Tuesday 19 October 2021

कितीजण विहीर उपसतील?

केवळ औरंगाबाद, मराठवाडाच नव्हे तर पूर्ण राज्यभरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वर्तुळात प्रचंड वावर असलेले प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा भयानक पद्धतीने खून झाला. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजेपासून सोशल मिडिआवर ही बातमी व्हायरल होताच खळबळ उडाली. उच्चवर्गीय वसाहतीत, आलिशान बंगल्यात राहणाऱ्या प्राध्यापकाचा खून म्हणजे चोरी किंवा दरोड्याचा प्रकार असावा, असेच वाटले. पण घरातून एकही वस्तू चोरीस गेली नाही. कुटुंबातील इतर सदस्यांना धक्काही लागला नाही. शिंदेंना चाकूने भोसकले नाही तर त्यांचा गळा चिरला, दोन्ही हातांच्या नस कापण्यात आल्या. हे कळाल्यावर काहीतरी वेगळाच प्रकार आहे, या दिशेने चर्चा सुरु झाली. प्रा. शिंदे देखणे, उमदे, लोकप्रिय हायप्रोफाईल व्यक्तिमत्व. त्यांच्या पत्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद केंद्रात प्राध्यापक. त्यामुळे घटनेचं महत्व लक्षात घेऊन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा फार झालं तर सायंकाळी मारेकरी जेरबंद होणार अशीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी ठोस पुरावेच नव्हते. मोठ्या शिताफीने कट रचून प्रा. शिंदेंना मारण्यात आलं होतं. कुठेही मारेकऱ्याच्या हाताचे, पावलांचे ठसे नव्हेत. शिंदेशी झटापट झाल्याच्या खाणाखुणा नव्हत्या. रात्री बारानंतर घरात कोणी आलं आणि बाहेर पडलं, असंही दिसत नव्हतं. मनीषा शिंदे आणि त्यांची मुले एकच घटनाक्रम सातत्याने सांगत होती. त्यात विसंगती सापडत नव्हती. त्यामुळे मारेकरी समोर दिसत होता. त्याचा वावर, त्याचे बोलणे, खून होण्यापूर्वी त्याने वापरलेला मोबाईल डेटा हे सारे त्याच्या दिशेने जात असले तरी त्याच्याभोवती घेराबंदी करणे पोलिसांना मुश्किल होत गेले. मग त्याला बोलते करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. एसआयटी स्थापन झाली. काही महिला अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली. चारही बाजूंनी हलकल्लोळ केल्यावर मारेकऱ्यानं हत्यारे शिंदेंच्या बंगल्याजवळील विहीरीत टाकल्याची कबूली दिली. आणि वडिलांना का मारले, याचेही एक कारण सांगितले. अनेक तास विहीरीतील पाणी, कचरा उपसून हत्यारे काढण्यात आली. मग ही घटना कशी आणि का घडली. याचा उलगडा १८ ऑक्टोबरला सायंकाळी पोलिसांनी केला. तरीही पूर्ण उलगडा झालाच नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. कारण प्रा. शिंदेंवर हल्ला होताना त्यांच्या पत्नी, मुलगी, आई-वडिलांना कसे कळाले नाही. कळाले तर त्यांनी त्याला रोखले का नाही. वडिल रक्ताच्या थारोळ्यात असताना गाढ झोपेतील आईला न उ‌ठवता मुले रुग्णवाहिका आणण्यासाठी घराबाहेर कशी पडू शकतात. प्रा. शिंदे यांच्या आई-वडिलांनी या बद्दल नेमकी काय माहिती दिली. मुलीविषयी शिंदेची विचित्र वागणूक होती काय? एकूणातच शिंदे कुटुंबातील परस्परांशी नाते कसे होते, याविषयी उलटसुलट माहिती येत आहे. त्याची ठोस उत्तरे उलगड्यातून मिळत नाहीत. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू होताच जोडीदाराचा नवा चेहरा दिसल्याचे शेकडो पती-पत्नीला वाटू लागले. त्यातूनही काही दुरावलेले संबंध जुळून आले. धाडस दाखवून अनेकांनी स्वत:च्या खासगी आयुष्याची गाळाने भरलेली विहीर उपसली. कुटुंब हीच खरी संपत्ती. प्रामाणिकपणे नाती जपली तरच जीवन आनंदी ठरते, याचा शोध त्यांना लागला. अशी विहीर उपसण्याची आणखी किती जणांची तयारी आहे, हा प्रा. शिंदे प्रकरणाने समाजासमोर उभा केलेला खरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment