Wednesday 12 October 2016

निष्कलंक : डॉक्टरांचा संदेश





अलिकडे सगळ्याच क्षेत्रात नितीमूल्यांची, नैतिकता आणि चांगुलपणाची जोरदार घसरण सुरू झाली आहे. राजकारण तर व्यवसाय होऊ घातला आहे, असे म्हणणे पलिकडे गेले आहे. शिक्षण क्षेत्रात संस्थाचालक शिक्षकांची गळचेपी करत आहेत. अनेक शिक्षक त्यांचे मूळ काम विसरत आहेत. कलावंत मंडळी मनोरंजनातून मिळवलेली लोकप्रियता राजकारण, प्रॉपर्टी डिलिंगसाठी वापरत आहेत. पोलिस, सरकारी नोकर वरकमाईसाठीच काम करत आहेत. व्यापारी मंडळी टोकाच्या फायद्याचा विचार करत आहेत. पत्रकार, उद्योजक सत्ताधाऱ्यांना ताब्यात ठेवण्यासाठी शक्ती वापरत आहेत. आणि एकेकाळी देवाच्या जागी मानले जाणारी अनेक डॉक्टर मंडळी रुग्णाला वेठीस धरून धनिक होण्यासाठी धडपडत आहेत. (प्रा. अजित दळवी यांच्या डॉक्टर तुम्ही सुद्धा या प्रचंड गाजलेल्या नाटकात वैद्यकीय जगाची काळी बाजू खूप टोकदारपणे आली आहे.) ही सगळी वस्तुस्थिती असली तरी प्रत्येक क्षेत्रात बरीच सुजाण, संवेदनशील लोकही आहेत. त्यांचे सामाजिक भान अत्युच्च आहेच. पण केवळ भान राखण्यापुरतेच ते स्वतःला थांबवत नाहीत. तर पिडीत, शोषितांच्या मदतीलाही धावून जात आहेत. त्यात डॉक्टरांचाही समावेश आहे. औरंगाबादेत असे काही डॉक्टर सातत्याने सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार घेताना दिसतात. त्यांची आयएमए ही संघटना नवनवे कार्यक्रम हाती घेत असते. रविवारी आयएमएच्या रंगकर्मी ग्रुपतर्फे सादर झालेली `निष्कलंक` एकांकिका सामाजिक दायित्व निभावण्याचाच एक भाग होता, असे म्हणावे लागेल. कारण हे सादरीकरण केवळ डॉक्टरांना रंगमंचावर येण्याची हौस होती म्हणून झाले नाही तर त्यातून एक चांगला संदेश समाजाला देण्यात आला. काही वर्षांपूर्वी घडून गेलेली आणि पडद्याआड लपलेली एक सत्य घटना पडद्यासमोर आणण्यात आली. निष्कलंकमध्ये मांडण्यात आलेला प्रश्न अजूनही कायम असल्याने विषयाचे समकालीन मूल्य आणखी तीव्रतेने जाणवते. आणखी थोडीशी तयारी करून या एकांकिकेचे किमान मराठवाड्यातील आठ-दहा प्रमुख शहरांमध्ये प्रयोग झाले तर महिलांविषयी अजूनही कलुषित, पारंपारिक विचार करणारी काही मने बदलू शकतील.

अशी मने बदलण्याची सुरुवात डॉ. भवान महाजन यांनी निष्कलंकच्या निमित्ताने सुरू केली, असे म्हणता येईल. इंग्लंडमध्ये डॉक्टरी व्यवसायात स्थिरावलेले असतानाही डॉ. महाजन मराठी ग्रामीण रुग्णांची सेवा करण्यासाठी परतले. येथे त्यांना अनेक प्रकारची माणसे भेटली. त्यांचे दुःख, वेदना त्यांनी जाणून घेतल्या. अनेकांना सढळपणे मदतही केली. हे सारे करत असताना आलेले अनुभव त्यांनी मैत्र जिवाचे या पुस्तकात नोंदवले. खरे म्हणजे ग्रामीण आरोग्य आणि डॉक्टरी पेशाचा तो एक दस्तावेजच आहे. त्यातील एका सत्य घटनेवर आधारित कहाणीचे नाट्य रुपांतर डॉ. अनंत कडेठाणकर यांनी केले. आणि डॉक्टरी व्यवसायात कमालीच्या व्यस्त असलेल्या डॉ. अमोल देशमुख, डॉ. स्वप्ना बोंडेकर, डॉ. प्रगती फुलगीरकर, डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. वर्षा वैद्य यांना सोबत घेऊन त्याचा प्रयोगही सादर केला. नाट्यशास्त्राचे विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन रंगकर्मींच्या सादरीकरणात लावले जाणारे निकष निष्कलंकला लावता येणार नाहीत. कारण यातील एकही जण मूळचा रंगकर्मी नाही. हौशी रंगभूमीवर काम केल्याचाही मोठा अनुभव त्यांच्याकडे नाही. तरीही त्यांनी एका महत्वाच्या प्रश्नाकडे सुजाण समाजाचे लक्ष वेधणाऱ्या एकांकिकेचे सादरीकरण केले. हे अत्यंत महत्वाचे आहे. प्रयोगाच्या उद्‌घाटनास आलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. अनुया दळवी यांनीही हाच मुद्दा मांडला आणि तो अतिशय योग्य आहे. डॉ. महाजन यांची कथा अतिशय भेदक आणि अस्वस्थ करणारी. तिचे नाट्य रुपांतर डॉ. कडेठाणकर यांनी संवेदनशीलतेने केले. वांझपणाचे दुःख भोगत जगणारी आणि ऑपरेशननंतर आपण वांझ नाही, असे कळाल्यावर आनंदाने फुललेली तान्हाबाई प्रगती फुलगीरकरांनी खूपच सहजपणे साकारली. डॉ. अमेय देशमुख यांनी तान्हाबाईच्या पोटात गर्भ होता हे कळाल्यावर उडालेली खळबळ छान व्यक्त केली. शिवाय स्वगतात त्यांचा प्रामाणिकपणाही अपेक्षेनुसार जाणवला. पुढील प्रयोगात डॉ. स्वप्ना बोंडेकरांच्या संवाद शैलीवर दिग्दर्शकाने थोडे लक्ष दिले तर डॉक्टर पती-पत्नीतील संभाषणे अधिक गंभीर होऊ शकतील. विषयाला अधिक सखोल करू शकतील. डॉ. कडेठाणकर यांचा बंडेराव, अनंत कुलकर्णींचा बारकू, वर्षा वैद्य यांची सासूबाईही भूमिकेला साजेशी. रवी कुलकर्णी यांचे नेपथ्य अत्यंत लक्षवेधी. आयएमएच्या अत्यंत छोट्या आकाराच्या रंगमंचावर कुलकर्णी यांनी डॉक्टरचे घर, दवाखाना, तान्हाबाईचे घर उभे केले होते. आणि हे करताना प्रत्येक कलावंताला रंगमंचावर वावरण्यासाठी पुरेशी जागा राहिल, याचीही काळजी घेतली होती. अमेय बोंडेकर यांची ध्वनी, प्रकाशव्यवस्था व्यावसायिक कसोटीवर उतरणारी होती. असे म्हणतात की, आपण ज्या व्यवसायात, क्षेत्रात, समाजात काम करतो. त्यातील अपप्रवृत्तींवर आपणच प्रहार केले पाहिजेत. सुधारणेसाठी पावले टाकली पाहिजेत. डॉ. भवान महाजन, डॉ. अनंत कडेठाणकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तसा प्रयत्न नक्कीच केला आहे. इतर क्षेत्रात नाव कमावलेल्यांमध्ये असा प्रयत्न करण्याचे धाडस आहे काय

No comments:

Post a Comment