Wednesday 29 March 2017

विद्यापीठ नाट्यशास्त्राचाही महोत्सव दिल्लीत व्हावा



ॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग म्हणजे कायम टीकेचा धनी, असे चित्र अनेक वर्षे होते. प्रख्यात, उत्तुंग अभिनेते आणि वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे या विभागाची धुरा सांभाळत असताना टीकेचा स्वर खूपच तीव्र होता. कारण विभागाची सर्व सूत्रे ते स्वत:च्या हातात राखून होते. वऱ्हाड त्या काळात लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर होते. देशभरातील सर्वच नामवंत कलावंत आणि सरकारी अधिकारी अगदी सर्वपक्षीय राजकारणीही देशपांडेंच्या अभिनयावर फिदा होते. त्यामुळे
अनेक चांगले, दर्जेदार उपक्रम राबवत असतानाही प्रसिद्धीचा आणि सृजनशीलतेचा झोत त्यांच्याशिवाय अन्य कुणावरही जात नव्हता. गेला तरी तो काही काळातच पुन्हा वऱ्हाडकारांवर येत होता. नाट्यशास्त्र विभागाचे एकांकिका आणि दोन अंकी नाटकांचे महोत्सव हा विभागासाठी सर्वात महत्त्वाचा भाग. वर्षभर नाटकाचे नेमके काय शिक्षण घेतले ते या महोत्सवात विद्यार्थ्यांना दाखवून द्यावे लागते. तो त्यांच्या परीक्षेचाच एक भाग असतो. त्यात रसिक हेच पहिले परीक्षक असतात. शिवाय पुढे नाट्यक्षेत्रात किंवा टीव्ही मालिका, चित्रपटाकडे वळायचे की नाही, याचा अंदाज बहुतांश विद्यार्थ्यांना येत असतो. प्रा. देशपांडे यांच्या आधी विभागप्रमुख पदाची धुरा सांभाळणारे प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी महोत्सवांची परंपरा सुरू केली. त्यांच्या काळात ते प्रचंड लोकप्रिय होते. कारण त्यामागे सोनटक्केंची प्रचंड मेहनत होती. कलावंत घडवणे म्हणजे नेमके काय, हे त्या महोत्सवातून कळत होते. नंतर देशपांडेंनी दरवर्षी महोत्सवांचे आयोजन केले. पण एकूणच विभाग हाताळण्याची त्यांची पद्धत वेगळीच म्हणजे आक्रमक होती. परिणामी नाट्यक्षेत्रात त्यांच्या इतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा किंचित उजवे असणारे प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूकर, प्रा. अलोक चौधरी, प्रा. कुमार देशमुख बरेच झाकाळून गेले होते. अनेक बड्या कलावंतांना ते महोत्सवातील काही प्रयोग पाहण्यासाठी घेऊन येत. त्यामुळे महोत्सव चर्चेत येत असे. मात्र, त्याचा थेट विद्यार्थ्यांना कोणताही फायदा होत नसे. त्याही काळात प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब यांनी वऱ्हाडकारांचा प्रभाव कमी करण्यात आघाडी घेतली होती. अस्सल लोककलावंत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा वर्ग निर्माण करण्यातही त्यांना यश मिळाले होते. पुढे विभागप्रमुख झाल्यावरही अचलखांब यांनी अनेक उत्तम महोत्सवांचे आयोजन केले. स्वत: परफॉर्मिंग आर्टिस्ट असल्याने काही नाटकांमध्येही भूमिकाही केल्या. अचलखांब यांच्यानंतर विभागप्रमुख झालेले प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचा महोत्सवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. काही िवद्यार्थी केवळ कलावंत आहेत तर काही जणांमध्ये नाट्य व्यवस्थापन आयोजनाचे गुण आहेत. त्यांनाही वाव मिळाला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. सरकार दरबारी आणि समाजातील विविध स्तरांत बऱ्हाणपूकर यांच्याविषयी आदर आणि आपुलकीची भावना होती. त्याचाही उपयोग त्यांनी विभागासाठी करून िदला. प्रसिद्धी, सृजनशीलतेचा झोत आपल्यावरच राहता कामा नये, याची बरीच काळजी घेतली. प्रचंड मेहनत आणि संवादांतून अभिनय उलगडून दाखवणे, ही बऱ्हाणपूरकरांची शक्तिस्थाने होती. ती त्यांनी महोत्सवातील काही नाट्यप्रयोगात दाखवून दिली. शिवाय लोकल ते ग्लोबल असा नारा देत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. दोन अंकी शिवाय एकांकिका महोत्सवावरही त्यांनी लक्ष दिले होते. विद्यार्थ्यांनी स्वत:च एकांकिका लेखन केले पाहिजे, यावरही भर दिला. एवढेच नव्हे तर तरुण लेखकांच्या कार्यशाळाही घेतल्या. त्यांच्या नाट्य लेखनाचे अभिवाचन महोत्सव औरंगाबाद, मुंबईत घेतले. एका अर्थाने कलावंत, लेखक, नाट्य व्यवस्थापकांची पिढी घडवण्याचे काम त्यांनी तसेच प्रा. डॉ. अचलखांब यांनी बऱ्याच अंशी केले. बऱ्हाणपूरकर सेवानिवृत्त झाल्यावर प्रा. डॉ. जयंत शेवतेकर यांच्याकडे विभागप्रमुखपदाची जबाबदारी आली. शास्त्रीय नृत्यातील मातब्बर आणि नाट्यक्षेत्रातील जाणकार अशी ओळख असलेले शेवतेकर आता नेमके काय करणार. विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम राबवणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यातील शास्त्रीय नाट्य महोत्सवाचा प्रयत्न त्यांनी विभागातील सहकारी तसेच प्रा. डॉ. दासू वैद्य, प्रा. डॉ. मुस्तजीब खान या संवेदनशील रंगकर्मींच्या मदतीने यशस्वी केला आहे. नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) तर्फे २२ ते २५ मार्च कालावधीत आयोजित हा महोत्सव रसिकांच्या पसंतीस उतरणारा ठरला. सुप्रसिद्ध रंगकर्मी, संगीतकार, चित्रकार आणि अभिनेते रतन थिय्यम यांनी दिग्दर्शित केलेले ‘उरुभंगम’ तसेच कवालम नारायण पण्णीकर दिग्दर्शित महाकवी कालिदासाचे शाकुंतलम्, सूर्यमोहन कुलश्रेष्ठ दिग्दर्शित भगवद्अजुयक्कियम, एनएसडीचे संचालक वामन केंद्रे दिग्दर्शित मोहे पिया ही वेगळ्या धाटणीचे आणि नव्या रंगकर्मींना खूप काही शिकवून जाणारे प्रयोग सादर झाले. महोत्सवाच्या उद््घाटनासाठी त्यांनी विभागापासून अनेक वर्षे दूर राहिलेले माजी विभागप्रमुख प्रा. सोनटक्के यांना निमंत्रित केले होते. उद्््घाटनात प्रा. सोनटक्के यांनी सांिगतले ते महत्वाचे. ते म्हणाले की १९७३ मध्ये हा प्रयोग सुरू झाला. तेव्हा तो एकपात्री प्रयोग होता. पुढे प्रा. लक्ष्मण देशपांडे, प्रा. दत्ता भगत, रुस्तुम अचलखांब, दिलीप घारे आदींनी विभागाला उंचीवर नेले. रंगकर्मी म्हणून ज्या गोष्टी आपल्याला करता आल्या नाहीत, त्या आपल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवल्याचा आपल्याला अभिमान अाहे. सोनटक्केंचे हे म्हणणे अगदी खरे आहे. कारण त्याकाळी नाट्य जगतात स्वत:चे अस्तित्व सिद्ध करून दाखवण्यासाठी धडपडणारे विद्यार्थी होते. आणि त्यांच्यासाठी मेहनत घेणारे िशक्षकही होते. आता विद्यार्थ्यांना नाटकापेक्षा टीव्ही मालिका, चित्रपटांचे अधिक आकर्षण आहे. एक-दोन नाटकांत भूमिका केल्यावर मुंबईला पळण्याची घाई आहे. त्यांना येथे रोखून त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ देण्याची जबाबदारी डॉ. शेवतेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. त्याकडे त्यांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. जसा एनएसडीचा महोत्सव औरंगाबादेत झाला तसा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचा महोत्सव दिल्लीला एनएसडीत करता आला तर बरेच काही साध्य होईल. नाही का?

1 comment: