Tuesday 28 December 2021

लालनांचे रंग

कर्म सर्वात महत्वाचं. कर्मानुसारच फळ निश्चित होतं. पण असंही म्हटलं जातं की, चार-पाच लोकांनी एकसारखंच कर्म केलं तरी त्यांचं फळ त्या प्रत्येकाला एकसारखेच मिळेलच, याची हमी नाही. या हमी नसण्याला नियती, नशिब, योग अशी नावं दिली जातात. अनेक राजकारणी, कलावंतांच्या दुनियेत तर नशिबाला फार महत्व आहे. आता हेच पहा ना. सर रिचर्ड अॅटनबरोंनी १९८१-८२मध्ये जगद्विख्यात गांधी सिनेमात महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी हॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेते बेन किंग्जले यांची निवड केली. तेव्हा कस्तुरबा कोण होणार, असा प्रश्न होता. अनेकींची नावे चर्चेत होती. संधी मिळाली रोहिणी हट्टंगडींना. आणि त्या जागतिकस्तरावरील अभिनेत्री झाल्या. तसं पाहिलं तर तुलना चुकीची आहे. तरीही तो दोष स्वीकारून असे म्हणावे लागेल की, रोहिणींपेक्षा काकणभर प्रखर, धाडसी, अष्टपैलू असलेल्या लालन कमलाकर सारंग मराठी रंगभूमीवरच मर्यादित राहिल्या. अर्थात त्यामुळे त्यांचे अभिनेत्री म्हणून महत्व मुळीच कमी होत नाही. जेव्हा कधी मराठी रंगभूमीवरील अभिनेत्रींचा स्वतंत्र इतिहास लिहिला जाईल. तेव्हा त्यात लालन यांचे नाव पहिल्या पाच जणींमध्ये घ्यावे लागेल. २००६मध्ये कणकवली येथे झालेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असताना त्यांना अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले. तरीही त्यांच्यावर मराठी रसिकांकडून किंचित का होईना अन्याय झाला, अशी रुखरुख डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलेले त्यांचे ‘जगले जशी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचताना वाटत राहते. अर्थात हा दोष त्या ज्या काळात बहरात होता. त्या काळालाही द्यावा लागेल. कारण त्या वेळी खासगी मनोरंजन वाहिन्या, सोशल मिडिआ नव्हता. त्यामुळे रंगभूमी आणि अत्यल्प विस्तार असलेले दूरदर्शन एवढीच माध्यमे होती. २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यातील पैंगणकर कुटुंबात त्या जन्मल्या. सहसा मुलींना मिळत नसलेले लालन हे नाव त्यांच्या वडिलांनी एका कादंबरीतील बैरागिणीच्या नावावरून दिले. एक भाऊ, सहा बहिणी आणि आई-वडिल अशा मध्यमवर्गीय पैंगणकरांच्या कुटुंबात दोन्ही बाजूंनी अभिनयाचा वारसा नव्हता. त्यामुळे शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरी करायची. आई-वडिल म्हणतील त्याच्याशी संसार थाटायचा. मुला-बाळांमध्ये रममाण व्हायचं, एवढंच लालन यांचं स्वप्न होतं. पण नशिब नशिब म्हणतात ते काय याचा अनुभव त्यांना आला. बीएचे शिक्षण घेत असताना मुंबईतील आयएनटी एकांकिका स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. चेहऱ्यावर पहिल्यांदा रंग लावला आणि त्यांचा रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला. कमलाकर सारंग या अवलिया दिग्दर्शक, अभिनेत्यासोबत संसार करत तो दीर्घकाळ चालला आणि ९ नोव्हेंबर २०१८ रोजी थांबली. मधल्या प्रवास काळात त्यांनी रंगभूमी अक्षरश: दणाणून टाकली. मुंबईचा मराठी साहित्य संघ आणि अत्रे थिएटर्सच्या नाटकांतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. मी मंत्री झालो, बुवा तेथे बाया, मोरुची मावशीमध्ये त्यांनी हलक्याफुलक्या भूमिका केल्या. पण एक सशक्त, बंडखोर, बोल्ड अभिनेत्री अशी त्यांची ओळख झाली विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाईंडरमुळे. त्या काळात म्हणजे १९७२मध्ये त्यांनी ‘बाईंडर’मधील चंपा साकारली. तेंडुलकरांना अपेक्षित असलेल्या चंपाचे अंतरंग त्यांनी दाखवून दिले. रंगभूमीवरील त्या काळच्या महिलेच्या प्रतिमेला प्रचंड धक्के देणाऱ्या व्यक्तिरेखेतील बारीकसारीक जागा त्यांनी इतक्या सहजपणे आविष्कृत केल्या होत्या की खलनायिकासम भूमिका असूनही त्या प्रेक्षकांना थक्क करत. गिधाडे कमला या तेंडुलकरांच्या महाकाय नाट्यकृतीतील भूमिकाही लालन यांनी गाजवल्या. ‘जगले जशी’ या आत्मकथनात लालन यांनी छोट्या-मोठ्या घटनांतून जीवन प्रवास नोंदवला आहे. पण तो केवळ त्यांच्यापुरता प्रवास नाही. तर त्या काळात मराठी रंगभूमीवर काय घडत होतं, हे सांगणारा पटही आहे. यात अर्थातच सखाराम बाईंडर अग्रस्थानी आहे. हे नाटक लालन यांचे पती कमलाकर यांनी दिग्दर्शित केलं. स्त्री - पुरुष संबंधांचा एक वेगळाच चेहरा दाखवणाऱ्या सखारामनं मराठी मध्यमवर्गात वादळ निर्माण केलं. मराठी माणूस, मराठी संस्कृतीविषयी आक्रमक असलेल्या शिवसेनेने या नाटकाला कडाडून विरोध केला. तो हिंसक विरोध अंगावर घेत कमलाकर यांनी प्रयोग केले. कारण लालन यांचा भक्कम पाठिंबा होता. पण ते सारं कसं घडत गेलं, याची रोचक माहिती जगले जशीमध्ये आहेच. शिवाय अभिनेत्री, माणूस म्हणून त्या कशा खंबीर, प्रगल्भ, संवेदनशील, परिपक्व होत गेल्या. अभियनापलिकडील जीवन कसे शोधत गेल्या, हेही उलगडत जाते. त्यामुळे हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही. तर खरंच अभिनेत्री होऊ इच्छिणाऱ्या आणि वादळाशी लढण्याची तयारी असणाऱ्यांसाठीही दिशादर्शक आहे.

Monday 27 December 2021

वानरमाया

जेमतेम हजार उंबऱ्यांचं गाव. टळटळीत दुपार. सगळे बाप्ये एक तर शेतात नाही तर कारखान्यावर. बायका धुणी-भांडी करत होत्या. म्हाताऱ्या-कोताऱ्या ओसरीवर, अंगणात बसून देवाचं नाव घेत होत्या. जख्खड म्हातारे पांघरुणात गपगार होते. धरणाच्या पाण्याकडून सुटलेला वारा सोडला तर गावात तसा शुकशुकाट होता. कोरोनामुळं शाळा बंदच होती. पाखरं फांद्यांना बिलगली होती. कुत्री झाडांखाली, गटाराजवळ, भितींना चिटकून पडली होती. आणि अचानक चिर्र…चिर्र … हुप्प …हुप्प असा बुभुत्कार झाला. तशी गल्ल्यांमध्ये चिरखा-पाणी, धप्पाकुटी, लपाछपीत रंगलेली पोरं थबकली. कशाचा आवाज झाला म्हणून कानोसा घेऊन पुन्हा खेळू लागली. अन् पुन्हा तसंच झालं. आता आवाज चांगलाच वाढला होता. शहराच्या शाळेत दोन वर्ग शिकून गावात आलेला उंचापुरा चिंतामणी टाचा उंचावून म्हणाला, ‘अरे … वान्नेर, वान्नेर. ते पाहा तिकडं.’ त्याच्यापेक्षा अपरी असलेली पोरं तो ज्या दिशेनं बघत होता तिकडं पळाली. चिंतामणीही गेला आणि सगळ्यांसमोर लीडरसारखा उभा राहिला. एका क्षणानं त्याचा आणि साऱ्या पोरांचा श्वासच थांबला. एखादा अवजड ट्रक जावा तसा आवाज झाला. पुरुषभर उंचीचा, काळ्या ठिक्कर तोंडात वीतभर लांबीचे दात विचकत म्हाळ्या वानर शेपूट उंचावून झेपावला. काही पोरं घाबरून मागं सरकली. काही किंचाळून चिंगाट मागं पळाली. आणि पाहू लागली. तीन ढांगातच वानरानं ती छोटीशी गल्ली ओलांडली. अन् गवतात निवांत लोळत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला अलगद उचललं. पोरांना काही कळायच्या आत तितुरे पाटील, भगत मास्तराच्या वाड्यावरून म्हाळ्या महादेव मंदिरामागच्या वडाच्या झाडावर गेलाही. डोळ्यासमोर दिसणारं कुत्र्याचं पिलू असं गायब झालं. वानरानं उचलून नेलं, यावर चिंतामणीचा विश्वासच बसला नाही. तो थरथरू लागला. खोबऱ्याच्या वाटीएवढे डोळे करून आँ … आँ …. असं करू लागला. ते पाहून त्याचे सोबतीही हुडहुडू लागले. दोन दिवसांपूर्वीच त्या कुत्र्याच्या पिल्लाला दगडं मारून बेजार करणाऱ्या श्रीपती, दगडूचं कुत्र्यावरील प्रेम दाटून आलं. त्यांनी ‘माझा रॉबी, माझा रॉबी’ म्हणून गळा काढला. सुंदरानं रॉबीला दगडफेकीतून वाचवलं होतं. घरी नेऊन आईचा डोळा चुकवत दूध, पोळी कुस्करून खाऊ घातली होती. म्हाळ्या वान्नेर पिलाला उचलून गेला, हे लक्षात येताच तिनं गल्लीतच फतकल मारत, ‘मा यो…मा यो … रॉबीला मारलं त्यानं’ असं म्हणत भोकाड पसरलं. तसं अंती, मंजरी, वैशूनंही तिच्या सुरात सूर मिसळला आणि हसती-खेळती गल्ली रडव्यानं भरून गेली. वाड्यामागे मोकळ्या अंगणात कांदे, लसणाचा ढिगारा वाळत घालणाऱ्या अलकाला त्या गलक्यात मंजरीचा आवाज अचूक ओळखू आला. कालपासून लेकीच्या अंगात कसकस होती. नाही म्हटलं तरी खेळायला गेलीच. आता खेळता-खेळता पडली का कोणी मारलं, असं म्हणत अलका तावातावानं गल्लीत आली. ‘काय झालं, कोणं मारलं तुला? कारे रौल्या, का मारलंस तिला. का तिच्या सारखा अंगचटीला जातो. तुझ्या आई-बापाला सांगू का?’ असा एकच भडिमार तिनं केला. त्यामुळं केकाटणारी पोरं शांत होऊन भांबावल्यासारखी तिच्याकडं पाहू लागली. चिडलेल्या अलकानं पुन्हा आवाज चढवला. तेव्हा चिंतामणी धीर एकवटून म्हणाल्या, ‘आत्या … वरडू नको. थोडी गप ऱ्हा.’ ‘आँ माझ्या पोरीला मारतेत बाहेरची पोरं. त्यांना हिसका दाखवायचा तर मलाच गप म्हणतोय का रे?’ अगं कोणी नाई मारलंय मंजरीला. धक्काबी लागला नाय कोनाचा. तु आधी इकडं ये. अन् इथून पाहा. शहाणा दिसणारा हा पोऱ्या घाबऱ्याघुबऱ्या आवाजात काय सांगतोय, असा विचार करून अलका लगबगीनं त्याच्याजवळ आली आणि वडाकडं पाहू लागली. पाहता पाहता तिचे डोळे विस्फारले. जीभ दीड वित बाहेर आली. ‘अग्गो बया.. अग्गो बया … बया बया… काय झालंय हे. असं कसं झालं. त्यानं कसं काय नेलं त्याला.’ असं बडबडू लागली. आता सगळी पोरं तिच्याभोवती दाट गोळा झाली होती. ‘रॉबी … रॉबी’ करत मुसमुसणाऱ्या मंजरीचे डोळे तिनं पदरानं पुसून काढले. नाक स्वच्छ केलं. श्रीपती, दगडूच्या डोक्यावरून हात फिरवला. कोलाहल शांत झाला. पण काही क्षणांसाठीच. सुताराच्या वाड्यातील कडूलिंबावरून दोन म्हाळे अलगद उतरून अगदी माणसासारखे पोरांजवळ उभे राहिले. त्यांची चाहूल लागताच अलकाला भोवळ आली. पोरं पुन्हा चित्कारली. ‘यांना ओरडायला काय झालं बुवा’ असा अवि‌र्भाव करत दोन्ही वान्नेरांनी गल्ली ओलांडली आणि उड्या मारत तेही वडाकडं निघून गेले. अलकानं पोरीला उचललं आणि ती वाड्याच्या आडोश्याला जाऊन उभी राहिली. तर सावरलेला चिंतामणी त्याच्या खास उचापती दोस्तांना म्हणजे रघु, नित्याला घेऊन पुढं सरकला. तसा कुत्र्याच्या पिलाला एका हाताने सांभाळत वान्नेरानं फांदीवरून मुक्काम हलवला. बाकीचे दोन्हीही दिसेनासे झाले. त्यानं चिंतामणी, अलकाचं धैर्य वाढलं. ते वडाच्या दिशेनं चालू लागले. रघु, नित्यानं हळूचकन पाच-सहा दगडं खिशात भरले. चिंतामणी सगळ्यात पुढं होताच. वडापासून सात-आठ पावलांवर तो थबकला. बारकाईनं पाहू लागला. एक - दोन मिनिटात त्याला खात्री पटली. त्यानं तोंडावर बोट ठेवून शांतता राखा, असा इशारा केला. सगळ्यांनी श्वास पोटात धरून ठेवले. सगळीकडं फक्त वाऱ्याचा आवाज होता. मग चिंतामणीनं शाळेतले ड्रिल मास्तर करतात तसे हात उंचावले. एक … दोन … तीन … अशी बोट केली. आणि नित्या, रघुनं अंगात होती नव्हती तेवढी ताकद एकवटून ‘बजरंग बली की जय’ म्हणत दगडं भिरकावली. अलका त्यांच्यावर संतापली होती. पण पोरं ऐकण्यास तयार नव्हती. वान्नेरं चांगलीच उंचावर होती. दगडं त्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीत. पण पोट्ट्यांच्या आवाजानं ती दचकली. झपाझप उड्या मारत आंब्याच्या, चिंचेच्या डहाळ्यांवर गेली. चिंतामणी आणि कंपनीसाठी हा त्यांच्या आक्रमणाचा पहिला विजय होता. आपल्या दगडांनी वान्नेरं पळाली. आता आणखी वर्षाव केला तर कुत्र्याचं पिल्लू परत मिळणारच, असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. तोपर्यंत गावातील पाच-पन्नास पोरं जमा झाली होती. त्यांनी एकच ओरडा करत दगडांचा मारा सुरू केला. चारही दिशांनी नुसता धुराडा झाला. अन् शेतातून पतरणाऱ्या शंकर टेकाडे, इश्वर स्वामीच्या टेंपोवर चार-पाच दगडं पडली. आधीच कामानं वैतागलेल्या शंकरच्या रागाचा पारा चढला. टेंपोतून खाली उतरून त्यानं कचकचीत शिव्या हासडल्या. त्या ऐकून पोरं जागीच थिजली. त्यांच्या हातातली दगडं घामेजली. पोरांच्या घोळक्यात अलकाला पाहून शंकर म्हणाला, ‘ए, अलके …तु पन काय पोरासारखी ल्हान झालीस का? दोन लेकरांची आई. तुला असं शोभंतं का? चल जा घरी …’ तशी अलका लगलगीनं म्हणाली, ‘तसं नाही दादा. जरा तिकडं पाहा की.’ ‘काय झालंय. चोर आलाय का काय?’ ‘व्हय. पण बाप्या न्हाई. म्हाळ्याय. वान्नेर. कुत्र्याचं पिलू उचलून गेलंय झाडावर.’ ‘आँ … काय सांगतीस?’ आता आश्चर्यचकित होण्याची वेळ शंकरची होती. त्यानं इश्वरला अन् टेंपोत ज्वारीच्या पोत्यांवर पडलेल्या युसूफ, रज्जाकला हाळी दिली. मग हे चौघे, पाच-पन्नास पोरं, अलका वान्नेराला शोधत, दगडं फेकत सुटले. संध्याकाळी मशिदीत अजान झाली. मंदिरात आरतीसाठी घंटा वाजू लागली. तेव्हा कुठे हे दगडफेके भानावर आले. शंकरला दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावाला जायचं होतं. सासूबाई, नवरा आपल्या नावानं ठणाणा करत असतील, असं लक्षात येऊन अलका पोरीला घेऊन घराकडे गेली. चिंतामणी, नित्या, रघू थकले होते. आता रॉबीला घेऊन वान्नेर गेलं असलं तरी उद्या काही त्याला सोडायचं नाही. गलोलीनं दगड मारून खाली पाडायचंच, अशी शप्पथ घेऊन ते निघाले. तशी बाकीची पोरंही पांगली. त्यासोबत दहा-बारा दिवसाचं कुत्र्याचं पिल्लू वान्नेरानं उचलून नेलं. चोरलं. बळकावलं. गळा दाबून काखोटीला मारलं, अशा गोष्टी तासाभरातच पांगल्या. ढेकळं काढल्यावर चारी अंगांनी वाहणाऱ्या पाटाच्या पाण्यासारखा वाहू लागल्या. म्हातारीच्या कापसासारखा उडू लागल्या. ०००० गावातला मुख्य रस्ता सरपंचांनी नुकताच सिमेंटचा करून दिला होता. दोन्ही बाजूंनी झाडंही लावून दिली होती. त्या रस्त्यावरून शाळेकडं जाताना डावीकडं महादेव अन् मारुतीचं मंदिर होतं. चाळीस वर्षांपूर्वी धरणाच्या तळाशी मूळ गाव गेलं. तेव्हा सरकारनं गावकऱ्यांना मोबदल्यात जमीन दिली होती. तेव्हा त्या वेळचे तालेवार पंडितअण्णा हर्षेंनी ही दोन मंदिरं स्वखर्चातून बांधली होती. नव्या गावाची उभारणी सुरू असताना एक वानर कायम घिरट्या घालत असायचा. एक दिवस त्याचा देह ओढ्याजवळ आढळला. त्यामुळं त्याच्या आठवणीत मारुतीचं मंदिर बांधलं गेलं, असं लोक म्हणत. गावकऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या पाच-पन्नास मुस्लिमांना एका छोट्या मशिदीसाठी दगड-विटा लाकूडही पंडितअण्णांनीच दिलं होतं. आता अण्णांची तिन्ही मुलं शहरात मोठ्या अधिकारी पदावर होती. तिथून जमेल तेवढं गावावर आणि शेतावर लक्ष ठेवून होती. मंदिरांचा त्यांनी विस्तार केला होता. मंदिराजवळ एक वाचनालय बांधून त्यात हजारभर अध्यात्मिक, धार्मिक पुस्तकं ठेवली होती. अण्णांच्या सगळ्यात लहान मुलानं दोन वर्षापूर्वी तालुक्याच्या गावातून दररोज दहा-बारा वर्तमानपत्रं रोज वाचनालयात येतील, अशी व्यवस्था केली होती. बोटावर मोजण्याएवढे सोडले तर कोणाच्या घरात टीव्ही नव्हते. ज्यांच्या घरात होते तेही फार टीव्हीला सुकाळले नव्हते. पोटात दोन घास पडल्यावर मंदिरासमोरचं अंगण हेच त्यांच्यासाठी मन निवांत होण्याचं एकमेव ठिकाण होतं. दिवसभर गावात काय घडलं हे त्यांना या अंगणातच कळत होतं. त्यानुसार त्या दिवशी काय झालं हे अनेकांना पोरा-टोरांनी सांगितलं होतं. पण पोरं सांगतात ते खरंच आहे की गपाट्या, याची खातरजमा करण्यासाठी अनेक मंडळी सुपाऱ्या, अडकित्ते, पान-तंबाकू घेऊनच आली होती. एका बाजूला बायकाही जमल्या होत्या. सरपंच पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते. म्हणून उपसरपंच दादारावांवर जबाबदारी आली होती. गेल्या काही वर्षांत त्यांना पहिल्यांदाच गावकऱ्यांसमोर बोलण्याची संधी मिळाली होती. ती पूर्ण साधून घ्या. दणक्यात भाषण ठोका. वान्नेराबद्दल खूप बोला, असं त्यांच्या सौभाग्यवती टापरेकाकींनी चार चार वेळा बजावलं होतं. त्यामुळं ते जबर तयारीनंच आले होते. ‘हे एक इपरित झालंय. असं कधी झाल्याचं मी माझ्या पन्नास पावसाळ्यात कधीच ऐकलं नवतं. आज त्यानं कुत्र्याचं पिलू उचललं. उद्या घरातलं चिरकं पोरगं नेलं तर काय भावात पडंल. म्हनून या वान्नेराचा तातडीनं बंदोबस्त झाला पायजे. मी लगेच जिल्ह्याला जाऊन जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाला निवेदन देतो. विरोधी पक्षाचे असले तरी त्यांनी जनहिताची गोष्ट लक्षात घ्यावी. तसं जर झालं नाही. चार दिवसात उपाययोजना झाली नाही. तर मी थेट मुंबईलाच जातो. कारण हा माझा नाही, साऱ्या गावाचा प्रस्न आहे. गावाच्या हितासाठी मी काहीही करण्यास तयार आहे.’ असं दादारावांनी जाहीर केलं. त्यावर टाळ्या वाजल्या. एक-दोन कुजके ‘मुंबईला जाण्यापेक्षा उपोषणाला बसा’ असं कुजकटले. त्यांच्याकडं डोळे बारीक करून पाहत दादारावांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, ‘सरकार जेव्हा करल तेव्हा करल. आपण आता जाऊन वान्नेराचा शोध काढू. हिंमतबाजांनी टार्ची, काठ्या अन् दोरखंड घेऊन माज्यासोबत यावं.’ एका दमात सांगून ते लगोलग निघालेही. तास-दोन तासांच्या विश्रांतीनं ताजेतवाने झालेले चिंतामण, नित्या, रघु दगडं उचलून चिंगाट वडाकडं पळाले. म्हातारे-कोतारे त्यांनी त्यांच्या तरुणपणात कशी वानरं पाहिली, याचे किस्से सांगत बसले. इकडं शंभरेकजणांनी वडाला घेरलं. टॉर्च लावून एकच कालवा केला. पण एकही फांदी हलंना. खुसपुसाट होईना. मग जमावानं आसपासची सारी झाडं धुंडाळली. कुठंच वानराचा मागमूस नव्हता. ‘गेलं वाटतं गाव सोडून.’ आबा शेळकेंनी शंका व्यक्त केली. घरी जाऊन जमिनीला पाठ टेकण्यासाठी आसुसलेल्यांनी ‘हो, हो … घाबरून पळालं असतील’ असं म्हणत पाय घराकडे ओढले. तेवढ्यात आईचा खणखणीत आवाज चिंतामणच्या कानी पडला. ‘आलो, आलो…चल नित्या, रघ्या’ असं सांगत त्यानंही निरोप घेतला. अन् त्याचं लक्ष मंदिराजवळच्या भल्यामोठ्या शिळेपाशी गेलं. त्यानं तिकडं हात दाखवत बेंबीच्या देठापासून बोंब ठोकली. ‘अऱ्या बापारे … अऱ्या बापारे’. चिंतामण ओरडला म्हणजे नक्कीच काहीतरी भयंकर असणार यावर पोरांचा ठाम विश्वास होता. ते शिळेपाशी धावले. दादाराव, युसूफ, प्रल्हाद, काशिनाथ आणि सगळा जमाव पोहोचला. कोणाचाच विश्वास बसंना. रक्तात माखलेल्या रॉबीनं काही वेळापूर्वीच प्राण सोडला होता. त्यापेक्षाही धक्का म्हणजे रॉबीच्या बाजूला आणखी एक पिल्लू मरून पडलेलं होतं. गावाची जबाबदारी स्वीकारलेल्या दादारावांसाठी ही खूपच भयंकर गोष्ट होती. अलकाच्या डोळ्यात पाणी आलं. मंजरीनं भोकाड पसरलं. अखेरच्या निरोपाचं कसब असलेल्या काशिनाथनं पटकन युसूफला पाठवून फावडं, कुदळ मागवली. पिल्लांवर माती सारली. माती सारता सारता त्याचा मोबाईल वाजू लागला होता. ‘च्या मारी या वेळेला कोण’, असा विचार करत त्यानं नाव निरखून पाहिलं आणि त्याच्या करामती डोक्यात घंट्या वाजू लागल्या. ‘लई दिवस झालेत. वाचनालयाचं उद्घाटन झालं. त्यानंतर आपल्या गावाचं पेप्रात नावच आलं नाही. खबरनामाला बातम्या देणारा कृष्णा मातोडे वळखीचा झालाय. तर त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजेच’ असं पुटपुटत त्यानं पिलांवरची माती पायानं जोरजोरात दाबली. तेव्हा अख्खा जमाव पुढं गेला होता. माती सारखीवारखी करून घरी पोचताच हातपाय धुऊन, देवापुढं हात जोडून काशिनाथ माळवदावर गेला. हळूहळू आवाजात कृष्णाशी बोलू लागला. दोन मिनिटं बोलून झाल्यावर त्याला कोणाचीतरी चाहूल लागली. म्हणून त्यानं पटकन मोबाईल बंद करून टाकला. पायऱ्या उतरून तो खोलीत गपगार होऊन पडला. अप्पांनी त्याला दोन-तीनदा विचारलं, ‘काय रे वर जाऊन कोणाशी काय बोलत होता?’ पण काशिनाथनं उत्तर दिलंच नाही. त्याला साऱ्या गावाला चकित करायचं होतं. ०००००० वाचनालयात येणारे सारे पेपर सकाळी आठच्या सुमारास बारकाईनं वाचायचे. त्यातल्या महत्वाच्या बातम्या सखाराम तिनावे, पांडुरंग काकवे आणि नामदेवराव पंडितांना उलगडून सांगायच्या, असा प्रभाकर भगतांचा शिरस्ताच होता. शाळा बंद असल्यानं तर हे काम ते अतिशय मन लावून करत होते. नेहमीप्रमाणे ते चहाचा कप घेऊन पेपर चाळू लागले. अन् खबरनामाचं तिसरं पान उघडताच एकदम उडाले. ‘वानरांनी कुत्र्यांची २०० पिलं हालहाल करून मारली’ असं टप्पू अक्षरात छापलेलं होतं. त्यांनी लगोलग त्यांच्या रोजच्या तीन श्रोत्यांना ‘आपल्या गावात वान्नेरानं कुत्र्याची दोनशे पिलं मारून टाकलीत. कुत्र्यांनी वानेराच्या पिल्लाला मारल्यानं वान्नेरं त्याचा बदला घेत आहेत.’ अशी बातमी खबरनामात आल्याचं सांगितलं. नामदेवराव पंडितांनी चिरक्या, थरथरत्या आवाजात म्हटलं, ‘अरे देवा. पिसाळलीत का काय वान्नेरं. दोनशे पिलं मारलीत. आन् मला कुणी कसं काही सांगितलं नाही.’ त्यावर सखाराम म्हणाले, ‘आता आपण म्हातारी झालोत. अन् कोण काय सांगितलं नाई तर काय झालं ... पेप्रावाल्यानं खरं सांगितलंच की.’ पांडुरंगरावांनी त्यांच्या स्वभावानुसार शंकेखोरपणे विचारलं, ‘भगत मास्तर या एका पेप्रावाल्याचं काय खरंय. बाकीच्या पेप्रातबी बगा की.’ कधी नव्हे ते पांडुरंगरावांची शंका रास्त असल्याचं वाटून मास्तरांनी सगळ्या पेप्रांची चळत उघडली. अन् म्हणाले, ‘चार पेप्रात आलीय बातमी. खबरनामात आहे तेवढी मोठी नाही. पण आलीय. दोन जणांनी तर वान्नेरांचे फोटो पण टाकलेत. एकानं कुत्र्याची पिल्लंही दाखवलीत.’ भगतसर सांगतात. प्रेपातही आलंय म्हणजे कुत्र्याची दोनशे पिल्लं पिसाळलेल्या वानरांच्या टोळीनं ठेचून मारली. हालहाल करून मारली, यावर तिघांनीही शिक्कामोर्तब केले आणि ते गप्पांचा कार्यक्रम गुंडाळून लगोलग आपापल्या वाड्यात गेले. तासाभरात गावामध्ये एकच चर्चा सुरू झाली. छोटी पोरं हातात दगडं, तरणी पोरं काठ्या, गोफणी घेऊन फिरू लागली. ‘ते पहा वान्नेर. तिकडं पहा. पळा, पळा. अरं, अंगावर येईल रे. चावतंय बरं.’ म्हणत दिसंल त्या झाडांवर दगडं फेकू लागली. एकच कोलाहल सुरू झाला. एवढ्या आवाजातही सांडवे पाटलांच्या म्हातारीनं काढलेल्या किंकाळीनं सगळे थबकले. जाणते लोक सांडवेंच्या वाड्यात धावले. अंगणात कापसाच्या वाती करत बसलेल्या म्हातारीच्या दंडाला म्हाळ्यानं ओढलं होतं. झटापटीत तिचं पोलकं दंडाला टरटर फाटलं होतं. मग गर्दीत उभ्या काशिनाथनं आडोसा शोधत कृष्णाला कॉल केला. ‘पिसाळलेल्या वान्नेरानं म्हातारीवर हल्ला केला’ अशी वित्तंबातमी दिली. कृष्णानं लगोलग मुख्यालयात संपादकसाहेबांना कळवलं. संपादकसाहेब खुश झाले. बेव एडिशनच्या उपसंपादक जहीर शेखला बोलावून म्हणाले, ‘दोन ओळींचा स्क्रॉल चालवा. जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ द्या. किमान दहा लाख व्ह्यूज मिळतील रात्रीपर्यंत.’ जहीरही खुश होत म्हणाला, ‘सर, वानरांचे लाईव्ह किंवा गावाचे, कुत्र्यांच्या मृतदेहांचे काही फोटो असतील तर फोटो स्टोरीपण चालवतो’. संपादकसाहेब गुरकावले. ‘आता एवढं तर चालवा. लायब्ररीमधले वानरांचे दुसरे फोटो टाका. सगळी वानेरं एकसारखीच तर दिसतात.’ जहीरनं आज्ञेचं पालन केलं. आणि संध्याकाळी गावात चार न्यूज चॅनेलच्या मोठमोठ्या गाड्या शिरल्या. त्यांच्यासोबत यु ट्युबवालेही आले होतेच. दिसेल त्याच्या ते मुलाखती घेत होते. गावातल्या प्रत्येकासमोर एक कॅमेरावाला होता. वार्ताहर काहीबाही प्रश्न विचारत होते. मुलाखती घेत होते. एकच धूम झाली. जगाच्या नकाशावर ठिपक्याएवढं गाव जगाएवढं मोठं झालं होतं. प्रसिद्धीच्या लाटेवर आरुढ झालं होतं. काशिनाथच्या चेहऱ्यावर समाधान ओघळत होतं. ०००००० इकडं चार दिवसाच्या सुटीनंतर कामावर परतलेला दैनिक पंचनामाचा रिपोर्टर गोरखनाथ काल्डे हैराण झाला होता. वानरांनी धुमाकूळ घातलेलं गाव त्याच्या गावापासून पाच किलोमीटरवरच होतं. एवढी मोठी घटना घडली पण आपल्याला कळाली नाही, याचं त्याला वाईट वाटत होतं. त्या गावात त्याचे एक दोन दूरचे नातेवाईकही होते. पण कुणीच काही का सांगितलं नाही, याचं त्याला आश्चर्य वाटत होता. कृष्णाशी त्याची चांगली मैत्री होती. पण त्यानंही कळवलं नाही. बाकी रिपोर्टरचा तर प्रश्नच नव्हता. आता काय करावं, या चिंतेत असतानाच मोबाईल वाजला. दैनिक पंचनामाचे संपादकसाहेब त्यांच्या खास कमावलेल्या संथ आवाजात म्हणाले. ‘गोरख … तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरल्या गावात एवढी जगावेगळी घटना घडते आणि आपल्याकडं त्याची एकही ओळ आली नाही, याचं मला खूप वाईट वाटतंय.’ ‘सर, मी सुटी घेऊन बहिणीला भेटण्यासाठी गेलो होतो. लांडगेसाहेबांकडून मंजूर करून घेतली होती.’ गोरख चाचरत उत्तरला. दोन क्षण थांबत संपादकसाहेब म्हणाले, ‘ठीक आहे. पण आता फार वेळ घालवून उपयोग नाही. आपल्याकडं बातमी नसल्यानं आपलेच लोक काहीबाही बोलताहेत. तुम्ही तातडीनं त्या गावात जा. सगळ्या बाजू नीटपणे तपासून घ्या. खोलात चौकशी करा. खरंच काय प्रकार झालाय, हे शोधून काढा. उद्याच सविस्तर रिपोर्ट करा. तुमच्याच मोबाईलमध्ये फोटो काढा.’ संपादकसाहेबांनी नीटपणे समजावून सांगितल्यानं गोरखच्या मनावरील ताण बऱ्यापैकी पळाला. आणि तो पुढील तयारीला लागला. त्यानं वनाधिकारी साईनाथ वावटळेंशी संपर्क साधला. तेव्हा तेही त्याच गावाकडं निघाले होते. मग गोरखनं फोटोग्राफर संतोषला कॉल करून मोटारसायकल घेऊन येण्यास सांगितलं. संतोष येईपर्यंत तो खोलीची आवरासावर करू लागला. वानराविषयी डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिवरील डॉक्युमेंटरीज आठवू लागला. बहिणीच्या गावातील दुकानातून आणलेली पुस्तकं ठेवता ठेवता त्याच्या नजरेस व्यंकटेश माडगूळकरांची ‘सत्तांतर’ कादंबरी पडली. वानरांच्या दुनियेची अजब कहाणी सांगणाऱ्या ‘सत्तांतर’ची अनेक पारायणं त्यानं दोन वर्षांपूर्वीच केली होती. त्यात माडगूळकरांनी म्हटलं होतं की, भारतात वानरांच्या सोळा उपजाती आहेत. अठराशे तेहतीसमध्ये ब्रिटीश संशोधक चार्लस मॅकॅनने पहिल्यांदा वानरांचा सखोल अभ्यास केला. नंतर काही भारतीय, परदेशी संशोधकांनी खूप लिहिलं. रानकुत्री वानरांचा मोठा शत्रू. एका डहाळीवरून दुसऱ्या डहाळीवर सूर मारताना अनेकदा वय झालेल्या वानरांचा किंवा कवळ्या पिलांचा अंदाज चुकतो. आणि खाली उभी रानकुत्र्याची टोळी त्याचा काही मिनिटातच फडशा पाडते. गावातली साधी कुत्रीही वानराच्या मागं लागतात. पण त्याचा बदला म्हणून वानर कुत्र्याचं पिलू उचलून त्याला हालहाल करून मारतं, असा कुठंही उल्लेख सत्तांतरमध्ये नव्हता. ‘पण काय सांगावं वानरंही बदलली असतील. माणसासारखी’, असं तो पुटपुटला. तेवढ्यात संतोष आला. ‘चला महाराज, वानरांच्या दुनियेतील खरी गोष्ट शोधण्याच्या मोहीमेवर चला’ असं म्हणत गोरखनं संतोषच्या मागे बसकण मारली. ०००००० गावात अक्षरश: उत्सवाचं वातावरण होतं. फक्त बँड वाजवणंच बाकी होती. प्रत्येक रस्त्यावर पोरांच्या टोळ्या होत्या. थोडी जाणती झालेली पोरं झाडं शोधत होती. त्यांनी खुण केली की छोटे बाचकेबुचके हुप्प हुप्प असा आवाज करीत दगडं फेकीत होती. बिथरलेली वानरं मारा चुकवीत कधी दात विचकीत इकडून तिकडं पळत होती. सुदैवानं इतर कोणी मिडिआवाले नव्हते. त्यामुळं गोरख, संतोषसाठी रान मोकळं होतं. त्यांच्याभोवती लोक गोळा झालेच. एखाद्या शाळकरी मुलाला समजावून सांगावं तसं भगतमास्तरांनी पद्धतशीरपणे उलगडून सांगितलं. पण त्यांचा सगळा भर पेप्रात वाचलेल्या बातमीवरच होता. ‘हाहा:कार उडाला बघा. सरकारचं काही लक्षच नाही. सगळा गाव वान्नेरांनी वेठीस धरलाय. पण कोणी काही बघायला तयार नाही. खरं पाहिलं तर सरकारनं येऊन वान्नेरं धरली पाहिजेत’ असं नामदेवराव पंडितांनी जोरदारपणं सांगितलं. त्याला लगेच केशवरावांनी आक्षेप घेतला. ‘आवं तक्रारच केली नाई अजून. लेखी काही दिलंच नाही तर सरकार काय कोणाच्या बापाचं नोकरंय का? त्याला काय सप्न पडलं का?’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यांच्या अशा हस्तक्षेपानं चिडलेले पांडुरंगराव म्हणाले, ‘घ्या. एवढी सगळ्या जगभरात बातमी चालली तरी सरकारला कळंना का? तुम्ही तर काहीही बोल्ता’. प्रकरण वेगळ्याच वळणावर जातंय, असं लक्षात येताच गोरख अन् संतोषनं हस्तक्षेप केला. एकच प्रश्न विचारला. ‘किती कुत्री मेली?’ कायम टाचा उंचावून फिरणारा आणि गेल्या काही दिवसात लीडर झालेला चिंतामण संधीची वाटच पाहत होता. ‘दोनशे, दोनशे मेलीत.’ त्याच्याकडे मोर्चा वळवत गोरखनं विचारलं, ‘तु पाहिलीस का?’ चढ्या आवाजात चिंतामण म्हणाला ‘हो तर. मी काय खोटं बोलतो?’ ‘तसं नाही. फक्त तु स्वत: पाहिलं का, असा माझा प्रश्न आहे. त्याचं हो किंवा नाही एवढंच उत्तर दे?’ त्यावर चिंतामण थोडासा गांगरला. म्हणाला, ‘ते काय, सदाशिवकाकानं पाहिलं ना.’ मग लवाजमा किराणा दुकानाच्या ओट्यावर बसलेल्या सदाशिवरावांकडे वळाला. स्मरणशक्तीवर बराच ताण देत ते म्हणाले, ‘हे पोट्टे काहीही सांगतेत. मी कदीच असं नाई म्हटलं हां. पण गावात पाच-सातशे कुत्रे असतील. त्यातील दोनशे दिसंनात असा अंदाजय माझा.’ संतोषनं किंचित चिडून विचारलं, ‘मग हा दोनशेचा आकडा आला कुठून? कोण खरं सांगल आम्हाला?’ तसं नुकताच वानरांचा पाठलाग करून आलेला श्रीपतीचा मोठा भाऊ हरीराम ओरडला, ‘काहीही बोलतेत लोकं. गावच एवढं छोटंसं. त्यात पाच-सातशे कुत्रे कुठून आले. एका एका गल्लीत दहा पकडले तरी शंभर असतील. त्यांची पिल्लं पन्नासच्या पुढं नाईतच.’ त्याच्या बोलण्यानं गोरखनाथ सुखावला. कृष्णानं घाईगडबडीत किंवा काहीतरी थरार करायचा म्हणून मेेलेल्या पिलांचा आकडा वाढवून टाकला. त्याला वान्नेर-कुत्र्याच्या टोळीयुद्धाची फोडणी मारली, हे त्याच्या लक्षात आलं. आता आणखी कोणाला बोलतं करावं, असा विचार करत असतानाच त्याचा दूरचा नातेवाईक बद्रीनाथनं हाळी दिली. ‘काय राव, एवढी मोठी घटना घडली तुमच्या गावात अन् तुम्ही मला कळवलंच नाही. मोबाईलवर मेसेज तर टाकायचा.’ गोरखनं नाराजी व्यक्त केली. बद्री खजिल होत म्हणाला, ‘अरे.. मी नवा मोबाईल घेतला तर तुझा नंबरच गेला बघ.’ ‘बरं जाऊ द्या. गाव तर जगप्रसिद्ध झालं. तुम्हाला पण पाहिलं मी काही न्यूज चॅनेलवर.’ ‘हा .. हा .. ते खरंय. पण मला जे सांगायचं होतं ते त्या चॅनलवाल्यानं बोलूच दिलं नाही.’ ‘काय सांगायचं होतं. मला सांगा. आम्ही स्पेशल रिपोर्ट करतोय.’ गोरखनं सांगून टाकलं. मग बद्री फुसफुसत म्हणाला, ‘हा जो आकडा सांगताय ना दोनशे कुत्र्याची पिल्लं मारली. ते काही खरं नाही. फार झालं तर पाच-सात गेली असतील.’ ‘अहो, पण पाच-सात का होईना मेली ना? वानरांनी कुत्र्याची पिल्लं हाल हाल करून मारणं हीच किती भयंकर गोष्टंय.’ गोरखनं मत व्यक्त केलं. बद्रीनाथ आवाज आणखी हलका करत म्हणाला, ‘हे पण काही खरं नाही. वान्नेरांनी पिलाला हाल करून मारलं. त्यांची मुंडी मुरगाळली, असं कोणीही पाहिलं नाही. दोन पिलं मंदिराजवळच्या दगडी शिळेवर रक्ताच्या थारोळ्यात दिसली. या पेक्षा काही नाही. अन् तुम्ही गावात कोणालाही विचारा. कुत्र्यानं वान्नेराच्या पिल्लाला मारलेलंच नाही. मग ते कुत्र्याच्या पिल्लांना मारून कशाला बदला घेतील? उगाच कोणीतरी तशा अफवा पसरवल्या. अन् काही पेप्रावाल्यांनी, चॅनलवाल्यांनी तेच भडकून दिलं.’ बद्रीचं असं बोलणं सुरू असतानाच गलका झाला. साळुंक्या चिरकत उडाल्या. गोसावी चिमण्यांनी कलकलाट केला. संतोषनं कॅमेरा झाडांच्या दिशेनं फिरवला तर म्हाळ्यानं एक पिलू बकोटीला मारून चिंचेची सगळ्यात वरची, मोठी फांदी गाठली होती. पोरांना तेच हवं होतं. त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळं चिडलेले दोन म्हाळे त्यांच्या अंगावर चालून येऊ लागले. संतोष लाईव्ह फोटोमुळं खुश होता.पण गोरखला ही हल्लेबाजी पसंत नव्हती. तो ओरडणार तोच पोरंच थबकली. कारण वन अधिकारी वावटळे आणि त्यांचं पथक दाखल झालं होतं. मग त्यांच्याभोवती घोळका झाला. या वाड्यासमोरून त्या वाड्यासमोर, या घरातून त्या घरात. एका झाडाकडून दुसऱ्याकडं घोळका फिरू लागला. दोन चकरा झाल्यावर गोरखनं वावटळेंनाही तेच विचारलं, ‘साहेब, दोनशे कुत्र्यांची पिलं मेली आणि ती पिसाळलेल्या वानरांनीच मारली, असं काही तुमच्या निदर्शनास आलंय का?’ गेल्या आठ दिवसांपासून वावटळेंना एकाही मिडिआवाल्यानं काहीच विचारलं नव्हतं. त्यामुळं त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पहिलीच संधी मिळाली होती. ते म्हणाले, ‘वानरानं उच्छाद मांडला अशी एक तक्रार आली होती. पण त्यात काही गांभीर्य जाणवलं नाही. म्हणून कारवाई करता आली नाही. आता हा दोनशेचा आकडा आला.’ ‘पण खरं काय आहे. तुमचा अनुभव, अभ्यास काय सांगतो?’ ‘एक एक गोष्ट क्लिअर करतो. पहिलं म्हणजे ही वानरं पिसाळलेली नाहीत. तसं असतं तर ती अनेकांना चावत सुटली असती. दुसरी गोष्ट - दोनशे पिलं मारलेली तुम्हालाही सापडणार नाहीत. आम्हालाही सापडली नाहीत. कितीही आकडा फुगवला तर वीसच्या पुढं जाणार नाही. तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा. तो म्हणजे वान्नेरं कुत्र्यांचा बदला घेत नाही. कारण या गावातल्या कुत्र्यांनी वानराचं एकही पिलू मारलेलं नाही. मुळात पिलू मेल्याचं वानराला तेवढं कळत नाही. अनेक माद्या मेलेलं पिलू तीन-चार दिवस स्वत:सोबत वागवत असतात.’ गोरखनं वावटळेंना मध्येच थांबवत विचारलं, ‘साहेब, हा बदला नाही, असं तुम्ही एवढ्या ठामपणे कसं म्हणू शकता?’ वावटळे पटकन खिजवत्या स्वरात म्हणाले, ‘अरे, असं काय करताय पत्रकारसाहेब. गावात फिरणारे तिन्ही नर आहेत नर. म्हाळे आहेत. त्यात एकही मादी नाही. आता मादीच नाही तर वान्नेराची पिलं कुठून आणली तुमच्या मिडिआवाल्यांनी? तुम्हीच शोध घ्या.’ ‘बरं, पण आता डोळ्यांनी मला आणि तुम्हालाही दिसतंय. एक वान्नेर कुत्र्याच्या पिलाला घेऊन बसलंय. तर ते कशासाठी?’ ‘ते शोधावं लागंल. एका ओळीत प्रश्न एका ओळीत उत्तर असं होणार नाही. वानर हजारो वर्षांपासून माणसासोबत राहत असलं. आपल्या पुराणात वानरांच्या अनेक कथा असल्या अगदी वानररुपातील हनुमान आपला देव असला तरी वानराशी कसं वागावं. त्याला कसं समजून घ्यावं, हे अजूनही आपल्याला समजलेलं नाही.’ ‘साहेब, माझा थेट प्रश्न आहे. वानर पिलांना का उचलून नेतंय?’ गावकऱ्यांकडं हलकी नजर टाकत साहेब म्हणाले, ‘हे बघा. बीड जवळच्या तागडगावात वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक व प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे राहतात. त्यांनी मला कालच सांगितलंय की, वानरांना कुत्र्याच्या अंगावरील ऊ, लिखा व इतर किटक काढण्याची सवय असते. त्यासाठी त्यांनी कुत्र्याची पिलं उचलली असावीत. पण गावकऱ्यांनी त्यांना चोर, मारेकरी ठरवलं. त्यांच्यावर दगडं फेकली. धावपळीत उंचावरून पिलू वानराच्या हातातून पडून मेलं. त्याला सूड, बदला घेणं म्हटलं गेलं. खरंतर वानरानं पिलाची मान पिरगाळली, गळा आवळला किंवा वरून फेकून दिल्याचं कोणी पाहिलं नाही. काही पिलं अन्न-पाण्यावाचून मेली असावीत. आणखी एक निवृत्त वनाधिकारी विजय सातपुते यांनी तर असंही सांगितलं की, वानर आणि कुत्र्यांत टोळीयुद्ध सुरू झालं. वानरांनी दोन अडीचशे कुत्र्यांच्या पिल्लांचा बळी घेतला. माणसं, लहान मुलांवर हल्ले केले, अशा बातम्या मिडीयावाल्यानी दिल्या. वस्तुस्थितीत असं काहीही झालं नाही. दोन ते तीन पिलांचा मृत्यू झाला. वानर हा प्राणी समाजशील. तो लोकांच्या अवतीभोवती, गावाजवळ मुक्काम पसंत करतो. वानर स्वसंरक्षण सोडता विनाकारण कोणालाही इजा पोहोचवत नाहीत. त्यानं कुत्र्याची, मांजराची पिले उचलणे ही निव्वळ नैसर्गिक घटना आहे.’ वावटळेंच्या बोलण्यानं गोरख, संतोष काहीसे समाधानी झाले. पण गावकऱ्यांचं काय? त्यांनी घोळक्यावर नजर फिरवली तर अनेकांच्या चेहऱ्यावर वानरांच्या दुनियेविषयी नवे ज्ञान मिळाल्याची भावना होती. काशिनाथच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. आपण कृष्णाला दोन पिलं मेल्याचं सांगितलं होतं. पण त्याला वेगळंच ऐकू गेलं. तरी आपण त्याला तेही सांगायला नको होतं, असं त्याला वाटलं. विशेष म्हणजे चिंतामणीही बराच शांत झाला होता. त्यानं अन् नित्या, रघूनंही हातातली, खिशात भरलेली दगडं खाली टाकली. एक-दोन जाणत्या पोरांनी काठ्या झाडाखाली टाकून दिल्या. ते पाहून वावटळेही खुश झाले. ‘आपण विदर्भ, औरंगाबादेतून एक्स्पर्ट बोलावलेत. लवकरच या वानरांना पकडून जवळच्या जंगलात सोडलं जाईल’ अशी घोषणा त्यांनी केली. त्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. आता सगळं संपलं. सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली, असं वाटून संतोष मोटरसायकलकडं वळाला. पण गोरखच्या डोक्यात एक प्रश्न गिरक्या घेत होताच. तो तडक बद्रीनाथचा मामेभाऊ उमाकांतच्या वाड्यात शिरला. तेव्हा तिथं पोरांची एक झुंड होतीच. शिवाय माहेरपणाला आलेल्या उमाकांतच्या दोन बहिणी, बहिणींच्या सासूबाईही होत्या. त्या सगळ्याजणी माळवदाकडंच बघत होत्या. अधून-मधून पत्र्याचा तडतड आवाज येत होता. गोरखनं विचारलं तर वैतागलेला उमाकांत म्हणाला, ‘अरे बाबा. तु एवढा मोठा पत्रकार. जरा मदत कर. तालुक्याच्या साहेबांना सांगून या वान्नेरांना पकडून दे.’ चहाचा कप हातात घेत गोरख माळवदाकडं पाहू लागला. त्याला काय प्रश्न पडला, हे जणूकाही उमाकांतला कळालंच असावं. तो सांगू लागला. ‘वान्नेरांनी चार पिलं आणून ठेवलीत पत्र्यावर. उंचावरून पिलू पडलं तर मरतं हे त्याला आता उमगलं असावं. पण आम्हाला त्याचा किती त्रास. दिवसभर नुसता धिंगाणा.’ कृषी खात्यात काम करणारे उमाकांतचे भावजीही बोलण्यास सरसावले. ‘दिवसभर वान्नेरं कोवळी पानं, उंबरं खातेत. पिलांना थोडीच ते जमतं. खाणं-पिणं नाही तर खंगून दोनएक पिलं मेली असणार. म्हणून मी उपाय सुचवला. आता वान्नेर थोडं इकडं तिकडं गेलं की आम्ही पत्र्यावर दूध-पोळी कुस्करून ठेवतो. वान्नेर पिलाला ते निवांत खाऊ देतं. हाडहूड करत नाही. गावातले काही लोक काहीही सांगोत. पिलं रमलीत वान्नेरांसोबत. अन् मला सांगा कुत्र्याचं अन् वान्नेराचं तर हाडवैर. मग पिलाला उचललं तर कुत्र्यांनी त्यांच्यावर किती हल्लाबोल करायला पाहिजे होता. तसं तर काही दिसत नाही. पिलंही केकाटत नाहीत. प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर हिवरे यांचं तर असं म्हणणंय की, उत्क्रांतीच्या वरच्या शिडीवर असणाऱ्या प्राण्यांत अपत्य आसक्ती विकसित होत असते. वानर अशा वरच्या शिडीवर आहे. ’ असं म्हणत भावजींनी दीर्घ श्वास घेतला. आणि फर्मान काढावं अशा आवाजात म्हणाले, ‘हे सगळं तुम्ही लिहून काढा. म्हणजे लोकांच्या मनात गैरसमज होणार नाही. सगळ्या शंका-कुशंका फिटतील.’ गोरखनं मान डोलावली. तरीही त्याच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न कायम होताच की, वान्नेरं पिलांना का उचलतात? त्यानं धीर एकवटून तो विचारला. त्यावर उमाकांत, भावजी अन् इतरही जाणते एकमेकांकडे टकमका बघू लागले. मग गोरख अखेरचा उपाय म्हणून महिलांकडे वळत म्हणाला, ‘काकी … तुम्ही तर कीर्तनकार, भारुडकार. पंचक्रोशीत तुमच्या बोलण्याला मान्यता. तुम्ही इतके उन्हाळे, पावसाळे पाहिले. तुम्हाला काय वाटतं? कशामुळं हे नर वान्नेरं पिलांना उचलत असतील?’ रुपयाएवढं कुंकू लावलेल्या, चेहऱ्यावर तेज पसरलेल्या बायजाबाईंनी डोक्यावरचा पदर नीटसा केला. अन् त्या उत्तरल्या, ‘यावर आमचंबी कालच थोडंसं बोलणं झालं. आता तु विचारलं तर थोडक्यात सांगते. कसंय की माणसासारखीच वान्नेरालाबी लेकराची लई आवड. लेकराबाळांसोबतच त्येंचं जीवन चालतं. लेकरं आजूबाजूला नसली तर जीव तगमत ऱ्हातो. आता या गावात आलेले तिन्ही नरच. त्यांच्यासोबत मादी नाही. मग लेकराची हौस भागवावी कुठून. कोणाचं लाड करावेत, कोणाचं कौतुक करावं, असं त्यांना वाटू लागलं. मग त्यांनी त्यांच्या बुद्धीनुसार चार पायावर चालणारं, शेपूट असलेलं, छोटंसं कुत्र्याचं पिलू उचललं. नर असला म्हणून काय झालं त्याच्यातही आईची, मातेची माया असणारच की. बापात पण माय असतीच ना.’ बायजाबाईच्या सांगण्यानं गोरखच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शंकेचं जाळं एका क्षणात फिटून गेलं. चटकन उठून त्यानं बायजाबाईंच्या चरणावर डोकं टेकवलं. अन् वाड्याबाहेर पडला. त्याची नजर समोर चिंचेच्या झाडावर पडली. उंच जाडजूड डहाळीवर वानर चारही दिशावर नजर फिरवत बसलं होतं. अन् त्याच्या मांडीची उशी करून कुत्र्याचं पिलू निवांतपणे पहूडलं होतं. जसं आईच्या कुशीत लेकरू. ००००००००

Tuesday 7 December 2021

असं का होतं?

रसिकांच्या हृदयावर अविरत राज्य करणारी, जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी दोनच पण अतिशय सुमधूर गीते. संथगतीची तरीही खिळवून ठेवणारी कथा, कसदार दिग्दर्शन अन् सहजसुंदर अभिनय अशा चौरंगी संगमाचा सिनेमा ‘रजनीगंधा’. १९७४चा हा सिनेमा आजही मोहात पाडतो. त्याच्या मूळ कथाकार, हिंदीतील प्रख्यात लेखिका मन्नु भंडारी यांचे नुकतेच निधन झाले. त्या निमित्ताने रजनीगंधा पडद्यावर येण्याच्या प्रवासाची ही कहाणी. १९६९मध्ये हिंदीतील मातब्बर लेखक राजेंद्र यादव यांची ‘सारा आकाश’ कादंबरी प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक बासु चटर्जींच्या हाती लागली. त्यावरून त्यांनी सिनेमा केला. तो तिकीट खिडकीवर, समीक्षकांच्या नजरेत यशस्वी ठरला. त्यानंतर बासुदा नव्या कथेचा शोध घेत असताना राजेंद्र यादव यांच्या पत्नी मन्नू भंडारी यांची ‘यही सच है’ कथा त्यांच्या वाचनात आली. आणि याच कथेवर आपला पुढील सिनेमा असेल, असं त्यांनी जाहीर केलं. मन्नु उर्फ महेंद्रकुमारींना भेटून त्यांनी आपला मानस सांगितला. तेव्हा त्यांना सौम्य धक्काच बसला. कारण आपल्या या कथेत सिनेमा करण्यासारखं काही असेल, असा त्यांनी कधी विचारच केला नव्हता. प्रेमभंगाचा धक्का पचवू पाहणाऱ्या एका मनस्वी, मध्यमवर्गीय तरुणीची मानसिक आंदोलनं त्यांनी ‘यही सच है’मध्ये तरुणीच्या रोजनिशीतून आविष्कृत केली होती. ही आंदोलनं पडद्यावर कशी मांडता येईल, असा त्यांचा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता की, हे मांडलेलं रसिकांना कसं आवडेल? आपल्या कथेतील अलगद तरीही अतिशय रुतत जाणारी मांडणी मोठ्या पडद्यावर हलकी तर होणार नाही ना? पण बासुदा त्यांच्या निर्णयावर ठाम होते. कथानकात काही बदल करून त्यांनी विद्या सिन्हा, अमोल पालेकर आणि दिनेश ठाकूर या त्या वेळच्या फारशा परिचित नसलेल्यांना भूमिका दिल्या. १९७२-७३ मध्ये दिल्लीत थोडंसं चित्रीकरण झालं. तेव्हा तर मन्नु भंडारींना सतत असं वाटू लागलं की हा सिनेमा आपटणार. मग बातमी कानावर आली की, वितरकांनी रजनीगंधा प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. यात काहीच मसाला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मन्नुजी खट्टू झाल्या. यात एकतरी बडा कलावंत हवा होता, असं त्यांना वाटू लागलं. पण काही महिन्यात त्यांना त्याचाही विसर पडला. सहा महिने उलटले आणि बासुदांनी कळवलं की, ताराचंद बडजात्या यांनी आपला सिनेमा वितरित करण्यास घेतला आहे. रजनीगंधा प्रदर्शित झाला आणि इतिहास घडला. रसिक आणि समीक्षक असे दोन्ही फिल्म फेअर पुरस्कार या सिनेमानं पटकावले. विद्या सिन्हा, अमोल पालेकर रातोरात स्टार झाले. दिनेश ठाकुरांभोवती वलय निर्माण झालं. बासुदांच्या प्रतिभेवर शिक्कामोर्तब झालं. त्या तुलनेनं मन्नु यांचे फारसं कौतुक झालं नाही. आणि त्यांनीही ते खेचण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्या त्यांच्या लिखाण कामात दंग होऊन गेल्या. 'मैं हार गई', 'तीन निगाहों की एक तस्वीर', 'एक प्लेट सैलाब', 'यही सच है', 'आंखों देखा झूठ' और 'त्रिशंकु' या त्यांच्या कथांमधून त्यांनी महिलांच्या व्यथांची परखड, वास्तववादी मांडणी केली. हिंदीसह सर्व भाषिक साहित्यात त्या सर्व कथा प्रचंड गाजल्या. त्यांच्या महाभोज कादंबरीनं साहित्यिक, राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. १९७९मध्ये प्रकाशित झालेल्या या साहित्यकृतीत एका सामान्य माणसाचे भ्रष्ट नोकरशाही कसे हाल करते, याचं मर्मभेदी वर्णन होतं. ‘आपका बंटी’ या त्यांच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित सिनेमा कायद्याच्या कचाट्यात अडकला. त्यात त्यांनी प्रेमात आकंठ बुडणं, विवाह होणं आणि एके दिवशी विभक्त होणं यात महिलेची किती, कशी फरफट होते, हे सांगितलं होतं. व्यक्तिगत जीवनातील अनुभव त्यांनी मांडले होते. यशस्वी लेखिका असल्या तरी वैवाहिक जीवनात त्या होरपळल्या होत्या. रजनीगंधानं स्टार बनवलेल्या विद्या सिन्हांचंही काहीसं असंच झालं. त्यांना खऱ्या आयुष्यात सुख मिळालंच नाही. अखेरच्या टप्प्यात तर त्यांना दुसऱ्या पतीकडून मारझोड सहन करावी लागली. एकाकी अवस्थेत त्यांचा शेवट झाला. म्हटलं तर काहीजणांचं आयुष्य खूपच गुंतागुंतीचं, क्लिष्ट आणि काहींचं सोपं, सुटसुटीत, सरळ रेषेसारखं असतं. अनेकदा सरळ चालणारे भरकटून जातात आणि भरकटलेले ताळ्यावर येतात. हे असं का असतं? का होतं, याचं ठोस, अचूक उत्तर अजूनतरी सापडलेलं नाही. त्याचा शोध अखंडपणे सुरू आहे. आणि तो सुरू असेपर्यंत मन्नु भंडारी यांच्या कथा, अमोल पालेकर-विद्या सिन्हांचा सहज अभिनय, बासुदांचे दिग्दर्शन अजरामर राहिल. खरंय ना?