Sunday 24 May 2020

हायवेवर कोणी टाकला मृतदेह?


मी आत्मानंद. मला पोलिस कंप्लेंट नोंदवायची आहे, असं तो पस्तिशीतील तरुण म्हणाला. तेव्हा इन्सपेक्टर गायकवाडांना त्याच्या चेहऱ्याकडं पाहून वाटलं की, बहुधा दुचाकी किंवा मोबाईल चोरी असावी. फारच झालं तर घरफोडी असावी. म्हणून त्यांनी त्याला बाहेर हवालदार आहेत. त्यांच्याकडे जा, असा सल्ला दिला. पण त्यानं ऐकलं नाही. गायकवाडांसमोरची खुर्ची ओढून घेत त्यावर बसकण मारली. आणि ढसढसा रडू लागला. गायकवाडांनी पटकन आवाज देऊन दोन-तीन सहकाऱ्यांना बोलावून घेतलं. एकानं ग्लासभर पाणी पिलं. एक घोट पिल्यावर आत्मानंद थोडासा सावरल्यासारखा झाला. आणि म्हणाला, साहेब, माझी कंप्लेंट घ्या. माझी बायको पळून गेलीय. नऊ वर्षांचा संसार सोडून गेलीय ती. शुक्रवारी पहाटेच्या वेळी मी दूध आणण्यास गेलो. तासभर फिरून, व्यायाम करून, दूध घेऊन आलो. तर ती गायब होती. म्हणजे बहुधा मध्यरात्रीच केव्हातरी गेली असावी. मग मी तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. आत्या आहे तिला फक्त. पण ती नव्हती त्यांच्याकडं. येईल दोन तीन दिवसांनी राग शांत झाल्यावर, असं वाटलं. म्हणून वाट पाहिली. आणि आज तुमच्याकडं आलोय. एवढं सगळं एका दमात सांगून तो थांबला. गायकवाडांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला. हवालदार साबळेंना सांगत तक्रार नोंदवून घेतली. मिसेस आत्मानंद म्हणजे रिद्धिकाच्या फोटोवर नजर फिरवली. हजारात एक आहे, चेहरा आणि एकूण व्यक्तिमत्व, असं त्यांनी मनात मत नोंदवलं. आणि दुपारनंतर आत्मानंदच्या घराची पाहणी करण्यास गेले. एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम असलेला आत्मानंद सहा मजली अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर राहत होता. तीन बेडरुमचा फ्लॅट होता. दोन कार होत्या. एक बायकोसाठी, एक स्वतःसाठी. एक मुलगा. तो पाचगणीला असतो. एकूणात संपन्न घरातील ती महिला का निघून गेली असावीॽ गायकवाडांनी माहिती घेणं सुरू केलं. तेव्हा समोर आलं की, आत्मानंद कमालीचा देवभक्त. रोज सकाळ, संध्याकाळ घरात होम हवन. मंत्र जाप. तर जेमतेम बारावी पास असलेली रिद्धिका त्याच्या उलट. काहीशी उथळच. नवऱ्याची चांगली कमाई असली तरी आपणही काहीतरी उद्योग केला पाहिजे. चार पैसे कमावले पाहिजेत, असं तिला वाटत होतं. म्हणून तिनं साड्या, दागिने, खाद्य पदार्थ विक्रीचा घरगुती व्यवसाय सुरू केला होता. त्यात तिचा हळूहळू जम बसू लागला होता. त्यानिमित्ताने काहीजणांची ये-जा सुरू झाली होती. त्यात एक होती मीना. तिच्यासारखीच व्यावसायिक. मीनाचा नवरा अभय. एकदम देखणा आणि कायम खुसखुशीत विनोद सांगणारा. साड्यांचा पुरवठा करणारा विशालही तरुणच. पण एकदम शांत वृत्तीचा. याशिवाय अपार्टमेंट सोसायटीचे चेअरमन धनंजयही काहीना काही निमित्त काढून आत्मानंदच्या फ्लॅटमध्ये ये-जा करत होते. पण ते बरेच वयस्कर होते. उथळ रिद्धिकावर नजर ठेवणे हा आपला उद्देश असल्याचं ते त्यांच्या पत्नीला सांगायचे. धनंजयरावांशी बोलल्यावर इन्सपेक्टर गायकवाडांना कळालं की, आत्मानंदला रिद्धिकावर संशय होता. तिचं कुठंतरी प्रेम प्रकरण सुरू आहे, असं त्याला वाटत होतं. त्यावरून त्यांच्यात जोरदार धमश्चक्री होत होती. त्यामुळंच ती वैतागून गेली असावी. मग गायकवाडांनी सगळ्या पोलिस ठाण्यांना, खबऱ्यांना रिद्धिकाचे फोटो पाठवले. तेव्हा आठ-दहा दिवसांत काहीतरी हाती लागेल असं त्यांना वाटलं. पण तीन महिने उलटून गेले तरी रिद्धिका बेपत्ताच होती. तिचा मोबाईल तर घरीच होता. त्यामुळं लोकेशन कळण्याचा संबंधच नव्हता. शिवाय तिनं काही चिठ्ठीही ठेवली नव्हती. पोलिसांचे एक पथक पाचगणीलाही जाऊन आलं. पण ती मुलाला भेटण्यासाठी गेली नव्हती. अभय, विशाल, मीनावर प्रश्नांचा वर्षाव केला तरी धागा सापडत नव्हता. आणि अचानक हायवेवर एका कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची बातमी त्यांच्यासमोर आली. हा तरुण आत्मानंदचा दूरचा चुलतभाऊ सुखानंद होता. एकटाच रहात होता. साड्या, दागिने पुरवठा करणाऱ्या एका कंपनीत मोठ्या पदावर होता. पहिल्या वेळेला पाचशे साड्या देण्यासाठी आत्मानंदच्या घरी आला होता. नंतर फिरकलाच नाही. आत्मानंदशी त्याचे ठीकठाक संबंध होते. कोणी केला असावा सुखानंदचा खून. मृतदेहाजवळच्या मोबाईलने महत्वाचे धागे मिळवून दिले. तीन दिवसांतच इन्सपेक्टर गायकवाड खुन्याजवळ पोहोचले.   

No comments:

Post a Comment