयोगात त्यांनी आवाजाचा विविध लयीत, शैलीत वापर केला आहे. त्याचा अनुभव प्रत्यक्ष प्रयोगात घेणे अधिक चांगले.
आवाजाच्या वापराचे हे कौशल्य निलेगावकरांमध्ये मुळात असणारच. पण त्याला आणखी सफाईदारपणा आला तो वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्यामुळे. निलेगावकर वऱ्हाडकारांचे शिष्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात प्रा. डॉ. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे त्या काळी गिरवले. वऱ्हाडकार ऐन बहरात असताना निलेगावकरांनी ‘अस्सल माणसे, इरसाल नमुने’ या एकपात्री नाट्यप्रयोगाची निर्मिती केली. त्यात ते त्यांना भेटलेल्यांचे खास मराठवाडी स्टाईलने सादरीकरण करत. खुद्द वऱ्हाडकारांनी त्या प्रयोगाचे कौतुक केले. आज ‘अस्सल माणसं इरसाल...’ 2200 पेक्षा अधिक प्रयोगांचा टप्पा ओलांडला आहे. त्यावरूनही निलेगावकरांमधील अस्सल कलावंतपणा लक्षात येतो. यापुढील काळात हे अस्सलपण आणखी निखरत राहो, हीच शुभेच्छा. 

विधात्या...कादरखानसाहेबांना परत पाठव

मला माहिती नाही कादरखान साहेब की तुमच्याबद्दलचा माझ्या मनातील 
आदर, प्रेम मी योग्य शब्दांत व्यक्त करतोय की नाही
पण तुमच्या कोट्यवधी चाहत्यांपैकी मी एक आहे
त्यापोटीच मी व्यक्त होतोय. तुमच्या उत्तुंग, वैविध्यपूर्ण अभिनयाने
स्तिमित झालेल्यांपैकी मी आहे. कदाचित स्वत:ला उच्च दर्जातील 
समीक्षक मानणाऱ्यांना हे पसंत पडणार नाही. पण कोणताही सो कॉल्ड 
चेहरा नसतानाही विलक्षण बोलणारा तुमचा चेहरा, पडद्यावरचा वावर, कधी
खर्जातील गोळीबंद तर विनोदी फिरकी घेणाऱ्या आवाजात थेट प्रेक्षकांच्या
हृदयाला भिडणे हे सारेच अलौकिक होते. प्रत्येक चित्रपटात तुमचे नवे रूप 
पाहता पाहता माझ्यासारखे अनेकजण कधी तुमचे फॉलोअर्स होऊन गेलो
ते आम्हालाच कळाले नाही. साहेब, माझा तुमचा पहिला परिचय ‘सुहाग’ 
सिनेमात झाला. परभणीच्या नाझ टॉकीजमध्ये अमिताभ बच्चन, शशीकपूर,
अमजदखानचा म्हणून सुहाग पाहण्यासाठी गेलो. त्या दिग्गजांच्या गर्दीतही
तुम्ही स्वत:ची छाप सोडली होती. तुमचा निष्ठूर गँगस्टर पाहून ७५ पैशांचे तिकीट 
खरेदी केलेले अस्सल सिनेमादर्दी परभणीकर तुमच्यावर कमालीचे संतापले होते
हे मला आजही आठवतंय. पुढे औरंगाबादला मुकद्दर का सिकंदर पाहिला
तुमच्यासोबत पुन्हा एकदा महानायक अमिताभ होते. तुफान सोसाट्याचा
वारा सुटलेल्या त्या स्मशानभूमीत महानायकाला तुम्ही अशा काही शब्दांत
जीवनाचे तत्वज्ञान ऐकवले की सारे थिएटर अवाक होऊन गेले होते
मिस्टर नटवरलाल, नसीब, यारानामधील तुमच्या भूमिका तुमच्यातील 
खलनायकी अभिनयाचे वैविध्य दाखवणाऱ्याच होत्या. पण, नाविन्याची आस
म्हणून तुम्ही विनोदी भूमिकांकडे वळालात. जितेंद्र, श्रीदेवीचा हिंमतवाला पाहून
आलेला माझा एक मित्र म्हणाला, ‘कादरखानसाठी पाहा. फार धमाल उडवलीय.’ 
आणि मग मी पण तुमच्या अनोख्या अंदाजातील विनोदाचा आनंद मनमुराद लुटला.
माझ्यासोबतचे लोक तुम्ही पडद्यावर येताच लोटपोट होऊन हसत होते
तरीही साहेब, हिंमतवालाच्या चित्रपट परीक्षणात एका स्थानिक समीक्षकाने 
तुमची अवहेलना केली. तुम्ही एक सुमार दर्जाचे विनोदी अभिनेते आहात
असे म्हटले. देशभरातील समीक्षकांचा असाच सूर होता. पण तुम्ही त्याला
दाद दिली नाही. भूमिकेशी प्रामाणिक राहत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन 
करण्याच्या मूळ उद्दिष्टापासून ठळला नाहीत. आणि मग जस्टीस चौधरी, मवाली,
पाताल भैरवी, जानी दोस्त, मकसद गिरफ्तारमध्येही तुमच्यातील विनोदवीराची
अनेक रुपे आम्ही मनात साठवली. त्याचा मनसोक्त आनंद घेतला
घर एक मंदिर’मधील तुमचा सेठ धरमदास कोण विसरू शकेल. शोभा खोटे
असरानींसोबतची तुमची जुगलबंदी म्हणजे शाब्दिक करामतीचा अस्सल नमुना होता
त्यात जितेंद्र, मिथुन हिरो असले तरी खरे हिरो तुम्हीच होतात
गोविंदासोबतचा कुली नं. १ तर केवळ अफलातून. त्यात तुम्ही रुपेरी 
पडद्यावरील विनोदी अभिनय किती निखळ, सात्विक असू शकतो, हे 
सिद्ध करून दाखवले. अंगारमधील तुमच्या ‘डॉन’ने समीक्षकांची तोंडेच बंद
करून टाकलीत. साहेब, तुम्ही दिग्गज नाट्यकर्मी, ताकदीचे लेखक. त्याचा 
अनुभव मी घेतला. औरंगाबादेतील १९९० च्या सुमारास एका एकांकिका 
स्पर्धेत भगवान होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या संघाने ‘
भुखे पेट भजन न होए गोपाल’ एकांकिका सादर केली
भिकारी, अनाथांच्या जीवन संघर्षाविषयी तुम्ही त्यात हृदयापासून केलेले
भाष्य प्रत्येक संवादागणिक डोळ्यात अश्रू आणणारे होते. एकांकिका संपल्यावर
टाळ्यांचा कडकडाट झाला. कलावंतांचे कौतुक तर झालेच पण दिग्गज अभिनेते
कादर खान यांचे लिखाण असल्यानेच त्यात एवढा अणकुचीदारपणा आल्याचेही
सांगितले गेले. एक रंगकर्मी, चित्रपटप्रेमी म्हणून माझ्या मनात तुमच्याबद्दलचा
आदर आणखीनच उंचावला. कादरखान साहेब, दहा-बारा वर्षांपूर्वी तुमच्याविषयी
अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. त्यातील एक होती की, कादरखान यांच्या बंगल्यावर आयकर खात्याची धाड पडली आहे. तुम्ही बंगल्यातून चॅनेलच्या अँकरला फोन केला 
आणि सांगितले...‘माझ्या घरात कोणी आयकरवाले आले असतील तर तुम्हीच
त्यांना मला भेटण्यास सांगा. कारण मी तर घरात निवांतपणे बसलो आहे
हल्ली इकडे कोणी फिरकतही नाही. आणि माझ्याकडे कोणतीही अवैध संपत्ती नाही
असलीच तर ती अगणित चाहत्यांच्या प्रेमाची आहे. ती हवी असल्यास आयकरवालेच
काय तुम्हीही घेऊन जाऊ शकता.’ असेही तु्म्ही जाहीर केले
एक माणूस म्हणूनही तुम्ही खरेच किती उंची व्यक्तिमत्व होता, याचा अंदाज 
यावरून त्या नाठाळ चॅनेलवाल्याला आला नाही. पण माझ्यासारख्या कोट्यवधी
चाहत्यांना नक्कीच ते पुन्हा एकदा ठामपणे कळाले. साहेब, तुमचा पुर्नजन्मावर
विश्वास आहे की नाही माहिती नाही...पण माझी त्या विधात्याकडे नक्कीच
प्रार्थना राहिल, तुम्हाला त्याने काहीशी विश्रांती घेऊन पुन्हा पाठवावे...

तुमच्या अभिनयाने आमचे जीवन समृद्ध करून टाकण्यासाठी...


निरागस : सुंदर माझी शाळा

चेहऱ्यावर कायम हास्य, वागण्या-बोलण्यात कमालीचा आनंद. हालचालीही उत्साहाने भरलेल्या. अशा एकापेक्षा एक सरस देणग्या मिळालेला गणेश प्रल्हाद घुले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पदाधिकारी. निलेश राऊत, सुबोध जाधव यांच्यासोबत कायम कार्यरत असलेला. त्याच्यात हा अमाप उत्साह नेमका कुठून येतो. हा सारखा ताजातवाना, हसतमुख कसा राहू शकतो, असा प्रश्न माझ्यासारखा अनेकांना पडत असावा. त्याचे उत्तर काही दिवसांपूर्वी मिळाले आणि मोठा उलगडा झाला. गणेश घुले केवळ सामाजिक कार्यकर्ता नाही तर एक तरल, संवेदनशील आणि जागरूक कवी असल्याचे कळाले. खरेतर तो कवितेच्या जगात प्रसिद्ध माणूस. पण मलाच त्याच्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागला म्हणा किंवा त्यानं त्याच्या वागण्याबोलण्यातून ते कधी जाणवू दिलंच नाही. सुंदर माझी शाळा या त्याच्या बालकवितांच्या पुस्तक प्रकाशनाची पत्रिका घेऊन तो सुबोध जाधवसोबत भेटला. तेव्हा गणेश आपल्या परिचयाचा आहे, याची जाणिव होऊन मन आनंदित झालं. आणि प्रतिभासंपन्न कवीला आपण यापूर्वी का ओळखू शकलो नाही, असा प्रश्न पडून खजिलही झालो. गणेश  यांच्या कवितांचे ‘सुंदर माझी शाळा’ पुस्तक वाचताना त्याच्यात एवढी उर्जा नेमकी कुठून येते याचा शोध लागला. लहान मुलांसोबत कोणीही काम करत असो. त्याच्यात एक निरागसपण येते. चैतन्य अंगात भरते. नाविन्याची कायम ओढ लागते. गणेश यांना ते सारेकाही चिमुकल्यांसाठी मनापासून काम करत असताना मिळाले. पण महत्वाचे म्हणजे मिळालेला आनंद, निरागसपणा त्यांनी स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. स्वतःच्या पोतडीत भरून ठेवला नाही. तर तो त्यांनी सुंदर माझी शाळा पुस्तकातून सर्वांना खुला करून दिला. हा केवळ बाल गीतांचा-कवितांचा संग्रह नाही तर तो मोठ्यांनाही छोट्यांच्या जगात घेऊन जातो. मोठ्यांचे मन रमवून टाकतो. एवढी शक्ती, प्रतिभा गणेश यांच्या लेखनात आहे. सामाजिक जाणिवा अतिशय तीव्र आणि जबाबदारीने स्वीकारल्या असल्याने मनोरंजन करता करता त्यांच्या कविता लहान मुलांवर दाट संस्कारही करतात. रसायनशास्त्रात एम.एस्सी., मराठीत एम.ए. आणि नंतर बी.एड. करणारे गणेश यांचा मूळ पिंड चांगला माणूस असण्याचा आणि इतरांमध्ये चांगलेपण पेरण्याचा आहे. ते रसायन त्यांच्यात काठोकाठ भरलेले असल्याचे ‘कचरा, डस्टर, पैसा, तिरंगा, शिपाईमामा’ या कवितांतून लक्षात येते. आजकाल मुलांवर छडी उगारणे म्हणजे गुन्हा असे सांगितले जात असताना, शिस्त लावणाऱ्या मास्तरांवरच हल्ला करणारे वाढत असताना छडीचे महत्व सांगण्याचे धाडसही गणेश करतात. मोबाईलच्या जगात गुंग होऊन मुलांना विसरणारे आई-बाप ही अलिकडच्या काळातील एक नवी सामाजिक समस्या. त्यावर मुलांना खरंच काय वाटतं हे सांगणारी ‘मोबाईल’ नावाची कविता तिरकस बाण सोडत धमाल उडवते त्याचवेळी पण मनाला हलवते, रुतते. ‘मामाच्या गावाला जाऊया’ ही रचनाही अप्रतिम. कवीवर्य ‘ग. दि. माडगुळकरांची क्षमा मागून’ असे नमूद करत घुले यांनी मामाचे गाव पाणीटंचाईच्या संकटाशी कसे लढते आहे, याचे अत्यंत कमी शब्दांत पण मर्मभेदी चित्र उभे केले आहे. नव्या पिढीला कळतील, उमजतील आणि लक्षात राहतील, अशाच एक दोन नव्हे तर बेचाळीस रचना त्यांनी अतिशय सहजतेने केल्या आहेत. कोठेही अतिरेक नाही. किंवा आता मुलांचे मनोरंजन झालेच पाहिजे. त्यांच्यावर संस्कार केलाच पाहिजे, असा हट्ट किंवा अतिरेकही नाही. सारे कसे एखाद्या खळाळत्या ओहळासारखे आपल्यासमोर वाहत येते. पावसाचे हलके हलके थेंब अंगावर यावेत आणि त्यांनी मन प्रफुल्लित करून टाकावे. भिजता भिजता गावाकडील उजाड रानाचीही आठवण यावी अन्‌ विचार थबकून जावेत, अशी भावना हा कविता संग्रह वाचल्यावर निर्माण होते. आणि हेच या संग्रहाचे बलस्थान आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील पाडुळी नावाचे छोटेसे गाव. तेथे सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर गणेश औरंगाबादेत शिक्षणासाठी आले. पण गावची नदी, शेती, फुले, सवंगडी यांच्याशी त्यांनी नाते तोडले नाही. कवितांच्या रुपात ते जपून ठेवले. पुढे निलेश राऊत, कवी पी. विठ्ठल, गेनू शिंदे यांच्या पाठिंब्याने वर्षभरापूर्वी ‘सुंदर माझी शाळा’ या कार्यक्रमाची निर्मिती झाली. त्यात गणेश यांच्या  बालकवितांना श्रीराम पोतदार यांनी सुरेख चालींमध्ये बांधले. अभ्युदय फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांगलीच दाद मिळू लागली. त्यानंतर घुले यांनी कविता पुस्तक रूपात उपलब्ध करून देण्याचा चांगला निर्णय घेतला. दत्ता बाळसराफ, पद्‌मभूषण देशपांडे, ग्रंथाली प्रकाशनाचे सुरेश हिंगलासपूरकर यांच्या पुढाकाराने अतिशय सुऱेख रुपात हा संग्रह रसिकांसाठी उपलब्ध झाला आहे. घुले यांच्या रचनांना दृश्यात्मक रुपात पुंडलिक वझे यांनी अर्थवाही केले आहे. त्यांनी मुखपृष्ठासह आत केलेली रेखाटने काही क्षण थांबून, निरखून पाहावीत, अशी आहेत.