Thursday 27 September 2018

गावगाड्याचे शेकडो भेदक छेद

बालाजी सुतार यांनी कथा, कवितांतून गावाचे उभे, आडवे शेकडो छेद भेदकपणे मांडले आहेत. त्यांच्या गावाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हे तर लांबलचक भेगा पडल्या आहेत. या भेगा किती भयावह, वेदनादायी आणि मराठी समाजात खोलवर पोहोचल्या आहेत, याची जाणिव ‘गावकथा’ हे नव्या शैलीतील नाट्य पाहताना वारंवार होते. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात ९ सप्टेंबरला गावकथाचा प्रयोग पाहणाऱ्या सर्वांनाच हा अनुभव आला. सभागृह खचाखच भरल्याने मी विंगेत उभा होतो. एकही क्षण नजर हटली, एखादा संवाद अगदी शब्द निसटला तर खूप काही गमावले जाईल, हे पहिल्या काही क्षणातच लक्षात आले. श्वास रोखत, एक एक प्रसंग डोळ्यात उतरवून घेत रसिक त्यात जणूकाही गावकरीच असल्यासारखे सामिल झाले होते. अनेक संवाद, प्रसंगांना ‘ओह...अरेरे...हं...’ असा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे मिळत होता. एवढी ताकद सुतार यांच्या लेखणीत आणि संजय मोरे यांच्या दिग्दर्शनात, तमाम कलावंतांत होती. खरेतर एकच प्रयोग करण्याचे नियोजन होते. पण रसिकांची एवढी तुडुंब गर्दी झाली की तिथेच दुसरा प्रयोग करावा लागला. यावरूनही ही कलाकृती किती सखोल होती, याचा अंदाज येऊ शकतो.
जग एकसारखे कधीच राहत नाही. ते सारखे बदलत असते. पण हा बदल सुखाच्या दिशेने असला पाहिजे, अशी अपेक्षा असते. सगळ्यांची धडपड तीच असते. प्रत्यक्षात तसे होतेच असे नाही. किमान भारतात, महाराष्ट्रात, मराठवाडा-विदर्भात ते झालेले नाही. ग्रामीण भागात तर नक्कीच नाही. निसर्गाचा कोप, बिघडलेली समाज व्यवस्था, सरकारी यंत्रणेकडून होणारे शोषण या साऱ्यांमुळे आपली खेडी रोगट, कुपोषित होत चालली आहेत. हजारो वर्षांपासून सुरू असलेले महिलांना उखळात टाकून कुटण्याचा उद्योग अजूनही सुरूच आहे. इंग्रज जाऊन सत्तर वर्षे उलटून गेली. त्यांची जागा नव्या आणि इंग्रजांपेक्षाही खतरनाक व्यवस्थेने घेतली आहे. सुबत्तेची सूज काहीजणांच्याच अंगावर झुलीसारखी चढली आहे. आणि झूल चढवलेली हीच मंडळी इतरांचे जगणे कठीण करत आहेत. स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना कळालेलाच नाही. स्वातंत्र्यातून येणारी जबाबदारी स्वीकारण्यास ते तयार नाहीत. त्यांना बेलगाम जगणे हवे आहे. जाती, धर्माचा शिताफीने वापर करून दुसऱ्यांचे शोषण करण्यासाठीच ते धावत आहेत. अशी अनेक पैलूंची मांडणी गावकथामध्ये आहे.
सौम्य व्यक्तिमत्वाचे असले तरी बालाजी सुतार यांची लेखणी अतिशय टोकदार, कसदार आहे. मराठी मुलुखातील खेडेगाव त्यांच्या नसानसात आहे. गाव म्हणजे नेमके काय आहे. तिथे खरंच कोण राहतं आणि कोणाची पाळमुळे जमिनीत रुतली आहेत. गावे उद्‌ध्वस्त का होत आहेतॽ खरंच जागतिकीकरणामुळे गावांवर नांगर फिरत आहे काॽ गावातले तरुण काय करत आहेतॽ महिलांचे जगणे किती जिकीरीचे झाले आहेॽ जातीय राजकारणाने कोणाचे भले अन्‌ कोणाचे भले होत आहेॽ ज्यांना आरक्षण मिळाले तेच राज्य करतायत की त्यांच्याआडून अजून कोणी सत्तेच्या दोऱ्या हातात ठेवल्या आहेतॽ अशा साऱ्या प्रश्नांचा वेध ते घेतात. केवळ वेध घेण्यावर थांबत नाहीत तर त्याची अतिशय निडरपणे उत्तरेही देतात. तिखटात बुडवलेल्या चाबकाचे फटके समाज व्यवस्थेवर ओढतात. ‘गावकथा’मध्ये त्यांनी एक एक शब्द अतिशय मोजून, मापून दिला आहे. त्यामुळे हे नाट्य पाहता पाहता मनाभोवती वादळ निर्माण करते. नाट्यगृहात बाहेर पडल्यानंतरही हे वादळ घोंगावतच राहते. एवढ्या ताकदीच्या लेखनाला तेवढ्याच प्रभावीपणे रंगमंचावर अवतरित करण्याचे काम संजय मोरे यांनी विलक्षण प्रवाहीपणे केले आहे. कथा, कविता, ललित लेखनातील विस्तारलेला एक अख्खा गाव. त्या गावाचे जीवन त्यांनी ऐंशी मिनिटांच्या कालावधीत ज्या कसबीने जिवंत केले त्याला तोडच नाही. साऱ्या व्यक्तिरेखा एकात एक गुंतलेल्या तरीही त्या स्वतंत्रपणे येतात आणि पुन्हा एकमेकांत मिसळून जातात. पुन्हा विलग होतात आणि काही क्षणांनी एकमेकांशी नाते सांगू लागतात, हा अजब अनुभव मोरे यांच्यातील दिग्दर्शकीय पकड, कौशल्य सांगणाराच आहे. त्यांनी पारंपारिक चौकट नसलेल्या संहितेची रंगमंचीय अवतरणासाठी संगतवार मांडणी, काँपोझिशन्स, संवाद शैलीसाठी घेतलेली मेहनत क्षणोक्षणी जाणवत राहते. कोणत्या प्रसंगात आपल्याला काय सांगायचे आहे आणि कोणामार्फत ते पोहोचवायचे आहे. याची अचूक सांगड त्यांनी घातली आहे. संजय ठाकुर, महेंद्र प्रकाश, विनोद वणवे, अनिता डेंगळे, श्रीकांत शिवाजी, ऋताली वैद्य, रश्मी साळवी, तुषार हांडे, ए. जी. हर्षा, अरबाज मुलानी या तरुण, प्रतिभावान कलावंतांशिवाय हे नाट्य एवढ्या खोलीवर जाऊच शकले नसते. प्रत्येकजण भूमिकेत शिरलेला आणि ती जगणारा. त्यांचा रंगमंचावरील वावर, भूमिकेची समज अचंबित करणारी. जणू काही आपण खरेच गावातील मंडळींना पारावर, चौकात भेटत आहोत. ते आपल्याशी बोलत आहेत. त्यांचे म्हणणे मांडत आहेत. गाऱ्हाणे सांगत आहेत, असे वाटत होते. ‘गावकथा’ मनाच्या तळापर्यंत उतरवण्यात मयुर मुळे, दीप डबरे यांच्या संगीताचाही मोलाचा वाटा आहे. दोन प्रसंगांना जोडण्यात, त्यांना आशयघन करण्यात संगीतकार यशस्वी ठरले आहेत. त्यांना शिवानी कंधारकर, अनिरुद्ध गोरे, गोपाळ तिवारी यांची सुरेख साथ मिळाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये महत्वाच्या पदावर, राजकारणात असूनही सर्वांना सोबत घेऊन चालणारे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव निलेश राऊत आणि त्यांचे सहकारी सुबोध जाधव यांच्यामुळे पुण्यातील रंगदृष्टी संस्था निर्मित हा अप्रतिम प्रयोग औरंगाबादकरांना पाहण्यास मिळाला. त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद. यापुढील काळात त्यांच्याकडून अशाच कसदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होईल, अशी अपेक्षा नक्कीच करता येईल.

No comments:

Post a Comment